फॉलोअर

०८ एप्रिल २०१६

मराठमोळी गुढी सिक्कीम मध्ये




स्व. यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी, खा. शरद पवार यांचे विद्यार्थी दशेपासूनचे विश्वासू सहकारी, कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे मराठमोळ्या मराठी, संस्कृती जपणारे नेतृत्व आहे, नव्हे खानदानी वाघ   असे म्हटले तर  वावगे ठरणार नाही. ऐवढ्या मोठ्ठ्या पदावर जाऊन पण त्यांनी मातीची नाळ काय सोडलेली नाही. आज सकाळी सकाळी मह्रामहीम राज्यपाल महोदयांनी राजभवन निवासस्थाना समोर गुढी उभारली. पत्नी सोबत छान फोटो काढून मला पाठवून दिला. नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या , काय म्हणायचे या विभुतीला !



राज्यपाल साहेबांविषयी खुप लिहता येईल,  लिहिले आहे, नुकताच त्याचा अमृतमहोत्सवी वाढदिवस 11 फेब्रुवारी रोजी साजरा झाला. कराड लोकसभा मतदारसंघाचे कर्तृत्व संपन्न खासदार, खासदार काय करू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण ही राजकीय ओळख . साधेपणा, उच्च शिक्षण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व,  सर्व गटातील लहान थोर व्यक्तीसोबत असलेले जिव्हाळ्याचे नाते,  बोलण्याची पद्धत, जबरदस्त व्यक्तीगत आणि पिळदार मिशा या सर्वासहीत रांगडे नेतृत्व म्हणजे श्रीनिवासपाटील.



कराड पाटण तालुक्याने विविध क्षेत्रात अनेक रत्ने जन्माला घातली.स्व. यशवंतराव चव्हाण  लोकनेते बाळासाहेब देसाई, ज्येष्ठ नेते पी डी पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले या दिवंगत नेत्याबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर आणि राज्यपाल साहेब या नेतृत्वानी कराड पाटणचे  नाव राज्यपातळीवर, देशपातळीवर नेऊन ठेवले. शिक्षण, प्रशासन, राजकारण, समाजकारण यासह प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळविलेले व राज्यपाल म्हणून सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर तेवढ्याच ताकदीने सेवा बजावणारे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.  

मारूल हवेली सारख्या एका छोट्याशा गावातून येऊन सुद्धा आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी विद्येची उच्च शिखरे गाठली. गावातील मारूतीच्या देवळातील शाळेतून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांनी मॅट्रीकला कराड केंद्रात गुणवत्ता यादीत झळकले. पुढे पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून 1 जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. श्रीनिवास पाटील यांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभले. तर शरद पवार यांच्याबरोबर युवक कॉंग्रेसमधील निकटचे सहकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. हे दोघेही चव्हाण साहेबांचे लाडके तरूण  कार्यकर्ते म्हणून नावारूपास आले. अर्थशास्त्र विषयात एम.ए. व मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. पदवी मिळविली. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 1965 साली उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. चव्हाण साहेबांच्याच सल्यानुसार राजकीय कारर्कीद सोडून प्रशासकीय सेवेत रूजू झाले.



कोल्हापूर जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. प्रशासकीय सेवेतील त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने अनेकदा अडचणीत असलेल्या विविध संस्थावर त्यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली. यामध्ये संगमनेर साखर कारखाना, भारत सरकारच्या पिंपरी येथील हिंदुस्तान ऍटीबायोटिक्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, 1992 साली पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त व 1995 साली नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली नियुक्ती तसेच अडचणीत असलेल्या या संस्थांचा केलेला कायापालट यामुळे एक संकटमोचक अधिकारी अशी ख्याती महाराष्ट्रभर झाली.
सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडलेला व त्यांच्या प्रश्नांची जाण असणारा एक लोकाभिमुख जिल्हाधिकारी, साखर उद्योगाचे सखोल ज्ञान असणारा संचालक म्हणून त्यांनी केलेले काम आज लोकांच्या स्मरणात आहे. प्रशासकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना शरद पवार यांच्या एका हाकेवर भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली.

1999 साली स्थापन  झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या राजकीय पक्षाला अवघड असलेल्या कराड लोकसभेची निवडणूक लढवून उच्चांकी मताधिक्याने विजय मिळविला. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघात विकासकामांचा जणू डोंगरच  उभा केला. खेड्या पाड्यासह मतदारसंघातील त्यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली विकासकामे आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देताना कर्तबगार लोकप्रतिनिधी काय करू शकतो याचे ते उदाहरण आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणाऱ्या सिक्कीम राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर तेथेही त्यांनी आपला वेगळा ठसा उमठविला आहे. 

सिक्कीमच्या दुर्गम भागाचा दौरा करणारे व सिक्कीमच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राजभवनाचे द्वार कायम खुले ठेवणारे राज्यपाल म्हणून त्यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे.
मिशीवाला साहब अशी त्यांची राज्यात  ओळख झाली आहे.  सिक्कीमच्या राजभवनात  गेल्या दोन वर्षांत अनेक लहान मोठे कार्यक्रम  झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सहीत अनेक देशी विदेशी पाहुणे येऊन गेले. जे आले ते सिक्कीमच्या आणि श्रीनिवास पाटील यांच्या प्रेमात पडले. याचे कारण म्हणजे  सिक्कीमच्या संस्कृतीशी एकरूप होत असताना महाराष्ट्रीयन ढप त्यांनी जपली आहे.


आज गुढीपाडवा. राज्यपाल साहेबांनी सिक्कीम मध्ये गुढी उभारली. कुठेही गेला तरी मराठी माणूस आपली संस्कृती विसरत नाही. पाटील साहेबांनी आज हे सिद्ध करून दाखवले आहे. दोन वर्षे ते राज्यपाल आहेत, खुप मोठ्या पदावर  आहेत, पण आजही पुढारी मध्ये  एखादी त्यांची बातमी आली तरी तेथून फोन करतात, आभार मानतात. अमृतसर सुवर्ण मंदिर भेटीची बातमी पुढारीत प्रसिद्ध झाली तेव्हा तर सकाळी सहा वाजता त्यांचा फोन आला होता. 

वाढदिवसाला सुद्धा न विसरता माझ्या सारख्या वार्ताहराला फोन करतात, हे खरंच वेगळंच गणित आहे.  भेटले की काय सतीश, बरं आहे ना,  या एकदा सिक्कीमला, असे निमंत्रण त्यानी अनेकदा मला दिले आहे. 


प्रगल्भता म्हणजे काय,

फार मोठ्ठे बोलणे, उच्च पदावर पोहचणे म्हणजे प्रगल्भता नव्हे !
छोट्या छोट्या गोष्टी मध्ये बारकावे पाहणे, अनुकरण करणे आणि जपणे म्हणजे प्रगल्भता.

राज्यपाल साहेबांना पाहून आणखी काय बोलायचे प्रगल्भता विषयी!

       ..........सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...