फॉलोअर

१२ मार्च २०१६

साहेबांची समाधी आणि साहेब

नमस्कार,
यशवंतराव चव्हाण आणि कराडचा प्रितिसंगम  हे घट्ट नाते आहे.
साहेबांना अभिवादन करावयास येणार्‍या असंख्य यशवंत प्रेमींना कृष्णा कोयनेच्या संगमाची, घाटाची , निसर्ग सौंदर्याची आणि समाधी स्थळाची भुरळ पडते. हा परिसर कोणी सजवला, समाधी आणि बाग कोणी  आणि कशी उभारली याबाबत अलिकडच्या पीढीला काहीच माहिती नाही. कोण म्हणतो शासनाने बांधली,  कोण पालिकेने तर कोणी म्हणतो कराड शहरवासियांनी ही  समाधी बांधली. मात्र सत्य वेगळे आहे. याबाबत पी.डी साहेबांचे चिरंजीव सुभाषराव पाटील काका आणि माझ्यात अनेकदा चर्चा झाली होती.  या चर्चेतून मला वेगळी आणि छान माहिती मिळाली. पी.डी. साहेबाच्या पुण्यतिथी दिनी गत वर्षी मी पुढारी प्रीतीसंगमावरून मध्ये  ही  माहिती (लेख ) छापला होता. आज चव्हाण साहेबाच्या जन्मदिनी पुन्हा पोस्ट करत आहे.
                                                                                                                         

                                                                                                                      धन्यवाद. ....सतीश मोरे

साहेबांची समाधी आणि साहेब

कृष्णा आणि कोयना या दोन भगिनी कराडला समोरासमोर कडकडून भेटतात. महाबळेश्वर मध्ये ताटातूट झालेल्या सख्ख्या बहिणीचा करहाटक नगरीत  प्रेमाचा संगम होतो. खुप कमी ठिकाणी पहायला मिळेल अशा कराडच्या प्रीतिसंगमाची भुरळ सर्वाना पडते. कृष्णा नदीकाठी अनेक प्राचीन मंदीर आहेत. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या कृष्णा काठावर संगमाच्या डाव्या बाजूला  अतिशय सुंदर, रेखीव आणि अष्टकोनी यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. देशभरातील यशवंत प्रेमीसाठी श्रद्धा आणि प्रेरणास्थान असलेली ही समाधी 1988 साली बांधून पूर्ण झाली. यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचाराचे सच्चे पाईक असलेले तसेच  सुखदुःखात, भरारीच्या आणि पडत्या काळात चव्हाणसाहेबांना सावली प्रमाणे साथ देणाऱ्या आदरणीय स्व. पी डी पाटील यांच्या पुढाकाराने,सह्याद्री साखर कारखान्यातील सभासद, कामगारांच्या एक एक रूपयांच्या निधीतून आणि कराड नगरपालिकेच्या सहकार्यमुळे उभे राहिलेले हे प्रेरणास्थळ साहेबांच्या साहेबांवरील निस्सीम प्रेमाची साक्ष देत आहे.
यशवंतराव चव्हाण याची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये साहेबाचे बालपण गेले. शुक्रवार पेठेतील डुबल गल्लीत त्याचे बालपण गेले. तेथून कृष्णा जवळच असल्याने साहेबाच्या लहानपणीच कृष्णाकाठाचे आकर्षण राहिले होते. विद्यार्थी दशेत या परिसराने त्यांच्या मानसिक व बौद्धिक विचाराला चालना दिली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रास कृष्णाकाठ असे नाव दिले आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून लहानपणी शाळेत बोललेली मी यशवंतराव चव्हाण होणार हा संकल्प पुर्णत्वाकडे नेला. महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री ते भारताचे उपपंतप्रधान हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.  राज्यात, देशात उच्च पदावर काम करीत असताना साहेबांचे कराडला सतत येणे होते. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी कृष्णा काठावर फेरफटका मारला. त्यानंतर मुंबईला गेल्यावर त्यांनी या परिसराबाबत हळुवार भावना व्यक्त करणारे पत्र 16 मे 1961रोजी तत्कालिन नगराध्यक्ष पी डी पाटील यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी प्रीतिसंगमाचा परिसर सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सुचविले होते. साहेबांच्या इच्छेनुसार पी डी पाटील यांनी त्यानंतर भुईकोट किल्ला परिसरातील संगमालगतची साडेसात एकर जागा औध पंतप्रतिनिधी कडून संपादित केली. 1974 मध्ये बागेचा आराखडा तयार करून कंपाऊंड घातले. दरम्यान 1976 च्या पुरात हे सर्व वाहून गेले. त्यानंतर संगमाच्या वळणावर संरक्षक भिंत बांधून याबाबत शासनाकडे 1983 मध्ये प्रस्ताव सादर केला.
25 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतराव चव्हाण यांचे दिल्ली येथे निधन झाले. साहेबांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यविधी करावे असा विचार पुढे आला.  मात्र पी डी पाटील, बाबुराव कोतवाल, मंत्री शामराव अष्टेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. चव्हाणसाहेब कराडचे आहेत आणि त्यांच्यावर कृष्णाकाठावरच अंत्यसंस्कार व्हायला हवे अशी समस्त कराडकराची इच्छा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्याना पटवून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने चव्हाणसाहेबांचे पार्थिव कराडात आणण्यात आले. त्यावेळी लाडक्या नेत्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. पी डी पाटील यांनी  चव्हाण साहेबाच्या त्या पत्रातील प्रितीसंगमावरील प्रेमभावनेचा विचार करून संगमाच्या काठावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर काही दिवसांतच शरद पवार यांनी मुंबईत  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली. इकडे कराडात साहेबांचे चिरंतन स्मारक उभारण्यासाठी यशवंतराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. मात्र या समितीने पुढे काहीच न केल्यामुळे पी डी पाटील त्यातून बाजूला झाले. पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. साहेबांच्या समाधीसाठी निधी संकलन करण्यासाठी नागरिकापुढे जाण्याऐवजी सह्याद्री साखर कारखाना सभासदाकडून उसातून प्रतिटन रक्कम  कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याच्या उभारणीत चव्हाणसाहेबांचे फार मोठे योगदान आहे, साहेबामुळेच हा कारखाना उभा राहिला, शेतकरी सधन होऊ शकता आणि या कृतज्ञता भावनेने शेतकरी सभासदांनी यास एकमताने मंजुरी दिली. कामगार सुद्धा पुढे आले. सभासद आणि कामगार यांनी 5 लाखावर निधी गोळा केला. कोल्हापूर चे आर्किटेक्ट बेरी यांनी आराखडा तयार केला. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या धर्तीवर बेरी यांनी हे डिझाईन पी डी पाटील यांच्या सूचनेवरून केले.
या समाधीची लांबी रुंदी 20×20 फुट आहे. सभोवतालची परिक्रमा मार्ग 8 फुट 6 इंच रुंदीचा आहे. समाधी पूर्वेस पाणघाटावर 30×30 फुट  मापाचा अष्टकोनी चौथरा असून तेथून समाधी कडे जाणार्‍या मार्गाची रुंदी 15 फुट व लांबी 95 फुट आहे. चबुतरा, समाधी कडे जाणारा मार्ग, समाधी,  परिक्रमा मार्ग,  समाधी मार्ग ही कामे आरसीसी मध्ये एकजीव आहेत.  या कामाच्या फौडेशनसाठी 15 फुट खोलीपर्यंत एक फुट जाडीचे 75 आर सी सी काॅलम उभे करण्यात आले.  या सर्व काॅलमना जोडणाऱ्या बिम्स सर्वत्र आहेत. या कामासाठी गोकाक स्टोन वापरला आहे. परिक्रमा, चौथरा व मधला मार्गावर आग्रा टाईल्स बसवली आहे तर समाधी सभोवताली व माथ्यावर पिंक शेडच्या ग्रॅनाईट स्टोन फरशी आहे. कोल्हापूरच्या अॅडव्हान्स कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम पूर्ण केले.  समाधीचा स्लॅब टाकण्या अगोदरच जमिनीत खोल एक ताम्रमंजुषा ठेवली असून त्यामध्ये साहेबांचे साहित्य, ग्रंथ,भाषणे, पत्रे, फोटो ठेवली आहेत. ताम्रपटावर त्याचे जीवन चरित्र कोरले आहे. कामाची पाहणी करून शरद पवार यांनी प्रतिष्ठानच्या वतीने 3 लाख रुपये दिले.
समाधी समोर साडेसात एकर जागेत आर्किटेक्ट जयंत धारप यांच्या आराखड्यानुसार अतिशय सुंदर बाग तयार करण्यात आली. उद्यानाच्या प्रवेश द्वाराकडून समाधी कडे जाण्यासाठी 15 फुट रूंदीचा रस्ता तयार केला आहे. बागेत गोलाकार,  नागमोडी रस्ते तसेच विशाल हिरवळ केली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूस कोटाच्या उतरणीवर निलगिरी झाडे लावल्या मुळे हा भाग खुप छान दिसतो. या सर्व कामातून उरलेली रक्कम पालिकेच्या खात्यावर जमा करून त्या व्याजातून समाधी देखभाल दुरुस्ती व पुजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शामराव अष्टेकर याच्या आमदार फंडातून पर्णकुटी इमारत व ग्रंथालयाचे काम केले . 25 नोव्हेंबर 1988 रोजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते समा

Add caption


धी व बागेचे अनावरण करण्यात आले.
पी डी पाटील यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टी मुळे कराडात अनेक कामे पूर्ण झाली आहेत. टाऊन हॉल, शिवाजी स्टेडियम, पालिकेची इमारत, शाॅपिंग काॅम्लेक्स, शाळा इमारती, साहेबांची समाधी,साखर कारखाना, शिक्षण संस्था यासारखी भव्य दिव्य कामे पूर्ण करून पी डी साहेबांनी अतिशय सन्मानाने राजकीय निवृत्ती. 42 वर्षे सलग कराड नगराध्यक्ष म्हणून काम करताना सामोपचाराने कारभार केला.  साहेबांच्या कालावधीतील पालिकेत सर्व ठराव एकमताने मंजूर झाले,  ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचाराचे सच्चे पाईक म्हणून त्याच्या पश्चात अनेक उपक्रम पी डी पाटील यांच्या पुढाकाराने राबवले जातात.  कराड शहरात आदीलशहा कालीन भव्य दिव्य मनोरे आहेत. पी डी पाटील आणि यशवंतराव चव्हाण हे दोघेही विकासकामाचे उत्तुंग मनोरेच आहेत. हे दोघेही कराडचे वैभव आहेत.
यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन.

                                                                                                      ........सतीश मोरे, कराड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...