फॉलोअर

०७ जुलै २०२१

तळबीड फाटा

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
७ जुलै २०२१
निसर्गवारीचा आजचा दिवस खरंतर तासवडे टोलनाका ते तासवडे एमआयडीसी परिसर असा नियोजित होता. मात्र तासवडे एमआयडीसी परिसरात आम्हाला आवश्यक असे नैसर्गिक वातावरण पाहायला जायला खूप अंतर जावं लागत होतं आणि त्यामुळे पुढारीचे वार्ताहर प्रवीण माळी यांच्या सूचनेनुसार आम्ही थोडासा बदल करून आमची निसर्ग वारी तळबीड फाटा येथून सुरू केली.
सहा वाजता हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी मोहिते यांच्या गावाच्या प्रवेशद्वारावर (तळबीळ फाटा) येथे आम्ही पोहोचलो. तळबीड गावाला जाणारा फाट्यापासूनचा संपूर्ण रस्ता निसर्गाची खाण आहे,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही बाजूला हिरवंगार उस, सोयाबीन पीक, समोर किल्ले वसंतगड,गडाच्या पायथ्याशी हिरवीगार झाडी,थंड हवा आणि नैसर्गिक विपुलता. अशा या प्रसन्न वातावरणात आम्ही चालायला सुरुवात केली. हरिपाठ सुरू होता, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनसंपदेकडे लक्ष होते. पक्षी, फुले, पाने, झाडे, पाणी,प्राणी, डोंगर नदी या सर्व पासून तयार झालेला निसर्ग. यातून चालत असताना रस्त्याला दोन्ही बाजूने असणारी निरगुडीची विपुल वनस्पती आणि वेगवेगळ्या वनस्पतींच्या वेलीकडे लक्ष गेलं.निरगुडीची मोठ्या प्रमाणात असणारी झाडे आणि त्याची तटबंदी कुंपण केलेली शेती, घरं आम्ही पाहिली.निरगुडी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, अनेक आजारात निर्गुडीचा पाल्याचा रस किंवा लेप दिला जातो. खेडेगावात निरगुडीचा उपयोग खराटा म्हणून तसेच ताटी बांधण्यासाठी केला जातो.
साडेसहाच्या सुमारास तळबीड गावाच्या जवळ पोहोचलो तेव्हा लांबूनच श्रीराम मंदिराचे ३ कळस दिसू लागले. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे सोनेरी कळस अजून उजळून दिसत होते. साई किरण महाराजांनी बांधलेले श्रीराम मंदिर गावची शान वाढवते. या कळसाचे आम्ही दुरूनच दर्शन घेऊन माऊलीना नमस्कार केला.
गावात प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला असणारा महाकाय वड वृक्ष पाहून आमची पावले थांबली आणि हात जोडले गेले. हा वृक्ष किती वर्षांपूर्वीचा असावा याचा विचार मनात आला. त्या वृक्षाच्या सावलीखाली कोण कोण बसले असेल? या वृक्षाने आज अखेर किती पक्षी, प्राणी आणि माणसांना उनवाऱ्यापासून निवारा दिला असेल? हा विचार आला. वडाचे झाड भक्कम आणि उंच असते. आपण वडाची झाडे लावत आहोत,आपण लावलेला वडाच्या झाडाचा अजून काही वर्षांनी एवढाच मोठा वृक्ष होईल असे आम्हाला वाटलं. पुढे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दुरूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचा विसावा बेलदरे खिंडीत असणाऱ्या मंदिराजवळ होता. ही खिंड आमच्यासाठी नवीनच होती, या अगोदर पाहिली नव्हती.त्यामुळे रस्ता विचारत आम्ही गावाबाहेर आलो. या रस्त्यावरून एमआयडीसीचा शेवटचा भाग आम्हाला दिसत होता. पुढे हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात चालत राहिलो.
आता गाव खूप मागे राहिलं होतं, थोडासा चढाचा रस्ता लागला. समोर किल्ले वसंतगड अतिशय सुंदर दिसत होता. आम्हाला जिथे पोहचायचे होते ती खिंड जवळ आहे असे वाटत होते मात्र चालत राहिलो तरी ती खिंड जवळ येत नव्हती. दुरून डोंगर साजरे याचा अर्थ काय असतो हे आम्हाला समजले. खरंच डोंगर पाहायला गेलं तर ते जवळ दिसतात मात्र प्रत्यक्ष चालत जातो तेव्हा तो लांब असतो .चालायला सुरुवात करतो तेव्हाच हे कळतं. थोडासा चढाचा रस्ता आल्यानंतर आम्हाला आमचा वेग मंदावला. आम्ही हळूच चालत राहिलो. या उंच ठिकाणावरून पाठीमागे तळबीड गाव अतिशय सुंदर दिसत होते तर पुढे मंदिरावरील भगवा झेंडा आम्हाला दिसू लागला.आम्ही तिथे जाऊन पोहचलो. उंचावरून नजारा पाहिल्यानंतर आमचा कंटाळा निघून गेला,भान हरपून गेलं.
बेलदरे गावच्या हद्दीत उंचावर असणारे नाईकबा मंदीर आणि त्या ठिकाणी विकसित केलेला परिसर अतिशय सुंदर असा आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या पर्यटक गॅलरीतून उंच ठिकाणावरून आम्ही बेलदरे , म्होप्रे, विहे गावे दिसत होती. पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा समोर होत्या. बेलदरे खिंडीत असणारे हे नाईकबा मंदिर फार प्राचीन आहे. नाईकबा मंदिराबाबत सुद्धा आख्यायिका आहे. तळबीड गावातील एक भक्त ढेबेवाडी नाईकबा येथे हा दर्शनासाठी जायचा. वृद्ध झाल्यानंतर त्याला जाणे अवघड झाले. शेवटी त्यांनी देवाला विनंती केली आणि देव त्याच्यासोबत तळबीड गावाकडे यायला निघाला. मात्र देवाने घातलेली मागे न पाहण्याची अट त्याने मोडली.तळबीड समोर दिसत होते मात्र या डोंगरावर त्यानं पाठीमागे पाहिले आणि नाईकबा देवाने तिथेच आपला मुक्काम केला. तेच हे ठिकाण.
हे नाईकबा मंदिर तळबीडच्या हद्दीत आहे कि बेलदरेच्या यावरून दोन्ही गावांत वाद होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्या डोंगराचे दोन भाग करून ह्या मंदिराचा भाग बेलदरे हद्दीत असल्यामुळे हे मंदिर बेलदरे ग्रामस्थांचा असल्याचा निवाडा दिला असे आम्हाला उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. या ठिकाणी आम्हाला पुजारी भेटले. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अतिशय वेगळी होती. बेलदरे गावातील मराठा समाजातील 32 भावक्या आहेत त्यांच्याकडे या मंदीराच्या पूजेची दिवाबत्तीची जबाबदारी असते. बत्तीस भावकी या मंदिराचा कार्यभार पाहतात. अमावस्या ते अमावस्या असा एक महिन्याचा कालावधी प्रत्येक भावकीला मिळतो. त्या एक महिन्यात त्या भावकीचा व्यक्ती या मंदिरात राहतो, एक महिनाभर श्रीची पूजा करतो. अमावस्या आल्यानंतर हा कार्यभार पुन्हा दुसऱ्या भावकीच्या ताब्यात दिला जातो. मंदिराचा कारभार पुन्हा त्याच भावकीच्या ताब्यात येण्यासाठी 31 महिने वाट पाहावी लागते. संपूर्ण गावावर या मंदिराची जबाबदारी असल्यामुळे मंदीर परिसरात विकास अतिशय चांगला झालेला आहे. मंदिराच्या परिसरात कराडचे परशुराम रावजी शिंदे यांनी एक आड काढून दिला आहे ,त्याला भरपूर पाणी आहे. ग्रामस्थांनी पाइपलाइन करून पाणी या मंदिरात आणले आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या परिसरात रामघळ नावाचा एक भाग आहे, शेजारी खुप उंच टेकडी आहे त्या टेकडीवर सुमारे तीनशे एकर एवढे मोठे पठार आहे. गिर्यारोहण प्रेमीसाठी हे पठार एक पर्वणी आहे. मंदिराच्या समोरच वसंतगडावर जायला रस्ता आहे. या बाजूने वसंतगडावर जाण्याचा रस्ता अतिशय सोपा आहे असे आम्हाला ग्रामस्थांनी सांगितले.
या ठिकाणी काही वर्षांपूर्वी वसंतगडावर जाण्यासाठी मोठा रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाने गडावर दूरदर्शनचे केंद्र होणार होते. हे केंद्र सुरू होण्याअगोदर या मंदिरासमोरून वसंतगडावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले. सुमारे दोनशे मीटर रस्ता तयार करून झाला. मात्र पुढे हे दूरदर्शन केंद्र अजिंक्यताऱ्यावर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आणि हे काम बंद पडले. याच परिसरात आम्ही उपस्थित असलेल्या पुजारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वडाची झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी मंदिरातील सर्व लोकांनी हातभार लावला. खड्डे काढण्यापासून पाणी घालण्यापर्यंत तसेच त्या झाडाला कंपाउंड घालण्यापर्यंत जबाबदारी या मंदिरातील लोकांनी स्वीकारली.विष्णु कदम, महेश खांबे, विठ्ठल डुबल, मंथन खांबे, मंदार खांबे तसेच वाहागावचे अजित माळी, राजवर्धन माळी, प्रवीण यांचं ही झाडे लावण्यासाठी फार सहकार्य लाभले. डोंगरावर नाईकबा मंदिरासमोर दोन वडाची झाडे लावण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा आम्हाला खूप आनंद झाला.
झाडे लावल्यानंतर मंदिराशेजारी असलेल्या एका शेडमध्ये बसून आम्ही नाश्ता केला. प्रवीण माळी यांनी आमच्यासाठी शेवयाचे उपीट आणले होते. याची चव माऊलींच्या भाषेत सांगायचे तर अमृताहून गोड होती. आम्ही नाश्ता करेपर्यंत मंदिरातील पुजारी मंडळींनी आमच्यासाठी आले, वेलदोडे टाकून अतिशय सुंदर असा ब्लॅक टी केला होता. या चहाची चव अजून सुद्धा जिभेवर रेंगाळत आहे.
चहा पिऊन आम्ही सर्व माऊलींचा निरोप घेतला आणि परतीच्या दिशेने निघालो. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने तळबीड गावात सरसेनापती यांचे अतिशय सुंदर असे स्मारक तयार झाले आहे. या स्मारकाची निगा चांगल्या पद्धतीने राखली जाते. या ठिकाणी हंबीरराव मोहिते यांच्या स्मृती ग्रामस्थांनी जपून ठेवलेल्या आहेत. विजय दिवस समारोह समिती आणि भारतीय सेनेच्या वतीने सरसेनापतींच्या समाधीवर 16 डिसेंबर रोजी पुष्पचक्र अर्पण केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचे राज्याभिषेक पाहिलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावात आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली. येथूनच श्रीराम मंदिराचे दर्शन घेतले आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
आजची निसर्ग वारी वसंत गडाच्या तळबीड आणि बेलदरे गावातील नाईकबा टेकडीवर अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाली.
राम कृष्ण हरी माऊली
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०६ जुलै २०२१

अंधारवाडीला

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
6 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
आज आमची निसर्ग वारी निघाली अंधारवाडीला. नाव जरी नकारात्मक असलं तरी या गावात खूप सकारात्मक आहे, गावकरी खुप प्रेमळ आहेत.गावाला मोठा इतिहास आहे. त्या गावात जाण्यासाठी कराडला सगळे जमलो. सव्वा सहा वाजता उंब्रज येथे पोहचलो.निसर्ग वारीचे खास शिलेदार रणजीत पाटील यांना थोडेसे तब्येत बरं नसल्यामुळे ते येऊ शकले नव्हते. मात्र त्यांनी गाडी घेऊन अभिजित सूर्यवंशी यांना आमच्या सोबत पाठवले होते.
सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आम्ही अंधारवाडीच्या दिशेने उंब्रज येथून चालायला सुरुवात केली. उंब्रज ते अंधारवाडी हे अंतर तीन किलोमीटर आहे,सकाळच्या प्रसन्न वेळेत उंब्रजचे अनेक नागरिक, युवक पुरुष माॅर्निंग वाॅकसाठी या रस्त्यावर होते. रस्त्यावरून चालणारांची संख्या खूप होती.या रस्त्यावरून अंधारवाडी पर्यंत रोज चालत जाणारे खूप लोक आहेत. या लोकांना आम्ही नवीन दिसत होते, त्यामुळे लोक आमच्याकडे उत्सुकतेने पाहत होते.आमचा हरिपाठ सुरू होता. साडेसहा वाजता आम्ही अंधारवाडीत पोहोचलो फक्त तीन किलोमीटर अंतर चालून झाले होते. त्यामुळे आम्ही आणखीन गावाच्या पुढे जाण्याचा निर्णय घेतला. गावाच्या बाहेर एक वाघजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात आपण नक्कीच जायचे असा आम्ही निर्णय घेतला.
अंधारवाडीच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर आनंदपुर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे असा मोठा फलक पाहिला. या गावाने काही वर्षापूर्वी आनंदपुर असे नामकरण केले आहे. या कमानीतून आम्ही आत आलो, या गावात आम्ही सकाळ सकाळी पोहोचल्यामुळे या गावातील सुखद चित्र आम्हाला पाहावयला मिळाले. खेडेगावातील अनेक पद्धती,रुढी, सवयी अजूनही संपलेल्या नाहीत. गावागावात बंगले उभे राहिले तरीपण ग्रामीण जीवन हे अजूनही ग्रामीण आहे.आम्ही गावातून पुढे जात होतो तेव्हा हे सर्व ग्रामीण चित्र पाहावयास मिळाले. घराबाहेर चुलीवर पाणी तापवण्यासाठी महिला मंडळी बसल्या होत्या. चौकात काहीजण हातावर तंबाखू मिसरी घेऊन दात घासत होते, गोठ्यामध्ये कोणी शेण काढत होते तर काढलेले शेण टाकण्यासाठी कुणी डोक्यावर पाटी घेतली होती. गोठ्यात धार काढायची लगबग सुरू होती. शेतातून वैरण घेणारे काही लोक पाहायला मिळाले तर काहीजण शेतात जाताना आम्हाला भेटले. गावातील हनुमान मंदिर चौक पाठीमागे सोडून आम्ही पुढे आलो. महालक्ष्मी मंदिरा शेजारीच एक वडाचे प्राचीन झाड आहे. या झाडा विषयी पुढे सांगेन.
खेडेगावातील लाइफ खरच वेगळ असतं, आम्ही या गावातून पुढे जात होतो तेव्हा मला माझ्या करवडी गावातील काही गोष्टी सहज आठवल्या. सकाळी उठल्यानंतर चुलीवर पाणी तापवायचे, त्यासाठी आदल्या दिवशी पालापाचोळा आणून ठेवायचा.विहिरीवरून पाणी आणायचे, पुढे गावात नळ आल्यानंतर नळाला नंबर लावण्यासाठी घागरी ठेवायच्या, असा तो नित्यक्रम असायचा. अंधारवाडीत सुद्धा हे दृष्य पाहिल्यानंतर करवडीची आठवण नाही आली तर नवल !
गावाच्या बाहेर शेताच्या रस्त्याने निघालो. येथून पुढे वाघजाईदेवी मंदीराकडे जाणारा रस्ता होता. या रस्त्यावर पुन्हा ग्रामीण शेती दर्शन पाहून खूप आनंद झाला.ग्रामीण अशा जुन्या पद्धतीची घरे, दारात असलेला गोठा,पडवी ! घरासमोर बांधलेली पशु संपत्ती, शेतात खळखळणारे पाणी हे सर्व आनंदी दृष्य खुप दिवसानंतर पाहायला मिळाले. यादरम्यान पंडित भीमसेन जोशी यांचे भक्ती संगीत ऐकत होतो, सुरुवातीला ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी त्यानंतर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल आणि पुढे याचसाठी केला होता अट्टाहास, ही तीन भक्तीगीते ऐकत ऐकत आम्ही वाघजाई मंदिराजवळ आलो.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले वाघजाई मंदिर अतिशय सुंदर आहे.हे मंदिर पाहून आमचा थकवा निघून गेला. मंदिराला चारी बाजूने तटबंदी आहे,झाडी आहे .बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ जाऊन हात पाय धुतले आणि मंदिरात प्रवेश केला. आत पुजाऱ्यांची गडबड सुरू होती पूजेचे साहित्य जुळवाजुळव सुरू होती.आम्ही मंदिरात गेल्यानंतर आज मंगळवार आहे आणि आणि देवीच्या वारा दिवशी आम्ही आज मंदिरात आलो, याचा आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांनी आम्हाला या मंदिराची माहिती सांगितली. खूप जुने असे हे मंदिर असून ही नवसाला पावणारी देवी आहे, या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते अशी माहिती आम्हाला मिळाली. देवीची पूजा होईपर्यंत आम्ही मंदिरात बसलो. त्यानंतर मनोभावे दर्शन घेऊन बाहेर पडलो.
यादरम्यान सागर बर्वे आणि जगन पुरोहित, भुषण पाटील, बंडा भस्मे अंधारवाडी गावात पोचले आहेत, असा फोन आला.आम्ही परत गावाकडे निघालो. गावाच्या वेशीच्या अलीकडेच सागर बर्गे मित्रांसमवेत आले होते. आज सागर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी आमच्या वारीमध्ये एक दिवस सहभागी होण्याचा, त्याच्या वतीने एक झाड देण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व मित्रमंडळी समवेत आम्ही आम्ही गावात येऊ लागलो.
मगाशी आमच्या नजरेतून सुटलेला एक भाग म्हणजे या गावाच्या बाहेर असणारा आड. खूप वर्षापासून नंतर कार्यरत असलेला एक आड पहिला. अनेक गावात आजही आड आहेत पण ते बंद पडलेले आहेत. अनेक ठिकाणी तर या आडांमध्ये कचरा टाकण्यात येतो, काही ठिकाणी आड म्हणजे अडगळीची जागा झाली आहे. अंधारवाडीच्या या आडातून एक व्यक्ती पाणी बाहेर काढत होता. आडातून पाणी बाहेर काढण्याचा प्रसंग आजच्या पिढीला खरच माहीत नसेल, माहीत नसणार. प्रत्येक गावागावात अशा प्रकारचे आड आहेत पूर्वी अशा आडातून पाणी काढायचे, डोक्यावर कळशी घेऊन पाणी घरी न्यायची पद्धत होती. या आडातून पाणी काढताना व्यायाम होत असे आणि पाण्याची कळशी घरी नेईपर्यंत जे कष्ट व्हायचे तो एक वेगळा व्यायाम व्हायचा. त्या आडा जवळ जाण्याचा मोह मला आवरला नाही आणि सर्वांनी आडातून पाणी काढले. हात पाय धुतले आणि पुढे आलो.
प्राथमिक शाळेमध्ये गावचे सरपंच धोंडीराम बर्गे आणि त्याचे सर्व सहकारी आमची वाट पहात होते. पुढारीचे उंब्रजचे प्रतिनिधी सुरेश सूर्यवंशी सकाळीच आम्हाला येऊन मिळाले होते, त्यांनी पुढे जाऊन या शाळेजवळ झाडे लावण्या साठीची सर्व तयारी सरपंचांच्या मदतीने केली होती. अंधारवाडी प्राथमिक शाळेची स्थापना 1938 सालची आहे, या शाळेच्या समोर मैदानावर काढलेल्या एका खड्ड्यात सागर बर्गे यांच्या हस्ते आणि सरपंच बर्गे यांच्या उपस्थितीत एक झाड लावण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी आम्हा सर्व जणांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
सरपंचाशी गप्पा मारताना मिळालेल्या माहितीनुसार या गावाचा इतिहास फार जुना आहे. वाघजाई मंदिरापासून खंडोबाची पाली येथे जाण्यासाठी शिवकालीन जुना रस्ता आहे. या रस्त्यावरून संताजी धनाजी यांची फौज आणि संताजी-धनाजी गेलेले आहेत. संताजी धनाजी यांनी या गावात मुक्काम केला आहे आणि त्यांच्या नावाने गावात इनाम जमीन आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. अंधारवाडी हे नाव का पडले असे असा प्रश्न आम्हास पडला याबाबतची आख्यायिका गावातून आम्हाला ऐकायला मिळाली. गावाच्या बाहेर अनेक वडाची झाडे होती. ही वडाची झाडे अतिशय महाकाय अशी होती. या झाडाच्या पारंब्या लांबपर्यंत पोहोचलेल्या होत्या. अशा या झाडांची दाट गडद सावली पडत असे. ही सावली पडल्यानंतर दिवसासुद्धा या परिसरात अंधार व्हायचा आणि त्यामुळे या भागात जायला लोक घाबरायचे. अंधार आणि वड त्यावरून पुढे या गावाचे नाव अंधारवाडी पडले, अशी माहिती आम्हाला मिळाली. या महाकाय वडापैकी आता फक्त एकच वडाचे झाड शिल्लक आहे. त्या झाडाचा फोटो काढून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
दोन दिवसापूर्वी वडोली निळेश्वर येथे आम्ही एक झाड लावले होते, या गावातील निळेश्वर माध्यमिक विद्यालयांमध्ये वडाची पाच झाडे लावावीत असा आम्ही संकल्प केला होता. त्यानुसार आम्ही मुख्याध्यापक सचिन नलावडे आणि शिक्षक सुधीर पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यादिवशी ते शक्य न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा वडोली निळेश्वर गावी आम्ही पोहचलो. निळेश्वर माध्यमिक विद्यालय तथा ज्ञानप्रसारक शिक्षण मंडळाचे संस्थापक सुनिल संकपाळ नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. संकपाळ भाऊ यानी नवी मुंबई ऐरोली येथे 1998 साली शिक्षण संस्थेची स्थापना केली, नवी मुंबई येथे त्यांचे फार मोठे हायस्कूल आहे. यास हायस्कूलमध्ये ते नोकरीला होते त्यांचे मूळ गाव म्होप्रे आहे. साकुर्डी आणि नावडी या दोन ठिकाणी या अगोदर माध्यमिक विद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता मात्र राजकीय कारणांमुळे त्या ठिकाणी हायस्कूल सुरू होऊ शकले नाही. मात्र संकपाळ यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांना वडोलि निळेश्वर येथे हायस्कूल करण्यासाठी सुरु करण्यासाठी योग्य दिशा मिळाली आणि 1999 मध्ये हे हायस्कूल सुरू झाले. सुरुवातीला हायस्कूल छोट्याशा जागेत खाजगी जागेत होते मात्र सकपाळ भाऊ यांचे प्रयत्न, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी निळेश्वर माध्यमिक विद्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. ही इमारत आणि या शाळेचा परिसर निसर्गरम्य आहे, ही शाळा पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शाळाचे मुख्याध्यापक येथे येतात.
संकपाळ सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला होता. माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांना पन्हाळा टेकडीवर ही शाळा आहे, असा भास झाला, इतकं सुंदर वातावरण या शाळेच्या परिसरात आहे. टेकडीवरील या शाळेतून समोर भव्य सदाशिवगड अतिशय सुंदर दिसतो. करवडी, पार्ले, बनवली, विरवडे हजारमाची, कोपर्डे हवेली ही गावे पण दिसतात. शाळेच्या प्रांगणात संकपाळ सरांच्या उपस्थितीत आम्ही वडाची झाडे लावली.
संकपाळ सरांनी आमच्या निसर्ग वारीची सविस्तर माहिती घेतली आणि निसर्गवारीसाठी पाच हजार रुपये किमतीची वडाची झाडे दान करण्याचा इरादा बोलून दाखवला , त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्याध्यापक सचिन नलवडे यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या. आम्ही धन्य झालो आमचा संकल्प 221 झाडे लावण्याचा आहे. गेल्या पाच-सहा दिवसात आमच्याकडे 100 झाडे जमा झाली आहेत.आम्हाला अजून एकशे एकवीस झाडांची गरज होती, आम्ही कुणालाही कळवले नव्हते किंवा कुणालाही झाडे मागितली नव्हती. मात्र आज वडोलि निळेश्वर मध्ये सकपाळ सरांच्या रूपाने माउलींनी आम्हाला काही झाडे मिळतील अशी तरतूद करून ठेवली होती. खरंच माउलीचा महिमा फार महान आहे.
ईश्वर चराचरामध्ये बसलेला आहे, प्रत्येक झाडांमध्ये एक विठ्ठल आहे. आळंदी ते पंढरपूर या 221 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण एका किलोमीटर मागे एक झाड लावले तर पंढरीच्या वारीला गेल्याचा आनंद मिळेल आणि या कल्पनेतूनच मी आणि रणजीत पाटील यांनी ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला आमच्या वारी ग्रुपचे विजय वाटेगावकर यांनी पाठिंबा दिला होता. आपल्याला काही कमी पडणार नाही कमी पडेल तिथं आपण आहोतच, असे रणजीत पाटील आणि वाटेगावकर मला बोलले होते. माऊलींनी आमच्यासाठी, आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला हवे असलेली झाडे मिळण्याची व्यवस्था केलेली आहे . परवा खळे येथील एका व्यक्तीने दोन झाडे आमच्या पुढारी ऑफिसमध्ये आणून दिली आहेत, सोमवार पेठेतील एका व्यक्तीने एक झाड देण्याचे मान्य केले आहे. डॉक्टर डी जे जोशी यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 75 झाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणालाही काहीही न मागता माउलींनी आमच्या वृक्ष लागवड चळवळीसाठी शेकडो हात पाठवून दिले आहेत. खरंच माउलीचा महिमा फार मोठा आहे
आज आमच्या निसर्ग वारीने आम्हाला माणसातील विठ्ठलाचे दर्शन घडवले, विठ्ठलरूपी अनेक लोक भेटले,यापेक्षा अधिक काय हवं आणि लिहिणे!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Mahesh Patil and 73 others
7 comments
Like
Comment
Share

०५ जुलै २०२१

मसूर ते किवळ

 निसर्गवारी*

मसूर ते किवळ
संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
5 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
सकाळच्या प्रसन्न वातावरणात साडेपाच वाजता कराड कृष्णा नाका येथे जमलो. आज जरा थोडं लांब जायचं असल्यामुळे लवकर येण्याचं नियोजन केलं होतं मात्र सर्वजण यायला सहा वाजले आणि मसूर मध्ये पोहोचायला सव्वासहा वाजले. मसूरमध्ये शिवाजी हायस्कूल समोर असणाऱ्या डॉक्टर सत्यजित पाटील यांच्या हॉस्पिटल समोर आमचे गाडी उभी केली आणि आम्ही मसूर किवळ या निसर्गवारीतील पाचव्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली.
मसूर ते किवळ हा सहा किलोमीटर संपूर्ण रस्ता दाट वनराईतून जातो. या परीसरात सर्व गावे अलीकडच्या काही काळात बदलून गेली आहेत. आरफळ कॅनॉलचे पाणी या परिसरात आल्यानंतर समृद्धी आली. मसूर गाव सोडल्यानंतर दोन्ही बाजूला असणाऱ्या हिरव्यागार झाडीतून जाताना आम्हाला आजवेगळाच आनंद मिळत होता. दोन-तीन दिवस आम्ही जो वारी मार्ग केला त्या मार्गात रस्त्यावरून वाहने ये जा करत होती मात्र यादरम्यान आम्ही चालत असताना एक दोन दुचाकी वाहने सोडली तर वाहने नव्हती. रस्त्यावर संपूर्ण शांतता होती. पक्षांचे मंजुळ आवाज येत होते .रस्त्याकडेला व्यायामासाठी आलेले लोक आम्हाला दिसत होते. युवक रस्त्यावर जोर बैठका मारत होते तर आमचा हरिपाठ सुरू होता. चिखली गावाच्या अलीकडे आरफळच्या पुलावर काही ग्रामस्थ गप्पा मारत बसले होते. त्यांना राम कृष्ण हरी म्हणत आम्ही तिथे दोन मिनिटे विश्रांती घेतली. आमचा फोटो काढायला एका ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. तो फोटो काढायचा कसा हे त्यांना शिकवले. त्या ज्येष्ठ नागरिकांने अतिशय सुंदर फोटो काढला पण फोटो कसा काढायचा हे सांगताना आलेली मजा खरंच मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
आरफळ कॅनॉल क्रॉस करून पुढे आल्यानंतर चिखली गावाच्या चौकात हायस्कूलची भव्य इमारत पाहून खूप आनंद झाला.ग्रामीण भागात शिक्षणाची दारे उघडी करण्यासाठी कर्मवीरांना पासून या भागातील अनेकांनी जे योगदान दिले आहे त्यामुळेच लहान गावात सुद्धा आता हायस्कूल उभी राहिलेली आहेत. चिखली मागे सोडून आम्ही पुढे निघालो. या हिरव्यागार झाडीतून जाताना आम्ही बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ब्लुटुथवर लावले. कीर्तनातील अभंग होता 'संतांचे संगती मनोमार्ग गति अकळावा श्रीपती'. हरिपाठातील हा अभंग ऐकताना प्रसन्न शांततेत बाबा महाराज सातारकरांचा गोड आवाज हृदयापर्यंत जात होता. अतिशय सुंदर विवेचन करत बाबा महाराजांनी संतांची संगत किती महत्त्वाचे असत, मनाची ताकद काय असते, मन कसे चंचल असते. आकाशाची घडी घालता येऊ शकते, पर्वताची पुडी बांधता येऊ शकते, समुद्राचे पाणी एका घोटात पिता येऊ शकते मात्र मन ताब्यात ठेवता येत नाही. परंतु हे ताब्यात ठेवण्यासाठी हरिनाम आणि संतांची संगत किती महत्त्वाची असते या आशयाचे संपूर्ण विवेचन त्यांनी केले. हरीनामाचा गोडवा ऐकत आम्ही साडेसात वाजता किवळ गावाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. या गावात असणाऱ्या देशभक्त देशभक्त भिकोबा साळुंखे माध्यमिक हायस्कूल समोर उभा राहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही इतकी या शाळेची इमारत खुप सुंदर आहे. आजी माजी सैनिक संघटना कमानीतून पुढे आलो, माझा बीएससी चा मित्र या गावचे माजी सरपंच सुनिल साळुंखे तिथे येऊन थांबले होते. साळुंखे यांनी आपण झाड लावण्यासाठी किवळ शामगाव रस्ता निवडला आहे असे सांगितल्यानंतर आम्ही गाव पार करून पुढे शामगाव रस्त्याला लागलो.
कराड तालुक्यातून शामगावला जाणारा फलटण रोड सर्वांना माहीत आहे. मात्र किवळ गावातून शामगावला जाणारा एक रस्ता आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. हा रस्ता अजून पूर्ण झालेले नाही. यातील बाराशे मीटरचा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो, तो होणे बाकी आहे. डोंगराच्या अलीकडे असणारे किवळ गाव आणि डोंगराच्या पलीकडे असणारे शामगाव या दोन्ही गावांनी डोंगरापर्यंत रस्ता करून ठेवलेला आहे. फक्त डोंगरातील हद्दीतील बाराशे मीटरचा रस्ता झाला तर मसूर परिसरातील गावांना शामगाव नवीन रस्ता मिळू शकतो.आज रोजी या बाराशे मीटर अंतरातुन पाऊलवाट आहे ,वाहने जाऊ शकत नाहीत. वन विभागाच्या परवानग्या आणि इतर कार्यवाही करून हे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
या रस्त्यावरून पुढे जाऊन आम्ही किमयागार किवळ गावाच्या शिवारात आलो. खरंच हे किमयागार गाव आहे. 2011 12 पर्यंत या गावात पाण्याचा टँकर सुरू करा,अशा प्रकारच्या बातम्या आम्ही छापलेल्या आहेत. किवळ, खोडजाईवाडी, निगडी, हेळगाव परिसरात पाण्याचे सतत दुर्भिक्ष्य असायचे. या गावात मे महिन्यात पाण्याचा टॅंकर द्यावा लागायचा. 2013 अखेर या गावात पाण्याच्या टँकरची मागणी होती मात्र त्यानंतरच्या काळात ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेली जादु खरंच कौतुकास्पद आहे.
कराड तालुक्यातील तसे हे शेवटचे गाव.कायमस्वरूपी टंचाईग्रस्त, कोरडवाहू शेती असा या गावावर शिक्का होता. या गावात सरासरी पर्जन्यमान 615 मिलिमीटर एवढे आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र सतराशे हेक्टर आहे. यापैकी पाचशे एकर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे.उर्वरित क्षेत्रात बहुतांश शेतकरी खरीप पीक तर काही जण द्राक्षबागा घेत होते. 2011 नंतर या गावातील परिस्थिती हळूहळू बदलत गेली. गावाने नालाबंडिंग, जलसंधारण. स्वच्छता अभियान, एकात्मिक विकास योजना, शतकोटी वृक्षारोपण, कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट नाला यासारखी अनेक कामे हाती घेतली. 50हून अनेक ठिकाणे पाणी अडवले आणि जिरवले. 34000 हून अधिक छोटी मोठी झाडे लावली. याचा फायदा हळूहळू होत गेला. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. पुढे मंत्रालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक तानाजी साळुंके यांनी या आपल्या गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी दिला. शेतकऱ्यांनी,ग्रामस्थांनी एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवण्याऐवजी पाणी अडवले पाणी अडवले आणि पाणी जिरवून गावात समृद्धी आणली.
आज या गावात सुमारे 200 हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस असून चालू वर्षी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला सुमारे 20 हजार टन इतका ऊस घालवला आहे. मोठी आर्थिक प्रगती केली आहे. केवळ गावाला खरंच एकदा भेट दिली पाहिजे याच आणखी एक कारण आहे देशातील पहिला ओढाजोड प्रकल्प या गावाने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. डोंगराच्या बाजूने येणारे दोन मोठे ओढे एका ठिकाणी एकत्र करून हे पाणी अडवल्यामुळे गावात पाणी पातळी वाढली आहे. सतरा वर्षांपूर्वी पाण्यासाठी वणवण फिरणार्या आणि टॅंकरची वाट पाहणाऱ्या किवळने केलेली ही प्रगती पाण्यासाठी आजअखेर राज्यभरातील हजारो ग्रामपथकांनी या गावाला भेट दिली आहे.
गावाबाहेर असणाऱ्या सुमारे 12 एकर गायरानामध्ये सागवानाची लागवड केली आहे, ही लागवड खरच पाहण्यासारखी आहे. गावाच्या दोन्ही बाजूला असणारा डोंगर गावाची शोभा वाढवतो. नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून ग्रामस्थांनी,प्लॅन करून डोंगराच्या पायथ्यापर्यंत पाणी नेले आहे.
सध्या काम सुरू असलेली हणबरवाडी धनगरवाडी योजना या गावांसाठी आणखी वरदान ठरणार आहे. या योजनेचे काम या परिसरात मोठ्या वेगाने सुरू आहे. या योजनेच्या पाईप जमीनीमध्ये टाकून पूर्ण झाल्या आहेत. या संपूर्ण योजनेची माहिती आम्ही ग्रामस्थांकडून घेतली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले.
डोंगराच्या पायथ्याशी कैलास साळुंखे यांच्या शेतामध्ये आम्ही वडाचे झाड लावले. यावेळी संकेत साळुंखे, श्रीकांत काशीद प्रणव साळुंखे तसेच मित्र परिवार उपस्थित होता. या शेतातच आम्ही नाश्ता केला,चहा घेऊन परत गावात आलो. संत नावजीनाथ महाराज यांचे मंदिर पाहिले. अतिशय सुंदर मंदिर आहे. माऊलींचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
आज निसर्ग वारीमध्ये एका उपक्रमशील गावाला भेट देण्याचा सुंदर योग आला. कराड,खटाव आणि कोरेगाव तालुक्याचे हद्द जिथे डोंगरावर एकत्र येते असे ठिकाण दुरून पाहिले. खोडजाईवाडी डोंगर लांबूनच पाहून खूप आनंद झाला.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०४ जुलै २०२१

वडोली रस्ता

 *निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
4 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
कराडच्या कृष्णा नाक्यावर जमून पावणेसहा वाजता आज आमचा निसर्ग वारीचा दिवस सुरु झाला. आम्ही बरोबर सहा वाजता कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ मंदिरासमोर पोहचलो. देवाचे दर्शन घेऊन आम्ही हरिपाठ सुरू केला. आज निसर्ग वारीमध्ये अमित खाडे सहभागी झाले होते.
कोपर्डे हवेली ते वडोली रस्ता म्हणजे हिरवीगार उस शेती, काठोकाठ भरलेल्या विहिरी आणि वनराई. आज या गावातून जाताना एक वेगळा आनंद होता. हे गाव खूप मोठं आहे, अतिशय चांगलं गाव आहे. या गावाची लोकसंख्या 15 हजारच्या सुमारास आहे. खूप सधन गाव आहे, या गावात गावातील लोक सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र एकेकाळी या गावाची ओळख 'कोपर्डे आलं,नाकावर रुमाल धरा' अशी अस्वच्छ गाव म्हणून होती. मला आठवते 2002 साली या गावातील अस्वच्छतेवर मी पुढारीमध्ये 'गाव तसं चांगलं पण अति पुढाऱ्यांच्या संख्येने वेशीला टांगलं' या शीर्षकाखाली बातमी दैनिक पुढारीमध्ये छापली होती. या बातमीनंतर गावातील काही नेत्यांनी मला फोन करून नाराजी व्यक्त केली. मात्र काही जणांनी हे सत्य स्वीकारून गाव स्वच्छ होण्यासाठी, गावाची कुओळख पुसण्यासाठी दै. पुढारीने योग्यच केलं,आमचे डोळे उघडले,अशी प्रतिक्रिया दिली होती.
नंतरच्या काळात 2004 नंतर ग्रामस्वच्छता अभियानाचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलं. ग्राम विकास मंत्री आर आर पाटलांना सुचलेली संकल्पना संपूर्ण राज्याने उचलून धरली. त्यानंतर केंद्र सरकारचं निर्मल ग्राम अभियान आलं. स्वच्छता अभियान आणि शौचालयाचे महत्त्व गावागावांत पटू लागलं. कोपर्डे गावाने या स्वच्छता अभियानात भाग घेतला. अनेकांनी घरात,घरासमोर शौचालये बांधली. मोठमोठे बंगले उभे करताना त्या बंगल्याच्या बाहेर शौचालयेही बांधली गेली आणि गाव स्वच्छ आणि सुंदर होत गेलं. आज कोपर्डे गावाची ओळख अतिशय स्वच्छ आणि सुंदर गाव अशी आहे. या नवीन गावातून चालत जाताना मला आज खूप आनंद होत होता. जाताना आम्हाला गावातील सुबत्तेचं दर्शन होत होतं. घराघरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर,चार चाकी वाहने, गोठ्यामध्ये गोधन असं सुखद चित्र होतं. धारा काढायची वेळ झाली होती.अतिशय सुंदर दृश्य पाहत आणि याचा आनंद घेत आम्ही कोपर्डे हवेली पार करून पुढे गेलो.
रेल्वे फाटका जवळ आलो. रेल्वेचं लहानपणापासून सर्वांनाच आकर्षण आहे,असतं. मला पण होतं. करवडी ते कराड टिळक हायस्कूलमध्ये जाताना एसटी बस मधून मला रोज रेल्वेचे दर्शन व्हायचं. करवडी कराड एसटी जर पार्ले मार्गे जाणार असेल तर हमखास साडेदहाच्या दरम्यान कोयना एक्सप्रेससाठी फाटक बंद केलेलं असायचं. कधीकधी कोयना एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस एकाच वेळेला येणार असतील तर दहा पंधरा मिनिटे रेल्वे गेट बंद राहायचं आणि आम्हाला या दोन्ही एक्स्प्रेस पाहायला मिळायच्या. आज रेल्वेट्रेन जाताना जाताना काहीच वाटत नाही. लहानपणी रेल्वे गाडी जवळून गेली की किती डबे आहेत हे मोजायचे. मालगाडी असेल तर त्याला खुप डबे असतात. प्रवासी वाहतूक असेल तर कोणती एक्सप्रेस आहे, कुठल्या गावाहून आली आहे, याची आम्हाला उत्सुकता असायची. आजच्या छोट्या मुलांना ह्या ट्रेन गाडी विषयी किती आकर्षण आहे कल्पना नाही. आम्ही रेल्वे रुळावर रेल्वे जाण्यापूर्वी एखादे नाणे ठेवायचे रेल्वे गेल्यानंतर ते शोधण्याचा पराक्रम केला आहे.
रेल्वे फाटक ओलांडून आम्ही उत्तर पार्ले मध्ये आलो. या ठिकाणी गेल्या काही वर्षात नागरी वस्ती खूप वाढली आहे. पार्ल्यातील अनेक लोक या परिसरात राहायला आले आहेत. त्यांनी बंगले बांधले आहेत. या ठिकाणी मंदिर उभारले आहे. याच ठिकाणी शासकीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह बांधण्यात आले आहे. नजीकच कराड पालिकेसाठी आ. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या कचरा डेपोची 25 एकर जागा आहे, ही जागा पाहून उंडाळकर काकांनी कराड पालिकेसाठी केलेला एक मोठं काम डोळ्यासमोर आलं. या ठिकाणी कचरा डेपो किंवा कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रयत्न झाला मात्र परिसरातील ग्रामस्थांना आपण नक्की काय करून देणार आहोत हे पटवून देण्यास कराड पालिका अपयशी ठरल्यामुळे इथे काही होऊ शकले नाही. आज ती जागा पडून आहे,भविष्यात या ठिकाणी कराड पालिकेकडून एक मोठा प्रकल्प उभा राहिल,अशी अपेक्षा आहे.
निसर्गाचं रूप पाहत आम्ही पुढे जात होतो, हरिपाठ संपला होता. आता भक्ती गीते सुरू होती. राम कृष्ण हरी चा जप सुरू होता. सातच्या सुमारास आम्ही वडोली निळेश्वर या गावात पोहोचलो. या गावाच्या पश्चिमेला डोंगरावर एक दत्त मंदिर आहे, त्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही वळालो. गावाच्या पलीकडे असणारा आरफळ कॅनॉल पार करत रूळलेल्या पाऊलवाटेने आम्ही चालत राहिलो. याही रस्त्यावर आम्हाला मोरांचे आवाज ऐकत होते. मोरांचे दर्शनही झाले. पुढे एक छोटासा तलाव होता, या तलावात अनेक बगळे स्नान करत होते, अतिशय सुंदर असे दृश्य होते ते! तिथून पुढे वळणावर एक मोठा शेडवजा गोठा पाहायला मिळाला. या गोठ्यात असणारी पशु संपत्ती पाहून खूप आनंद वाटला. पुढे निघालो टेकडीवरील दत्त मंदिर खूप आम्हाला खुणावत होते. आम्ही पुढे टेकडी चढायला लागलो, तोपर्यंत आमचे जावई विजय पवार आणि त्यांचे बंधू संभाजी पवार, त्यांचा पुतण्या तिथे आले. दोन मिनिटांत टेकडीवर पोहचलो. हळूवार वाहणारा थंड वारा आनंद देत होता आणि त्याच वेळेला 'आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहीकडे' ही बालकवींची कविता आठवली.
आता झाडं लावण्यासाठी तयारी सुरू केली. दोन-तीन जागेवर आम्ही खड्डा काढण्याचा प्रयत्न केला मात्र खाली दगड लागत असल्यामुळे आमचे प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी तीन खड्डे काढल्यानंतर एका जागी खूप माती मुरूम लागला. त्या ठिकाणी आम्ही वडाचे एक झाड संभाजी पवार आणि विजय पवार यांच्या हस्ते लावले. पुंडलिंक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि गुरुदेव दत्तचा जयघोष केला आणि मंदिरात जाऊन दत्त भगवानांचे दर्शन घेतले.
वडोली गावात काही काही वर्षापूर्वी एक महाराज आले होते, त्यांनी हे छोटेसे दत्त आणि शंकर मंदिर उभारले. मात्र काही वर्षांनंतर हे महाराज येथून निघून गेले आणि मग ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिर उभे केले. या मंदिरात दत्ताच्या मूर्तीच्या खाली गाभारा असून यामध्ये महादेवाची पिंड आहे. टेकडीवर वसलेले हे मंदिर आणि ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. ग्रामस्थांनी प्रयत्न करून या ठिकाणी अनेक छोटी मोठी झाडे लावली आहेत, शेजारी बोअर मारले आहे. बोअरच्या पाण्यावर ही झाडे जगविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र वन विभागाकडून या लोकांना त्रास होतो. सिमेंटची पाण्याची टाकी उंचावर ठेवण्यासाठी भिंत उभी केली होती मात्र हे बांधकाम वन विभागाने दोन दिवसात तोडून टाकले. आजही ही पाण्याची टाकी तिथेच आहे.
काही वर्षापूर्वी या जागेत खोदलेल्या बोअरसाठी वीज कनेक्शनसाठी वन विभागाने खूप अडवणूक करत वीज कंपनीला कनेक्शन न देण्याचे पत्र लिहिले. शेवटी कंटाळून संभाजी पवार हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटले.उदयनराजेनीं त्यांच्या खास 'स्टाईल'मध्ये वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर काही तासातच याठिकाणी वीज जोडणी झाली होती. ही माहिती संभाजी पवार यांनी आम्हाला सांगितली. हे ऐकताना सातारा जिल्ह्यात कोणतेही काम होत नसेल तर लोक उदयनराजेंकडे का जातात? उदयनराजे लोकांच्या हृदयामध्ये का आहेत? याचा प्रत्यय आला.शासकीय नियमाप्रमाणे सगळेच अधिकारी, पदाधिकारी काम करतात मात्र कायदा, नियम आणि व्यवहार याची सांगड घालून जनतेच्या हिताचे काम करणारा नेता म्हणून उदयनराजेंना ओळखलं जातं.
मंदिराच्या समोरच टेकडीवर बसून कांदे पोहे नाष्टा केला. त्या ठिकाणावरुन उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि उसाची शेती पाहून तनामनात उत्साह संचारला, हा उत्साह घेऊनच आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
आजची वारी खूप सुंदर आणि आनंदी झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...