फॉलोअर

१९ मार्च २०१६

सोळावं वरीस मोक्याचं

सोळावं वरीस मोक्याचं
आकरावीचे काॅलेज सुरू झाल्यानंतर महीना दिड महिन्यात मला आलेला अनुभव मी काल शेअर केला. जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते, आपण तिच्या मागे लागायचे नसते.  योग्य वेळी योग्य गोष्टी करायला हव्यात, करायच्या असतात. या शब्दरूपी शस्रानी मला समजून सांगणारे, बरं करणारे गुरू मला भेटले म्हणून आयुष्यातील तो दिवस माझ्या साठी टर्निंग पाॅईंट ठरला. थोरात मॅडम यांनी मला मंत्र दिला,  इथे ज्या कामासाठी आला आहे तेच करा. ते काम कोणते तर अभ्यास करायचे, शिकायचे, चांगल्या मार्काने पास व्हायचे, करियर करायचे, स्वतःच्या पायावर उभे रहायचे. हे सर्व करण्यासाठी आपण आपले लक्ष या गोष्टीवर  केंद्रित केले पाहिजे. जी गोष्ट अनेकांनी सांगून मी मनावर घेतली नसती ती एका अनुभवाने, तेजस्वी सल्ल्याने मला शक्य झाली.

तेरा ते एकोणीस Thirteen To Nineteen ही सात वर्षे  नाजुक असतात.  मानसशास्त्रज्ञ याला  TEEN AGE असे म्हणतात. आमचे ओगलेवाडीचे सय्यद सर म्हणायचे, ' या टीन वयात ज्याने संयम ठेवला, लक्क्ष्यावर लक्ष केंद्रित केले तो आयुष्याच्या परिक्षेत कधीच फेल होणार नाही '  काय काय शक्य असते या वयात असा प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेन काय  काय शक्य नाही या वयात. आपल्याकडच्या शिक्षण पद्धती नुसार या वयात आठवी ते बारावी हा महत्त्वाचा काळ असतो.  या दरम्यान दहावी  आणि बारावी  अशा दोन महत्वाच्या परिक्षांना आपण सामोरे जात असतो. आठवी नववीचे कोवळे वय काही तरी नवीन शोधत असते . घरातील व्यक्तीं पेक्षा बाहेरच्या लोकाचे, मित्रमंडळीचे बरे वाटते आणि नवनवीन शोध करण्याचे वेध लागतात. एकटे बाहेर जाऊ वाटते,  शारीरिक बदल होतात,  काही गोष्टी समजत नाहीत. समजून सांगणारे चांगले मित्र,  सल्लागार भेटले नाहीत तर 'बालक पालक' मधील पोरांसारखी अवस्था होते. माझ्या काळात बरीच माहिती आम्हाला मिळाली नव्हती, कोण सांगत पण नव्हते, मात्र आजची ANDROID परिस्थिती खुप वेगळी आणि गंभीर आहे. मला खुप चांगले मित्र आणि आईवडिलांचे संस्कार मिळाले , करवडी सारख्या अध्यात्मिक वातावरण असलेल्या गावांमध्ये रहाण्याचे भाग्य लाभले.

पंधरा किंवा सोळाव्या वर्षी दहावीचे महत्वाचे वर्ष असते. सोळाव्या वर्षी खुप मोठ्ठे कार्य करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भुमित महाराष्ट्रात आपण रहातो, हे काय कमी आहे ! ज्या वयात नवे नवे अंकुर फुटत असतात, नवी क्षितिजे खुणावत असतात त्याच मार्गावर  आपण जायला हवे.  ही क्षितिजे ( टेकड्या नव्हे) खुप विस्तीर्ण  आहेत, असतात . त्या दिशेने वाटचाल केली तर आयुष्य सुंदर होऊ शकते, याची जाणीव झाली पाहिजे. आपल्याकडे सोळावं वरीस धोक्याचं असे म्हणतात. चांगले मित्र, चांगले सहकारी, चांगले विचार, चांगले साहित्य, चांगले शिक्षक या काळात मिळाले नाहीत तर खरंच हे वय धोकादायक आहे.  वहात जाणार्‍या पाण्यात चांगले वाईट सर्व काही मिसळते. आपली धारा, धारणा , ध्यान योग्य दिशेने असली की चुकीचे काम होणारच नाही. असे म्हणतात आपण कोणतीही चुकीची गोष्ट, काम,  विचार करत  असतो तेव्हा आतून एक आवाज येतो. तो आवाज सांगतो तू जे करतो आहे ते बरोबर नाही. ज्यांना हा आवाज  ऐकू येतो,  पटतो तो कधीच वाईट मार्गाने जात नाही. मात्र हा  आवाज  ऐकू येऊ नये म्हणून भुलवणारे अनेक भोवरे तुमच्या कानाभोवती भुंग भुंग करत  असतात. त्यांना बाजूला काढून टाका. ते करण्यासाठी चांगले साहित्य वाचायला हवे.  मला माझ्या आयुष्याच्या या कठीण काळात आकरावी-बारावीत ययाती आणि मृत्युंजय या दोन महान कलाकृती वाचायला मिळाल्या.  या कादंबरीचे वाचन करताना मी नोटस् काढल्या होत्या.  त्यामधील दिव्य विचार आणि सकस, समृद्ध विचाराचे सोबती, सल्लागार, भाऊ,  अध्यात्मिक गुरू यामुळे मी नेहमी रूळावर राहीलो.

सोळाव्या वर्षी खुप काही करता येत. या काळात करवडी मध्ये माझी दोन ज्ञानेश्वरी पारायणे झाली होती. वाचन केले होते, समजले किती माहिती नाही, पण ज्ञान काय असते याचा स्पर्श  होऊन गेला होता. पसायदानाचे आकर्षण लागले. आकरावी मध्ये चांगले मार्क मिळाले. बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. काही वाईट वळणे लागली नाहीत. एक चहा आणि एक क्रिमरोल चौघात शेअर करणारे मित्र लाभले .काल मी जो अनुभव कथन केला त्यावरून  अनेक मित्रांचे फोन आले , काही पालकांनी पण फोन केला.  त्यांनी ही गोष्ट त्याच्या  आकरावी बारावी मधील मुलांना दाखवली. मुलांना कसे सांगणार असा प्रश्न पडलेल्या एका पालकांनी माझे आभार मानले. आपल्याला आलेले अनुभव शेअर करणे, त्यातून दुसर्‍याचा फायदा होणे यासाठीच तर हा खटाटोप!


                                                                                                                              सतीश मोरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...