अनियंत्रित वाहतूक व्यवस्थापनाचे
पोलिसांसमोर मोठे आव्हान
तरडगाव सतीश मोरे
नैसर्गिक
परिस्थिती, दुष्काळ याचा थोडाफार होणारा परिणाम वगळता प्रत्येकवर्षी
वारीत किमान 5 लाख लोक सहभागी होत असतात. वारी म्हणजे भक्तीचा अखंड उत्साह.
घरामध्ये सुरू असलेली वारीची अखंड परंपरा पुढे सुरूच ठेवण्यासाठी अनेकजण
वारीत सहभागी होत असतात. उन, वारा, पाऊस, वय, आजार, घरांतील अडचणी याची
कसलीही पर्वा न करता वारकरी भक्तीच्या या प्रवाहात स्वत:ला झोकून देतात. 13
दिवस हा प्रवास सुरू असतो. तरुण, वृद्ध, स्त्री- पुरूष, सशक्त, अपंग असे
सारेचजण वारीत सहभागी होतात. गेल्या काही वर्षांत वारीमध्ये सहभागी
होणाऱ्या वारकऱ्यांची अचानक वाढलेली मोठी संख्या प्रशासना समोरील मोठे
आव्हान राहिलेले आहे.
आळंदी ते
पंढरपूर दरम्यान ..................... एवढे मुक्काम असतात. मुक्कामातील
सर्वात मोठे शहर म्हणजे पुणे. या शहरात दोन दिवस वारकऱ्यांचा मुक्काम असतो.
महानगराला वारकऱ्यांचे हे भक्तीचे ओझे सोसणे किंवा पेलवणे तसे सोपे जाते.
पाणी, निवास आणि खाद्य व्यवस्था पुणेकर चोख पार पाडतात. थोडीफार वाहतूक
व्यवस्था कोलमडते मात्र दोन दिवस पुणे पोलिस अखंडपणे प्रयत्न करीत असतात.
वारीच्या वाहतूक व्यवस्थेत पुणे, सातारा आणि सोलापूर पोलिस यांना फार मोठे
प्रयत्न करावे लागतात. या तिन्ही जिल्ह्यातील सुमारे 50 हजार पोलिस तसेच
एसआरपी, स्थानिक युवक आणि चोपदार फौडेशन 17 दिवस वारी वाहतूक व्यवस्थापन
करीत असतात. माऊलीमय झालेले वारकरी पोलिसांसाठी काही अडचण नसते. मात्र
पालखी सोहळा पहावयास आलेले भाविक, हौसे-गवसे आणि गेल्या काही वर्षांत
वारीमध्ये वाढलेल्या वाहनांची संख्या पोलिसांसाठी मोठे आव्हान उभे राहिले
आहे.
आळंदी
ते पुणे आणि पुढे सासवड ते नीरा या दरम्यान पुणे जिल्हा आणि पुणे ग्रामीण
पोलिस वारी वाहतूक व्यवस्थापन करतात. लोणंद ते तरडगाव दरम्यान सातारा
जिल्हा पोलिसांवर ही जबाबदारी असते. पालखी सोहळा नातेपुते गावात प्रवेश
केल्यानंतर सोलापूर जिल्हा पोलिस ही जबाबदारी स्वीकारतात. वारीचा त्या
जिल्ह्यात प्रवेश होण्या अगोदर अनेक दिवस या वाहतूक व्यवस्थापनावर पोलिस दल
काम करीत असते. इतर जिल्ह्यांतून वाढीव कुमक मागविली जाते. पालखी सोहळ्यात
पालखीच्या पुढे असणाऱ्या 27 दिंड्या आणि पालखीच्या मागे असणाऱ्या 210
नोंदणीकृत दिंड्या तसेच त्यांच्या पाठीमागे सुमारे 250 नोंदणी नसलेल्या
दिंड्या आणि यामध्ये सहभागी असलेले वारकरी, टाळकरी, विणेकरी एवढाच पालखी
सोहळ्याचा भाग असतो. यामध्ये दोन ते अडीच लाख वारकरी सहभागी असतात. मात्र
या सोहळ्याच्या पुढे कोणाचेही नियंत्रण नसलेला मोकळा समाज हा अडीच- तीन
लाखांच्या घरात असतो. अशाप्रकारे पाच लाख वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग सतत
कार्यरत ठेवणे, कोठेही ट्राफिक अडथळे येऊ न देणे, पालखी दर्शनासाठी आलेल्या
भाविकांमुळे अडचणी निर्माण होऊ न देणे ही प्रमुख जबाबदारी पोलिसांच्याकडे
असते. तिन्ही जिल्ह्यांचे पोलिस एकमेकांशी सतत संपर्कात असतात.
पालखी
सोहळा आणि त्यामध्ये सहभागी वारकरी यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा
काम करते. तर मोकळ्या समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांना कोणतेही
अडथळे येऊ नयेत म्हणून व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा
कार्यरत असते. पालखी सोहळ्यातील वारकरी म्हणजे शिस्तीचा मूर्तीमंत अनुभव
असतो. मात्र मोकळा समाज पूर्णपणे स्वतंत्र, अनियंत्रित आणि खुला असतो.
त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे हे वारकरी कोठेही थांबतात. या
दरम्यान काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशावेळी पोलिस
यंत्रणा "माऊली... माऊली' करून या वारकऱ्यांना विनंती करते आणि वाहतूक
व्यवस्था खुली करते.
मोकळा
समाज आणि पालखी सोहळ्यात गेल्या काही वर्षांत वाढलेली वाहनांची संख्या हे
पोलिसांसमोरील मुख्य आव्हान आहे. दिंडी आणि त्यामध्ये सहभागी वारकरी यांचे
निवासाचे साहित्य, भोजन व्यवस्था आणि रोजच्या वापरातील साहित्य वाहून
नेण्यासाठी वाहनांची गरज असते. ट्रॅक्टर, टेम्पो आणि ट्रक, पाण्याचा टँकर
ही प्रमुख वाहने असतात. मात्र अलिकडे दिंडी प्रमुखांच्या वातानुकूलित कारची
तसेच जीपची यात भर पडली आहे. या वाहनांचा आकडा कुठेही नोंद नसला तरी पालखी
सोहळ्यात तसेच मोकळ्या समाजात मिळून सुमारे 20 हजार वाहने असतात. ही वाहने
डाव्या बाजूने सतत धावत असतात. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या उजव्या बाजूने
चालणारे वारकरी आणि डाव्या बाजूने चालणारी ही वाहने म्हणजे पोलिसांसमोरील
प्रमुख आव्हान असते.
मुख्य
पालखी सोहळ्यातील कोणीही वारकरी स्वत:ची दिंडी सोडून जात नाही. मात्र हा
सोहळा पहावयास आलेले भाविक आणि मोकळ्या समाजातील लाखोंच्या संख्येने येणारे
वारकरी कुठेही घुसत असतात. वारीतील वाहनांचा वेग कमी असला तरी रस्त्याच्या
डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाणारे अनियंत्रित वारकरी रिस्क घेवून रस्ता
पार करीत असतात. या दरम्यान अपघातही होतात. माऊलींच्या कृपेने त्या अपघातात
कोणीही मयत झालेले नाही किंवा गंभीर जखमी होत नाही. मात्र या वारकऱ्यांवर
नियंत्रण कसे ठेवायचे हा पोलिसांसमोरील महत्वाचा प्रश्न असतो.
पोलिस
यंत्रणा वारकऱ्यांना कधीही रागावून बोलत नाही. किंबहुना तशी वेळच येत
नाही. मात्र थोडा रस्ता रिकामा मिळाला की भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि
बघ्यांची संख्या यांच्यावरील नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न
अपूर्ण पडतात. मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखी सोहळा निघाल्यापासून तो
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत रस्त्यावर पुढे-मागे 10 ते 15 किलोमीटर
वारकऱ्यांचा अखंड प्रवास सुरू असतो. या दरम्यान कोणकोणत्या ठिकाणी पोलिस
उभे करायचे याचे नियोजन असते. मुख्य रस्त्याला जोडणारे छोटे-मोठे रस्ते,
लहान-मोठी गावे या ठिकाणी पोलिस सज्ज ठेवले जातात. मात्र ही यंत्रणा कमीच
पडते.
चोपदारच वारीचे पोलिस अधीक्षक
पंढरीच्या
वारीमध्ये पोलिसांसमोर वारकरी लोकांना नियंत्रित करण्यासाठी तसा फार मोठा
त्रास होत नाही. कोणी वारकऱ्यांने काहीही चुकीचे केले तर दुसरा वारकरी "ओ
माऊली.. हे बरोबर नाही', असे सांगतो आणि तात्काळ तो वारकरी मूळ प्रवाहात
येतो. मुळात 5 लाख लोकांवर नियंत्रण करण्यासाठी पोलिस यंत्रणा किती काम
करणार हा प्रश्न असतो. मुख्य पालखी सोहळ्याची शिस्त अतिशय सुंदर असते. यावर
नियंत्रण करण्यासाठी चोपदार अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडीत असतात.
पालखी सोहळ्याचे मुख्य पोलिस अधीक्षक खरे तर चोपदारच असतात. चोपदारांनी
दिलेल्या सूचना आणि आदेशाचे पालन पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी तंतोतंत
करतात. मात्र मोकळ्या समाजातील वारकऱ्यांना आवरण्याचे आणि त्यांच्यासाठी
वाहतूक व्यवस्था खुली ठेवण्याचे अवघड काम पोलिसांसमोर असते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा