फॉलोअर

०५ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *फलटण,बरड*

  *०४/०७/२०१९*
*०५/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,

फलटण ते नातेपुते (शिंगणापूर फाटा) हा 30 किलोमीटरचा प्रवास एकाच दिवशी म्हणजे काल गुरूवारी माऊलीच्या जयघोषात पालखीच्या पुढे जाऊन आम्ही पूर्ण केला होता. आमच्या एका सहकार्याला घरगुती कामासाठी कराडला जावे लागणार असल्यामुळे
दोन मुक्कामाचे अंतर एकाच दिवशी चालायचे असे ठरवून आम्ही काल दिवसभर सकाळी दहा ते रात्री नऊ तीस किलोमीटर प्रवास पूर्ण केला. माऊलींचे नाम घेताना हा प्रवास कसा पार पडला हे आम्हाला समजलेच नाही मात्र रात्री थोडा त्रास झाला.



फलटणच्या विश्रामगृहावर रात्री उशीरा रात्री उशिरा पोहोचलो पुढारीचे फलटण तालुका प्रतिनिधी हरीश पाटणे यांचा शिलेदार यशवंत खलाटे यांनी आम्हा सर्व वारकऱ्यांचा खूप चांगला पाहुणचार केला. एक वेगळा व्यक्ती एक चांगला माणूस आम्हाला भेटल्याचा आनंद झाला. फलटणमधील पत्रकार खरे तर  वारकऱ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करतात. यशवंत खलाटे आणि त्याच्या सर्व सहकार्याने माझा मोठा भाऊ म्हणून केलेल्या आदरातिथ्य आणि दिलेला सन्मान खरच लक्षात राहील. रात्री उशिरा विश्रामग्रहावर पोहोचल्यानंतर पाय खूप दुखत असल्यामुळे आणि शरीराने साथ न दिल्यामुळे कालच काहीच लिहू शकलो नाही. मात्र माऊलीचे नाम आणि माऊलींचा आशीर्वाद सोबत असल्यामुळे एवढे विशेष त्रास जाणवले नाही.

काल रात्री वारीमध्ये चालत असताना फार मोठी प्रश्न उद्भवला. ही समस्या किंवा अडचण वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे मी सांगू इच्छित नाही. मात्र  न केलेल्या चुकीचा  त्रास झाला. सुरुवातीपासूनच माझा सकारात्मक विचारांवर आणि कर्मावर विश्वास आहे. Success through Positive Mental Attitude या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे .1996 सालु हे पुस्तक मी वाचले होते. मुळ इंग्रजी पुस्तकाच्या मी मराठीमध्ये नोट्स काढल्या होत्या. चुकीचे काही केले नसेल तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आपली दिशा योग्य असेल तर कधीही अपयश येत नाही. आसा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे हा त्रास झाल्यानंतर काही क्षण वाईट वाटले. मात्र त्याच क्षणी पंढरपूरच्या दिशेने तोंड करून *विठ्ठला* असा मोठ्या आवाजात टाहो फोडला. काही अंतर या विचारातच आणि विठ्ठल नाम घेत चालत राहिलो.

विठ्ठल नामाचा महिमा काय असतो आणि सत्याच्या बाजूने कायम परमेश्वर उभा असतो, याचा प्रत्यय मला फक्त पाचच मिनिटात आला. पाच मिनिटानंतर महामाऊलींचा मला फोन आला आणि त्यांनी माझी सर्व बाजू उचलून धरली आणि तुम्ही असेच पुढे काम करत राहा. तुमची कोणतीही चूक नाही,काम करत रहा मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद दिला आणि माझे डोके हलके झाले.


विठ्ठलाने फक्त पाच मिनिटात सकारात्मक विचाराचा, सत्कृत्याचा, सत्कर्माचा रिझल्ट दाखवला होता, मी खूप आनंदी झालो. पंढरीच्या वारीत असे अनेक सुखद प्रसंग ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळतात त्यातून मी कसा अपवाद असेन !

राम कृष्ण हरी

आज शुक्रवार सकाळी पुढे फार काही चालवायचे नसल्यामुळे आम्ही सर्व सहकारी उशिरा उठलो. आमच्या सहकार्याचे  कराडला जाणे रद्द झाले होते. आम्ही तशी विठ्ठलाकडे विनवणी केली होती.  दिवसभर काय करायचं शेवटी शिंगणापूरला जायचा निर्णय घेतला. गाडी तयार होऊन बसलो तेवढ्यात विश्रामगृहावर पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे माऊली यांची भेट झाली. 1990 पासून भिसे माऊली पंढरीची वारी करत आहेत. अनेक खस्ता खात, सर्व परिस्थितीवर मात करत यांनी आजपर्यंत पंढरीची वारी कव्हर केली आहे. वारी जगापर्यंत पोचवण्यासाठी मिडीयाचे फार मोठे योगदान आहे असे भिसे माऊली यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. बदलती वारी, वारीमधील बदलती पत्रकारिता याविषयी आम्ही बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्वजण शिंगणापूरला जायला निघालो.

माऊलींचा मुक्काम आज बरडला होता. बरड पासून शिंगणापूर हे अंतर पंधरा किलोमीटर आहे त्यामुळे वारकऱ्यांचा ओढा  शिगणापूर कडे खूप होता शिंगणापूर गावात जिकडेतिकडे वारकरी दिसत होते.विदर्भ मराठवाडामधील वारकरी शिंगणापूरला फार गर्दी करतात .शिंगणापूर हा आमचा कुलस्वामी, तेथे गेल्यानंतर आमचे परंपरागत बडवे संतोष बडवे यांना भेटलो. रणजित पाटील यांनी मोहन बडवेंना फोन करून बोलावून घेतले.खूप गर्दी असूनही व्यवस्थित दर्शन घेतले, शिंगणापूर ची सर्व माहिती घेतली,व्हिडिओ तयार केला आणि परतीच्या प्रवासाला बरडकडे निघालो.
*See Pudhari online link*



बरडला जाण्यासाठी जवळचा रस्ता पकडला. या रस्त्यावर सगळीकडे भकास भकास होते. जावळीमध्ये जनावरांची छावणी दिसली, छावणीमध्ये जनावरांची संख्या कमी असली तरी या भागात अजिबात पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली होती आणि मशागती करताना शेतकरी दिसले.

जुलै महिना आला तरी पावसाचा पत्ता नाही. माण खटाव फलटण तालुक्यात भीषण परिस्थिती आहे हे वास्तव आजच्या प्रवासात पाहायला मिळाले. एका गावातून जात असताना रस्त्याच्या कडेला प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचे बॅरेल कळशी हंडे ठेवलेले दिसले .जरा पुढे गेलो तर एका ठिकाणी टँकर मधील पाणी या बॅरलमध्ये भरले जात होते. ग्रामस्थांची भेट घेतली. हे पाणी पाहून धक्का बसला. टँकरमधून गावागावात अस्वच्छ, दुषीत पाणी पोहचवले जात होते, हे या भागातील लोकांना समजत नव्हते असे नाही. पण पाण्यासाठी टाहो करणाऱ्या या नागरिकांना , ग्रामस्थांना मिळेल ते पदरात पडले असे समजून ते पाणी स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता.

कराड साताराचे लोक पाण्याचा किती अपव्यव करतात, शुद्ध पाणी गाड्या धुण्यासाठी, शौचालयासाठी वापरतात. सकाळचा भरलेले पाणी शिळं झालं म्हणून संध्याकाळी ओतून टाकतात,अशी स्थिती जिल्ह्याच्या एका टोकाला असताना दुसऱ्या टोकावर माण फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आह,पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते हे विदारक चित्र पाहून खूप वाईट वाटले.

टॅंकर मालकाने पुढारी ऑनलाईन बुम पाहून थोडेसे त-त-प-प केलं. आम्ही आठ टॅंकर फलटण नगरपालिकेत भरून आणतो असे त्यांनी सांगितले .मात्र फलटणमध्ये असेच पाणी दिले जात असेल याचा विचार केला नक्की दिले जात नसेल .म्हणजेच टँकर मालक खोटे बोलत आहेत, अस्वच्छ पाणी भरून ग्रामस्थांना वाटत आहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही हे जाणवले.

साडेचार वाजता बरडला पालखी तळावर पोहोचलो. बारा नंबर दिंडी मध्ये जाऊन वारकरी सहकार्याने गप्पा मारल्या.थोडा वेळ ट्रकमध्ये बसून आराम केला. या पालखी तळा शेजारीच एक दर्गाह आहे या दर्ग्याच्या परिसरात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. याच परिसरात अनेक वारकऱ्यांनी आपले तंबू उभारले होते.अनेक वारकर्याने त्या दर्गा च्या समोरील शेडमध्ये आपले अंथरून टाकून जागा धरली होती. ही मुस्लिम समाजाची जागा आहे,येथे कसे झोपावे झोपावे असे त्यांना काहीच वाटले नव्हते. या लोकांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले आहे,जगातील सर्वांच्या कल्याणाची काळजी घेतली आहे, सर्वधर्मसमभाव हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया आहे,असे त्यांनी बोलून दाखवले.या लोकांची मुलाखत घेऊन पुढे गेलो.
*See Pudhari online link*

माऊली पालखी सोहळा अतिशय महत्वाचा क्षण म्हणजे समाज आरती सोहळा. सोहळ्याचे मालक हरफळकर यांच्या मालकीच्या ट्रक वर उभा राहून हा सोहळा पहिला, फोटो काढले. व्हिडिओ तयार केले बातमी पाठवली. त्यानंतर ट्रकच्या केबिन वर बसून तेथे उपस्थित वारकऱ्यांची गप्पा मारल्या.
*See Pudhari online link*

 तिकडे बारा नंबर दिंडीमध्ये साडेसात वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता. लायन्स क्लबचे माझे सहकारी विराज जांभळे मला भेटायला तेथे आले होते, त्यांच्यासोबतच जेवण घेतले.

रात्री उशिरा नातेपुते मुक्कामी पोहोचलो. नातेपुते हे माझे मित्र राहून खोचीकर यांचे आजोळ. गेली तीन वर्षे खोचीकर यांच्या आजोळी आम्ही वारकरी उतरतो रात्री उशिरा त्यांचे मामेभाऊ मंगेश यांच्या सोबत गप्पा मारत बसलो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान मात्र इमोशनल गेला.

माऊली माऊली !




माऊली माऊली !

Also available at

👇karawadikarad.blogspot.com



🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩


०४ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *वाल्हे*
  *०३/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,

तरडगाव चांदोबा लिंब

लोणंदचा दीड दिवसाचा मुक्काम आटोपून माऊली तरडगाव मुक्कामाला निघाले. तरडगाव ते लोणंद अंतर फक्त नऊ किलोमीटर आहे, त्यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास माऊलीची पालखी तरडगावकडे निघाली. सातारा जिल्ह्यात लोणंदमध्ये पालखी दीड दिवस थांबत असल्यामुळे  काल सायंकाळपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी लोणंद मध्ये माऊली भक्तांचा महापूर उसळला होता.  लोणंद ते तरडगाव हे अंतर खूप कमी असल्यामुळे माऊलींच्या पालखीसोबत चालणाऱ्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भक्तांची संख्या येथे वाढते, माऊलींच्या पालखीसोबत हे वारकरी चालतात.



लोणंदला भाविक जास्त  येण्याचे का आणखी एक कारण आहे. लोणंदमध्ये पालखी दुपारी निघते आणि त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर चांदोबाचा लिंब येथे भरणारे  पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण ! चांदोबाचा लिंब येथे होणारे पहिले रिंगण हे पाहण्यासारखे असते. रिंगण पाहून पुढे तीन किलोमीटर अंतरावर माऊलींच्या पालखीतळावर जाऊन समाज आरतीचा पाहण्याचा आनंद लुटायचा हेही एक लोणंद ते तरडगाव चालणे मागचे खास कारण असते.


दुपारी साडेबाराच्या दरम्यान माऊलींचा सोहळा लोणंद मधून निघाला, माऊलींना वेशीपर्यंत सोडण्यासाठी लोणंदकर आले होते .कापडगाव पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी भक्तांचा जणू मेळावा भरला होता.जिकडे पाहावे तिकडे फक्त वारकरी दिसत होते, वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यावर येत होते.

इकडे चांदोबाचा लिंब येथे रिंगण पाहण्यासाठी पुढे येऊन अनेक भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चांदोबाचा लिंब हे मंदिर बरोबर रस्त्याच्या एका बाजूला मात्र रस्त्यातच आहे. लोणंद फलटण हा मार्ग चौपदरी करण्यात आला आहे . रुंदीकरणात हे मंदिर जाऊ शकते. मात्र श्रद्धेचा व भावनेचा भाग तसेच न्यायालयीन बाब असल्यामुळे हे मंदिर अजूनही रस्त्यातून हटवण्यात आले नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार हे लक्षात घेऊन सातारा पोलिसांनी योग्य नियोजन करणे गरजेचे होते.माऊलींची पालखी लिंब येथे पोहोचणे अगोदरच येथे हजारो भाविक माऊलींची वाट पाहत होते. चारच्या सुमारास माऊलींची पालखी रिंगणाच्या ठिकाणी आली



सातारा पोलिसांच्या बेफिकीरपणा आणि स्थानिक युवा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी यामुळे पालखी चांदोबाचा लिंब येथे आल्यानंतर ढकलाढकली सुरू झाली. वास्तविक या ठिकाणी किती लोक उभे राहू शकतात याची काळजी व माहिती पोलिसांनी घ्यायला हवी होती. मात्र ती न घेतल्यामुळे दिंडी सोबत आलेले वारकरी ,स्थानिक ग्रामस्थ आणि अगोदरच येऊन बसलेले वारकरी यांची एकच गर्दी रिंगणाच्या परिसरात झाली. माऊलींच्या अश्वाला धावत येण्यासाठी तीन फुटाचा रुंदीचा रस्ता करणे गरजेचे असते,हा करण्यासाठी  रथाच्या शेजारी असणाऱ्या जागेत लोकांना मागे ढकलल्यास सुरवात केली. मात्र या लोकांना माझ्या सरकायला जागाच नव्हती, त्यामुळे अनेकजण रेलिंगला धडकले, रेलिंगच्या पाठीमागेच पोलिसांची व्हॅन उभी होती या व्हॅनवर स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उभ्या होत्या. त्या उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत होत्या. मात्र काही करू शकत नव्हत्या. त्यांनी नेमलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोबाजी दाखवण्याच्या नादामध्ये वारकऱ्यांना आणि भाविकांना ढककले. यातून पत्रकार सुद्धा सुटू शकले नाहीत. काहींचे मोबाईल, कँमेरे खाली पडले,काहीजण खाली पडले. थोडी चेंगराचेंगरी झाली. पाच मिनिटात रिंगणाला सुरूवात झाली. माउलींच्या अश्वाच्या पाठीमागे दुसरा घोडेस्वार धावत आला. माऊली माऊली माऊली चा जयघोष झाला आणि पाच मिनिटात रिंगण संपले, माऊलींची पालखी पुढे निघाली.

सातारा पोलिसांचा नियोजन किती ढिसाळ होते याचा प्रत्यय रिंगण झाल्यानंतर आला. रिंगण स्थळावर वाहतूक ठप्प झाली होती. रिंगण संपल्यानंतर माऊली पुढे गेल्यावर ही वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र चांदोबाचा लिंब ते तरडगाव तीन किलोमीटरचे अंतर पाया पडायला अनेकांना अडीच तासाचा कालावधी गेला. वाहतूक खूप ठप्प झाली होती. चौपदरी रस्ता असूनही एवढा वेळ वाहतूक ठप्प झाली याचे आश्चर्य वाटले.( *वाल्हे घाटातला अरुंद रस्ता, दिवेघाटात भर पावसात अरुंद रस्त्यावरून झालेली वाहतूक एवढे असूनही पुणे जिल्हा पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वाहतूक विस्कळीत झाली नव्हती*)


एका बाजूला वारकरी पुढे चालत होते  दुसर्‍या बाजूला मुंगीच्या पावलाने चार चाकी वाहतूक सुरू होती रिंगणाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावायला सातारा पोलीस कमी पडले हे यातून सिद्ध झाले.

दरम्यान चांदोबाचा लिंब येथे रिंगण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. सातपूते मॅडम यांचे पहिली ओळख फोनवरून झाली होती. कराड कोल्हापुर नाका येथे वाहतुकीची होत असलेली कोंडी आणि आणि कराड पोलीसांचे दुर्लक्ष याबाबत याबाबत पुढारी सह अनेक दैनिके छापलेल्या बातम्याची माहिती सातपूते मॅडमना गेल्या महिन्यात मोबाईल वरून दिली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मॅडमनी एडिशनल एसपीना कराडला पाठवले होते आणि हा प्रश्न निकाली काढला होता,याबाबत मॅडम ना धन्यवाद दिले.


रिंगण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडत फलटणला मुक्कामी जाण्याचा निर्णय घेतला. लोणंद ते तरडगाव ते निंबोरे हे अंतर काल रात्री आम्ही चालून पूर्ण केले होते. गाडीने निंभोरे येथे आलो. आठ वाजता फलटण च्या दिशेने चालायला सुरुवात केली. यादरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांचा फोन आला. तरडगाव येथे माऊलींचे दर्शन घेऊन आणि आ. दीपक चव्हाण यांच्यासोबत भोजन आटोपून आमदार बाळासाहेब पाटील कराडला निघाले होते. आम्ही चालत आहोत हे समजल्यानंतर त्यांनी आमचे लोकेशन्स विचारले आणि त्याठिकाणी आम्हाला भेटावयास आले. आमच्या प्रकृतीची चौकशी केली. आ बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा गेल्या चार वर्षापासून पंढरीची वारी पायी करतात. आमच्या समोरच त्यांनी जशराज यांना फोन लावला, खुशाली विचारली. थोड्या थोड्या गप्पा मारल्या आणि आम्हाला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देत ते निघून गेले.


रात्री साडेआठ ते 10.30 वाजेपर्यंत केवळ दोन थांबे घेत फलटणला पोचलो, माझे जवळचे मित्र डॉ. प्रसन्ना पतंगे यांचे फलटण हे मूळ गाव. दुपारी त्यांनी सहज मेसेज पाठवला होता ,'मी उद्या फलटणला येत आहे आमच्या गावी आमच्या घरी या.'  यावरआजच तुमच्या घरी येत आहे असे मी कळवले होते. डॉक्टर पतंगे यांनी आपल्या घरी आईला फोन करून आमच्या भोजनाची तयारी करण्याचे कळवले होते. साडेदहा वाजता डॉक्टर पतंगे यांची आई घराबाहेर रस्त्यावरच  उभे राहून आमची वाटच पाहत बसल्या होत्या. माऊलींनी आग्रहाने जेवणास घातले. डॉक्टर पतंगे यांचे बंधू जितेंद्र पतंगे हे संगीतकार आणि गायक आहेत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये बीई झाले आहेत. जितेंद्र पतंगे यांच्या स्टुडिओ मध्ये बसून संगीत या विषयावर चर्चा करताना अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर चर्चा झाली. जितेंद्र पतंगे यांनी कंपोस्ट केलेली गाणी पाहिली आणि ऐकली. खूप आनंद झाला. रात्री उशिरा 12 वाजता फलटण विश्रामगृहावर मुक्कामाला पोहोचलो. फलटण विश्रामगृहाची अवस्था आणि दुरावस्था याच्यावर वेगळे भरपूर लिहावे लागेल.असो.रात्र घालवण्यासाठी येथे जागा मिळाली हेही नसे थोडके!

एकंदरीत आजचा दिवस खूप आनंदाचा गेला. एक वाजता ब्लॉग लिहून सर्वांना पाठवले आणि झोपी गेलो.

माऊली माऊली !

Also available at

👇karawadikarad.blogspot.com




🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०३ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *लोणंद*
  *०२/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,




Also available at

👇karawadikarad.blogspot.com


नीरा नदीच्या काठी निरा गावात राहण्याचा अनुभव खरच वेगळा होता. सकाळी सर्व विधी आटोपले.  माऊलीं नीरास्नान ज्या ठिकाणी होणार आहे त्या नीरा नदी काठी पुलावर आलो .नीरा पुल पुणे जिल्ह्याच्या हद्दीत  तर पुल संपल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता. सात दिवसानंतर आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार होतो. समोरच पुलाच्या शेवटी सातारा जिल्ह्यात आपले स्वागत करत आहे असा बोर्ड लावला होता. सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी नदी पुलावरून पात्राचे दर्शन घेतले.

निरेच्या पात्रांमध्ये वारकरी स्नान घेत होते .वरुन धो धो पाऊस पडत होता. निरा पुलावर वारकऱ्यांची गर्दी होती. हे सर्व मोकळ्या समाजातील वारकरी पुढे येऊन आपल्या सकाळच्या सर्व विधी करण्यासाठी निवारा शोधत होते.

काल रात्री नीरा पुलावर पाहणी करायला आलो तेव्हा पुलाच्या फुटपाथवर असणारा चिखल व घाण याबाबत सातारच्या कलेक्टर श्वेता सिंघल यांना फोन करून कल्पना दिली होती. सिंगल मॅडम याची तात्काळ दखल घेत स्वच्छता करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे पूल स्वच्छ झालेला पाहून लक्षात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन असो वा पुणे-सोलापुर  प्रशासन असो कायमच कार्य करत असते. माऊलींचा सोहळा सुसह्य होण्यासाठी प्रशासनाचे मिळणारे सहकार्य खरच उल्लेखनीय असते. जिल्हा परिषद पंचायत समिती पोलीस यंत्रणा महसूल विभाग आरोग्य विभाग शेती विभाग या सर्व विभाग वारकऱ्यांच्या सोयीसाठी सदैव कार्यक्रम असतात वारकऱ्यांना काही कमी पडू देत नाहीत. नीरा नदीकाठी वैष्णवांचा भरलेला मेळा पाहून खूप आनंद झाला.




पुढे येऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आलो आपल्या जिल्ह्यात असे म्हणत सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला. लोणंद मध्ये येत असताना रस्त्याकडेला नेहमीप्रमाणे अनेक ओळखीचे पोलीस कर्मचारी भेटत गेले. अधिकारीही दिसले. दुपारी लोणंद मध्ये पोहोचल्यानंतर गजानन प्लॅनेट्सचे विवेक राव यांच्या घरी जाऊन चहा पाणी घेतले. माऊलीची पालखी यावेळी निरा स्नानासाठी नदीपात्रात नदीकाठाला होती, अतिशय भावपूर्ण वातावरणात माऊलींना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.सहाच्या सुमारास माऊलींची पालखी लोणंद मध्ये पोहोचली. लोणंदकरानी माऊलींचे भक्तिभावात स्वागत केले. नेहमीप्रमाणे लोणंदमध्ये ही माऊली पोहोचल्यानंतर थोडा पाऊस पडला.

लोणंदच्या पुढे असणाऱ्या चांदोबाचा लिंब येथे आमचे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुढे चालत चार किलोमीटर अंतरावर डॉक्टर काकडे यांच्या आत्मश्री आयुर्वेदिक केंद्रामध्ये आलो.

माऊलीच्या नामघोषात गेल्या सात दिवसांपासून पंढरीच्या वाटेचे अंतर कसे कमी होत आहे हेच कळत नाही. तरीपण सातारा जिल्हा आल्यानंतर आपल्या गावात आल्याचा आनंद खूप होत आहे. लोणंदला आल्यानंतर वारकरी आज दीड दिवस थांबणार आहेत. इथे लोणंदच्या पाठीमागे आणि पुढे अनेक गावात वारकरी मुक्काम करत आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्थानिकांनी मोफत चहा पाणी पिण्याचे पाणी याची व्यवस्था केली आहे. लोणंद मध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाने पाण्याचे टँकर उभे केले आहेत.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान .

माऊलीची कृपा दुसरे काय !



🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०२ जुलै २०१९

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

राम कृष्ण हरी,

जेजुरी मध्ये मुक्कामाची चांगली सोय झाली होती, रात्री झोप चांगली मिळाली मात्र सकाळी सहा वाजता पालखीतळावर या असा निरोप रामभाऊ चोपदार यांनी दिला होता. पहाटे पाच वाजता जेजुरीच्या गडावरून करून भोंगा वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली, उठलो. पटकन तयार झालो. सहा वाजता जेजुरी पालखी तळावर पोहोचलो. नियोजित वेळेप्रमाणे बरोबर सहा वाजता माऊली साठी खास तयार केलेल्या मोठ्या या गडद हिरव्या रंगाच्या तंबूमध्ये पालखीत ठेवलेल्या माऊलींच्या पादुका भावपूर्ण वातावरणात माऊली नामाचा जयघोष करत उचलण्यात आल्या. या पादुका रथामध्ये ठेवल्यानंतर लगेच नगारा वाजला आणि पालखी सोहळा वाल्हेच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज झाला.



पालखीतळावर काय शिस्त असते, पालखीचा मुक्काम आटोपून दुसर्‍या गावाकडे जाताना त्या ठिकाणी काय वातावरण असते काय नियम असतात,असते हे सकाळी सहा वाजता पहावयास मिळाले. इतक्या लवकर पालखी निघणार असल्यामुळे सर्व सुमारे 400 दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी तळावर येऊन थांबले होते. राजाभाऊ चोपदार यांनी विणेकरांची हजेरी घेण्यास सुरुवात केली होती. सोहळ्यात सहभागी असणाऱ्या दिंड्याच्या मालकांना रोज हजेरी देणे गरजेचे असते .दिंडी मालकांच्या वतीने त्या दिंडीचा विणेकरी हजेरी देण्यासाठी येतो. पालखी तळाच्या परिसरात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किंवा अगदी जवळपास कोठेही त्या दिंडीला मुक्कामाची जागा मिळालेली असते. त्याठिकाणाहून संबंधित दिंड्याचे विणेकरी आणि झेंडेकरी सोहळा सुरू होण्याच्या वेळेअगोदर तळावर येऊन थांबतात, ओळीने दिलेल्या क्रमानुसार उभे राहतात. विणेकरी हजेरी देतात, रथा समोरील 27 दिंड्यांची हजेरी अगोदर होते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या नोंदणीकृत 251 दिंड्या आणि त्याचे विणेकरी हजेरी देताना माऊलींचा पालखी पादुका मध्ये ठेवल्यानंतर त्या तंबूमध्ये असलेल्या कट्टाचे दर्शन घेतात, आणि बाहेर बाहेर उभे असलेल्या चोपदारांच्या कडे हजेरी देतात अशी पद्धत आहे. ही माहिती मिळाल्‍यानंतर आम्ही वारकरी  या मासिकाचे संपादक सचिन पवार यांना भेटावयास गेलो आम्ही वारकरी संस्थेतर्फे तरुणांसाठी वेगळा उपक्रम वारी विथ विसडम पवार यांनी यावर्षी राबवण्याचा निर्णय घेतला होता



पंढरीची वारी काय आहे याचा अप्रुव सगळ्यांनाच आहे.वारी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असते अशाच उत्सुकता असणाऱ्या राज्यभरातील आस्तिक-नास्तिक 100 विद्यार्थ्यांना यावर्षी वारीमध्ये *वारी विथ विसडम* या उपक्रमाच्या माध्यमातून वारीची माहिती सांगितले जाणार आहे. आम्ही वारकरीचे संपादक सचिन पवार माऊली हे वारकऱ्यांना विद्यार्थ्यांना वारी कशी चालते, वारी मध्ये काय उपक्रम असतात आणि वारी कोणी सुरू केल्यापासून  दिवसभरात वारीत उपक्रम काय असतात याची माहिती विद्यार्थ्यांना देत होते.

तळावरील हा दोन उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर बाहेर पडलो. अचानक ओ मोरे माऊली असा आवाज आला. पाठीमागे पाहतो तर एक विणेकरी मला बोलावत होते. या विणकरी माऊरलीकडे पाहून मी इतका आनंदित झालो की माझा आनंद सांगू शकत नाही.माझे चुलते पण जी मोरे यांची मुलगी, माझी चुलत बहीण वैशाली रहिमतपूर येथे आत्याच्या मुलाला दिली आहे. आत्याचा मुलगा संजय म्हणजे आमचे दाजी. या लग्ना अगोदर पासून संजय दाजी यांचे करवडी मध्ये सतत येणे-जाणे होते, मी ही अनेक वेळा रहीमतपुरला त्यांच्या घरी राहून आलो आहे.  हे दाजी  एका दिंडीचे विणेकरी होते.

 संजय दाजी यांची माझी भेट जवळजवळ पाच सहा वर्षानंतर झाली असेल. गेली काही वर्षे संजय दाजी यांनी पूर्ण परमार्थाचा मार्ग स्वीकारून एक वेगळ्या पद्धतीचे जीवन ते जगत आहेत. मध्यंतरी त्यांच्या घरातील काही कार्यक्रमाला मला जाणे जमले नव्हते. संपूर्ण भारत भ्रमण करून आलेल्या पारमार्थिक विचारांचा वसा घेतलेल्या संजय पवार दाजी यांना भेटण्याची इच्छा मला खूप दिवसापासून होती. ती भेट माऊलींच्या पालखी सोहळ्यात झाली. मला खूप आनंद झाला. आम्ही दोघांनी एकमेकाच्या पायाचे दर्शन घेतले , कडकडून मिठी मारली. संजय दाजींना यांना विणकरीच्या रुपात पाहून खूप खूप आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, त्यांच्यासोबतच पालखी मधून पुढे चालत आलो. जेजुरी लोणंद रस्त्यावर पालखी येताच मी त्यांचा निरोप घेतला आणि जेजुरी गडावर जायला निघालो.

*जेजुरीच्या गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले.  जेजुरीमध्ये मल्हारराव होळकर यांच्या वंशजांनी बांधलेले छत्री मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे .या मंदिराविषयी यापूर्वी ऐकले होते या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील नंदी 6 फुटी आहे. एक वेगळे मंदिर पाहिल्याचा आनंद झाला.या मंदिराचा व्हिडिओ आणि माहिती आपणास पाठवून देत आहे अवश्य ऐका*.

 9 वाजता पुन्हा वाल्ह्यांच्या दिशेने चालायला सुरुवात सुरुवात केली. वाल्हेचा घाट आणि घाटांमधील अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणे यामुळे वारकऱ्यांना चालणे कठीण होते त्यातच पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.

मात्र या कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत होते चिखलातून दगडातून पाण्यातून आपली वाट पार पाडत भरपावसात साडेबाराच्या सुमारास माऊलींची पालखी वाल्हे गावाजवळ पोहोचली. दुपारी एक वाजता पालखी तळावर पोहचली, समाज आरती झाली. पाऊस उघडल्यावर दुपारच्या पंगती पडल्या. त्यानंतळ थकलेल्या माऊलींनी आराम केला. काही जण कपडे धुवायला गेले, काहीजण वाल्या कोळीच्या डोंगरावर वाल्मिक ऋषीच्या दर्शनासाठी गेले काही जण निवांत तंबूमध्ये पडून राहिले. कराडकर यांच्या बारा नंबर दिंडीमध्ये जेवण झाल्यानंतर ह. भ .प. बंडातात्या कराडकर यांची एक मुलाखत घेतली .दुपारचे दोन वाजले होते, वाल्यामध्ये न राहता पुढचा प्रवास सुरु करावा,असा निर्णय घेतला आणि चालायला सुरुवात केली.




साडेपाच वाजता नीरा नदी जवळ पोहोचलो ,नदीच्या पलीकडे गेल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता.आपल्या जिल्ह्यात प्रवेश करण्याची उत्सुकता होती.दरम्यान निरेत कुठे राहायचे या बाबत अगोदरच फोनाफोनी झाली होती.माझे लहानपणीचे जुने मित्र श्रीधर नलवडे यांची एक बहीण नीरा येथे शिक्षिका होते ते अनेक वर्षे निरेत राहत होते, त्यांना फोन करून निळ्या मध्ये कुठे राहायची व्यवस्था होती का अशी विनंती केल्यानंतर आमच्या बहिणीने लगेच घर मालक तुषार आगवणे  यांच्या घरी राहायला जावा सांगितले. सधन शेतकरी आणि तितकेच मनाने श्रीमंत असलेल्या या आगवणे कुटुंबाने  आमचे अतिशय मनोभावे स्वागत केले, पाहुणचार केला.नीरा मध्ये चांगल्या ठिकाणी राहायला मिळाल्यामुळे खूप आनंद झाला,

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली माऊली.

Also available at

👇karawadikarad.blogspot.com




🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०१ जुलै २०१९

राम कृष्ण हरी,
दोन दिवस माऊलींचा पाहुणचार सासवडमध्ये अतिशय उत्तम झाला.माऊलींच्या आगमनाने सुखावलेल्या सासवडकरांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही दोन दिवस माऊली पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या सुमारे साडेतीन लाख वारकऱ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. दोन दिवस सासवडमध्ये भक्तीचा महापूर वाहत होता.वारकऱ्यांसाठी अनेकांनी आपली घरी खुली केली होती. घरात, घराबाहेरील शेडमध्ये, फ्लॅटमध्ये, पार्किंगमध्ये ,हॉटेलच्या परिसरात , कंपनीच्या कंपाऊंडमध्ये ,एसटी स्टँड दुकान जिथे मिळेल त्या जागेवर वारकरी आराम करत होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी परिसरातील नागरिकांनी चहापाणी नाश्ता सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या.

सासवडमधील नदीमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता थोडी फारसे पाणी आले ते दोन दिवस पडलेल्या पावसामुळे. शेतीसाठी पाणी अजिबात नाही, दोन-तीन दिवस पिण्याचे पाणीही येत नाही.पिके करपली आहेत ,अशी परिस्थिती असतानाही वारकऱ्यांसाठी पाणी,  बोअर उपलब्ध करून दिली. प्रशासनाने जागोजागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी मदत केंद्र उभे केले होते. वारकरी सकाळी जेजुरी च्या दिशेने रवाना झाले




नऊच्या सुमारास आम्ही आम्ही बाहेर पडलो. सासवडच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी विसावला होता, या ठिकाणी अनेक वारकरी थांबले होते .काल एकादशी होती .द्वादशी आज उपवास सोडायचा होता. उपवास सोडण्यासाठी न्याहरी आणली होती. काहीनी सार्वजनिक मंडळाने दिलेला नाश्ता खाऊन उपवास सोडला. विसाव्याच्या ठिकाणी दोन वर्षानंतर बाबा महाराज यांचे नातू हभप चिन्मय महाराज आणि भगवती महाराज सातारकर यांची भेट झाली. कराडच्या किर्तन महोत्सवच्या आठवणींना उजाळा दिला .चिन्मय महाराजांची पुढारी आँनलाईन साठी मुलाखत घेऊन पुढे चालू लागलो.

पुण्यातील टेकडी ग्रुपचे पंधरा-वीस वारकरी सासवड ते जेजुरी असा टप्पा पार पडणार होते. या ग्रुप मध्ये पुण्याचे नवीन पाहुणे थोरात साहेब भेटले. या ग्रुपसोबत सातारा जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पराड साहेब हे होते. मी त्यांची मुलाखत घेतली मात्र सुरुवातीला त्यांना ओळखले नाही त्यांनी स्वतःहून आमच्या सातारा भेटीविषयी आठवण करून दिल्यानंतर खूप आनंद झाला.


पुढे पुढे चालत राहिलो रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेले कराड ट्राफिक पोलीसचे वरिष्ठ कर्मचारी पाटील माझगावकर भेटले , त्यांनी आम्हाला चहा पाजला .

आम्ही हळूहळू पुढे वाटचाल केली. चारच्या सुमारास जेजुरीला पोहोचलो आणि जोरदार पावसाला पुन्हा यायला सुरुवात झाली. धो-धो पावसाने वारकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. पूर्वनियोजित मुलाखत आणि बातमीच्या कामानिमित्त पेशवे लॉज येथे पोचलो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही काही कार्यकर्ते एका बातमीच्या विषयासाठी वाट पाहत बसले होते. त्यांच्याशी झालेल्या फोनवरून चर्चेनंतर सासवड नगरपालिका येथे सभागृहांमध्ये दोन तास बसलो. वेगळी माहिती मिळाली या विषयीची बातमी दोन दिवसात पुढारी मध्ये प्रसिद्ध होणार आहे. सेवाभाव काय असतो याचे मूर्तीमंत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनुभवायला आले.

सासवड पालिकेच्या इमारतीसमोर वारकऱ्यांनी जागा व्यापली होती. त्यानंतर पुढे सायंकाळी पालखीतळावर पोहोचलो. कराडकरांच्या दिंडीत जेवण केले  माहिती घेत बसलो आणि रात्री उशिरा झोपायचं निघालो. एकंदरीत आजचा दिवस चांगला गेला.


🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩
*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com

३० जून २०१९

राम कृष्ण हरी,

शुक्रवारी सायंकाळी माऊलींचा पालखी सोहळा सासवड मध्ये पोहोचला,तेव्हा माऊलींचे स्वागत जोरदार पावसाने केले होते.सासवडमध्ये माउलींनी पाऊस आणला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या पावसाने पालखीतळावर दिंडी मालक आणि वारकरी माऊलींची दैना उडवली,पाऊस थोड्या वेळाने थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र सायंकाळच्या पंगती बसण्याच्या वेळेत पावसाने आणखी जोर धरला. पालखी तळ आणि परिसरात मुक्कामाला असलेल्या अनेक दिंड्यांमध्ये स्वयंपाक तयार झालेला होता. मात्र जेवायचे कसे असा प्रश्न  होता. पावसाची धार सुरू होती शेवटी बुफे सिस्टीम लावून जेवण सुरू केले. काही वारकर्‍यानी तंबूत बसून जेवण आटोपले.अनेकांची गैरसोय झाली.दिवसभर सुमारे तीस किलोमीटर चालल्यानंतर माऊलींना भूक लागली होती. त्यामुळे भर पावसात कुठेतरी बसून, उभे राहून मिळेल ते, मिळेल तसे वारकर्‍यानी जेवण केले. दहा वाजले तरी पाऊस थांबला नव्हता.



जेवणाचा प्रश्न मिटला मात्र आता झोपायचे कसे आणि कुठे? तंबूच्या चारी बाजूने पावसाचे पाणी वाहत होते. या तंबूत रात्र कशी काढायची असा प्रश्न होता? तंबूचे कापड पहिल्या पावसात भिजते तेव्हा पाणी आत झिरपते, पुढे पुढे ठिक होत जाते . पहिलाच पाऊस असल्यामुळे अनेक तंबू गळत होते. मात्र हार मानतील ते वारकरी कसले? परिस्थितीला सामोरे जाणे आणि तडजोड करणे हे फक्त वारकरीच करू शकतात, याचा प्रत्यय सासवडमध्ये आला. वारकऱ्यांनी प्रशासनाविरोधात कसलीही तक्रार न करता पावसाला तोंड दिले.दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊलींनी पाऊस आणल्याबद्दल सासवडकर मात्र खुश होते.



आमच्या कराडकर 12 नंबर दिंडी मध्ये फार वेगळी परिस्थिती नव्हती,या ठिकाणी तंबूमध्ये पाणी घुसले होते. खालची जमीन  पाण्याने झिरपली होती. अंथरलेले कागद कार्टून ओले झाले होते. पाऊस सुरूच होता आता येथे रहायचे कसे हा प्रश्न पडला. शोधाशोध सुरू झाली. याच दरम्यान प्रकाश पाटील आणि रणजित पाटील यांच्या कराड मधील एका मित्राचा फोन आला. सासवडमध्ये माझी सासरवाडी आहे तिकडे राहायला जाता का? असे त्यांनी स्वतःहून विचारले. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे ,अशी आमची अवस्था झाली. आमचे ध्यानी मनी नव्हते ते माऊलींनी पाठवले होते.

कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर असणारे साँ मिलचे मालक दीपकशेठ पटेल यांचा मुलगा निलेश याची सासरवाडी सासवड आहे. निलेश यांनी तात्काळ आपले मेहुणे राज पटेल यांना फोन करून माझे कराडचे मित्र तुमच्याकडे झोपायला येत आहेत,त्यांची व्यवस्था करा असे सांगितले.पंधरा मिनिटात राज पटेल आणि त्यांचे वडील सासवडच्या शिवाजी पुतळा चौकात भर पावसात आले आणि त्यांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले.

गणेश मंगल कार्यालयाच्या शेजारी त्यांनी नुकतेच एक नवीन घर बांधले आहे, खाली बेसमेंट, मध्ये दुकान गाळे आणि पहिला मजला निवास असे हे घर होतं. या घराची अद्याप वास्तुशांती झालेली नव्हती. या घरात पटेल बापलेक आम्हाला घेऊन आले. त्या घरात पोहोचल्यानंतर पाहिले तर अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेल्या या तीन मजली घरांमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आमची व्यवस्था केली. या घराचे अजून वास्तुशांती झाली नाही त्या ठिकाणी पटेल पितापुत्रांनी आमच्यासाठी खूप कमी कालावधीत लाईट व्यवस्था, पाणी बादली या सर्व आणून दिल्या.अतिशय सुंदर अशा या नवीन घराची त्यांनी आम्हाला दारे उघडून माऊली निवांत रहावा,काही गरज लागली तर मध्यरात्री फोन करा असे नम्रपणे सांगितले.



माऊली काय चमत्कार करतात याचा प्रत्यय याची डोळा याची देहा पाहायला मिळाला.आमच्या डोळ्यातून आता पाणी यायचेच बाकी होते.आपल्या जवळच्या कोणीही पाहुण्याने असा वास्तुशांती न झालेला सुंदर बंगला आपल्याला दिला असता का असा प्रश्न डोळ्यासमोर उपस्थित झाला.माऊलीचं हे करू शकतात,त्यामुळे आम्ही कृत्य कृत्य होऊन माऊलीपुढे नम्र झालो.

रात्री उशिरा झोपी गेलो, सकाळी उठलो तर त्या बंगल्यातील टाकीचे पाणी खूप थंड होते. रात्रभर पाऊस चालूच होता.टाकीमधील साठलेल्या थंड पाण्याने आंघोळ करायचे जीवावर आले. बाथरूमचे काँक फिरवले असता सोलरचे कडक गरम पाणी वाहू लागले. पुन्हा एकदा माऊलीचा महिमा पाहायला मिळाला.आदल्या दिवशी गारठून गेलेले शरीर गरम पाण्याने अंघोळ करून आम्ही शेकून घेतले.आंघोळ झाली आणि त्यानंतर आम्ही पालखी तळाकडे माऊली दर्शनासाठी गेलो.

पालखीतळावर फार वेगळी परिस्थिती नव्हती रात्रभर पावसात झाल्यामुळे तळावरील अनेक तंबूमध्ये पाणी शिरले होते .कोणी कपडे सुकवत होते, तंबुमधील पाणी बाहेर काढत होते तर कोणी चिखलातून वाट काढत इतर कामासाठी जात होते. तळावर असलेल्या  सोहळ्याचे मुख्य चोपदारांच्या तंबूमध्ये गेलो. राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांच्याशी सुमारे तासभर गप्पा मारल्या, वारीसह वेगवेगळ्या विषयांवर बोललो. त्यानंतर माऊली दर्शनासाठी निघालो. मसूरचे लंगडे काका तिथे भेटले



यादरम्यान कराडमध्ये काम केलेले पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांची भेट झाली. त्याचसोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोलीसांनी पालखीतळावर येणाऱ्या भाविकासाठी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता. सासवड परिसरात माऊलीं पालखीचे आगमन म्हणजे दसरा-दिवाळी सण असतो. परिसरातील ग्रामस्थ, भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येतात. हा दिवस माऊली उत्सवाचा दिवस असतो. माऊली दर्शन घेऊन तृप्त झालो. एकंदरीत आजचा दिवस नेहमीप्रमाणे खूप सुंदर गेला.


Also available at

👇karawadikarad.blogspot.com

२९ जून २०१९


राम कृष्ण हरी,

पुण्यातील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळी आम्ही सासवडच्या दिशेने चालायला निघालो. (त्यामुळे दोन दिवस ब्लाँग नव्हता ) पुणे ते सासवड हे अंतर सुमारे बत्तीस किलोमीटर आहे. एका दिवसात हे अंतर पार करणे म्हणजे खूप अवघड काम असते. माऊली पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या पूर्णवेळ वारकऱ्यांना हे अंतर काहीच वाटत नाही मात्र आमच्यासारख्या मोकळा समाजात फिरणाऱ्या वारकऱ्यांना हे आव्हानच असते, हाच विचार करून नवा रस्ता पेठ ते दिवे घाट हे अंतर आम्ही कालच रात्री परवा चालून पूर्ण केले होते.

आज दिवेघाटात सकाळी दहाच्या सुमारास पोचलो आणि चालावयास सुरुवात केली. रस्त्यावर दुतर्फा मोकळा समाजातील वारकऱ्यांची आणि छोट्या-मोठ्या दिंडी यातील वारकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घाटाच्या पायथ्याशीच आम्हाला पुढारी ऑनलाइनच्या वृत्तांसाठी एक ज्येष्ठ वारकरी भेटले, गळ्यात तुळशीच्या अनेक माळा, फक्त धोतर नेसलेले हे वारकरी पुढारीचा बूम माईक पाहून माझ्याकडे धावत आले.त्यांना विचारले वारीतून तुम्हाला काय मिळते तर ते बोलू लागले ,मी नाशिकहुन आलो आहे,गेली अनेक वर्षे मला डॉक्टरांनी रक्तात साखर जास्त असल्याचे सांगितले आहे, मात्र मी एक गोळी खात नाही,प्रत्येक वर्षी पंढरीची वारी करतो. या वारीतून मला पुढील वर्षभर नामाचे टॉनिक मिळते आणि पूर्ण खडखडीत बरा होतो,असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या वारकऱ्यांच्या भावना असतात या वारकऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही दिवेघाट चारावयास सुरुवात केली.



ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा यादरम्यान हडपसर च्या पाठीमागे होता मात्र सोहळ्याच्या पुढे चालणारे मोकळ्या समाजातील अनेक वारकरी दिवेघाटात पोहोचले होते, सोहळ्यातील प्रमुख दिंड्यांचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक तसेच मोकळ्या समाजातील दिंड्यांचे ट्रक घाटाच्या उजव्या बाजूने वर जात होते तर वारकरी डाव्या बाजूने घाटात चालत होते. वारकऱ्यांचा उत्साह हळूहळू वाढत होता. खुल्या समाजातील वारकऱ्यांना स्वतःचे साहित्य वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नसते, त्यामुळे ते त्यांचे साहित्य डोक्यावर घेऊनच पुढे चालत असतात. डोक्यावर मोठी बॅग घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी त्यांच्यासोबत असलेले पुरुष वारकरी आणि अशा प्रकारच्या दिंड्या मध्ये असणारे एक वेगळी व्यवस्था पहावयास मिळाली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी मराठी भाषा बोलतात मात्र त्यांच्या बोलण्यावरून ते कोणत्या भागातून आले असतील याचा अंदाज येतो.त्यांच्या सोबत गप्पा मारत घाटावरील वळणावर थांबत थांबत आम्ही दिवे घाट चढत होतो .रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक पाण्याचे टँकर उभे होते या टँकरमध्ये वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. टँकरमधील पाणी व्यवस्थित न पिता अनेक वारकरी पाणी वाया घालवत होते, हे पाहून रणजीत पाटील यांनी वारकऱ्यांना चढ्या आवाजात सुनावले, 'जे पाणी वाया घालवणार त्यांना माऊली नाही भेटणार',असा गोड दम देऊन  नाना पुढे चालत होते. घाटाच्या कट्ट्यावर काही वारकरी बिड्या ओढत निवांत बसले होते ,काहीजण तंबाखू खात होते. यांना पाहूनआम्हाला तुमच्या बिडीचा त्रास होत आहे  तुम्ही धूम्रपान करू नका. 'जो वारीत बिडी ओढणार त्याला माऊली वरचा रस्ता दाखवणार',अशा प्रकारचा दुसरा एक गोड दम देऊन आम्ही पुढे चालू लागलो.

पाय नसलेला एक वारकरी पांगुळगाड्यावरून घाट चढत होता. दोन्ही हाताने तो गाडा ढकलत होता, त्याच्या मदतीला अनेक वारकरी गाडा ढकलण्यासाठी पुढे येत होते तर काही जण त्याच्या मदतीसाठी डब्यामध्ये पैसे टाकत होते. अपघातांमध्ये पाय गेल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी केलेला संकल्प पूर्ण पाडण्यासाठी मी वारी सुरू केली गेली, अनेक वर्षे वारी करतोय असे त्या दिव्यांग वारकर्‍यांने सांगितले.

आम्ही पुढे चालत होतो घाटाच्या शेवटच्या दोन वळणावर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ओबी व्हॅन उभ्या होत्या, या कॅमेरासमोर येऊन काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न काही दिंडीतील वारकरी करत होते. दिवे घाट जिथे संपतो त्या अगोदर एक छोटीशी गुहा आहे आणि त्याच्या शेजारीच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. त्या गुहेमध्ये बसून फोटो काढण्याचा मोह अनेकांना होतो,आम्हीही तो पूर्ण करून घेतला. शेजारच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत चहा वाटप सुरू होते तर समोर सेवाभावी कार्यकर्ते अक्षरशः वारकऱ्यांना थांबवून,विनंती करुन त्यांना चहा देत होते. थंड हवा वाहत होती, पाऊस येण्याची शक्यता होती त्यामुळे आम्ही पुढे लवकर निघालो.



घाट माथ्यावर असलेल्या झेंडेवाडी गावात ग्रामस्थांनी,परिसरातील सेवाभावी संस्था आणि पुण्यातील अनेक मंडळांनी अनेक मदतीचे स्टॉल उभे केले होते .पुण्यातील सालासर हनुमान चालिसा मंडळाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक कक्ष उभारला होता. या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांचे पहिल्यांदा गरम पाण्याने हात-पाय धुतले जात होते, त्यानंतर त्यांच्या पायाला, बोटांना, गुडघ्यांना मॉलिश करून त्या वारकर्यांचे वेदना कमी करण्याचा हे लोक प्रयत्न करत होते. यामध्ये महिलांचाही सक्रिय सहभाग होता. पुण्याच्या योग विद्या संवर्धन मंडळाने आदरणीय डॉ. पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा कक्ष उभारला होता. आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी या कक्षांमधील अनेक सेवेकरी हृदयापासून काम करत होते.

घाट माथ्यावर वारकऱ्यांसाठी चहापाणी,फराळ ,केळी,आम्रस  लिंबू सरबत,जेवण या सर्व सुविधांची रेलचेल होती.सेवा भावी संस्थांचे कार्यकर्ते वारकऱ्यांना आदरातिथ्याने खाऊच्या वस्तू घेण्यासाठी विनंती करत होते. यामध्ये तरुणांचा सहभाग नोंदणीय होता. झेंडेवाडीत एक तास आराम केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरु केला, तत्पूर्वी कुठे जेवण मिळते का याचा शोध घेऊ लागलो.मात्र त्याच वेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला.आम्ही आडोसा शोधत एक छोटस हॉटेल गाठलं.अचानक जोरात पाऊस झाल्यामुळे वारकरी भांबावून गेले. आम्ही तिथेच बसून राहिलो पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता, भूक खूप लागली होती शेवटी तिथेच मिसळपाव खाऊन घेतला.तिथून हळूच बाहेर येऊन पावसात भिजत नाम नामामध्ये चिंब झालेल्या वारकऱ्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढले.दिवेघाटात जाऊन काही फोटो काढले,वारकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.घाटात वर येणारी वाहने आणि वारकरी यांची झालेली गर्दी त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र पोलिस यंत्रणेने अतिशय चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला. या संपूर्ण वारीत पोलिसांचे सहकार्य खरंच वाखाणण्यासारखी असते. एरव्ही डोळे वटारुन थांबवणारे पोलीस या वारीत वारकऱ्यांना  'माऊली' नावाशिवाय बोलवत नाहीत.

तीनच्या सुमारास पाऊस कमी झाला आणि पुढचा प्रवास सुरु केला,माऊलींची पालखी अजून उरळीकांचन मध्ये होती. त्यामुळे आम्ही पुढे चालू लागलो. भिजलेले वारकरी रस्त्याकडेला थांबून कपडे सुकवण्याचा प्रयत्न करत होते. काहीजण ट्रक खाली बसून जेवण करत होते, तर काही जण रस्त्यावर पडलेला कचरा केळीच्या साली,चहाचे कप उचलत होते. पुण्याच्या रिँबिंनहूड या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांचे मला चांगलेच अप्रुव वाटले, हे कार्यकर्ते वारकऱ्यांना लिंबू सरबत देत होते त्याच वेळी वारकऱ्यांनी रस्त्यावर टाकलेले कप व इतर कचरा ते गोळा करत होते.अधिक माहिती घेतली असता ही संस्था पुण्यातील हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले अन्न गोळा करून रोज झोपडपट्टीमध्ये पोहच करतात, अशी माहिती मिळाली. या कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप देऊन पुढे निघालो. रस्त्याकडेला असणाऱ्या अनेक घरांमध्ये वारकरीही विसावले होते. स्थानिक ग्रामस्थ त्यांना चहा पाणी विचारपुस करत होते  यामध्ये छोटी मुलेही कमी नव्हती. आईने तयार करून दिलेला चहा रस्त्यावर आणून वारकऱ्यांच्या वाटणाऱ्या दोन छोट्या चिमुकल्यांचं मला फार कौतुक वाटलं.लेकीची आठवणी झाली. राम कृष्ण हरी !


अजून सासवड सहा किलोमीटर होते.सासवडच्या परिसरात असणाऱ्या बोराच्या सीताफळाच्या बागा पाहत पाहत गप्पा मारत ,माऊलींचे नाम घेत आणि मधूनच वेगळे फोटो काढत आमचा प्रवास सुरू होता. भिजलेले कपडे आता अंगावरच पूर्ण सुकले होते. सासवडला कधी पोहोचणार याचे वेध लागले होते. थंडीमुळे,भिजल्यामुळे पाय खूप दुखत होते मात्र बसायला कुठे जागाच नव्हती. सगळीकडे चिखल आणि ओलसर जागा होती,त्यामुळे चालतच राहिलो.

साडेपाचच्या सुमारास सासवडमध्ये शाळा नंबर 4 मध्ये बारा नंबर दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. कारमध्ये बसून वेगळी बातमी आणि ब्लॉग तयार केला. सासवड मध्ये गेले चार दिवस पाणीपुरवठा आला नव्हता, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येते अशी माहिती मिळाली. मात्र प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी,वारकऱ्यांच्या सेवेसाठी दमदार तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. थोडा आराम करून शेजारीच असलेल्या सोपानकाकांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या ठिकाणी चर्चा करताना खरात माऊली यांनी हातात शस्त्र नसणारे तीन देव आहेत आणि हे देवच जगाला शांतीचा मार्ग दाखवतील असे सांगितले.पंढरपुरचा विठ्ठल ,भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या तिघांच्या हातात कसल्याही प्रकारचे शस्त्र नाही. विनाशस्त्र या तिन्ही देवांनी भक्तीचा वेगळा मार्ग सांगितला आहे, ही एक वेगळीच माहिती आज ऐकावयास मिळाली. पंढरीच्या वारीत खूप काही शिकायला मिळते,आजही मिळाले.

बारा नंबर दिंडीमध्ये असणारे तंबू मध्ये आपले साहित्य घेऊन ठेवून पुन्हा लिहित बसलो,पावसाची पिरपिर चालू होती,आज रात्रभर असाच पाऊस राहिला तर थोडे वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे.मात्र सासवडमध्ये असणाऱ्या सुमारे तीन लाख वारकऱ्यांची काळजी माऊली घेणार आहेत.त्यामुळे कसलीच अडचण येणार नाही.

राम कृष्ण हरी माऊली !

 😌जय माऊली😌

माऊली सतीश मोरे

Also available at
👇karawadikarad.blogspot.com

👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2463181780404657&id=100001385769226

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...