फॉलोअर

१८ मे २०२६

नवसाला पावणारी जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगल ताई


*नवसाला पावणारी करवडीची जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगल ताई*_ 

 _करवडीत उद्या सिझन मधील शेवटचा शो_ 

महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासात काही नावं ही केवळ कलाकार म्हणून नाही, तर एक परंपरा म्हणून ओळखली जातात. मंगला बनसोडे हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव. कितीही संकटं आली, कितीही अडचणी आल्या, तरी मंगला बनसोडे कधी खचल्या नाहीत. संघर्षाशी दोन हात करत त्यांनी उभा केलेला तमाशाचा हा प्रवास म्हणजे जिद्दीचा, कष्टाचा आणि श्रद्धेचा जिवंत इतिहास आहे.

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या असलेल्या मंगलताईनी करवडी तालुका कराड येथील रामचंद्र बनसोडे यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिल, सुनील, नितीन अशी तीन मुले आणि लक्ष्मीताई ही मोठी कन्या अशी चार अपत्ये झाली. पुढे हे संपूर्ण कुटुंबच तमाशा कलेसाठी वाहून घेत गेलं.

सुमारे १९८२-८३ च्या काळात “मंगला बनसोडे तमाशा मंडळ” या नावाने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. विठाबाई नारायणगावकर यांच्या फडातून स्वतंत्र होत मंगला बनसोडे आणि त्यांचे पती रामचंद्र बनसोडे यांनी स्वतःचा तमाशा फड उभा केला. सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षमय होता. आर्थिक परिस्थिती कठीण होती. अनेकदा संकटं समोर उभी राहत होती. पण करवडी गाव नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलं. रामचंद्र बनसोडे आणि मंगल ताईंनी हा तमाशा टिकण्यासाठी अनेक कष्ट सोसले. वडलार्जित संपत्ती त्यांना विकावी लागली. खूप खूप प्रयत्नातून आणि कष्टातून हा फड हळूहळू उभारी घेत गेला.


या तमाशा मंडळाने सुरुवातीपासूनच वेगळे प्रयोग केले. लावणी, गण-गवळण, वगनाट्य, विनोदी बतावणी अशा सर्व प्रकारांत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. संगीत बारी आणि वगनाट्य हे तर या तमाशा मंडळाचा खास वैशिष्ट्य होतं आहे. पुढे हे मंडळ महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा मंडळांपैकी एक बनले. राज्यातील प्रमुख पाच तमाशा फडांची नावे घेतली तर “मंगला बनसोडे तमाशा मंडळ” हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

सुरुवातीच्या काळात संपूर्ण तमाशा सांभाळण्याची जबाबदारी मंगला बनसोडे यांच्यावर होती. त्यावेळी त्यांच्यासोबत लहानगा नितीनही फडात काम करत होता. आठ-नऊ वर्षांचा तो मुलगा पुढे महाराष्ट्राचा लोकप्रिय कलाकार “विनोदाचा सम्राट नितीनकुमार बनसोडे” म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसरीकडे अनिल बनसोडे यांनी तमाशा मंडळाची टेक्निकल बाजू सांभाळली.  वर्गात हुशार असलेला अनिल पुढे घरच्या तमाशा मंडळासाठी पूर्णवेळ काम करू लागला.
रामचंद्र बनसोडे यांचे योगदानही तितकेच मोठे आहे. त्यांनी अनेक गाजलेले वग लिहिले. तमाशा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याला साहित्यिक आणि सामाजिक बाजू देण्याचं काम त्यांनी केलं.

माझं स्वतःचं गाव करवडी असल्यामुळे या तमाशा मंडळाशी माझं बालपणापासूनच नातं जोडलेलं आहे. पावसाळा संपत आला की करवडी गावात आमच्या घरासमोर एका बंद पडलेल्या पोल्ट्रीमध्ये रंगीत तालमी व्हायच्या. त्या पाहण्यासाठी आम्ही उत्साहाने जात असू. अनिल बनसोडे हा माझा वर्गमित्र. आम्ही चौथीपर्यंत एकत्र शिकलो. पुढे त्याने शिक्षण सोडून तमाशा मंडळासाठी स्वतःला वाहून घेतलं.

मंगला बनसोडे आणि करवडी गाव यांचं नातं अत्यंत भावनिक आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जीवनातील श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे करवडीची जानूबाई देवी. दरवर्षी दसरा-दिवाळीनंतर तमाशा दौरा सुरू करण्यापूर्वी मंगला बनसोडे जानूबाईच्या मंदिरात जातात. “आई जानूबाई, मी तमाशा दौऱ्यावर निघत आहे. संपूर्ण दौरा सुखरूप पार पडू दे. शेवटचा खेळ मी तुझ्या दारात मोफत करेन,” असा नवस त्या बोलतात.

१९८८ पासून सुरू झालेला हा नवस आजतागायत अखंड सुरू आहे. मे महिन्यात तमाशाचे दौरे संपल्यानंतर शेवटचा मोफत खेळ करवडी गावात जानूबाई देवीच्या साक्षीने होतो. गेली पस्तीस वर्षे हा शब्द त्यांनी कधी मोडला नाही. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे तमाशाचा खेळ दोनदा रद्द झाला, पण तरीही मंगला बनसोडे आणि काही कलाकारांनी मंदिरात जाऊन देवीसमोर छोटासा गण-गवळण सादर करून नवस पूर्ण केला.

उद्या दिनांक १९ मे रोजी करवडी गावात या सिझनमधील त्यांचा शेवटचा तमाशा रंगणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला परिसरातील हजारो रसिक उपस्थित राहतात. मध्यंतरात गावातील सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या वतीने मंगला बनसोडे यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला जातो. तो क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचा आणि भावनिक असतो.

मंगला बनसोडे यांच्या कुटुंबाशी माझे गेली चाळीस वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या प्रत्येक संकटाच्या काळात मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, आणि त्यांनीही मला कुटुंबातील सदस्यासारखंच प्रेम दिलं. मंगलताई तर मला त्यांचा चौथा मुलगाच मानतात.

आजही करवडी गाव, संपूर्ण परिसर आणि महाराष्ट्रातील तमाशा रसिकांच्या मनात मंगला बनसोडे यांच्याबद्दल अपार प्रेम आणि आदर आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा तमाशा फड भविष्यातही असाच यशाच्या शिखरावर जावो, आणि महाराष्ट्राची ही लोककला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो, हीच मनापासून शुभेच्छा.


सतीश मोरे सतिताभ
पत्रकार दैनिक पुढारी कराड 
9881191302

1 टिप्पणी:

  1. निनावी७:५०:०० PM

    या परंपरा फक्त मराठी कलाकारच करू शकतो, सलाम त्यांच्या पूर्ण बनसोडे परिवाराला 🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...