फॉलोअर

११ ऑक्टोबर २०२१

मी आणि अमिताभ पाच भेटी @ पाच अनुभव


अमिताभजी बच्चन 
पाच भेटी, पाच अनुभव!


अमिताभ बच्चन! 
अमिताभ बच्चन !
आणि अमिताभ बच्चन !

किती वेळा हे नाव घ्यायचं आणि किती वेळा त्यांची आठवण काढायची,अनेक एक किती वेळा त्यांच्या विषयी काय काय बोलायचं! खरंच कितीही वेळा बोललं तरी या व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्त करता येणार नाही, इतकी उंच, आभाळापेक्षाही उत्तुंग याव्यक्तीची कारकिर्द आहे.
आजपर्यंत अमिताभ बच्चन यांना पाच वेळा भेटलो.26 ऑक्टोबर 2018, 4 सप्टेंबर 2019, 16 ऑगस्ट 2021, 27 ऑगस्ट 2021आणि 29 सप्टेंबर 2021. या पाचही वेळा भेटलेले, पाहिलेले अमिताभ बच्चन फार वेगळे होते. उच्च होते, अप्रतिम होते, विनम्र होते, विनोदी होते, प्रेमळ होते, अभ्यासू होते,दिलखुलास होते, दिलदार होते, सन्मान देत होते , इतरांना आपलं समजत होते, एवढा मोठा अनुभव पाठीशी असूनही स्वतःविषयी न सांगता दुसऱ्याकडून जास्त माहिती घेणारे अमिताभ होते!

चित्रपटातील अभिनय वेगळा आणि वैयक्तिक लाईफ वेगळं. याची अनुभूती मला त्यांच्या प्रत्येक भेटीतून येत होती, जाणवत होती. माझे आयडॉल, माझे गुरु माझे प्रेरणास्थान, माझ्या संकटाच्या काळी मला आधार देणारे, मला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिका असा संदेश देणारे अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस.  त्यानिमित्त थोडसं आणखी काही लिहावसं वाटलं म्हणून आपल्यासाठी.



अमिताभ बच्चन या शब्दाची जादू ,प्रेममोहिनी माझ्यावर 40 वर्षापासून आहे. या जादूविषयी मी अनेकवेळा लिहीलेलं आहे. या प्रेमातूनच मी अमिताभ बच्चन प्रेमी नावाचा एक ग्रुप 2010 साली स्थापन केला. या ग्रुपमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण सहभागी झाले. गेल्या सहा वर्षात हा ग्रुप अतिशय उच्च पातळीवर  पोहचलेला आहे. 

मी नेहमी म्हणतो, आम्ही अमिताभ बच्चन यांच्या विचारावर, आचारावर, त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या गाण्यावर, त्यांच्या स्टाईलवर, त्यांच्या आवाजावर,त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या कवितेवर, त्यांच्या चाली बोलीवर, त्यांच्या जीवन संघर्षावर प्रेम करतो. रोज ब्लॉग लिहिणारा, या वयात फेसबुक वरती एक्टिव असणारा, इंस्टाग्राम वरती कविता शेअर करणारा, ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधणारा,कोणतीही घटना घडल्यानंतर व्यक्त होणारा हळव्या मनाचा कवी अमिताभ आणि अभिनेता आपल्या देशात क्वचितच असेल. 


79 वर्षे हा माणूस सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. 79 वर्षापैकी 53 वर्षे त्यांनी अभिनयासाठी स्वतःला झोकून दिले आहे. सात हिंदुस्तानी हा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट सात नोव्हेंबर 1969 साली रिलीज झाला. (माझ्या जन्माच्या अगोदर तीन वर्षे, माझा वाढदिवस सात नोव्हेंबर आहे) त्यापासून आजपर्यंतची त्यांची 53 वर्षाची कारकीर्द एक सर्वांना पडलेलं कोडं आहे. अमिताभ बच्चन ही भारताला मिळालेली फार मोठी देणगी आहे. या माणसाकडे एवढा मोठा उत्साह कोठून येतो हे खरच कळतं नाही. 


अमिताभ बच्चन यांची माझी पहिली मुलाखत 26 ऑक्टोबर 2018 ची. जसे प्रेयसीला पहिल्यांदा भेटतो आणि प्रेयसीला भेटल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो, आपण फक्त तिच्याकडे फक्त पहात राहतो, काहीच बोलत नाही. होय तशीच माझी अवस्था त्या दिवशी झालेली होती. माझ्या बच्चन पहिल्या भेटी विषयी मी स्वतंत्र दोन ब्लॉग satitabh meets amitabh लिहीलेले आहेत, आपण वाचा. थोडक्यात एकच सांगतो ही मुलाखत मला खूप भारावून गेली. या मुलाखतीदरम्यान आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडून मी ऑटोग्राफ घेतला, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या हातात हात दिला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.


अमिताभ बच्चन यांची माझी दुसरी मुलाखत 4 सप्टेंबर 2019 रोजीची. ही मुलाखत सलग दहा तासाची होती. मुंबईमध्ये असणारा मोठा पाऊस, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती त्यामुळे कसेबसे आम्ही सेटवर पोहोचलो. खरंतर आमची बस होती म्हणून चालेल तर पोहोचू शकलो कारण तिथं जाणं शक्यच नव्हतं. केबीसीचे सलग तीन शोमध्ये आम्ही कराड सातारचे 50 अमिताभ बच्चन प्रेमी सहभागी झालो होतो. 

बारा वाजता आम्ही सेटवर गेलो. बारा ते रात्री दहा असे सलग दहा तास अमिताभ बच्चन आमच्यासमोर होते आणि आम्ही फक्त सिनेमास्कोप अमिताभ बच्चन पाहत होतो. फक्त अमिताभ बच्चन फक्त अमिताभ बच्चन. याचे कारण त्या दिवशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शोसाठी पुरामुळे कोणीही दर्शक पोहचू शकले नव्हते. पावसामुळे मुंबई बेहाल झाली होती. पहिला शो संपल्यानंतर आम्हाला विचारण्यात आले की तुम्ही दुसऱ्या शोसाठी थांबू शकता का ? आम्ही आनंदाने तयार झालो. दुसरा शो संपल्यानंतर  सायंकाळी सहा वाजता पुन्हा आम्हाला विचारण्यात आले की तिसऱ्या शोसाठी तुम्ही थांबणार का? 


आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो तीन डोळे अशी आमची अवस्था झाली. सलग दहा तास आम्ही अमिताभ बच्चन यांना पाहिलं. त्यांनी आम्हाला जिंकलं. फक्त अमिताभ अमिताभ आणि अमिताभ. रात्री दहा वाजता आम्ही धुंद होऊन, मनसोक्त मनमुराद दर्शन घेऊन बाहेर पडलो. अमिताभ बच्चन यांच्यासोबत अतिशय जवळून फोटो काढले. अमिताभ यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला, ग्रुपची माहिती घेतली. हा एक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. अशी होती माझी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची दुसरी भेट!


16 ऑगस्ट 2021ला अमिताभ बच्चन यांना तिसऱ्यांदा भेटीसाठी मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा पहिल्या भेटीच्या वेळी जी उत्सुकता होती तीच होती. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील तांत्रिक बिघाडामुळे मधल्या काळात अमिताभ बच्चन खूप निवांत होते. या कालावधीमध्ये त्यांनी सेटवर असणाऱ्या सर्व अमिताभ बच्चन प्रेमींचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, मनोरंजन केलं. सुमारे एक तास त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. या गप्पात अमिताभ बच्चन यांची मी एक मुलाखतही घेतली. आम्ही अमिताभ बच्चन प्रेमी सदस्यांनी एबीपीचा लोगो असलेला मास्क त्यांना खूप आवडला. त्यांनी तो मास्क मागून घेतला.


जेव्हा केबीसी शूटिंग संपले तेव्हा सर्वांसोबत त्यांनी फोटो काढले. मी फोटो काढताना माझे चाहते, माझे प्रेमी आहेत म्हणून मी जिवंत आहेत, असे भावनाप्रधान उद्गार त्यांनी काढले होते. अमिताभ बच्चन यांची ही मुलाखत मी पुढारीमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. सेटवर लांबून का होईना अमिताभ बच्चन यांची पहिली मुलाखत घेण्याचा मला जो योग आला, ती घटना माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आहे. पत्रकार म्हणून आजपर्यंत मी अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, अनेक मोठ मोठे कार्यक्रम कव्हर केलेले आहेत. मात्र अमिताभ बच्चन यांची मुलाखत हा माझ्या आयुष्यातील सर्वात उच्च क्षण आहे.

2002 साली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेली भव्य सभा मी कव्हर केली होती. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे साहित्य संमेलनातील भाषण बातमी, साहित्य व नाट्य संमेलन असे विविध कार्यक्रम, मोठे मोठे नेते यांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. मात्र सेटवरील अमिताभ बच्चन यांची ही मुलाखत माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.

याच वर्षी 27 ऑगस्टला पुन्हा एकदा आमच्या आपल्या कराड शहरातील बच्चन प्रेमींना केबीसीच्या सेटवर घेऊन जाण्याचा मला योग आला. ही माझी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची चौथी मुलाखत होती. या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांचा एक गुण पाहायला मिळाला तो म्हणजे स्वतःचे कौतुक करुन घ्यायचे नाही. 

आपणा सर्वाना माहिती असेल केबीसीच्या सेटवर स्क्रिप्ट मध्ये असणारे सर्व काही प्रश्नांची उत्तरे स्पर्धकाने दिल्यानंतर  त्या प्रश्नाची इत्यंभूत माहिती अमिताभ बच्चन यांना समोर असणाऱ्या स्क्रीनवर दिसते. अमिताभ बच्चन ती वाचून दाखवतात. पुढे प्रश्न येत राहतात आणि स्पर्धकाचे दडपण वाढत जाते. स्क्रिप्ट सोडून ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी खरंच वेगळ्या असतात आणि त्या हॅन्डल करण्याचे सामर्थ्य , समयसुचकता अमिताभजी बच्चन यांच्याकडे आहे.


सलग एकवीस वर्षे ते  दूरचित्रवाहिनीवरील कौन बनेगा करोडपती हा शो करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे  फार मोठे कौशल्य प्राप्त झाले आहे. एखादा स्पर्धक अडखळल्यानंतर किंवा थोडा टेंशनमधे आल्यानंतर त्याला रिलीज कसे करायचे, त्याच्याशी काय गप्पा मारायच्या हे सर्व अमिताभ बच्चन लगेच ओळखतात. 27 ऑगस्टच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्पर्धक म्हणून आसाम मधील एक शिक्षक जे  एका निवासी शाळेत रेक्टर म्हणूनही काम करत होते. या शिक्षकांची आवड आवड आणि अमिताभ बच्चन यांची आवड यावर चर्चा सुरू झाली. हॉस्टेलमधील लाईफ कसे असते याबाबत माहिती सांगायला सुरुवात झाली. या शिक्षकांनी ही माहिती सांगितली. 

मात्र हे ऐकत असताना आमिताभ बच्चन सुद्धा आपल्या हॉस्टेल लाइफ मध्ये हरवून गेले. त्यांनीही आपल्या हॉस्टेलमधील काही आठवणी सांगितल्या. अचानक त्यांच्या असे लक्षात आले की आपण आपल्या स्वतःविषयी जास्त बोलत आहोत. मग  ते तिथे लगेच थांबले आणि म्हणाले माफ कीजिए मे अपने खुद के बारेमेंही जादा बोलने लगा हू !

अमिताभ बच्चन यांचे हे वाक्य मला खूप आवडले
 खरं तर स्वतःचे कौतुक कुणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडते. मात्र आपले कौतुक सुरू झाल्यानंतर कुठे थांबायचे, कसा तो  विशेष बदलायचा आणि मूळ विषयावर जायचे, कुठे थांबायचे हे ज्याला कळते हे फक्त तोच मोठा होऊ शकतो. अमिताभजी यांनी स्वतःचे कौतुक ऐकण्यापेक्षा माझे कौतुक करू नका, थांबा असा प्रेमळ सल्ला देऊन तो विषय वळवला. मला हा गुण खूप आवडला.

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना पाहणे हे फार मोठा आनंद असतो. सुमारे तीन तास या सेटवर शुटींग चालते. या सेटवर गेल्या महिनाभरात व आज अखेर कराड शहरातील पावणेदोनशे बच्चन प्रेमींना आम्ही घेऊन गेलो आहोत. अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची माहिती आणि उपक्रम अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. या सेटवरील अनेक जण आता अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड यांना नावाने ओळखू लागले आहेत. 



29 सप्टेंबर ला मी यावर्षी तिसऱ्यांदा आणि आज अखेर पाचव्यांदा जेव्हा केबीसीच्या सेटवर गेलो तेव्हा मला याची चांगलीच जाणीव झाली. अमिताभ बच्चन मला त्या दिवशी पाहायला मिळाले, तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण अमिताभजी यांच्या तोंडात माझे ग्रुपचे नाव येणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती.  सेटवर आल्यानंतर अमिताभ यांनी माझ्याकडे पाहून केलेला नमस्कार आणि मी पण त्यांना केलेला नमस्कार मी कधीही विसरू शकणार नाही. 29 तारखेला शूटिंग झालेल्या केबीसीचे प्रसारण उद्या 12 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. हे आपण नक्की पहावे, ही आपणास विनंती.


अमिताभ बच्चन यांच्याशी शूटिंग ब्रेक दरम्यान मी त्यांच्या सोबत संवाद साधला. "अमिताभजी आपका 11 ऑक्टोबरको बर्थडे है, आपको उस बर्थडे के लिए हमारे बच्चन ग्रुप की तरफ से बहुत शुभकामनाये देता हु , लेकिन 11 ऑक्टोबर को आप क्या करनेवाले हो, कहा जानेवाले हो? आपका बर्थडे का प्लान क्या है?" यानंतर अमिताभ बच्चन यांनी माझ्याकडे बघून हसत 'अरे कुछ नही,कुछ नही करेंगे फॅमिली के साथ रहेंगे! घर में बैठेंगे मज्जा करेंगे, असे त्यांनी हसत हसत उत्तर दिलं.


हे उत्तर ऐकून मला खूप आनंद झाला. महानायक आपला बर्थडे कसा साजरा करतो याबाबत अनेकांना उत्सुकता असते, मलाही ती होती. या उत्सुकतेने मी तो प्रश्न विचारला होता. एवढा मोठा कलाकार कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करतो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याचाही आपण आदर्श घेतला पाहिजे. 

अमिताभ बच्चन यांच्या पायाला बोटाला काही दिवसांपूर्वी जखम झाली आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर पासून पुढे काही दिवस केबीसीचे भाग शूट झाले आहेत त्या भागामध्ये पायाच्या बोटाला बँडेज बांधल्याचे दिसत आहे.अमिताभ बच्चन यांनी ब्लेझर सूट ऐवजी पारंपारिक पोशाख परिधान केलेला आहेत.पायाला पोटाला झालेली जखम यादरम्यान शूटिंगमध्ये स्पष्ट दिसत आहे.

ब्लेझर घातला तर खाली शूज घालावे लागतील आणि पायाच्या बोटाला बॅंडेज केलेले असल्यामुळे शुज घालणे शक्य नाही.त्यामुळे पारंपारिक पोशाख घालून अमिताभ बच्चन यांनी पायामध्ये चपला घातलेल्या दिसत आहेत. कौन बनेगा करोडपती च्या 21 सिझनमध्ये यापूर्वी कधीही अशा प्रकारच्या चपला अमिताभ बच्चन यांनी घातलेल्या नाहीत. पुढील काही भागात अमिताभ बच्चन यांनी ब्लेझर घालून सुद्धा रंग बेरंगी रंगाचे घातलेले आहेत या हे थोडे वेगळे दिसत आहे. विचित्र यावर अमिताभ बच्चन यांनी फेसबुक वर *FB  3084 -  नीचे हरे, भूरे बूट ; और ऊपर कुछ matching वाले सूट* अशी पोस्ट केली आहे.


आम्ही जेव्हा 29 सप्टेंबरला केबीसीच्या सेटवर होतो त्या दिवशी अमिताभ बच्चन यांना पारंपारिक पोशाखमध्ये आम्ही पाहिले. दुर्गा उत्सव स्पेशल हा भाग असल्यामुळे आम्ही त्या दिवशी सकाळी आठ वाजताच सेटवर पोहोचलो होतो. आठ ते दहा या दरम्यान दुर्गा स्तवन आणि बंगाली पारंपरिक गाण्याचे शूटिंग आम्हाला पाहायला मिळाले. अमिताभजी यांच्या आवाजातील शरण्ये त्रंबके गौरी हे स्तवन अमिताभ यांच्या वर शुट होताना प्रत्यक्ष समोर आम्हाला ऐकायला मिळाले.पायात पायाच्या बोटाला जखम असूनही हा योद्धा थकलेला नव्हता. कारण शो मस्ट गो ऑन.पायाची जखम दुखत होती मात्र तरीही लंगडत लंगडत अमिताब सेटवर आले. संपूर्ण शूटिंग पूर्ण केले. चार तासांमध्ये ते कुठेही थकलेले मला पाहायला मिळाले नाहीत. उलट सेटवर येताना आणि जाताना त्यांच्यामध्ये फार मोठा जोश आम्हाला पाहायला मिळाला. या शो दरम्यान 120 दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल पन्नास जण कराडचे होते. आम्ही खूप दंगामस्ती केली अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. हा आनंदाचा क्षण कधीही विसरण्यासारखा नाही.

अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त आमच्या बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम 13 ऑक्‍टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाला सातारचे कलेक्टर शेखर सिंह उपस्थित राहणार आहेत. बच्चन यांच्या 79 वर्षांच्या कारकीर्दीला या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सलाम करतो.

 *सतीश वसंतराव मोरे* 
 *_सतिताभ_*

३ टिप्पण्या:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...