फॉलोअर

१० जुलै २०१९



राम कृष्ण हरी, 

बंडी शेगाव ते वाखरी पंढरीच्या वाटेतील शेवटचा टप्पा वाखरी ते पंढरपूर हा आणखीन एक शेवटचा टप्पा असता तरी वाखरी आणि पंढरपूर आता काही वेगळे राहिलेले नाही. बंडी शेगाव ते वाखरी फारसे अंतर नाही. त्यामुळे पालखी सोहळा सकाळी लवकर निघणार नव्हता आदल्या दिवशी समाज आरती दरम्यान चोपदारांनी बंडी शेगाव इथून पालखी दुपारी दीड वाजता निघेल असे अगोदरच सांगितले होते सकाळी सर्व वारकरी नेहमीपेक्षा निवांत होते लवकर उठून तयार होण्याची अंघोळ करण्याचे किंवा लगेच चालायला सुरुवात करण्याची गडबड नव्हती सर्व काही आटोक्यात आले होते. त्यामुळे सर्वजण साडेआठ नऊ वाजेपर्यंत तयार झाले.
 आज पालखीतळावर सकाळचे कीर्तन होणार होते. पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर दरम्यान दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तने होत असतात . ही कीर्तने सायंकाळी दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर होतात. मात्र सासवड, पुणे आणि भंडी शेगाव येथे सकाळ आणि संध्याकाळी कीर्तने होतात.


पंढरीच्या वारीत आळंदीपासून पालखी सोहळा वाखरी पर्यंत पोहचे पर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या परंपरा आहेत .त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे पालखीतळावर पोहोचल्यानंतर होणारी कीर्तन सेवा. गेल्या शेकडो वर्षापासून पालखीतळावर होणारे किर्तन कोणी करायचे हा प्रत्येक दिंडी सल्ल्याचा मान आहे. वाखरीपर्यंत 21 ठिकाणी कीर्तन सेवा होतात .या 21 ठिकाणी कोणाचे किर्तन होते हेही ठरलेले आहे. हा मान 21 दिंडी मालकांना मिळालेला   आहे. काय आहे ही परंपरा?  हे जाणून घेण्यासाठी मी पालखीतळा़र पोहचलो.भंडीशेगाव मध्ये रथासमोरील पंढरपूर येथील आजरेकर दिंडी क्रमांक 7 मालकाचे मानाचे कीर्तन होते. आजरेकर महाराजांच्या दिंडीवतीने कीर्तन झाले,या कीर्तनाचे मानकरी यांच्याबरोबर चर्चा केली.

इकडे आपल्या मारुतीबुवा कराडकर दिंडी क्रमांक 12 मध्ये भगवान भगवान मामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजनाचा कार्यक्रम सुरू होता. साडेनऊ वाजता कार्यक्रम संपला. त्यानंतर जेवणाच्या पंगती झाल्या. वैकुंठ वाशी भगवान भगवान मामा यांना गुलाबजाम खूप आवडत होते त्यामुळे खास स्वयंपाक केला जातो .मामांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली होण्यासाठी कराडहून अनेक लोक आले होते, अनेकांनी मामांच्या त्याविषयी आणि त्यांनी कराडकर मठासाठी केलेल्या कामाचा, त्यागाला उजाळा दिला. याठिकाणी माळा विकणारी एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी दिसली. काखेला कापडात गुंडाळून छोट्या बाळाला घेऊन ती आली होती. मुलगी पाहून समाजात अजूनही बाल विवाह होतात ह्याचे वाईट वाटले. परिस्थितीने गांजलेल्या या छोट्या मुलीकडे पाहून आणि तिच्या बाळाला  पाहून तिला थांबवले आणि तिला जेवायला बसवले. ती जेवताना तिच्या डोळ्यातील आनंद पाहून विठ्ठल दर्शन झाल्याचे सुख मिळाले.


जेवण झाल्यानंतर तंबू काढण्यात आले. आता सर्वांना पुढे वाखरीला जाण्याची घाई झाली होती. आम्ही तिथून निघायची तयारी सुरू केली. बाजीराव विहीर येथे मोठ्ठे रिंगण होणार होते. या ठिकाणी होणाऱ्या रिंगण पाहण्यासाठी फार मोठी गर्दी होते, वाखरी मध्ये येणाऱ्या सर्व पालख्या व त्यामधील वारकऱ्यांची वाढती संख्या मोठी संख्या विचारात घेऊन बाजीराव विहिर येथूनच अनेक वाहने सातारा रोड बसला वळवली जातात, तेथ पोहचलो तेथेच दोन तास विश्रांती घेतली. अजून रिंगण सुरू व्हायला फार वेळ होता. साडेचार वाजता बाहेर पडलो अचानक जोरात पाऊस सुरू झाला. हजारोच्या संख्येने भाविक येत होते, बाजीराव विहीर येथे होणाऱ्या रिंगण पाहण्यासाठी मोठ्या पटांगणावर फार गर्दी झाली होती. अनेकांना रिंगण पहायचे होते मात्र तेवढी जागा उपलब्ध नव्हती. काहीजण लांबूनच रिंगण पाहण्यासाठी झाडावर चढले, कोणी ट्रकच्या टपावर , मिळेल तिथे बसले होते.जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. जेथे रिंगण होणार होते ती जागा आहे काळे रान असल्यामुळे चिखल झाला होता. लोकांची ये-जा झाल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचा खच झाला. मात्र यातही वारकरी बेभान होऊन नाचत होते. चिखलाने आणि त्यांचे कपडे खराब झाले. पाचच्या सुमारास माऊलींची पालखी या ठिकाणी आली, उभे व गोल रिंगण झाले. नंतर आम्ही पुढे वाखरीकडे निघालो. वाखरी पासून एक किलोमीटर अंतरावर चहा पिण्यासाठी थांबलो आणि आम्ही ज्याची वाट पाहत होतो ती संत तुकाराम महाराजांची पालखी पालखी तेथे आली. तुकाराम महाराज यांच्या सोहळ्यातील वारकरी अचानक वाढल्यामुळे खूप गर्दी झाली.आम्ही जिथे थांबलो होतो तेथेच तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे उभे रिंगण होणार होते, खूप आनंद झाला.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला या सोहळ्यातील वारकरी दुतर्फा उभे राहिले, माऊलींचा अश्व दोन्ही दोन्ही दिशेने आला. वैष्णवांनी माऊली नामाचा जयघोष केला. हवेत गारवा होता वातावरण खूप चांगले होते. त्यामुळे वैष्णवांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता .वारकरी नाचत होते, महिला फुगड्या खेळत होत्या. अश्वाच्या पायाखालची माती कपाळाला लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्यातील शिस्त खरंच वेगळी होती. या सोहळ्यात महिलांची संख्या अधिक होती आणि महिला सक्रिय पण खूप होत्या हे पाहायला मिळाले. हे रिंगण पाहिल्यानंतर पुढे चालू लागलो. रस्त्यावर तुडुंब भरून वारकऱ्यांचा प्रवाह सुरू होता. माऊली सोहळ्यातील पद्धतीप्रमाणे हरिपाठ सुरू झाला. एका दिंडी वर चालत चालत हरिपाठ केला. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ करत करत वाखरी कधीआली हे समजलेच नाही. याच दरम्यान चिरंजीव पियुशचा फोन आला. तो खुप आनंदी होता, हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षाचा निकाल लागला होता तो डिस्टिंक्शन मध्ये पास झाल्याची गोड बातमी त्याचे तोडून ऐकली. खूप खूप दिवसांनी त्याचा आवाज ऐकला आनंद झाला, आनंदाश्रू वाहू लागले.

वाखरीत चौपदरी रस्त्याला सुरुवात झाली.राज्यभरातून आलेले सुमारे 2000 हून अधिक लहान-मोठ्या दिंड्या तसेच संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ,चांगदेव महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताई चांगवटेश्वर यासारख्या मोठ्या पालखी सोहळ्यातील वारकरी सर्व रात्री याच एका ठिकाणी मुक्कामाला येणार होते, काहीजण पोहचले होते. त्यामुळे वाखरीत वैष्णवांची मांदियाळी होती. या ठिकाणी आळंदीचे एक ज्ञानेश्वर भेटले. हो ज्ञानेश्वर महाराज नसून हाडवैद्य ज्ञानेश्वर काकडे आहेत. एका वेगळ्या पद्धतीने मसाज करून हातापायाची मणके बसवणारे, झाडाला उलटे टांगून मणक्यातील गॅप कमी करणारे ज्ञानेश्वर काकडे हे युट्युब वर  लोकप्रिय आहेत. पंढरपूर नगरपालिका, महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत यांच्यावतीने वाखरी मुक्काम तळावर सर्व सुखसुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आल्या होत्या. वाखरीत सुमारे पाचसहा लाख लोक एकाच वेळी आले होते,अजून पालखी सोहळ्यातील प्रमुख दिंड्या येणे बाकी होते. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली  होती. थोडा फेरफटका मारून आराम करण्यासाठी कराडकर दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन बसलो.

नऊच्या सुमारास बहुतांश सर्व पालख्या वाखरीत  आल्याचे समजल्यानंतर आम्ही सर्वजण सर्व संताच्या पादुका दर्शनासाठी बाहेर पडलो. सुरुवातीला संत तुकाराम महाराज, त्यानंतर मुक्ताई, सोपान काका गाडगेनाथ महाराज कराडकर तसेच अनेक लहान-मोठ्या संताच्या पादुकांचे दर्शन घेतले.सर्वात शेवटी माऊलींच्या पालखी तळावर पोचलो तेव्हा तिथे समाज आरती सुरू होती. माऊलीच्या सोहळ्यातील ही शेवटची समाज आरती. त्यामुळे  सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल महसूल खाते,पोलीस खाते यांच्यासहित सर्व शासकीय विभागाचे, शासनाचे राजाभाऊ चोपदार यांनी आभार मानले. पालखी सोहळा दरम्यान गेल्या सोळा दिवसात निधन झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कृतज्ञतेने वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून शासनाच्या सर्व विभागाचे आभार मानले. पंढरीला येणाऱ्या सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचे दर्शन झाल्यामुळे मन तृप्त झाले होते. पुन्हा आपल्या दिंडीमध्ये आलो आणि जेवायला बसलो.

आता रात्रीचे दहा वाजले होते. वाखरीमध्ये मुक्काम करण्याऐवजी पुढे पंढरपूरला चालत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व चार सहकारी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आमच्यासारखे अनेक वारकरी या रस्त्यावर चालत होते. वाखरी ते पंढरपूर हे ५ किलोमीटर अंतर मात्र या रस्त्याला सगळी दुकाने थाटलेली होती, रात्रभर वारकरी चालत होते. रात्रीच्या अकरा वाजता वाजल्या तरी नामसंकिर्तन आवाज ऐकू येत होते. बाराच्या सुमारास पंढरपुरला पोहोचलो. पंढरपूरच्या वेदान्त भक्त निवासमध्ये पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या वतीने आमची निवासस्थानाची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी रात्री साडेबारा वाजता पोहचलो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली कृपा दुसरे काय !

जय माऊली
माऊली सतीश मोरे


Also available at
karawadikarad.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...