मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात
आपण पुढे चालत रहायचं असते
आपण पुढे चालत रहायचं असते
बिचारं मांजर आडवे आले की आपण त्याला दोष देतो, त्याच्यामुळे
काम होणार नाही अशी अटकळ बांधतो, पुढची कामे सोडून देतो. पण आयुष्यात
आलेल्या अनुभवाचा, लागलेल्या ठेचांचा विचार केला तर मांजरापेक्षा माणसेच
आपल्या आडवी आली होती हे लक्षात येईल.
मांजर आडवे गेले की आपण थांबतो, कुणीतरी रस्ता ओलांडून पुढे
जाण्याची वाट पाहतो किंवा दोन पाऊले मागे येऊन पुन्हा चालायला सुरुवात
करतो. हे करून आपल्याला समाधान मिळते व पुढे जाऊन आपण कामाला लागतो.
अंधश्रद्धा ठेऊन पुन्हा श्रद्धेने कामाला लागतो.
आयुष्यात अनेकदा चांगले काम करताना वाईट विचाराची मांजररूपी
माणसे आडवी येतात. आडवे येणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्या आडव्या
येण्यामागे तुमचे चांगले काम बंद पाडणे हा हेतू असतो. आडवे येणाऱ्याच्या
आडवे जाऊन त्यामध्ये वेळ घालविण्याची चुक शहाणे लोक करत नाहीत. मांजर आडवे
आल्यावर जे आपण करतो तसेच अशा वेळी करायला हवे.
दोन पाऊले मागे येऊन दोन मिनिटे विचार करायचा.समोरचा माणूस
माझ्या आडवा येतोय म्हणजे मी त्याच्यापेक्षा काही तरी वेगळे करतोय. असे
चांगले आणि वेगळे काम करतोय की जे त्या व्यक्तीला जमत नाही. अशा वेळी त्या
व्यक्तीला त्याचे काम करू देत. माझे काम मी ठरवल्यानुसार पुर्ण करणारच ,असा
दृढनिश्चय करून त्या मांजररूपी आडव्या आलेल्या व्यक्तीला तेथेच सोडून
यायचे, डोक्यातून घरी आणायचे नाही.
असे केले तरच आपण पुढे जाऊ शकतो. भारतीय वंशाचे थोर विचारवंत
राॅबीनसिंग म्हणतात, तुम्ही जेव्हा डोक्यावर पाच दहा किलो वजनाची पाटी घेऊन
चालता तेव्हा त्रास तुम्हाला होतो. तसेच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला
डोक्यात घेऊन जगता तेव्हा त्रास तुम्हालाच होतो. तुमच्या विषयी वाईट विचार
करणारे, तुम्हाला दुषणे देणारे किंवा आडवे येणाऱ्याना तुम्ही तुमच्या
डोक्यावरून, डोक्यातून काढून टाका. बघा तुम्हाला कसे हलके हलके वाटते. लोक
तुमच्यावर जळतात तेव्हा समजायचे की तुम्ही काही तरी चांगले काम करत आहात.
परवाच मी एक विचार वाचण्यात आला, तुम्हाला जर शिखरावर
पोहचायचे असेल तर रस्त्यावर आडवे येणाऱ्या प्रत्येक कुत्र्यारूपी म्हणजे
प्रगती विरोधी भुंकणाऱ्या लोकांसाठी शक्ती वाया घालवू नका.सोबत बिस्किटे
ठेवा, त्याच्यापूढे फेका आणि पुढे चालायला लागा.
.......सतीश मोरे, कराड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा