फॉलोअर

३१ जानेवारी २०२४

पहिली परदेशवारी @ बाकू अझरबैझान 1

परदेश सहल करण्याचं स्वप्न सर्वांचच असतं, माझंही होत.पण ते कधी पूर्ण होणार याची गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत होतो. परदेशात जायचं म्हणून पासपोर्ट काढला खरा मात्र पासपोर्टची मुदत संपली. पाच वर्षे होऊन गेली तरी कुठेही जाता आलं नाही. पुन्हा पासपोर्ट नुतनीकरण केला आणि आता ठरवलं जायचं, नक्की जायचं. पासपोर्ट रिन्यू करून पुन्हा सहा महिने गेले तरी योग येत नव्हता. ऑफिसचं काम, घरच्या अडचणी, कन्येची दहावी या सर्व जबाबदारी मध्ये परदेशात कधी जायचं राहूनच गेलं. 

फेसबुकवर ट्रॅव्हल्स कंपनीच्या अनेक जाहिरात येतात. त्यापैकी एका कंपनीला संपर्क साधला. तत्पूर्वी कराड मधील जे ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्या सर्वांना फोन केले, त्यांनी काही कल्पना दिल्या सुचवल्या. मात्र मी फेसबुक वर आलेल्या दिल्ली येथील डुक कंपनीकडून परदेश दौऱ्याचे नियोजन केले. एरवी कुठेही जाताना मला बोलवा असे सांगणारे अनेक जण असतात मात्र आपल्या वेळेला कोणी तयार होत नाही. माझ्यासोबत लहानपणापासून असलेला माझा करवडी येथील शेजारी, लहानपणीचा सवंगडी अनिल चव्हाण याला मी ती आयडिया सांगितल्यानंतर तो लगेच तयार झाला.आम्ही पैसे भरले देश निवडला, अजरबैंंजान ! जशी दुबई ही संयुक्त अमिराची राजधानी आहे मात्र संयुक्त अमीरातला फार जास्त पण ओळखत नाही. दुबई म्हटले की लोकांना सर्व आठवत तसंच अझरबैझान हा देश हा कमी लोकप्रिय आहे मात्र त्याची राजधानी बाकू ही अतिशय प्रसिद्ध आहे. त्या बाकूला जाण्याचा दिवस उजाडला. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथून बाकूसाठी फ्लाईट रवाना झालं. 27 जानेवारी रोजी पहाटे 3  वाजता बाकूमध्ये पाय ठेवला. 



कुठल्याही परदेशी भुमीवर माझं हे पहिले पाऊल होतं. परदेश किती मोठा असो, लहान असो, प्रगत असो वा गरीब असो  आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथली संस्कृती जाणायला, तिथले लोक पहायला, त्याचा अभ्यास करायला मला पहिल्यापासूनच आवडतं अझरबैझान देशाविषयी खूप ऐकलं होतं, वाचलं आहे. आता बाकूमध्ये आम्ही पोहोचलो आहे. पुढील पाच दिवसात तिथं राहणार आहोत. त्याविषयी सविस्तर ब्लॉक लिहीणारच आहे.

भारतात कुठेही गेलो तर पत्रकारिता विषय कधी विसरत नाही. ज्या ठिकाणी नवीन काही दिसेल ते मी पाहतो आणि त्याविषयी लिहितो. दिल्ली, आग्रा, गोवा इथून मी लेखन केलेलेच आहे. परदेशात गेल्यावर लिहिणं कसं थांबवता येईल ? अझरबैझान मध्ये खुप  ठिकाणी भेटी दिल्या. याबाबत पुढील चार पाच दिवस लिहिणारच आहे. Be connected.

२८ जानेवारी २०२४

सावरणे कठीण झाले

विरहाच्या क्षणी या
सावरणे कठीण झाले !
बिलगून दूर जाताना
सावरणे कठीण झाले !
दुरगावी याद आली
सावरणे कठीण झाले !
तुजवीण परदेशी
सावरणे कठीण झाले !

Miss u At Baku
Azerbaijan 

१५ जानेवारी २०२४

सखी

 

सखी ,
तू जसं म्हणशील तसं.. 
पण मला तू हवी आहेस !
तुझ्यासाठी हेही अन् तेही, 
भेटली नाहीस तरी चालेल.. 
पण मला तू हवी आहेस !

तुझ्या भेटीत सर्व मिळतं मला,
स्पर्शाची तुझ्या राहील ओढ मला.. 
वाट पाहीन त्या क्षणाची सर्वदा, 
पण मला तू हवी आहेस !

मैत्रीचं अन् विश्वासाचं नातं आपलं, 
जपण्यासाठी ते सारं काही मान्य ...
पण सखी, मला तू हवी आहेस !

@सतिताभ 

०९ जानेवारी २०२४

उद्दिष्ट हट्टी राजकारणी मनोहर शिंदे

उद्दिष्ट 'हट्टी' राजकारणी.. मनोहर शिंदे 

मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचेच खरं करणाऱ्या 'हट्टी मनोहर शिंदे भाऊ' यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस.... त्यानिमित्ताने...

मलकापूर सारख्या छोट्या गावातील एक युवा कार्यकर्ता ते प्रगल्भ राजकारणी असा मनोहर शिंदे यांचा प्रवास मी गेल्या तेवीस वर्षांपासून पाहत आहे. माजी आमदार भास्करराव शिंदे यांचा मुलगा, केवळ अशी ओळख असणारे मनोहर शिंदे ज्यावेळी काहीच नव्हते तेव्हापासून मनोहर शिंदे यांना मी पाहत आलो आहे. आता 'मनोहर शिंदे भाऊ' या नावाचा ब्रँड तयार झाला आहे. पण हा प्रवास छोटा नाही, सोपा तर अजिबातच नाही. या प्रवासात मनोहर शिंदे यांना जे यश,कीर्ती आणि नाव मिळालं आहे याची माझ्या अभ्यासातून किंवा माझ्या मते केवळ दोन कारणे आहेत. ती म्हणजे पक्षनिष्ठा आणि माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर असणारे अढळ प्रेम. 

सुरूवातीला मलकापूर ग्रामपंचायत होती,आता मलकापूर नगरपालिका झाली आहे .यामध्ये मलकापूर नगरपंचायत नावाचा एक टप्पा येऊन गेला. हा टप्पा फार महत्त्वाचा होता. ग्रामपंचायतीची मलकापूर नगरपंचायत करणे हे म्हणजे अंगावर अनेक शत्रू ओढवून घेण्यासारखे होते. कर वाढणार, शासनाचे नियम वाढणार, घरपट्टी वाढणार, पाणीपट्टी वाढणार अशा काही गोष्टी नकोशा असणारे सामान्य नागरिक आणि त्यांना चिथावणी देणारे राजकीय नेते यामुळे शक्यतो कोणी नगरपंचायत करायच्या नादाला लागत नाही. मनोहर शिंदे यांनी हे अग्निदिव्य स्वीकारले आणि खा. पृथ्वीराज बाबा यांच्या पाठीमागे लागून तात्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मलकापूरची नगरपंचायत करून आणली. नगरपंचायत झाल्यामुळे मिळणारा भरघोस विकास निधी आणि त्यामुळे गावाचा होऊ शकणारा विकास याची जाण शिंदे यांच्याकडे होती. सुदैवाने मनोहर शिंदे यांच्याकडे मलकापूरची सत्ता आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला.आणखी दुधात साखर पडली, 2010 साली पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग मलकापूरला भरभरून विकासाची गंगाच होऊ लागली. विकासकामं ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, एक विकास केला की दुसरी विकासाची कामे पुढे उभी असतात. त्यामुळे कमी जास्त होत असलं तरी  मलकापूरमध्ये एके काळी काहीच नव्हतं मात्र ते सगळे आणण्यासाठी मनोहर शिंदे यांनी केलेली धडपड,केलेले प्रयत्न मी स्वतः पाहिलेले आहेत. कराड शहरालगत मोठ्या वेगाने विकसित होत असलेले मलकापूर शहर म्हणजे नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण तर व्यापाऱ्यांसाठी सोन्याची खाणंच. महामार्गालगत राहायला मिळणे, त्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळणे, सर्व पद्धतीचे शिक्षण मिळणे आणि हे सगळे मलकापूर मध्ये कमी खर्चात उपभोगाला मिळणे, ही संधी कोण कसे बरे घालवील ?आणि याच गोष्टीमुळे मलकापूरचा विकास झपाट्याने होत गेला, लोकसंख्या वाढत गेली. भौतिक सुविधा कमी पडू लागल्या. मग  डोळ्यासमोर विकासाची ब्ल्यू प्रिंट ठेवून मनोहर शिंदे यांनी  शहर विकासाचे नियोजन केले. उत्तम , भव्य आणि सुंदर रस्ते हा तर प्रत्येकाचा अधिकार आहेच. रस्ते मोठे झाले तरच शहराचा विकास होतो हे खरे असले तरी विकसित होत असलेल्या मलकापूरमध्ये सुरुवातीला घरोघरी शुद्ध आणि मुबलक पाणी गेले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून मनोहर शिंदे यांनी 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना आखली. या योजनेच्या मंजुरीपासूनच ही योजना सुरू होणार का ? चालणार का ? टिकणार का ? 24 तास पाणी कोणी  देऊ शकतं का ? 24 तास पाणी देऊन काय उपयोग होणार? मनोहर शिंदेंना यश मिळणार नाही ? मलकापूर ग्रामपंचायत तोट्यात जाणार,अशा नकारात्मक आणि उलट सुलटचर्चा त्यावेळेला रंगल्या होत्या. मात्र मनोहर शिंदे यांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले. देशभरात जिथे ही योजना सुरू आहे तिथे जाऊन माहिती घेतली, अभ्यास केला. 24 तास शुद्ध आणि मुबलक पाणी देणे शक्य आहे. हे पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय कमी होईल, लोकांना शुद्ध पाणी मिळाले की मलकापूरमध्ये लोक राहायला येतील, मलकापूरचा विकास होईल,लोकांना आरोग्य मिळेल, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना उभी केली, चालवली. देशात आदर्शवत करून या योजनेच्या माध्यमातून मलकापूरचे नाव जगाच्या जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले. मनोहर शिंदे होते म्हणूनच ही योजना चालू शकली आणि यशस्वी झाली, यात काही शंका नाही. मनोहर शिंदे यांचा स्वभाव थोडासा हट्टी आहे, ते स्वतःचच खरं करतात. मात्र ते शहराचा विकासासाठी हट्ट करतात, हे मी अनेकदा पाहिले आहे. 24 बाय सात योजना राबवताना त्यांनी हा हट्टच केला आणि या हट्टीपणामुळेच ही योजना यशस्वी झाली, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. 

सलग दोन टर्म काँग्रेसच्या चिन्हावर बहुमत मिळणे हे सोपे काम नाही. मात्र मनोहर शिंदे यांना हे शक्य झाले कारण त्यांची काँग्रेस पक्षावर असणारी निष्ठा. मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय जवळचे मानले जातात. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मधील अनेक महत्त्वाच्या गोष्टी मनोहर शिंदे यांनाच विचारून करतात. किंबहुना कराड दक्षिणेत काँग्रेस पक्ष वाढीसाठी मनोहर शिंदे यांचे योगदान फार मोठे आहे. एकनिष्ठ असलेल्या मनोहर शिंदे यांनी जे जे मागितले तेथे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत मलकापूरला दिले. काँग्रेस पक्षनिष्ठा हा मनोहर शिंदेचा गुण घेण्यासारखा आहे. 

अनेक गोष्टीवर मनोहर शिंदे भाऊ आणि यांचं माझं एक एकमत असतं, मात्र कधी कधी आमचे तात्विक वाद होतात. त्यांच्या जवळच्या काही चमच्यांनी अनेकदा आमच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला मात्र भाऊंनी त्या चमच्याना वेळोवेळी अलगद फेकून दिले. त्यामुळे आमच्या दोघां मधील वैयक्तिक संबंध कधीही दुरावले नाहीत. पुढारीच्या माध्यमातून अनेकदा मलकापूरच्या विकासाबाबत वस्तुनिष्ठ बातम्या द्यावा लागतात. कचरा समस्या, सांडपाणी याबाबत आर्टिकल छापून येतात, फोटोन्यूज येतात. मात्र हे छापून आल्यानंतर मनोहर शिंदे यांनी कधीही ही बातमी का छापली म्हणून मला फोन केला नाही. उलट ही बातमी छापून आल्यामुळे आमचा फायदा झाला ,या बातमीचे कटिंग दाखवून मी मंत्रालयात गेलो आणि मलकापूर स्मशानभूमीसाठी निधी आणला. कचराकुंडीची बातमी छापून मी कचऱ्यासाठी निधी आणला,असे मनोहर शिंदे मला आनंदाने सांगतात. हा त्यांचा गुण खरंच उल्लेखनीय आहे. विरोधात छापून आलेल्या बातम्यानांही जो सकारात्मक घेतो, त्याचा फायदा उठवतो,असा राजकारणी मी क्वचितच पाहिलेला आहे. या पुढील काळातही मनोहर शिंदे यांची काँग्रेस पक्षनिष्ठा घट्ट होओ,त्यांच्या हातून मलकापूर वासीयांसाठी चांगली कामं होवो, त्यांना आरोग्य लाभो,अशा त्यांना शुभेच्छा !

सतीश मोरे सतिताभ
9881191302

०४ जानेवारी २०२४

कराडातील कलाकृतींचा अयोध्येत बहुमान




कराडातील कलाकृतींचा अयोध्येत बहुमान


अयोध्येमध्ये राम जन्मभूमीत रामलल्ला विराजमान होत आहेत. भव्य राममंदिर साकार होत असताना त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराडमधील छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांनी काढलेले फोटोरुपी रामचरित्र अयोध्येत कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे. ही सर्व छायाचित्रे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण प्रकल्प प्रमुख गोपालजी यांच्याकडे केदार गाडगीळ आणि कल्पेश पाटसकर यांनी नुकतीच अयोध्या येथे सुपूर्द केली आहेत. शहरातील कलाकारांच्या सहभागातून तयार झालेली ही छायाचित्रे अयोध्येत कायमस्वरुपी राहणार असल्यामुळे कराडकरांचा हा एक अनोखा सन्मानच ेआहे.

5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. पाहता पाहता मंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरु झालं. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला. याशिवाय अनेकांनी आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कलेच्या माध्यमातून सेवा घडवू या उद्देशाने कराडमधील कलाकारांनी एकत्र येऊन संस्कार भारती, कराड निर्मित व कराडतमधील छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांच्या संकल्पनेतून श्रीराम दिनदर्शिका तयार केली. प्रभू श्रीराम यांची आठवण जनमानसात सतत जागृत रहावी, या उद्देशाने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली होती. ही दिनदर्शिका तयार करण्याच्या कामात परिसरातील अबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या दिनदर्शिकेत प्रभू श्रीरामांचे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श शिष्य, आदर्श बंधू असे 12 आदर्श गुण असलेले प्रसंग आहेत. या प्रसंगांचे छायाचित्रण करुन ही छायाचित्रे या दिनदर्शिकेत घेतली आहेत. ही सर्व छायाचित्रे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील परिसरात प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काढण्यात आली असून ही दिनदर्शिका चैत्र ते फाल्गुन अशी अर्थात मराठी वर्ष पद्धतीप्रमाणे तयार केली. या दिनर्शिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे छायाचित्राच्या खाली असणारा क्यु-आर कोड स्कॅन करताच छायाचित्रातील प्रसंग मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत या चार भाषांमध्ये लिखित स्वरूपात येतो. ही दिनदर्शिका तयार करण्याची कल्पना कराडमधील फोटोग्राफर कल्पेश पाटसकर यांची आहे. त्यांनी एक-एककलाकार जोडून टीम तयार केली. त्यातून पुढे फोटोग्राफी विभाग, एडिटिंग विभाग, ड्रेपरी विभाग असे छोटे-छोटे विभाग केले आणि त्यातून काम सुरू केले. या विभागात स्वतः कल्पेश पाटसकर, सर्वेश उमरणी, आसावरी पंडित, शांतनू देशमुख, अमेय तिडके, गणेश गायकवाड (श्रीरामांच्या भूमिकेत), कल्याणी बोरकर (सीता) रितू उनऊने, अर्पिता गाडगीळ, अनंत जोशी (विश्वामित्र), के. एन. देसाई (दशरथ), अभय भंडारी आणि रिता जोशी (मार्गदर्शक) यांनी काम केले. दिनदर्शिकेच्या छायाचित्रणासाठी लागणारे नेपथ्य साहित्य (धनुष्यबाण, गदा, पुरुष पात्रांचे दागिने, मुकुट इ.) रात्रंदिवस काम करून टीममधील कलाकारांनी स्वतः तयार केले. त्यानंतर निवडलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन 12 प्रसंगांचे छायाचित्रण पूर्ण झाल्यानंतर त्याचे एडिटिंग, प्रिंटिंग आणि काही तंत्रात्मक काम पूर्ण झाले आणि दिनदर्शिका हातात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन गुढीपाडव्याच्या दिवशी अभिनेते नितीश भारद्वाज आणि कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले होते. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रविण दभडगाव आणि संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत यांच्यापर्यंत ही दिनदर्शिका पोहोचवली. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनज गडकरी यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून दिनदर्शिका सुपूर्द केली. दिनदर्शिकेतील प्रभू श्रीरामांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन कराडमध्ये भरवले होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन भिडे गुरुजी आणि प्रसिद्ध वक्ते अभय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातील छायाचित्रे लोकांना पाहण्यासाठी 5 फूट बाय 3 फूट या आकारात प्रदर्शनात मांडली होती. त्याबरोबरच टीममधील कलाकारांनी स्वतः तयार केलेले नेपथ्य साहित्य सुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. प्रदर्शनातील सर्व छायाचित्रे श्री गोपालजी श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या उभारणी प्रकल्प प्रमुख यांच्याकडे सुपूर्त केली असून ही छायाचित्रे अवधूत कलबुर्गी यांनी प्रिटिंग करून दिली होती. दिनदर्शिका तयार झाल्यानंतर त्याच्या विक्रीतून खर्च वजा करता 2 लाख हातात आले. सर्व रक्कम श्री गोविंददेवगिरी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आयोध्या यांच्याकडे सुपूर्त केली. या दिनदर्शकेनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील 12 स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित अशी स्वराज्य 75 दिनदर्शिका सुद्धा तयार केली. यानंतर दोन्ही दिनदर्शिकांच्या टीम बरोबर श्री गोविंदगिरी महाराज यांना ही भेटण्याचा योग आला. मानवी मनावर प्रभाव टाकणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कला.  आपल्या कलेचे सार्थक व्हावे, असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. याच प्रेरणेतून कराडमध्ये एकत्र येत कलाकरांनी स्वप्न साकारले. ही दिनदर्शिका अयोध्येत प्रभू श्रीरामांपर्यंत पोहचावी, असं प्रत्येकाला वाटत होतं आणि ते प्रयत्नांती सत्यात उतरलं. 

कल्पेश पाटसकर आणि केदार गाडगीळ यांनी ही  छायाचित्रे राम मंदिर न्यास कमिटीपर्यंत पोहोचवली. ही छायाचित्रे त्यांना इतकी आवडलीत की, या छायाचित्रांचे पोट्रेट राम मंदिर न्यासाच्या कार्यालयात लावण्याची इच्छा व्यक्त केली. ही छायाचित्रे श्रीराम मंदिराच्या शेजारील कार्यालयात लावण्याचा निर्णय कमिटीने घेतला. सध्या ही चित्रे कार्यालयात लावण्याचे काम सुरु आहे.


सतीश मोरे सतिताभ 

वनवासावेळी झालेल्या प्रभू श्रीराम व भरत भेटीचे छायाचित्र.

 वनवासावेळी झालेल्या प्रभू श्रीराम व भरत भेटीचे छायाचित्र.
 प्रभू श्रीराम यांचे हनुमान भेट झालेल्या प्रसंगाचे छायाचित्र.

मी पाहिलेली नाटके..! मी केलेलं नाटक.. अर्थात माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स


मी पाहिलेली नाटके..!
मी केलेलं नाटक.. अर्थात माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स 

प्रत्येक माणसांमध्ये एक कलाकार असतो,कला असते आणि तो  'ती कला' कुठे ना कुठे व्यक्त करत असतो.कोणी गाणं म्हणतो, कुणी नाटकं करतो,कोण नकला करतो, कोण कुणाचा तरी आवाज काढतो, रिमेक करायचा प्रयत्न करतो. कोण आपल्या स्वतःच्या आवाजाची, वागण्याची, बोलण्याची वेगळी स्टाईल निर्माण करतो. स्टेजवर अभिनय करणे हे प्रत्येकाला जमतंच असं नाही पण प्रत्येक मनुष्य आयुष्यभर अभिनयच करत असतो, नाटक आणि नाटकं करत असतो,नाट्य घडवत असतो,नाट्य पाहत असतो. आयुष्याच्या नाटकात तो अनेक भूमिका निभावतो. त्याला आवडणारी भूमिका तो इतरांच्यावर लादत असतो. दुसऱ्यांच्या न आवडणाऱ्या भूमिकेवर तो लगेच व्यक्त होत असतो. मात्र स्वतःच्या 'भूमिके'वर तो कायम ठाम असतो. 

असो. नाटक, नाट्य आणि अभिनय याचा प्रत्येकाच्या आयुष्यातील सहभाग कमी जास्त प्रमाणात असला तरी नाटक करायला किंवा अभिनय करायला एक संधी मिळावी लागते.  लहानपणी ती संधी मिळते शाळेमध्ये. अलीकडे बालवाडी पासूनच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले जाते. आमच्या काळात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी फक्त आम्ही सजलेलो असायचं. बाकी वेळेला रेगुलर कपडे. नवीन कपडे घ्यायला दिवाळीची वाट पाहत बसायला लागायचे. त्या काळात फोटो हा विषय नव्हताच, त्यामुळे त्या  आठवणी फक्त डोळ्यांत साठवल्या जात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला टोपी घालून केलेली महात्मा गांधीची ड्रेपरी आजही डोळ्यात आहे. आज अभिनय आणि नाट्य या विषयावर बोलायचं , लिहायचं सुचलं कारण आज मला एक फार जुना फोटो सापडला. हा फोटो मी करवडी गावातील अल्बम मधून मिळवला. तो फोटो आहे माझ्या स्टेजवरील पहिल्या परफॉर्मन्सचा.

माझ्या आयुष्यातील नाट्य क्षेत्राचा किंवा अभिनयाचा पहिला योग आला की जो मला चांगला आठवतो. तो म्हणजे टिळक हायस्कूलमध्ये सादर केलेला पोवाडा. माझा कोळे येथील प्रशांत उकिरडे नावाचा एक मित्र आहे. त्याने आम्ही आठवीला असताना भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा पोवाडा आमच्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये सादर केला होता. त्याच्यासोबत पाठीमागे 'जी..जी रं' म्हणायला मी आणि कडेपूरचा हिंदुराव यादव होतो. स्टेजवरचा माझा पहिला परफॉर्मन्स. फक्त जी जी म्हणण्यापुरते मी स्टेजवर असलो तरी त्याची पूर्वतयारी मात्र महिन्यांपासून सुरू होती. तो फोटो आता माझ्याकडे उपलब्ध नाही. मात्र मी बांधलेला फेटा , नेहरू शर्ट ही आठवण आजही माझ्या हृदयावर कोरलेली आहे.

 त्यानंतर सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील एक आठवण माझ्या स्मरणात आहे. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी गॅदरिंग म्हणजे एक उत्सव असायचा. या गॅदरिंग मध्ये सर्वांचा आवडता एक विषय असायचा तो म्हणजे फिश पॉइंट. आपल्या वर्गातील मुला मुलीवर फिश पॉइंट लिहून द्यायचे आणि त्याचं वाचन स्टेजवर केलं जायचं. माझ्या वर्गात अकरावी बारावीला सहा मुली होत्या आणि आम्ही जवळजवळ 70 मुलं. आमच्या वर्गातील एका मुलाने एका मुलीवर फिश पॉइंट टाकला होता. ती मुलगी परिक्षेला कॉपी खूप करायची. म्हणून तिच्यावर 'कोणती कॉपी कोणत्या खिशात, याची इंडेक्स वरच्या खिशात ...मिस ...' असा फिश पॉइंट पडला होता. गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला खूप कमी विद्यार्थाचा नंबर लागायचा. मला सीनियर असलेल्या आर्ट शाखेतील  प्रदीप वालावालकर यांने एक नाटिका बसवली होती. त्याच्यामुळे मला 1990 साली कॉलेजमधल्या गॅदरिंग मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. ते एक छोटसं नाटक होतं. नाटकाचं नाव होतं 'आधुनिक रामायण'. सर्व प्रसंग हिंदी चित्रपटामधील गाण्यावर आधारित होते. दहा मिनिटांची ही नाटिका होती. अर्थातच या नाटकाचा दिग्दर्शक आणि रावण भुमिका वालावलकर याने केली होती.अंताक्षरी टाईप सर्व गाण्याचा मुखडा एकत्र करून आम्ही ही नाटिका सादर केली होती. या नाटकाची सुरुवात सरगम चित्रपटातील 'ओ रामा हो.. हम तो चले परदेस, हम परदेसी हो गये' या गाण्याने झाली होती आणि त्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेत असा सीन होता. या नाटकात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण अशी फक्त पाच पात्र होती. सीतेचे काम करायला आम्हाला आमच्या वर्गातीलच काय आख्या कॉलेजमधील कोणतीही मुलगी तयार झाली नाही. शेवटी एका मुलालाच आम्ही सीता बनवलं. विशेष म्हणजे प्रभू रामचंद्राचे पात्र निभावलेला मुलगा  ख्रिश्चन धर्मीय होता) आम्ही दमदारपणे ते नाटक स्टेजवर सादर केलं, कॉलेजमधील युवक युवतींनी टाळ्या वाजवत आम्हाला दाद दिली. तुम्हाला सर्वांना सांगायला आता आनंद वाटतो आणि थोडसं हसू पण येतं, या नाटकात मी चक्क हनुमानाची भूमिका केली होती. बारावीत असताना माझी तब्येत अतिशय सड पातळ होती. सोबतचा फोटो पाहिला की तुमच्या लक्षात येईल. कोणत्याही दृष्टीने, कोणत्याही अँगलने मी हनुमानाची भूमिका करायला पात्र नव्हतो. मात्र तरीही ती भूमिका माझ्या वाट्याला आली होती. या नाटकातली माझी एन्ट्री होते त्यावेळेला लावलेले गाणं सुद्धा माझ्या आवडीचं, माझ्या आवडत्या कलाकाराचं होतं. सीतामाईला रावण पळवून नेतो. सीतामाईच्या शोधात हनुमान जेव्हा लंकेत जातो तेव्हा तो सीतेला अंगठी दाखवून आपली ओळख दाखवतो आणि तेव्हा गाणं होतं 'अरे दिवानो मुझे पहचानो कहा से आया मै हु कौन'.

या नाटकाची वेशभूषा, रंगभूषा सर्व काही तयारी आम्ही पाच जणांनीच केलेली होती. हनुमानाच्या हातात गदा पाहिजे. मात्र मोठी गदा कुठे मिळणार? आणि बजेट फार कमी होतं. शेवटी प्लास्टिकची  खेळण्यातील गदा आणली. आपण हा जर फोटो पाहिला तर गदा दिसून येईल.आधुनिक रामायणातील माझी ही भूमिका माझा स्टेजवरचा पहिला परफॉर्मन्स होता. मात्र तो परफॉर्मन्स आज 33 वर्षे होऊन गेली तरीही माझ्या डोळ्यासमोर अजूनही तसाच आहे.नाटकातली भूमिका छोटी असली तरी ही भूमिका साकारल्यानंतर मला मिळालेला आनंदाचा सुगंध अजूनही दरवळतो आहे.

पुढे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना आणि झाल्यानंतर नाटक आणि अभिनय करायचा योग कधीच आला नाही. मात्र गावात यात्रेला, गणपती उत्सवात परिसरात कुठेही नाटके असली तरी आम्ही पाहायला जात होतो. कार्वे ,सह्याद्री साखर कारखाना,कराड,रेठरे या ठिकाणी पाहिलेली नाटके मला थोडेफार आठवतात. कराडच्या टाऊन हॉलमध्ये प्र. के. अत्रे यांचे 'ब्रह्मचारी' नावाचं एक नाटक आलं होतं. या नाटकात प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर हे मुख्य भूमिकेत होते. वर्षा उसगावकर यांचं त्या काळातील हे नाटक फार गाजलं होतं. कदाचित हा काळ 1993 चा असावा. स्टेजवर वर्षा उसगावकर कृत्रिम तयार केलेल्या धबधब्यासमोर आंघोळ करते,असा एक सीन होता आणि त्या काळात कमी कपडे घातलेली वर्षा उसगावकर स्टेजवर पाहायला मिळणे म्हणजे ....., धाडस होते. लोक नाटक पहायला जायचे, वर्षा उसगांवकरचा तो तीन पाहून उलट सुलट चर्चा करायचे. आजच्या काळात कमी कपडे घातलेली हीरोइन पाहणे काहीच विशेष नाही .मात्र त्यावेळेला अशी कमी कपड्यातली नटी स्टेजवर येणं म्हणजे संस्कृतीविरोधी होतं.  


आमच्या टिळक हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीं मिळून राम गणेश गडकरी लिखित 'एकच प्याला' नावाचे एक नाटक केले होते. कदाचित 1985 सालं असावं. हे नाटक मला चांगले आठवते. या नाटकात आठवीत शिकत असलेल्या सुधीर घळसासी यांने सुधाकरची दमदार भूमिका केली होती. शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय प्रयत्न करून,रातं दिवस सराव करून हे नाटक अतिशय सुंदर पद्धतीने बसवले होते. एकच प्याला हे नाटक सादर करणे एवढं सोपे नाही मात्र आमच्या शाळेतील मुलांनी ते शिव धनुष्य पेललं होते. हे नाटक पहायला त्यावेळी परिसरातील अनेक नागरिक आलेले होते. घळसासी सरांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक टिळक हायस्कूलच्या निगडीकर कला मंदिर येथे सादर करण्यात आले होते (या नाटकाविषयी माहिती संकलित करत आहे, सविस्तर लिहीन लवकरच... )


2001 साली पुढारी मध्ये वार्ताहर म्हणून जॉईन झालो. त्यानंतर प्रत्येक वर्षी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये राज्य नाट्य स्पर्धा होत होत्या. या नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांचे समिक्षण लिहिण्याची जबाबदारी पुढारीने माझ्यावर सोपवली होती. त्यामुळे ही सर्व नाटके पाहिली आहेत. निळू फुले,अशोक सराफ, भरत जाधव प्रशांत दामले, संकर्षन कराडे, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी अशा अनेक नाट्य कलाकारानी कराडच्या टावर मध्ये सादर केलेली अनेक नाटके त्यानंतर पाहिलेली आहेत. 'रायगडाला जेव्हा जाग येते' आणि 'तो मी नव्हेच' ही दोन नाटके मी तीन चार वेळा पाहिली आहेत. 'हनुमाना'चा तो फोटो पाहून मला आठवलेल्या काही नाटकाविषयी आज लिहिण्याचा प्रयत्न केला. आपणास आवडेल कदाचित ! धन्यवाद.

सतीश मोरे सतिताभ
9881191302

लेखन @श्रीकृष्ण सिटी विंग 
4 जानेवारी 2024 सकाळी आठ वाजता

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...