दिंडी चालते, चालते ; वारकरी विसावतो!
लोणंद सतीश मोरे
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! चा जयघोष करीत टाळकरी, झेंडेकरी वारकरी दिवसभर चालत राहतो. दुपारी विसाव्याच्या ठिकाणी चार घास खातो. थोडा कलंडतो. नगारा वाजतो, पालखी निघाली असा निरोप येतो. वारकरी उठून पुन्हा मार्गक्रमण करतो. सायंकाळी 7 च्या सुमारास पालखी सोहळा विसावातळावर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. समाज आरती संपल्यानंतर दिंड्या आपआपल्या जागेवर विसावतात. वारकरीही नेमूण दिलेल्या तंबूत जाऊन पडतो. सायंकाळच्या जेवणानंतर लवकर झोपी जातो. पुन्हा पहाटे उठतो, तयार होतो आणि पुन्हा दिंडी ज्ञानोबा माऊली... तुकाराम! चा जयघोष करीत वारी पुढे चालत राहते.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होतात. यात माळकरी असतात किंवा आई-वडिलांनी सुरू केलेली परंपरागत वारी सुरू ठेवण्यासाठी आलेले वारकरीही असतात. सोहळ्यात सहभागी नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत सुमारे ते 500 दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांचा नित्यनेम एकच असतो. पालखीपुढील 27 आणि पाठीमागे असणाऱ्या 210 दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांना शिस्तितच रहावे लागते. नियमांचे पालन करावे लागते. आळंदी ते पंढरपूर (वाखरी) येथे पालखी पोहोचेपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते झोपेपर्यंत वारकऱ्यांचा नियम, रोजनिशी ठरलेली आहे. त्यामध्ये बदल होत नाही.
आळंदी सोडल्यानंतर पालखी पुण्यात येते. या ठिकाणी अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेल्या रितीप्रमाणे वारकरी वारकऱ्यांच्या घरातच, शाळेत, धर्मशाळेत विसावतात. महानगर असलेल्या पुण्यात दोन दिवस भक्तीचा महापूर वाहत असतो. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन तत्पर असते. पालखी सासवडला पोहोचल्यानंतर निवास व्यवस्था खऱ्या अर्थाने पाहण्यासारखी असते आणि शिस्तबद्ध वारीचा अनुभव इथून पुढे अनुभवावयास येतो.
वारीतील प्रत्येक दिंड्यांची मुक्कामांची ठिकाणे ठरलेली आहेत. अनेक वर्षांपासून एखादी दिंडी ज्या ठिकाणी उतरत असते, त्याच ठिकाणी ती विसावते. या जागा कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. काही ठिकाणी दिंड्या खासगी जागेत, शाळेत, धर्मशाळेत मुक्कामी असतात. बहुतांश दिंडी मालकांच्याकडे वारकऱ्यांसाठी तंबू निवास व्यवस्था असते. सासवडमध्ये पहिल्यांदा तंबू उभारले जातात. दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी या तंबूमध्ये जागा नेमून दिली जाते. त्याच जागेवर वाखरी मुक्कामापर्यंत त्या वारकऱ्यांनी रहायचे असते. सायंकाळी 7 च्या सुमारास पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणी समाज आरती झाल्यानंतर दिंड्यांतील वारकरी, टाळकरी, चोपदार, विणेकरी असे सारेचजण आपल्या तंबूकडे जातात.
दिवसभर विठ्ठल नामघोषात बेधुंद होऊन नाचलेले, थकलेले वारकरी येथे पाहेाचल्यानंतर माल वाहतूक ट्रकमधून आपले गाठोडे घेवून तंबूत जातात. बाड-बिस्तारा अंथरल्यानंतर पहुडतात. साडेसात- आठच्या सुमारास पंगती पडतात. काही दिंड्यांमध्ये पत्रावळी वापरली जाते. तर अलिकडे बहुतांश दिंडी मालकांनी ताट-वाट्यांची सोय केली आहे. जेवण झाले की ताटे विसळून वारकरी पुन्हा तंबूकडे येतो. नऊ- साडेनऊ वाजेपर्यंत तंबुमध्ये सर्व वारकरी झोपलेले असतात. स्वयंपाक करणारे, वाढपी आणि सेवेकरी उशिरा जेवतात.
पहाटे तीन वाजता दिंडी स्थळावर उठा... उठा... उठा अशी लबगब सुरू होते. तंबु काढण्यास सुरूवात होते. एखाद्या तंबूतील वारकरी उठत नसेल तर "सर्व तंबू तुला एकट्याला काढावा लागेल' किंवा "तुझ्या अंगावरच तंबू पाडतो' अशी प्रेमळ धमकी देवून त्याला जागे केले जाते. प्रात:विधीसाठी गडबड सुरू होते. रात्री झोपतानाच उशाला पाणी बॉटल भरून ठेवलेली असते. ती घेवून सोय असेल तर शौचालय नसेल तर उघड्यावरच हा विधी आटोपला जातो. तिकडे पाण्याच्या टाकीवर आंघोळ करण्यासाठी नंबर लागलेले असतात. पहाटेच्यावेळी गार वारा वाहत असतो. थंडी असते. मात्र याची कदर न करता स्त्री-पुरूष सर्व वारकरी थंड पाण्यानेच टाकीलगतच आंघोळ करतात. सर्व वारकऱ्यांच्या आंघोळी होईपर्यंत इकडे सर्व तंबू काढलेले असतात.
आपल्या साहित्याच्या ठिकाणी जाऊन गाठोड्यात बांधलेली माऊली आणि विठ्ठलाचा फोटो काढून वारकरी त्याची पूजा करतात. गंध उगळून डोक्यावर लावतात. बुक्का लावला जातो. या दरम्यान तयार झालेले वारकरी सर्व साहित्य ट्रकमध्ये नेऊन ठेवतात. पाचच्या सुमारास ट्रक, पाणी टँकर व इतर सर्व वाहने तेथून बाहेर पडलेली असतात.
कुठेतरी जागा शोधून प्लास्टिकचा कागद किंवा पोते टाकून वारकरी पुन्हा कलंडतो. साडेसहाच्या सुमारास चूळ भरून पुन्हा तयार होतो. पालखीच्या मागे किंवा पुढे प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. त्या ठिकाणी अगोदरच पोहचलेला विणेकरी, झेंडेकरी शोधत तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. सकाळी 7 च्या सुमारास पालखी येथून निघते. साडेआठ ते नऊच्या सुमारास पालखी विसावा असतो. तेथे वारकरी विसावतात. घरातून आणलेलं खाद्य साहित्य काढतात. थोड्या वेळात पुन्हा पालखी सुरू होते. दुपारी 12 ते 1 च्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी सोहळा थांबतो. सुमारे दीड तास पालखी जाग्यावरच असते. या ठिकाणी पुन्हा पंगती पडतात. पहिल्या पंगतीला टाळकरी, माळकरी, विणेकरी आणि दिंडीत प्रत्यक्ष सहभागी वारकऱ्यांचा मान असतो. जेवणानंतर झाडाखाली, ट्रॅक्टर- ट्रकखाली मिळेल त्या जागेवर विसावा घेण्यासाठी वारकरी थांबतात.
नगारा वाजवत घोडागाडी येते. या नगऱ्याचा अर्थ पालखी निघणार आहे... तयार व्हा. असा असतो. पुढे पुन्हा सोहळा सुरू होतो. अखंड हरिनाम मुखी घेऊन वारकरी चालत राहतात. माऊलींचे नाव घेतले तर चालणे सुखावह होते. चारच्या सुमारास विसाव्यासाठी पालखी थांबते. त्याठिकाणी भक्त मंडळांनी चहापाण्याची सोय केलेली असते. त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू होतो. सातच्या सुमारास पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाहोचते. असा पंढरीच्या वारीतील पालखी वारकऱ्यांचा नित्यक्रम असतो.
सतीश मोरे
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot. in/
http//karawadikarad.blogspot.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा