सदाशिवगड गडावरचा सच्चा शिवभक्त
सात मार्चला 2016 सदाशिवगडावर जाण्याचा योग आला. सदाशिवगड आणि माझे नाते, येणेजाणे 30-35 वर्षापासून आहे. चौथी पर्यंत शालेय शिक्षण करवडीच्या जीवन शिक्षण विद्या मंदीरात झाले. श्रावण महिना सुरू झाला की आम्हाला वेध लागायचे गडावर जाण्याचे. रोज सकाळी उठून घराबाहेर आलो की पहीले दर्शन सदाशिवगडाचे. 1980 - 85 च्या दरम्यान गडावर वीज कनेक्शन नेले असावे. हजारमाचीचा पायथा ते गडाच्या टोकाला ते सदाशिव मंदीर असे लाईटींग झाले होते. रात्रीच्या वेळी गडावर जाण्यासाठी ही चांगली सोय झाली होती. याचा दुसरा फायदा मात्र परिसरातील गावांना व्हायचा. गडावर रात्री लाईट लागली की लोक वेळ सांगायचे. साडे सहा वाजले, गडावरील बल्ब लागले. काही ठिकाणी बल्ब गेला असेल तर त्याची पण लोक लांबून चर्चा करायचे. करवडी,वाघेरी विरवडे,ओगलेवाडी, पार्ले, बनवडी गावातील लोकांसाठी गडावरील हे दिवे म्हणजे आकर्षण होते. आणि हो आमच्या गावातली लाईट गेली की आम्ही घराबाहेर येऊन पहिल्यांदा गडावर लाईट आहे काय हे पहात असू. गावातील लाईट गेली अन् गडावर आहे म्हणजे गावातच कुठेतरी फाॅल्ट झाला आहे आणि गावात पण लाईट नाही, गडावर पण लाईट नाही म्हणजे वरनंच लाईट गेलीआहे, असा आमचा अनुभव होता.
गडावरील या लाईट खांबाच्या रांगा, सदाशिवगड मंदीराचे शिखर आम्हाला रोज इकडे ये असे खुले निमंत्रण देत असे . श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी गडावर जायचेच असा माझ्या सहीत परिसरातील भक्त, शाळकरी मुलांचा अट्टाहास असायचा. शाळेतल्या सहली साठी सदाशिवगड हे मोस्ट फेवरेट पर्यटन स्थळ होते. विना खर्च, विना त्रास विना कटकट अशी ही सहल होती. सहली दिवशी सकाळी लवकर उठून आवरून, डबा घेऊन तयार होऊन आम्ही शाळेत जायचो. करवडी ते सदाशिवगड ओळीत चालताना रस्त्यावरची वाहने पाहताना मजा यायची. गडावर चढताना गुरूजीच्या सुचना असायच्या, गडबड करायची नाही, पळायचे नाही. जसे जसे वर जाऊ तसे पायथ्याला असणारे हजारमाची गाव स्पष्ट दिसे. आणखी वर गेले की आसपासची गावे दिसायची, लांबवर कराड शहर आणि नागमोडी कृष्णा नदी आणि हिरवागार निसर्ग खुप छान दिसू लागे. मग आपले गाव कुठे आहे, गावातले मंदीर दिसते काय, खाली विटा, वडूज रस्त्यावरील वाहने पाहताना खुप मजा यायची. सर्वात जास्त मजा यायची झुकझुक गाडी बघताना. गडाच्या पायथ्याशी जवळच कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबायची, मग ती सुरू होऊन पुढे जायपर्यंत, डोळ्याआड होईपर्यंत आम्ही बघत होतो. कुणीतरी मग रेल्वेचे डबे मोजायचा. मालगाडी आहे की प्रवासी गाडी आहे, हे सांगताना तो मला खुप कळते याचा आविर्भाव आणायचा.
खुप मजा, मस्ती करत कधी गडावर पोहचायचो ते कळत नव्हते. गडावर पोहचलो की मोकळे पठार आणि सदाशिव मंदिर पाहून डोळ्याचे पारणे फिटायचे. देवदर्शन झाल्यावर पठारावर फेरफटका मारून मग आम्ही गोल करून एखाद्या झाडाखाली जेवायला बसत होतो. सगळ्याचा डबा बघत, तु काय आणलंय, मी खिचडी आणली, त्याने शेंगा आणल्यात, हे बघत सारे जेणणावर ताव मारत होते . गडावरील विहीरीत पाणी असायचे, गुरूजी मोठ्या पोरांना घेऊन पाणी आणायला जायचे. गाण्याच्या भेंड्या, शब्द कोडी, गाणी, गप्पा मारत गोलाकार बसण्याचे ते दिवस खुप सुंदर होते. पुढे पाचवीला कराडला टिळक हायस्कूलला प्रवेश घेतला, तिथे पण हीच सहल असायची.1993 साली काॅलेज पुर्ण होई पर्यंत श्रावण महिना आणि सदाशिवगड हे समीकरण कायम राहीलं. दरम्यान 1990 मध्ये बारावी पास झालो की मी शिकवणी सुरू केली. क्लासच्या मुलांना घेऊन सर म्हणून मी सदाशिवगड सहल घेऊन जाऊ लागलो. 1996 मध्ये मी आणि यादव सरांनी मिळून ओगलेवाडी येथे यादव मोरे क्लासेस सुरू केले. 2001पर्यंत क्लासेस सुरू होते. या काळात गडावर कित्येकदा गेलो.
अलीकडे गडावर जायला आठ नऊ वर्षे जमले नव्हते. परवा महाशिवरात्री दिवशी सकाळी साडे सहा वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचलो. लहानपणी गडावर जाण्याचे थ्रील वेगळेच होते, आता त्या आठवणी जाग्या झाल्या. मजा करत साडे सात वाजता गडावर पोहचलो. जाताना तीन चार ठिकाणी थांबलो, सेल्फी काढली. गडावर खुप गर्दी होती. अनेक विद्यार्थी, कराडकर, जुने मित्र भेटले. मंदिराच्या परिसरात माझा विद्यार्थी योगेश कुंभार भेटला. आनंदाने धावत आला, सर चहा घ्यायला या. छोट्या खोलील चहा कढत होता. दर्शन घेऊन परत येतो म्हणून पुढे गेलो . सदाशिवाच्या पिंडीला मनोभावे नमस्कार केला. या देवावर माझी खुप श्रद्धा आहे. गडावर सारे ओगलेवाडी येथील भक्त नित्यक्रमाने पुजा करतात. रोज सकाळी कराडहून गडावर जाणार्याची संख्या गेल्या दहा वर्षांत शंभरावर गेली आहे. या लोकांनी स्व देणगीतून, लोकवर्गणी तून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वयं प्रेरणेने रोज पुजा करणारा एक कृष्णत भोसले नावाचा भक्त मला तिथे भेटला, ओगलेवाडीचाच होता. शिवलिंगावर काही जण दुधाचा अभिषेक करत होते. त्या लोकांना हा पुजारी सांगत होता, दुध देवावर ओतू नका, बाहेर चहा करायला ठेवला आहे, हे दुध त्यात नेऊन ओता,कुणाच्या तरी मुखात हे दुध जाऊदे! मला खरा भक्त आणि खरा पुजारी पहायला मिळाला. तोच खरा साधु, तोच खरा संत हे पटले.
मंदीराबाहेर आलो. योगेश कुंभार सोबत चहा घेतला, त्याने माझ्या हस्ते भाविकांना खिचडी वाटप केले. गड उतरून खाली आलो.ऑफिस मध्ये गेलो. दिवसभर माझ्या मनात तो पुजारी होता. अनेक ठिकाणी देवाला, देवाच्या नावाखाली, मंदीरात ओतले जाणारे दुध वाया जात असते . पुजारी तिकडे कधी लक्ष देत नसतात, त्याचे तोंडी फक्त दक्षिणा टाका येवढेच असते. सदाशिवगडावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळाले. सुखद अनुभव देऊन गेले. त्या पुजार्याचा आदर्श सार्यांनी घेतला तर मंदिर स्वच्छ, सुंदर आणि मनमंदीरे होतील. होय ना?
.......... सतीश मोरे.



More sir, feeling nostalgic n memorized all childhood events of karawadi, nicely covered story 👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवासतीश वसंतगडावर कधी गेला आहेस का? खर तर मोहीत्यांचे गाव
उत्तर द्याहटवापर्यटणाच्या द्रुष्टीने खुप संधी आहे प्रयत्नांचा खुपच अभाव जाणवतो