टाळ मृदंगाचा जोश ; त्यात पावसाची संगत
पाऊसात न्हाहून माऊली निघाले पंढरीला
आळंदी
यात्रे अलंकापुरा येती ते आवडी विठ्ठला
पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना
भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या
निळा म्हणे जाणोनि संत । धावत येती प्रतिवर्षी
पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी अवघ्या राज्यातून आलेले संत मंडळी अलंकापुरीमध्ये जमलेले झाले. पंढरीची वारी आळंदीपासून सुरूवात झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात वैष्णवांचा मेळा जमला , निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या जयघोषाने आळंदीनगरी दुमदुमून गेली . तीन च्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली अन्य वारकर्यचा जोश आणखी वाढला. भर पावसात ज्ञानोबा माऊलीचा जल्लोश करत वैष्णवानी ताल धरला . तिकडे मंदीरात माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. आरती ज्ञानदेवा... सौख्यदाता विधाता.. अन् माऊली पंढरीला निघाली. वैष्णवजन पताका, झेंडे नाचवत मंदिरासमोर खेळू लागले. टाळ- मृदुंगाच्या जयघोषात पावसात न्हाहून माऊली पंढरीला निघाले. वैष्णवांच्या मेळ्यामुळे अगोदरच पवित्र असलेली अलंकापूरी अधिकच उजळली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातून वारकरी आलेले आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या सर्व दिंड्या सोमवारीच आळंदीमध्ये येऊन विसावल्या होत्या. ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, एस.टी. बस, रेल्वे अशा मिळेल त्या वाहनाने वारकरी आळंदीत पोहोचले . मंगळवारी पालखी प्रस्थानाचा दिवस असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊली मंदिर आकर्षक रंगरंगोटी, फुले आणि लाईटस् यांनी सजवलेले आहे. पाडुरंगाच्या भेटीला जायला माऊली आसुसलेले आहेत. पंढरीची वारी सुरू करताना पहीले दर्शन झानेश्वर माऊलींचे घेऊन मगच वारी सुरू होते. सकाळपासून मंदीराबाहेर लांब रांगा लागल्या होत्या. दिंड्याचे आगमन होत होते.
पालखी प्रस्थानाची वेळ चार वाजता होती. नित्य परंपराप्रमाणे पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी मंदिरामध्ये धार्मिक विधी होतात. प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंदिराच्या आवारात येण्यास पालखीपुढील 27 आणि पालखी मागच्या 20 अशा 47 दिंड्यांनाच प्रवेश असतो. तीन वाजल्यापासूनच मंदिर परिसर या दिंड्यांच्या लगबगीने फुलून गेला होता. सर्वांत पुढे दिंडी क्रमांकाचा फलक घेतलेला वारकरी त्याच्या मागे चार-चार च्या ओळींत भगव्या पताका घेतलेले झेंडेकरी, त्याच्या मागे तुळस आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला आणि त्याच्या मागे ओळीप्रमाणे टाळकरी. टाळकऱ्यांच्या मध्यभागी पखवाज वादक. टाळकऱ्यांच्या शेवटी विणेकरी आणि त्या मागे महिला वारकरी,असा दिंडीतील वारकऱ्यांचा क्रम असतो.
47 दिंड्यांमधील सहभागी असणारे 3000 हून अधिक वारकरी, टाळकरी एकामागोमाग एक मंदिराच्या आवारात येत होते. माऊली... माऊलीचा जयघोष सुरू होता. पावसाने सुरुवात केली. मात्र पावसात भिजायला घाबरणारे थोडेच होते. हे वारकरी! ज्या पावसाची वारकरी, शेतकरी सारेच जण चातक पक्षाप्रमाणे वाट पहात होते तो पाऊस माऊलीच्या दारात आला. मग सुरू झाला माऊलीचा जयघोष. सारे पावसात न्हाऊन निघाले. वैष्णवांच्या उत्साहाला आता उधाण आले.
मंदिरातील वीणा मंडपात चांदीची पालखी सजविलेली होती. पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा झाल्यानंतर माऊलींच्या पादुका या पालखीत ठेवण्यात आल्या. यादरम्यान हैबतबाबा यांच्यातर्फे पंच व मानकऱ्यांना श्रीफळ प्रसाद देण्यात आला. आरती झाल्यानंतर पुंडलिलक वरदा... हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ! चा जयघोष होऊन पालखी निघाली. विठूरायाला भेटण्यासाठी माऊली पंढरीस निघाली पालखीसमोर अश्व, दिंड्या चौघडा उभ्या होत्या. पालखीसोबत जरीचे एक निशाण, सुंदर अब्दागिरी, जरीचे सुंदर छत्र, चांदीची चवरी असते. हे माऊलींचे वैभव आहे.
पालखीने मंदिरास आतून प्रदक्षिणा घातली. माऊली...माऊली...माऊलीचा जयघोष आणखी वाढला. प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी महाद्वारातून बाहेर पडली.
मंदिरापासून जवळच ज्ञानेश्वर माऊलींचे आजोळघर असलेल्या गांधीवाड्याकडे पालखी निघाली. गांधीवाडा ही आता त्यांच्या मूळ मालकाकडून संस्थानने घेतली आहे. या बदल्यात मूळ मालकांना दुसरी जागा देण्यात आलेली आहे. याठिकाणी पालखी मुक्कामाला असल्यामुळे रात्रभर वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी झाली होती . नगरप्रदक्षिणा करीत पालखी गांधीवाड्यात रात्री पोहोचली. या ठिकाणी आरती होऊन साखरपान-विडा वाटण्यात आला. चोपदारांनी पुढील दिवसाचा कार्यक्रम तयार केला. "आता महाराज उद्या ज्येष्ठ नवमीस पुण्यास जाण्यासाठी सकाळी 6 वाजता निघणार आहेत ...हो!'
आल्याड पल्याड पताकांचे भार ।
मध्यें मनोहर इंद्रायणी ।।
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या ।
नीळवर्ण साऱ्या लखलखीत ।।
जरी जर्तारी झाल्या रानभरी ।
विजा त्यावरी खेळताती ।।
सर्पाकार दंड तारांगणावाणी ।
पताका तिकोणी दाटताती ।।
नामा म्हणे तेथे पताकांचा भार ।
केव्हडे भाग्य थोर ज्ञानोबाचे ।।
संजीवन समाधी ; अन् चेतनामय पाऊस
ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर आळंदीचे प्रवेशद्वार मानले जाते. अमृतानुभव लिहुन झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी काही काळ आळंदी येथील एका गुहेत व्यतीत केला. नंतर याच गुहेत त्यांनी संजीवन समाधी घेतली. शके 1218 मध्ये कार्तीक पक्षाच्या त्रयोदशी दिवशी ज्ञानेश्वरांनी समाधी अवस्थेत प्रवेश केला. माऊली आजही त्या ठिकाणी आहेत, अशी भक्तांची भावना आहे. माऊलीच्या या संजीवन समाधी मंदिरात पहिल्यादा प्रवेश केला रथामागील 11 नंबरच्या दिंडीने अन रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यापाठोपाठ एकामागून एक दिंड्या येऊ लागल्या आणि पावसाचा जोर वाढला. आला पाऊस , वारकरी झाले भावुक अशी स्थिती निर्माण झाली. पावसाने माऊलींच्या दारात सुरूवात केली, आता पुर्ण वारीत पाऊस येणार, चालू वर्षी खुप पाऊस पडणार, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा