महिला माऊली सेवेकर्च्याया कामाला सलाम
वेळापूर सतीश मोरे
कामाची योग्य विभागणी, श्रम ,जल ,काम ,आहार, स्वच्छता याचे योग्य व्यवस्थापन, अचुकता ही पंढरीच्या वारीला जाणाऱ्या सर्व दिंड्याची खास वैशिष्टय़े म्हणता येतील. वारीत महिला आणि पुरूष दोघांचाही सहभाग असतो. कष्टाची कामे पुरूष करतात. त्याहून अधिक क्लिष्ट, अवघड आणि कमी प्रतिष्ठेची मात्र अत्यावश्यक कामे करायला महिला सेवेकरी 18 ते 20 तास धडपडत असतात. कोणतीही बिदागी न घेता काम करणाऱ्या सेवेकरी महिला माऊलींच्या या सेवेमुळेच हायजेनिक पोटभर जेवण वारकर्याना मिळू शकते. सलाम या सेवेला, त्रिवार सलाम त्या माऊलींना !
वारी प्रवास सुरू होण्याआधी किमान महिनाभर तयारी सुरू केली जाते. वारकरी किती येणार, त्यात महिला किती, पुरूष किती, सेवा देणारे किती, टाळकरी, झेंडेकरी, याचा विचार केला जातो. त्यानुसार तंबू संख्या किती असावी, स्वयंपाकाची भांडी किती व कोणती आणायची, जेवणाचे धान्य, साखर, तेल आदी साहित्य किती घ्यायचे याचे नियोजन केले जाते. हे साहित्य कुठे ठेवायचे, कोणत्या दिवशी कोणता स्वयंपाक असतो यावरून ट्रकमध्ये साहित्य त्या क्रमाने भरले जाते. हे सर्व काम करताना पुरूष सेवेकरीची जितकी आवश्यकता असते त्याहून अधिक छोटी छोटी पण महत्वाची कामे महिला सेवेकरी करतात. अनेक दानशूर लोक गहू किंवा तांदुळ देतात, ते निवडण्याचे काम तसे खुप सोपे आहे, वाटते. पण वारीत सहभागी लोकांच्या संख्येनुसार धान्याची पोती 10 ते 20 इतकी असतात. ह धान्य निवडायचे काम पुरूषांना जमत नाही, किंबहुना ते करत नाहीत. गहू निवडून ते दळून पीठ वाहनात ठेवले जाते.
आळंदीला गेल्यापासून पंढरपूर मठात पर्यंत अनेक छोटी मोठी कामे महिला सेवेकरी करतात. अनेक वर्षे पासून सेवा करणाऱ्या अनेक महिला सेवेकरी वारीत पहायला मिळाल्या. तीस वयापासून 70 वर्षे वयाच्या महिला सेवेकरी हे काम माऊली सेवा म्हणून करतात. क्वचितच महिला नाममात्र बिदागी घेतात. विनामोबदला काम करणाऱ्या सर्व सेवकांचा शेवटी टाॅवेल , टोपी, चोळी नारळ देऊन सत्कार केला जातो. सेवेकरी महिला अथवा पुरूषांना स्वतंत्र तंबू व्यवस्था असते . पहाटे तीन वाजता तंबू काढला की सारे साहित्य ट्रकमध्ये टाकले जाते. त्यानंतर याच ट्रकमध्ये या महिला जशी जागा आहे तिथे बसतात. या दरम्यान थोडी झोप लागते. दुपारचा भोजन विसावा ठिकाणी चार -पाच वाजता वाहन पोहचते. तिथे जी सोय आहे त्यानुसार आंघोळ व इतर विधी आटोपला जातो. उजाडलेले असते. लगेच स्वयंपाक तयारी सुरू होते.
मुख्य आचारी जेवणाचा मेनू सांगतात. लगेच पीठ मळायला घेतले जाते. त्याचवेळी भाज्या स्वच्छ करून निवडणे, कांदा व भाज्या कापणे, लसूण सोलणे , मसाला तयार करणे चपात्या लाटणे, भाजणे, भाकरी करणे, हे काम करताना या महिला गवळणी, हरिपाठ म्हणतात. हरीचे नाम घेता घेता काम सोपे होऊन जाते. संपते. ही कामे दिसताना सोपी वाटतात, पण महिला सेवेकरीच ते करू शकतात. जेवण तयार झाल्यावर वाटपींना भरून देणे, चपात्या, भाकरी मोडणे ही कामे महिलांवरच येऊन पडतात. बारा वाजता पंगती संपतात आणि सर्वात क्लिष्ट भांडी धुवायचे, घासायचा काम महिला सेवेकरीच करू शकतात. किमान 3 ते 5 मोठ्ठी पातेली, कढई, उलातणे, पळी, वगराळी आदी भांड्याचा ढिगच लागतो. नाक न धरता आणि मुरडता घरच्या प्रमाणे महिला हे काम करतात.
एक वाजता ट्रक पुन्हा सुरू होतो. तीन पर्यंत मुक्काम ठिकाणी पोहचतो. या दरम्यान डुलकी लागते. तंबू उभे झाल्यावर तासभर विश्रांती घेऊन पुन्हा सायंकाळच्या सस्वयंपाकाची तयारी सुरू होते. पुन्हा तेच. सारे जण झोपलेले असतात तेव्हा दहा, आकरा पर्यंत महिला भांडी घासत असतात. त्यानंतर तंबूत झोपतात. महीला सेवेकर्याचे वेळापत्रक असे बिझी राहते. या शिवाय दिंडीत आलेले पाहुणे यांना चहापाणी करून देणे, दिंडी मालकांना वेगळा स्वयंपाक तसेच कपडे धुणे, ही कामे महीलाच करतात. म्हणूनच या महिलांना सलाम करावा वाटतो,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा