# तू मुलगी का नाही झालास ?
#### दोन मनांतील संवाद…
एका अनोख्या नात्याची गोष्ट
"तू मुलगी का नाही झालीस?" असा प्रश्न जेव्हा तिने मला विचारला, तेव्हा तिच्या मनात एक निरागस कल्पना होती. आपण दोघी मुली असतो, तर कदाचित किती छान मैत्रिणी झालो असतो! एकत्र फिरलो असतो, शॉपिंग केली असती, मनातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगितल्या असत्या.
पण तिच्या या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या मनात एक वेगळाच विचार आला.
मी तिला म्हणालो,
"तू मुलगी असतीस आणि मीही मुलगी असतो, तर कदाचित आपली ओळख दोन मैत्रिणींची झाली असती. आपण एकत्र फिरलो असतो, गप्पा मारल्या असत्या, एकमेकींच्या गोष्टी शेअर केल्या असत्या. पण आज आपल्या नात्यात जी एक अनामिक ओढ आहे, जी एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव आहे, जी मनाला वेगळीच सुरक्षितता देते, ती कदाचित वेगळ्या स्वरूपात असती.
आज तू माझ्यासाठी केवळ एक मैत्रीण नाहीस. आणि मीही तुझ्यासाठी केवळ एक मित्र नाही. आपल्या नात्यात काहीतरी असं आहे, जे शब्दांत सांगता येत नाही; पण मनाला सतत जाणवत राहतं."
"अगं, मी मुलगी झालो असतो आणि तूही मुलगी असतीस, तर कदाचित आपल्या नात्याला एक मर्यादा आली असती. कारण दोन मुलींच्या मैत्रीत कितीही जवळीक असली, तरी कधी कधी नकळत थोडीशी मत्सराची भावना, असूया किंवा एखादी अनामिक खुन्नस निर्माण होऊ शकते. प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणाने शेअर होईलच असं नाही.
अगदी तसंच दोन पुरुषांच्या मैत्रीतही असतं. एखादा मित्र कितीही जवळचा असला, कितीही खास असला, तरी त्याच्यापासून एखादी गोष्ट लपवली जाते. काही भावना मनातच दाबून ठेवल्या जातात. काही गोष्टी सांगताना संकोच वाटतो. कधी अहंकार आडवा येतो, तर कधी आपल्याच भावनांना शब्द देण्याचं धाडस होत नाही.
पण तुझं आणि माझं नातं या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे.
तू स्त्री आहेस आणि मी पुरुष आहे. पण आपल्या नात्यात ही ओळख केवळ एक बाह्य वास्तव बनून राहिली आहे. आपल्या मनांमध्ये मात्र एक वेगळीच एकरूपता निर्माण झाली आहे.
आपल्या नात्याला सखा-सखीचं नाव देता येईल. कदाचित राम आणि त्याच्या दुलारीच्या नात्यात जी एक अनामिक ओढ, जी एक भावनिक जवळीक आणि जे एकमेकांच्या मनाशी जोडलेपण आहे, त्याची एक छोटीशी झलक आपल्या नात्यातही आहे.
आपण एकमेकांपासून काही लपवत नाही.
लपवलेलं नाही.
आणि कदाचित आता लपवूही शकत नाही.
कारण आपलं नातं इतकं खुलं झालं आहे की, आपल्या मनातली अगदी छोटीशी भावना देखील एकमेकांपर्यंत पोहोचते. कधी शब्दांतून, कधी एखाद्या छोट्याशा मेसेजमधून, तर कधी केवळ शांततेतून.
तुझ्यासमोर मी केवळ एक पुरुष म्हणून उभा राहत नाही. मी माझ्या सगळ्या भावनांसह, माझ्या कमतरतांसह, माझ्या भीतीसह आणि माझ्या अपूर्णतेसह तुझ्यासमोर असतो.
आणि तूही माझ्यासमोर केवळ एक स्त्री म्हणून नसतेस. तू तुझ्या मनातील प्रत्येक भावना, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक दुःख घेऊन माझ्याशी जोडलेली असतेस.
आपण आपल्या स्त्री-पुरुष असण्याच्या ओळखीच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या मनाशी जोडले गेलो आहोत.
हेच आपल्या नात्याचं सर्वांत मोठं यश आहे, असं मला वाटतं.
कारण नातं सुंदर होण्यासाठी दोन व्यक्तींनी एकसारखं असण्याची गरज नसते. त्यांना एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. एकमेकांच्या मनात डोकावता आलं पाहिजे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, एकमेकांसमोर कोणताही मुखवटा न घालता स्वतःसारखं राहता आलं पाहिजे.
आपल्या नात्यात हे सगळं आहे.
तू स्त्री आहेस, मी पुरुष आहे. पण आपल्या मनांची भाषा एक आहे. आपल्या भावनांचा प्रवास एक आहे. आपल्या विश्वासाची वीण एक आहे.
आणि म्हणूनच कदाचित…
तू मुलगी नाहीस आणि मी मुलगा आहे, म्हणूनच आपण सखा-सखी आहोत. पण आपल्या मनांची एकरूपता अशी आहे की, कधी कधी आपण दोन व्यक्ती आहोत, याचाही विसर पडतो.
हेच आपल्या नात्याचं सौंदर्य आहे.
हेच आपल्या नात्याचं वेगळेपण आहे.
आणि हेच आपल्या नात्याचं सर्वांत मोठं यश आहे.
सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा