फॉलोअर

१८ मार्च २०१६

जवानीत गाढवीण सुंदर दिसते

जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते

1988 मध्ये टिळक हायस्कूल मध्ये दहावी परीक्षा पास झालो. 1982 ते 1988 माझ्या शालेय जीवनातील संस्कारमय खुप आठवणी आहेत. योग्य वेळी त्याही सांगणार  आहे.  दहावी नंतर कोणत्या साईटला जायचे, काय करायचे हे सांगायला तेव्हा जवळचे असे कोणी नव्हते. मित्र, शेजारी किंवा शिक्षक म्हणतील तसे करायचे. सायन्स साईडचे तेव्हा फार आकर्षण होते.  डिसेक्शन बाॅक्स, मोठे प्रॅक्टीकल जनरल, पुस्तके घेऊन जाणारी सायन्सची पोरं लय हुशार अशी इमेज होती. आम्हाला पण कुणीतरी सांगितले, सायन्स लय भारी, नोकरी मिळते, डाॅक्टर  इंजिनिअर होता येते. तु हुशार आहे, घे सायन्स( खरंच त्यावेळी 70 -80 % वाल्यांना हुशार समजत होते) स्वतः गेलो सदगुरू गाडगे महाराज काॅलेजमध्ये, प्राॅसपेक्ट आणले. घरी आल्यावर सांगितले मी सायन्स घेणार आहे. पाचवी सहावी पासून स्वावलंबन आणि स्वंयंनिर्णय ही शिकवण देणार्‍या माझ्या आदरणीय वडीलांनी (दादांनी) हा ही निर्णय तुच घे, तुला योग्य वाटेल ती साईट घे, पण ज्या क्षेत्रात जाशील तिथे टाॅपवर जा असा सल्ला दिला.



काॅलेजमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव मला आज सांगायचा  आहे.  प्रत्येक दिवस हा नवा  धडा घेऊन येतो, काहीतरी शिकवून जातो. दहावी, आकरावीचे वय वेगळेच असते . X Y आकर्षण, प्रेम ,नवी उमेद, नवे नवे काही तरी शोधण्याची जिज्ञासा गप्प बसून देत नाही. सदगुरू गाडगे महाराज काॅलेजला अॅडमिशन घेणारी पोरं ग्रामीण भागातील, सुमार , रांगडी, कुठे मिळेना तर  इथे नक्की प्रवेश मिळणार , असे हे महाविद्यालय. इतर काॅलेजची पोरं आमच्या काॅलेजला गाडगे महाराजांचा मठ म्हणायचे ! खरंच तेव्हा सारं भकास होते तिथे. साधी राहणी असलेली आमच्या सारखी खेडेगावातून आलेली पोरं, साध्या पिशवीत घालून पुस्तके, वह्या घेऊन आलेली. अशा मठात आमचे सायन्स शिक्षण सुरू झाले.

आकरावीचे वर्ग सुरू झाले. माझ्या वर्गात साठ सत्तर पोरं आणि सहा पोरी. मुली त्या पण खेड्यातून  आलेल्या. पैकी दोघीचे वडील याच काॅलेजमध्ये प्राध्यापक होते म्हणून त्या इथे होत्या. आम्ही आमच्या समान सवयीचा, स्टाईलचा, खेड्यातला ग्रुप तयार केला नव्हे आपोआप झाला, जुलै महिन्यात प्रॅक्टीकलसाठी आमच्या बायोलॉजि लॅबमध्ये आम्ही जमलो होतो. डिसेक्शन बाॅक्स, जनरल नोटबुक नवीन आणली होती. प्रत्येकजण आपल्या हातात ते बाॅक्स घेऊन लॅबमध्ये आला. आज काही तरी नवीन शिकायला मिळणार अशी सर्वाना  उत्तुकता होती. थोरात मॅडमनी दोघात एक असे वाटप करून एक झुरळ (काॅकरोच) घ्यायला सांगितले. शिपायांनी झुरळे वाटली. (सायन्स केलेल्या लोकांना हे माहिती आहे तेव्हा झुरळे कशी मारली जायची, उंदरे कशी पकडली जायची. तेव्हा परवानगी होती. आता मनेका गांधी यांच्या दबावामुळे सर्व प्राणी डिसेक्शन बंद आहे )

ज्या झुरळाला पाहून महिला, पोरी, स्त्रिया ई~ई~ई~ई~ई~ई करतात ती झुरळे वाटप सुरू झाली की आमच्या वर्गातल्या पोरींची चुळबुळ सुरू झाली.  इन बीन सहा पोरी त्यांना कोण सांगणार. मॅडमनी दम दिल्यावर त्यापुढे आल्या. झुरळ ताब्यात घेतले .आम्ही पण घेतले.  सुचने प्रमाणे काम सुरू झाले.  मॅडम सांगत होत्या आणि आम्ही करत होतो.  या दरम्यान माझे लक्ष एका मुलीकडे गेले. तिची मैत्रीण डिसेक्शन करत होती व ती फक्त पहात होती. सोळा वयाचा जादुई आकडा सर्वात धोकादायक असतो असं म्हणतात.  इंग्रजीत आकरा ते एकोणीस या वयाला TEEN AGE म्हणतात.  या वयाने तिला पहायला सुरुवात केली. माझे सारे लक्ष तिच्याकडे होते, तिचे डिसेक्शनकडे होते.  माझा सहकारी मित्र मला सांगत होता, शस्त्र instruments मागत होता, मी (माझे शरीर ) देत होतो, पण मन मात्र तिच्याकडे होते.  पाच दहा मिनिटे हे सर्व सुरू असेल. माझी तंद्री लागली होती. अचानक मला मित्रांनी हलवलं, मोरे जावा तुम्हाला मॅडम बोलवत आहेत. माझी तंद्री तुटली. घाबरत घाबरत थोरात मॅडम जवळ जाऊन मान खाली घालून उभा राहिलो.

मोरे, काय करत होता, मॅडमनी विचारले.
काही नाही मॅडम प्रॅक्टीकल करत होतो, डिसेक्शन करत होतो... मी
खरं सांगा, मोरे?
मॅडम, काही नाही करत होतो...मी
तुमचं प्रॅक्टीकल सुरू होतं की प्रॅक्टीस? माझे लक्ष होतं, तुमच्याकडे!

मी काय करत होतो,नक्की काय चालले होते हे मॅडमनी पाहीले होते, ओळखले होते.
मी चुक मान्य केली. त्यांनापण ते आवडले.

' मोरे, ज्या कामासाठी इथे आला आहे, तेच काम करा.आणि हे लक्षात ठेवा,
 जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते.आयुष्यभर पुन्हा हेच करायचे आहे. जावा आता '

चक्कीत जाळ झाला, काजवे चमकले. मी पुर्ण ब्ल्नॅक झालो होतो. ते शब्द कानावर हल्ला करत होते. आयुष्याचा एक उत्कृष्ट धडा त्यादिवशी मी शिकलो. त्यानंतरकाॅलेज पुर्ण होईपर्यंत आजपर्यंत हे वाक्य लक्षात आहे. पुढे मी त्या मॅडमचा लाडका विद्यार्थी झालो. मुलाना कसे समजावून सांगायचे हा प्रश्न आज आम्हाला पडतो. त्यावेळी थोरात मॅडमनी शब्दरूपी शस्त्राने वार करून मला जखमी नव्हे बरे केले होते.




                                                                                                                  ......सतीश मोरे





२ टिप्पण्या:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...