फॉलोअर

१४ ऑक्टोबर २०२२

सावर मला...


एकदा ती म्हणाली,
ऐ वेड्या,
बस की आता, 
आवरू दे मला !

मग मी सहज बोललो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

न्हाहून प्रेमरसात नीव,
तुझ्यात गुंतलाय जीव 
बेफाम भावनेचा गुंत्ता , 
तो अगोदर सोडवं , 
मग तुझं आवरं !

न झालेल्या भेटीची उत्कंठा , 
साक्षात भेटीपेक्षा झालीय उत्कंठ,
प्रेमरसात डुबलेल्या 
माझ्या मनाला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

वार्‍याहून वेगवान विजेहून जलद, 
तुझ्यापर्यंत पोहचणाऱ्या 
माझ्या प्रेमलहरीला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

कवेत तुझ्या विरघळून जाण्याची , 
ओढ अजुनच वाढलीय मिलनाची, 
ओढीने त्या व्याकुळ 
या जीवाला अगोदर सावरं,
मग तुझं आवरं !

भावनिक गुंफण अन् कोमलता  
नात्यात बहरली आहे आता मणभर, 
हळव्या मनाला 
तु अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

तुझे भास होताना, 
घड्याळाचे काटेही थांबतात क्षणभर , 
मग मात्र मीही होतो स्वैरभर,
अगं वेडे 
म्हणून तर म्हणतो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

 *सतिताभ* 
२७.०४.२०२२

१३ सप्टेंबर २०२२

आठवण येते का माझी ?



आठवण माझी येते का माझी माझ्याकडे काम नसतानाही?

आठवण माझी येते का माझी काहीतरी वेगळं खाताना ?

आठवण माझी येते का माझी काहीतरी नवीन वाचताना?

आठवण माझी येते का माझी थंड झुळूक आल्यावर ?

आठवण येते का माझी अवकाशात काळे नभ आल्यावर?

आठवण येते का माझी रिमझिम पाऊस पडून गेल्यावर?

आठवण येते का माझी काही तरी भास झाल्यावर ?

आठवण येते का माझी दूर कुठेतरी ते गाणं ऐकल्यावर ?

०८ सप्टेंबर २०२२

पाट्या नसलेला वेगळा बावर्ची ! लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी !


पाट्या नसलेला वेगळा बावर्ची !
लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी  !

खरंतर शालेय जीवनापासून मी अमिताभ बच्चन यांचा डाईंग फॅन आहे. मात्र त्या काळात मिथुन चक्रवती, धर्मेंद्र, जितेंद्र आणि राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट मी पाहिलेले आहेत. राजेश खन्ना हा हिंदी चित्रपट सृष्टीतला पहिला सुपरस्टार. राजेश खन्नाने सलग रोप्य महोत्सवी चित्रपट दिलेले आहेत. त्यांच्या नंतर त्यांची जागा अमिताभ बच्चन यांनी घेतली.

राजेश खन्ना यांचे दो रस्ते, दाग, आप कि कसम,सौतन, अवतार, अमृत, रोटी हे चित्रपट मी अनेकदा पाहिले आहेत. ते मला खूप आवडतात. विटा (सांगली) येथील भैरवनाथ थेटर मध्ये फळीवर बसून पाहिलेला दो रस्ते मला चांगला आठवतो. या या चित्रपटातील 'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गई' हे गाणे मला खूप आवडते. कराडच्या प्रभात मध्ये सौतन हा चित्रपट पाहिलेला अजूनही डोळ्यासमोर आहे. आपकी कसम हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान' हे गाणं मला खूप आवडते. या चित्रपटात राजेश खन्नाच्या मुलीचे नाव एकता आहे, हे नाव मला त्यावेळी खूप आवडलं होतं. अवतार मधील 'दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगो का गम देखा तो, मैं अपना गम भूल गया' हे गाणे आणि राजेश खन्ना यांचा दमदार अभिनय मला खूप आवडला आहे. कदाचित डिस्को डान्सर या चित्रपटातील 'गोरो की ना कालोंकी, दुनिया है दिलवालोकी' हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी आनंद या चित्रपटात एकत्र काम केले तर पूर्वी त्यांनी नमक हराम या चित्रपटातही काम केले होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे ऑल टाइम आवडते कलाकार. राजेश खन्ना यांचा  ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बावर्ची हा चित्रपट मी पाहिलेला नव्हता. बुधवारी रात्री युट्युबवर लावून टिव्ही वर हा पूर्ण चित्रपट पाहिला. या चित्रपटात सुद्धा अमिताभ बच्चन आहेत हे मला आज पहिल्यांदाच कळलं. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा अभिनय कुठेही नाही किंवा त्यांच्यावर कुठेही चित्रिकरण नाही. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे.

चित्रपटाच्या नावाच्या पाट्या (टाईटल) आपण नेहमीच पाहतो. मात्र बावर्ची या चित्रपटाला हा अपवाद आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला नावाच्या पाट्या दाखवलेल्या नाहीत तर पिक्चरचे निर्माते,दिग्दर्शक, संकलक, संगीतकार,गायक या सर्वांची नावे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात ऐकवली आहेत. त्याला हिंदीमध्ये कथा वाचक असे म्हणतात. (हा प्रयोग नाटकात राबवला जातो) अशा प्रकारे चित्रपटाची सुरुवात मी पहिल्यांदाच पाहिली. 

'बावर्ची' हा चित्रपट मला खूप आवडला. हा चित्रपट पाहताना अधून मधून आनंद पिक्चरची आठवण येत होती. स्वतःसाठी स्वतःचे काम कोणीही करतात पण दुसऱ्यासाठी काम केलं तर त्यात खरा आनंद असतो. आनंद वाटत राहा, छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतो. मात्र तो लुटायचा सोडून मनुष्य मोठ्या आनंदाच्या मागे लागतो. त्याऐवजी छोटा छोटा आनंद घेतला पाहिजे. छोटा छोटा आनंद दिवसभरात अनेक वेळा मिळतो, लुटता येतो. तो घेता आला पाहिजे. मोठा आनंद वर्षातून चार-पाच वेळा मिळतो मात्र तेवढ्यासाठी आपण छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो,  असा संदेश ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाद्वारे दिला आहे. (७ जुलै १९७२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता त्यानंतर चार महिन्याने माझा जन्म झाला आहे)

ऋषिकेश मुखर्जी यांची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली याही चित्रपटात मला पाहायला मिळाली. चित्रपट कुठेही बोअर झालेला नाही किंवा या चित्रपटात घेतलेले कलाकार चुकीचे आहेत असं कुठेही वाटलं नाही. सहज फुलत जाणारं कथानक, राजेश खन्ना यांचा सहज अभिनय आणि शेवटपर्यंत उत्सुकता ताणलेला क्लायमॅक्स हे ही या चित्रपटाचे यश आहे. हा चित्रपट मला खुप आवडला, तुम्ही पाहिला असेल तर छानच. नसला पहिला तर अवश्य पहा.

जाता जाता.. या चित्रपटात जया भादुरी आहे. या चित्रपटात राजेश खन्नाला कोणतीही हीरोइन नाही. (आनंद प्रमाणे याही चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्नाला हीरोइन नाही) जया भादुरीने राजेश खन्नाच्या मानलेल्या बहिणीची भूमिका केली आहे. खूप सुंदर,अल्लड जया या चित्रपटात मला पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
    ०८.०९.२०२२
    वेळ रात्री साडे बारा.

२६ ऑगस्ट २०२२

Amitabh Bachchan 6 th meeting

*

कराड सातारचे आम्ही ५८ बच्चनप्रेमी आज केबीसीत दिसणार* .

कराड येथील आम्ही ५८ बच्चन प्रेमी सोनी टीव्हीवर "कौन बनेगा करोडपती"च्या आजच्या शुक्रवारच्या शोमध्ये दिसणार आहोत. कराडच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप वतीने ही संधी आम्हाला साधून आली.

आजचा शो अतिशय महत्त्वाचा आहे. या शोसाठी या वर्षी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची आतापर्यंतची पाचवी बॅच १७ आॅगस्ट २०२२ रोजी मुंबईला गेली होती.  गेल्या तीन वर्षात २०० जणांना *अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने* अमिताभ बच्चन यांचे केबीसी दर्शन घडवले आहे. 

आम्ही सर्वजण १७ तारखेला सकाळी १२ वाजता सेटवर पोहोचलो. भेटीची एक्साइटमेंट फार मोठी होती. आत गेल्यानंतरचे सेटवरचे विद्युलोशित  वातावरण पाहून आम्हाला खूप आनंद झाला. साडे तीन ते सात असे साडे तीन तास आमच्या समोर साक्षात अभिनयाचे देव अमिताभ बच्चन साहेब होते. 'ना तु रुकेगा कभी' या ओळी अमिताभ बच्चन यांना तंतोतंत लागू पडतात. चार तासांमध्ये ते कुठेही थकलेले पाहायला मिळाले नाहीत. उलट सेटवर येताना आणि जाताना त्यांच्यामध्ये फार मोठा जोश आम्हाला पाहायला मिळाला. 

शो दरम्यान १५० दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल ५८ जण कराड सातारचे होते. आम्ही खूप दंगामस्ती केली. अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. पुन्हा एकदा त्यांना कराडला येण्याचे निमंत्रण दिले. 

अमिताभ यांनी अनेकदा माझ्यासहीत अनेकांकडे पाहून केलेला नमस्कार अविस्मरणीय क्षण होता. हा आनंदाचा क्षण आज आपण केबीसीत या भागांमध्ये पाहणार आहोत. 

केबीसीची शूटिंग झाल्यानंतर आम्ही अमिताभ बच्चन यांच्या सोबत अनेक फोटो काढले. हे फोटो आम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहेत. मात्र आज तुम्ही आम्हाला केबीसीमध्ये अमिताभ बच्चन पाठीमागे पुढे कुठे तरी दिसणार आहोत.तर मग आपण आजचा केबीसी भाग नक्की पहा. आम्ही दिसलो की टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. टिव्हीचा फोटो काढून आम्हाला पाठवा.

 *सतीश वसंतराव मोरे.* 
सतिताभ

२६ ऑगस्ट २०२२

#kbc
#kaunbanegacrorepati
#amitabhbachchanpremikarad
#abpk
#sonytv
#kbc14

११ जुलै २०२२

पंढरीची वारी 10 जुलै

🚩 *माझी पंढरीची वारी* 🚩
   पंढरपूर,१० जुलै २०२२
 *_सतीश मोरे _* 

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दीनु गोड व्हावा !

आज आषाढी एकादशी. पांडुरंगाला भेटण्यासाठी राज्यभरातून सुमारे दहा लाख भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. पांडुरंगाच्या कृपेने आमची वारी सफल झाली. काल रात्री पांडुरंगाचे दर्शन झाले होते. 'याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिनू गोड व्हावा' अशी मनाची स्थिती झाली होती. पावसाने थोडीशी आमच्यावर कृपा केली, त्यामुळे गर्दी थोडीफार कमी होती, त्याचा फायदा आम्हाला झाला आणि विठ्ठलाचे दर्शन लवकर झाले. पंढरीची वारी मी या अगोदर सहा वेळा केली आहे. यापैकी यापूर्वी मला फक्त एकदा पांडुरंगाचे दर्शन झाले आहे. यावेळी सातव्या वारीच्या दरम्यान पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाचे दर्शन झाले, हे मी माझे भाग्य समजतो.


आज आषाढी एकादशी, वारकऱ्याला एकादशी उपवास करावीच लागतो. जो एकादशी करतो, जो रोज हरिपाठ करतो, जो आषाढी, कार्तिकी माघु आणि चैत्री या चारी वाऱ्या करतो त्याला खरा वारकरी म्हणतात. आम्हाला फक्त एकच वारी करता येते. मात्र हेही नसे थोडके. आषाढी एकादशी असल्यामुळे आज पंढरीत जिकडे तिकडे माऊलीमय वातावरण होते. विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास मधून तयार होऊन बाहेर पडलो, चेकआउट केले आणि थेट आम्ही आमच्या मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या मठापर्यंत जाईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांचा महापूर वाहत होता. आमच्याकडे चार चाकी वाहनाचा पास असल्यामुळे आम्हाला जाणे शक्य झाले अन्यथा वाहनांना परवानगीच नव्हती. सुदैवाने आज सकाळी पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. वातावरण पावसाळी होते मात्र पाऊस पूर्ण थांबला होता. मारुती बुवा मठात गेल्यानंतर अनेक वारकरी भेटले, सर्वांना वारकरी नमस्कार केला. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत नगरप्रदक्षिणासाठी आमची बारा नंबर दिंडी पुढे गेलेली होती, त्यामुळे आम्ही तात्काळ या दिंडीच्या पाठोपाठ जायचा निर्णय घेतला. एकादशी दिवशी नगरप्रलचना झाल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही. मारुती बुवा कराडकर मठ झेंडे गल्लीत आहे इथून पुढे चौकात पंढरपूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्यालय आहे. तेथून आम्ही नगरप्रदक्षिणा सुरुवात केली. पंढरीच्या वारीला येणारा वारकरी एकादशी दिवशी संपूर्ण पंढरी नगरीला प्रदर्शना घालतो, चंद्रभागेला जाऊन नमस्कार करतो, तत्पूर्वी चंद्रभागेत स्नान करतो. 

आम्ही प्रदक्षिणा सुरू केली, एक एक रस्ता, चौक, गल्ली करत पुढे जात राहिलो. पुढे आल्यानंतर चंद्रभागा काठावर आलो. चंद्रभागा काठावर वारकऱ्यांचा आणि वैष्णवांचा मेळावा भरलेला होता. जिकडे पाहील तिकडे फक्त वारकरी दिसत होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीमध्ये जाऊन स्नान करणे पसंत केले. चंद्रभागा नदीवरील पुलापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील घाटापर्यंत सगळीकडे फक्त वारकरीच दिसत होते. चंद्रभागा नदीमध्ये अनेक बोटी मधून वारकरी पलीकडच्या बाजूला जात होते. इस्कॉनने चंद्रभागाच्या पलीकडच्या बाजूला मोठा घाट आणि मठ बांधलेला आहे. हा घाट अतिशय सुंदर दिसत होता. आम्ही चंद्रभागेमध्ये जाऊन पाणी डोक्यावर घेऊन नदीला नमस्कार केला. यावर्षी चंद्रभागा नदीचे पाणी अतिशय स्वच्छ होते, याचे कारण दोन दिवसापासून पडणारा पाऊस. चंद्रभागाला नमस्कार करून पुन्हा आम्ही नगरप्रदक्षिणा सुरू केली. अनेक दिंड्या या ठिकाणी आम्हाला भेटल्या. पंढरीच्या वारीला आलेल्या सर्व सोहळ्यातील दिंड्या नगरप्रदक्षणा घालतात. छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या मला या ठिकाणी भेटल्या. या दिंड्यातील वारकरी चंद्रभागा काठी भजन करत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद भरून वाहत होता. सर्वांची वारी पूर्ण झाली होती. आज एकादशी होती यापैकी काहीजणांचं पांडुरंगाचे दर्शन झाले होते तर काहीजणांनी फक्त कळसाचे दर्शन घेतले होते. तरीही या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. सर्वांचं स्वप्न साकार झाले होते.

या दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली पालखी या ठिकाणी दाखल झाली. नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी माऊलींची पालखी प्रमुख दिंड्यासोबत या ठिकाणी आली होती. या पालखी समोरील दोन्ही अश्वाना नमस्कार केला, फोटो काढले. आमचे खरंच नशीब चांगले होते.  मी माऊली सोबत चाललो, माऊलींचे दर्शन आम्हाला पुन्हा एकदा चंद्रभागा काठी झाले होते. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे चालायला लागलो. चंद्रभागा  घाट आला, नदी काठावरील जुन्या धर्मशाळा, मठ, होळकर, शिंदे , छत्रपतींच्या काळातील बांधकामे पंढरपूरचे महात्म्य साक्ष देत होती.  

चंद्रभागा घाटातून आम्ही वरती आलो. या ठिकाणी दर्शनाची भली मोठी लाईन होती.पांडुरंगाच्या दर्शनासाठी 14 ते 18 तास लाईन होती तर मुखदर्शनासाठी सहा ते सात तास लाईन होती. या लाईन मधील सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली होती. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर काय आनंद होतो याची अनुभूती आम्ही कालच घेतलेली होती. 14 ते 18 तास लाईन मध्ये उभं राहण्याची ताकद या वारकऱ्यांना पांडुरंग देतो. एवढा वेळ लाईन मध्ये उभा राहून शेवटी पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर सारा कंटाळा निघून जातो. या लाईन मध्ये कोणी घुसू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तिथून पुढे आम्ही गोपाळपूर येथे आलो. रस्त्यावर सर्व बाजूला भाविक उभे होते तर अनेक दिंड्या संपूर्ण रस्त्यावरून पांडुरंगा माऊलीच्या नावाचा जयघोष करत होत्या.आम्ही प्रत्येक दिंडीचे दर्शन घेऊन शेवटी चौकातील श्रीकृष्ण मंदिरात आलो. येथून विठ्ठल मंदिराला नमस्कार केला, पुन्हा एकदा शिखराचे दर्शन घेतले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौकात येऊन शेवट झेंडे चौकात नगरप्रदक्षिणा मी सांगता केली. 

त्यानंतर मारुतीबुवा कराडकर मठाकडे जाताना संपतराव चव्हाण कुंभारगावकर वकील यांच्या निवासस्थानी थांबलो. त्यांच्या घराचे नाव त्यांच्या वारकरी संप्रदायात मानाने घेतले जाते. पूर्वसंचित असे नाव असणाऱ्या वकीलांच्या घरामध्ये अनेक वारकरी उतरले होते. एडवोकेट संपतराव चव्हाण यांच्याकडून अतिशय महत्त्वाची माहिती घेतली, याबाबत मी लवकरच वेगळे लिखाण करणार आहे. त्यांच्या घरी फराळ करून पुन्हा आम्ही मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची भेट घेतली, सर्वाना नमस्कार केला. मठातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अनेक वारकऱ्यांना पुढच्या वर्षी भेटू असे सांगून निरोप घेतला. त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. बारा वाजता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून कराड कडे निघालो. येताना म्हसवड गोंदवले या तीर्थक्षेत्राला भेट झाली.सहा वाजता कराडला पोहचलो.

कराडकडे येताना पंढरीची वारी पूर्ण झाल्याचा आनंद तर होताच मात्र आमच्या सारे लक्ष, ध्यान पंढरपुरात होतं. गेल्या तीन दोन दिवसात पंढरपुरातील गर्दी, पाऊस, या पावसामध्ये चिंब होऊन नाचलेले वारकरी, माऊली पालखी सोहळा, मंदीरासमोरील गर्दी, विद्युत रोषणाई डोळ्यासमोर येत होती. गेल्या 21 दिवसात पंढरीची वारी करताना भेटलेले अनेक माऊली, छोट्या मोठ्या मदतीला धावून आलेले अनेक लोक, ऊन वारा पावसात चालणारे वारकरी, वारकऱ्यांच्या पडलेल्या पंगती, दिवेघाटात झालेला पाऊस, सासवड मध्ये झालेला पाहुणचार, वाल्याच्या डोंगरावरून पाहिलेला वारकऱ्यांचा मेळावा या गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या. आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही पंढरी वारीत सहभागी होत आहे. पंढरीची वारी नशिबवान लोकांच्या नशीबातच असते, असे म्हणतात. पंढरीची वारी पुन्हा पुन्हा करण्याचे भाग्य आम्हाला मिळो, अशी माऊली चरणी प्रार्थना!

धन्य झालो हो संसारी । आम्ही देखीली पंढरी ।                                     चंद्रभागे करुनी स्नान । घेतले पुंडलीकाचे दर्शन ।                                          केली क्षेत्र प्रदक्षिणा। भेटलो संत ,सज्जना ।                                      उभे राहुनि गरूडपारी । डोळे भरुनी पाहीला पांडुरंग । 



राम कृष्ण हरी..

 *_सतीश मोरे सतीताभ_*
  ९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...