फॉलोअर

२४ मार्च २०२६

माझं साहित्य प्रेम

साहित्यप्रेमाची माझी वाटचाल

माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम बाबा पाटणकर यांच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षांपासून पाटण येथे भडक बाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी या संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित करण्यात आले, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसतो, तर तो एक साहित्यिकही असतो. पुढारीचे पत्रकार आणि विक्रम बाबा पाटणकर यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद वाटतो.

मी स्वतःला एक साहित्यप्रेमी मानतो. माझ्या साहित्यप्रेमाची सुरुवात लहानपणीच झाली. टिळक हायस्कूलमध्ये असताना ग्रंथपाल पोतदार सर आम्हाला छोटी-छोटी पुस्तके वाचायला देत असत. घरातही वाचनाची परंपरा होती. माझी थोरली बहीण ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकांचा सहवास अधिक मिळाला.
याच काळात हिमांशू जोशी यांच्या ‘तेरे लिये’ या हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद वाचला आणि साहित्याशी एक वेगळे नाते निर्माण झाले.

पुढे कराड तालुक्यातील शिवाजीराव भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांनी साहित्याची आवड अधिक वृद्धिंगत केली.

महाविद्यालयीन जीवनात वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही कादंबरी माझ्या हाती लागली. या कादंबरीने माझ्या विचारविश्वावर खोल परिणाम केला. इतकेच नव्हे तर मी या कादंबरीच्या सखोल नोट्सही तयार केल्या.

त्यानंतर व. पु. काळे यांच्या लेखनाच्या प्रेमात पडलो. त्यांची ‘पार्टनर’ ही कादंबरी मी पाच-सहा वेळा वाचली आहे. त्यांच्या लेखनातील साधेपणा आणि जीवनाशी असलेली नाळ मनाला भिडणारी आहे.

१९९६ साली सद्गुरु वामनराव पै यांचे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकाने आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांची दिशा दिली. तसेच डॉ. जोसेफ मर्फी यांचे ‘पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड’ आणि ‘सक्सेस थ्रू पॉझिटिव्ह मेंटल अ‍ॅटिट्यूड’ या पुस्तकांनीही माझ्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकला. या पुस्तकांच्या नोट्सही मी तयार केल्या.

महाविद्यालयीन काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कविता तसेच मराठीतील अनेक कवींच्या साहित्याचे वाचन केले. या सर्व वाचनातून माझे विचारविश्व समृद्ध होत गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...