दिनांक 13 जुलै
वाखरी सतीश मोरे
कोणतीही सवय लागायला, सुटायला किमान पंधरा कमाल एकवीस दिवस लागतात, असे म्हणतात . गेल्या सोळा दिवसात पहाटे दोन तीन वाजता उठायची आम्हा सर्वाना सवयच लागली होती. आज भंडीशेगाव मध्ये खरं तर लवकर उठायची गरज नव्हती, वाखरी अंतर
कमी असल्याने दुपारी एक वाजता पालखी निघणार होती. पण सवयी प्रमाणे तीन वाजता अनेकांना जाग आली, पुन्हा झोपवले इतरांनी. पाणी टंचाई थोडी जाणवत होती या भागात. याचाच विचार करून खरात व लोहार माऊलींनी मला चार वाजता जागे केले. उठा, कपडे तंबूतच ठेवा आणि लगेच टॅन्कर खाली आंघोळीला चला, असे सांगितले. हा अनुभव मी लोणंद मध्ये पण घेतला होता. उठलो, थेट टॅन्कर गाठला. टॅन्कर रिकामा करून शंकरराव थोरात नडशीकाना पाणी भरून आणायला जायचे होते. काॅक फुल करून भरपूर पाणी सोडले त्यांनी. मनसोक्त स्नान केले. 12 नंबर दिंडीला थोरात आणि त्याचे सहकारी दिपक जगताप वडगाव, रमेश थोरात कार्वे, रामचंद्र पिसाळ, दिनकर वायदंडे घोणशी, मुकेश खराडे काले यांच्या अविरत प्रयत्नामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. सह्याद्री साखर कारखान्याने टॅकर दिला आहे.
पावणे पाच वाजता आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. रस्त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक गाडी फिरत होती, शौचालयांची जागा सांगत तिकडे जायचे आवाहन सुरू होते. जय भवानी, बारामती चहा वारीत प्रसिद्ध आहे. चहा घेऊन पालखी तळाकडे आलो. तळावर काकडा आरती सुरू झाली होती, तर तिथेच एका बाजूला खुल्या जागेत अनेक जण झोपले होते. तेथून पुढे जाऊन माऊली पालखी दर्शन घेतले. गर्दी कमी असल्याने निवांत दर्शन झाहले. परत तंबूत परतलो आणि पुन्हा झोपलो. सात वाजता उठवले कोणीतरी, फ्रेश झालो, उरलेले विधी आटोपले .
बंडा तात्या त्या झाडाच्या जवळपास पुजा करत बसले होते. नमस्कार केला, त्यानी विचारपूस केली. दहा मिनिटांनी बसू असे सांगितले. परत एकदा गेलो, तात्या सोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. रिंगण आणि उडीचे खेळ यावर माहिती दिली. वारीमध्ये बदल होत आहेत, शासन स्तरावर चांगले काम केले आहे यावर्षी, असे सांगून आणखी सुधारणा होणेसाठी तुम्ही लिखाण करा, पुढच्यावर्षी वारी सुरू होण्याआधी मला आठवण करा, असेहीते म्हणाले. करवडी गावात तात्याच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात जलसंधारण काम झाले, त्याचा परिणाम छान झाला, याची माहिती दिली तेव्हा त्यानी करवडीत आणखी एक करायचे आहे, गोशाळेत बैठकीला हजर रहाव असे सांगून आम्हाला कसलेच श्रेय नको, पण गावागावांत कामे पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आज मठाधिपती वैकुंठवासी भगवान मामा कराडकर यांची 7 वी पुण्यतिथी. त्या निमित्ताने भजन कार्यक्रम आयोजित केला होता. अनेकांनी मामाच्या आठवणीना उजाळा दिला. पाडुरंग पवार कराड आणि बाळासाहेब देसाई वाठारयांचेवतीने पुरी कुर्मा गुलाबजाम, जिलेबी, भात जेवण होते . दहा वाजता पंगती पडल्या. तंबू पॅक अप अगोदरच झाले होते. आकरा वाजता आम्ही निघालो वाखरी दिशेने.
आज कडक ऊन पडले होते. पंढरी जवळ आली आहे, त्यामुळे विठ्ठल दर्शन ध्यास घेतलेले वारकरी भर ऊन्हात चालत होते. वारे जोरात वाहत होते. रस्ता तापला होता, वरून ऊन्हाची धग, तरीही पायात काही न घालता चालणारे वारकरी मी पाहिले. एक तास गेला, बाजीराव विहीरीच्या अलिकडे एक नवीन बांधलेले घर दिसले, रंग दिला नव्हता, आत गेलो. टॅब चार्ज करायला लावला, कागद टाकला आणि दिड पर्यंत आराम केला. पुन्हा चालू लागलो. बाजीराव विहिरी जवळ रिंगण पहायला खुप गर्दी होती. या ठिकाणी संत तुकाराम महाराज, सोपान काका, वटेश्वर आदी अनेक पालखी सोहळ्याचे वारकरी एकत्र आले होते. बघेल तिकडे वारकरी, पताका आणि टाळाचा आवाज. येथून वाहतुक दुसर्या मार्गाने वळवली होती. अनेक पालखीचे दर्शन घेतले, चालत पुढे आलो. तीन वाजता वाखरीत पोहचलो.
पंढरपूरचे प्रवेशद्वार म्हणुन वाखरी ओळखलेजाते. शासन व पंढरपूर नगरपालिकेने येथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी जवळ जवळ मुक्कामी असतात . दोन्ही मोठ्या सोहळ्याचे वारकरी साडेतीन चार लाख लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. येथे उघड्यावर शौचाला बसायला पुर्ण बंदी आहे. अनेक युनिट तसेच पाणी नळ आहेत.
सायंकाळी तंबूसमोर सर्वासोबत फोटो सेशन केले, आराम केला. डाॅक्टर जोशी सोबत वारीतील चांगल्या वाईट गोष्टीवर चर्चा केली. परत जीप मध्ये जाऊन बातमी व वारी लिहीत बसलो साडे आठ वाजेपर्यंत.
दुपारी एक वाजता नेट बंद पडले आहे. सुरू झाले की लगेच तयार आहे तुम्हाला माझी वारी पाठवायला. माऊली
एकंदरीत आजचा दिवस छान गेला.
- सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली







