फॉलोअर

२५ मार्च २०१६

बेमिसाल सखी

सखी कशासाठी? कोण आहे ही सखी ?




 सखी आणि सखा, 
तसे खुप छोटे शब्द. 
मात्र अर्थविश्व फार मोठ्ठे !
कृष्ण सखा म्हणून द्रौपदीच्या पाठी उभा होता,
राधेचा तर तो प्राणसखा होता.
सखी आणि सखा नातं
अतुट प्रेमाचे, मैत्रीचे, विश्वासाचं,
मार्गदर्शकाचं, मानसिक आधाराचं,
                                                           एकमेकांना समजून घ्यायचं 
                                                               अव्यक्त व्यक्त होण्याचं,  
                                                     घेण्याचं नव्हे देण्याचं आणि त्यागाचंही !



             सखी
              हा शब्द माझ्या कानावर अनेकदा पडला होता,
              अजुनही पडतो.
               तुमच्याही पडत असेल.
                मला तो भावला फक्त
                 बेमिसाल मधील सुधीरच्या मुखातून  पडलेला......
                    सखी, सखे......!


1990 च्या दशकात हा सिनेमा पाहिला होता.
मी अमिताभ बच्चन यांचा जन्मजात फॅन. आकरावी बारावीत असताना हा सिनेमा पाहिला.
रूषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा अमिताभ बच्चन अभिनित शेवटचा सिनेमा.
 या अगोदर अमिताभ बच्चन यांना घेऊन मुखर्जी यांनी आनंद, अभिमान, गुड्डी , मिलि, चुपके चुपके आदी आकरा चित्रपट केले आहेत .

ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसाल हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला .हा चित्रपट अभिनेता उत्तमकुमार यांचा बंगाली चित्रपट अमी से ओ सखा या चित्रपटावर आधारीत होता. काश्मीरचे खुप खुप छान फोटोसेशन आहे यामध्ये.
एक वेगळीच कथा आहे. प्रेम असुनही सखी पुढे व्यक्त न करणारा सुधीर.
डाॅक्टर म्हणून अमिताभ बच्चन यांची ही वेगळी भुमिका.
मी हा चित्रपट अनेकदा पाहीला आहे. यामध्ये राखी ही सुधीरची सखी होती.


माझ्या मनात सखी हे पात्र हा चित्रपट पाहून बसले आहे. सखी खरंच खुप वेगळी असते.  सुधीरची सखी इतकी एकरूप होती की तिने त्याला जवळचा मानले, ही सखी त्या सख्यासाठी सर्वस्व होती, मैत्रेयी होती. सख्याचे सखीवरील प्रेम, समर्पण, त्याग म्हणजे बेमिसाल. हा चित्रपट पाहून सखी हे पात्र इतकं खोल मनात बसले की गत वर्षी माझ्या मनात सखी नावाची माझी पहिली कविता उमटली.


ही कविता प्रसिद्ध झाली, अनेकांना खुप आवडली, काहींना कळली, काहीजणाच्या डोक्यावरून गेली.
सखी म्हणजे काय असे त्यांनी मला विचारले. एकदा फ्रेंडस ग्रुपमध्ये तर दोन तास यावर चर्चा झाली. 


प्रत्येकांनी त्याच्या त्याच्या दृष्टीतून सखीची व्याख्या सांगीतली. कोणाला ती मैत्रीण,शेजारीण वाटली, कोणाला पहीलं प्रेम, कोणी सल्लागार म्हटलं तर कोणी लफडं म्हटलं. याहून वेगळी यापैकी काही, खुप काही अशी सखी माझ्या मनात होती, आहे, राहील. अनेकांच्या मनात ती सखी असेल. मला फक्त बेमिसाल मधील सखी दिसते .

खरंच कोण आहे ही सखी?


आपल्या सर्वांना जवळिकीची, प्रेमाची भुक असते. भावनाशील माणसाची ती गरज असते.
अनुदिनी अनुतापांनी तापलेल्या, दमलेल्या-भागलेल्या माणसाला अशी एक कुस हवीच असते
की जेथे आपण हक्काने विरघळून जाऊ शकू. सगळे काही विसरून त्या सावलीत शांतनिवांत पहुडू शकू.

सर्जनशील माणसाला तर अशा सखीची नितांत आवश्यकता असते.
त्याची गृहीणी त्याची सखी असेल तर प्रश्नच मिटतो .खरं तर पत्नी इतकी जवळची सखी कोणी असूच शकत नाही.
पण सत्यभामा सखी होऊ शकत नसेल तर रूक्मिनीचा शोध सुरू होतो. (आजची मस्तानी नव्हे )
अर्थात हे समजण्यासाठी पाशवी मनोविकारातून बाहेर यावे लागेल हा भाग वेगळा !


कायिक व्यापातून सुटका मिळविली तरी
मनाचा प्रश्न उरतोच. त्याच्या गरजा वेगळ्या असतात.
त्याला एका ह्रदयीचे गुज ओळखणारे ह्रदय हवे असते , मनोवेदनांवर फुंकर घालणारे ओठ हवे असतात ,
विशिष्ट बौद्धिक पातळीवरून
केला जाणारा संवाद हवा असतो ,
वैचारिक सख्यत्व हवे असते.
म्हणूनच त्याला एक सखी हवी असते.

जिच्या कडे सर्व काही मन मोकळे करायचे आहे अशी ती सखी !
जिच्या पुढे सर्व बंधने तुटतात, आडपडदा रहात नाही ती सखी !
जिच्या अस्तित्वात माझे सर्वस्व असेल, मी माझा नसेल ती सखी !
जिच्या मनात आहे तेच ओठांवर असते अशी ती सखी !
जिच्या भेटीची हुरहुर मज निशदिनी अशी ती सखी !
प्रेम, समर्पण, शरीर , त्याग, आदर याच्याही पुढे अशी ती सखी !

अशी सखी सर्वांना मिळो.
सखी मनात कायम असते,
जवळ असो वा नसो.
तिच्याबाबत अनेक विचार,
भावना, स्पंदन, लहरी उमटतात.
आणि हे शब्द बाहेर पडतात.


सखी,
तु जसं म्हणशील तसं...
पण मला तु हवी आहेस.



तुझं ते माझं, माझंही तुझं
तुझ्यासाठी हेही अन् तेही
तुझ्या असण्याचाच आधार मला
भेटली नाहीस तरी चालेल पण
मला तु हवी आहेस.



तुझ्या भेटीत सर्व मिळतं मला
तुझ्या स्पर्शाची अन् सोबतीची
सतत ओढ असते मला
वाट पाहीन जन्मभर त्या क्षणाची पण
मला तु हवी आहेस.


मैत्रीचे,विश्वासाचं नातं आपलं
टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी

सर्व मान्य 
पण
सखी,
मला तु हवी आहेस.



              




   ...........सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...