दिनांक 3 जुलै
जेजुरी सतीश मोरे
सासवडचे दोन मुक्काम झाल्यावर खरी वारी सुरू झाली. म्हणजे आळंदी ते पुणे ते सासवड दरम्यान तंबूत रहायची संधी सासवडला मिळते. तंबूत रहायचा आनंद, मजा आणि सजा दोन्ही सकारात्मक घेऊन खरंच हा एन्जॉय घेतलाच पाहिजे. दोन दिवस सासवडला तंबूत राहीलो. आज म्हणजे रविवारी ममुक्कामाला जेजुरीला जायचे होते. सकाळी दोन वाजता आमच्या तंबूतील एक जण चावळत ओरडले, सारे जागे झाले. बाहेर काहीजण उठले होते.
नुकताच जोरदार पाऊस पडून गेला होता. चला उठा आता सारे म्हणून त्याच व्यक्तीने सर्वाना जागे केले. खुप झोप आली होती, पण इतर जण उठून बॅगा भरत होते. मी पण पॅक करून माझे अंथरूण ट्रक मध्ये नेऊन ठेवले. सारे तयार होऊ लागले, नैसर्गिक विधी साठी वारीत मोकळ्या रानात जावे लागते. हा फार मोठा योग असतो, पण तो योग झाला की दिवसाचे काम होते, दिवस आनंदात जातो.
तयार होऊन साडे तीन वाजता आम्ही 15 जणांचा ग्रुप जेजुरीला जाण्यासाठी बाहेर पडलो. पावसाचा अंदाज होता, त्यामुळे रेनकोट शर्ट घातला, सॅक पाठीवर घेऊन चालायला लागलो.
रस्त्यावर खुप वारकरी होते, वाहतूक पण सुरू झाली होती. सासवड शहरात पोलीस होते, पण शहराबाहेर जेथे ररस्ते एकत्र येतात, तेथे पोलीस नसल्याने काही काळ विस्कळीत झाली, पण चालणारे वारकरीच पोलीस झाले व वाहतूक कोंडी फोडली. पावणे चार वाजता अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. कुठे थांबायचे, सगळीकडे अंधार, मग आम्ही चालायचे ठरवले. मित्रांनी प्लॅस्टिक कागद खोळ तयार केली. या दरम्यान सगळी कडे खोळ घातलेले वारकरी दिसू लागले. पावसाचा जोर वाढू लागला. पण थांबू शकत नव्हतो, कुठे निवारा नव्हता. चहा टपरी वर काही वारकरी थांबले होते, आम्ही चालत राहिलो.
पाऊस थांबेल असे वाटत होते, पण अर्धा तास झाला तरी सुरूच होता. हळूहळू रेनकोट मध्ये पाणी जाऊ लागले, चहा साठी थांबलो तेव्हा पाहीले रेनकोट पॅन्ट न घातल्याने पाणी जीन्स मध्ये जाऊ लागले आहे. मग पॅन्ट मधील साहित्य, मोबाईल शर्ट खिशात ठेवले. पुन्हा चालू लागलो. सारे वारकरी प्लॅस्टिक कागदाची खोळ करून चालत होते, सारे एकसारखे दिसत होते. आपल्या माणसांची कपडे, टोपी किंवा बॅग कडे लक्ष ठेवून त्याच्या मागेच रहायचे, तरच सारे एकत्र जाऊ शकतो. मधूनच कराडकर माऊली, आहेत का मागे, असा आवाज द्यायचा अन खात्री करून चालायचे. तरीपण अचानक एक मोठी दिंडी आली आणि आमच्या ग्रुप मधील सात जण बाजूला झाले. शोधले पण उपयोग नाही झाला, अखेर आम्ही 8 जण एकत्र चालू लागलो. पावसाचा जोर कायम होता, आता साडे चार वाजून गेले होते. मागे सॅकला हात लावून पाहिले तर खाली पाणी गळत होते. लगेच सर्वाना वारकरी महाप्रवाहातून बाजूला घेतले, बॅगेतील टॅब, पावर बॅक प्लॅस्टिक पिशवीत घालून खरात माऊलीचे बॅगेत सुरक्षित ठेवले, दुसरा मोबाईल लोहार माऊली कडे ठेवायला दिला. सॅक वाॅटर प्रुफ होती पण सलग एक तास पाऊस पडल्यानंतर तिचे काय होणार होते? आता आम्ही झानोबा माऊली तुकाराम चा घोष सुरू केला. अतिशय गोड आवाज असणारे खरात आणि बाळू सकपाळ यांच्या मागे आम्ही भजन करत राहीलो. दोन तास झाले, तीन तास झाले पाऊस सुरूच होता. आता माझी जीन्स कंबरेचा भाग वगळता पुर्ण भिजलेली होती, शर्ट पण भिजला होता. वुडलॅन्ड शुज मध्ये पाणी जाऊन साॅक्स ओले झाले होते. तीन तास ट्रॅकींग इन फुल रेन चा आनंद आम्ही घेत होतो. सर्दीने त्रस्त असूनही पर्याय नव्हता, माझी सर्दी पावसात पळून गेली. मनात विचार आला, येवढे सारे लोक चालत आहेत, अनेकांच्या डोक्यावर काहीच नाही, चपला तुटक्या आहेत, गुडघ्या पर्यंत सारा भाग ओला चिंब झाले आहे, या लोकांना काही होत नाही, मला पण काहीच होणार नाही, माऊली पाठीशी उभे आहेत.
सहा वाजले, पाऊस थोडा कमी झाला. जेजुरी आठ किलोमीटर होते अजून. ठाणे भिवंडी च्या वारकरी सेवा मंडळाचे सदस्य भर पावसात सर्वाना अडवत होते, माऊली गरम शिरा खा, काहीजण प्लेट हातात घेऊन वारकर्याना वाटत होते. आम्ही पण थांबून पावसात उभे राहून नाश्ता केला. फोटो काढून टॅब पुन्हा आत ठेवला. काहीनी घरी फोन केला, कराडला पाऊस आहे का विचारले. पियुशला फोन करून पाऊस अनुभव सांगितला. पुढे चालू लागलो. जेजुरी दोन किलोमीटर अंतरावर होती. तिथे जाऊन काय करायचे, तंबूचा ट्रक मागे होता.सात वाजता निघणार होता. तो ट्रक जरी आला तरी पालखीतळावर पाणी साचले होते, चिखल झाला होता, मग तंबू कोठे उभारणार असा प्रश्न पडला. बाजीराव नाना जगताप यांना फोन केला तर अजून ट्रक निघाला नाही, पाऊस खुप आहे, नऊ वाजतील निघायला, असे त्यांनी सांगितले. काय करायचे जेजुरीला जाऊन, कोठे बसायचे, मी नखापासून डोक्यापर्यत भिजलो होतो, अशा परिस्थितीत ओले कपडे अंगावर ठेवून किती वेळ बसणार, असा विचार केला.
शेवटी जेजुरी पुढारी वार्ताहर नितिन राऊत यांना फोन लावला. माझे सोबत सात लोक आहेत, आम्हाला कुठे तरी रूम द्या, शेड द्या, अडोसा द्या, किमान कपडे बदलून तासभर बसायला जागा द्या, अशी विनंती केली. त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात जखमी असल्याने त्यांना काम होते, खुप गडबड होती, शिवाय माऊली बातमी द्यायची होती, तरीही त्यांनी मोठ्या मनाने घरी यायला सांगितले. पाऊस कमी झाला होता, जेजुरीला साडे आठ वाजता पोहोचलो. घालायचे कपडे मागे ट्रक मध्ये होते, त्यामुळे नवीन ट्रॅक सुट, शर्ट, बनियन, अंडरवेयर खरेदी केली . 9 वाजता आम्ही राऊत यांच्या घरी पोहोचलो, त्यांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले. मोठा हाॅल, एक रूम अटॅच बाथरूम आमच्या ताब्यात दिला. निवांत झोपा, आराम करा, असे सांगून ते कामाला लागले.
दहा वाजता आमच्या पुढे मोठी प्लेट भरून पोहे आले. नाश्ता झाले वर जेवण करून जायचे असे सांगून राऊत साहेब व त्याचा मुलगा जाॅन्टी जेजुरी गडावर न्युज कव्हरेज साठी गेले. आम्ही आराम केला.
आकराच्या दरम्यान आम्ही भजन सुरू केले, बारा वाजता आरती साठी सारे कुटुंब आले. घरातील दु:ख विसरून सारे जणानी आम्हाला जेवण वाढले. बाजरीची भाकरी, मटकीचा रस्सा, पापड, शशेंगदाणा चटणी, लोणचे असा मेनू होता. आग्रहाने त्यानी वाढले. चार वाजेपर्यंत आम्ही त्याचे घरातच आराम केला . आमचा ट्रक ट्राफिक मध्ये अडकला होता, त्यामुळे आणखी काही वेळ थांबलो. पाच वाजता आमच्या मुक्काम ठिकाणी जायला बाहेर पडलो. नवीन पालखी तळावर चिखल असल्याने ट्रक जाऊ शकत नव्हता, त्यामुळे जुन्या तळावर येत आहे, असे बाजीराव नानानी फोनवर सांगितले. आम्ही तिथे वाट पहात बसलो. साडे सहा वाजता ट्रक आला. तिथेही चिखल होता, घाण होती, स्वच्छता केली.
रोज दुपारी एक वाजता तंबू उभारले जातात, आज पावसामुळे साडे सात वाजता हे काम पूर्ण झाले. चिखलात, मिळेल त्या जागेवर नानाच्या नेतृत्वाखाली अशोक शिंदे, महेंद्र तवर, खरात, विजय पवार, विशाल नलवडे, लोहार, बाळू संकपाळ मनोहर जगताप, शिवाजी राव शिरवडेकर , यांनी हे काम पूर्ण केले. दमून आलेल्या वारकरी, टाळकरी यांनी परिस्थिती समजून घेत तंबूचा रस्ता पकडला. स्वयंपाक साहित्याची गाडी आली होती पण पाणी टॅकर नवीन तळावर गेला, अडकला. त्यामुळे स्वयंपाक कसा करायचा प्रश्न होता. कुठुन तरी आठ दहा बादल्या पाणी आणून नामदेव कुंभार, संभाजी कुंभार, दिलीप काकडे याच्या नेतृत्वाखाली संजय काकडे, सुनिल यादव, श्रीपती शिर्के, अरूण साळुंखे, सुरेश काकडे, नामदेव कुंभार या स्वयंपाकी टिमने काम सुरू केले. महिला वर्ग तर या कामासाठी खुप आघाडीवर होता. दरम्यान DYSP मितेष घट्टे यांचे आगमन झाले. कराडकर मठाचे अध्यक्ष माने गुरूजी यांनी त्यांना जेवण करून जावा असा आग्रह धरला. आमचा पाणी टॅकर अडकला आहे, काही तर करा, असेही गुरूजीनी सांगितले. घट्टे सरांनी याअगोदरच आपण कळवल्याचे सांगितले. पाचच मिनिटात साडे नऊ वाजता पाणी टॅकर आला.
इकडे जेवण तयार होत होते, तिकडे दिवसभर कंटाळलेले वारकरी तंबूत बसले होते . दहा वाजता पंगती पडल्या. हातात ताट घेऊनच अनेक जण जेवले, काही जण तंबूत जाऊन बसले.
अजून खुप लिहीता येईल, पण लेखन मर्यादा.
आजचा दिवस कष्टात, पावसात गेला,
आयुष्यात पहिल्यांदा साडे चार तास पावसात चाललो पण कसलाही त्याचा त्रास वाटला नाही. माऊलीनी सारी सोय केली होती.
माऊली माऊली
- सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली
|
रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
०४ जुलै २०१६
पाऊस वाढला अन् वारकर्याचा उत्साह पण
जेजुरी : सतीश मोरे
पंढरीच्या वारीत रविवारी वारकरी भक्ती रसासोबत पावसात पण न्हाऊन निघाले. सासवड ते जेजुरी दरम्यान सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. मोकळ्या समाजातील लाखो वारकरी पुढच्या टप्प्यावर पोहचण्यासाठी सकाळी लवकर निघतात. वारकरी आणि पाऊस यांच्यात जणू वेगाची स्पर्धा लागली होती. दिवसभर हा खेळ सुरू होता. दोघेही जोशात होते. माऊलींच्या नामाचा महीमा आणि राम कृष्ण हरी या मंत्राच्या ताकदीसमोर अखेर पर्जन्यराजा हरला, माऊली जिंकली.
सासवडला दोन दिवस मुक्काम करून सुखावलेले वारकरी रविवारी सकाळी लवकर उठून जेजुरीला जायला निघाले. सासवड जेजुरी अंतर 19 किलोमीटर आहे. अंतर कमी असल्याने माऊली पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे 250 दिंड्या उशिरा निघणार होत्या . सोहळ्यात सहभागी नेहमी दिंड्यातील वारकर्यापेक्षा मोकळ्या समाजात खुप वारकरी असतात. त्यांचे कसलेही वेळापत्रक नसते. केव्हाही निघा, कुठेही थांबा. हे वारकरी सकाळी लवकर उठून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघतात. पहाटे चार तीन पासूनच वारकरी बाहेर पडले होते. चार वाजता तर रस्त्यावर वारकर्याचा मोठा प्रवाह होता.
अंधारात पुढच्याचा अंदाज घेत तसेच उजव्या बाजूला असलेल्या वाहनांच्या प्रकाशात वारकरी चालले होते. सासवड शहर सोडून एक किलोमीटर अंतर गेल्यावर पावसाला सुरुवात झाली . या अगोदर आळंदी ते पुणे ते दिवे घाट दरम्यान वारकरी रिमझिम पावसात आनंदले होते, हा पाऊस फार थोडा वेळ होता. पण आता पावसाचा जोर जास्त होता. सगळी कडे आभाळ गच्च भरलेले होते. त्यामुळे माऊलींनी लगेच प्लॅस्टिक खोळ बाहेर काढली. काहींनी रेनकोट, छत्र्या बाहेर काढले.
आता पावसाने आणखी वेग वाढवला. जोरदार पाऊस सुरू होता. रस्त्यावर पाणी साचले. चालणे अवघड होत होते. पण वारकरी थांबले नाहीत. मार्ग काढत पुढे जात राहिले. सोबतीला होते माऊली आणि तुकाराम महाराजाचा जयघोष. या नामाने त्यांना ताकद मिळत होती. डोक्यावर घेतलेली खोळ दोन्ही हातांनी पकडत, थोडी तोंडावर घेऊन ते चालत होते . दोन तास झाले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. गटागटाने चालणारे वारकरी कोणी चुकू नये म्हणून काळजी घेत होते. माऊली माऊली म्हणून उजवीकडे असणारे वाहनाचे क्लिनर वारकर्याना साईड मागत होते. पोलीस व्यवस्थापन बेपत्ता होते. वाहतूक शिस्तीचे काम वारकर्यानी हाती घेतले.
सहा वाजले, उजाडू लागले, पाऊस सुरूच होता. वाराही जोराने वाहू लागला , वारकर्याचा उत्साह जराही कमी झाला नाही. मध्ये कोणी चहा घ्यायला थांबत, काही जण नाश्ता करून पुन्हा चालणे सुरू करत. पावसाचे पाणी पायावर पडत होते, मधूनच खोळ वार्याने उडून जायची, सारे अंग थंडीने शहारत होते. पाऊस मी म्हणत होता आणि वारकरी माऊली म्हणत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत हा खेळ सुरू होता. आता जेजुरी जवळ आले आणि पाऊस दमला. चिंब चिंब भिजून गेलेले वारकरी जेजुरीला पोहचलो. पावसाने बारा पर्यंत विश्रांती घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. दिवसभर हा खेळ सुरु होता, वारकरी जेजुरीला येत होते.
सायंकाळी माऊली पालखीचे आगमन झाले. या दिंड्यातील वारकरी, टाळकरी, विणेकरी सारे पावसात भिजले होते, त्याचे कपडे पाऊस थांबला की सुकत होते. पावसाची तमा न करता वारकरी चालत राहिले. बर्याच दिवसांनी पालखी सोहळ्यात असा पाऊस पडला, अशी प्रतिक्रिया वारकर्यानी व्यक्त केली.
मोबाईल वाढले; वारकरी झाले ऑनलाईन
जेजुरी : सतीश मोरेपंढरीची वारी कालची आणि आजची याबाबत माहीती घेतली आणि तुलना केली तर खुप मुद्दे आहेत. 500-1000 वारकरी घेऊन जाणारी फार फार पुर्वीची वारी, त्यानंतर 1970 च्या सुमारास 10000 वारकरी, 1990 च्या सुमारास 20000 वारकरी आणि 1995 मध्ये वारी लाखावर पोहोचलेली वारी ! 2000 नंतर तीन लाख वारकरी आता चार लाखावर पोहचलेल्या ज्ञानेश्वर माऊली सोहळा. सोहळ्यात बरेच बदल झाले आहेत. वारीसाठी घर सोडल्यानंतर महिनाभरात कुटुंबाशी कसलाही संपर्क नसलेला पुर्वीचा वारकरी मात्र आता ऑनलाईन झाला आहे, रोज संध्याकाळी आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत बोलत आहे, वारीचे अनुभव सांगत आहे.
संत तुकारामांच्या घराण्यात वारीची परंपरा फार वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याच्यनंतर त्यांचे कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव श्री नाराङ्मण बाबा यांनी 1685 मध्ये या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायांच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला जात. त्याठिकाणी पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये वाद झाल्यामुळे हा सोहळा काही काळ खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये माऊलींचे निश्चिम भक्त श्री हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या कडे सरदार म्हणून असलेल्या पवार कुळातील हैबत बाबा यांनी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला, वाढवला.
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गेल्या काही दशकात अनेक बदल टप्प्याटप्प्याने होत गेले आहेत. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या वारीत महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील वारकरी सहभागी होतात. सुरुवातीला हा आकडा शेकड्यात होता, पुढे हजारात, विसाव्या शतकाच्या अखेरीस लाखावर, आता तीन ते चार लाखांच्या घरात गेला आहे.
पुर्वी वारीसाठी वारकरी आठ दहा दिवस अगोदर आळंदीला जायला निघत. पुढे बैलगाडी आली . टमटम, एसटी बस आली. आळंदी ते पंढरपूर वारी व पंढरपूर येथे दोन दिवस, परतीचे दहा दिवस असा महीना दिड महिना वारी कार्यक्रम असायचा. आता यामधील पंधरा वीस दिवस कमी झाले आहेत.
पुर्वी वारकरी पंढरीला निघाला की सारे गाव जमायचे, त्याचे दर्शन घेतले आमच्या वतीने पाडुरंगाला नमस्कार सांगा, हे पाच रूपये पेटीत टाका, असे सांगायचे. तो वारकरी पुन्हा कधी परत येणार याची खात्री नव्हती. मात्र आता इंटरनेट च्या जमान्यात वारी, पालखी सोहळा आणि वारकरी ऑनलाईन झाला आहे. गतवर्षी मी वारीमध्ये वारकर्यांकडे खुप कमी मोबाईल पाहीले होते. ऍन्ड्रॉईड फोन क्वचित होते. यावर्षी वारीला मोबाईल फोन घेऊन येणारे वारकरी खुप वाढले आहेत. महिला व पुरुष वृद्ध वारकरी छोटासा मोबाईल घेऊन येतात. दिवसभर त्याचा फोन बंद असतो, मात्र मुक्कामाला पोहचले की हे आज्जी,आजोबा फोन बाहेर काढून घरी फोन करतात. मी जेजुरीला पोहचली हाय, तब्येत चांगली आहे. काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे, असा संवाद होतो. फक्त खुशाली आणि कुठे पोचलो आहे, येवढे सांगणे हाच फोन उद्देश असतो. या दरम्यान गावातील एखादा युवक, अनुभवी वारकरी त्या दिंडीत असेल तर तो वृद्ध वारकऱ्यांचे फोटो त्याच्या मुलाला पाठवतो, हे पहायला मिळाले.
टाळकरी, झेंडेकरी व इतर वारकऱ्यांकडे सुद्धा मोबाईल आला आहे. दुपारी विसावाच्या ठिकाणी थांबलो की यांचे फोन सुरु होतात. काही जण आपल्या फोनवर मोबाईल न आणलेल्या माऊलींना मोफत फोन लावून देत सेवा करतात. गळ्यात दोरा बांधून त्याला मोबाईल बांधला जातो. आधुनिक तरूण वारकरी, पहिली दुसरी वारी करणारे युवा वारकरी, संत वाडमय मंडळाचे सदस्य, शिष्य वारीत ऍन्ड्रॉईड फोन घेऊन आले आहेत. मोबाईल कॅमेरात सतत सेल्फी घेण्यात हे मग्न होते. फोटो काढून लगेच सोशल नेटवर्किंग साईट वर टाकले जातात. मोबाईल मोबाईल चार्ज करण्यासाठी अनेक ठिकाणी चार्जर सेंटर सुरू झाली आहेत. वारी अपडेट देण्यासाठी गेल्या काही वर्षांत फेसबुकवर समुह तयार झाले आहेत. वारी कव्हरेज देण्यासाठी मराठी चॅनल 24 तास कार्यरत आहेत. पण आता वारकरी मोबाईल लाईनवर, ऑनलाईन वरही येत आहेत, हा वारीतील सुखद अनुभव आहे. मुख्य पालखी सोहळ्यातील दिंडीच्या तुलनेत खुल्या समाजात खुप मोबाईल फोन असल्याचे आढळले.
वारी अपडेटस देण्यात सोशल मिडिया आघाडीवर आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर वारीचे तासातासाला फोटो पडतात. वारी मार्गावर माऊली दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे फोटो सोशल मिडियावर पडत असतात.
०३ जुलै २०१६
नांदेडकर देतायेत मोफत शुद्ध पाणी
सासवड सतीश मोरे
पाणी जीवन आहे, पाणी अमृत आहे, पाणी तृष्णा भागवते, पाणी समृध्दि आणते. पाण्याशिवाय काही शक्य नाही. पाणी किती महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पंढरीची वारी करताना थकलेल्या, दमलेल्या वारकर्याला पाणी तरतरी आणते, ताजेतवाने करते. महाराष्ट्र शासनाने वारकरी लोकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवले आहे. वारी मार्गावर सामाजिक कार्यकर्ते व शासन पाणी टॅन्कर उभे करते. पाणी पुरवठा यंत्रणेच्या मदतीला आता नांदेड येथील साईप्रसाद अमृतदिंडी धावून आली आहे. वारी मार्गावर सलग 18 दिवस शुद्ध आणि थंड मिनरल वाॅटर देण्यासाठी 200 स्वयंसेवक यंत्रणा या संस्थेने उभी केली आहे.
2012 साली स्थापन झालेल्या या संस्थेला कुणाचाही चेहरा नाही. नोंदणीकृत संस्था वा ट्रस्ट नाही कोणी अध्यक्ष नाही, पदाधिकारी नाहीत. सारेच स्वयंसेवक म्हणून उस्फूर्त पणे सेवा करतात. सामाजिक कार्यात ही संस्था अग्रेसर आहे. 1400 सदस्य संख्या असलेल्या साईप्रसादने आजवर 70 विवाह लावून दिले आहेत. या संस्थेच्या काही सदस्या गत वर्षी वारीत सहभागी झाले होते. सहा महिन्यापुर्वी वारीत सर्वांना शुद्ध मिनरल व थंड पाणी पुरवठा कसा करता येईल यावर विचार केला. पुणे, सोलापूर, सातारा जिल्हाधिकारी तसेच पुणे आयुक्त, पंढरपूर मंदिर सेवा समिती व ननगरपालिका मुख्याधिकारी यांचेसोबत चर्चा झाली, आळंदी पंढरपूर वारी मार्गाचे सर्वेक्षण केले.
![]() |
संस्थेने या कामी नांदेड, जालना, औरंगाबाद, नगर तसेच वारी मार्गावरील गावातील दाते व लोकवर्गणीतून निधी गोळा केला. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी दोन ट्रकवर आर ओ प्लान्ट उभ केले आहेत. पाणी थंड करण्यासाठी चिलर आर ओ प्लान्टला जोडले आहेत. गावातील पाणी या प्लान्ट पर्यंत आणण्यासाठी 15 हजार लिटर क्षमतेचे दोन टॅन्कर ठेवले आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाला तर दोन जनरेटर पण ठेवले आहेत. स्थानिक ठिकाणी पाणी उचलून ते शुद्ध केले जाते. आठ टेम्पो मध्ये 1400 लिटर क्षमतेचे इन्सुलेटेड टॅक असून
त्यामध्ये पाणी साठवले जाते. 40 ठिकाणी पिक अप जीपमध्ये 20 लिटरचे 1000 जार ठेवले आहेत. संस्थेचे स्वयंसेवक या वाहनाबाहेर उभे राहतात. येणाऱ्या वारकरी माऊलीला पोटभर पाणी देतात.
त्यामध्ये पाणी साठवले जाते. 40 ठिकाणी पिक अप जीपमध्ये 20 लिटरचे 1000 जार ठेवले आहेत. संस्थेचे स्वयंसेवक या वाहनाबाहेर उभे राहतात. येणाऱ्या वारकरी माऊलीला पोटभर पाणी देतात.
शुद्ध मिनरल पाणी, तेही मोफत उपलब्ध करून देऊन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान 200 स्वयंसेवकाच्या सोबतीला स्थानिक लोकांनी, तरूणांनी यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक गावातील लोकांनी फक्त पाणी द्यावे, आम्ही ते शुद्ध करून माऊलीना देऊ, विठ्ठल भक्तांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.
वारीत सहभागी वारकरी ठणठणीत रहावा, असे आम्हाला वाटते. वारकरी मिळेल तिथे कोठेही पाणी पिऊन तहान भागवतो. वारकर्याना आजार मुख्यत्वे पाण्यामुळे होतात . ते होऊ नये म्हणून आम्ही शुद्ध मिनरल पाणी मोफत देतो. पाणी बाॅटल विकत घेणे सर्वाना जमत नाही.
. ........... स्वयंसेवक साईप्रसाद
सतीश मोरे
सतीश मोरे
०२ जुलै २०१६
माऊली नाम आहे चालणाऱ्या
वारकऱ्याचे टाॅनिक
दिवे घाट : सतीश मोरे
अरे वारकऱ्या
तुले नाही ऊन वारा
थंडी झुगारीत अवघ्याले
आली पंढरीची वारी
तुले नाही ऊन वारा
थंडी झुगारीत अवघ्याले
आली पंढरीची वारी
वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल आणि या देवाजवळ जाण्याचा सहज सोपा मार्ग दाखविणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या नावात किती ताकद आहे याचा प्रत्यय वारकऱ्यानी पुन्हा एकदा अनुभवला. दिवे घाटातील चढ उतार, वेडीवाकडी वळणे कधी आली आणि संपली माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी माऊलीना कळलेच नाही. बालकापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धाला वारीत चालण्याची ताकद मिळते फक्त माऊली नामाने. आळंदी ते पंढरपूर दरम्यान सुमारे पावणे तीनशे किलोमीटर अंतर सहज पार होते ते माऊली नामामुळे!
पंढरीची वारी करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र सर्वानाच वारीला जायला जमत नाही. विठ्ठल भेटीची ओढ ज्याच्या हृदयात उफाळून येते, संत संगतीचा ध्यास लागतो आणि या दोन्ही गोष्टी जुळल्यानंतर ज्याला विठ्ठलाचे बोलावणे येते त्यालाच पंढरीच्या वारीचे भाग्य लाभते, असे म्हणतात. वर्षानुवर्षे घरात सुरू असलेली वारी परंपरा चालू ठेवणारा वारकरी, स्वतःच्या इच्छेने आलेला वारकरी असो वा लेकाने सुनेने इथं काय करताय बसून असे म्हणत बळजबरीने वारीला आलेला वृद्ध, संसारातील कटकटीला कंटाळलेला कुणाचा पती, कुणाची पत्नी, सासु , सुन , तरूण, तरूणी, म्हातारी, म्हातारा, लहान मुले, मुली सारे सारे जण पंढरीच्या वारीला आले आहेत. इच्छेने असो की अनिच्छेने वारीला जाण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिंडीत तो कष्टकरी भाविक सहभागी झाला आहे.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातून पंढरीला निघालेला हा वारकरी वारीचा आनंद लुटत आहे. काशी यात्रा आणि पंढरीची,आळंदीची वारी यात फरक आहे. इतर सर्व यात्रा पापक्षालन आणि पुण्यसंपादनासाठी एकवार केल्या जातात. मात्र आळंदी पंढरीची वारी नित्यनेमाने प्रतिवर्षी करायची असते. यातून फार मोठा आनंद मिळतोच शिवाय संताच्या भेटी गाठी होतात. पायी वारी करण्याचा आनंद काही औरच.
भक्तीप्रेमरसाची अनुभुती घेण्यासाठी आलेला या वारकऱ्यानी आळंदीतून चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जोश होता. संताची साथ आणि जवळच्या लोकांची सोबत होती. 25-30 किमी अंतर चालून वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला आले. दोन दिवस पुणेकराच्या आदर अतिथ्याने सारे भारावले. पुण्यभूमीला कृतज्ञपणे वंदन करून वैष्णवांचा मेळा सासवडकडे निघाला.
पंढरीच्या वारीमध्ये सर्वात अवघड,लांब पण आल्हाददायक, आनंददायी असा हा टप्पा. त्यात भर म्हणजे दिघीचा घाट आणि एकादशीचा उपवास . साडे सहा वाजता माऊलींची पालखी निघाली. शिंदे छत्री येथे सकाळचा विसावा, हडपसर येथे दुपारचे भोजन करून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पालखी दिघी घाटात पोहचली. चढाचा रस्ता सुरू झाला आणि वैष्णवाचा जोश वाढू लागला.
अवघड रस्ता, घाट, खाचखळगे तसेच उन, वारा आणि पावसातही वारकरी बेभान होऊन नाचत असतात. त्याला कशाचीच फिकीर नसते. त्याला ही ताकद मिळते फक्त माऊलींच्या नामामुळे.
वारीमध्ये तसेच कीर्तन, अभंग म्हणताना वारकरी का नाचतात याबाबत किर्तनकार गोष्ट सांगतात. एकाने दुसऱ्याला विचारले हे वारकरी का नाचतात ? दुसरा सद्पुरूषाने हसत हसत उत्तर दिले, अरे बाबा मनुष्याच्या डोक्यावर मोठे थोरले ओझं दिल तो नाचणार नाही. कुंथतच राहील. पण ते ओझे कुणी काढून टाकले तर तो उड्या मारत नाचेल. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर दोन मोठ्ठी ओझ्याची गाठोडी असतात. एक प्रपंचाचे दुसरे परमार्थाच. या दोन्हीच्या भाराखाली मनुष्य दबलेला असतो. पंढरीच्या वारीमध्ये अशी मौज आहे की पाठीमागे असणाऱ्या ज्ञानोबा माऊलीनी त्याच्या डोक्यावरून परमार्थाच ओझं काढून घेतले आहे तर पुढे असलेल्या पाडुरंगाने प्रपंचाचे ओझे पळवले आहे. त्यामुळे तो या वारीत बेफाम होऊन नाचतात आणि त्यामुळेच घाट रूपी रस्त्याचे दुख कसे संपते हे त्याला समजत नाही.
वारीमध्ये तसेच कीर्तन, अभंग म्हणताना वारकरी का नाचतात याबाबत किर्तनकार गोष्ट सांगतात. एकाने दुसऱ्याला विचारले हे वारकरी का नाचतात ? दुसरा सद्पुरूषाने हसत हसत उत्तर दिले, अरे बाबा मनुष्याच्या डोक्यावर मोठे थोरले ओझं दिल तो नाचणार नाही. कुंथतच राहील. पण ते ओझे कुणी काढून टाकले तर तो उड्या मारत नाचेल. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर दोन मोठ्ठी ओझ्याची गाठोडी असतात. एक प्रपंचाचे दुसरे परमार्थाच. या दोन्हीच्या भाराखाली मनुष्य दबलेला असतो. पंढरीच्या वारीमध्ये अशी मौज आहे की पाठीमागे असणाऱ्या ज्ञानोबा माऊलीनी त्याच्या डोक्यावरून परमार्थाच ओझं काढून घेतले आहे तर पुढे असलेल्या पाडुरंगाने प्रपंचाचे ओझे पळवले आहे. त्यामुळे तो या वारीत बेफाम होऊन नाचतात आणि त्यामुळेच घाट रूपी रस्त्याचे दुख कसे संपते हे त्याला समजत नाही.
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष वारीत सर्व काळ सुरू असतो. दिवे घाटाचा रस्ता आला. हळुहळु पालखी आणखी चढाला लागली. आभाळ भरून आले होत . वैष्णवानी आता राधा राधा राधा कृष्ण राधा चा ठेका धरत नाचायला सुरवात केली. दुसरीकडे काहींनी जय जय राम कृष्ण हरी चा नाद धरला. अंतर कमी होत होतं. वैष्णव जन नाचत होते.
पालखी पुढे पुढे जात होती, वारकरी माऊली नामात रंगून गेले. . भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवाना पायाखालची वाट कशी निघून गेली हे कळलेच नाही. सर्व इंद्रिये भजनरंगात रंगल्याने अदभुत शक्ती मिळून वृद्धाच्या ठिकाणी सुध्दा तरूणासारखा आवेश व उत्साह निर्माण झाला आणि घाटातील अवघड वाटेच्या रूपातील दुख संपून गेलं. माऊलीच्या पालखी सोहळ्यात रस्ता कधी संपतो हे लक्षातच येत नाही याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव वैष्णवाच्या संगतीत आला.
०१ जुलै २०१६
गतवर्षी पेक्षा आळंदीत यंदा कमी भाविक
पुणे
धन्य पुंडलिका बहु बरे केले ।
निदान आणले पंढरिये ।।
धन्य ते पंढरी, धन्य भीमा तीर ।
आणियेले सार पुंडलिक ।।
नित्यनेमाने वारी करणारे हजारो वारकरी मंगळवारी आळंदीत दाखल झाले होते. प्रस्थान सोहळ्यात माऊली भक्तांचा अमाप उत्साह पहायला मिळाला. बुधवारी पालखीने पुण्याकडे मार्ग क्रमण केले. या दरम्यान गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी वारीमध्ये कमी वारकरी सहभागी झाले आहेत . मागील वर्षे पडलेला मोठ्ठा दुष्काळ, त्यामुळे झालेले स्थलांतर व भीषण परिस्थिती आणि याही वर्षी जुन संपत आला तरी पावसाने मारलेली दडी याचा परिणाम वारीवर झाला आहे. गेल्या वर्षी आळंदीत आलेले सुमारे साडेपाच सहा लाख भाविकांच्या तुलनेत यावर्षी पाच लाख भाविक आणि वारकरी आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही संख्या आहे याला काही दिंडी मालकांनीही दुजोरा दिला आहे .गेल्या काही वर्षांत वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी यांची संख्या वाढत आहे. 1990 नंबर झानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी आणि दिंड्या वाढू लागल्या आहेत. माऊली सोहळ्यात सहभागी पुर्व परपरागत दिंड्या मध्ये 1990 -1993 दरम्यान 10 ते 15 हजार वारकरी सहभागी होत असत. या दरम्यान पालखी सोहळ्याकडे प्रशासनाचे जास्त लक्ष नसायचे. पालखी गावातून यायच्या, जायच्या त्याकडे त्या गावातील लोक आणि निवडक वारकरी यांच्या व्यतिरिक्त कोणाला घेणेदेणे नसायचे. 1990 च्या दशकात ज्ञानेश्वरी सप्तशताब्धि जयंतीच्या निमित्ताने राज्यभर अनेक गावांमध्ये पारायण सोहळे पार पडले. माऊलींच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी संख्या वाढली. हळूहळू ही संख्या लाखावर गेली. पुढे दोन लाख झाहली तर गेल्या सहा वर्षांत ही संख्या पाच सहा लाखावर पोहचली आहे.
आळंदीत माऊली सोहळ्यास प्रारंभ होतो तेव्हा राज्य भरातील शेकडो दिंड्या येथे दाखल होतात. अनेक वर्षे सलग या सोहळ्यात सहभागी होणार्या दिड्यांना संस्थान ट्रस्ट वतीने नंबर दिला जातो. फार पुर्वी पालखी खांद्यावर घेतली जायची, पुढे रथ आला. त्यामुळे रथासमोरील दिंड्या आणि रथामागे असणाऱ्या दिंड्या असे क्रमांक देण्यात आले. माऊली पालखी रथाचे पुढे पहिला क्रमांक दिंडी आळंदीची असते व पुढे यासहीत 27 दिंड्या असतात. रथामागे किंवा पालखीमागे नोंदणीकृत 201 दिंड्या असतात. तर त्या मागोमाग तितक्याच म्हणजे 200 दिंड्या आहेत. या 200 दिंड्याचे सातत्य, सक्रिय सहभाग पाहून त्यांना नंबर दिले जातात. गेल्या काही वर्षांत या दिंड्या मध्ये सहभागी वारकर्याची संख्या वाढली आहे.
गत वर्षी माऊली सोहळ्यात आळंदी पासूनच वारकर्याचा फार मोठा सहभाग होता. साधारण पाऊसपाणी व्यवस्थित झाले असेल तर सोहळ्यात वारकरी स्वयंप्रेरणेने, स्फुर्तीने येतात. वारीला येणारा सर्वाधिक शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर वर्ग आहे. माऊलीची वारी या वर्गानेच वाढवली, फुलवली आणि टिकवलीही. वारी सुरू होते ज्येष्ठ वद्य अष्टमीला. या दरम्यान अगोदर पाऊस योग्य वेळेत पडला तर हा वर्ग पेरण्या पुर्ण करून घेतो. पेरण्या पूर्ण झाल्या , चांगले पीक येईल, सारं काही चांगले होईल या आशेने शेतकरी सुखावतो. मोकळा श्वास घेतो आणि मोकळेपणाने वारीला निघतो. ज्या वर्षी पाऊसमान चांगले होते, त्यावर्षी वारीत वारकरी जास्त येतात, हा अनुभव आहे. दुसरीकडे पंढरीच्या पाडुरंगाकडे जाऊन दर्शन घेऊन आले की सारे काही आलबेल होईल, या आशावादही त्याचा असतो. गत वर्षी पाऊस बरा होता, त्यामुळे माऊली सोहळ्यात सुमारे साडेचार लाख लोक सहभागी झाले होते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
वास्तविक सहभागी वारकरी लोकांची कुठेही नोंदणी नसते, रस्त्यावरन जाणारा वारकर्याचा प्रवाह मोजता येत नाही. दहा ते वीस किलोमीटर रस्त्यावर फक्त वारकरी आणि दिंड्या दिसत असतात. आळंदी मध्ये आलेली वाहने, झालेली गर्दी, किती लांब रांगा लागल्या, इंद्रायणी नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी होणारी गर्दी या सर्व बाबींचा विचार करून पोलीस खाते अंदाज बांधते. चालु वर्षी सुमारे पाच लाख वारकरी आळंदीत आले असावेत, हा आकडा गतवर्षी पेक्षा 1 लाखाने कमी आहे. यापैकी सारेच वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी होत नाहीत. काही भाविक माऊली दर्शन घेऊन घराकडे जातात, पुढे पंढरपूर जवळपास पुन्हा सोहळ्यात सहभागी होतात.
यंदा जुन महिन्यात राज्यभरात सरासरी पेक्षा 25% पण पाऊस झाला नाही. काही भागात वळवा पाठोपाठ मान्सून सक्रिय झाला आहे. तरीही राज्याचा विचार करता पावसाची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस नसल्याने पेरण्या झाल्या नाहीत, बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे. धरणे, पाझर तलाव आटले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम वारीवर झाला आहे. यावर्षी शेतकरी वारकरी कमी झाला आहे पुणे, सासवड मध्ये काही जण सहभागी होतात. मात्र गतवर्षी तुलनेत यंदा वारकरी कमी आहेत. काही दिंडी मालकाकडे माहिती घेतली असता त्यांनी पण यावर्षी लोक कमी आले आहेत, गावाकडे पाऊस नाही, त्यामुळे परिणाम झाला असल्याचे त्यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना सांगितले.
आळंदीत गतवर्षीचा तुलनेत कमी भाविक आले आहेत. गेल्या वर्षी माऊली दर्शनासाठी सुमारे सहा लाख लोक आले होते. यावेळी 5 लाख भाविक सहभागी आले आहेत. कमी पाऊसमान हे याचे कारण असू शकते. हे सर्व वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी होतात असे नाही. यंदा पावसामुळे वारकरी सहभाग कमी आहे .
- मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी, राजगुरुनगर, खेड.
३० जून २०१६
पुणे सतीश मोरे
मंगळवारी माऊली पालखी प्रस्थान सोहळा डोळे भरून पाहिला आणि मठात येऊन निवांत बसलो. दुपारी हेवी जेवण झाल्यामुळे आणि सोहळा पाहून पोट भरले असल्याने भुक लागली नव्हती. तरीही तारूखच्या कुलकर्णी काकानी आग्रह धरला, नव्हे द्रोण पत्रावळी, भात आणि भाजी घेऊन आले. थोडा भात खाल्ला आणि झोपण्याची तयारी केली. दहा वाजताच्या सुमारास पडलो, झोप लागत नव्हती, डोळ्यासमोर फक्त माऊलीची पालखी आणि वारकरी दिसत होते.
सकाळी उठून लवकर निघायचे होते. रात्री दोन तीन वेळा जाग आली, फक्त घड्याळात पाहिले पुन झोपलो. साडे तीन वाजता शेजारी गजर झाला, पटकन जागा झालो. अंगात थोडी कणकणी होती, जाणवले. इंन्दायणी मध्ये स्नान करायला जायचे रद्द करून फ्रेश होऊन तयार झालो. साडेचार वाजता सहकारी सोबत बाहेर पडलो. माऊली मंदिर शिखराचे दर्शन घेतले, नदीमध्ये अनेक जण स्नानासाठी उतरले होते. नदीचा पुल पार करून पुणे रस्ता पकडला.
सकाळी उठून लवकर निघायचे होते. रात्री दोन तीन वेळा जाग आली, फक्त घड्याळात पाहिले पुन झोपलो. साडे तीन वाजता शेजारी गजर झाला, पटकन जागा झालो. अंगात थोडी कणकणी होती, जाणवले. इंन्दायणी मध्ये स्नान करायला जायचे रद्द करून फ्रेश होऊन तयार झालो. साडेचार वाजता सहकारी सोबत बाहेर पडलो. माऊली मंदिर शिखराचे दर्शन घेतले, नदीमध्ये अनेक जण स्नानासाठी उतरले होते. नदीचा पुल पार करून पुणे रस्ता पकडला.
पालखी सकाळी सात वाजता आळंदीतून निघणार होता. पहिल्या दिवशी यामध्ये जायचे नव्हते. मी मोकळा समाजातून जायचे ठरवले होते. रस्त्याला लागलो.
नुकताच जोरदार पाऊस पडला होता, आळंदीमधील सर्व रस्ते चिखलमय झाले होते. पहाटे अंतर उरकते म्हणून बाहेर पडलेले वारकरी रस्त्यावर , नदीत स्नान करण्यासाठी निघालेले वारकरी , स्नान करून बाहेर पडणारे वारकरी या सर्वाची रस्त्यावर लगबग सुरू होती. पाठीवर सॅक , डोक्यावर टोपी घालून मी चालायला लागलो. रस्त्यावर एका बाजूला पुण्याकडे जाणारे वारकरी यांचा प्रवाह तर डावीकडे दिंड्याचे साहित्य घेऊन जाणारी अवजड वाहने, ट्रक याची लाईन लागली होती .
झानेश्वर माऊली, तुकोबा महाराज यांच्या नावाचा जयघोष, राम कृष्ण हरी चे स्मरण, हाताने टाळी वाजवत वारकरी चालत होते. रस्त्यावर खुप चिखल होता, काही ठिकाणी पाणी पण साठले होते. यातून मार्ग क्रमण करत वारकरी चालले होते. एकमेकांना दाटून, आपला ग्रुप धरून जात होते, दिंडीचे चोपदार कोणालाही रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊ देत नव्हते. अंधारात कोणी चुकून जाऊ नये, हरवू नये म्हणून काही दिंड्यानी एल ईडी दिव्याची माळ काठीला बांधली होती.
अंतर उरकत होते, वारकरी चालत होते. पायात साधे चप्पल, स्लिपर किंवा साधा सॅन्डल . या चपल्यामुळे अनेकांच्या कपड्यावर, साडीवर, धोतरावर चिखलाची रांगोळी झाली होती. रस्त्यावर झालेल्या रबडीमुळे पाय घसरत होता, गती कमी होत होती, पण थांबता येत नव्हते. एक तर बाजूला व्हा, पण तसे केले तर ग्रुप पुढे जातो, त्यामुळे आहे त्या परिस्थितीत वारकरी चालत होते , अंतर जवळ करत होते.
आता साडे पाच वाजले होते, थोडं दिसायला लागले होते, थोडं दमलो होतो , शुजचे लेस पण लुज झाले. थांबायची इच्छा झाली, बाजूला आलो. चहाची टपरी बघितली, खुर्ची वर जाऊन बसलो. कटींग चहा मागितला. आय टी दिंडीतील पाचपन्नास युवक युवती तिथे आले. त्याची माहिती घेतली गप्पा मारल्या. वास्तविक या दिंडीच्या एका व्हाॅटसअप ग्रुपमध्ये मी वर्षभर मी आहे. खुप चांगले लोक आहेत.
पुन्हा चालायला लागलो. दिघी गाव आणि मिलिटरी एरिया सुरू झाला, रस्त्याकडेला सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी मोफत चहा, नाश्ता उपलब्ध केला होता. काही वारकरी तेथे जात होते, आंघोळी साठी शाॅवर पण सोय होती. मिलिटरी एरियातून जाताना दोन्ही बाजूला सैनिक, त्याची वाहने, त्याचा ड्रेस रूबाब पाहून खूप हेवा आणि आनंद झाला.
चालत चालत अंतर बरंच कापलं होतं, अजुनही पुणे 12 किलोमीटर अंतरावर होते. माऊलीमय वातावरण, संताची सोबत आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ लागली होती . त्यामुळे अंतर कसे पार पडले कळलं नाही. उंच इमारती दिसू लागल्या, गर्दी झालेली होती. रस्त्यावर बॅरीकेटस लावून वाहतूक बंद करण्यात आली होती, वारकरी सुरक्षित जावा, दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी खुप सुंदर नियोजन केले होते.
नऊ वाजले होते. साडे चार तास चालत होतो. बरंच अंतर पार पडले होते, आवाक्यात आले होते. पालखी जिथे मुक्काम करते ते ठिकाण भवानी पेठ पाच सहा किलोमीटर अंतरावर होते. मला मुक्कामाला कात्रज कोंढवाला जायचे होते, बसची चौकशी केली. पोलिसांनी पुढे दोन किलोमीटर खडकी जवळ बस मिळेल असे सांगितले.
येरवडा हद्दीत प्रवेश करण्या पुर्वी आंबेडकर उडान पुल, अनेक रस्ते एकत्र येऊन झालेला चौक लागतो, तेथे पोहचलो. एका छोट्या हाॅटेलात जाऊन नाश्ता केला. पुन्हा चालू लागलो. इन्द्र धनुष्य बस सेवा सुरू होती. बस पकडली. बारा वाजता सासुरवाडी मुक्कामी पोहचलो.
पाच तास सुमारे 27 किलोमीटर चाललो होतो, थोडा थकलो होतो. बातमी लिखाण करायचे काम सुरू केले. दिड वाजता बातमी मेल केली. जेवण झाल्यावर निवांत पडलो.
आज, उद्या गुरुवार पुण्यातच मुक्काम.
- सतीश मोरे,कराड
9881191302
9881191302
माऊली माऊली
सतीश मोरे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...


















