फॉलोअर

२३ मार्च २०१६

पाणी वाचवूया भाग 2





पाणी कसं वाचवता येईल ?


२२ मार्च – जागतिक जलदिन विशेष 





२२ मार्च हा दिवस दर वर्षी जगभर जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. पण पाण्याचे महत्त्व कोणाला समजावून सांगायची आवश्यकता आहे का? ते आधीच सर्वांना ठाऊक आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो
जागांच्या कमतरतेमुळे जेथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तेथे घर बांधणे, शेती करणे, व्यवसाय कारखाने उभारने भाग पडते म्हणून.....

पाण्याचे नियोजन करा,
पाणी काटकसरीने वापरा,
पाणी साठवा,
पाणी जिरवा.

माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे..!!!
भविष्यासाठी पाणी वाचवा.विजेनंतर घरात सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पाणी. खरं तर विजेइतकंच पाणीदेखील आपण अतिशय बेजबाबदारपणे वापरत असतो, ज्याची बचत करणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. घरातला पाणीवापर कसा आटोक्यात ठेवता येईल त्यावर प्रकाश टाकूया.

असं म्हटलं जातं की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आता जागतिक युद्धाचं राहू द्यात पण पाण्यावरून गल्ली-मोहल्ल्यात कितीतरी भांडणं होताना आपण रोजच पाहत असतो. 
पाणीटंचाई केवळ ग्रामीण भागातच जाणवते असं नाही तर तिची तीव्रता शहरी भागातदेखील तेवढीच आहे. शहरात फक्त घराघरात हाताशी धो धो पाणी वाहणारे नळ असतात, त्यामुळे ही तीव्रता तेवढय़ा गंभीरतेनं जाणवत नाही एवढंच. पण शहरातही कित्येकदा अचानक बोअरिंग वेलचा पंप बंद पडल्यानंतर किंवा नगरपालिकेनं पाणीकपात जाहीर केल्यावर नळाचंच नव्हे तर आपल्याही तोंडचं पाणी पळतं व त्रेधा उडते. परंतु अशी वेळ येण्यापूर्वीच आपण पाण्याची बचत केली तर चांगलं नाही का..

घरातच पाणी वापर जादा

👉घरात आपण दहा टक्के पाण्याचा वापर हा एकटय़ा किचनमध्ये करत असतो. शिवाय कपडे-भांडी धुणं, स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही करत असतो. त्याव्यतिरिक्त पाणी अंघोळीसाठी, शौचालयात व साठवण्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर वापरलं जातं. आता हे प्रमाण आपल्याला नियंत्रणात कसं ठेवता येईल ते पाहू.

👉पाण्याचा जास्त वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तिथं पाण्याचा वापर कमी होतो आहे असं वाटलं तरी ते बरेचदा फुकट जात असतं.

👉भाज्या, तांदूळ, डाळ धुतलेलं पाणी शक्यतो साठवून ठेवावं आणि इतर ठिकाणी वापरात आणावं. उदाहरणार्थ हेच पाणी तुम्ही कुकरमध्ये तळाला घालू शकता.

👉डिप फ्रिझरमधून वस्तू काही तास आधीच काढून ठेवाव्यात, त्या नॉर्मल तापमानाला आणण्यासाठी पाण्यानं धुऊ नयेत.
👉अन्नपदार्थ उकडण्यासाठी पाण्याऐवजी शक्यतो वाफेचा वापर करावा.

👉किचनमधील भाज्यांसारखे पदार्थ किंवा वस्तू धुण्यासाठी एकाच मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यातच धुवा, वाहत्या नळाचा वापर करू नका.

👉आज भरून ठेवलेलं पाणी उद्या फेकून देण्याची चूक कधीही करू नका. साठवणीच्या पाण्याच्या बाबतीतही अनेक जण बेपर्वाईनं वागत असतात. अनेकांच्या घरी एक किंवा दोन पाण्याच्या टाक्या असतात. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी अशी माणसं पर्वा करत नाहीत. टाकी साफ करायची वेळ येईल तेव्हा शक्यतो पाणी कामांसाठीच वापरून टाकी रिकामी करा, नंतरच ती साफ करायला घ्या.

👉बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये आपण घरातल्या ७५ टक्के पाण्याचा वापर करतो. यात सर्वाधिक पाणी फुकट जातं ते शॉवरखाली अंघोळ केल्यामुळे किंवा वाहत्या नळाखाली भांडी घासणं, कपडे धुणं या प्रकारांमुळे. त्याऐवजी मोठय़ा टबात आवश्यक तेवढंच पाणी साठवून ही कामं केली तर पाण्याची खूप बचत होईल.

👉झाडांना पाणी घालताना शक्यतो ऋतुमानानुसार पाण्याची गरज ओळखूनच झाडांना पाणी घालावं. उन्हाळ्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा.

👉घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.

👉इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी. ४० मी. असेल तर मुंबईच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!

👉दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.

👉पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिऊन तशाच टाकून देऊ नका. निसर्गाची ती एक मोठी प्रतारणा आपण करीत आहे व म्हणूच तो अक्षम्य गुन्हा आहे. पाणी संपणार नसेल तर आजूबाजूच्या झाडांना घाला व त्यांचा दुवा मिळवा. कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र वापरत असाल तर त्याचा वापर पूर्ण क्षमतेनेच करा. आठवडय़ातून दोन-तीन दिवसच त्याचा वापर तारतम्याने केला तर ऊर्जा व पाणी या दोन्हीची चांगली बचत होऊ शकते.

👉न्हाणीघरातील व स्वयंपाकघरातील पाणी ऑक्सिडेशन करून बागेसाठी व शौचालयाच्या टाक्यांसाठी वापरता येईल. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे.

👉इमारतींच्या आवारात जर बाग वाढविली असेल तर दिवसा त्यावर एका विशिष्ट जातीचे प्लास्टिक अंथरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. अर्थात त्यासाठी सदस्यांना थोडे कष्ट करावे लागतील अथवा माळ्याला उचलून पसे द्यावे लागतील. आवारातील झाडांना ठिबक पद्धतीने (पाण्याच्या बाटलीला छोटेसे छिद्र पाडून) पाणी दिले तर पाण्याची बचत होईल. झाडाच्या बुंध्याजवळ जर नारळाच्या शेंडय़ा किंवा मॉस ठेवले तर पाणी कमी वापरावे लागेल.


एकूणच वाहत्या नळाखाली काम करणं टाळलंत तर बरीच मोठी पाणीबचत होईल. शेवटी पाण्याची बचत म्हणजे आपल्या भविष्यासाठीचीच बचत या दृष्टीनं आजच पाण्याचा योग्य तितकाच सांभाळून वापर करायला सुरुवात करा.

................सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...