फॉलोअर

१४ जुलै २०२१

आमचा वारीचा प्रवास उंडाळे विभागात

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१४ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.आज आमचा वारीचा प्रवास उंडाळे विभागात सुरू झाला आहे.गेल्या वर्षी आम्ही मनमंदिर वारी केली होती, त्यातील गावे आम्ही टाळली आहेत.गाववातून प्रवास रिपीट झाला असेल पण संपूर्ण नवीन वारी मार्गावरून आम्ही निसर्गाचा आनंद घेत आहोत.
आम्ही पाचवड फाट्यापासून चालायला सुरुवात केली. काल सांगीतल्या प्रमाणे वारी आणि पावसाचा खूप जवळचा संबंध असतो,आहे.आज सकाळी पावणे सहा वाजता घरातून बाहेर पडलो तेव्हा धो धो पाऊस सुरू होता. छत्री जॅकेट तयारी करून असे सर्वजण सव्वा सहाच्या दरम्यान पाचवड फाट्यावर पोहचलो. तिथे एका पेट्रोल पंपासमोर गाडी पार्क केली आणि भर पावसात आम्ही धोंडेवाडी गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आज पावसाने आमची परीक्षा घ्यायची ठरवले होते. एक सारखा पाऊस सुरू होता मात्र तरीही ब्ल्यूटूथवर मोठ्या आवाजात हरिपाठ लावून आम्ही चालू लागलो. रस्त्यावर गर्दी कमी होती मात्र भर पावसात चालणे एक अवघड काम होते. माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला काही अडचण नव्हती.डोक्यावर छत्री धरून सुद्धा आमच्यातील काहीजण भिजले होते,बुटांमध्ये पाणी शिरले होते. एव्हाना कालेटेक येथे पोहोचलो होतो.या दरम्यान मला पंढरीच्या वारीतील एका पावसातील प्रवासाची आठवण झाली. २०१५/१६ ची वारी असेल.सासवड येथे मुक्काम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो.त्या दिवशी मी मुख्य पालखी सोहळ्यातुन चालणार होतो. सकाळी सात वाजता सासवड गाव सोडल्यानंतर अचानक इतका जोरदार पाऊस सुरू झाला. वारकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र माऊली पालखी सोहळ्याची शिस्त कोणी सोडली नाही.भर पावसात सर्वजण चालत होते, पावसाला कुणीही जुमानले नाही. उलट पावसात वारकऱ्यांचा उत्साह अजून वाढला होता. सासवड दिवे घाटामध्ये एकदा पावसातील पंढरीच्या वारीचा आनंद घेतला होता. भरपावसात सासवड ते जेजुरी केलेला प्रवास मी कधी विसरू शकणार नाही आणि आज त्या प्रवासाची मला आठवण झाली.
कालेटेकच्या दरम्यान आल्यानंतर थोडा पाऊस कमी झाला, पूर्ण पाऊस थांबला आणि निसर्गाचे दुसरे रूप आम्हाला पाहायला मिळाले. मुनावळे गावाच्या बाजूला असणाऱ्या पावसाचे ढग जमिनीवरून डोंगरावर वाहत होते, हे निसर्गरम्य चित्र पाहत असताना या डोंगरदऱ्यातून मोरांचा जोरात आवाज ऐकू येत होता. पाऊस थांबला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा झपाझपा पावले टाकत धोंडेवाडी फाट्यावर पोहोचलो. आणि गावाकडे जायला निघालो.
धोंडेवाडी फाटा ते धोंडेवाडी गावा दरम्यान दीड किलोमीटरच्या अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला खचाखच पाण्याने भरलेल्या विहीरी आणि उसाच्या जोमाने वाढलेल्या लागणी पहायला मिळाल्या. या भागातील शेतकरी प्रयोगशील आहेत.गावात पोहोचेपर्यंत या गावातील माझे मित्र आणि पुढारी चे जुने सहकारी प्रभाकर पवार आमचे वाहन घेवून गावात यायला लागले होते. धोंडेवाडी गावातून आम्ही पुढे जायला निघालो. धोंडेवाडी गाव पार करून पुढे गेल्यानंतर उजवीकडे पुनर्वसित डिचोली गावाकडे जायला एक फाटा आहे तिकडे आम्ही वळालो.
कोयनानगर भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बाधित झालेले डिचोली गाव कराड तालुक्यात धोंडेवाडी आणि बाबरमाची येथे वसले आहे. बाबरमाची येथे यापूर्वी अनेकदा जायचा प्रसंग आला आहे, मात्र धोंडेवाडी डिचोलीला आज पहिल्यांदाच गेलो होतो. साधारण अर्धा किलो चालल्यानंतर डिचोली गावाचे प्रवेशद्वार दिसू लागले. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे डिचोली धोंडेवाडी गाव पंचवीस-तीस घराचे आहे, या गावाची लोकसंख्या चारपाचशेच्या आसपास आहे. सध्या हे गाव धोंडेवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर शिस्तबद्ध प्लॉटिंग केलेली घरे, मोठे बंगले पाहायला मिळाले. काही साधी घरे पण होती. गावात एसटी बस निवारा उभारण्यात आले आहे, मात्र हा निवारा मुख्य रस्त्यापासून आत अडगळीच्या जागी का उभे केले आहे याचे कोडे आम्हाला कळले नाही.
पुढे गावातील मुख्य चौकात पोहोचल्यानंतर ग्रामपंचायत समोर चौकात आम्ही थांबलो. वृक्षारोपण करण्यासाठी आमचे साहित्य येणाऱ्या गाडीमध्ये मागे असल्यामुळे आम्ही एका घरात टिकाव मागण्यासाठी गेलो. तो एक टुमदार बंगला होता. त्या घरातून दोन माऊली बाहेर आल्या आणि त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली.आम्ही आमचा संकल्प व वारीची माहिती दिल्यानंतर ते लोक आमच्याशी एकरुप झाले आणि लगेच त्यांनी शेजारच्या लोकांकडून टिकाव आमच्याजवळ दिले. झाड कुठे लावायचे याबाबतची माहिती घेताना सदर व्यक्ती बाळासाहेब कोळेकर आहेत असे आम्हाला समजले. बाळासाहेब कोळेकर हे या गावचे मोठे प्रस्थ आहे. अतिशय मनमिळाऊ असे हे व्यक्तिमत्त्व आहे. डिचोली गावात यांना मोठा सन्मान आहे. बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला ग्रामपंचायत समोरील खुल्या जागेत झाड लावण्यासाठी जागा दाखवली. दरम्यान प्रभाकर पवार आमची गाडी घेऊन तिथे दाखल झाले. आम्ही खड्डा काढायला सुरुवात केली, दहाच मिनिटात गावातील आणखीन तीन चार लोक त्याठिकाणी आले. त्यांनी आम्हाला खड्डा काढायला मदत केली. या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले. या झाडाला बाजूला लावण्यासाठी विटा बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. उपस्थित दगडू बावधाने, राजाराम मिरजेत, जगनाथ कोळेकर लक्षमण शेळके या ग्रामस्थांनी त्याच झाडाच्या आसपास एक काट्यांचे कंपाउंड तयार केले. दरम्यान कोळेकर यांच्या घरातून आलेला चहा आम्ही घेतला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल च्या जयघोष केला, झाडाला पाणी घातले. पुनर्वसित हे गाव अतिशय सुंदर आहे आणि गावातील ग्रामस्थ अतिशय मनमिळावू आहेत. अजूनही त्यांच्या भाषेत एक वेगळेपण जाणवते. डिचोली गाव आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसित झाले आहे. या गावातून गडावर जाण्यासाठी अतिशय चांगला मार्ग आहे.या परिसरातील अनेक ग्रामस्थ याच मार्गे गडावर जातात. गावातील खुल्या जागेत मैदानावर वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला जागा द्याल का अशी विनंती रणजीत पाटील यांनी केल्यानंतर बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सर्व मंडळी सोबत फोटो काढून अतिशय गोड आठवणी साठवत आम्ही परत धोंडेवाडी गावात आलो.
धोंडेवाडी हे अतिशय जुने गाव आहे. गावाची लोकसंख्या ४५००च्या सुमारास आहे. या अगोदर मला मला मिळालेल्या माहितीनुसार हे छोटे गाव असावे असा मी समज केला होता. १९८४ सालापर्यंत या गावात पाण्याचे फार मोठे दुर्भिक्ष्य होते. मात्र कृष्णा साखर कारखान्याची पाणी योजना आल्यानंतर हे गाव सुजलाम सुफलाम झाले आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती पूरक उद्योग हाच आहे. या गावात प्रामुख्याने धनगर समाजातील लोक जास्त आहेत, त्यांच्या जमिनीही जास्त आहेत. गावात अतिशय जुने बिरोबा देवस्थान आहे. या हे मंदिर अतिशय प्रसिद्ध असून काले, काले टेक, मुनावळे नारायणवाडी या गावांचे श्रद्धास्थान आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर प्राथमिक शाळेसमोर आम्ही झाडे लावण्यासाठी थांबलो. या ठिकाणी अगोदरच गावचे सरपंच सुरेखा काकडे यांचे पती सचिन काकडे ,श्री सुरेश जाखले, श्री माणिक गंगावणे, माजी पोलीस पाटील, ग्रामपंचायत सेवक श्री सुहास गडाळे, दीपक काकडे, शिवाजी मोटे आले होते. त्यांनी अतिशय आदराने आमचे स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात एका बाजूला आम्हीच वडाचं एक झाड लावले. पुंडलिक वरदेव असा जयघोष केला आणि आम्ही प्राथमिक शाळेच्या इमारतीत जाऊन थांबलो.
या शाळेची अतिशय रंजक माहिती बोलताना आम्हाला मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली पहिल्यांदा या गावात शाळेची स्थापना केली आहे. काले या गावात रयत ची पहिली शाळा स्थापना केली गेली असे सांगितले जाते मात्र येथील ग्रामस्थांच्या मते काले गावाच्या अगोदरच धोंडेवाडी गावात कर्मवीरांनी ही पहिली प्राथमिक शाळा काढली. या शाळेच्या उद्घाटनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील स्वतः गावात आले होते. यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा या गावास भेट दिली होती.गावात आनंदराव पाटील विद्यालय आहे.आनंदराव पाटील हे स्वातंत्र सैनिक होते. काले येथै हायस्कूल असतानाही या गावापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर धोंडेवाडी येथे रयत शिक्षण संस्थेने आणखी दुसरे हायस्कूल सुरू केले यामागे या गावाची कर्मवीर भाऊराव पाटलांवर असणारी श्रद्धा हे कारण आहे,असे आम्हाला ग्रामस्थांनी सांगितले.
सुनील काकडे यांनी यादरम्यान बोलताना गावातील रूढी परंपरा विषयी खूप चांगली माहिती दिली. या गावात लोक अतिशय सहकारी वृत्तीचे आहेत. बिरोबा मोठे देवस्थान आहे. या गावात असणारा वेताळबा परिसरातील चार गावांचं श्रद्धास्थान आहे. बिरोबाचे यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. नवसाला पावणारा बिरोबा देव आहे. बिरोबा देवाला केलेले नवस फेडण्याची एक वेगळी पद्धत या गावात आहे. त्याला गुगळ असे म्हणतात. ज्याने देवाला नवस केले आहे तो डोक्यावर एक मडके घेतो, त्याच्यामध्ये वातीचा दिवटा ठेवून पेटवला जातो. हे गुगळ डोक्यावर घेऊन ती व्यक्ती अनवाणी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून बिरोबा मंदिरासमोर जाते आणि त्यानंतर ते नवस फिटते, प्रत्येक वर्षी पाडव्याला या देवाची फार मोठी यात्रा असते. पाडव्यादिवशी नवस फेडण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात .
सुनील काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यां समवेत गप्पा मारताना या गावा विषयी माहिती मिळालीच शिवाय आणि परंपराही कळाल्या. चहापाणी करून आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला.
आजची वारी भर पावसात झाली खरी पण आम्हाला खूप आनंदाची वाटली. चालण्याचा कुठलाही त्रास आला वाटला नाही. जिवाभावाची नवीन माणसं भेटली, डिचोली गावाची माहिती मिळाली, आगाशिवगडला जाण्यासाठी नवीन रस्ता पाहायला मिळाला. अतिशय आनंदात वारी संपन्न झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१३ जुलै २०२१

घारेवाडी फाटा ते धुळोबा मंदिरा

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१३ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आजही आमची निसर्गवारी होती घारेवाडी फाटा ते धुळोबा मंदिरापर्यंत. मात्र शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व माझे सहकारी चंद्रजीत पाटील यांनी धुळोबा मंदिरानजीक असणाऱ्या डोंगरावरील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करु या,असे सुचवले.आम्ही सकाळी सहा वाजता एकत्र येऊन साडेसहापर्यंत धुळोबा मंदिरासमोर पोहोचलो. जाताना घारेवाडी गावातील अतिशय सुंदर अतिशय सुंदर मंदिर पाहिले. या मंदिर परिसरात असणारा उंच पिंपळवृक्ष आणि त्याशेजारी ग्रामस्थांनी तयार केलेला पार ,बाग, वृक्षारोपण खरंच पाहण्यासारखे आहे.आम्ही शिवम अध्यात्मिक केंद्राच्या रस्त्याने पुढे निघालो,आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे दुरूनच इंद्रजीत देशमुख यांनी तयार केलेल्या भव्य अध्यात्मिक स्मारकाला आम्ही दुरूनच नमस्कार केला आणि वर मंदिरात पोचलो.
कोरोना संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर या पायी वारीस राज्य शासनाने परवानगी नाकारली आहे. आळंदी ते पंढरपूर हे अंतर सुमारे २२१ किलोमीटर इतके आहे. त्यामुळेच तालुक्यातील विविध भागात दररोज ६ किलोमीटर पायी चालत जाऊन २ जुलै ते २० जुलै या कालावधीत २२१ वडाच्या झाडे लावण्याचा संकल्प माझ्या सहीत, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील (नाना), कराड नगरपालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, युवा उद्योजक गौतम करपे, डॉ. अमित खाडे, संदीप सूर्यवंशी,अभिजित सुर्यवंशी यांनी केला आहे.
१ जुलैला सह्याद्रि कारखान्यावर वृक्षारोपण करून सुरूवात केल्यानंतर निसर्ग वारीचे मंगळवारी सकाळी धुळोबा डोंगर येेथे आगमन झाले. या परिसरात आज मी खूप दिवसांनी गेलो होतो.अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून तिथे गेल्यानंतर खाली डोंगराच्या कुशीत दिसणारे शिवम केंद्र,भव्य पाझर तलाव आणि निसर्गाने उधळण केलेली रंगसंगती पाहून खूप आनंद झाला.
श्री धुळोबा डोंगरावर १६ मोठी झाडे लावायची होती, ती खाली उतरवली. महादेव मंदिर केवळ अडीच किलोमीटर आहे असे आम्हाला सांगण्यात आले, मात्र हे मंदिर कुठेही दिसत नव्हते. धुळोबाला नमस्कार करून आम्ही चालावयास सुरुवात केली, हरिपाठ सुरू केला.अतिशय सुंदर असा हा ट्रेक होता. निसरड्या रस्त्यातून, घनदाट झाडीतून तर कधी पठारावरुन चालताना मजा येत होती.
दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे निसरडी बनलेली पायवाट तुडवत शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे रणजित शिंदे, ब्रिजेश रावळ, मुकूंद पोतदार उर्फ बंटी भैय्या, नंदू खडतरे, गणेश पवार यांच्यासह मदतीसाठी आलेले किल्ले सदाशिवगडचे दुर्गसेवक आबासाहेब लोकरे, संदीप मुळीक, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे, नरेंद्र मुळीक, चंद्रजीत पाटील यांनी अडथळ्यांवर मात करत सर्व झाडे धुळोबा डोंगर पायथ्यापासून डोंगरावर नेली.या कामी कराडमधील खांबे वॉच कंपनीचे विश्वास खांबे आणि कराडमधील श्रीकृष्ण एंटरप्रायझेसचे हरेश पटेल, महेंद्र पटेल, अशोक पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले होते. पटेल बंधू तर सर्वात अगोदर सकाळी सहा वाजताच घारेवाडीत पोहचले होते.
सर्व मावळे वरती मंदिरापर्यंत पोहचले होते मात्र ट्रेकिंगचा अनुभव नसल्यामुळे आम्ही राम कृष्ण हरी ,छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशी घोषणा देत हळू वरती मार्गक्रमण करत होतो.आज आमच्या सोबत ओगलेवाडी येथील व्यापारी माझे मित्र धनंजय राजमाने सहभागी झाले होते. आम्ही प्रत्येकाने सोबत एक झाड,पाण्याचा कॅन घेतलेला होता. दम लागला की अनेक वेळा थांबावं लागलं. मधूनच रिमझिम पाऊस येत होता. रस्ता घसरटी असल्यामुळे एकमेकाला शाब्दिक आधार देत आम्ही चालत राहिलो. पुढे विस्तीर्ण पठारावर आल्यानंतर संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसू लागला. कोळेवाडी, शिंदेवाडी, तुळसण, तारुख ही गावे इवलीशी दिसत होती. समोर असणारा आगाशिवगड, वसंतगड आम्हाला वाकुल्या दाखवत होता. मधूनच बारीक पाऊस येत होता. डोंगरावर धुके येत होते.या निसर्ग वारीतील हा पावसाचा आमचा पहिला अनुभव. प्रत्येक वर्षी वारीमध्ये पाऊस येतोच, मात्र गेली काही दिवस आला नव्हता. आज मात्र आम्हाला पावसाने गाठलेच. रिमझिम पावसात मधूनच सूर्यप्रकाश दर्शन झाले आणि हा परिसर अजूनच खुलून दिसायला लागला.
आठच्या सुमारास आम्ही महादेव मंदिरासमोर पोहचलो. मंदिरा समोर मोठ्या दिमाखाने फडकत असलेल्या भगव्या झेंड्याला आम्ही वाकून नमस्कार केला. त्या ठिकाणी अगोदरच गेलेले शिवराय ट्रेकिंगचे मावळे वृक्षारोपणाची तयारी करत होते. आमचे रणजीत नाना पाटील त्यांना मदत करत होते. डोंगरावर पोचल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. छोटेखानी मंदिरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही जाऊन उभे राहिलो. पाऊस थांबत नसल्याने पावसात सर्व मावळ्यांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केले. आज वृक्षारोपण करण्याचा आनंद फार वेगळाच होता. डोक्यावर जोरदार पाऊस पडत होता, हवा वाहत होती. सगळे पावसात भिजत असुनही कुणाचे लक्ष पावसाकडे नव्हते, सगळ्यांचे लक्ष्य एकच होते झाडे लावायची, झाडे लावायची आणि झाडे लावायची. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणून आम्ही याठिकाणी आणलेली पाच वडाची झाडे लावली तर शिवराय ट्रेकिंग ग्रूपने इतर अकरा झाडे लावली.
*आता शिवराय ट्रेकिंग ग्रुप कराडबद्दल थोडसं*
... हा ग्रुप सन २०१२ साली अस्तित्वात आला. किल्ले लिंगाणा, कळसुबाई शिखर यांच्यासह राज्यातील गडकोटांची भ्रमंती व संवर्धन कार्यात हा ग्रुप अग्रेसर आहे. कराड तालुक्यातील सह्याद्रीच्या विविध डोंगर रांगा तुडवत असताना हा ग्रुप धुळोबा डोंगरावर गेला होता. त्यावेळी तेथील श्री शंभू महादेव मंदिराची अवस्था पाहून या ग्रुपच्या मावळ्यांना खूप वाईट वाटलं आणि या ठिकाणी नव्याने मंदिर उभारण्याचा निर्धार शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांनी २०१९ साली केला होता. केवळ निर्धार न करता ग्रुपमधील मावळ्यांनी स्वतःच्या खर्चातून मंदिराची उभारणी करण्याचे ध्येय बाळगत १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मंदिराच्या जिर्णोद्धारास प्रारंभ केला होता. धड पायी चालता येत नाही अशा अवघड पायवाटेने २० ते २५ किलोचे ओझे वाहून विटा, वाळू, खडी, सिमेंट पायथ्यापासून डोंगरवर नेत शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसह दुर्गसेवकांना शिवराय ट्रेकिंग ग्रुप नेहमीच मोलाची मदत करतो. किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकही शिवराय ट्रेकिंग ग्रुपला धुळोबा डोंगरावरील शंभू महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी श्रमदान करून मोलाची मदत करतात आणि मंगळवारी हेच पहावयास मिळाले. सर्वांचे परिश्रम पाहून अवाक् झाल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही.
मंगळवारी निसर्ग वारीसाठी निवडलेल्या एका एका झाडाचे वजन जवळपास १५ ते १६ किलो इतके होते. इतके वजन अंगावर घेत निसरड्या वाटेवरून पावसात भिजत पायथ्यापासून सर्व मावळ्यांनी झाडे डोंगरावर नेल्याने आम्हाला मावळ्यांच्या अथक परिश्रमाची जाणीव झाली. कारण पायवाटेने मोकळे असूनही आम्हाला धड चालता येत नव्हते. एकमेकांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळेच शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकांच्या परिश्रमाला कोणत्या शब्दात दाद द्यायची ? हेच आम्हाला उमजत नव्हते.
झाडं लावून आम्ही सर्वांनी जय शिवाजी...जय भवानी, राम कृष्ण हरी असा जयघोष करत मोठ्या उत्साहात फोटोमध्ये आठवणी टिपल्या. या ठिकाणी शिवराय ट्रेकिंग ग्रुपने वृक्ष संगोपनासाठी किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकांच्या मदतीने ठिबक सिंचन केले आहे. त्यामुळे आम्ही लावलेल्या ५ वडाच्या झाडांसह अन्य १६ झाडांचे नक्की संगोपन होणार याचा आम्हाला विश्वास आहे.
ही झाडे लावून परत येताना जो प्रवास होता तो आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा आहे. गड, टेकडी चढून जाणे एकवेळ सोपे असते मात्र उतरणे फार मोठे दिव्य असते. उंच टेकडीवरून खाली येताना आम्हाला खुप काळजी घ्यावी लागली. नुकताच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. अशा या निसरड्या रस्त्यातून एकमेकाचा हात धरत आम्ही खाली उतरू लागलो. आज शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे मावळे आमच्यासोबत नसते तर घसरगुंडी करत, जखमी होऊन आम्हाला खाली यावे लागले असते. मात्र या मावळ्यांनी आम्हा सर्वांना हात दिला,आमची काळजी घेतली आणि सुखरूप आम्हाला खाली आणले. माऊलींनी आमच्या सर्वांसाठी ही अतिशय चांगली व्यवस्था केली होती. हा अर्धा तासाचा प्रवास खरंच अविस्मरणीय असा होता.
साडेनऊच्या सुमारास आम्ही धुळोबा मंदिरात पोहचलो. सारे पावसात चिंब भिजलेले होतो, कपडे सुकवली. येथे बसून थोडा आराम केला. सभागृहात बसून आम्ही भडंग चहा घेतला आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही परत यायला लागलो.
येताना चचेगांव येथील कुमार पाटील आटकेकर यांच्या फार्म हाऊस मध्ये आम्ही इडली सांबर प्रसाद घेतला. कुमार पाटील यांनी आमचे अतिशय आनंदाने स्वागत करत पाहुणचार केला. माऊलींना नमस्कार करून आम्ही अकरा वाजता कराडात परत आलो.
आजची वारी ट्रेकिंग वारी होती. आज खुप आॉक्सिजन आणि आनंद मिळाला. धुळोबाच्या डोंगरावर खरंच एकदा गेले पाहिजे आणि या डोंगरावरून पुढे अडीच किलोमीटर असणाऱ्या महादेव मंदिराकडे पण आपण नक्की जाऊन या. हा ट्रेक करताना आपल्यासोबत हा भाग माहित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाणे हे आपल्या हिताचे ठरेल.
जय शिवाजी...
जय भवानी
जय धुळोबा.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१२ जुलै २०२१

विंग गाव

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१२ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आजच्या आमच्या निसर्ग वारीला सुरुवात झाली ढेबेवाडी खोऱ्यातील विंग येथून. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सुरली घाट,शामगाव घाट, मसूर परिसर,उंब्रज परिसर ,तळबीड परिसर तसेच विजयनगर तांबवे परिसर करत आम्ही आज कराड-ढेबेवाडी रस्ता परिसरात आलो होतो. विंग फाट्यापासून ६.३० वाजता चालायला सुरुवात केली. या ठिकाणी आमच्या स्वागतासाठी नवीन ओळख झालेले अमोल खबाले पाटील आले होते. त्यांच्यासोबत आम्ही गावात निघालो.
विंग गाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. कराड दक्षिणमधील सर्व निवडणुकीचा शुभारंभ विंगच्या मारुती समोर नारळ फोडून केला जातो. मारुती मंदिरासमोर ७ वाजता पोहचलो. या चौकात वडाचा वृक्ष आहे, त्या समोर अनेक सभा झाल्या आहेत संपूर्ण नवीन गावाला प्रदक्षिणा घातली अन पूढे निघालो.
विंग गावातील अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत मात्र पंढरीच्या वारीच्या निमित्ताने माझ्या आणि रणजित पाटलांच्या ओळखीचे झालेले बारा नंबर दिंडीतील अनेक वारकरी आमचे जीवाभावाचे आहेत. वर्षभर त्यांच्याशी आमचा संपर्क असतो. आळंदी ते पंढरपूर माझी जेव्हा पहिली वारी झाली निवास खबाले पाटील यांचा एम एस 94 95 नंबरचा एक ट्रक माझा वारीतील सोबती होता. निवास खबाले हे अनेक वर्षापासून बारा नंबर दिंडीसाठी आपला ट्रक घेऊन वीस दिवस सहभागी असतात. या ट्रक मधून वारकऱ्यांचे सर्व साहित्य नेले जाते. विंग मध्ये आल्यानंतर निवास खबाले यांची आठवण झाली आणि तेवढ्यातच निवास खबाले आमच्यासमोर आले. याला योगायोग म्हणायचा की माऊलीची कृपा हेच मला कळले नाही.राम कृष्ण हरी म्हणून त्यांची चौकशी करून आम्ही पुढे निघालो.
मघाशी सांगितल्याप्रमाणे या पालखी सोहळ्यात मिळालेले विंग गावातील आणखीन 3 सहकारी म्हणजे बाळासाहेब कुराडे आणि पांडुरंग होगले,संजय खबाले. या वारकऱ्यांसोबत माऊलीच्या सोहळ्यातील अनेक आठवणी आहेत. गावातून आम्ही पुढे जात असताना टप्प्याटप्प्याने आम्हाला हे तिन्ही सहकारी येऊन मिळाले.
अमोल खबाले सुरुवातीपासून आमच्यासोबत दिंडीमध्ये सहभागी झाले होते, गावातून बाहेर आल्यानंतर विंग खिंड येथे वृक्षारोपण करण्याचे आमचे नियोजन होते, त्यानुसार आम्ही हरिपाठ करत पुढे चालत राहिलो.
खिंडीच्या जवळ आल्यानंतर डावीकडे वळून आम्ही कानिफनाथ मंदिराकडे जायला निघालो. या मंदिराकडे जाणारा रस्ता कच्चा, चिखलाचा होता. विंग फाटा ते खिंड तीन किलोमीटर अंतर आम्ही डांबरी रस्त्यावरून आलो होतो,आता चिखलातून जायचे होते. पाऊस पडून गेला होता .या रस्त्यातून शेतकरी येताना आम्ही पाहिले. अशा चिखलातून सुद्धा एक शेतकरी सायकलवरून उसाचे ओझे कसेबसे घेऊन निघाला होता, त्याचे हे कष्ट पाहून आम्हाला या रस्त्याचे काहीच वाटले नाही. त्या शेतकऱ्याला भेटल्यानंतर त्याने 'हे आमचं रोजचंच काम आहे असे सांगून सगळे दर वाढतात मात्र दुधाचे दर का वाढत नाहीत आणि दुधाचे दर वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात तेवढे पैसे का मिळत नाहीत' असा सवाल करून तो तिथून निघून गेला. शेतकऱ्यांच्या समस्या बाबत बोलावं तेवढं कमी आहे. यावर चर्चा करत आम्ही पुढे आलो.
एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर पुढे डांबरी रस्ता आला आणि तिथे श्रीकृष्ण सिटी हा बोर्ड पाहिला. तेथून पुन्हा डावीकडे कानिफनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता ओढ्यातून होता. ओढ्यात संथ पाणी वाहत होते आणि अतिशय सुंदर असा तो नजराणा होता.ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यात माशासारखी बेडकांची पिल्ले विहार करत होती. बेडकांच्या जीवनक्रमामध्ये पाण्यात पोहणारी छोटीची पिल्ले माशासारखे असतात, त्यानंतर त्यांचे शेपूट निघून जाते व ती पिल्ले मोठी होऊन जमिनीवर येतात, असे आम्हाला उपस्थित अमोलनी सांगितले. पाण्याच्या प्रवाहात अनेक छोटे छोटे जलचर होते. त्यापैकी सर्वांच्या ओळखीचा एक जलचर म्हणजे निवळी. निवळी हा जलचर पाण्याच्या पृष्ठभागावर झिगझँग सारखा पोहत असतो. अस्वच्छ झालेले पाणी पाच मिनिटात तो स्वच्छ करतो. अशा ओढ्याच्या ओघळीच्या रस्त्यावरून चालताना आम्हाला खूप मजा येत होती.
निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद शेतकरी दररोज घेतात मात्र आज आम्ही घेत होतो. तेवढ्यात डोक्यावर मक्याचे ओझे घेऊन येणारा एक शेतकरी आम्हाला भेटला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कुणीतरी अधिकारी आहे अशा भीतीने तो आमच्याशी न बोलता तिथून निघून गेला. पुढे आलो उजव्या बाजूला कानिफनाथ मंदिराकडे जायला रस्ता होता. मंदिरासमोर पोहचलो. हे एक छोटेसे मंदीर आहे. या कानिफनाथांच्या नावानेच विंगातून प्रत्येक वर्षी पंढरपूरला दिंडी जाते, ही दिंडी फक्त कार्तिकी एकादशीला असते. नाथांना नमस्कार करून आम्ही परत आलो. येताना नाथपंथातील गुरुशिष्य परंपरेविषयी माहिती घेतली. नाथपंथातील शेवटचा अनुग्रह निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिला आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्व जगाला ज्ञानरूपी अनुग्रह दिला,असा नाथपंथाचा इतिहास आहे.
पुन्हा त्याच रस्त्याने विंग खिंडीत पोहोचलो. या खिंडी जवळ गावचे श्रद्धास्थान असणारे म्हसोबाचे मंदिर आहे. खूप जुने छोटेखानी हे मंदिर आहे. या मंदिरासमोर आम्ही सर्व मान्यवर वारकऱ्यांच्या उपस्थित खड्डा काढला आणि वडाचे झाड लावले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला.
दरम्यान पांडुरंग होगले माऊलींनी सर्वांच्या डोक्यावर गंध अबीर लावला. खूप दिवसातून हा गंध डोक्यावर लावायचा संधी मिळाली. दोन वर्षापूर्वी पंढरीच्या वारीत डोक्यावर गंध लावला होता. वारकरी संप्रदायाची ती परंपराच आहे. गंध बुक्का टिकली लावण्याचे सर्व साहित्य माळकरी, वारकऱ्यांच्या बॅगेत असते. तो सकाळची नित्य पूजा करून डोक्यावर गंध लावतोच. आमच्यासारख्या वारकऱ्यांच्या डोक्यावर गंध लावण्यासाठी संपूर्ण वारीत अनेक जण भेटतात. गंध लावणारे छोटे व्यावसायिक आहेत,या माध्यमातून वारीत मोठा व्यवसाय होतो. विंगच्या खिंडीत झाड लावून झाल्यानंतर आम्ही गावात येऊन बाळासाहेब कुराडे यांच्या घरात चहा पाणी घेतले. आणि विंग खिंडीतून धोंडेवाडी मार्गे कराडला परत आलो. येताना काले टेक नर्सरीत वडाचे व इतर झाडांची चौकशी केली. या नर्सरीमध्ये एक खूप मोठी गोगलगाय पहिली. एवढी मोठी गोगलगाय मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.
निसर्ग वारीमध्ये आम्ही आज निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटला. डांबरी रस्ता,चिखलाचा रस्ता आणि ओढ्याचा रस्ता या तिन्ही मार्गावरून आम्ही चाललो. अतिशय सुंदर असा अनुभव होता.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

११ जुलै २०२१

तांबवे फाटा

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
११ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमच्या निसर्ग वारीचा आजचा प्रवास सकाळी सहा वाजता तांबवे फाटा येथून सुरू झाला. तांबवे फाटा येथे माझे पुढारीमधील सहकारी विकास पाटील त्यांच्या दोन मित्रा सोबत तिथे आमच्या स्वागतासाठी आले होते.'राम कृष्ण हरी' करुन आम्ही आमच्या वारीला सुरुवात केली.
तांबवे फाट्यावरून चालत जाण्याचा अनुभव एक वेगळाच होता. मोबाईल वरती हरिपाठ सुरू केल्यानंतर त्या निसर्गरम्य वातावरणात एक वेगळाच फिल तयार झाला. नुकताच पाऊस होऊन गेलेला होता. थंड हवा वाहत होती,उंच डोंगरावर सभोवताली धुके अच्छादले होते आणि आज निसर्गाची एक वेगळीच जादू आम्ही अनुभवत होतो. आम्ही तांबव्याच्या नवीन पुलावर पोहचलो.
तांबव्याच्या जुन्या पूलाबाबत आपण या अगोदर अनेकदा ऐकले आहे, माहिती घेतली आहे. या पुलावरून पावसाळ्यात पाणी हमखास जायचेच. तांबबव्याचा जुना पूल आणि संगमनगर धक्कापुल या दोन्ही पुलावरून पाणी गेल्याच्या बातम्या वाचल्याशिवाय कोणालाच पावसाळा सुरू झाला असं वाटत नाही. तो जुना पूल काही दिवसापूर्वी जमीनदोस्त करण्यात आलला आहे. या पुलाविषयी माझे मित्र एडवोकेट विजय पाटील तांबवेकर यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट केली होती. या पुलाच्या तसेच गावातील विविध विकास कामाच्या मुलगा उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्री बॅरिस्टर अ. र. अंतुले अशी ती पोस्ट होती. हा पुल बांधण्यासाठी त्याकाळी पंधरा लाख रुपये खर्च आला होता, आणि तो जमीनदोस्त करण्यासाठी २०२१ मध्ये पंधरा लाख रुपयांचे टेंडर निघाले होते. हा एक विरोधाभास म्हणा किंवा बदलता काळ म्हणा,त्या पोस्टमध्ये नमुद होता. आता तांबवेला जाण्यासाठी नवीन पूल झाला आहे ,या नवीन पुलावरून सुद्धा श्रेयवाद राजकारणाचे वारे वाहिलेले आहे.अखेर हा पूल पूर्ण झाला आणि जनतेसाठी काही महिन्यापूर्वी खुला करण्यात आलेला आहे.
नवीन पुलावर पोहोचल्यानंतर कोयना नदीचे सुंदर पात्र पाहून त्या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह होणार नाही असा कोणी सापडणार नाही. या पुलावरून दिसणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि तिथून या वाहत येणारे संथ पाणी पाहणे आल्हाददायी असते. आम्ही त्या पुलावर काही काळ थांबलो आणि पुढे चालायला सुरुवात केली. तांबवे गाव माहित नाही असा जुन्या काळातला क्वचितच व्यक्ती सापडेल. तांबव्याचा विष्णूबाळा किंवा विष्णू बाळांचे तांबवे म्हणा,या गावाची माहिती, इतिहास कृष्णा आणि वारणा काठाला अजूनही ताजा वाटतो. स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेला विष्णु बाळा पाटील आणि त्यानंतर घडलेले सत्र याविषयी चित्रपटही निघाला होता.मंगला बनसोडे तमाशा मंडळाने या सत्यघटनेवर आधारित वगनाट्य सादर केले होते. चित्रपट आणि वगनाट्याला रसिकांनी उचलून घेतले होते. अशा ह्या गावात आम्ही प्रवेश केला.
खरंतर हे गाव स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. स्वातंत्र्यसैनिकांना भूमीगत होण्यासाठी हा परिसर सुरक्षित ठिकाण समजले जायचे. अनेक राजकीय चढ-उताराचे, राजकीय क्रांतीचे हे गाव केंद्र आहे.कोयना काठावर वसलेले हे गाव सधन आहे. कोयना नदीला पूर आल्यानंतर या गावात पाणी येते. गेल्या दोन दशकांत आलेल्या महापुरात या गावात पाणी घुसल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. अशा या गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले. आम्हाला एका जुन्या माऊली मंदिरात पोहोचलो. येथील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहून माऊलींचे डोळे भरून दर्शन घेतले. अतिशय सुंदर देहभान विसरून जाण्यारे चित्र होते.
तिथून पुढे आम्ही पारा जवळच्या दुसऱ्या विठ्ठल मंदिरात गेलो. या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे निस्सीम भक्त ह. भ. प. कृष्णत बुवा तांबवेकर यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेतले. कृष्णतबुवा यांची दिंडी प्रत्येक वर्षे पंढरपूरला जाते. या दिंडीचा पहिला मुक्काम आमच्या करवडी गावात असतो.अनेक वर्षापासून ही दिंडी मी आमच्या गावात पाहिलेली आहे.आमच्या घरासमोरच ही दिंडी उतरत असल्यामुळे दिंडी मधील वारकरी आणि या गावाबाबत एक वेगळा आदरभाव आणि प्रेम आहे. यावर्षी ही दिंडी निघणार नसल्यामुळे दिंडी चालक चार दिवसापूर्वी माऊली पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते. या ठिकाणी माऊलींच्या दर्शनानंतर या पादुका पुन्हा तांबवेत आणून मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत. आषाढी एकादशीपर्यंत या पादुका या मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असून येथे रोज नित्य हरिपाठ, किर्तन होतात. या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे गावाला प्रदक्षिणा घातली. मुख्य चौकात आल्यानंतर अण्णा बाळा पाटील हायस्कूलच्या जवळून आम्ही गावाबाहेर पडलो, दक्षिण तांबवेकडे निघालो.
विष्णु बाळा पाटील यांचे चिरंजीवाचे घर या रस्त्याला आहे, ते आम्हाला भेटले त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि आम्ही पुढे निघालो. 1976 चा पूर आल्यानंतर गावामधील अनेक घरे स्थलांतरित झाली ती दक्षिण तांबवेमध्ये. या दक्षिण तांबवे गावातून पुढे निघालो. तांबवे गावात तामजाई देवीचे मंदिर आहे आणि या देवीच्या नावावरूनच या गावाला तांबवे असे नाव पडले आहे.
या गावाचे ग्रामदेवत असणार्या पेरूच्या बागेतील भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतले. या मंदीरासमोर असणाऱ्या महाकाय पिंपळ वृक्षाच्या समोर उभे राहिलो. पिंपळाच्या झाडाचे आयुष्य फार मोठे असते. पिंपळ सर्वांना सावली आणि आधार तर देतोच शिवाय मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही देतो. पूर्वी गावागावात एक पिंपळपार असायचा. या पारावर गावातील अनेक छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे. झाडाखालचा तमाशा आपल्यापैकी खूप लोकांनी पहिला असेल. नाटके पाहिली असतील. अशा या पिंपळवृक्षांनी अनेक अशी उन्हाळे-पावसाळे, पूर, अनेक पिढ्या, स्थित्यंतरे पाहिली असतील.पिंपळवृक्षाला नमस्कार करून आम्ही पुढे आरेवाडीचा दिशेने अधिक कुच केली.
आजचा संपूर्ण प्रवास हिरव्यागार झाडीतून असल्यामुळे अंतर कसे पार पडत होते हेच कळत नव्हते. आमच्यासोबत गावातील काही वारकरी सहकारी होते. त्यांच्याकडून पाठरवाडीचा डोंगर आणि भैरवनाथ देवाची माहिती घेत घेत 'राम कृष्ण हरी' म्हणत आम्ही आरेवाडीच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. तिथे आम्हाला एक
जुना आड पाहायला मिळाला,आडाच्या भिंतीवर मोडी भाषेतील एक शिलालेख होता. येथे काही काळ थांबावे अशा आम्हास सुचना आल्यामुळे आम्ही थांबलो.
पाच दहा मिनिटात एका वेगळ्या आवाजाकडे आमचे लक्ष वेधले. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा, तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, टाळ पखवाजचा आवाज ऐकून आम्ही तिकडे पाहिले. या गावातील वारकरी आमच्या दिशेने येत होते. ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखालील वारकरी दिंडी पाहून आमच्या आनंदाला उधाण आले. आमच्या निसर्ग वारीच्या स्वागतासाठी आज माऊलींनी ही दिंडी पाठवून दिली होती.खुप दिवसानंतर अशी दिंडी पाहायला मिळाली. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत सोशल डिस्टंसिंग ठेवत पंधरा वीस लोकांची ही दिंडी आमच्या स्वागताला आली. त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरीला प्रदक्षिणा मारून आम्ही या दिंडीमध्ये सहभागी झालो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या तालावर आम्ही पुढे निघालो.
आज खरंच आमच्या निसर्ग वारीतला अत्यंत आनंदाचा क्षण होता. आम्ही आज वारीचा फील घेत होतो. आम्हाला दोन वर्षे वारी करता आली नव्हती मात्र आरेवाडी येथील वारकरी संप्रदायातील लोकांनी आमच्यासाठी,आमच्या स्वागतासाठी एक छोटीशी दिंडी काढली होती. दिंडी आरेवाडी येथील स्मशानभूमी मध्ये दाखल झाली. या ठिकाणी अगोदरच खड्डा काढण्यात आलेला होता.
सरपंच सौ. रेशमा यादव
उपसरपंच अविनाश देसाई,
लक्ष्मण देसाई, अधिक महाराज, निवृत्ती महाराज, रामचंद्र यादव, वारकरी संप्रदायीक भजनी मंडळ
विणेकरी पार्थ महाराज,
मृदंगवादक तुषार महाराज,
पताका धारक दिलीप देसाई आदी सहभागी झाले होते. रामदास महाराज यांनी दरम्यान त्यांच्या अतिशय गोड अशा आवाजात 'मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला' हा अभंग सुरू केला.
मोगरा फुलला हा अभंग गेल्या अनेक वर्षांपासून वर्षापासून माझी मोबाईल डायलर टोन आहे ,मला हा अभंग खूप आवडतो. इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरीमधील गोड असा हा अभंग, सुंदर अशी ही रचना लतादीदींनी तितक्याच सुंदर व गोड आवाजात गायली आहे. आज अभंग ह.भ.प रामदास महाराजांच्या आवाजात ऐकताना एक वेगळीच चाल होती, मात्र फील तोच होता.वारकरी संप्रदायातील कीर्तनकार वेगवेगळे अभंग त्यांच्या वेगळ्या चालीमध्ये म्हणतात आणि त्याला टाळ आणि पखवाजची जोड मिळते, त्यानंतर निर्माण होणारा नाद आणि संगीत मनाला तृप्त करते. विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई हा शब्द जरी घेतला आणि त्यासोबत टाळ-मृदंगाचा आवाज ऐकला तरी वारकरी नाचायला लागतो.आज मोगरा फुलला अभंग ऐकताना खूप खूप आनंद झाला. आरेवाडी स्मशानभूमीत सर्वांच्या उपस्थितीत आम्ही वडाचे एक मोठे झाड लावले.
या दिंडीमध्ये वीणा घेऊन सहभागी झालेला एक छोटा वारकरी पार्थ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार लहान मुलावर असले तर ती मुले वाया जाणार नाहीत. १९८५ ते ९० मध्ये करवडी गावात ज्ञानेश्वरी पारायण व्हायचे तेव्हा हा विणा अखंड ठेवला जायचा. हा विणा सप्ताहाच्या कालावधीमध्ये खाली ठेवला जात नसे, तो विणा घेऊन उभे राहण्यासाठी दिवसातील 24 तासाचे एक वेळापत्रक केले जायचे, त्या वेळापत्रकानुसार गावातील चार किंवा पाच लोक तो वीणा घेऊन उभे राहत.आम्ही जेव्हा संध्याकाळी प्रवचन ऐकायला जात होतो तेव्हा तो विणा घेत असू. वीणा घेऊन उभा राहण्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळत होता, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विणा देताना दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या पाया पडायचे आणि त्यानंतर वीणा दुसऱ्याला द्यायचा, ही वारकरी संप्रदायातील पद्धत आहे. आज तो छोटा विणेकरी पाहून माझ्या आठवणी जाग्या झाल्या.
आरेवाडी स्मशानभूमीमध्ये महिलांना बसण्यासाठी सावली नव्हती आणि त्यांना सावली मिळावी म्हणून एका योग्य जागी माऊलीं वडाचे झाड लावले, याबाबत ग्रामस्थांनी आम्हाला धन्यवाद दिले. त्यानंतर आमची दिंडी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आली. या मंदिरामध्ये आम्हा सर्व निसर्ग वारीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दिंडीचालक ह भ प रामदास महाराज यांनी श्रीश्रेत्र आरेवाडी ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडी बाबत माहिती दिली. यावर्षी पंढरपूरला दिंडी जाणार नसल्यामुळे गावाने या मंदिरातच विठ्ठल रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली आणि पादुकाची प्रतिष्ठापना केली आहे. विठ्ठल रुक्मिणी आणि समोर बसलेले ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्ती पाहून डोळे भरून आले. गावाला असणारा वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आजही जपला जात आहे, याची खूप आनंद झाला. सर्व वारकरी मंडळींना नमस्कार करुन आणि धन्यवाद देऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
दरम्यान रामदास महाराज यांच्या घरी जाऊन आम्ही चहा पाणी घेतले आणि याच गावातील यांच्या यादव यांच्या निवासस्थानी कांदेपोहे घेऊन आम्ही परत आलो.
आजच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे आरेवाडीमध्ये आज वारकऱ्यांच्या सोबतीत टाळ आणि माऊली नामाच्या गजराच्या काही काळ चाललो. आळंदी ते पंढरपूर दिंडी चालत आहे असा काही अनुभव आला. हा आनंद आम्ही हृदयात जपून ठेवणार आहोत. माउली माउली!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल

१० जुलै २०२१

सुपनेला जाण्यासाठी

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१० जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारीला जाण्यासाठी पावणेसहा वाजता कृष्णा नाक्यावर जमलो,या ठिकाणी सायकलवरून अकरा मारुती पैकी सात मारुती करण्यासाठी निघालेले आमचे गावचे फौजी (निवृत्त) शशिकांत कुंभार भेटले. कराड अर्बन बॅंकेचे मुख्य टेलिफोन ऑपरेटर शशिकांत कुंभार यांच्याविषयी एक दिवस स्वतंत्र लिहीणार आहे. आज एक गोष्ट सांगतो, मिलिटरीमध्ये असताना बॉम्बचा स्फोट होऊन त्यांना एक पाय गमवावा लागला होता. मात्र त्यानंतर कृत्रिम पाय बसवून गेल्या अनेक वर्षापासून ते आनंदी जीवन जगत आहेत. एका पायात कृत्रिम पाय असूनही ते पुराच्या पाण्यात पोहतात. कृत्रिम पाय लावून ते रोज सुमारे 15 ते 20 किमी सायकल प्रवास करतात.अशा या फौजीला आणि त्याच्या जिद्दीला सलाम. आज ते आणि त्याचे सहकारी कराड ,शहापूर,मसूर,उंब्रज, माझगाव,चाफळ ते शिंगणवाडी असे सात मारुती सायकलवरून करणार होते, त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देऊन आज आमचा प्रवास सुरु केला.
सुपनेला जाण्यासाठी आरटीओ ऑफिस समोर जमलो. या ठिकाणी सुपनेचे प्रकाश आकाराम पाटील आम्हाला येऊन मिळाले आणि त्यांच्यासोबत आम्ही जायला निघालो. सुपने हे गाव गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कराड पासून जवळच आहे, हरिपाठ करत आम्ही दहाच मिनिटात सुपने फाट्यावर पोहोचलो.१९७६ साली आलेला पूर आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती याचा विचार करून वारुंजी प्रमाणे सुपने हे गाव सुद्धा नदीपासून वर रस्त्याकडेला पुनर्वसित केले आहे. जुनं आणि नवीन सुपने असे दोन भाग आहेत.नवीन सुपने मध्ये आम्ही प्रवेश केला. भव्य ६० फुटी रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय नियोजनबद्ध प्लॉटिंग, सुंदर घरे, बंगले तसेच रस्त्याच्या मध्यभागी असणारे डिव्हायडर या मधून आम्ही पुढे जात होतो. गाव पार करून आम्ही गावाच्या बाहेर आलो आणि जुन्या सुपने दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. हा रस्ता ऊस शेतीतून जातो. हाच रस्ता पुढे किरपे गावाला जाऊन मिळतो आणि आणि पुढे घारेवाडीला जाऊन ढेबेवाडी रस्त्याला मिळतो. सुपने ते किरपे दरम्यान कोयना नदीवर अतिशय भव्यदिव्य असा पूल बांधण्यात आला आहे, हा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
या रस्त्यावर आम्हाला ग्रामस्थ आणि वारकरी माळकरी भेटले. या लोकांचा सकाळचा नित्यक्रम आणि चालणे सुरू होते. राम कृष्ण हरी म्हणून आम्ही सर्वांना नमस्कार केला, त्यांनीही तितक्याच प्रेमभावनेने आम्हाला राम कृष्ण हरी नमस्कार केला. राम कृष्ण हरी या शब्दाची जादूच वेगळी आहे. हाय-हॅलो पेक्षा राम कृष्ण हरी, राम राम, नमस्कार या शब्दांत जो आदर आपुलकी आणि जिव्हाळा आहे तो जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असे वाटत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच शिवारात हिरवीगार शेती पाहून 'शेतात उन नसतं' हे ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचे वाक्य आठवलं.
सुपने तसेच केसे पाडळी, खोडशी,येरवळे या गावात एके काळी सुमारे शंभर गुऱ्हाळे होती. एकट्या सुपने गावात एकवीस गुऱ्हाळे होती. आता यापैकी 16 गुऱ्हाळे सुरू आहेत. गुऱ्हाळाचे गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल पण या गावात गुळाचा कारखाना आहे. आपण साखर कारखाना पहिला असेल. पण व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात चालविण्यात येणारा गुळाचा कारखाना रस्त्याकडेला आम्हाला पाहायला मिळाला. सध्या गुळाचा सिजन नसल्यामुळे सर्व गुऱ्हाळे बंद होती. या गावातून एके काळी कोकणात गुळ जात असे. चिपळूण पर्यंत बैलगाड्यातून गुळ जात असे, पंधरा-वीस बैलगाड्या एकत्रितपणे कोयना नगर मार्गे पुढे चिपळूणचा घाटातून खाली उतरायच्या. येताना तेथून आंबे, किराणा किंवा इतर माल घेऊन यायचा,अशी पद्धत होती.
सुपने गाव राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असे गाव आहे. या गावात अनेक मोठे नेते होऊन गेले. दिवंगत माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत आकाराम पाटील याच गावचे. पूर्वी हे गाव उंब्रज जिल्हा परिषदेला जोडलेले होते. अनेक राजकीय घडामोडी आणि राजकीय स्थित्यंतराचे हे गाव साक्षीदार आहे.
सुपने हे नाव कसे पडले याबाबत आख्यायिका प्रसिद्ध आहेत. लक्ष्मणाने शुपर्णका राक्षक्षिणीचे नाक कापले, तिचा वध केला. या राक्षसीनीने सुपने जवळच्या एका डोहात जाऊन रक्ताने माखलेले नाक आणि तोंड धुतले. हा परिसर जोमलिंग मंदीर जवळ आहे. येथे नाक धुतले म्हणून अजूनही या भागात नकटे मासे सापडतात.शुपर्णिकीचे नाक कापल्याने रक्त आल्यामुळे याच परिसरात तिच्या अंगावर सगळे रक्त शिंपले होते. शिंपलेचे पुढे अपभ्रंश होऊन सुपने असे नाव पडले आहे, असे या ठिकाणचे लोक सांगतात. महाकाय रासक्षिणीला मारून टाकल्यानंतर तिचे दोन स्तन दूर पडले,स्तनाच्या आकाराचे दोन डोंगर या गावापासून जवळच आहेत.
आम्ही पुढे अगदी जुन्या सुपने गावात पोहोचलो. गावात प्रवेश करताच अनेक पडलेले वाडे पाहून या गावाची भव्यता लक्षात आली. या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे,त्याचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी श्री रामप्रभूच्या मांडीवर बसलेली सीतामाई अशी एक मूर्ती आहे. रामाच्या मांडीवर बसलेली सीता अशी मूर्ती कुठेही पाहायला मिळत नाही. फक्त येथेच आहे, असे प्रकाश पाटील यांनी आम्हाला सांगितले. या मंदिराच्या जिर्णोद्धारावेळी या मूर्तीच्या जवळ हनुमानाच्या रूपात अनेक माकडे येऊन बसली होती अशी आठवण आम्हाला त्यांनी सांगितली.
पुढे गावातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहचलो, मंदिरामधील महादेवाचे लिंग खुप मोठ्ठे, आकर्षक आहे. या मंदिराचे अवशेष पाहिल्यानंतर हे गाव किती प्राचीन आहे याची जाणीव झाली. मंदिरासमोरची दीपमाळ अतिशय सुंदर आहे. मंदिरासमोर एक पार आणि उंच पिंपळाचे झाड आहे. पारावर ,1832 (सन 1920) असा उल्लेख आहे. या पाराला १९७६ च्या पुराचे पाणी लागले होते.जिथे पाणी लागले होते तिथे एक खिळा मारून ठेवला होता मात्र तो आता खाली पडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पारा शेजारीच पालखी ठेवण्यासाठी एक विसावा दगडी कट्टा आहे. हा कट्टा खूप जुना आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार 1972 साली झाला होता, या वेळी ग्रामस्थांनी देणगी दिल्याचा एक फलक या ठिकाणी अजूनही आहे. 2 रुपये पासून 201 रुपये पर्यंत देणगी दिल्याचा याठिकाणी उल्लेख आहे.
महादेव मंदिरा शेजारीच ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. या दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन आम्ही मधल्या रस्त्याने नावजी महाराज मठाकडे निघालो. या मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. हे वृक्ष संभाळण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे. या रस्त्याला आम्हाला एक जुने पेव पाहायला मिळाले. तेथून पुढे आम्ही नावजी नाथाच्या मठामध्ये आलो. मठाच्या परिसरात सुद्धा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. येथे आम्ही वडाची 2 झाडे वारकरी माऊलीच्या हस्ते लावली. या वारकऱ्यांनी ही झाडे आम्ही जगवणार, तुम्ही कधीपण झाडे पहायला या, असे सांगून आमच्या निसर्ग वारीचे कौतुक केले. वृक्षारोपण झाल्यानंतर आम्ही नावजी महाराज मठामध्ये आलो. नावजी महाराज हे फार मोठे संत होऊन गेले.महाराजांची याठिकाणी संजीवन समाधी आहे. लोकांची या महाराजांवर फार मोठी श्रद्धा आहे. ही नावजी महाराजांच्या कृपेने गावावर मोठे संकट कधी येत नाही ,अशी ग्रामस्थांची धारणा आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो.
समोर सायकलवरून तालुकाभर निसर्ग भटकंती करणारे उद्योजक विजय चव्हाण, प्राणजित पाटील आणि अमोल सुतार हे तिघे जण भेटले. कराडमध्ये अनेक सायकल ग्रुप आहेत. हे हौशी सायकलपटू रोज तालुकाभर सायकलवरून प्रवास करतात, आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटले. या सर्वांसोबत आम्ही प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी आलो. पाटील त्यांच्या घरातील भगीनींनी आमच्यासाठी स्वीट कॉर्न भजी चटणी तयार केली होती, हा माऊलीचा प्रसाद खाऊन आम्ही तृप्त झालो.परिसरातील उद्योगाची, गावाची माहिती घेतली आणि आम्ही परत निघालो.
वैयक्तिक आणि घरगुती कारणामुळे वेळ न मिळाल्यामुळे आज ब्लॉग लिहायला उशीर झाला. माऊलींच्या कृपेने आमची निसर्गवारी अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू आहे,आपली कृपा आमच्यावर अशीच राहू देत ओ माऊली !
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०९ जुलै २०२१

विजयनगर येथील गोशाळेत.

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
९ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज निसर्गवारी थोडी उशिरा सुरू झाली,याचं कारण आमचं वाहन हायवेजवळ आल्यानंतर पंक्चर झाले. मात्र पाच मिनिटात माउलींनी व्यवस्था केली. हायवेवरच्या एका पंपाशेजारी पंक्चर काढून त्यानंतर साडेसहाच्या दरम्यान आम्ही वारुंजी फाटा येथे पोहोचलो. तेथे वाहन ईसुझी एका हॉटेलसमोर उभे केले. आमच्या विसाव्याच्या ठिकाणी वाहन पोहोच करण्यासाठीची व्यवस्था करुन आम्ही तिथून चालावयास सुरुवात केली.
आमची वारी होती विजयनगर येथील गोशाळेत.वारुंजी फाट्यावरून आम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर नुकताच तयार झालेला राष्ट्रीय महामार्ग १६९ ई आमच्यासाठी खुला होता, मोकळा होता. वाहनांची संख्या कमी होती. हरिपाठ करत करत आम्ही शासकीय शेती महाविद्यालयासाठी पोहचलो. या ठिकाणी आमच्या आठवणीसाठी एक फोटो काढताना जणूकाही आम्ही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत काय असा फिल आमच्यातल्या काही जणांना आला. पुढे विजयनगर गाव जवळच होते गावात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळच सुनील पाटील आमची वाट पाहत होते. त्यांचे जवळचा एक सहकारी आज कोव्हिडमुळे मरण पावल्यामुळे ते आमच्यासोबत सहभागी होणार नव्हते त्यांची भेट घेऊन आम्ही पुढे चालू लागलो.
विजयनगर या गावाविषयी आजच्या या वारीमध्ये मी आपणास सविस्तर माहिती सांगणार आहे. या गावात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही महाकाली मंदिराचे जाऊन देवीचे दर्शन घेतले. या गावात अनेकदा आलो मात्र मंदिरात जाण्याचा योग आला नव्हता.बाहेरूनच या मंदिराची भव्यता नेत्र सुखावत होती. आज प्रत्यक्ष आम्ही सर्वजण या मंदिरात प्रवेश केल्यानंतर खुप आनंद झाला. कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेले हे गाव स्थलांतरित होऊन दोन-तीन ठिकाणी विस्थापित झाले. यापैकी महत्त्वाचा भाग म्हणजे विजयनगर. १९५९ साली कोयना धरणाच्या कामासाठी गोजेगाव सहित कोयनानगर खोऱ्यातील अनेक गावे शासनाने ताब्यात घेतली. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक अनेक गावे होती. धरणासाठी हे सर्व क्षेत्र संपादित केल्यानंतर ही गावे इथून बाहेर काढण्यात आली. पुनर्वसनाच्या कायद्यानुसार त्यांचे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन झाले. गोजेगाव हे गाव कराड जवळील मुंडे गावाजवळ तसेच चिंचणी अंबक, राममळा आणि नवी मुंबईतील काही परिसरात विस्थापित करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांना या विस्थापित झालेल्या नवीन गावात जमिनी देण्यात आल्या.
१९५९ मध्ये गोजेगाव कराड तालुक्यात आल्यानंतर १९८५ अखेर मुंडे ग्रामपंचायत अधिपत्याखाली या गावाचे कामकाज सुरू होते. गोजेगावसह सहा गावाची मुलकी पाटीलकी असणारे जमीनदार राघोजी बहिरू पाटील यांनी कराड जवळील मुंडे या गावात येण्याचा निर्णय घेतला. (स्व. राघोजी पाटील हे माजी आमदार आनंदराव पाटील यांचे वडील आहेत) राघोजी पाटील यांना रामचंद्र, जयराम, आनंदराव, विश्वासराव, वसंतराव आणि दिलिप ही सहा मुले आणि दोन मुली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राघोजी पाटील यांची ३६५ एकर जमीन गेली. एवढी जमीन कोयना धरणाच्या निर्मितीसाठी देणारे राघोजी पाटील यांच्या कार्याला खरंच सलाम करावासा वाटतो.
राघोजी पाटील यांचा लाकडाचा व्यवसाय होता. मालकीचे दोन ट्रक होते. या निमित्ताने कराडचा संबंध आणि येणेजाणे होतेच. कराडात मुंडे येथे आल्यानंतर नवीन गाव व ग्रामस्थासोबत जुळवून घेतले. गोजेगावच्या शेतकऱ्यांना मुंडे गायरान तसेच वन विभागाची जमीन देण्यात आली. कोयना विभागाच्या अगदी वेगळी नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन कामाला सुरुवात केली. अगोदरच विस्थापित झालेल्या या गोजेगावाला पुन्हा एकदा १९८० मध्ये विस्थापित होण्याची वेळ आली. वीज कंपनीच्या (MSEB) ४०० केव्ही आणि २२० केव्ही अशा दोन वेगवेगळ्या भव्य सबस्टेशनसाठी या गावातील जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय सरकारने घेतला.कोयना धरणासाठी जमीन सोडून या गावाकडे आलो, मात्र येथील जमीन पुन्हा वीज कंपनीसाठी जाणार हे कळल्यावर ग्रामस्थ नाराज झाले. मात्र त्या वेळचे जिल्हाधिकारी व्ही.पी. राजा यांनी ग्रामस्थांची बाजू घेतली. ( त्याकाळात धरणग्रस्तांची बाजू घेणारे जिल्हाधिकारी होते हे किती मोठे भाग्य !) युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व इंटक वीज या कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील आणि तत्कालीन जिल्हा परिषद शेती सभापती जगन्नाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभी राहिली. या संघटनेने बाजू मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विस्थापित गावाची जमीन तुम्ही पुन्हा घेऊ शकत नाही, असे वीज कंपनीला ठणकाऊन सांगितले. शेवटी तडजोडीचा मार्ग निघाला आणि मुंडे आणि विजयनगर या दोन्ही गावातील ज्या लोकांची जमीन या वीज केंद्रासाठी जात आहे त्या कुटुंबांतील एकाला एमएसईबी मध्ये नोकरीला घ्यायचा अटीवर ही जमीन सबस्टेशनला देण्यात आली. मात्र एकत्र कुटुंबातील प्रत्येक भावाच्या एका मुलाला वीज कंपनीमध्ये कामावर घ्यावेच लागेल असा आग्रह आनंदराव पाटील यांच्यासह सर्वानी धरला. वीज कंपनीने ही मागणी मान्य केली. सरासरी घरटी एक जण नोकरीला लागला आणि त्या ठिकाणी वीज केंद्र उभे राहिले. या सब स्टेशन मध्ये कोयनानगर होऊन आलेले वीज आणली जाते आणि ही वीज महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यात पुरवली जाते.
मुंडे ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असलेल्या गोजेगाव या ग्रामस्थांनी 1985 झाली स्वतंत्र ग्रामपंचायत मागितली. राघोजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली याला मंजुरी मिळाली. स्वतंत्र झालेल्या गावाला विजयनगर हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज कंपनीच्या शेजारी कोयना धरणातील विस्थापित गाव म्हणून विजयनगर हे नामकरण करण्यात आले. १९८६ ते १९९६ दहा वर्षे या गावाचे सरपंच म्हणून आनंदराव पाटील यांनी काम पाहिले. त्यानंतरच्या काळात त्यांचे बंधू वसंतराव पाटील,पुतणे सुनील पाटील या गावचे सरपंच होते. या गावाने अनेक शासकीय पातळीवरील अभियानात भाग घेऊन पुरस्कार मिळालेले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात स्वच्छता अभियान, निर्मल ग्रामसहित अनेक उपक्रम राबवले गेले. नियोजनबद्ध असलेल्या गावात आपण कधीही भेट दिली तर स्वच्छता स्वच्छता दिसते.
स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने आनंदराव पाटील यांनी लोकवर्गणीतून ग्रामदैवत महाकाली मंदिर उभे केले आहे. या मंदिरात महाकालीसह जानाईदेवी, चंडीकादेवी, केदारनाथ, तुळाईदेवी, झोळाईदेवी मुर्ती स्थापित करण्यातआल्या आहेत. मंदिरासमोर तत्कालीन खासदार प्रेमलाताई चव्हाण यांच्या फंडातून 1987 झाली अतिशय भव्यदिव्य सभामंडप उभारला आहे. तर सभागृहातील सुशोभीकरण आणि परिसर पेविंग ब्लॉक आदी कामे आ. आनंदराव पाटील यांनी यांच्या फंडातून पूर्ण झाली आहेत. या हॉलमधे एकाच वेळी पाचशे लोक बसू शकतात इतकी चांगली सोय आहे. प्रत्येक वर्षी या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा या महाकाली मंदिरात आम्ही काही काळ विसावा घेतला देवीचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो.
*विजयनगर या गावाविषयी अलीकडच्या पिढीला खूप कमी माहिती आहे, या गावात जाण्याचा योग निसर्गवारीच्या निमित्ताने आल्यानंतर मुद्दामहून या गावाची माहिती आणि या ग्रामस्थांचा त्याग जनतेला कळावा म्हणून ही सर्व माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे.*
कोयना धरणाच्या निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिलेले आहे, अनेकजण आपली घरे जशीच्या तशी आहे तिथे सोडून ते दुसर्या गावात विस्थापित झाले आहेत. राघोजी पाटील यांच्यासारखी महान दानशूर व्यक्ती ३६५ एकर जमीन देतात, बदल्यात तुटपुंजा मोबदला आणि १६ एकर जमीन घेतात, त्याग करतात तेव्हाच कोयना धरणासारखा महान प्रकल्प उभा राहू शकतो. राज्यभरात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत मात्र त्या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जातात त्यांचे पुनर्वसन करणे आज देखील शासनाला जमलेले नाही, हे दुर्दैव आहे. कोयना धरण पुनर्वसन धरणग्रस्तांच्या समस्या आजही तशाच आहेत.
विजयनगर सारख्या गावाने मिळेल तेवढी शासकीय मदत घेऊन कराडजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्या काळात जमिनी कमी मिळाल्या. मात्र शहराजवळ राहून हे गाव आहे अतिशय प्रगत झाले आहे. या गावातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित आहेत. मोठ्या पदावर काम करत आहेत.
या गावातून बाहेर पडत आम्ही आमच्या विसाव्याच्या ठिकाणी गोशाळेकडे निघालो. आनंदराव पाटील यांचे धाकटे बंधू वसंतराव पाटील (भाऊदा) यांनी काही वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेत सामाजिक बांधिलकीतून गोशाळा सुरू केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी सहा एकर क्षेत्रात गोशाळा आहे. सुरुवातीचे काही काळात 50 हून अधिक गाई होत्या,गोप्रेमीकडून या शाळेला मदत केली जात होती. भाऊदा या गोशाळेसाठी पूर्णवेळ काम करत असतात. वनौषधी करणे, गोमुत्रापासून वेगवेगळे घटक तयार करण्यापासून शेणाच्या वस्तू तयार करण्यासाठी तेथे कार्यरत असतात. आनंदराव पाटील यांचे थोरले बंधू रामचंद्र पाटील (दादा) हे जुन्या काळातील आयुर्वेद तज्ञ होते. कोयना भागात त्यांनी अनेक वर्षे रुग्णसेवा केली, नाडी परीक्षणामध्ये त्यांचा हातखंडा होता. कोणत्याही प्रकारच्या जर्जर आजारावर ते आयुर्वेदिक औषध देत. आयुष्यभर त्यांनी विनामोबदला रुग्णांची सेवा केली.अतिशय त्यागाने त्यांनी हे व्रत जपले होते. गोशाळेमध्ये त्यांचा हा वारसा आता वसंतराव पाटील चालवत आहेत.
गोशाळेत एक ध्यान मंदिर तयार करण्यात आले आहे. या परिसरात मी यापूर्वी तीन वेळा जाऊन आलो आहे. मध्यंतरी दोन दिवस या गोशाळेत मुक्काम केला आहे. गोशाळेपासून जवळच डोंगरावर पांडवकालीन लेणी आहेत तसेच जवळच डोंगरावर जानाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परिसरातील अनेक गावांचे श्रद्धास्थान आहे. गोशाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. सध्या सहा गाई असून गाईंच्या सेवेसाठी वसंतराव पाटील व त्यांचा स्टाफ कार्यरत असतो.
कराडपासून जवळच एक छोटीशी ट्रीप करण्यासाठी हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. गोशाळा परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उंच डोंगरावरील घनदाट वृक्षारोपण आणि मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या. घनदाट अशा झाडीतूनच आपण ह्या गोशाळेकडे आपल्याला जावे लागते. डोंगरावर असलेले वृक्षसंपदा आणि अन्न असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर पक्षी आहेत. मध्यंतरी मी येथे ५० हून अधिक मोर एकाच वेळी पाहिले होते. दिवसभर या परिसरात मोरांचा आवाज ऐकू येत असतो.मोरांना या गोशाळेत खुला प्रवेश असतो. मोरांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी खोल भांडे ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. मोरांच्या सान्निध्यात गोशाळा, पांडवकालीन लेणी आणि जानाईदेवी मंदिर अशी एक छोटीशी एक दिवशी ट्रिप येथे होऊ शकते.
या ही जागा याअगोदर पाहिल्यानंतरच या ठिकाणी निसर्ग वारीत झाडे लावावीत असा संकल्प केला होता आणि आज तर प्रत्यक्षात उतरला. वसंतराव पाटील भाऊदा यांच्या हस्ते निसर्ग वारकर्यांनी याठिकाणी पाच झाडे लावली. याकामी वैभव जाधव आणि मेजर या दोन सहकार्याने खूप कष्ट घेतले. आमचे या ठिकाणी स्वागत झाले ते औषधी काढा पिऊन. या ठिकाणी तयार होत असलेल्या औषधे वनस्पती बरोबरच चहाचा काढा खूप प्रसिद्ध आहे. चहा पिल्यानंतर आम्ही ताजेतवाने झालो. निरोप घेतला आणि आम्ही या निसर्गरम्य वातावरणातून घराकडे परतलो.
आजच्या निसर्गरम्य वारीमध्ये निसर्गरम्य वातावरण तर होतेच शिवाय पुनर्वसित गावाचा इतिहास ऐकायला मिळाला. गोशाळेत जाऊन झाडे लावण्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजची वारी खूप आनंददायी झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...