फॉलोअर

१७ जून २०१६

सिक्किम सफर 6

हाऊ अॅन्ड व्हाॅय टू गो सिक्किम...?




सिक्किम म्हणजे सौंदर्याची खाण, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज्याचा विस्तार, भूभाग सातारा जिल्ह्याएवढाही नाही. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे चार विभाग आणि चार जिल्हे. सर्व जिल्हे छोट्या-मोठ्या रस्त्यांनी राजधानी गंगटोकशी जोडलेले आहेत. राज्यात कोठेही सपाट भूभाग पहावयास क्वचितही मिळणार नाही. डोंगरदऱ्या, उंच शिखरे, नद्या, खोरे, तळी आणि हिरवीगार झाडी असलेले कदाचित देशातील हे एकमेव राज्य असावे आणि हीच नैसर्गिक संपत्ती जपण्याचे, वाढविण्याचे, संवर्धन करण्याचे काम सिक्किमवासिय करीत आहेत. म्हणूनच सिक्किमला जायचे तर फक्त निसर्गसौंदर्य पहायलाच , खेळायला, थरार अनुभवायला !





STDC सिक्किम टुरिस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एसटीडीसी), सिक्किम सरकार आणि सिक्किमचे प्रेमळ लोक पर्यटकांच्या स्वागतासाठी सतत तत्पर असतात. सिक्किमला जायला तसा एकमेव मार्ग आहे. तो मार्ग बागडोग्रा (पश्चिम बंगाल) येथून जातो. दार्जिलिंगहूनही सिक्किम राज्यात प्रवेश करता येतो. पण दार्जिलिंगला जाण्यासाठी बागडोग्रामध्ये जावेच लागते. नऊ दिवसांचे नियोजन करून आम्ही सिक्किम दौऱ्यावर निघालो. वास्तविक तीन-चार महिने अगोदर विमानाचे तिकिट बुक केले तर सिक्किम सहल स्वस्तात आणि फायदेशीर होऊ शकते. शिवाय विमानप्रवासाचाही आनंद लूटता येतो. पश्चिम बंगालमध्ये कोलकातापर्यंत रेल्वेने जाऊन पुढे आठ तास कोलकाता ते जलपायगुडी असा रेल्वे प्रवास करून बागडोग्राजवळूनच सिक्किमला पोहोचता येते. बागडोग्रा ते गंगटोक हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे.  मात्र अगोदर बुकिंग करावे लागेल. हा प्रवास नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो . शिवाय साहित्य, बॅगा न्यायला वाहन स्वतंत्र पाठवावे लागते.





रेल्वे प्रवास 44 तास, विमान सेवा 4 तास

पुण्याहून प्रत्येक मंगळवारी कामाक्षी एक्सप्रेस या खास गाडीतून जलपायगुडीपर्यंत पोहोचता येते. हा प्रवास 44 तासांचा आहे. दिल्ली, कोलकाता येथून जलपायगुडीला जाण्यासाठी अनेक एक्सप्रेस उपलब्ध आहेत. ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे आणि रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे त्यांना हा पर्याय उत्तम आहे. पुणे आणि मुंबई येथून बागडोग्रा येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहेत. तीन-चार महिने अगोदर तिकिट काढले तर एक व्यक्ती 10 ते 11 हजारांत रिटर्न प्रवास करू शकते. विमान प्रवासाचा आनंद वेगळाच आहे. रेल्वे प्रवासात पूर्ण दोन दिवस, दोन रात्री जातात.
पुण्याहून बागडोग्रा येथे जाण्यासाठी विमानाने थेट विमानसेवा असेल तर चार तास आणि दिल्ली एक थांबा विमानसेवा असेल तर पाच ते सात तास लागतात.

 माय जर्नी बाय  एअर

मुंबईहून इंडिगोच्या सकाळी 7 वाजून 25 मिनीटांनी सुटणाऱ्या विमानातून आम्ही प्रवासाला निघालो. ही विमान सेवा अतिशय सोयीची आणि जलद आहे. प्रवास कसा झाला हे कळलंच नाही.  साडेनऊ वाजता आम्ही गुवाहटी विमानतळावर पोहोचलो. उतरताना  आकाशातून गंगा नदीचे पात्र पहावयास मिळाले. दोन तीन दिवस जोरावर वृष्टी  झाल्यामुळे पाणी गढूळ होते. लष्कर हवाई अड्डा, फोटोग्राफी करणेस मनाई आहे, असे आमच्या वैमानिकाने जाहीर केले. म्हणायला का होईना  मी गुवाहाटीला जाऊन आलो. खाली उतरण्यास परवानगी नव्हती.  गुवाहटीचे प्रवासी उतरले आणि  तेथून पुढे बागडोग्राला जाणारे प्रवासी या विमानात बसले. एक तास ही प्रक्रिया सुरू होती. साडेदहा वाजता आम्ही पुन्हा आगेकूच केले. साडेअकरा वाजता बागडोग्रा या लष्करी हवाई तळावर आम्ही उतरलो.





जलपायगुडीमध्येही डूगडूग...

बागडोग्रा ते जलपायगुडी या दरम्यानच्या प्रवासात रस्त्यावर धावणाऱ्या मिनीडोअर (आपल्याकडील डूगडूग) मला दिसल्या. डूगडूग बघून मला कराडची आठवण झाली. चला,  करवडी, वाघेरीची आरोळी दिली. इकडेपण डूगडूग आहे होय , असे मी आमच्या कार ड्रायव्हरला विचारले. तेव्हा त्याने पश्चिम बंगालमध्ये खासगी वाहतूक जोरात चालते. खासगी वाहतूकीवरच पर्यटन व्यवसाय जोरात चालतो, असे त्याने सांगितले.


बागडोग्रा ते गंगटोक 5 तास

बागडोग्रा हे सिक्किमचे प्रवेशद्वार आहे. सिक्किमची राजधानी गंगटोक ते बागडोग्रा हे अंतर 110 किलोमीटर आहे. आपल्याकडील 110 किलोमीटर अंतर डोळ्यासमोर घेवून तुम्हाला हा प्रवास दीड-दोन तासांचा वाटला असेल, पण तसे नाही. हे अंतर पार करायला नैसर्गिक परिस्थिती चांगली असेल तर किमान 5 तास लागतात. बागडोग्रा पश्चिम बंगालमध्ये आहे. तेथून गंगटोकला जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध आहेत. अगोदर नियोजन केले तर विमानतळावरच तुम्हाला न्यायला टॅक्सीचालक सज्ज असतो.बागडोग्रा ते गंगटोक इनोव्हा गाडी सिझननुसार साडेचार ते साडेपाचहजार भाडे देवून मिळते. अगोदर बुकिंग न केल्यास बागडोग्रा विमानतळाबाहेर वाहने मिळतात. मात्र जास्त पैसे मोजावयास लागू शकतात.  नियोजन करून हा प्रवास करणे कधीही चांगले.



महामहिम राज्यपालांच्या निमंत्रणानुसार आम्ही सिक्किमला निघालो असल्याने राज्यपालांचे खासगी सचिव इरफान सर यांनी आमच्यासाठी इनोव्हा  कारची व्यवस्था केली होती. सुमारे 15-20 किलोमीटर सपाट भूभागावरून प्रवास करीत आम्ही डोंगराच्या घाट रस्त्याला लागलो. तिश्ता नदीच्या काठावरील वळणाचा रस्ता सुरू झाला. सुमारे 70 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर रंगपो येथून सिक्किमची हद्द सुरू होते. या दरम्यान वळणदार, नागमोडी घाटातून तिश्ता नदीचे मोहक दर्शन होते. तिश्ता नदीवर तीन-चार ठिकाणी लहान-मोठी धरणे बांधली आहेत.


रिवर राफ्टिंगचा थरार...
Ready for  River Rafting 


तिश्ता गावाजवळ मोठा वीज प्रकल्प आहे. हे गाव पार केल्यानंतर तिश्ता नदीत रिवर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी आम्ही थांबलो. टुरिझम विभागाच्या परवानगीशिवाय हे रिवर राफ्टिंग सुरु आहेत. हा पश्चिम बंगालचा भाग आहे. रिवर राफ्टिंग म्हणजे तरफेसारख्या जाड प्लास्टिकच्या बोटीमधला थरारक प्रवास.

तिश्ता नदीच्यावरील भागात असलेल्या धरणातून केव्हाही पाणी सोडले जाते. तसेच नदीमध्ये डोंगर, पर्वत, कडे कोसळण्याचे प्रकार सर्रास होत असतात. अचानक पाणी पातळी वाढते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रिवर राफ्टिंगला कायदेशीर परवानगी नाही. मात्र नैसर्गिक परिस्थती चांगली असल्यामुळे आम्ही रिवर राफ्टिंग करण्याचा बेत आखला.
प्रति माणसी 700 रुपये इतके तिकिट आकारले जाते. आपल्या थराराचे व्हिडिओ शुटिंग आणि पन्नास फोटो काढण्याचे 500 रुपये वेगळे आकारले जातात. खिशातील सर्व साहित्य, मोबाईल इनोव्हामध्येच ठेवून  आम्ही एका जीपमध्ये बसलो. जीपच्या टपावरच ती बोट बांधली होती. अतिशय उताराच्या, खडकाळ रस्त्यातून ही जीप नदीकाठाला नेली. सुरक्षा जॅकेट घातल्यानंतर आम्ही नदीच्या काठावर उभ्या असलेल्या बोटीमध्ये बसलो. पोहायला येत असले नी नसले तरी काळजी करू नका, आम्ही आहोत.. तुम्ही सुरक्षा जॅकेट घातलेले आहे. इथे अपघात कधीच होत नाहीत. नदीचे पात्र जास्त खोल नाही, असा धीर देणारा सल्ला बोट पायनटने दिला.



डर के  आगे जीत है

मोठ्या व्यक्तींच्या हातात बॅलेन्स करण्यासाठी आणि चालवण्यासाठी वल्हे दिले. एका व्यक्तिला समोर बसविले. बोट खोल पाण्यात उताराला एकदम लागली की समोरच्या व्यक्तीने छाती बोटीच्या पुढच्या भागावर टेकवून झोपायचे, असा सल्ला दिला आणि आमचा पंधरा मिनीटांचा तो थरारक प्रवास सुरू झाला. हेलकावे खात खात बोट निघाली. आम्ही बोट वल्हवत होतो. ग्रेट गॅम्बलर मधील ओ मारे मायचो...गुणगुणणारा आठवला. गणपती बाप्पा मोरया चा घोष केला. दोनच मिनीटांत तीव्र उतार आला आणि बोट खाली गेली. पायलटच्या सूचनेनुसार आम्ही बॅलेन्स केला. बोटीत पाणी घुसले. कपडे ओली झाली. आता संपलं, असे वाटले. आम्हा सर्वांचीच भीतीने चाळण झाली . आमची छोटी मुले ओरडून एन्जॉय करीत होती, मात्र मोठ्यांना भीतीचा अनुभव आला. दोन-तीनदा हेलकावे खाल्ले. नदीकाठावरून आमचा फोटोग्राफर शुटींग करीत होता. मधूनच आम्ही तिकडे बघत होतो. मोठ्या दगडाजवळून आमची तरफ बोट गेली. मात्र त्या भागाची माहिती असलेल्या पायलटने काळजीपूर्वक हाताळत बोट बाजूला घेतली. पुढे शांत नदीपात्रात बोट थांबली. पोहायचे असेल तर खाली उतरा, अशा सूचना पायलटने केल्या. मात्र ओलेचिंब झालेल्या आमच्यापैकी कोणालाच खाली उतरण्याची इच्छा झाली नाही. लवकर बाहेर घेऊन चल,  असे सांगितले.  नदीकाठाला बोट आल्यानंतर फोटोसेशन केले. खाली उतरलो आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. एवढा मोठा थरार आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला होता. "डर के आगे जीत है' चा अनुभव आला  आणि "जो डर गया वो मर गया' हा गब्बरसिंगचा डायलॉग आठवला.

रात्री 8 च्या सुमारास गंगटोक शहरात आम्ही प्रवेश केला.
राजभवनच्या गेटवर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर राजभवन विश्रामधामच्या दारात उतरलो.

थरारक अनुभव 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...