फॉलोअर

१६ मार्च २०१६

मी कोण?

मोठ्ठा माणुस छोटा विचार 






जगाचा पसारा खुप मोठ्ठा आहे . इथे माणुस म्हटलं तर फार मोठा नाहीतर खुप छोटा आहे . करवडी सारख्या छोट्या खेडेगावात मी वाढलो, मोठ्ठा झालो. गाव जितके लहान तितके विचार लहान पण व्यक्ती मात्र खुप महान असतात. माझ्या गावासारखे दुसरे गाव नाही असे अजुनही वाटते. गावातील प्रत्येक व्यक्ती गावातील इतर व्यक्तींना ओळखते, घराघरांत त्याचे येणे जाणे असते. पुर्वी साधन संपत्ती, दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. मात्र संपर्क खुप होता.

गावात चांगले, वाईट काही झाले तरी गावाला कळते. ट्रक घेतला काय आणि सायकल घेतली, चर्चा तेवढीच. मला आठवतं गावात एखाद्याने हरक्युलस सायकल जरी घेतली तरी त्याची चर्चा गावभर व्हायची.सायकल कुठून घेतली, कितीला घेतली, कशी आणली, किती छान आहे, घंटी कसली आहे, डायनामा आहे का, ती कशी दिसते इथपासून उंची किती आहे , टायर कसला आहे याबाबत गावभर गप्पा रंगायच्या. गावातील राहणीमान पद्धती, दुसर्‍याची चौकशी करून माहिती काढणे लय भारी असतं.


गावातील लोकांना पारावर गप्पा मारायला खुप आवडतात. दिवसभर शेतात काम करून कंटाळून आलेला तो घरी येतो. स्वयंपाक होईपर्यंत याच आवडतं ठिकाण म्हणजे पार. तिथं त्याचे जोडीदार अगोदरच येऊन बसलेले असतात. पारावरच्या गप्पाची एक पद्धत असते. गप्पा मारता मारता एखादा नवा माणूस आला की त्याला बरोबर  नवीन विषय सुरू, मग ह्याचं काय चाललंय, त्याचं काय, त्याने नवीन काय केले, त्याचं काय,  त्याला काय कळतंय अशी मापं काढत विषय एखाद्या खाजगी विषयावर येतो. मग आणखी खाजगी ! ही चर्चा सुरू असताना एखादा माणूस निघून गेला की त्याच्या विषयी चर्चा सुरू होते.

पारावरच्या गप्पात गावाबाहेर असलेल्या गावातील मोठ्या व्यक्तीचा विषय निघाला की 'आरं त्याला कितीही मोठा होऊ दे , एक दिवस गावातच यायचं आहे,'असे बोलले जाते. माणूस कितीही मोठा झाला तरी शेवटच्या दिवशी त्याला गावातचं आणले जाते, कुठेही गेला तरी तो गाव विसरत नाही. गावाबाहेर गेलेला माणूस गावाचे नाव राज्यभर, देशभर, जगभर करत असतो. तरीही त्याचं मोठ्ठपन मान्य नाही करणारा पारावरचा आगळावेगळा युक्तिवाद मला नेहमी भंडावून सोडतो.


जगाच्या पसार्‍यात माणुस किती तरी छोटा आहे, त्याचे विश्व खुप लहान आहे, त्याचे विचार तरी त्याहून लहान  आहेत, असे असताना  तो माणूस स्वःतला  गावपातळीवर  आणून स्वःतला आणखी लहान का करतो? गावाबाहेर गेलेला माणूस गावाचे नाव राज्यभर, देशभर, जगभर करत असतो. माणूस तालुक्याचे ठिकाणी  गेला तर त्याला पहिल्यांदा त्याचे गाव विचारले जाते. आणखी पुढे जाऊन अंदाज घेऊन,आडनाव विचारून मग तुम्ही कुणापैकी हा प्रश्न हमखास विचारला जातो. पावणं कुठलं गाव? हे विचारले की मी करवडीचा हे उत्तर आले की हिकडं कुठे आला,  कुणाचं पाहुणं, नाव काय हे प्रश्न येत रहातात. हीच व्यक्ती जेव्हा जिल्ह्य़ात जाते तेव्हा ती गावची ओळख सांगत नाही, तालुक्याचं नाव सांगते. जसजसे वर वर जाऊ तसे गावाचे नाव खुप मागे पडते.

मी करवडीचा, मी कराडचा, मी सातारचा, मी घाटावरचा, मी कोकणातला, मी विदर्भातला, मी मराठवाडय़ातला, मी पश्चिम महाराष्ट्राचा, मी महाराष्ट्राचा आणि सर्वात शेवटी मी भारताचा अशी ओळख होते. मी भारतीय आहे ही ओळख करून द्यायला मला भारताबाहेर जावे लागते. भारतात मला कोणीच भारतीय म्हणून बोलवत नाही. भारतात मी भारतीय का होऊ शकत नाही? कधी मी गोंधळात पडतो मी कोण?

  
नाव सांगितले तर तु कुणाच्या घरातल्या, कुणाचा पोरगा, वरच्या घरातला की खालचा, यांचा पाहुणा की त्यांचा मेव्हणा, मग तुझी सासुरवाडी कोणती? आजोळ कोणते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात? आडनाव आले की ठरवले जाते, या आडनावाची भावकी कोणती? जात कोणती? त्याची गावात घरं किती? पाहुणेपै कोणत्या गावात आहेत? भावकी मोठी असेल तर कोणत्या वाड्यातला? बुडखा कोणता? गावात  एकटं घर असेल तर दत्तक आहे का उपरा आहे ? अशा  किती तरी विषयावर त्याला भंडावून सोडले जाते. किती खालच्या पातळीवर जाऊन चौकशी केली जाईल याचा नेम नाही. गावातील लोकांच्या या विचार पद्धतीमुळे मी चक्रावून जातो आणि हे शब्द बाहेर पडतात.







मी कोण?
मी सतीश मोरे
माझे गाव करवडी
राहतो कराडात
पण मला सगळे म्हणतात 
..................करवडीकर

मी जेव्हा सातारला जातो
तेव्हा ते मला कराडकर म्हणतात
मी जेव्हा मुंबईला जातो
तेव्हा ते मला सातारकर म्हणतात.
सांगाना मी कोण?

मी विदर्भात जातो, 
जेव्हा मी मराठवाडय़ात जातो 
तेव्हा ते मला पश्चिम महाराष्ट्राचा म्हणतात
मी कोकणात जातो
तेव्हा ते मला घाटावरचा म्हणतात 
सांगाना मी कोण ?

मी जेव्हा दिल्लीला जातो
मी जेव्हा सुरतला जातो
मी जेव्हा कलकत्त्यात जातो 
मी जेव्हा पंजाबला जातो
तेव्हा ते मला महाराष्ट्रीयन म्हणतात 
सांगाना मी कोण?

मी जेव्हा अमेरिकेत जातो
मी जेव्हा दुबईला जातो
मी जेव्हा जपानला जातो
मी जेव्हा जगात कुठेही जातो
तेव्हा मला इंडीयन म्हणतात 
सांगाना मी कोण?

प्लीज मला कोणी सांगेल का 
मी कोण?

                ..........कनफ्युज्ड ?



                                                               ......................सतीश मोरे   







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...