दिनांक 5 जुलै
लोणंद सतीश मोरे
वाल्हे छोटे गाव आहे, त्यामुळे मोबाईल टॉवर्स जाम झाले होते, दुपारी दोन वाजता नेट बंद पडले, सुरूच झाले नाही. त्यामुळे काल रात्री वारी पोस्ट करता आली नाही. एक फायदा झाला लवकर म्हणजे साडे 9 वाजता वाजता झोपलो.
लोणंद सतीश मोरे
वाल्हे छोटे गाव आहे, त्यामुळे मोबाईल टॉवर्स जाम झाले होते, दुपारी दोन वाजता नेट बंद पडले, सुरूच झाले नाही. त्यामुळे काल रात्री वारी पोस्ट करता आली नाही. एक फायदा झाला लवकर म्हणजे साडे 9 वाजता वाजता झोपलो.
आज सकाळी तीन वाजता उठलो, खरं तर उठायची इच्छा होत नव्हती,
गेल्या पाच सहा दिवसांत पहिल्यांदा इतकी मस्त झोप लागली होती. तोंडावर
पाणी मारले, सारे तयार होत होते. वळकटी ट्रक मध्ये नेऊन ठेवली . आमचा
ग्रुप तयार होताच, लगेच चालायला लागलो. चारच्या सुमारास चहा घ्यायला
थांबलो, तेव्हा टॅब सुरू केला, नेट सुरू झाले होते. एकावर एक पोस्ट यायला
लागल्या. 14 तास नेट बंद होते ना! लगेच माझी वारी वेल्हे मुक्काम पोस्ट 50
ग्रुपमध्ये शेअर केली. दरम्यान काही जण विधी साठी गेल्याने थांबलो.
पुन्हा चालू लागलो. आज आमच्या ग्रुप मध्ये सुरूवाती पासूनच ज्ञानोबा
ज्ञानोबा , ज्ञानोबा माऊली तुकाराम चा घोष सुरू होता. आम्ही पंधरा जण
होतो. महेश तवर आणि बाळू संकपाळ पुढे म्हणत होते, आम्ही त्याच्या मागे.
सर्व जणांचे कान त्या आवाजाकडे होते. रस्त्यावर माऊलीचा महाप्रवाह अखंड
वहात होता. त्यामध्ये आपल्या माणसाचा आवाज ऐकून त्या पाठोपाठ जात होतो.
त्यामुळे आज चुकामूक झाली नाही.
निरा पाच किलोमीटर बोर्ड दिसला, आनंद झाला. आता जवळ आलंय ही
भावनाच खुप आनंद देऊन जाते. पुढे रेल्वे फाटक असल्याने वाहतूक खुप स्लो
होती. वाल्हे ते निरा रस्ता एकेरी असल्याने वारकरी माऊलीना आज उजव्या
बाजूने जाणाऱ्या वाहनातून पडणार्या धुराचा खुप त्रास होत होता. वारकरी
खोकत होते, मार्ग काढत पुढे जात होते. फाटकाच्या नजीक पोहचलो . खुप गर्दी
झाली, थोडी ढकला ढकली पण झाली, वाहने थांबवून वारकरी पुढे गेले. पुढे एक
दोन किलोमीटर रेल्वे लाईन व रस्ता समांतर आहे. र एक्स्प्रेस ट्रेन जात
होत्या. भोळे भाबडे वारकरी रेल्वे बघायसाठी बाजुला येऊन थांबत होते.
त्यांना त्याचे अप्रुव वाटत होते.
साडे पाच वाजले होते. डाव्या बाजूला निरा दुध शीतकरण
केंद्राशेजारी एक पेट्रोल पंप पाहून सर्वाना थांबवले. पंपावर वाहनाची
रांग मी अनेकदा पाहिली आहे. पण मोठ्या पंपाच्या विस्तृत जागेत वारकरी
निवांत झोपलेले आज पहिल्यांदा पहायला मिळाले. पंपाचा ताबा माऊलीनी घेतला
होता, असे म्हणावे लागेल. काल रात्री आलेले हे वारकरी पंपात मिळेल त्या
जागेवर निवांत पडले होते, किती छान झोप लागली होती त्या माऊलींना ! खुप
हेवा वाटला मला त्याच्या या झोपेचा!
पुढे निघालो, पाउस सुरु झाला. वारकरी लोकांनी प्लॅस्टिक कागद
बाहेर काढले. पावणे सहा झाले, उजाडले होते आता. निरा कॅनाल दिसू लागला,
डाव्या बाजूला बाहेर पडलो. कच्च्या रस्त्यावरून चालत निरा कॅनाल च्या सेवा
रस्त्यावर आलो. पुढे कॅनाल वरील छोटा पुल ओलांडून डावीकडे गेलो. कॅनाल
पाण्याने भरून वहात होता. खुप कमी वारकरी होते पाण्यात. वारकरी माऊलीसाठी
खास पाणी सोडण्यात आले होते. वाहते पाणी पाहून सारे सुखावले. बॅगा बाजूला
ठेवून आम्ही पाण्यात उतरलो. गेल्या पाच दिवसांत परिस्थिती स्वीकारत
झटपट आंघोळ करायला लागली होती. पाणी अंगावर टाकणे, अंग ओले करणे म्हणजे
आंघोळ अशी वारकर्याची वारीतील पद्धत असते. आज काही बंधन नव्हते, पाणी कमी
नव्हते ,निरा भरून वहात होता, त्यामुळे आम्ही चेकाळलो. खाली उतरलो,
मनसोक्त स्नान केले. एकमेकांना आंघोळ घातली, पाठ घासली. काहीजण पोहले,
पाय मोकळे करून घेतले. कपडे धुवायला ही जागा योग्य होती. चार दिवसाचे कपडे
धुतले. आमच्या मागोमाग अनेक लोक तिथे आले. पुरूष आणि महिला वारकरी पाण्यात
उतरून स्नान करू लागले. सारे तयार झाले. गंध लावला. फोटो काढले. निघालो.
निरा गावाकडे जायला लागलो. पिंपरी खुर्द गाव आले. आमच्या
समुहात गोवारे गावचे शिवाजी विठ्ठल देशमुख बापू ज्येष्ठ वारकरी आहेत.
विनोदी स्वभावाचे बापू सर्वात लवकर झोपतात आणि सर्वात अगोदर म्हणजे दोन
वाजता उठतात. पंधरा मिनिटांत तयार होऊन सगळ्यांना उठवतात. ग्रामीण अस्सल
टच व दमदार आवाजात ' ये उठा की, उठा लवकर ' असा आवाज पहाटे कानावर पडला की
सारे जागे होतात. राग येतो त्यांचा पण उठावेच लागते. अन्यथा बापूंचा
दम असतो, ' नाही उठला तर सारा तंबू उतरावा लागेल. तंबू याच्या अंगावर
काढून टाका. ' हे कोणाला नको असते त्यामुळे सारे पटकन उठतात . सांगायचे
कारण बापूंची मेव्हणी या गावात दिली आहे. साडू शहाजीराव मारूतराव शिंदे
लोणंद मध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करतात. शिंदे यांचे आग्रहाचे निमंत्रण
असल्याने आम्ही कराडचे 15-20 वारकरी त्याच्या घरी दरवर्षी जेवायला जातो.
आदर अतिथ्य करावे तर या कुटुंबासारखे. त्यांच्या घरी 9 वाजता पोहचलो.
दुमजली सारे घर त्यानी आमच्या ताब्यात दिले होते. कुठेही जा, काही घ्या,
बसा, हे स्वातंत्र फक्त आपल्या स्वतःच्या घरातच असते. पण येथे घरच्या
सारखेच होते. किती मोठेपणा म्हणायचा. आम्ही आमच्या घरात पाहुणे आले तर
इतके मोकळे सोडले असते का? असा विचार आला. आम्ही आता भजनासाठी गोलाकार
बसलो. खरात माऊली, बाळू संकपाळ यांच्या सोबतीला उस्मानाबाद येथील दोन
वारकरी होते. थोडी भजन जुगलबंदी झाली साडे दहा पर्यंत भजन, पुन्हा आरती
करून जेवायला बसलो. वरण, भात, चपाती, भाजी, सुधारस आणि श्रीखंड... काय
सुंदर जेवण होते ते. संताचे पंगतीला बसण्याचा आनंद काय असतो ते अनुभवले.
बारा वाजता शिंदे माऊली कुटुंबाला नमस्कार करून निरेतून
निघालो. निरा नदीच्या काठावर माऊली पालखी विसावली होती. परिसरातील अनेक
गावातील भाविकांची दर्शनासाठीगर्दी केली होती. खुप लांब रांग लागली होती.
खेळणी दुकाने, हार फुले दुकाने आणि माऊलीनी गाव फुलले होते. पुढे
निघालो, पुलावर आलो, नदीत अनेक भाविक स्नान करत होते, कोणी कपडे धुत
होते, तर काही जण कपडे वाळत घालत होते. खुप सुंदर दृश्य होते ते. याच
नदीत माऊली पादुकांना स्नान घातले जाते. लांबूनच एक कमान दिसली. सातारा
जिल्हा परिषद आणि खंडाळा पंचायत समिती आपले सातारा जिल्ह्यात स्वागत करत
आहे. खुप आनंद झाला, आपण आपल्या जिल्ह्यात आलो, आपला सातारा आला .गेली
सात दिवस पुणे जिल्ह्यातून पालखी जात आहे . आता सातारा मग सोलापूर जिल्हा
येणार. फोटो काढले. पुल ओलांडून पुढे आलो, सातारा जिल्हा प्रशासनाने
स्वागत तयारी केली होती. त्या स्वागत फलकावर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो
पाहून सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचाच असा विचार छाती फुगवून गेला.
सातारा जिल्हा पोलिसांनी वाहतूक नियोजन चांगले केले होते.
माऊली उजवीकडे येऊ नका, वाहनांना जागा द्या असे पोलीस सांगत होते,
अधिकारी अलर्ट होते पण काही गाॅगलधारी डॅशियर पोलीस मधोमध उलट्या बाजूने
दुचाकीवरून सायरन लावून येत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्या ऐवजी विस्कळीत
झाली. असे उलटे येणारे पोलीस व त्याची दुचाकी पुणे जिल्ह्यात नव्हते.
लोणंद जवळ आलो, रेल्वे पुल पार केल्यावर कराडचे ट्राफिक पोलीस
मनोज शिंदे, पाटणकर आणि. . भेटले, चहा पिला. विशेष म्हणजे मनोज शिंदे
मला गेल्या वर्षी याच जागेवर भेटले होते. शहरात प्रवेश केला, फलटण
रस्त्याला लागलो, आणखी एक रेल्वे ब्रिज आला. पोलीस स्टेशनला नजीकच्या
मालोजीराजे विद्यालयात आलो. पटांगणावर आमची पालं ठोकली होती , जाऊन पडलो.
अडीच वाजले होते.
चार वाजता सदा माऊली फोटोग्राफर आले, मला मिठीच मारली.
कराडवरून सतीश यादव, विनायक विभुते आदी आले होते. त्यांना भेटून खुप आनंद
झाला. दरम्यान लोणंद रहिवासी, कराड येथील गजानन प्लॅनेटचे मालक माझे मित्र
लायन विवेक राव यांचा फोन आला, माऊली आमच्या घरी या . मी मोबाईल कुठे
चार्ज करायला लावायचा असा विचारच करत होतो, माऊलीनी विवेक राव यांचेकडे
निरोप पाठवला. आमच्या मुक्काम मालोजीराजे विद्यालय होता. तेथून जवळच रेल्वे
लाईन पलिकडे लोणंद मधील प्रसिद्ध गजानन शोरूम मध्ये गेलो.. सोबत शाम पवार
काका होते गप्पा मारत बसलो. मोबाईल तिथेच ठेवून जेवायला तंबू कडे आलो.
सगळीकडे चिखल होता. बारीक पावसात वारकरी उभे राहून मिळेल तेथे जेवायला बसले
होते. पिक अप गाडीचा फाळका पाडला, त्यावर ताट ठेवले, जेवलो. पुन्हा
मोबाईल आणायला रेल्वे लाईन ओलांडून पलीकडे गेलो. इंटरनेट मिळत नव्हते,
दहा पर्यंत वाट पाहीली अन झोपलो. साडे आकरा वाजता जाग आली तेव्हा पुन्हा
पाहीले, नेट जाम होतं. शेवटी टॅब बंद करून झोपलो.
वाल्हे येथील एक महत्त्वाचा प्रसंग सांगायचे राहून गेले.
वाल्हे येथे दुपारी लवकर पोहचलो. वाहने उशिरा आल्याने स्वयंपाक करणे दोन
वाजता सुरू झाल. दरम्यान आता करायचे काय म्हणून बसलो होतो. यावेळी लवकर
या, लवकर या, भारूडाचा कार्यक्रम सुरू होत आहे, असा आवाज आला. आम्ही
कराडचे चार पाच लोक तिकडे गेलो. पुढेच बसलो. भारूड ही संत एकनाथ यांचा
आवडता प्रकार. खुप लोकप्रिय. किर्तन, प्रवचन ऐकायला न येणारे भारूड
म्हणलं की लगेच येतात. ग्रामीण भाषेत, चिमटे घेऊन, कधी उपहासात्मक विनोद
करून, कधी नाचून , गाऊन भारूड सादर केले जाते. अग ग ग ग विंचू चावला ,
या शेजारणीनं बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं ग बया, ही भारूड गीते
आपल्याला आठवत असतील. असे भारूड मी पहिल्यांदा बघत होतो. खुप मजा आली.
यातील कलाकारांने डोक्यावर समई ठेवून त्यावर पाण्याने भरलेला हंडा ठेवला,
डोक्यावर चुंबळ ठेवून ती पेटवून नाच केला.
या भारूडाचा घटक म्हणून मला त्या कलाकाराने बोलवले.
सुरूवातीला काही कळले नाही पण या हो साहेब असे सांगून त्यांनी माझ्या
डोक्यावर जिरेटोप घातला आणि जेजुरीचा राजा म्हणून मला सादर केलं. माझ्या
मिशामुळे मला ही संधी मिळाली, हे लक्षात आले. मी मल्हारी झालो होतो.
आकरावीत असताना नाटकात काम केले होते, 26 वर्षे नंतर आज पुन्हा राजा झालो.
वेगळा अनुभव होता. खुप हसलो, फोटो काढले.
एकंदरीत आज मंगळवारचा दिवस छान गेला.
पंधरा किलोमीटर चाललो, मजेत..
पंधरा किलोमीटर चाललो, मजेत..
- सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा