फॉलोअर

११ जानेवारी २०१८

मराठी माणसाचा दावणगिरी डोसा

दावणगिरी A1 डोसा : कराडचे टेस्ट पाॅईंट

साउथ इंडियन उडपी मॅनेजमेंट चा बाऊ करत गेली अनेक वर्षे आपण ठराविक हाॅटेलमध्येच चांगले खायला मिळते असे म्हणत आलो आहे. कराड, सातारा येथे काही साऊथ इंडियन हाॅटेलमध्ये खायला मिळणाऱ्या डिशेस आता खाऊन खाऊन कंटाळा आला आहे.

हे सांगताना आता नवीन काय पर्याय आहे का असा प्रश्न पडला असेल ना? हो आहे.  गेली सात वर्षे कन्या शाळेच्या शेजारी A1 दावणगिरी डोसा नावाचे एक रेस्टॉरंट कम गाडा सुरू आहे.  मी अनेकवेळा तिथे डोसा खाल्ला आहे.  अतिशय सुंदर आणि टेस्टी असा दावणगिरी लोणी खाऊन मन तर तृप्त होतेच पण जाताना हा डोसा कसा करता हे विचारण्याची इच्छा होते .

आता प्रश्न पडला असेल मी हे का सांगतोय?  मी का त्यांची जाहिरात करतोय?  त्याचा माझा संबंध काय? होय संबंध आहे.  कारण नावाप्रमाणेच A1 डोसा करणारा एक मराठी माणूस आहे. पटणार नाही पण हे खरं आहे. मराठी माणसाला बळ देण्यासाठी मी ही पोस्ट मुद्दाम इथे टाकत आहे,  होय मराठी माणूस हेही करू शकतो हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट टाकली आहे.  मराठी माणसाला असला धंदा जमणार नाही,  हे करू जाणे उडपी लोकांनीच असे म्हणणारांना ही चपराक आहे. 

या युवकाचे नाव आहे सुरेश केशव जगताप. यांचे गाव आहे कराड तालुक्यातील कोडोली.  आठ वर्षांपुर्वी सुरेशच्या कोल्हापूर येथील नातेवाईकानी त्याला हा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.  या नातेवाईकाची रंकाळा तलाव जवळपास मोठ्ठी पिठाची गिरण आहे , या गिरणीत  अनेक  उडपी लोक लोणी डोसा पीठ दळायला येत. या लोकांच्या संपर्कातून सुरेशला त्यांनी दावणगिरी येथील  कुक गाठून दिला, कराडात गाडा सुरू झाला. पण हा कुक फक्त 25 दिवसच टिकला, काम सोडून पळून गेला. सुरेशने मग स्वतः हा व्यवसाय पुढे न्यायचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.

हळूहळू धंद्याचे बस्तान बसले, दावणगिरी डोसा म्हणजे काय या उस्तुकतेपोटी आलेले लोक  ही टेस्ट चाखून पुन्हा पुन्हा येऊ लागले. आज कन्या शाळेजवळचा दावणगिरी डोसा कराडकरांसाठी टेस्ट पाॅईंट झाला आहे.  आपण या मराठी युवकाला बळ द्यायला हवे , एकदा तरी टेस्ट घेऊन.

सतीश मोरे @ karawadikarad.blogspot.com

सिक्किम राज्यपाल पत्रकार दिनानिमित्त

पत्रकारितेला फार मोठी परंपरा
पत्रकारांनी काळानुरुप बदलण्याची आवश्यकता
   - सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी  :- पत्रकारितेला फार मोठी परंपरा आणि इतिहास लाभला आहे. दिवसेंदिवस पत्रकारितेत बदल, सुधारणा आणि परिवर्तन होत असून पत्रकारांनी बदलत्या परिस्थितीला सामोरे जात काळानुरुप बदलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने मराठी पत्रकार दिन पुरस्कार वितरण सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहात संपन्न झाला, त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडीक, महापौर स्वाती यवलुजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमीका महाडीक आदि मान्यवर उपस्थित होते. आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करुन दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरु करुन मराठी पत्रकारितेची खरी सुरुवात  केली. त्यानंतर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शि.म. परांजपे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर विभुतींनी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधन आणि समाजजागृती केली. आज पत्रकारितेत काळानुरुप फार मोठे बदल आणि सुधारणा होत आहे. वृत्तपत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि सोशल मिडिया अशा गतीमान बदलांना वृत्तपत्रकारांनी सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी काळानुरुप बदलण्याची गरज असून त्यानुसार पत्रकारिता क्षेत्रात होत असलेले  बदलही समाधानकारक असल्याचेही सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी कोल्हापूर पत्रकारितेचाही मुक्त कंठाने गौरव केला.
सामाजिक परिवर्तनाचे फार मोठे सामर्थ पत्रकारितेत असून पत्रकारिता हा समाजाचा आरसा असल्याचे सांगून सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले की, सामान्य माणसांची सुख-दु:खे बातमीव्दारे समाजासमोर मांडून सामान्याला पत्रकार आपलासा वाटावा, अशी पत्रकारिता करण्यातही पत्रकारांचे योगदान आहे, पत्रकारांनी सदैव निर्भिडता जोपासून वस्तुनिष्ठ बातम्याव्दारे समाजाची विश्वासार्हता जोपासणे महत्वाचे आहे. यावेळी त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काळानुरुप होत असलेल्या बदल आणि परिवर्तनावर सविस्तर विवेचन केले. फार मोठी परंपरा आणि इतिहास असलेली पत्रकारिता यापुढेही दर्जेदारपणे वाढावी, बहरावी, यासाठी प्रत्येकाने आपले सकारात्मक योगदान देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
समारंभाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पत्रकारितेला फार मोठा वसा आणि वारसा लाभला आहे. पत्रकारांवर मोठी सामाजिक जबाबदारी असून समाजात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. समाज जागृतीव्दारे पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा देण्यातही सक्रीय व्हावे, आचार्य बाळ शास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेल्या पत्रकारितेतील अनेक मान्यवर संपादकाच्या योगदानाचाही त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला.
खासदार धनंजय महाडिक याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक समतोल राखण्याचे महत्वपूर्ण काम होत असून आजच्या स्पर्धेच्या युगातही पत्रकारांकडून वस्तुनिष्ठ  चित्रण समाजासमोर आणलं जात आहे,ही समाधानाची बाब आहे. पत्रकार हा समाजजीवनाचा एक महत्वाचा घटक असल्याचेही ते म्हणाले.
महापौर स्वाती यवलुजे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या, वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागृतीचं आणि समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगातही माहिती, ज्ञान आणि प्रबोधनाचे महान काम वृत्तपत्रकारितेव्दारे होत आहे. कोल्हापूर प्रेस क्लबचे कार्य समाजहिताचे असून कोलहापूरच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे.
प्रारंभी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले. याप्रसंगी समीर देशपांडे (लोकमत), राहुल गायकवाड (टाईम्स ऑफ इंडिया), प्रताप नाईक (झी 24 तास), प्रमोद सौंदाळे (न्यूज 18 लोकमत) आणि अमरदिप पाटील (ॲड फाईन) यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील‍ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
समारंभास पोलीस अधिक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे संपादक,पत्रकार, प्रेसक्लबचे पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

१० जानेवारी २०१८

तु बोलणंच सोडलं?



मी तुझ्यावर प्रेम करतो
हे काय मी गैर केलं?
असं काय झालं गं सखे ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !


माझे सारं काही तुझ्यासाठी
तु म्हणशील तसं नात्यासाठी
आपल्या पवित्र नात्यात
काय नेमकं वेगळं घडलं ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !


का कळत नाही तुला
माझंही एक मन आहे
जे तुझीच वाट पाहत आहे
माझं नेमकं काय चुकलं ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !

०७ जानेवारी २०१८

का

तुझं माझं नाते हलकं फुलकं
यात नाही आपलं तुपलं !
देणे नाही घेणेही नाही
फक्त सामाऊन आनंद लुटणं !

तु डिसेंबर, मी जानेवारी !
नातं आपलं जवळचं ,
पण वियोग वर्षभराचा !

१४ डिसेंबर २०१७

प्रीतिसंगमावरून .. पुन्हा एकदा आम्ही तिघेच

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते आणि विलासराव पाटील-उंडाळकर या दोन दिग्गजांनी सलग 62 वर्षे केले. 2014 साली  विलासराव पाटील - उंडाळकर यांची सलग या मतदारसंघातून निवडून येण्याची परंपरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंडित केली. तिघा दिग्गज नेतृत्चांचा कराड दक्षिण मतदारसंघ आणि एकाच नेत्याला सलग कौल देण्याची मतदारांची मानसिकता यामुळे हा मतदारसंघ निवडणूक विश्‍लेषणासाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. सलग 19 तास एकाच विषयावर विधीमंडळात चर्चा करणारे स्व. यशवंतराव मोहिते, 50 वर्षे जनमाणसांवर गारुड करणारे विलासराव पाटील-उंडाळकर आणि पारदर्शक कारभारामुळे राज्यभर लोकप्रिय झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण आज दक्ष आहे. 
2014 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर निवडणुका लढविण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतल्यानंतर विलासराव उंडाळकर यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. उंडाळकरांनी बंडखोरी करत अपक्ष तर डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे असणारे वलय,  सुमारे 1200 कोटी रुपयांचा निधी या जोरावर सुमारे 16 हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण निवडून आले. मात्र, अतुल भोसले आणि विलासराव उंडाळकर यांना मिळालेली मते फार मोठी होती. ग्रामीण भागाबरोबरच कराड शहर व मलकापूरने दिलेल्या विक्रमी मतांमुळे पृथ्वीराज बाबा विजयी होऊ शकले. 


2014 साली पृथ्वीराज चव्हाण, विलासराव उंडाळकर आणि अतुल भोसले यांच्या पाठिशी असणारे मतदार संघातील दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील नेते तसेच कराड शहरातील कमी-जास्त प्रमाणात असणारी ताकद यामध्ये गेल्या तीन वर्षांत नोंदणीय असा बदल झाला आहे. दक्षिणमधून पुन्हा एकदा हे तिघेच उभे राहतील अशीच शक्यता आहे.  किंबहुना या मुद्याचाच विचार करून दक्षिणमधील  गणिते मांडणे योग्य ठरेल. 

विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदारसंघातील वैयक्तिक वलय आजही कायम आहे. त्यांनी शहरासहित दक्षिणमधील बहुतांश गावात दिलेल्या विकासनिधीचा वापर होऊन पूर्ण झालेली कामे आता दिसू लागली आहेत. चव्हाण यांच्याकडे थेट पोहोचण्यासाठी येणार्‍या अडचणी त्यांच्यापर्यंत काही निकटवर्तियांनी पोहचवल्यामुळे गेल्या वर्षभरात बाबांनी कार्यपद्धतीत बदल केला आहे. गावागावांतील कार्यकर्त्यांना वन टू वन भेटण्याबरोबरच काही कार्यकर्त्यांना अधूनमधून फोन  होऊ लागले आहेत.  नेहमीच त्यांच्यासोबत असणार्‍या काही मंडळींना बाजूला ठेऊन गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सणासुदीच्या काळात त्यांनी केलेले संपर्कदौरे त्यांच्या पथ्यावर पडले. या सर्व गोष्टींचा फायदा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींत त्यांना मिळाला. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व मिळवले. 

विलासराव पाटील उंडाळकर यांनी पराभवातून धडा घेत लगेच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने प्रत्येक दिवशी किमान एक गाव संपर्क अभियान सुरुच ठेवले. आमदारकी नसताना सुरूवातीला ‘दुर की सोच’ म्हणून फक्त गरज ओळखून त्यांच्या विरोधात लढलेल्या डॉ. अतुल भोसले गटाला जवळ केले. तालुक्यातील इतर सर्व दिग्गज विरोधात असताना बाजार समिती पृथ्वीराज चव्हाण आणि आ. बाळासाहेब पाटील गटाकडून हिसकावून घेतली. त्या बदल्यात भोसले गटाला सहकार्य करून कृष्णा कारखान्यावरही सत्तांतर घडवून आणले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांइतकेच यश मिळवत आ. बाळासाहेब पाटील यांच्याशी सलगी करून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यानंतर राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साधत कार्यकर्त्यांना चार्ज करत नुकताच भव्य असा कार्यक्रम घेतला. दिग्गज काँगे्रस नेत्यांबरोबरच वैचारिक व्यासपीठावरून ‘मी थकलेलो नाही, अजूनही रेसमध्ये आहे’, असा इशारा विरोधकांना दिला. 

डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेतील निसटत्या पराभवानंतर घरातील भांडणे मिटवून घेत मदनराव मोहिते यांच्यासह जुळवून घेतले. कृष्णा कारखाना आणि बाजार समितीच्या निवडणुकीत उंडाळकर गटाची केलेली युती तोडून टाकत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच भवितव्य आजमावण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले, गटही मजबूत झाला.  तत्पूर्वी कराड नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून त्यांच्या विचाराच्या रोहिणी शिंदे निवडून आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवत अतुलबाबांनी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून चार गावांमध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनांसाठी कोट्यावधींचा निधी आणला. केवळ तिकिट मिळाले म्हणून भाजपातून उभे राहिलेले अतुल भोसले भाजपाची कार्यप्रणाली स्विकारतील काय? अशी शंका भाजपासहीत इतर सर्व पक्षातील लोकांना होती. मात्र मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास संपादन करत त्यांना तीन वेळा कराडला आणून मी भाजपमय झालो आहे, असा संदेश देत त्यांनी दक्षिणमध्ये भाजपाचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न केला. या निष्ठेचे फळ म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान कमिटीचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. कृष्णा साखर कारखाना तसेच जयवंत शुगर्समध्ये शेतकर्‍यांशी संपर्क ठेवण्याबरोबरच विक्रमी ऊस दर यामुळे डॉ. भोसले यांनी दक्षिणमध्ये मीच सक्षम आहे, असा दावा केला आहे. 

2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी संभाव्य दिग्गज तीन उमेदवारांची ही झाली जमेची बाजू. मात्र दुसर्‍या बाजूने विचार केला तर  या तिघांनीही स्वत:ला ठराविक प्रतिमेत आणि ठराविक भागापुरते मर्यादित ठेवले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कराड शहर व परिसराशी असतो. विलासराव उंडाळकर काले, ओंड, उंडाळे, कोळे भागातच अधिक सक्रिय असतात. अतुल भोसले यांना कृष्णाकाठ आणि कधीतरी कराड शहर या व्यतिरिक्त दुसरीकडे संपर्क ठेवायला जमत नाही. निवडणुकीपूर्वी काही महिने हे तिन्ही नेते मतदारसंघात खूप सक्रिय असतात. स्वत:चे बालेकिल्ले किंवा  दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांचे नेटवर्क याबाबत तिघांनाही मर्यादा आहेत. उंडाळकरांना शहरात तितक्या दमाचा कार्यकर्ता न मिळाल्यामुळे ते अजूनही चाचपडत आहेत. कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि काँग्रेस पक्ष सक्षम करण्यात आ. पृथ्वीराज चव्हाण  फार मागे आहेत. डॉ. अतुल भोसले यांना  कृष्णा काठावरील नेहमीच्याच जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय नवीन दमदार कार्यकर्ते मिळालेले नाहीत. हे तिन्ही संभाव्य उमेदवार आजच्या घडीला संपूर्ण दक्षिण मतदारसंघात सक्षमपणे यंत्रणा राबवत नाहीत, असे म्हणावे लागेल. निवडणूक काळापर्यंत बर्‍याच गोष्टी घडणार आहेत. पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे सद्य स्थितीत वेगवेगळ्या माध्यमातून हे तिघेही संभाव्य उमेदवार ‘आम्ही आहोतच’ या दिशेने कामाला लागलेले दिसत आहेत. राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, असा कराड दक्षिणचा आजवरचा लहरी राजकीय इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते, कराडचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव हे ही निर्णायक भूमिका बजाऊ शकतात. याशिवाय मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आणि मदनराव मोहिते हे अतुल भोसले यांच्यासाठी हुकूमाचा एक्का ठरू शकतात की नाही याचे उत्तर 2019 लाच मिळणार आहे. 

- सतीश मोरे

 

वाचा : प्रितिसंगमावरुन : दखलनीय काका काँग्रेस







© 2017 पुढारी न्यूज

१२ डिसेंबर २०१७

दखलनीय अदखल काका congress



दखलनीय काका कॉंग्रेस  

विलासराव पाटील उंडाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पुर्ण होत असताना याच काळात 1942 साली ब्रिटीशांविरोधात पुकारलेल्या छोडो भारत आदोंलनाला 75 वर्षे होणे, हा फार मोठा योगायोग आहे. या दोन्ही घटनांचा योग साधत विलासराव पाटील आणि संयोजन समितीने आयोजित  केलेल्या भव्य मेळाव्यामुळे कराड दक्षिणेत काका कॉंग्रेस गटाला पुन्हा उभारी घेण्याची फार मोठी संधी निर्माण झाली आहे. 

2003 मध्ये कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सभेनंतर अशा प्रकारचा भव्य मेळावा कराडात घेऊन उंडाळकर काकांनी मी कॉंग्रेसमध्येच असून 89 व्या वर्षीही मी रेसमध्ये  आहे, असा निरोप पक्षश्रेष्ठी आणि विरोधकांना दिला आहे.  सलग 35 वर्षे कराड दक्षिण  मतदारसंघात निवडून येणे आणि पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय राहत सत्तेत टिकून राहण्याचा फार मोठा राजकीय पराक्रम उंडाळकर काकांच्या नावावर आहे. काकांची संपूर्ण राजकीय कारकीर्द चढती राहिली आहे. रयतेला म्हणजेच सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषद सदस्य झाले, पुढे लोकसभेला उभे राहिले, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले,  पुढे आमदार झाले,  जिल्हा बंँकेचे संचालक, उपाध्यक्ष झाले, पुन्हा आमदार झाले, पुढे मंत्री झाले परंतु काही झाले तरी त्यांनी सर्वसामान्य माणसाची नाळ कधीच सोडली नाही, ते कायम रयतेतच राहिले. प्रत्येक वेळी तिकिट मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. तरी त्यांचे जनमाणसातील स्थान पक्षाला माहित असल्याने पक्ष त्यांना डावलू शकला नाही.   


2014 साली मात्र परिस्थिती वेगळी होती. राज्याची सूत्रे उंडाळकर यांचे परंपरागत राजकीय शत्रू ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका लढवल्या जाणार होत्या. त्यामुळे आठव्या वेळी उंडाळकराना कॉंग्रेस पक्षाचे  तिकिट मिळाले नाही. दोन प्रमुख पक्षांची ऑफर काकांना होती, प्रलोभनेसुद्धा दाखवली गेली. मात्र ती धुडकावून लावत कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्विकारता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. तिरंगी लढतीत उंडाळकरांनी समोरच्या सर्व बाजूंनी सक्षम उमेदवारांना जोरदार लढत दिली. त्यांचा पराभव  झाला. तरीही समोरच्या व्यक्तीच्या विजयापेक्षा उंडाळकरांच्या पराभवाचीच अधिक चर्चा झाली.  2014 साली राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आले. कॉंग्रेस पक्षाचा राज्यात लाजिरवाणा पराभव झाला, पक्षाला नेतृत्वच राहिले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कराड दक्षिणमधील विजयाचा आनंद आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना फार काळ घेता आला नाही. मात्र जनतेतून निवडून मिळालेली आमदारकी, पूर्ण होऊन  दिसायला लागलेली विकासकामे तसेच माजी मुख्यमंत्री म्हणून असणारे वलय यामुळे हा गट सतत चर्चेत राहिला. 


 दुसरीकडे सत्ताधारी भाजपाचे अतुल भोसले यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवत कामे आणली. नंतरच्या काळात त्यांना पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद सुद्धा मिळाले. आ. पृथ्वीराज चव्हाण आणि सत्ताधारी  अतुल भोसले यांच्या तुलनेत 35 वर्षे सलग आमदारकी असलेले विलासराव उंडाळकर बाजूला फेकले गेल्याचे  वातावरण विधानसभा निवडणुकीनंतर काही महिने होते.  सत्ता नाही, आता काका गट संपला अशी चर्चा विरोधक करू लागले होते. खरं तर पराभवानंतर दुसऱ्याच आठवड्यात उंडाळकरांनी वाडी टू वाडी, गाव टू गाव, घर टू घर अभियान पुन्हा सुरू करत झालेल्या चुकांची दुरूस्ती करून पुढची तयारी सुरू केली होती.   त्याचाच परिपाक म्हणजे  कराड बाजार समिती, कृष्णा साखर कारखाना आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उंडाळकर गटाने सत्तांतर घडवत मिळविलेले यश होते. काका गटाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. या सर्व राजकीय घडामोडीची दखल कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा घेऊन काकांच्यावर अन्याय झाला, अशी भावना व्यक्त केली होती.  

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर फुल्ल चार्ज झालेल्या उंडाळकर गटाने 2019 डोळ्यासमोर ठेवून विलासराव पाटील यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.  कसलेही सत्कार,  वाढदिवस,  महोत्सव न करणाऱ्या काकांनी सुरूवातीला याला नकार दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तयारी दर्शवत याला 1942 च्या "चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाची जोड द्यायची अट घातली. जून - जुलैमध्ये तयारी सुरू झाली आणि 10 डिसेंबरला कार्यक्रम पार पडला.  हा कार्यक्रम म्हणजे काकांच्या गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या इतर सर्व कार्यक्रमाचा अर्क होता. 50 वर्षाचा अनुभव पणाला लावून काकांनी हा कार्यक्रम घडवून आणला. 


कोणतीही मोठ्ठी सत्ता नसताना, आर्थिक बाजू सक्षम नसताना 15 ते 17 हजार लोक या कार्यक्रमाला कसे जमले? हे न उमगणारे कोडं आहे. आजकाल सभेला माणसं गोळा करताना सत्ता असलेल्या लोकांना आटापिटा करावा लागतो, कारखाने तसेच आमदारकी असलेल्या नेत्यांना माणसे आणण्यासाठी कामगारांना हाताशी धरावे लागते अशी परिस्थिती आहे.  दुसरीकडे यापैकी काहीच नसताना उंडाळकर काकांच्या कार्यक्रमाला  माणसे जमतात. हाच तर काकांच्या राजकारणाचा, बुद्धिमत्तेचा आणि लोकसंग्रहाच्या अभ्यासाचा विषय आहे. मी थकलेलो नाही, 89 वर्षाचा तरूण आहे, असे सांगत काकांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय विरोधकांना तर आव्हान दिलेच आहे, पण त्याचवेळी कार्यकर्त्यांनी खचून जाऊन नये, नव्या जोमाने कामाला लागावे असा संदेशही देण्यात काका कोठेही मागे राहिलेले नाहीत. त्यांच्या याच जिगरबाज वृत्तीमुळे 2019 ची निवडणूक तुमच्यासाठी सोपी नाही, असा संदेश विरोधकांना देण्यात काका  यशस्वी ठरले आहेत. 

सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलेले आवेशपूर्ण भाषण कार्यकर्त्यांसाठी केवळ प्रेरणादायीच नव्हते, तर ही कराड दक्षिणच्या किंबहुना सातारा जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची नांदीच होती. त्यामुळे आता कराड दक्षिणसह जिल्ह्यात राजकीय गोळाबेरीज करताना काकांना डावलून चालणार नाही, असा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून कॉंग्रेसला, विरोधकांना मिळाला आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका काय असेल? हे आत्ताच कोणी सांगू शकत नसले, तरी आपण मैदानात असणारच आहोत, आपले आव्हान परतवणे सोपे नसून आपण विजयीही होणार आहोत, असाच सूचक संदेश देण्यात काका यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच काकांच्या या सत्कार कार्यक्रमाची नोंद प्रत्येक पक्ष, राजकीय विरोधकांना घ्यावीच लागणार आहे, हे निश्चित. 


2003 साली सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत कराडच्या शिवाजी स्टेडियमवर सुमारे 1 लाख लोक जमवून विलासकाकांनी कराड दक्षिणमधील आपली ताकद दाखविली होती. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री म्हणून सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी यासभेनंतर उंडाळकरांची राजकीय उंची दिल्लीदरबारी वाढली होती. सुशिलकुमार शिंदे सध्या सोनिया गांधी किंबहूना राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनाच या कार्यक्रमाला बोलावून उंडाळकरांनी पुन्हा एकदा दिल्लीकरांना आपले लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले. देशभर मोदी विरोधी लाट निर्माण होत असताना याचा फायदा घेण्यात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासहीत कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते कमी पडत असताना मी कॉंग्रेसचाच आहे हे स्पष्ट करून छोडो भारत आंदोलनाप्रमाणे "छोडो नरेंद्र- देवेंद्र सरकार' असा संदेश पोहोचविण्यात उंडाळकर यशस्वी ठरले आहेत आणि हेच या कार्यक्रमाचे यश म्हणावे लागेल. 

(उद्याच्या अंकात "काय होऊ शकते दक्षिणेत !)

०७ डिसेंबर २०१७

सखी शेजारणी



मी पद्य तु गद्य !
मी सूर तू संगीत !
मी कथा तु कादंबरी !
तु आणि मी जीवन गाणे !


कधी कधी मला वाटतं,
तु आणि मी दोघेच असावं !
आपल्या जगात दुसरं कोणी नसावं !


तु जवळ असावीस,
नजरेत माझ्या विसावीस !
नयनांची भुक तु शमवावीस !


जीला भेटायला, पहायला,
जिच्याशी बोलायला,ऐकायला,
जिची आठवण करायला,
मनातलं सारं काही सांगायला,
मी मला आवर घालू शकत नाही,
अशी तु सखी शेजारणी !


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...