फॉलोअर

०४ जुलै २०१६


🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩
दिनांक 3 जुलै 
जेजुरी  सतीश मोरे
सासवडचे दोन मुक्काम झाल्यावर खरी वारी सुरू झाली.  म्हणजे आळंदी ते पुणे ते सासवड दरम्यान तंबूत रहायची संधी सासवडला मिळते. तंबूत रहायचा आनंद, मजा आणि सजा दोन्ही सकारात्मक घेऊन खरंच हा एन्जॉय घेतलाच पाहिजे. दोन दिवस सासवडला तंबूत राहीलो. आज म्हणजे रविवारी ममुक्कामाला जेजुरीला जायचे होते.  सकाळी दोन वाजता आमच्या तंबूतील एक जण चावळत ओरडले,  सारे जागे झाले. बाहेर काहीजण  उठले होते.
नुकताच जोरदार  पाऊस पडून गेला होता. चला उठा आता सारे म्हणून त्याच व्यक्तीने सर्वाना जागे केले.  खुप झोप  आली होती,  पण  इतर जण  उठून बॅगा भरत होते.  मी पण पॅक करून माझे अंथरूण ट्रक मध्ये नेऊन ठेवले.  सारे तयार होऊ लागले,  नैसर्गिक विधी साठी वारीत मोकळ्या रानात जावे लागते. हा फार मोठा योग  असतो, पण तो योग झाला की दिवसाचे काम होते,  दिवस  आनंदात जातो.
तयार होऊन साडे तीन वाजता आम्ही 15 जणांचा ग्रुप जेजुरीला जाण्यासाठी बाहेर पडलो.  पावसाचा अंदाज होता, त्यामुळे रेनकोट शर्ट घातला,  सॅक पाठीवर घेऊन चालायला लागलो. 
रस्त्यावर खुप वारकरी होते, वाहतूक पण सुरू झाली होती. सासवड शहरात पोलीस होते, पण शहराबाहेर जेथे ररस्ते एकत्र येतात,  तेथे पोलीस नसल्याने काही काळ विस्कळीत झाली,  पण चालणारे वारकरीच पोलीस झाले व वाहतूक कोंडी फोडली. पावणे चार वाजता अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. कुठे थांबायचे,  सगळीकडे अंधार, मग आम्ही चालायचे ठरवले.  
मित्रांनी प्लॅस्टिक कागद खोळ तयार केली. या दरम्यान सगळी कडे खोळ घातलेले  वारकरी दिसू लागले. पावसाचा जोर वाढू लागला. पण थांबू शकत नव्हतो, कुठे निवारा नव्हता. चहा टपरी वर काही वारकरी थांबले होते, आम्ही चालत राहिलो.
पाऊस थांबेल असे वाटत होते,  पण अर्धा तास झाला तरी सुरूच होता. हळूहळू रेनकोट मध्ये पाणी जाऊ लागले, चहा साठी थांबलो तेव्हा पाहीले  रेनकोट पॅन्ट न घातल्याने पाणी जीन्स मध्ये जाऊ लागले आहे.  मग  पॅन्ट मधील साहित्य, मोबाईल  शर्ट खिशात ठेवले. पुन्हा चालू लागलो. सारे वारकरी प्लॅस्टिक कागदाची खोळ करून चालत होते,  सारे एकसारखे दिसत होते.  आपल्या माणसांची कपडे,  टोपी किंवा बॅग कडे लक्ष ठेवून त्याच्या मागेच रहायचे,  तरच सारे एकत्र जाऊ शकतो.  मधूनच कराडकर  माऊली,  आहेत का मागे, असा  आवाज द्यायचा  अन खात्री करून चालायचे. तरीपण अचानक  एक मोठी दिंडी आली आणि  आमच्या ग्रुप मधील सात जण बाजूला झाले.  शोधले पण उपयोग नाही झाला, अखेर आम्ही  8 जण  एकत्र चालू लागलो.  पावसाचा जोर कायम होता,  आता साडे चार वाजून गेले होते.  मागे सॅकला हात लावून पाहिले तर खाली पाणी गळत होते. लगेच सर्वाना वारकरी  महाप्रवाहातून बाजूला घेतले,  बॅगेतील टॅब, पावर बॅक प्लॅस्टिक पिशवीत घालून खरात माऊलीचे बॅगेत सुरक्षित ठेवले,  दुसरा मोबाईल लोहार माऊली कडे ठेवायला दिला. सॅक वाॅटर प्रुफ होती पण सलग  एक तास पाऊस पडल्यानंतर तिचे काय होणार होते? आता आम्ही झानोबा माऊली तुकाराम चा घोष सुरू केला. अतिशय गोड आवाज असणारे खरात आणि बाळू सकपाळ यांच्या मागे आम्ही भजन करत राहीलो.  दोन तास झाले,  तीन तास झाले पाऊस सुरूच होता.  आता माझी जीन्स कंबरेचा भाग वगळता  पुर्ण भिजलेली होती,  शर्ट पण भिजला होता. वुडलॅन्ड शुज मध्ये पाणी जाऊन साॅक्स ओले झाले होते.  तीन तास ट्रॅकींग इन फुल रेन चा आनंद आम्ही घेत होतो.  सर्दीने त्रस्त  असूनही पर्याय नव्हता,  माझी सर्दी पावसात पळून गेली. मनात विचार आला,  येवढे सारे लोक चालत आहेत,  अनेकांच्या डोक्यावर काहीच नाही,  चपला तुटक्या आहेत,  गुडघ्या पर्यंत सारा भाग ओला चिंब झाले आहे,  या लोकांना काही होत नाही,  मला पण काहीच होणार नाही,  माऊली पाठीशी उभे  आहेत.


सहा वाजले,  पाऊस थोडा कमी झाला.  जेजुरी आठ किलोमीटर होते अजून.  ठाणे भिवंडी च्या वारकरी सेवा मंडळाचे सदस्य भर पावसात सर्वाना अडवत होते,  माऊली गरम शिरा खा, काहीजण प्लेट हातात घेऊन वारकर्याना वाटत होते. आम्ही पण थांबून पावसात उभे राहून नाश्ता केला.  फोटो काढून टॅब पुन्हा आत ठेवला.  काहीनी घरी फोन केला,  कराडला पाऊस आहे का विचारले.  पियुशला फोन करून पाऊस अनुभव  सांगितला.  पुढे चालू लागलो.  जेजुरी दोन किलोमीटर अंतरावर होती. तिथे जाऊन काय करायचे,  तंबूचा ट्रक मागे होता.सात वाजता निघणार होता. तो ट्रक जरी आला तरी पालखीतळावर पाणी साचले होते,  चिखल झाला होता,  मग तंबू कोठे उभारणार  असा प्रश्न पडला.  बाजीराव नाना जगताप यांना फोन केला तर  अजून ट्रक निघाला नाही,  पाऊस खुप आहे,  नऊ वाजतील निघायला,  असे त्यांनी सांगितले.  काय करायचे जेजुरीला जाऊन,  कोठे बसायचे,  मी नखापासून डोक्यापर्यत भिजलो होतो,  अशा परिस्थितीत  ओले कपडे  अंगावर ठेवून किती वेळ बसणार, असा विचार केला. 
शेवटी जेजुरी पुढारी वार्ताहर नितिन राऊत यांना फोन लावला. माझे सोबत  सात लोक आहेत, आम्हाला कुठे तरी रूम द्या,  शेड द्या, अडोसा द्या,  किमान कपडे बदलून तासभर बसायला जागा द्या,  अशी विनंती केली.  त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात जखमी  असल्याने त्यांना काम होते,  खुप गडबड होती,  शिवाय माऊली बातमी द्यायची होती,  तरीही त्यांनी मोठ्या मनाने घरी यायला सांगितले. पाऊस कमी झाला होता, जेजुरीला साडे आठ वाजता पोहोचलो.  घालायचे कपडे मागे ट्रक मध्ये होते, त्यामुळे नवीन  ट्रॅक सुट,  शर्ट, बनियन, अंडरवेयर खरेदी केली . 9 वाजता  आम्ही राऊत यांच्या घरी पोहोचलो,  त्यांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले.  मोठा हाॅल, एक रूम अटॅच बाथरूम आमच्या ताब्यात दिला. निवांत झोपा,  आराम करा, असे सांगून ते कामाला लागले.
दहा वाजता आमच्या पुढे मोठी प्लेट भरून पोहे  आले.  नाश्ता झाले वर जेवण करून जायचे असे सांगून राऊत साहेब व त्याचा मुलगा जाॅन्टी जेजुरी गडावर न्युज कव्हरेज साठी गेले. आम्ही आराम केला.
आकराच्या दरम्यान  आम्ही भजन सुरू केले, बारा वाजता आरती साठी सारे कुटुंब  आले.  घरातील  दु:ख विसरून सारे जणानी  आम्हाला जेवण वाढले. बाजरीची भाकरी,  मटकीचा रस्सा,  पापड,  शशेंगदाणा चटणी,  लोणचे  असा मेनू होता. आग्रहाने त्यानी वाढले. चार वाजेपर्यंत  आम्ही त्याचे घरातच  आराम केला . आमचा  ट्रक  ट्राफिक मध्ये  अडकला होता, त्यामुळे  आणखी काही वेळ थांबलो. पाच वाजता आमच्या मुक्काम ठिकाणी जायला  बाहेर पडलो. नवीन पालखी तळावर चिखल असल्याने ट्रक जाऊ शकत नव्हता,  त्यामुळे जुन्या तळावर येत आहे,  असे बाजीराव नानानी फोनवर सांगितले.  आम्ही तिथे वाट पहात बसलो.  साडे सहा वाजता ट्रक आला. तिथेही चिखल होता,  घाण होती,  स्वच्छता केली. 

 
रोज दुपारी एक वाजता तंबू उभारले जातात, आज पावसामुळे साडे सात वाजता हे काम पूर्ण झाले. चिखलात,  मिळेल त्या जागेवर नानाच्या नेतृत्वाखाली अशोक शिंदे,  महेंद्र तवर, खरात, विजय पवार, विशाल नलवडे,   लोहार,  बाळू संकपाळ  मनोहर जगताप,  शिवाजी राव शिरवडेकर , यांनी हे काम पूर्ण केले. दमून आलेल्या वारकरी,  टाळकरी यांनी परिस्थिती समजून घेत तंबूचा रस्ता पकडला.  स्वयंपाक साहित्याची गाडी आली होती पण पाणी टॅकर नवीन तळावर गेला, अडकला.  त्यामुळे स्वयंपाक कसा करायचा प्रश्न होता.  कुठुन तरी  आठ दहा बादल्या पाणी आणून नामदेव कुंभार,  संभाजी कुंभार,  दिलीप काकडे याच्या नेतृत्वाखाली  संजय काकडे,  सुनिल यादव,  श्रीपती शिर्के,  अरूण साळुंखे, सुरेश काकडे,  नामदेव कुंभार या स्वयंपाकी टिमने काम सुरू केले. महिला वर्ग तर या कामासाठी खुप आघाडीवर होता.  दरम्यान DYSP मितेष घट्टे यांचे आगमन झाले.  कराडकर मठाचे अध्यक्ष माने गुरूजी यांनी त्यांना जेवण करून जावा असा  आग्रह धरला.  आमचा पाणी टॅकर अडकला आहे, काही तर करा,  असेही गुरूजीनी सांगितले.   घट्टे सरांनी याअगोदरच आपण  कळवल्याचे सांगितले. पाचच मिनिटात साडे नऊ वाजता पाणी टॅकर आला.
इकडे जेवण तयार होत होते, तिकडे दिवसभर कंटाळलेले वारकरी तंबूत बसले होते . दहा वाजता पंगती पडल्या. हातात ताट घेऊनच अनेक जण जेवले, काही जण तंबूत जाऊन बसले. 
अजून खुप लिहीता येईल, पण लेखन मर्यादा.
आजचा दिवस कष्टात, पावसात गेला,
आयुष्यात पहिल्यांदा साडे चार तास पावसात चाललो
पण कसलाही त्याचा त्रास वाटला नाही. 
माऊलीनी सारी सोय केली होती.
माऊली माऊली







- सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...