फॉलोअर

२८ जून २०१६

माऊली चालले पंढरीला आळंदी

वरुणा, अलका, कणिका, आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी

पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत लुटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे. महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक वारीमध्ये सहभागी होतात. माऊली... माऊली..चा जयघोष करीत आनंदाचा हा प्रवास सलग चौदा दिवस सुरू असतो.

आळंदी ते पंढरपूर हा पालखी मार्ग सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. भक्तीच्या या प्रवासात गतवर्षीप्रमाणेच "पुढारी'सुद्धा सहभागी होणार आहे. पुढारी वाचकांच्या सेवेसाठी पुढारी प्रतिनिधी वारीत सहभागी होवून रोज लिखाण करणार आहेत. आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये "माऊली चालले पंढरीला' या विषेश सदरात सहभागी व्हा.
                                                                                             सतीश मोरे

आळंदी
चला आळंदीला जाऊ ।
ज्ञानदेवे डोळा पाहु ।।
होतील संतांच्या भेटी ।
सांगू सुखाच्या गोष्टी ।।
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर।
सुखी म्हणता चुकतील फेरे ।।
जन्म नाही रे आणखी ।
तुका म्हणे माझी भाक ।।

आळंदी हे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु आहे. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्य प्रेमाने ओसंडून जात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भुमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अलंकापुरीतून आजपासून पालखी सोहळा सुरू होणार आहे.  आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे.

आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा 28 जून रोजी सुरू होऊन 14 जुलै रोजी पंढरपूरला पालखी पोहोचणार आहे. ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे नेली. वाढवली. आता या वारीला महाकाय स्वरूप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. या पवित्र गावात पाहण्यासारखं खूप काही आहे. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या या गावात  वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात.

शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्रांत. त्याच्यां खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी खेडच्या (राजगुरुनगर) दक्षिणेस वसले आहे. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव होते. कुबेराने इंद्रायणीच्या काठी धन पुरून ठेवले होते. ज्ञानदेवांच्या पासून पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची "इंद्रायणी' म्हणून आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे.

आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ताम्रपटात 'आळंदीस' म्हणून जे उल्लेख सापडतात ते मात्र या आळंदीचे नाहीत. ते थेऊरच्या पूर्वेस असणाऱ्या दुसऱ्या आळंदीचे आहे. तिला चोरांची आळंदी म्हणतात. ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहे. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते. म्हणून या आळंदीस "सिद्धेश्वर' म्हटले असावे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाला लागून पश्चिमेस हरिहरेंद्र ह्या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. तेथे त्यानंतर देऊळही बांधले आहे.तेथे स्वामींचे पूर्वज गुरुंच्या आणखी समाधी आहेत. त्यापैकी एका समाधीवर यादव काळातील काही पुसट उल्लेख आढळतात. या समाधीवर चंद्र-सूर्य ही काढले आहेत. सूर्य व चंद्र ही नाथपंथीय चिन्हे आहेत. इतिहासकार यांनी जे संशोधन केले आहे, त्यावरून आळंदी हे गाव मध्ययुगीन ठरते. अलिकडील काळातील उल्लेख सांगायचा म्हटले म्हणजे शिवाजी महाराजांनी एका सनदेद्वारा आळंदी येथील सव्वा दीडशे  वारखे  याजिराफ  शेताचे  खंडी  मण धान्य श्री ज्ञानदेवांकडे देऊन टाकले आहे.

आळंदी ही त्यावेळी चाकण प्रांतात समाविष्ट होती. या जमिनीचे व्यवस्थापक रामचंद्र गोसावी हे होते. शके  1613 मध्ये आळंदी चे कुलकर्णी मोरो भास्कर यांच्या विनंतीवरून राजाराम महाराजांनी समाधीच्या बाबतीत ज्या व्यवस्था केल्या त्या पुढे चालविण्याबद्दल बाळाजी नारायण यांना आज्ञा केली आहे.शके  1619 मध्ये बाळाजी जाधव यांनी आळंदी यात्रा केल्याचा उल्लेख आहे शके  1661 साली श्रीमंत पेशवे यांनी श्रींचे पूजा नैवद्यनंदादीपाचा खर्च अपुरा पडतो म्हणून आळंदी गाव श्रींकडे इनाम करून दिले आहे.देवळासमोर गरुड पाराजवळ एक दीप माल आहे त्यावरील शिलालेख पुसलेला आहे. परंतु त्याचा उल्लेख 'कान्होजी आंग्रे' यांच्यापत्नी लक्ष्मिबाई यांनी ती दीपमाळ शके  1665 मध्ये बांधली आहे.

पेशवे सरकार शके  1672 व 1675 मध्ये कार्तिक यात्रेस आले होते. पेशवे सरकारांनी हे गाव ज्ञानेश्वर महाराज संस्थानाला इनाम दिले आहे. त्यातील वसुलापैकी  रुपये समाधीसाठी खर्च करावा, असे म्हटले आहे. शके 1681, 1696  मध्ये पेशवे सरकारांनी यात्रेत रखवालीसाठी माणसे पाठवण्याबद्दल दिलेले हुकुम आढळतात.

आळंदीनजीक केळगाव येथील रानात श्री पांडूरंगाश्रम स्वामी यांनी देवालय बांधले व गोपाळकाला करू लागले. तेव्हा गोपाळपुराची वस्ती झाली. हा काळ शके 1670 चे सुमाराचा आहे.आळंदीत प्रवेश करतांना जो दगडी पूल आहे, तो पुण्याच्या ठाकूरदास अग्रवाल नावाच्या श्रीमंत सावकाराने  मध्ये बांधला त्यास  80 हजार रुपये खर्च आला. आता या नदीवर नवीन पूलही बांधला गेला आहे. या पुलावर आल्यावर गावातील देवळांची शिखरे दिसतात.यात्रेकरुंच्या मुखातून 'श्री ज्ञानेश्वर महाराज की जय' असे म्हणून नामाचा गजर होतो. दोन्ही हात जोडले जातात आणि मस्तक शिखराच्या दिशेकडे झुकून विनम्र होते.

।। अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,
जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।।

श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, ह्या गावाचे महत्व अमर होऊन गेले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. इ. स. 768  च्या कृष्णराज राष्ट्रकूटांच्या तळेगाव ताम्रपटात आळंदी गावाचा उल्लेख आढळ्तो. इंद्राने पृथ्वीवर येऊन महायाग केला तो इथेच.

स्कंद पुराणातील सहयाद्रि खंडाच्या 64  व्या अध्यायात या गावाची वारुणा, अलका, कर्णीका, आनंद व सिध्दक्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी या गावाचे नाव लडीवाळ्पणे अलंकापुरी ठेवले आहे. हरिहरेंद्र स्वामींच्या समाधीवर यादव काळातील उल्लेख सापडतात. श्री शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले. क्षेत्राच्या सौदर्यांत भर पडली. त्यानंतर अनेक धनिकांनी या गावातील वास्तू बांधल्या. इ. स. 1867 साली येथे नगरपालिका स्थापन झाली.

          .......सतीश मोरे
                988191302

      satishmore302@yahoo.co.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...