राजभवनातील न्यायमूर्ती
शपथविधी सोहळा.. याचि देही...
अभ्यासू माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना 2013 मध्ये सिक्किमच्या राज्यपालपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. घटनात्मकदृष्ट्या या पदाला फार मोठे महत्व आहे. कराड-साताऱ्याच्या जनतेने पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहिले आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा कराडचेच. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या, देशाच्या विकासात बजावलेली मोलाची कामगिरी सर्वांच्याच लक्षात राहणार आहे.
या दोघा मातब्बरांपेक्षा थोडं वेगळं मात्र घटनात्मकदृष्ट्या फार मोठे पद श्रीनिवास पाटील यांना मिळाले आहे. राज्य छोटं की मोठं यापेक्षा त्या राज्याचा "प्रथम नागरिक' म्हणून राज्यपालांकडे पाहिले जाते. श्रीनिवास पाटील गेली पावणेतीन वर्षे या पदावर आहेत. त्यांचा शपथविधी पाहण्याचा योग काही जणांनाच आला असेल.
सिक्किम दौऱ्यात राज्यपालांच्या वतीने सिक्किम उच्च न्यायालय न्यायमूर्तींच्या शपथविधीचा अविस्मरणीय प्रसंग राजभवनावर अनुभवण्याचा योग आला.
राजभवन हा विषय औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा राहिला आहे. सामान्य नागरिकांना या ठिकाणी जाण्याचा किंवा कामाचा योग फार क्वचित येतो. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपालांचे पाहुणे यांनाच राजभवनावर प्रवेश असतो. इंग्रजांच्या राजवटीत त्या विभागावर राज करणारा प्रमुख म्हणजे गव्हर्नर. ऐशोआरामात राहणाऱ्या इंग्रज गव्हर्नरनी स्वत:च्या निवासासाठी अनेक प्रमुख ठिकाणे "गव्हर्नर निवास' उभारली आहेत. भारतातील अनेक राज्यात आज असणारे राजभवन बहुतांश इंग्रजांनीच बांधलेली आहेत.
1888 साली सिक्किम-तिबेट युद्ध संपल्यानंतर ब्रिटीशांनी सहाय्यक राजकीय अधिकारी म्हणून जॉन क्लाऊड व्हाईट यांना सिक्किममध्ये पाठविले. सिव्हिल इंजिनियर असलेल्या व्हाईट यांनी नियोजनबद्ध आराखडा करून हे राजभवन बांधले आहे. उंच डोंगरावर अतिशय सुंदर अशा जागेवर उभारलेल्या या राजभवानातून कांचनगंगा रांगा अतिशय सुंदर दिसतात. या राजभवनाने गेल्या सव्वाशे वर्षांत अनेक घडामोडी, उलथा-पालथ पाहिल्या आहेत. या राजभवनामध्ये एक मराठी माणूस विराजमान आहे. याचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे.
सिक्किमच्या मुख्य न्यायाधिशांच्या शपथविधीसाठी आपणास खास निमंत्रण आहे, असा फोन राज्यपालांच्या खासगी सचिवाने मला सायंकाळी केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा शपथविधी होणार होता. त्या दिवशी सकाळी 9 वाजता राजभवनातून एक खास वाहन आम्हाला नेण्यासाठी राजभवन सर्किट हाऊसवर आले. वास्तविक राजभवन ते सर्किट हाऊस हे अंतर 200 मीटर आहे. तरीही आम्हाला न्यायला खास वाहन आल्यानंतर हे असे का? विचारले असता "हा प्रोटोकॉल आहे. आपण राज्यपालांचे पाहुणे आहात' असे सांगण्यात आले.
 |
| Guests of Governer असे लिहलेल्या आसनावर आम्ही स्थानापन्न झालो |
पाचच मिनीटांत आम्ही राजभवनसमोर पोहोचलो. सुमारे 150 आसनक्षमता असलेल्या दरबार हॉलमध्ये शपथविधी कार्यक्रम होता. सन्मानपूर्वक आम्हाला तेथे नेण्यात आले. व्यासपीठाच्या अगदी शेजारी उजव्या बाजूला तीन कोच ठेवले होते. यावर "गेस्टस् ऑफ गव्हर्नर' असे लेबल चिकटवले होते. यावर आम्ही स्थानापन्न झालो. हळू-हळू दरबार हॉल भरू लागला.
सिक्किम मंत्रीमंडळातील सदस्य, आमदार, मुख्यमंत्र्यांचे सचिव, राज्यपालांचे सचिव, सिक्किम न्यायालयाचे न्यायाधिश, वरिष्ठ अधिकारी अशी निवडक मंडळी स्थानापन्न होऊ लागली. आम्हाला हे सगळं नवीन होतं. सगळे लोक राज्यपालांचे पाहुणे म्हणून आमच्याकडे पाहत होते. काय हवं काय? विचारत होते. त्यामुळे आमची छाती गर्वाने फुगली होती. 9 वाजून 45 मिनीटांनी न्यायमूर्ती सतीश अग्निहोत्री यांचे आगमन झाले. पहिल्या रांगेत नेमून दिलेल्या कोचवर ते सपत्निक विराजमान झाले. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांचे तीन-चार मंत्र्यांसोबत आगमन झाले. सर्वांनी त्यांना उभे राहून नमस्कार केला.
 |
| मराठमोळ्या साज परिधान करून सौ रजनीदेवी पाटील |
9 वाजून 50 मिनीटांनी फर्स्ट लेडी अर्थात राज्यपालांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे आगमन झाले. नऊवारी साडी, नाकात नथनी, कपाळावर मोठी टिकली अशा अस्सल मराठमोळ्या पोशाखात आलेल्या सौ. पाटील यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
10 चे ठोके पडले आणि राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांचे दरबार हॉलमध्ये आगमन होताच सभागृहात पिन ड्रॉप शांतता पसरली. सर्व जण उभे राहिले. न्यायमूर्ती सतीश अग्निहोत्री व्यासपीठावर राज्यपालांशेजारी जाऊन उभे राहिले आणि लगेच लष्कर बॅन्डच्या ठेक्यावर अतिशय सुंदर आवाजात जन-गण-मन सुरू झाले. राष्ट्रगीताची धून वाजत होती आणि तिकडे आमच्या तन-मनांत भारतमातेविषयी आदराच्या भावना प्रेरित होत होत्या.
आपल्याच भागातून मारुल सारख्या छोट्या गावात शिकलेला व्यक्ती आयएएस होतो. पुढे खासदार होतो. राज्यपाल होतो आणि आम्ही त्यांच्यासमोर उभे आहोत ही भावनाच खूप आनंद देऊन गेली. जरीचा फेटा घातलेले राज्यपाल श्रीनिवास पाटील सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रगीतानंतर लगेचच राज्यपालांनी शपथविधी कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. राज्यपाल आणि न्यायमूर्ती दोघेही उभे राहिले. "मी अशी शपथ घेतो की ...' असे म्हणत राज्यपालांपाठोपाठ वाचन करीत अग्निहोत्री यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी राज्याच्या नव्या न्यायमूर्तींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.
 |
| शपथविधी नंतर औपचारिक पदग्रहण |
शपथविधी हा खरे तर पाच मिनीटांचा कार्यक्रम असतो. मात्र त्याची तयारी, राजशिष्ठाचार, कोणी कोठे उभे रहायचे, काय करायचे याचे नियोजन हे खरंच डोळ्यांत सामावून ठेवण्यासारखे होते.
 |
| महामहिम राज्यपालांच्या समवेत न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री |
कार्यक्रमानंतर सर्वांनी न्यायमूर्ती सतीश अग्निहोत्री यांना शुभेच्छा दिल्या. फोटोसेशन झाले. त्यानंतर हॉलच्या तळमजल्यावर खास चहा-पानाच्या नियोजनासाठी सारे निघाले.
 |
| मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग सोबत मी |
एका महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी जायचे असल्याने राज्यपालांची परवानगी घेवूनच मुख्यमंत्री बाहेर जायला निघाले . यावेळी आमच्यातला पत्रकार जागा झाला. पुढे होऊन मुख्यमंत्र्याना थांबवले. 'आम्ही राज्यपालाचे गावातील पत्रकार आहोत, तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे ', असे विचारले. मोठ्या खुशीने पवनकुमार चामलिंग यांनी ते मान्य केले. माझा हात पकडला आणि, ' आओ, आप हमारे मेहमान है ' , असे म्हणत फोटोसेशन केले. माझ्या सोबतीला असणारे माझे मित्र प्रशांत सातपुते, माझे साडू दिलीप खोचरे आणि मी मुख्य मंत्र्यासोबत गप्पा मारल्या. त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले.
 |
| मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसेशन |
मुख्यमंत्ती गेल्यावर आम्ही सारे खालच्या मजल्यावर आलो.
येथील दरबार हॉलमधील दावतखान्यामध्ये सर्व पाहुणे, अधिकारी, मंत्री जमले. अतिशय नियोजनबद्ध हा हॉल सजविला होता. कोणतीही गडबड न होता शांतपणे चहापानाचा कार्यक्रम संपला. 10 वाजून 30 मिनीटांनी पुन्हा राष्ट्रगीताची बॅन्डवर धून वाजली. त्यानंतर महामहिम राज्यपाल या हॉलमधून सर्वप्रथम सपत्निक बाहेर पडले आणि त्यांच्या पाठोपाठ इतर सारे निघाले.
 |
| शपथविधी नंतर न्यायमूर्ती सोबत महामहिम राज्यपाल |
अतिशय देखण्या रुबाबदार आणि राजेशाही कार्यक्रमाचा लाभ "याचि देही... याचि डोळा...' पाहण्याचा योग मला आला. आपला माणूस या पदावर नसता तर राजभवनावर आपल्याला प्रवेश मिळाला असता का? फक्त लांबून किंवा फोटोतच राजभवन पहायला मिळाले असते, अशी भावना मनात आली.
(क्रमश:)
 |
| शशपथविधी नंतर साहेबांच्या ऑफिस केबिनमध्ये |