🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩
*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com
*वाल्हे*
*०३/०७/२०१९*
राम कृष्ण हरी,
तरडगाव चांदोबा लिंब
लोणंदचा दीड दिवसाचा मुक्काम आटोपून माऊली
तरडगाव मुक्कामाला निघाले. तरडगाव ते लोणंद अंतर फक्त नऊ किलोमीटर आहे, त्यामुळे दुपारी
साडेबाराच्या सुमारास माऊलीची पालखी तरडगावकडे निघाली. सातारा जिल्ह्यात लोणंदमध्ये
पालखी दीड दिवस थांबत असल्यामुळे काल सायंकाळपासूनच
माऊलींच्या दर्शनासाठी लोणंद मध्ये माऊली भक्तांचा महापूर उसळला होता. लोणंद ते तरडगाव हे अंतर खूप कमी असल्यामुळे माऊलींच्या
पालखीसोबत चालणाऱ्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भक्तांची संख्या येथे
वाढते, माऊलींच्या पालखीसोबत हे वारकरी चालतात.
लोणंदला भाविक जास्त येण्याचे का आणखी एक कारण आहे. लोणंदमध्ये पालखी
दुपारी निघते आणि त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर चांदोबाचा लिंब येथे भरणारे पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण ! चांदोबाचा लिंब
येथे होणारे पहिले रिंगण हे पाहण्यासारखे असते. रिंगण पाहून पुढे तीन किलोमीटर अंतरावर
माऊलींच्या पालखीतळावर जाऊन समाज आरतीचा पाहण्याचा आनंद लुटायचा हेही एक लोणंद ते तरडगाव
चालणे मागचे खास कारण असते.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान माऊलींचा
सोहळा लोणंद मधून निघाला, माऊलींना वेशीपर्यंत सोडण्यासाठी लोणंदकर आले होते .कापडगाव
पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी भक्तांचा जणू मेळावा भरला होता.जिकडे पाहावे
तिकडे फक्त वारकरी दिसत होते, वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यावर येत होते.
इकडे चांदोबाचा लिंब येथे रिंगण पाहण्यासाठी
पुढे येऊन अनेक भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. पोलिसांनी चोख
बंदोबस्त ठेवला होता. चांदोबाचा लिंब हे मंदिर बरोबर रस्त्याच्या एका बाजूला मात्र
रस्त्यातच आहे. लोणंद फलटण हा मार्ग चौपदरी करण्यात आला आहे . रुंदीकरणात हे मंदिर
जाऊ शकते. मात्र श्रद्धेचा व भावनेचा भाग तसेच न्यायालयीन बाब असल्यामुळे हे मंदिर
अजूनही रस्त्यातून हटवण्यात आले नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार हे लक्षात
घेऊन सातारा पोलिसांनी योग्य नियोजन करणे गरजेचे होते.माऊलींची पालखी लिंब येथे पोहोचणे
अगोदरच येथे हजारो भाविक माऊलींची वाट पाहत होते. चारच्या सुमारास माऊलींची पालखी रिंगणाच्या
ठिकाणी आली
सातारा पोलिसांच्या बेफिकीरपणा आणि स्थानिक
युवा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी यामुळे पालखी चांदोबाचा लिंब येथे आल्यानंतर ढकलाढकली
सुरू झाली. वास्तविक या ठिकाणी किती लोक उभे राहू शकतात याची काळजी व माहिती पोलिसांनी
घ्यायला हवी होती. मात्र ती न घेतल्यामुळे दिंडी सोबत आलेले वारकरी ,स्थानिक ग्रामस्थ
आणि अगोदरच येऊन बसलेले वारकरी यांची एकच गर्दी रिंगणाच्या परिसरात झाली. माऊलींच्या
अश्वाला धावत येण्यासाठी तीन फुटाचा रुंदीचा रस्ता करणे गरजेचे असते,हा करण्यासाठी रथाच्या शेजारी असणाऱ्या जागेत लोकांना मागे ढकलल्यास
सुरवात केली. मात्र या लोकांना माझ्या सरकायला जागाच नव्हती, त्यामुळे अनेकजण रेलिंगला
धडकले, रेलिंगच्या पाठीमागेच पोलिसांची व्हॅन उभी होती या व्हॅनवर स्वतः पोलीस अधीक्षक
तेजस्वी सातपुते उभ्या होत्या. त्या उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत होत्या. मात्र
काही करू शकत नव्हत्या. त्यांनी नेमलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोबाजी दाखवण्याच्या
नादामध्ये वारकऱ्यांना आणि भाविकांना ढककले. यातून पत्रकार सुद्धा सुटू शकले नाहीत.
काहींचे मोबाईल, कँमेरे खाली पडले,काहीजण खाली पडले. थोडी चेंगराचेंगरी झाली. पाच मिनिटात
रिंगणाला सुरूवात झाली. माउलींच्या अश्वाच्या पाठीमागे दुसरा घोडेस्वार धावत आला. माऊली
माऊली माऊली चा जयघोष झाला आणि पाच मिनिटात रिंगण संपले, माऊलींची पालखी पुढे निघाली.
सातारा पोलिसांचा नियोजन किती ढिसाळ होते
याचा प्रत्यय रिंगण झाल्यानंतर आला. रिंगण स्थळावर वाहतूक ठप्प झाली होती. रिंगण संपल्यानंतर
माऊली पुढे गेल्यावर ही वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र चांदोबाचा लिंब
ते तरडगाव तीन किलोमीटरचे अंतर पाया पडायला अनेकांना अडीच तासाचा कालावधी गेला. वाहतूक
खूप ठप्प झाली होती. चौपदरी रस्ता असूनही एवढा वेळ वाहतूक ठप्प झाली याचे आश्चर्य वाटले.(
*वाल्हे घाटातला अरुंद रस्ता, दिवेघाटात भर पावसात अरुंद रस्त्यावरून झालेली वाहतूक
एवढे असूनही पुणे जिल्हा पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वाहतूक विस्कळीत झाली
नव्हती*)
एका बाजूला वारकरी पुढे चालत होते दुसर्या बाजूला मुंगीच्या पावलाने चार चाकी वाहतूक
सुरू होती रिंगणाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावायला सातारा पोलीस कमी पडले हे
यातून सिद्ध झाले.
दरम्यान चांदोबाचा लिंब येथे रिंगण झाल्यानंतर
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार
घातला. सातपूते मॅडम यांचे पहिली ओळख फोनवरून झाली होती. कराड कोल्हापुर नाका येथे
वाहतुकीची होत असलेली कोंडी आणि आणि कराड पोलीसांचे दुर्लक्ष याबाबत याबाबत पुढारी
सह अनेक दैनिके छापलेल्या बातम्याची माहिती सातपूते मॅडमना गेल्या महिन्यात मोबाईल
वरून दिली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मॅडमनी एडिशनल एसपीना कराडला पाठवले होते
आणि हा प्रश्न निकाली काढला होता,याबाबत मॅडम ना धन्यवाद दिले.
रिंगण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीतून
बाहेर पडत फलटणला मुक्कामी जाण्याचा निर्णय घेतला. लोणंद ते तरडगाव ते निंबोरे हे अंतर
काल रात्री आम्ही चालून पूर्ण केले होते. गाडीने निंभोरे येथे आलो. आठ वाजता फलटण च्या
दिशेने चालायला सुरुवात केली. यादरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांचा फोन आला. तरडगाव
येथे माऊलींचे दर्शन घेऊन आणि आ. दीपक चव्हाण यांच्यासोबत भोजन आटोपून आमदार बाळासाहेब
पाटील कराडला निघाले होते. आम्ही चालत आहोत हे समजल्यानंतर त्यांनी आमचे लोकेशन्स विचारले
आणि त्याठिकाणी आम्हाला भेटावयास आले. आमच्या प्रकृतीची चौकशी केली. आ बाळासाहेब पाटील
यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा गेल्या चार वर्षापासून पंढरीची वारी पायी करतात.
आमच्या समोरच त्यांनी जशराज यांना फोन लावला, खुशाली विचारली. थोड्या थोड्या गप्पा
मारल्या आणि आम्हाला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देत ते निघून गेले.
रात्री साडेआठ ते 10.30 वाजेपर्यंत केवळ
दोन थांबे घेत फलटणला पोचलो, माझे जवळचे मित्र डॉ. प्रसन्ना पतंगे यांचे फलटण हे मूळ
गाव. दुपारी त्यांनी सहज मेसेज पाठवला होता ,'मी उद्या फलटणला येत आहे आमच्या गावी
आमच्या घरी या.' यावरआजच तुमच्या घरी येत आहे
असे मी कळवले होते. डॉक्टर पतंगे यांनी आपल्या घरी आईला फोन करून आमच्या भोजनाची तयारी
करण्याचे कळवले होते. साडेदहा वाजता डॉक्टर पतंगे यांची आई घराबाहेर रस्त्यावरच उभे राहून आमची वाटच पाहत बसल्या होत्या. माऊलींनी
आग्रहाने जेवणास घातले. डॉक्टर पतंगे यांचे बंधू जितेंद्र पतंगे हे संगीतकार आणि गायक
आहेत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये बीई झाले आहेत. जितेंद्र पतंगे यांच्या
स्टुडिओ मध्ये बसून संगीत या विषयावर चर्चा करताना अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर चर्चा
झाली. जितेंद्र पतंगे यांनी कंपोस्ट केलेली गाणी पाहिली आणि ऐकली. खूप आनंद झाला. रात्री
उशिरा 12 वाजता फलटण विश्रामगृहावर मुक्कामाला पोहोचलो. फलटण विश्रामगृहाची अवस्था
आणि दुरावस्था याच्यावर वेगळे भरपूर लिहावे लागेल.असो.रात्र घालवण्यासाठी येथे जागा
मिळाली हेही नसे थोडके!
एकंदरीत आजचा दिवस खूप आनंदाचा गेला.
एक वाजता ब्लॉग लिहून सर्वांना पाठवले आणि झोपी गेलो.
माऊली माऊली !
Also available at
👇karawadikarad.blogspot.com
🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा