माऊलींच्या
कृपेने पंढरीची वारी अतिशय सुंदर चालू आहे. पंढरीच्या वारीमध्ये सर्वात
काय महत्वाचे असेल तर तडजोड. वारीमध्ये सर्व काही मिळते. वारीमध्ये फक्त
आपला भाव चांगला असला की सर्व गोष्टी उपलब्ध होऊन जातात. माझी ही चौथी वारी
आहे. वारीला जाताना करावयाची वस्तुची तयारी फार मोठी नसते. जाताना फार
सुख सुविधा घेऊन जाण्याची गरज नसते, घेऊन जायचे असतो ते फक्त शुद्ध आणि
पवित्र मन. तिथे गेल्यावर सर्व गोष्टी आपोआप मिळत राहतात. खाण्यापिण्याची
तर बिलकुल चिंता नसते. गरज असते फक्त तडजोडीची. जो कोणी तडजोड करू शकेल
त्याला वारी सोपी असते. यावर्षी वारी करताना खूप गोष्टी सहज होत गेल्या आणि
अधिकाधिक आनंद मिळत गेला. माऊलीची कृपा !
नातेपुते
मुक्कामी आल्यानंतर राहण्याची उत्तम सुविधा झाली गेली. गेली चार वर्षे
नातेपुते मुक्काम सोय राहुल खोचीकरांचे मामेभाऊ मंगेश दीक्षित यांच्या घरी
होते. दीक्षित
कुटुंबासारखी प्रत्येक गावात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरी वारकरी
मुक्कामाला असतात.काही घरांमधील वारकरी ठरलेले आहेत,गेली अनेक वर्षे
त्यांच्याच घरात उतरतात . काही वारकरी एखाद्याच्या घराच्या बाहेर जाऊन,
माऊली आजची रात्र येथे काढू का अशी विनंती करतात. बहुतांशी हे वारकरी
समाजातील असतात.दारात आलेल्या वारकऱ्याला कोणीही बाजूला जा असं सांगत नाही.
अशा अनेक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना त्यांना निवारा देण्यासाठी
वारी मार्गावरील गावात भक्तिभाव फुलून वाहत असतो. वारीचा मुक्काम जेव्हा
एखाद्या गावात असतो त्या अगोदरचा दिवस आणि तो दिवस ही गावे भक्तिभावाने
फुलत असतात. कुणाच्या घरात त्यांना येऊ नका असे म्हटले जात नाही. घराच्या
दारात, पार्किंग मध्ये, अंगणात कुठेही जागा मिळेल तिथे वारकरी विसावतात, ती
रात्र काढतात आणि पहाटे निघून जातात. संबंधित जागा मालकाच्या कोणत्याही
वस्तूची मोडतोड केली जात नाही अथवा कुठलीही वस्तू कोणी न विचारता हात लावत
नाही. वारकरी फक्त बाथरूम पाणी आणि ती जागा वापरतात. जाताना ती जागा स्वच्छ
करून जातात. सेवा करण्यात दीक्षित यांच्या कुटुंबासारख्या अनेकांना खूप
आनंद वाटतो. वारकऱ्यांच्या सेवेसाठी काही कुटुंबे चहापाणी देतात, काहीजण
जेवणाची व्यवस्था करतात .मोकळ्या समाजातील अनेक वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशी
कुटुंबे आहेत म्हणून माऊली सोहळ्यातील दिंड्यांमधील वारकरीपेक्षा अधिक
संख्येने असलेल्या मोकळा समाजातील वारकऱ्यांसाठी वारी सुसह्य होत जाते.
दीक्षित कुटुंबीयांनी आमचे अतिशय सुंदर व्यवस्था केली. नातेपुते
येथे भेटायला अमोल चव्हाण सहकुटुंब आले होते, सोबत आमच्या सौ. आणि लेक
देवयानी आली होती. देवयानीने मला भेटल्यानंतर कडकडून मिठी मारली. रात्री
जाताना तिला मला सोडवत नव्हते, मला तिला सोडवत नव्हते. खूप वेळ पप्पांच्या
मिठीत सामावली होती ती! तिच्यासाठी नातेपुते यात्रेत छोटीशी खरेदी केली.
छोटीशी खरेदी केल्यानंतरही देवयानीच्या डोळ्यात वाहणारा आनंद खूप मोठा आनंद
होता.
नातेपुते गावात
अतिशय प्राचीन हेमाडपंती गिरिजात्मक शिव शंकर महादेव मंदिर आहे. हे मंदिर
स्थापत्यशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. या मंदिराविषयी लिहिता येईल थोडी
कमी आहे. उंचावर असलेले अतिविशाल असे हे हे मंदिर सुद्धा शिखर शिंगणापूर
प्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या मालकीचे आहे. मंदिराच्या शेजारी
बळी मंदिर आहे बळी मंदिराच्या समोरच शनी मंदिर आहे. याबाबत पुढारी ऑनलाईन
साठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे, आपण अवश्य पहा. हे मंदिर
पाहिल्यानंतर आम्ही माळशिरस दिशेने मार्गक्रमण केले. माळशिरसच्या
रस्त्याच्या दुतर्फा हिरवेगार वडाची, पिंपळाची झाडे आहेत, या झाडाखाली
वारकरी आराम करतात. ही झाडे म्हणजे अनेक वर्षापासून वारकऱ्यांसाठी निवारा
आहेत .नातेपुतेत कराड तहसिलमध्ये काम केलेल्या रमा जोशी भेटल्या. रमा जोशी
आत्ता ग्रामीण सोलापूर मध्ये तहसिलदार आहेत. त्यांच्याकडे वारीचा चार
वर्षाचा अनुभव आहे. प्रशासकीय सेवेतील लोकांना माऊली मुक्कामाच्या ठिकाणी
येणे अगोदरचे 10 दिवस फार काम करावे लागते. हे काम हे अधिकारी सेवा म्हणून
करतात. महसूल, जिल्हा परिषद ,आरोग्य, वीज कंपनी, पोलीस आदी अनेक खात्यातील
लोक वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी रात्र दिवस झटत असतात. वरिष्ठ
अधिकार्यांपासून कनिष्ठ कर्मचा-यांपर्यंत सर्वजण झटून काम करतात. माऊलीचे
काम करतात .वारकऱ्यांची सेवा म्हणजे आईवडिलांची सेवा म्हणून हे लोक काम
करतात. त्यांच्या मनातील सेवाभाव भरून वाहत असतो. संबंधित गावात 2 दिवस
दोन ते तीन लाख लोक येतात ,त्यांची राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था, अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय विज, पार्किंग
आधी सर्व विषयावर सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून काम होत
असते. गेल्या काही वर्षात वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना जिल्हा
परिषदेच्या वतीने वारीसाठी वेगळा निधी दिला जातो. विविध खात्यातील 24 तास
झटणाऱ्या या शासकीय कर्मचारी, अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे
वारी सहज होत जाते हे सुखद सत्य आहे.रमा जोशी यांनी केलेल्या मनोभावे
सेवेमुळे त्यांना यावर्षी सदाशिवनगर पुरूंदावडे रिंगण, खडूस रिंगण आणि
वाखरी रिंगण तसेच पालखी तळाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती.
त्यांच्याशी गप्पा मारल्या.
नातेपुते
ते माळशिरस दरम्यान सदाशिवनगर येथे होणारे या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण
असते. हे रिंगण पाहण्यासाठी सोहळ्यातील वारकऱ्यांनाबरोबरच स्थानिक भाविक
खूप गर्दी करतात. खरेतर रिंगण हा सोहळा फक्त पाच मिनिटाचा असतो मात्र
त्याची तयारी फार मोठी असते. पुन्हा ही सर्व जबाबदारी पोलीस खात्यावर येऊन
पडते. एकाच ठिकाणी हजारो लोक येणार, त्यांची सोय आणि त्यांची सुरक्षा याचा
विचार करून पोलीस खाते संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने खूप प्रयत्न
करत असते.गेली अनेक वर्षे सदाशिवनगर येथील कारखान्याच्या ग्राउंड वर हे
रिंगण होत होते. त्यामुळे सदाशिवनगरचे गोल रिंगण या नावाने ते प्रसिद्ध
होते. कारखान्याच्या आसपासच्या इमारती वाढत गेल्या आणि वारकऱ्यांची संख्या
ही हजारावरुन लाखावर पोहचली,त्यामुळे कारखान्याची जागा अपुरी पडू लागली.
दोन-तीन वर्षांपूर्वी ही जागा बदलून कारखान्यापासून पुढेच पुरंदावडे या
गावात गोल रिंगण होते. हे रिंगण पाहण्याचा आनंद आम्ही लुटला.एका अश्वावरती
माऊली बसलेले असतात आणि दुसऱ्यावरत शितोळे सरकारचा प्रतिनिधी बसलेला असतो.
माऊलींचा घोडा आणि शितोळे सरकार यांचा अश्व गोल धावतात आणि जेव्हा माऊलींचा
अश्वाबरोबर सरकारांचा अश्व धावतो तेव्हा रिंगण पूर्ण होते. रिंगणानंतर
ज्या मार्गावरून अश्व धावला आहे त्याच्या पायाखालची माती कपाळावर
लावण्यासाठी वारकरी पुढे येतात, वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. तत्पूर्वी
रिंगण संपल्यानंतर उडीचे खेळ खेळले जातात. हे खेळ पाहण्याचा एक वेगळा आनंद
आणि अनुभव असतो. माऊलींची पालखी रिंगण स्थळावर मध्यभागी ठिकाणी ठेवली जाते.
या पालखीच्या गोलाकार वारकरी एका रांगेत बसतात आणि सुरु होतो राम कृष्ण
हरी नामाचा जप. सोबत ताल मृदुंग यांचा नाद! या वारकऱ्यांच्या मधोमध चोपदार
उभे राहून सुचना देतात. चअर्धा तास हा खेळ चालू असतो. उड्या मारण्याचा खेळ
हा झाला याचा साधा सोपा अर्थ !थकलेल्या, दमलेल्या वारकऱ्यांना मनोरंजन
होण्याच्या दृष्टीने हे खेळ खेळले जातात. विणेकरी टाळकरी या खेळात सहभागी
होतात. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या माऊली या खेळात गोल धावतात
तेव्हा सारेजण माऊली माऊली माऊली माऊली असा जयघोष करतात. वेगळाच आनंद असतो
या खेळामध्ये.
पुरंदावडे
रिंगण आटपून आम्ही पुढे निघालो. माळशिरस च्या अलीकडे एका ठिकाणी माझी बहीण
दाजी सहकुटुंब आले होते, माझे वडील दादापण आले होते, त्यांना भेटलो. माळशिरसच्या
चौकात कराडच्या तेली गणपती चौकातील कार्यकर्ते वारकऱ्यांना लाडू वाटत
होते. आपल्या कराडमधील अनेकजण भेटल्यामुळे खूप आनंद झाला. जगन पुरोहित
यांनी कडकडून मिठी मारली. रात्रीचा
मुक्काम माळशिरस येथील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन
समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे यांच्या घरी होता.वारीतील आमचे तीन मुक्काम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचओळखीच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून
आहेत. जेजुरीत संघाच्या संघाच्या एका स्वयंसेवकांच्या पेशवे यांच्या घरी
होतो, पुढे अशाच एका स्वयं संलकावतीने माळशिरस येथे आमची सोय करण्यात आले
होती.माळशिरसच्या अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर आम्ही वाघमोडे यांना फोन
केला.चौकातच त्यांचे छोटेखानी ऑफिस आहे तेथे त्यांना भेटलो. इकडच्या
तिकडच्या गप्पा मारल्या. वास्तविक वाघमोडे आणि आमची कसलीही ओळख नाही.
आमच्या मुक्कामाची व्यवस्था त्यांच्या घरी ज्यानी केली आहे त्यांचीही कसली
ओळख नव्हती.काही पत्रकार मित्र तुमच्याकडे मुक्कामी येणार आहेत त्यांची सोय
करा, असा त्यांना फोन आला. एका फोनवर कसलीही ओळख नसताना आमची राहण्याची
सोय करण्यासाठी पांडुरंग वाघमोडे तयार झाले होते. कारण यामागे होती भाजप
पक्षाची निष्ठा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क. या नेटवर्क बाबत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहीत अनेकानी कौतुक केले
आहे,त्यामुळे मी केलेले लिखाण कोणीही राजकीय समजू नये, ही कृतज्ञता व्यक्त
आहे.
माळशिरसच्या पुढे दोन
किलोमीटर असलेल्या 60 वस्ती चौकात वाघमोडे यांचे घर आहे. या ठिकाणी
वाघमोडेंची वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. 60 वस्ती हे नाव कसे पडले याचा
इतिहास त्यांनी सांगितला. ब्रिटिश कालीन बंधाऱ्यातून माळशिरस तालुक्याला
पाणी आले आहे .या बंधाऱ्याचे छोटे पोटपाट अनेक गावातून गेले आहेत. 58
नंबरचा पोट पाट माळशिरसया प्रवेशद्वाराला गावातून जातो. 59 नंबर चा पंटपाट
सध्या जिथे माऊली पालखीतळ आहे तिथून जातो. 60 नंबरचा पोटपाट माळशिरसपासून
दोन किलोमीटर वाघमोडे वस्ती इथून जातो. या साठ नंबरच्या पोट पाटामुळे या
चौकाला अहिल्यादेवी 60 वस्ती चौक असे नाव पडले आहे. पांडुरंग वाघमोडे
यांच्या सोबत एक पत्रकार या नात्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाबाबत
चर्चा केलीच त्यांनीही आमच्याकडून सातारा जिल्ह्यात राजकारणाची माहिती
घेतली. यांच्या कुटुंबीयांनी आमचे राहण्याची चांगली सोय केली.खुप दिवसानंतर
त्यांच्या घरी शेवग्याची शेंग आणि आणि बाजरी भाकरी कुस्करून खाल्ली.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली माऊली
राम कृष्ण हरी !
😌 जय माऊली 😌
माऊली सतीश मोरे
Also available at


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा