राम कृष्ण हरी,
पंढरीची वारी आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली पोहोचली आहे. आज सोमवारी माऊलीचा मुक्काम वेळापूर येथे आहे. उद्या भंडीशेगाव, परवा वाखरी आणि त्यानंतर पंढरपूर. अजून तीन मुक्काम आणि पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी माऊली पंढरपुरात पोहोचणार आहेत.
सोमवारी सकाळी माऊलींची पालखी माळशिरस चा मुक्काम वेळापूरला जायला निघाली. 5 कि. मी. आल्यानंतर लगेच खुडूस नावाचे गाव आहे, याठिकाणी पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण झाले. त्या नंतर नेहमीप्रमाणे वारकर्यानी उडीचे खेळ खेळले.
आता वारकऱ्यांना वेध लागले आहेत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचे! वारकरी चालत आहेत. विसाव्याच्या ठिकाणी बसल्यानंतर चर्चा रंगतात. किती मुक्काम झाले, किती राहिले, उद्या कुठे असणार परवा कुठे असणार याची चर्चा रंगू लागली आहे. लोणंद सोडल्यापासून वारकऱ्यांना उन्हाचा खुप त्रास होत आहे. पुणे ते लोणंद पाऊस होता. पावसाळी वातावरण होते त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. थोडाफार त्रास झाला तो चिखलाचा मात्र लोणंद नंतर आता गेल्या आठ दिवसात ऊन पडले आहे. त्यातच रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा धूराचाही त्रास होत आहे
माळशिरस सोडल्यानंतर कडक ऊन पडले होते, या उन्हात चालताना तहानभूक हरवलेले वारकरी माउलींच्या नामाचा जयघोष करत होते. मात्र थकून काही वारकरी झाडाखाली आराम करत होते. खडूसचे रिंगण संपल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी, जेवणासाठी थांबले. त्यावेळी अचानक वारा सुरू झाला, जोरदार हवा येऊ लागली. धुळीचे कण वारकऱ्यांच्या ताटात येऊ लागले. जेवताना वारकऱ्यांचे चांगली दैना झाली. काही दिंडीमध्ये स्टील ताटाची सोय केलेली होती. ते वारकरी ताट घेऊन उचलून निवांत ठिकाणी गेले. मात्र पाऊस नव्हता केवळ वाराच होता. काहींच्या पत्रावळ्या उडून गेल्या. वारा आला मात्र पाऊस काय आला नाही.
पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला. आता वेळापूर जवळ आले होते. वेळापूरच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर धावा आहे. धावत जायची उताराची जागा.या उतारावरून चालत असताना तुकाराम महाराजांना विठ्ठलाचे मंदिराचे कळसाचे दर्शन झाले होते,अशी वारकऱ्यांची भावना आहे.
तुका म्हणे धावा I पुढे आहे विसावा II
असा एक अभंग प्रचलित आहे. तुम्ही धावत धावत विठ्ठलाकडे जा.लवकरच तुम्हाला विसावा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन मिळणार आहे. विठ्ठलाचे दर्शन मिळाल्यानंतर तुमची तहान भूक, चालून चालून आलेला थकवा सर्व संपणार आहे, असे या अभंगातून तुकाराम महाराजांना सांगावयाचे असेल. वारकरी धावत होते, काहीजण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. हा क्षण टिपण्यासाठी विविध चॅनलचे प्रतिनिधी रस्त्याकडेला उंचावर बसले होते. धावा संपल्यानंतर वेळापूर मध्ये रात्रीचा मुक्काम झाला.वेळापूरमध्ये रस्त्याकडेला एक प्राचीन तळे आहे.त्याला बकासुराचे तळे म्हणतात. भीमाने बकासुराचा वध वेळापूर नजीक एका गावात केला होता. ज्या बकासुराला रोज खायला गाडाभर अन्न लागायचे, बकासुर ते अन्न खाल्ल्यानंतर या तळ्यामध्ये पाणी प्यायचा, असे येथील लोकांनी सांगितले.
आजच्या प्रवासात खूप वारकरी भेटले. झाडाखाली बसलेले वारकरी गावाकडची चौकशी करत होते. पाऊस पडलाय का? पेरणी झाली का ?ऊस किती उगवला आहे? सारे ठीक आहे का ?आहे आई वडिल कसे आहेत? मुलं कशी आहेत ?याची माहिती घेत होते. वारी आता डिजिटल झाली आहे. मोबाईलवरून वारकरी गप्पा मारत आहेत. व्हिडीओ कॉलिंग लावून मुलाबाळांशी बोलणारे वारकरी पहायला मिळाले.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली माऊली ! माऊली माऊली !
Also available at
karawadikarad.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा