फॉलोअर

२९ जून २०१६


माझी वारी

दिनांक 28 जुन
सतीश मोरे
मुक्काम  आळंदी

पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी करायचीच !  पण का करायची ? कशी करायची?    काय  उपयोग त्याचा?  कुठून करायची?  आदी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. माझी आज्जी चंन्दभागा पंढरीची वारी करायची.  आम्ही तिला थोरली आई म्हणायचो. ती वारीतून येताना प्रसाद, खेळणी , करदोडा करायचा काळा गोफ आणायची. वारीचा प्रसादातील चिरमूरे आणि सोबत मिळणारा बत्तासू मला खुप आवडायचा, मी तो शोधून काढत होतो.   वारीची ओढ मला शालेय जीवनात लागली होती.  आमच्या करवडी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात दरवर्षी वारी यायची.  आमच्या गावाला तशी वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. गावात 40  वर्षे पासून ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. आठवी, नववी आणि आकरावी मध्ये  असताना या पारायणास मी बसलो होतो. त्यानंतर कराड शहरात झालेल्या तीन महापारायणास सुद्धा मी सहभागी होतो.
सांगण्याचा उद्देश मला वारी करायची खुप इच्छा होती. वारीची ओढ लागली होती .  सात आठ वर्षे पुर्वी कराडला सोनवणे नावाचे बीडीओ होते. ते एकदा मला फलटण येथे माऊली वारी
दर्शन करायला घेऊन गेले होते.  त्यानंतर  एक दोन वेळा फलटण जाण्याचा योग आला.  पुढे माझे कराड येथील मित्र राहुल खोचीकर त्याच्या आजोळी नातेपुते येथे माऊली सोहळा पहायला घेऊन गेले.  महा वारीचा महापसारा, वारकरी,  शिस्त यांचे मला कुतुहल निर्माण झाले.  पुढे दोन वेळा मी नातेपुते येथे जाऊन आलो.  या दरम्यान मला वारीची ओढ लागली.  आपण पण वारीला एकदा जायचे, वारी काय आहे ते पहायचे, अनुभवायाचे, वारीत कुठेतरी देव  असतो असे म्हणतात , तो देव शोधायचा,  वारकरी लोकांना  एवढा जोश कोठून येतो,  ते शोधायचे,  असे मला वाटू लागले.
वारीचे कुतुहल शांत बसू देत नव्हते.  शेवटी गेल्या वर्षी ठरवलेच आणि कोल्हापूर  ऑफीसमध्ये परवानगी मागितली.  समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील सर, वरिष्ठ संपादक सुरेश पवार,  कार्यकारी संपादक दिलीप लोंढे यांनी माननीय संपादक साहेबाकडे शिफारस केली.  माझी इच्छा शक्ती  इतकी प्रचंड होती की मला साहेबांनी केवळ परवानगी दिली नाही, तर  ऑन ड्युटी जायला सांगितले, पुढारीमध्ये लिहायला सांगितले. आंधळा मागतो एक डोळा,  देव देतो दोन डोळे असे झाले. गत वर्षी खुप छान वारी झाली.  ते अनुभव गत वर्षी लिहले  आहेत, या वर्षी पण मला माझ्या संपादक साहेबांनी ऑन ड्युटी वारीला जायला परवानगी दिली आहे,  याही वर्षी माऊली कृपेने लिहायचा प्रयत्न करणार आहे.
आज सकाळी साडे सहा वाजता वारीला जाण्यासाठी निघालो. माझे पुढारी कराड कार्यालयातील सहकारी विकास पाटील,  अशोक मोहन,  वैभव पाटील, दिलीप धर्में, प्रवीण माळी तसेच तात्या पाटील मला आळंदी पर्यंत सोडायला आले  होते. तसेच वारीत सहभागी होण्यासाठी राजू मोरे कापीलकर हे पण होते. आम्ही बारा वाजता पोहचलो आळंदीत. एक किलोमीटर अंतरावर गाडी लावून चालत गेलो. रस्त्यावर जिकडे तिकडे फक्त वारकरी दिसत होते. सर्व सहकारी मित्रांना टोपी घ्यायला लावली. वारकरी माऊली आहोत, अशी भावना झाली. थेट मारूती बुवा कराडकर यांच्या मठात पोहचलो.  गेल्या वर्षी सोबतीला  असणारे वारकरी दिसले, शोधले . काय माऊली कधी आला, यंदा  आहे ना शेवटपर्यंत,  अशी चौकशी केली. माऊलींच्या पाया पडलो.  पंगत बसली होतीच, माने गुरूजी आणि सहकारी माऊलीनी प्रसाद घ्यायचा  आग्रह केला. भुक लागली होतीच, सारे बसलो, साडेबारा वाजता जेवण झाल्यावर पुन्हा सहकारी माऊली सोबत गप्पा मारल्या.
दोन वाजता सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार माऊलीना फोन करून मंदीरात जायला निघालो.  आजोळ घरात बोलवले होते त्यांनी पास घ्यायला.  पण तिथे जाईपर्यंत पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले होते.  ओळखीचेच पोलीस होते,  माझ्या कडे ओळख पत्र होते,  दाखवले. सारे थेट मंदीराच्या दारात गेलो.  तिथे एक दिंडी पोहचली होती.  मी आत गेलो,  इतरांना या दिंडीत सहभागी होऊन आत यायला सांगितले.  थोडी चुकामूक झाली, पण सारे आत आले. मंदिराच्या आवारात एक  एक दिंडी येऊ लागली, अचानक पाऊस सुरू झाला. पावसातही वारकर्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.  याबाबत सविस्तर वाचा उद्याच्या पुढारीत.
साडे सहाला बाहेर पडताना जवळून दर्शन घेतले. आम्ही खुप फोटो काढले, फुगडी खेळलो. मंदीराबाहेर मित्र  DYSP मितेश घट्टे भेटले.  सहकारी मित्र परतीच्या प्रवासाला कराडला निघाले.  मी पुन्हा मारूती बुवा कराडकर मठात  आलो.  खुप थकलो होतो,  पावसात भिजलेले कपडे  वाळले होते पण  अंग  चिकट झाले होते.  फ्रेश होऊन ब्लॉग लिहायला बसलो.
माऊली कृपेने आजचा दिवस  आनंदात गेला.
वारकरी भेटले,  माऊली दर्शन झाले. 
आणखी काय हवे?
- सतीश मोरे, कराड 
   9881191302




🚩  माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
⛳   karawadikarad.blogspot.in ⛳


सहा वाजता नेट बंद पडले, 
त्यामुळे फोटो व वारी अपडेट वेळेत देता आल्या नाही. 
आज पहाटे सुरू झाले.    
माऊली माऊली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...