फॉलोअर

२२ मार्च २०१६

पाणी वाचवा भाग 1

🙏🏽 पुढारी परिवाराच्यावतीने आवाहन 🙏🏽

कराडकरांनो रोज पाणी वाचवुया

जागतिक जल दिन विशेष भाग 1

पाणी किती महत्वाचे आहे हे सांगायला नको. कराड तालुक्यातून कृष्णा नदी वाहते,आपण कृष्णा काठावरील गावात जन्माला आलो, हे आपले भाग्य आहे. नव्हे आपण खरंच पुण्यवान आहोत. कराड शहरवासिय तर महापुण्यवंत आहेत.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 
म्हणोणी करहाटक नगरी जन्मलो

पाणी टंचाई, पाणी संकट, पाणी कपात किंवा आज पाणी येणार नाही, असे शब्द कराडवासियांनी गेल्या साठ सत्तर वर्षात कधीच ऐकले नाहीत. पाणीआमच्या उशाला आहे. ज्येष्ठ नेते स्वर्गीय पी डी पाटील यांच्या दुरदृष्टीमुळे शहरात पाणीपुरवठा योजना राबविण्यात  आल्या, आणि आजही त्या सुरळीत सुरू आहेत.

पंचवीस तीस वर्षे पुर्वीचा म्हणजे 1985-90 चा काळ आठवला तर कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. दहा वीस गावे सोडली तर कोणत्याही गावात पाणी योजना नव्हत्या. गावात एखादी विहीर, आड असायचा. तेथून सारा गाव पाणी भरायचा. आम्ही करवडी गावकरी पाणी आणायसाठी रानामाळात भटकायचो. एका खाजगी विहीरीतून पाणी पाईपलाईन मधून करवडी स्टॅन्ड मागे बांधलेल्या टाकीत साठवले जायचे.  तिथे पाणी भरायला सारा गाव यायचा. पाणी भरणे हे घरातील पुरुष मंडळी, तरूणाचे दिवसभरातील महत्वाचे काम असायचे.

संपूर्ण आयुष्यभर आमच्या गावचे माजी सरपंच कै शंकरराव काशिद यांनी गावाला पाणी पाजण्याचे  काम केले. पहाटे चार पाच वाजता उठून मोटर सुरू करायचे ते. इकडे पाण्याच्या टाकीपुढे नंबर लागायचे. लांबलचक लाईन असे. टाकी पासून आमचे घर जवळ होते, त्यामुळे मोठी घागर नंबरला लावायचे ( नावडते ) काम माझ्या कडे असायचे. पाणी माझे वडील आणि थोरले बंधू आण्णा भरायचे. टाकीवर सकाळी पाणी बाणी असायची, खुप गर्दी व्हायची. कोणीतरी मध्ये घुसला की भांडणे पण व्हायची. स्टॅन्ड वर एक जिजाबा पवार यांचे हाॅटेल होते. जेज्याचे हाॅटेल म्हणून ते प्रसिद्ध होते. हाॅटेलात पाणी टाकीतून डायरेक्ट प्लॅस्टिक पाईप टाकून पाणी नेले होते.  सारे गाव, शाळेची पोरं, वाटसरू, प्रवासी तिथे पाणी प्यायचे म्हणून जेज्याला दिलेले ते मोफत कनेक्शन गावाला मान्य होते. कधीकधी टाकी पाणी भरून वाहू लागले की विहीरीवर जाऊन मोटर बंद करेपर्यंत ओव्हर फ्लो पाण्यात पोरं आंघोळ करायची, पाणी वाचवायसाठी . कठीण काळ होता तो.



 त्या टाकीवर एक वाक्य कोरले होते. ते वाक्य आम्ही पोरं वाचायचो,अर्थ समजून घ्यायचो. ते वाक्य खरंच पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या अडाणी शहाण्या गावकरी लोकांच्या सुपीक डोक्यातून तिथे लिहले गेले होते. आजही ते वाक्य तिथे आहे.
               ' सार्वजनिक जलधारा जपून वापरा '
हे वाक्य पाणी बचतीचा संदेश देत होते. एवढ्या कष्टाने पाणी घरी नेल्यावर कोणी त्याचा अपव्यय करेल का? तरीही माझ्या गावातील विचारवंत मंडळींनी टाकी बांधकाम सुरू असताना ते कोरले होते. मला खरंच दाद द्यावी वाटते, नतमस्तक व्हायला आवडेल त्याच्यासमोर. किती मोठ्ठा विचार होता तो. पाणी वाचवा,जलधारा जपून वापरा, पाणी मौल्यवान आहे, हे समजून, पटवून  देणारा !




आज माझ्या गावात सगळीकडे पाणी खळखळतंय फक्त आरफळ कालव्यामुळे. काळ बदलला, पाणी आलं, समृद्धी आली, सारा गाव, भाग पाणस्थळ झाला आहे.  कराड  परिसरातील सर्व गावात पाणी पुरवठा योजना आहेत. सार्वजनिक नळ बंद झाले, कमी झाले आता घरोघरी नळ आले आहेत. अनेक गावांमध्ये, कराड शहरात सकाळी, संध्याकाळी पाणी येतं. सकाळी पाणी आलं की संध्याकाळी भरलेले पाणी ओतून टाकायचं आणि संध्याकाळी पाणी आले की सकाळी भरलेले पाणी ओतून टाकायचे, हे सुरू झाले आहे. पाणी भरपूर आहे, साठा खुप आहे, काय करायचे पाणी ठेऊन, पाणी शिळं झाले आहे, अशी खुळी समजुत, हुशारी असणारी आपण कृष्णाकाठची विद्वान मंडळी पाणी फेकून देत आहोत. मुर्खपणाचा कळस गाठला आहे आपण. हे बरोबर नाही. पाणी जीवन आहे. पण हेच पाणी थोडं वास यायला लागला की आजार पण आहे. पाणी नाल्यात, गटारात ओतून दिल्यावर ते कुठे जाते याचा विचार केला आहे आपण कधी ? 
2004ली प्रीतीसंगमावरून काॅलममध्ये कराडकरांनो पाणी वाचवा,  असा लेख मी लिहला होता.  तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी नाही. पाणी लुटणारे, उधळपट्टी करणारे कराडकर तसेच आहेत. त्याच्या  मनोवृत्तीमध्ये काही फरक पडला नाही. पण आता शहाणे व्हायची वेळ आली आहे. कोयना धरणात पाणी साठा खुप कमी आहे. अजून एप्रिल, मे, जून पर्यंत पाणी पुरवायचे आहे.लवकरच कराडात पाणी एकवेळ मिळण्याची शक्यता आहे.  अजून गंभीर परिस्थिती झाली तर  एकआड दिवस  होऊ शकतो. टेंभू योजना पाणी साठवल्यामुळे आपल्याला संगमावर पाणी दिसतंय. किमान पाणी पहायला मिळतंय हे पण आपले नशीबच आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिका मोठा खर्च करते. आपल्याला घरपोच पाणी पुरवते आणि त्या शुद्ध पाण्याने आपण वाहने धुतो, रस्त्यावर पाणी मारतो, ते पाणी  ओतून टाकतो, याला शहाणपणा म्हणता येईल का? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत असे शहाणे रहातात, हे इतरांना कळले तर साहेबांचे नाव खराब होईल. चला तर मग  आज शपथ घेऊ या, प्रत्यक्ष  आचरणात आणू या. 



आज आंतरराष्ट्रीय जल दिन
यानिमित्ताने आजपासून संकल्प करूया....!


☝मी पाणी वाचवणार.
☝मी पाणी गटारात ओतणार नाही .
☝पाणी शिळे होत नसते, त्यामुळे मी पाणी फेकणार नाही.
☝मी रस्त्यावर पाणी मारणार नाही .
☝मी वाहन धुवायला पाणी वाया घालवणार नाही .
☝मी मला हवं तेवढं पाणी घेणार.
☝उरलेलं पाणी पुन्हा वापरणार, फेकणार नाही.
☝मी घरातले नळ, व्हाॅल्व्ह दुरूस्त करणार.
☝मी पाणी संपत्ती  प्रमाणे वापरणार, एक एक थेंब वाचवणार.

          आम्ही पाणी वाचवणार, शहाणे कराडकर बनणार!

                  कृष्णाबाईच्या नावानं चांगभलं
                         ..............................सतीश मोरे




..............सतीश मोरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...