फॉलोअर

१३ जुलै २०१९



कृतज्ञता हाच खरा देव

धन्यवाद वाचक माऊलींनो

एकादशी दिवशी झालेल्या तृप्तमय विठ्ठल दर्शनामुळे खूप खुश होतो.पहाटे सहाला भक्त निवास येथे आल्यानंतर आराम केला,बारा वाजता तयार झालो त्यानंतर पंढरीचा फेरफटका मारण्यासाठी पुन्हा बाहेर पडलो. पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा घातली. दरम्यान नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व पालख्यातील दिंड्या पंढरपुरात आल्या होत्या.नगरप्रदक्षिणा हा पालखी सोहळाचा सर्वात शेवटचा भाग असतो,ती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पहिला टप्पा संपतो. त्यानंतर प्रत्येक दिंडीतील प्रमुख काही लोकांना विठ्ठल रुक्मिणी समितीच्यावतीने विठ्ठल दर्शनाचा लाभ दिला जातो,थेट प्रवेश दिला जातो.नगरप्रदक्षिणा वेळेला अनेक दिंड्या आणि एकादशीला लाखो वारकरी असल्यामुळे रस्ते तुडुंब भरले होते. सोलापूर जिल्हा पोलिसांनी वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला मात्र त्यांनाही शेवटी मर्यादा होत्या. त्यामुळे काही ठिकाणी विशेषता विठ्ठल मंदिराच्या समोरील चंद्रभागा घाटा समोरील भागात थोडीशी ढकलाढकली झाली. काही वारकऱ्यांना दम लागला, त्यातच अडकून पडल्यामुळे अनेक जण घामाघूम झाले.मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही, हे माऊलींचे वारकऱ्यांवरील प्रेम म्हणावे लागेल.

चंद्रभागा तीरावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता, डोळ्यात साठवून हा सोहळा घेतला. आज एकादशी होती त्यामुळे उपवास होता, चहापाणी घेतले. त्यानंतर पुढारीच्या पंढरपूर कार्यालयात गेलो. सिद्धार्थ ढवळे हे अनेक वर्षापासून पुढारीचे पंढरपूर ते कार्यालय प्रमुख आहेत अतिशय चांगला माणूस असून पंढरपुरात पुढारी वाढवण्यासाठी ढवळे यांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे. त्यांना नवनाथ पोरे यांची चांगली साथ लाभली आहे. पुढारी कार्यालयात बसून चहापाणी घेतला. वारीची चर्चा केली. त्यानंतर बाजारपेठेत येऊन प्रसाद  खेळणी वगैरे खरेदी केली.  या दरम्यान अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे पंढरपूरचे सदस्य विजय जगताप भेटले.

दोन वाजता वेदांत भक्त निवासवर पोहोचलो.आता परतीचे वेध लागले होते. बॅगा भरल्या आणि साडेतीन वाजता पंढरपूर सोडले. खरंतर पंढरपूर आणि माऊलींचा सोहळा सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती.वारीत असेच चालावे ,आपण या भक्ती सोहळ्यामध्ये समरस होऊन जावे, सोहळा संपूच नये, असे वाटत होते. मात्र कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. माऊली सोहळा एक टॉनिक आहे.हे टॉनिक वर्षभरासाठी पुरते, हे टॉनिक घेऊन आता आपल्या कामाला लागायचे होते,घरी जायचे होते. येताना वारी मार्गावरूनच नातेपुतेपर्यंत आलो होतो उलटा प्रवास केला. वाखरी, भंडीशेगाव ,वेळापूर, माळशिरस, नातेपुते आणि परत सातारा जिल्ह्यात प्रवेश करून शिंगणापूर,दहिवडी, वडूज मार्ग कराडला पोहचलो. लेकीने घट्ट मिठी मारून पप्पांचे स्वागत केले.


पंढरीची वारी यावेळची खरंच वेगळी होती,खूप आनंद देऊन गेली.या वारीदरम्यान दिवसभर घडलेले सर्व प्रसंग, आलेले अनुभव,पाहिलेली मंदिरे असो वा भेटलेले लोक असो,सर्वांच्या बाबत जेवढं लिहिता येईल तेवढे लिहिले आहे. आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.आपण हे सर्व अतिशय मनापासून वाचलं ,मला प्रतिक्रिया दिल्या. आपण जे चांगलं पाहिलं ते दुसऱ्याला सांगावं, आपण जे चांगले ऐकले ते दुसऱ्याला सांगावं,आपल्याला माऊली कृपेने जे ज्ञान मिळते , ते दुसऱ्यांनाही सांगावं. ज्ञान देण्यानं वाढते. कोणतीही चांगली गोष्ट द्यायला पाहिजे. मी ते शेअर केले. मला जे पाहायला मिळाले ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. आपणही ते मनापासून पाहिलं, वाचलं, ऐकलं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असेच प्रेम माझ्यावर राहू द्या.

यावर्षी वारीमध्ये दैनिक पुढारी मधून सलग 19 दिवस 'देव माझा विठू सावळा' या मालिकेतून लिखाण केले आहे. यामध्ये वेगळे विषय मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आहे. आपण पुढारीमध्ये याचे वाचन केले, मला प्रतिक्रिया पाठवून दिल्या. मी आपला ऋणी आहे. या मालिकेसाठी कराड अर्बन बँकेने प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल मी मी बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष सुभाषराव एरम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांचाही ऋणी आहे.



दैनिक पुढारीने यावर्षी मला एक वेगळी जबाबदारी दिली होती. सध्याचा जमाना ऑनलाईनचा आहे, फेसबुक व्हाट्सअपचा आहे. लोकांना घडलेल्या बातम्या लगेच पहायच्या असतात, ऐकायचं असतं याचा विचार करून पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे चिरंजीव पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी पुढारी ऑनलाइन वेब पोर्टल मोठ्या दिमाखाने ॲक्टिव केले आहे. पुढारी ऑनलाइन चॅनेल युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय झाला आहे. युट्युबवर पुढारीचे 84 हजार सदस्य आहेत. फेसबुक वर सुद्धा पुढारी वेब पेज अतिशय लोकप्रिय आहे. पुढारीच्या बातम्या लिंकच्या माध्यमातून ताज्या बातम्या लगेच वाचकांच्या पर्यंत मोबाईल वरून पाठवल्या जातात. याचाच भाग म्हणून पंढरीची वारी पुढारीच्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी समुह सरव्यवस्थापक अनिल  पाटील आणि  एजीएम राजेंद्र मांडवकर यांनी या वर्षी माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली होती. मी ऑनलाईन, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नवीन आहे ,पहिल्यांदाच बुम माईक हातात घेतला.

सुरवातीचे दोन-तीन दिवस चुका झाल्या. हळूहळू सुधारणा होत गेली.याकामी आमच्या वेबचे प्रमुख अभ्युदय रेळेकर यांनी चांगले मार्गदर्शन केले, ऑनलाइन टीम मधील अनेकांनी वेळेवेळी फोन करून माईक कसा धरायचा, सुरुवातीला काय बोलायचे, शेवट कसा करायचा  व्हिडिओ कसा करायचा याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि आपल्यापर्यंत चांगले व्हिडिओ चांगले विषय पोहचवू शकलो. गेल्या 18 दिवसात 50 वेगवेगळ्या स्टोरी आपल्यापर्यंत पुढारी ऑनलाइनच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत. या सर्व स्टोरी व्हिडिओ तयार करताना माझ्या सोबत असणारे वारकरी रणजीत पाटील, विजय शेलार, प्रकाश पाटील आणि माणिक पाटील यांनी वेळोवेळी खूप सहकार्य केले, मी त्यांचा ऋणी आहे. वेगवेगळ्या विषयावर 50 नवीन व्हिडिओ स्टोरी देताना पंढरीच्या वारीतील वैशिष्ट्य मांडण्याचा प्रयत्न केला, आपणास तो आवडला असेल ! कॅमेरा समोर आणि माईक हातात घेऊन बोलण्याची फार सवय नव्हती मात्र माऊली कृपेने सर्व होत गेले. या स्टोरी फेसबुक आणि यू ट्यूब ऑनलाइन वरती अतिशय हिट झाल्या आहेत. तरडगाव मधील एका स्टोरीला 8000 हून अधिक लोकांनी पाहिले आहे. प्रत्येक स्टोरी किमान पाचशे लोकांनी पाहिले आहे. हे पुढारीच्या लोकप्रियतेचे यश आहे,माऊली नामाची जादू आहे, पंढरीच्या वारीचा महिमा आहे !

पंढरीची वारी आळंदी पासून सुरू झाली आणि पंढरपुरात संपली. या भक्तीच्या सागरात अनेक जण भेटले. अनेकात देव दिसला, वारी यशस्वी पूर्ण होण्यासाठी अनेकांनी हात पुढे केला, सहकार्य केले. या सर्वांचा मी ऋणी आहे. 👏

भेटू लवकरच😌
तोपर्यंत राम कृष्ण हरी !







karawadikarad.blogspot.com

माऊली सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...