फॉलोअर

१० जुलै २०१६



दिनांक 10 जुलै 
माळशिरस  सतीश मोरे 

सकाळी पाच वाजता उठलो.  मुक्काम दिक्षितांच्या घरीच होता. तंबूत असतो तर  अडीच वाजता उठायला लागले असते. नको म्हणल तरी त्यांनी गरम पाणी करून दिलेच. तयार झालो . रात्री झोपेत वारी लिहली होती , वाचली, एडीट करून तुम्हा माऊलीना पाठवली. साडे सहा वाजता बाहेर पडलो. आज माऊली पालखी सोबत चालणार होतो,  पुढे चौकात आलो.  रस्त्यावर झालेला चिखल,  भिरभिर पडणारा पाऊस यामुळे ट्राफिक जाम झाले होते.  वाहने थांबली होती,  किचकच झालेल्या रस्त्यावर वारकरी उभे होते. माऊलीकडे जायला वेळ लागणार होता, म्हणून  एकटेच चालायचे ठरवले. चलो माळशिरस, अकेला. रोज सहकारी  असायचेच, आज ते पुढे दुपारच्या भोजन ठिकाणी पोहचले होते. सहकारी अशोक शिंदे यांचा फोन आला,  कुठे आहे,  कुठे थांबायचे हे त्यानी सांगितले. 

आलो मुख्य रस्त्यावर. पावणे सात वाजता चालायला सुरुवात केली.  सोबत हजारो वारकरी होतेच. पुढे मागे बघायचे,  नव्हते.  एकटेच जायचे असल्याने काही काळजी नव्हती.  भुरभुर पाऊस सुरू होताच.  सुरूवातीला काही वाटले नाही, पण नंतर भिजतोय याची जाणीव झाली.  प्लॅस्टिक कागद बाहेर काढला. खोळ तयार करून चालायला लागलो.  रस्त्यावर  झालेला चिखल वारकरी लोकांना आव्हान देत होता, थांब म्हणत होता,   पण वारकरी त्याला दाद देत नव्हते. एक तीन चाकी सायकल दिसली. अपंग पती पत्नी सायकल पॅडेल हाताने मारत होते. फोटो काढायला पुढे आलो, चौकशी केली. जामखेडचे बाळू जालींदर गोरे गेली दहा वर्षे येतात वारीला.  मागे ढकलायला  वडील होते.  फोटो काढताना त्यानी मला विचारले,  आता  आम्हाला काय मिळणार?  मला कळेना यांना काय सांगायचे. मी पेपर मध्ये लिहतो,  तुमचा फोटो पेपरात येऊ शकतो,मी उत्तरलो.  त्यावर मला काय मिळणार, असे त्यांनी विचारले.  तुम्हाला माऊली देतील, असे सांगून तेथून निघालो. 

चालत राहिलो. एक तास झाला होता.  थांबायची इच्छा झाली.  पण पाऊस सुरूच होता. थांबायला जागा नव्हती.  भुरभुर पाऊस ,  खोळ घातलेली, विनाखंड चालणे  त्यामुळे घाम आला होता. खांद्यावर टाकलेल्या  ओल्या टाॅवेलने घाम पुसला. मांडवे गाव आले होते.  अरूंद
पुल पार करून आलो. उजवीकडे  आमचा पाणी टॅन्कर रस्त्यकडेलाच होतो. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने बारा नंबर दिंडीसाठी गेली अनेक वर्षे पाणी टॅन्कर पुरवला आहे , वारकरी सेवा करत आहे, हा कारखाना.  तो टॅकर पाहून थांबलो, आमचा खबाले पाटील ट्रक नंबर  MH 06 9594 दिसला. आत गेलो . जीप मध्ये जॅकेट ठेवले. शर्ट पण काढला.  बनियन  ओले झाले होते, थंडी वाजली. तसाच किचन विभागात गेलो,  तिथे गरम हवा,  वाफेत  बरं वाटले.  माने गुरुजी तिथे होते,म्हणाले, या भाताच्या पातेल्यावर बनियन टाका. तसे केले,  तोपर्यंत  उघडा उभा राहिलो होतो. मजा आली.  

साडे दहा वाजता जेवायला बसलो. पाऊस आला की वारीत बुफे सेवा असते. ओळीत उभे राहून ताटात भाकरी, पिठलं, खरडा,  वांग्याचे कालवण आणि भात मेनू होता.  जीपमध्ये जाऊन बसलो.  काही जण ट्रक खाली,  काही झाडाखाली तर काहीजण पावसात भिजत जेवत होते. भुक हा असा विषय आहे, जेव्हा लागते तेव्हा काही सुचत नाही. पोटभर  जेवण झाल्यावर निघालो पुढे. मी रिंगण पहायला थांबणार  असल्याने सहकारी पुढे गेले होते, त्यामुळे  एकटाच होतो. चालायला लागलो, चार किलोमीटर अंतरावर सदाशिवनगरचा शंकरराव मोहिते साखर कारखाना  आला.  जागा अपुरी असल्याने सदाशिवनगर ची जागा रद्द करण्यात आली होती.  तेथून पुढे जवळच  पुरूंदावडे येथे रिंगण सोहळा होणार होता. तिथे पोहोचलो.  स्वागत कक्षातच राजाभाऊ आणि  रामभाऊ चोपदार ऊभे होते,  माझे त्याचेकडे काम होते, राजाभाऊंनी रामभाऊ कडे काम सोपवले. आम्ही तळावरच बोललो. 

एक वाजता माऊली अश्वाचे आगमन झाले. रिंगण सोहळा  अतिशय सुंदर जाहला.  नवीन जागा फार मोठी होती.  सर्वाना पाहता आले.  कुठेही गोंधळ झाला नाही. रिंगण सोहळा नंतर वारकरी खेळ धरला,  नंतर उडीचे खेळ सुरू झाले.  एका तालात टाळ वाजत होते,  वारकरी बेभान होऊन टाळ वाजत होते. टाळ, मृदंगची जुगलबंदी सुरू झाली,  बाळासाहेब,  रामभाऊ,  राजाभाऊ चोपदार हातवारे करून सुचना देत होते. बंडा तात्या पण  उभे होते.  अर्धा तास हा खेळ सुरू होता.  दरम्यान वारकरी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे भेटले, लोकमतचे पत्रकार भेटले. फोटो काढले 

परत प्रवास सुरू.  माळशिरस सहा किलोमीटर अंतरावर होते. खुप कंटाळा आला होता,  पण लवकर जाऊन लिहायचे होते. थांबून चालणार नव्हते.  आता पाऊस थांबला होता,  उन पडले होते.  हे अंतर पार करायला दोन तास गेले. पाच वाजता पोहचलो.  मोठे गाव आहे ते. गावाबाहेर पालखी मुक्काम होता. खुप थकलो होतो. जाऊन ट्रक केबिनमध्ये पडलो.  


ट्रक मालक निवास खबाले पाटील, तसेच सहकारी  यांच्याशी चर्चा केली.  त्याना अपंग व्यक्तींचा किस्सा सांगितला.  तेव्हा वेगळीच बाजू कळली. वारीत काही जण अशी सायकल ढकलायला रोजंदारीवर माणूस ठेवतात. त्याचा उद्देश फक्त पैसे कमावणे हाच असतो. सायंकाळी  हिशोब करताना पैसे विभागणी करताना एका व्यक्तीने हे पाहीले आहे 

रात्री साडे आठ वाजता जेवायला बसलो. वळकटी घेऊन  तंबूत गेलो. काम पूर्ण केले.  सकाळी तीन वाजता जाताना न्यायची कपडे,  साहित्य जुळवून ठेऊनच झोपतात सारे.


एकंदरीत आजचा दिवस छान गेला. 
आठरा किलोमीटर चाललो,  मजेत..


     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...