फॉलोअर

०४ जानेवारी २०२४

मी पाहिलेली नाटके..! मी केलेलं नाटक.. अर्थात माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स


मी पाहिलेली नाटके..!
मी केलेलं नाटक.. अर्थात माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स 

प्रत्येक माणसांमध्ये एक कलाकार असतो,कला असते आणि तो  'ती कला' कुठे ना कुठे व्यक्त करत असतो.कोणी गाणं म्हणतो, कुणी नाटकं करतो,कोण नकला करतो, कोण कुणाचा तरी आवाज काढतो, रिमेक करायचा प्रयत्न करतो. कोण आपल्या स्वतःच्या आवाजाची, वागण्याची, बोलण्याची वेगळी स्टाईल निर्माण करतो. स्टेजवर अभिनय करणे हे प्रत्येकाला जमतंच असं नाही पण प्रत्येक मनुष्य आयुष्यभर अभिनयच करत असतो, नाटक आणि नाटकं करत असतो,नाट्य घडवत असतो,नाट्य पाहत असतो. आयुष्याच्या नाटकात तो अनेक भूमिका निभावतो. त्याला आवडणारी भूमिका तो इतरांच्यावर लादत असतो. दुसऱ्यांच्या न आवडणाऱ्या भूमिकेवर तो लगेच व्यक्त होत असतो. मात्र स्वतःच्या 'भूमिके'वर तो कायम ठाम असतो. 

असो. नाटक, नाट्य आणि अभिनय याचा प्रत्येकाच्या आयुष्यातील सहभाग कमी जास्त प्रमाणात असला तरी नाटक करायला किंवा अभिनय करायला एक संधी मिळावी लागते.  लहानपणी ती संधी मिळते शाळेमध्ये. अलीकडे बालवाडी पासूनच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले जाते. आमच्या काळात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी फक्त आम्ही सजलेलो असायचं. बाकी वेळेला रेगुलर कपडे. नवीन कपडे घ्यायला दिवाळीची वाट पाहत बसायला लागायचे. त्या काळात फोटो हा विषय नव्हताच, त्यामुळे त्या  आठवणी फक्त डोळ्यांत साठवल्या जात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला टोपी घालून केलेली महात्मा गांधीची ड्रेपरी आजही डोळ्यात आहे. आज अभिनय आणि नाट्य या विषयावर बोलायचं , लिहायचं सुचलं कारण आज मला एक फार जुना फोटो सापडला. हा फोटो मी करवडी गावातील अल्बम मधून मिळवला. तो फोटो आहे माझ्या स्टेजवरील पहिल्या परफॉर्मन्सचा.

माझ्या आयुष्यातील नाट्य क्षेत्राचा किंवा अभिनयाचा पहिला योग आला की जो मला चांगला आठवतो. तो म्हणजे टिळक हायस्कूलमध्ये सादर केलेला पोवाडा. माझा कोळे येथील प्रशांत उकिरडे नावाचा एक मित्र आहे. त्याने आम्ही आठवीला असताना भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा पोवाडा आमच्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये सादर केला होता. त्याच्यासोबत पाठीमागे 'जी..जी रं' म्हणायला मी आणि कडेपूरचा हिंदुराव यादव होतो. स्टेजवरचा माझा पहिला परफॉर्मन्स. फक्त जी जी म्हणण्यापुरते मी स्टेजवर असलो तरी त्याची पूर्वतयारी मात्र महिन्यांपासून सुरू होती. तो फोटो आता माझ्याकडे उपलब्ध नाही. मात्र मी बांधलेला फेटा , नेहरू शर्ट ही आठवण आजही माझ्या हृदयावर कोरलेली आहे.

 त्यानंतर सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील एक आठवण माझ्या स्मरणात आहे. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी गॅदरिंग म्हणजे एक उत्सव असायचा. या गॅदरिंग मध्ये सर्वांचा आवडता एक विषय असायचा तो म्हणजे फिश पॉइंट. आपल्या वर्गातील मुला मुलीवर फिश पॉइंट लिहून द्यायचे आणि त्याचं वाचन स्टेजवर केलं जायचं. माझ्या वर्गात अकरावी बारावीला सहा मुली होत्या आणि आम्ही जवळजवळ 70 मुलं. आमच्या वर्गातील एका मुलाने एका मुलीवर फिश पॉइंट टाकला होता. ती मुलगी परिक्षेला कॉपी खूप करायची. म्हणून तिच्यावर 'कोणती कॉपी कोणत्या खिशात, याची इंडेक्स वरच्या खिशात ...मिस ...' असा फिश पॉइंट पडला होता. गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला खूप कमी विद्यार्थाचा नंबर लागायचा. मला सीनियर असलेल्या आर्ट शाखेतील  प्रदीप वालावालकर यांने एक नाटिका बसवली होती. त्याच्यामुळे मला 1990 साली कॉलेजमधल्या गॅदरिंग मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. ते एक छोटसं नाटक होतं. नाटकाचं नाव होतं 'आधुनिक रामायण'. सर्व प्रसंग हिंदी चित्रपटामधील गाण्यावर आधारित होते. दहा मिनिटांची ही नाटिका होती. अर्थातच या नाटकाचा दिग्दर्शक आणि रावण भुमिका वालावलकर याने केली होती.अंताक्षरी टाईप सर्व गाण्याचा मुखडा एकत्र करून आम्ही ही नाटिका सादर केली होती. या नाटकाची सुरुवात सरगम चित्रपटातील 'ओ रामा हो.. हम तो चले परदेस, हम परदेसी हो गये' या गाण्याने झाली होती आणि त्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेत असा सीन होता. या नाटकात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण अशी फक्त पाच पात्र होती. सीतेचे काम करायला आम्हाला आमच्या वर्गातीलच काय आख्या कॉलेजमधील कोणतीही मुलगी तयार झाली नाही. शेवटी एका मुलालाच आम्ही सीता बनवलं. विशेष म्हणजे प्रभू रामचंद्राचे पात्र निभावलेला मुलगा  ख्रिश्चन धर्मीय होता) आम्ही दमदारपणे ते नाटक स्टेजवर सादर केलं, कॉलेजमधील युवक युवतींनी टाळ्या वाजवत आम्हाला दाद दिली. तुम्हाला सर्वांना सांगायला आता आनंद वाटतो आणि थोडसं हसू पण येतं, या नाटकात मी चक्क हनुमानाची भूमिका केली होती. बारावीत असताना माझी तब्येत अतिशय सड पातळ होती. सोबतचा फोटो पाहिला की तुमच्या लक्षात येईल. कोणत्याही दृष्टीने, कोणत्याही अँगलने मी हनुमानाची भूमिका करायला पात्र नव्हतो. मात्र तरीही ती भूमिका माझ्या वाट्याला आली होती. या नाटकातली माझी एन्ट्री होते त्यावेळेला लावलेले गाणं सुद्धा माझ्या आवडीचं, माझ्या आवडत्या कलाकाराचं होतं. सीतामाईला रावण पळवून नेतो. सीतामाईच्या शोधात हनुमान जेव्हा लंकेत जातो तेव्हा तो सीतेला अंगठी दाखवून आपली ओळख दाखवतो आणि तेव्हा गाणं होतं 'अरे दिवानो मुझे पहचानो कहा से आया मै हु कौन'.

या नाटकाची वेशभूषा, रंगभूषा सर्व काही तयारी आम्ही पाच जणांनीच केलेली होती. हनुमानाच्या हातात गदा पाहिजे. मात्र मोठी गदा कुठे मिळणार? आणि बजेट फार कमी होतं. शेवटी प्लास्टिकची  खेळण्यातील गदा आणली. आपण हा जर फोटो पाहिला तर गदा दिसून येईल.आधुनिक रामायणातील माझी ही भूमिका माझा स्टेजवरचा पहिला परफॉर्मन्स होता. मात्र तो परफॉर्मन्स आज 33 वर्षे होऊन गेली तरीही माझ्या डोळ्यासमोर अजूनही तसाच आहे.नाटकातली भूमिका छोटी असली तरी ही भूमिका साकारल्यानंतर मला मिळालेला आनंदाचा सुगंध अजूनही दरवळतो आहे.

पुढे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना आणि झाल्यानंतर नाटक आणि अभिनय करायचा योग कधीच आला नाही. मात्र गावात यात्रेला, गणपती उत्सवात परिसरात कुठेही नाटके असली तरी आम्ही पाहायला जात होतो. कार्वे ,सह्याद्री साखर कारखाना,कराड,रेठरे या ठिकाणी पाहिलेली नाटके मला थोडेफार आठवतात. कराडच्या टाऊन हॉलमध्ये प्र. के. अत्रे यांचे 'ब्रह्मचारी' नावाचं एक नाटक आलं होतं. या नाटकात प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर हे मुख्य भूमिकेत होते. वर्षा उसगावकर यांचं त्या काळातील हे नाटक फार गाजलं होतं. कदाचित हा काळ 1993 चा असावा. स्टेजवर वर्षा उसगावकर कृत्रिम तयार केलेल्या धबधब्यासमोर आंघोळ करते,असा एक सीन होता आणि त्या काळात कमी कपडे घातलेली वर्षा उसगावकर स्टेजवर पाहायला मिळणे म्हणजे ....., धाडस होते. लोक नाटक पहायला जायचे, वर्षा उसगांवकरचा तो तीन पाहून उलट सुलट चर्चा करायचे. आजच्या काळात कमी कपडे घातलेली हीरोइन पाहणे काहीच विशेष नाही .मात्र त्यावेळेला अशी कमी कपड्यातली नटी स्टेजवर येणं म्हणजे संस्कृतीविरोधी होतं.  


आमच्या टिळक हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीं मिळून राम गणेश गडकरी लिखित 'एकच प्याला' नावाचे एक नाटक केले होते. कदाचित 1985 सालं असावं. हे नाटक मला चांगले आठवते. या नाटकात आठवीत शिकत असलेल्या सुधीर घळसासी यांने सुधाकरची दमदार भूमिका केली होती. शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय प्रयत्न करून,रातं दिवस सराव करून हे नाटक अतिशय सुंदर पद्धतीने बसवले होते. एकच प्याला हे नाटक सादर करणे एवढं सोपे नाही मात्र आमच्या शाळेतील मुलांनी ते शिव धनुष्य पेललं होते. हे नाटक पहायला त्यावेळी परिसरातील अनेक नागरिक आलेले होते. घळसासी सरांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक टिळक हायस्कूलच्या निगडीकर कला मंदिर येथे सादर करण्यात आले होते (या नाटकाविषयी माहिती संकलित करत आहे, सविस्तर लिहीन लवकरच... )


2001 साली पुढारी मध्ये वार्ताहर म्हणून जॉईन झालो. त्यानंतर प्रत्येक वर्षी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये राज्य नाट्य स्पर्धा होत होत्या. या नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांचे समिक्षण लिहिण्याची जबाबदारी पुढारीने माझ्यावर सोपवली होती. त्यामुळे ही सर्व नाटके पाहिली आहेत. निळू फुले,अशोक सराफ, भरत जाधव प्रशांत दामले, संकर्षन कराडे, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी अशा अनेक नाट्य कलाकारानी कराडच्या टावर मध्ये सादर केलेली अनेक नाटके त्यानंतर पाहिलेली आहेत. 'रायगडाला जेव्हा जाग येते' आणि 'तो मी नव्हेच' ही दोन नाटके मी तीन चार वेळा पाहिली आहेत. 'हनुमाना'चा तो फोटो पाहून मला आठवलेल्या काही नाटकाविषयी आज लिहिण्याचा प्रयत्न केला. आपणास आवडेल कदाचित ! धन्यवाद.

सतीश मोरे सतिताभ
9881191302

लेखन @श्रीकृष्ण सिटी विंग 
4 जानेवारी 2024 सकाळी आठ वाजता

२ टिप्पण्या:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...