फॉलोअर

१४ जुलै २०१६



🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 14 जुलै 
पंढरपूर  सतीश मोरे 

वाखरीत काल सायंकाळी पोहचले पासून खूप प्रयत्न केला पण नेट काय सुरू झाले नाही.  कसे होणार संत तुकाराम,  संत ज्ञानेश्वर महाराज,  सोपानकाका या मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे चार लाख वारकरी वाखरी येथे विसावले होते. वाखरी तळ फार मोठ्ठा आहे,  सर्व सुविधा उपलब्ध करून दिली होती,  पालिकेने.  खुप वेळ वाट पाहीली मात्र नेट सुरू झाले नाही,  तुम्ही सारे वाट बघत होता,  माझी वारी वाचण्याची.  पण नेट पुढे काय करायचे?साडे दहा वाजता पडलो,  झोप लागत नव्हती,  शेजारी  एका दिंडीत जागर सुरू होता. आकरा वाजणेच्या सुमारास झोप लागली. दरम्यान  एक वाजता जाग आली, नेट पाहीले,  3 G रेंज होती,  पटकन सर्व ग्रुपला,  तुम्हाला माझी वारी पाठवून दिली,  पुन्हा पडलो.  पहाटे अडीच  वाजता सहकार्यानी उठवले. चला तयार व्हा.   लगेच उठलो खरात माऊलीनी आंघोळीला नेले.  मुख्य रस्त्याला  अनेक नळ उभारले होते,  तिथे पोहोचलो. पाणी कमी होते,  गर्दी जास्त होती.  गडबडीत घुसलो आत,  उरकली आंघोळ. परत  आलो तयार होऊन निघालो दर्शनासाठी. 

तळावर खुप गर्दी होती.  पहिल्यांदा संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.  कमी होती गर्दी.  खुप जवळुन आणि निवांत  घेता आले दर्शन.  पुढे आलो सोपानकाका यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.  माऊली दर्शन  अनेकदा झाले होते,  पण  आज  आणखी  एकदा मन भरून दर्शन घेतले,  डोके टेकवून.  मन प्रसन्न झाले.  येताना बंडा तात्या भेटले.  चहा घेऊन साडे तीन वाजता पुन्हा तंबूत येऊन पडलो.  सकाळी साडे सहा वाजता  उठवले. ब्रश करून 
घेतला.  गरमागरम दुध वाटप सुरू होत, आमच्या साठी.  वाखरी मध्ये संताचा मेळा जमला होता.  पुन्हा एकदा फिरून आलो.  सारे डोळ्यात घातले. आता  उद्या पासून तंबूत रहायला मिळणार नाही, उठून लवकर चालावे लागणार नाही,  एकादशी झाली की वारी पुर्ण, सारे जण बोलत होते . दरम्यान तंबू उतरणे सुरू झाले, साहित्य ट्रक मध्ये टाकले. किचन मधे वडे तळायचे सुरू होते, तिथे गेलो.  पाणी देणारे थोरात टीमचे फोटो काढले. दहा वाजता पंगती पडल्या.  कालेकरांची पंगत होती.  पुरी, श्रीखंड, कुर्मा, भात,  वरण भात,  बुंदी आणि केळी. सर्दी खोकला मुळे पुर्ण वारीत फळे व श्रीखंड खाल्ले नाही.  जेवण झाल्यावर निघण्याची तयारी सुरू झाली तेवढ्यात रामभाऊ  आणि राजाभाऊ चोपदार यांचे आगमन झाले.  सारे जण जमले,  वारी कशी झाली,  काय कमी जास्त ,सारी चौकशी केली त्या दोघांनी. अनेकांना चोपदार बंधू सोबत फोटो काढायचा होता.  फोटो काढायचा मोबाईल माझ्या कडे  असल्याने पुर्ण वारीत सारे जण माझ्या मागे असायचे, खुप वेगळा भाव होता त्या माऊलींच्या मनात.  मी स्वतःला नशीबवान समजतो, या भोळ्या भाबड्या लोकासोबत मी राहीलो, त्याचे फोटो काढायला मिळाले.  चोपदार बंधुच्या आगमनाने सारेच खुलले. आमच्या शेवटच्या तळ मुक्कामाच्या आठवणी चोपदार  बंधुच्या भेटीने सुखद झाल्या.






साडे आकरा वाजता निघालो पंढरीच्या दिशेने.  वारीचा अंतिम टप्पा. पाडुरंगाचे गावाला जाताना गेली सतरा दिवस  अनेक गावे गेली, आता देवाचे गाव.  सहा किलोमीटर अंतर फक्त. चालू लागलो.  सगळीकडे बघेल तिथे फक्त दिंड्या,  वारकरी,  भाविक,  पोलिस,  दुकाने  आणि वाहने.  गर्दी होती खुप. कडक उन्हात वारीचा शेवटचा टप्पा पार पडला.  एक वाजता पंढरीत पोहचलो.  एसटी स्टँड बाहेर  आणले होते.  दुतर्फा फक्त वारकरी होते.  येणारे जाणारे.  आमची वेळ योग्य म्हणा किंवा नशीब म्हणा. समोरून तीन महान संताच्या पालख्या आल्या.  या पालख्या माऊली भेटीला निघाल्या होत्या.  संत नामदेव पालखी पंजाब , संत निवृत्ती नाथ पालखी त्रिंबकेश्वर  आणि दिड महिन्यांत सुमारे एक हजार किलोमीटर अंतर पार करून जळगाव मुक्ताईनगर येथून आलेली संत मुक्ताई पालखी अशा एका पाठोपाठ एक  समोरून आल्या. जवळून दर्शन घेतले.  



पुढे आलो. कृषि पंढरी प्रदर्शनासाठी खुप गर्दी झाली होती, चार वाजता मुख्यमंत्री येणार होते उद्घाटन करायला.  रेल्वे लाईन ओलांडून शहरात  आलो.  सगळीकडे वारकरी दिसत होते.  दोन वाजता मारूती बुवा कराडकर मठात पोहचलो. घामाघूम झालो होतो.  ऑफिस शेजारच्या रूममध्ये माझी व्यवस्था होती.  मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला. नेट सुरू होते, बायकोने लेकीचा फोटो पाठवला होता,  त्याच्या शाळेत आज पंढरीची वारी होती.  देवयानीने  डोक्यावर तुळस घेतलेला फोटो पाहून डोळे भरून आले. लेकीच्या  आठवणी जाग्या झाल्या.  डोळ्यातले पाणी थांबत नव्हते,  शेजारी महेश तवर होत,  म्हणून गेले,  लेकीचे प्रेम असेच असते! 

या आठवणीतच निवांत दोन तास झोपलो. 

साडे पाच वाजता फ्रेश होऊन पंढरपूर दर्शन करायला बाहेर पडलो एकटाच.  सारे रस्ते ओसंडून वाहत होते.  पाय ठेवायला पण जागा नव्हती.  एका मागोमाग एक दिंड्या शहरात प्रवेश करत होत्या.  माऊलींचा उत्साह पाहण्या सारखा होता.  तीन चार चौक पार करून उद्धव घाटातून चंद्रभागा तिरी आलो.  काय सुंदर चित्र होते ते. वाळवंटावरवैष्णवाचा मेळा भरला होता,  अनेक जण स्नानासाठी पात्रात उतरले होते. कुठे किर्तन सुरू होते,  तर कुठे नामसंकिर्तन. पालिकेने उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पात्र दुषित,  अस्वच्छ  आणि  खराब होऊ नये म्हणून काळजी घेतली होती,  उघड्यावर बसू नये यासाठी पथके कार्यरत होती.  पुंडलिक मंदीर परिसरात मोठय़ा प्रमाणात भाविक होते.  

सारे पहात,  फोटो काढत महाघाटातून वर  आलो. तिथे आळंदीचे डाॅ विश्वनाथ कराड यांचे वतीने पवित्र चंद्रभागा नदीच्या नित्य  आरतीचा शुभारंभ कार्यक्रम सुरू होता. मोठे स्किन लावले होते.  महादजी शिंदे सरकाराचा फार जुना वाडा पाहून गतवैभव उभे राहिले.  पुढे आलो,  लांबून विठ्ठल मंदिर दिसू लागले.  नामदेव पायरी जवळून पुढे आलो.  दर्शन बारी भव्य मंडप  इमारत आकर्षक सजवली होती,  लाईन मोठी होती. डाव्या हाताने पुढे आलो,  महाद्वार बाजूला. रूक्मिनी मंदीराचा कळस दिसला,  आणखी पुढे आलो विठ्ठल मंदिर दिसले.  लांबून नमस्कार केला.  

मुख्य रस्त्यावर  आलो.  खेळणी, प्रसाद,  बुक्का,  कुंकु, देवाचे साहित्य यांची दुकाने फुलली होती. मठात  साडे सात वाजता पोहचलो. थोडा पडलो आणि टॅबवर काम सुरू केले. साडे आठ वाजता बाजरीची भाकरी, मटकीचे पातळ कालवण खाल्ले.  पुन्हा काम सुरू केले .


सकाळी लवकर उठून स्नान करण्यासाठी जायचे होते.  नेट बंद होते.  सुरू होण्याची वाट बघत बघत पडलो. 



     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...