फॉलोअर

१४ एप्रिल २०१६

जागृत कराडकर बाबासाहेबांना भावले


डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष  

2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात  आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या दिवशी मानपत्र प्रदान करण्याचे निश्चित केले होते. त्यादिवशी बाबासाहेब सातारा येथील निवासस्थानाहून तीन वाजण्याच्या सुमारास मोटारीने निघाले.
सातारपासून 13 मैलावर  म्हणजे अतित गावच्या  आसपास त्याची गाडी नादुरुस्त झाली. सर्वजण खाली उतरून दुसऱ्या वाहनांची व्यवस्था होते काय हे पहात होते. दरम्यान  मुंबई येथील परळ  भागातील तंबाखू व्यापारी लक्ष्मणराव शेटे त्याच्या मोटारीने निघाले होते, त्यांनी बाबासाहेबांना कराडपर्यंत नेण्याचे आनंदाने कबुल केले. या मोटारीत बसून सारे कराडला यायला निघाले. 
दुर्दैवाने या मोटारीला कराडजवळ मोठा अपघात झाला. सुदैवाने सारे जण मरणाच्या दारातून वाचले. सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने  सर्व जखमींना सरकारी दवाखान्यात दाखल केले.  जखमींवर उपचार केले, पट्‌ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी विश्रांती घेऊन सहाच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर कराडात मानपत्र स्वीकारण्यासाठी पोहचले.

या ठिकाणी कराडात बाबासाहेबांचा मानपत्र प्रदान करण्यात आले 

अतिशय सुंदर, शानदार समारंभ झाला. पाण्याच्या टाकी शेजारी मुन्सिपाल्टी कचेरी होती. मुन्सिपाल्टी हॉल आतून व बाहेरून सजवण्यात आला होता. कार्यक्रमास सर्व 17 सभासद, नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थीनीनी स्वागतपर गीत सादर केले. त्यानंतर प्रसिद्ध वकील सदाशिव कृष्ण  बहुलेकर यांनी मानपत्र वाचन केले. पालिकेचे अध्यक्ष राऊ बाळा कदम यांनी मानपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला.

या नंतर बाबासाहेब यांनी केलेले भाषण जसेच्या तसेे पुढील प्रमाणे....

अध्यक्ष महाराज, सभासद, भगिनी व बंधुजनहो,

आपण मला जे मानपत्र दिले आहे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. स्थानिक प्रश्नाबाबत मी काही कामगिरी केलेली नाही. मी कऱ्हाडचा रहिवाशी नाही. माझी  कामगिरी राजकीय स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत आपण मला मानपत्र अर्पन करून माझा जो गौरव केला आहे  यातून आपला उदारपणा मात्र व्यक्त होतो. आज या समारंभास मला हजार राहता आले ही इष्टापत्तीच होय.

हिन्दुस्थानच्या आजच्या परिस्थितीत जागृती व जबाबदारीची फार आवश्यकता आहे. युध्दोत्तर हिंदुस्थानापुढे मोठ मोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत. स्वराज्य सर्वासच हवे यात शंका नाही पण एकाचे स्वराज्य दुसऱ्यास गुलामगिरीत डांबण्यास कारणीभूत होणार नाही, अशी आपण सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे.

अल्पसंख्यांकांच्या मागण्या या वरील भीतीच्या निदर्शकच आहेत. ही भीती नाहिशी करण्यासाठी आपणापुढील प्रश्न सोडविण्यासाठी अल्पसंख्य व बहुसंख्य या दोन्ही लोकात आपण जागृती जबाबदारीची जाणीव उत्पन्न केली पाहिजे असे माझे सांगणे आहे.

आज हिन्दी राजकारणात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विचित्रपणा लक्षात येण्यासाठी आपण गेल्या पिढीचे राजकारण व या पिढीतील राजकारण यातील तुलना करू.
गेल्या पिढीतील गोखले, टिळकांचे राजकारण व आजचे गांधी राजकारण यामध्ये एक मोठा फरक आहे. गेल्या पिढीतील राजकारणास विद्वतेची जरुरी भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती, काडवाती करणारांची जरुरी भासत आहे. विद्वानांची यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे.
 
आजचे राजकरण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेली आहे. हि अत्यंत अनिष्ट गोष्ट झालेली आहे. देशाची प्रगती होत राहण्यास विविध विचार व वादविवादांचे निरनिराळे प्रवाह आवश्यक आहेत. अशा भिन्न विचारांच्या प्रवाहातून हमेशा प्रगती होत असते. आंधळ्याच्या माळेमागून एकाच मार्गाने देश जात राहिला तर तो खळग्यात पडल्याशिवाय राहणार नाही, हे खास.

राजकाणात एकच पंथ निर्माण करणे हा चालू राजकारणातील हेतू आहे. जागृती, नाना तऱ्हेचे विचार व साधक बाधक प्रमाणे यांचे या राजकीय पंथास वावडे आहे. त्याच त्या गोष्टींची री ओढीत राहण्यात फायदा काहीच नाही. आज लोक गांधीवेडे झाले आहेत. गांधीवाक्य हे ब्रम्हवाक्य होऊ पाहत आहे. या गांधी वेडाबरोबरच ढोंगबाजीही खूप वाढू लागली आहे. केवळ स्वार्थासाठी कॉंग्रेसला चार आणे देऊन व्यभिचार करणारे अनेक हरीचे लाल आज पैदा होत आहेत. जागृती व जबाबदारी नाही तेथे तशी बिकट स्थिती होणारच.

आपल्या कराड म्युनिसीपालिटीत भिन्न मतांचे व भिन्न पक्षाचे सभासद आहेत.यावरून स्थानिक मतदार विचारी असावेत असे मला वाटते. आपल्यात विचार जागृत आहेत म्हणून मी आपले अभिनंदन करतो. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुन: एकदा आपले आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.

अतिशय प्रभावी व मुद्देसुद अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भाषणाला, मानपत्र कार्यक्रमाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज बाबासाहेबांची 125 वी जयंती आहे, हा योग आहे.


बाबासाहेबांचे कराडातील ते  प्रभावी भाषण अनेक मुद्दयाला स्पर्शून गेले आहे.  तत्कालीन हिंदुस्थानची  परिस्थिती, आंधळ्यांच्या हातात गेलेले राजकारण, गांधीवेडातून वाढलेली ढोंगबाजी, स्वार्थासाठी व्यभिचार करणारे हरिचे लाल तसेच देशाच्या विकासासाठी आवश्यक विविध विचार प्रवाह यावर त्यांनी कडक शब्दांत मते व्यक्त केली होती.
कराड गावात भिन्न मताचे, भिन्न पक्षाचे मुन्सिपाल्टी सभासद  असणे म्हणजे गावातील लोक विचारी आहेत, असे कौतुक करताना त्यांनी कराडकर जनतेचे अभिनंदन केले होते, कृतज्ञता पूर्वक आभार मानले होते. जागृत विचारांचे कराडकर बाबासाहेबांना भावले. बाबासाहेबांचे ते भाषण उपस्थितांना प्रेरणा देऊन गेले होते.

बाबासाहेबांचे कराडवर प्रेम होते म्हणूनच त्यांनी हे मानपत्र स्वीकारले, कराडचे गोडवे गायले,  कराडच्या जनतेला आजही बाबासाहेबांविषयी आपुलकी वाटते. 1974 साली तत्कालिन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला गेला.  याही घटनेला 43 वर्षे पूर्ण होत आहेत. 
आज 125 व्या जयंतीच्या निमित्ताने या भाषणाचा, भेटीच्या स्मृती जपण्यासाठी कराडात  प्रेरणा स्तंभ उभारणी संकल्पना पुढे आली आहे. शहरातील  आंबेडकर प्रेमी जनतेने याबाबत पुढाकार घेतला तर सर्व समाज त्याला पाठिंबा देईल. बाबासाहेब सर्व समाजातील  उपेक्षित, दुर्बल, दलित, शोषित घटकांचे नेते होते. त्यांच्या मुळेच या घटकांना न्याय मिळाला आहे. कराडात यावर्षी या सर्व घटकांना बरोबर घेवून 125 वी जयंती साजरी होत आहे, हे कौतुकास्पद आहे.
1940 साली बाबासाहेबांना कराडकरांमध्ये दिसलेली ती वैचारिकता, जागृकता कराडकरांनी जपून ठेवावी, वाढवावी हीच बाबासाहेबांना आदरांजली.  


                       जय भिम, जय भारत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...