फॉलोअर

०९ जुलै २०१६


🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 9 जुलै 
नातेपुते  सतीश मोरे

बरड पालखी मुक्काम उंचावर आहे.  जोरदार वाहणारे वारे  आणि मधुनच येणार रिमजिम पाऊस यामुळे हवा थंड होती.  अनेक वारकरी आजारी पडले होते.  मी पण सर्दीने जाम. रात्री  औषधे घेतली. झोप लागली. सकाळी तीन वाजता नेहमी प्रमाणे चालणे सुरू केले. आज 19  किलोमीटर अंतर पार करून नातेपुते येथे दुपारी बारा वाजता जेवायला पोहचायचे होते.  वेग वाढवला आम्ही. पण सुरूवातीला रस्त्यावर येण्यारी वाहने आणि वारकरी याची गर्दी होती. 

साडे सहा वाजता आम्ही सोलापूर जिल्हा प्रवेश केला.  सोलापूर जिल्हा परिषद व प्रशासनाने स्वागत कक्ष उभारला होता. लगेच कॅनाल दिसला. खास वारकरी माऊलीसाठी पाणी सोडले होते. तिथे भाविकांनी गर्दी केली होती,  कोण कपडे धुत होते तर काही स्नान करत होते.  पुढे चालत राहिलो. रस्ता नवीन केला होता,  मोठा होता,  वेग वाढविला,   आता धर्मपुरी गाव  आले होते,  या गावादरम्यान इंग्रजी एस आकाराचे धोकादायक वळण पार करून पुढे आलो.  मगाशी गेलेला कॅनाल पुन्हा  एकदा आला.  थांबलो.  येथे आंघोळीला सहकारी गेले.  पाण्याला वेग होता,  पण काठावर  पायर्‍या बांधल्या आहेत,  तिथेच स्नान करावे,  अशा सुचना लावल्या होत्या.  आंघोळ करून बाहेर  आले सारे,  गंध लावला,  पुढे चालायला लागलो. पावणे आठ वाजले होते.  

नातेपुते आता सात किलोमीटर राहीले होते.  पहाटे बरेच अंतर कमी झाल्या आता आवाक्यात आले होते.  लांबूनच शिंगणापूर डोंगर दिसू लागला होता.  मोरोची गाव  आले.  या गावात चहा पिला,  बिस्किटे खाल्ली,  पेपर घेतला.  परत चालत राहिलो.  आता शिंगणापूर महादेव डोंगर आणखी जवळ दिसू लागला होता.  शिंगणापूर फाटा आला.  खुप गर्दी होती तिथे.  बस स्टॅड तयार करण्यात आले होते तिथे.  महामंडळाने छान तयारी केली होती.  अनेक भाविक येथून शिंगणापूरला  जातात,  12 किलोमीटर अंतर आहे.  या माऊलीनो, चला शिंगणापूर.  दर्शन लगेच होतंय.  तास दिड तासात परत, असे स्पिकर वर जाहीर केले जात होते. 

येथून नातेपुते 3 किलोमीटर  आहे.  चालत राहिलो.  पण वेग मंदावला होता. रस्त्याकडेला नांदेड येथील रामीनवार परिवाराचे वतीने पुरी भाजी नाश्ता मोफत पुरवला होता.  सारेच थांबलो, नाश्ता केला.  परत प्रवास सुरू.  साडे दहा वाजता माझा मित्र राहुल खोचीकर यांचे आजोळी मंगेश दिक्षित यांचे घरी पोहोचलो.  हे कुटुंब दरवर्षी पंचवीस  तीस लोकांसाठी जेवण करते. आम्ही बारा पर्यंत आराम केला व नंतर भजन सुरू केले. तासभर  अतिशय सुरेख गायन झाले.  आरती झाली. नंतर जेवण होऊन  सारे लोक मुक्काम ठिकाणी गेले. मी तिथेच थांबून  आराम केला. राहुलचे डाॅक्टर बंधू प्रशांत दिक्षित यांनी इंजेक्शन दिले, औषधे दिली. जेवण करून झोपलो. 
चार वाजता उठून बातमी तयार केली. पाच वाजता माझे कुटुंब आले.  सौभाग्यवती विद्या ,  मुलगा पियुष,  कन्या देवयानी आणि आई आले होते,  मला भेटायला.  आल्या आल्या लेक अशी बिलगली की सारे अंगदुखी पळून गेली. गेल्या काही दिवसांत काय काय केले,  टेस्ट मध्ये किती मार्क मिळाले, एक दात हालतोय , पडलेला दात  उगवला, हे सारे सांगितले.  खुप गप्पा मारल्या.  पियुष सोबत बोललो. सहा वाजता सारे जण पालखी दर्शन करायला गेलो.  दरम्यान पाऊस सुरू झाल्याने सारे आमच्या तंबूत गेलो. . हे आमचे घर,  दुपारी बांधतो, सकाळी काढतो,  असे लेकीला सांगितले.  नंतर त्यांना किचन व्यवस्था,  तंबू व्यवस्था,  पाणी व्यवस्थापन  सारे दाखवले.  परत माऊली दर्शन घ्यायला गेलो.  तिथे कराडचे सर्कल मित्र युवराज पाटील सहकुटुंब भेटले.  गर्दी मुले रथ दर्शन घेऊन निघाले होते.  त्यांना थांबवले.  चोपदार राजाभाऊ यांच्या तंबूत गेलो, भेटलो, त्यानी दर्शन व्यवस्था केली.  काही मिनिटांत दर्शन झाले.  परत आलो सोहळा मालक आरफळकर , राजाभाऊ चोपदार  यांची बैठक सुरू होती.  सदाशिवनगर रिंगण जागा बदलू नये म्हणून  श्रीमती मोहिते आल्या होत्या. 

तेथून बाहेर आलो.  तळावर बंडा तात्या कराडकर यांचे किर्तन सुरू होते . सोपे वर्म  आम्हा सांगीतले संता टाळ हाती घेऊनी नाचा, हा अभंग घेतला होता.  तेथून पुन्हा बाहेर  दिक्षित यांच्या घरी  आलो.  जेवण झाल्यावर सारे कराडला निघाले. पप्पा  लवकर या, काळजी घ्या , असे पियुष म्हणाला,  देवयानी दूर जाईपर्यत गाडीतून हात बाहेर काढत होती. डोळ्यातून पाणी  आले.  

आज दिक्षित यांच्या घरीच मुक्काम होता.  वारी लिहायला घेतली.  दहा वाजता झोपलो. 

आजचा दिवस इमोशनल गेला.
माऊली माऊली

सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
[7/10, 10:21 PM] Satish More: 🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩



या माऊली आवाजाच्या दिशेने या !

               वारकर्आयाला कर्षित करण्यासाठी अनेक क्लुप्त्या

नातेपुते : सतीश मोरे

माऊलींच्या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत.  रोज सकाळी तीन वाजता वारकरी बाहेर पडतात.  काही सकाळी सात वाजता पालखी सोबत निघतात.  सायंकाळी सात पर्यंत वारकरी मुक्कामाला पोहचतात.  या दरम्यान कुणाला काही कमी पडत नाही.  सारे काही मिळत राहते. आणखी काही हवे  असेल तर त्यासाठी सुमारे पन्नास सेवा पैसे देऊन उपलब्ध आहेत.  लाखो वारक्याना कॅच करण्यासाठी रस्त्याकडेला असणाऱ्या दुकानदारानी अनेक फंडे काढले आहेत. या माऊली आवाजाच्या दिशेने या ही कॅसेट पुर्ण वारीत काही क्षण का होईना थांबायला,  ऐकायला भाग पाडत आहे.

वारीत गेल्या काही  वर्षांत वारकरी संख्या वाढत आहे.  पंधरा वर्षे पुर्वी एक लाख  असणारा वारकरी चार पाच लाखावर जाऊन पोहचला आहे.  वारीत सर्व प्रकारचे लोक सहभागी होतात.  येथे गर्भ श्रीमंत पण आहेत,सामान्य माणूस आहे,  गरीब आहे, अतिगरीब पण  आहे.
वारीत सर्वाना समान वागणूक दिली जाते, कोणी लहान मोठा असत नाही. वारीतील प्रत्येकजण येताना घरातून साहित्य आणतो . बाडबिस्तारा सोबत असतोच . तरीही त्याला अनेक अत्यावश्यक सेवेची, वस्तूची, खाद्य पदार्थाची गरज असतेच . लाखो वारकर्यांची गरज  ओळखून अनेक व्यावसायिक,  दुकानदार, कंपन्या मार्केटिंग साठी वारीत  उतरल्या आहेत.

 वारकरी माऊलींना आवश्यक असलेली पन्नास एक प्रकारची छोटी मोठी दुकाने, हातगाडे, स्टाॅल, पालखी सोहळा मार्गावर थाटली आहेत.  चहा, रस, वजन, खेळणी, टोपी, प्लॅस्टीक कागद,  पाकीट, तंबाखू पान बिडी , छत्री, तुळशी माळा, जडीबुटी, मलम, ज्युस, शेगा, पाणी बाटली, वडा पाव , कपडे,  बिल्ला,फळे, चपला, केस दाढी, इस्त्री, पायाचे मिडकॅप, बॅटरी, बॅग, सोडा पाणी,  आईस्क्रीम, धार्मिक पुस्तके, अडकित्ता, चपला तसेच बॅग दुरूस्ती , मोबाईल चार्ज सेंटर अशी दुकाने रस्त्याकडेला, मुक्काम ठिकाणी थाटली आहेत.  या सर्व गोष्टींची गरज लागतेच.  पण ती घ्यायला प्रवृत्त करण्यासाठी नव नवीन क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत.

चालणारा वारकरी चहा प्यायला दिवसात दोन तीन वेळा थांबतोच. वारीत चहा पान ससेवा देणारी सागर,  विठाई हे स्टाॅल दहा ते पंधरा वर्षे येत आहेत.  माऊली या, दमला असाल, बसा  कडक चहा,  अशा गोड भाषेत चहाबाले बोलवतात.  रस प्यायला वारकरी  आलाच पाहिजे  अशी दमदार जाहीरात ज्ञानाई, विठाई, शिवशंकर, शिवयोगी या रसवंती गृह मालकांनी केली आहे.  इकडे कुपन घ्या, तिकडे रस घ्या. आलं बघ,  आलं बघ थंडगार रस. ताजा उस हाय.  आलं,  बर्फ लिंबू पण हाय, अशी जाहिरात दिवसभर कानावर पडत राहते.  दर  दोन तीन किलोमीटर अंतरावर ही दुकाने  आहेतच.

वारकर्रायाचा दिवस अंधारात सुरू होतो. अंधारात शौचाला जायला  त्याला प्रकाश हवा असतो   असतो.  त्यासाठी कमी पैशात बॅटरी उपलब्ध आहे.  या माऊली, आवाजाच्या दिशेने या.  कंपनीचा माल  आहे.  30,50 आणि 100 रूपयात बॅटरी आहे. आणि ती बी सेल टाकून, अशी जाहिरात बॅटरी घ्यायला भाग पाडतेच. खिशात ठेवायचे पाकीट खरं तर सामान्य  वारकरीला गरजेचे नसते.  मात्र  दहा रूपयात पाकीट,  त्यात  आठ प्रकारची कार्ड बसतात.  अहो काय येतेय दहा रूपयात. या पाकीटात पाणी जात नाही,  या आवाजाच्या दिशेने या,  अशी भुलवणारी ऑडीओ जाहिरात दहा रूपये बाहेर काढायला लावते.

महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल.  तीन वडे,  दोन पाव फक्त दहा रूपये, असा  आवाज  ऐकून वारकरी तिकडे जातोच. खोकला येतो, पाय दुखतोय, अपचन झालंय,  या आवाजाच्या दिशेने,  आम्ही तपासूनच औषध देतो,  औषध टाकून प्रत्यक्ष अनुभव दिला जातो, अशी जडी बुटी वैद्याची टिपिकल  आवाजातील जाहीरात आकर्षित करते.  जाहीरात कौशल्यामुळे ग्राहक येतो,  चौकशी करतो,  लगेच नाही घेतले तर पुढच्या मुक्कामाला घेतोच,  त्यामुळे वारीत धंदा बक्कळ होतोच, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

०८ जुलै २०१६

🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 8 जुलै 
बरड  सतीश मोरे

नेहमी प्रमाणे तीन वाजता चालणे सुरू केले.  काल फलटण मध्ये जराही पाऊस झाला नाही.  पण  आम्ही निघालो तेव्हा मोठी सर येऊन गेली. त्यामुळे रस्तावर चिखल झाला होता. पहाटेच्या वेळी पण काही मंडळे आणि सेवाभावी संस्थानी चहा आणि नाश्ता सोय केली होती. काही कार्यकर्ते रस्त्यावर येऊन उपीट वाटप करत होते,  तर बिसलेरी पाणी बाटली शहर वाटप सुरू होते.  आम्ही उभे राहूनच साडे तीन वाजता नाश्ता केला.  शहर  सोडून बाहेर आलो.

फलटण सोडून बाहेर आले नंतर कॅनाल आहे, त्यावर पुल  अरूंद आहे.  शिवाय रस्ता नागमोडी आहे.  सकाळी बाहेर पडलेले वारकरी व खुप  वाहने याचा विचार करून पोलिसांनी पुलाव अलिकडे रोप बॅरीकेटस तयार केले होते.  एकेरी रस्ता,  अरूंद पुल यामुळे वेग खुप मंदावला.  दाटीवाटी करून वारकरी  उभे राहिले होते,  पाय पुढे टाकायचा म्हणून टाकायचा, अशी परिस्थिती होती.  खाली चिखल होता. पाय अवघडले.  वीस मिनिटे गेली कॅनाॅल पुल ओलांडायला. चालत चालत  विडणी गाव आले.  चहाला थांबलो,  पुढे निघालो.  पिंपरद
गाव तीन किलोमीटर होते,  तिथे आम्ही जेवण करणार होतो,  त्यामुळे आंघोळीला जागा शोधून काढली .

रस्त्याकडेला एक विहीर होती,  नवीनच काढली असेल, दगड, माती माल बाहेर पडला होता.  तिथे खूप गर्दी होती. पिंपरदचे सयाजी रघू शिंदे यांच्या मालकीची ती विहीर आहे.  दोनशे मीटर पाटावर  आडवी पाईप लाईन  उंचावर बांधली होती.  त्या पाईपला दोन फुटावर छिद्र पाडले होते.  एकावेळी किमान शंभर लोक आरामात उभे राहून आंघोळ करू शकतील,  अशी अतिशय सुंदर व्यवस्था होती.  खरं तर  आज सकाळी पुन्हा सर्दीने नाक वाहू लागले त्यामुळे  मी आंघोळ करणार नव्हतो. पण  ओपन एअर शाॅवर पाहून बेत बदलला. स्नान केले,  गंध लावला  आणि विहिर मालकाला दुवा देऊन निघालो.

साडे आठ वाजता पिंपरद गावात पोहचलो. पिंपरद सोयायटी शेजारी  आमच्या गाड्या  उभ्या होत्या.  गतवर्षी प्रमाने पुन्हा  अर्चना काटकर यांनी माऊलींच्या घरी गेलो. वय पस्तीस चाळीस  असावे साधारण दहा बाय पंधराचे छोटे घर,  बाहेर नहाणी. अतिशय गरीब कुटुंबातील या विधवा महिलेला दोन मुले आहेत. पती निधनानंतर मोलमजुरी,  भांगलण करून तिने दोन मुले मोठी केली.  एक सहावीत,  दुसरा मुलगा आठवीत. दिवसभर शेतात मजुरी करणार्‍या या आर्थिकदृष्या गरिब पण मनाने दिलदार अशा माऊलींच्या घरी  आम्ही पोहोचलो तेव्हा  आमच्यातील काही वारकरी महिला घराबाहेर बाजरीच्या  भाकरी थापत होत्या. गरज भाकरीचा सुगंध आला.  आत जाऊन बसलो.  आमचे सहकारी कांदा पात कापत होते,  काहीनी लसूण सोलायला घेतला.  साडे नऊ पावणे दहा  वाजता स्वयंपाक तयार होता. जेवायला बसलो.  बाजरीची भाकरी, वांगे, वाटाणा मिक्स कालवण, कांद्याची पात, लाल चटणी , कांदा, शेंगदाणे  असा जबरदस्त मेनू होता. भरपेट जेवण झाले. काय चव होती त्या भोजनाला ! असे स्वादिष्ट जेवण आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले असेल. 

किती विचित्र आहे  जीवन.  ज्याचेकडे खुप आहे, ते लोक  देताना कुरकुर करतात.  ज्यांचे हातावरचे पोट  आहे ते खुशाल देतात,  आनंद वाटतात. त्या माऊलीला खरंच पायावर डोके ठेवून नमस्कार करायची  इच्छा झाली.  पण माऊली म्हणाली,  तुम्ही लोक माझ्या गरीबाच्या घरी येता, देवच घरी येतो. मी तरी काय देते तुम्हाला भाजी भाकरीच की!  धन्य ती माऊली! 
धाकटा मुलगा कुणालने माझा टॅब हातात घेऊन पहायला लागला.  मी त्याची चौकशी केली, कोणत्या   शाळेत जातो?  काय  अडचण आहे?  बोलायला तयार नव्हता तो.  मग मीच विचारले क्लास लावला काय कोणता? त्यावर त्याने क्लास लावायचा  आहे पण महिन्याला दोनशे रुपये लागतात,  असे केविलवाणा चेहरा करून सांगितले.  मी आणखी चौकशी केली,  क्लास मॅडमचा नंबर मागितला,  फी व्यवस्था  आम्ही करतो,  असे सांगितले.  आठवीत असलेल्या भावाची फी 300 रूपये आहे,  असे समजले. दोघांची सोय कराडचे माऊली करतील,  असे त्याच्या आईला सांगून बाहेर पडलो. शेक्षणिक असमतोल,  गरीबी सारे विचार  मनात येऊन गेले. 



बरड  गावी एक वाजता पोहचलो,  तंबू तयार होते. कागद  अंथरून अंग टाकून दिले. चार वाजता  उठून जीप मध्ये बसून बातमी केली,  मेल केली.  

आमच्या बारा नंबर दिंडीत भोजन व्यवस्था करण्यासाठी सेवेकरी टीम सतत कार्यरत  असते. श्रीपती हणमंत शिर्के, नादलापूर हणमंत शामराव खबाले,संभाजी तुकाराम कुंभार ,पाडुरंग रघुनाथ होगले,
नंदकुमार नानासो संकपाळ,सुनिल यादव,दत्तात्रय दिनकर ढेबे,
दिलीप ज्ञानदेव काकडे,सुरेश ज्ञानदेव काकडे ,संदीपमामा कार्वेकर,
विकास बबन खबाले अशी टीम पंचपक्वान खाऊ घालतात. त्याच्या साठी स्वतंत्र वाहन  उद्योजक शाम पवार काका यांनी केली आहे. दुपारी या टीम सोबत गप्पा मारल्या, फोटो काढले. 


सायंकाळी संभाजी  शेवाळे यांचे अॅमवे नेटवर्क मित्र डाॅक्टर हणमंत शिंदे यांच्या घरी जाऊन मोबाईल चार्ज करायला ठेवला. खुप छान स्वागत केले या कुटुंबाने! रहायला यायचा आग्रह केला. 

 येताना  एक वेगळच चित्र दिसले. पीर मंडपात सारे वारकरी विसावले होते.  कोणी कंपाऊंड ग्रील वर कपडे सुकायला टाकले होते. गळयात चार पाच तुळशी माळा घातलेल्या  एका वृदाला विचारले, तुम्ही मुसलमानाच्या पीरात झोपणार?  त्यावर तो म्हणाला, जिथे त्याला अडचण नाही, मग तुम्ही आम्ही काय? वारकरी हिंदू मुस्लीम मानत नाहीत.

 सायंकाळी डाॅक्टर जोशीयांचे कडे जाऊन खोकला औषध घेतले . जेवण झाल्यावर माझी वारी लिहली. पाठवली. नऊ वाजता  अंथरूणावर पडलो. 

दातृत्व कसे असते,  कसे करावे हे सांगणारा

आजचा दिवस माऊली कृपेने  मस्तच. 

     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
Read my blog

०७ जुलै २०१६

🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 7 जुलै 
फलटण  सतीश मोरे

तरडगाव मुक्काम करून पहाटे तीन वाजता तेथून फलटण कडे जायला निघालो.  हे अंतर 19 किलोमीटर आहे.  लवकर निघाल्याने वेग कमी होता.  माऊली नानाचा जयघोष करीत आमचा माऊली ग्रुप चालला होता.  रस्त्यावर खुप गर्दी होती. आज पहिल्यांदा  एक वेगळा आवाज  ऐकला.  या माऊली या. पाणी आहे,  शौचालय आहे,  गर्दी पण नाही, बादली पण  आहे.  बाटली शोधायची गरज नाही.  या!   त्या दिशेने गेलो.  चार पाच युवक वारकर्यांना विनंती करत होते.  त्याचे पाठोपाठ गेलो. भारतीयजनता पक्षाचे युवा मोर्चाचे पुणे शाखेने ही सोय केली होती.  चांगली व्यवस्था,  स्वच्छता होती.  खरंच योग्य ठिकाणी ही सोय होती.  महत्त्वाचे म्हणजे युवक लोकांना बोलावून घेते होते.  या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.  

पुढे चालू लागलो. सुरुवातीला काही अंतर दुहेरी मार्ग होता. दुहेरी मार्ग  असला की चालायला सोपे पडते, सुरक्षित पण  असते.   उजव्या बाजूला वाहने जातात, त्यामुळे चालणे सुकर होतो.  सातारा पोलीस सज्ज होते.  काळज गाव  आले.  या गावात ऐकेरी रस्ता होता.  गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी मध्ये रोप बांधले होते.  पहिल्यांदाच हे दिसले.  खरं तर  अशा सर्व  ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करताना रोप बांधणे सोयीचे होईल.  

गावाबाहेर  आलो,  पुन्हा चालू राहीलो. चढाचा रस्ता पार करून कडेला थांबलो. चार वाजले होते.  रस्त्या कडेला विसावलो.  बाजूला सगळी कडे खडी टाकली होती.  बसायला हीच जागा होती,  पुढे जायची इच्छा नव्हती.  तिथेच अनेकांनी प्लॅस्टिक कागद  अंथरून अंग टाकून दिले.  मी पण बसलो,  खडी टोचत होती,  पाय पसरले.  बाजूला पाहिले अनेक वारकरी तशा जागेत निवांत झोपले होते.  मला पण कंटाळा आला होता,  शेवटी कागद टाकला  आणि  आडवा झालो.  काय सांगू राव किती मस्त वाटले,  अंग खडीवर दाबून निघाले. तासभर तिथेच होतो.  आता  उजाडू लागले,  सारे उठलो.  आंघोळीला जायचे होते, चालत चालत  जागा शोधून काढली. . पेरू बागेत मोठी विहीर होती.  मालकाने पाईपला उंच टी लावून पाणी सोडले होते.  खुप गर्दी होती, मात्र सारा चिखल झाला होता. सर्वानी आंघोळ केली, दरम्यान  अनेकदा पाईप टी निसटला,  त्यामुळे गडबड झाली.  वेगळा  आनंद होता.

पुढे निघालो.  निंबोरे गाव  आले.  येथे माऊली पालखी भोजन विसावा होता.  आम्ही  आमच्या जागेकडे निघालो,  दरम्यान स्मशानभूमी शेड दिसले.  याठिकाणी वारकरी विसावले होते,  नाश्ता करत होते.  काही जण तेथील नळावर आंघोळ करत होते.  विचार आला,  या जागे कडे आपण पहात नाही,  लांबून निघून जातो.  खायचे सोडा तिथे बसत पण नाही. तिथे वारकरी बिनधास्त बसले होते,  त्यांना काही तमा नव्हती. एकजण म्हणाला,  काय भिती नसते स्मशानात,  तिथे कोण नसते,  उलट बाहेर जिवंत भुताची जास्त भिती  असते. 


निबोरे गावाच्या रणवरे टेकडीवर आमचे जेवण होते. आमची दिडी आकरा वाजता येणार होती.  तोपर्यंत बाळासाहेब रणवरे यांच्या घरी जाऊन मोबाईल बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली.  तिथे दुसरी एक दिंडी अगोदरच उतरली होती.  एक युवक किर्तनकार भेटले. MSc दुसर्‍या वर्षाला शिकत होते.  त्याचे सर्व कुटुंब शिकलेले आहे,  तीन पिढ्या वारी परंपरा आहे.   त्याचे सोबत गप्पा मारल्या.  

 विंग गावचे नामदेव कुंभार यांनी पुरण पोळी जेवण आणले होते. आदल्या दिवशी तीन वाजता 25 किलो डाळ शिजवून पुरण केले. गावातील, परिसरातील 50 महिला रात्री बारा पर्यंत पोळ्या लाटत होत्या. पहाटे चार वाजता पोळ्या, आमटी , दुध घेऊन ट्रक निघाला.  साडे आठला जागेवर होता.  साडे आकार वाजता पंगती पडल्या. 

जेवण झाल्यावर माहीती घेत फिरलो. दरम्यान  सारे सहकारी पुढे गेले त्यामुळे खबाले पाटील ट्रकात बसलो.  पाच किलोमीटर ट्रक प्रवास केला, चालक मालक निवास खबाले यांचे नजरेतून वाहन चालवताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.  फलटण मध्ये विमानतळावर दोन वाजता पोहचलो.  ट्रक मध्ये झोप काढली. उठून टॅबवर काम केले.  पाच वाजता कोल्हापूर येथील आमचे बच्चन वेडे ग्रुपचे मित्र आले.  ट्रकमध्ये बसूनच गप्पा मारल्या. ते सात नंबर कोल्हापूर दिडीसाठी प्रसाद घेऊन  आले होते . किरण पाटील,  आनंद पराडकर,  प्रकाश  इंगवले,  संतोष जाधव,  गोपाल पाटील आणि ट्रक चालक निवास थोरात  आम्ही वारी विषयावर बोलत बसलो. समाज आरतीसाठी सहा वाजता सारे गेले. खुप म्हणजे 25 वर्षे नंतर  मी ट्रकवर चढलो.  लहानपणी लग्न वराडातून जाताना ही जागा मिळायला धडपड असायची. टपावर बसून फोटो काढले. 

साडे सात वाजता पंगती पडल्या.  जेवण करून वारी लिहायला बसलो.  वारी वाचणारे अनेक जण आहेत.  अनेकांनी फोटो पाठवा  अशी मागणी केली. माझी पण खूप  इच्छा असते, दिवसभरात सारखे फोटो पाठवावेत.  पण नेट बंद पडलेले  असते. त्यामुळे   रात्री उशिरा किंवा सकाळी मी पोस्ट करतो.. 

आज सुंदर दिवस होता.  अजिबात पाऊस नव्हता  इकडे. 

 

     - सतीश मोरे 
      9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
⛳ karawadikarad.blogspot.in    ⛳Read my blog
 
 
अनियंत्रित वाहतूक व्यवस्थापनाचे 
पोलिसांसमोर मोठे आव्हान

तरडगाव   सतीश मोरे

नैसर्गिक  परिस्थिती, दुष्काळ याचा थोडाफार होणारा परिणाम वगळता प्रत्येकवर्षी वारीत किमान 5 लाख लोक सहभागी होत असतात. वारी म्हणजे भक्तीचा अखंड उत्साह. घरामध्ये सुरू असलेली वारीची अखंड परंपरा पुढे सुरूच ठेवण्यासाठी अनेकजण वारीत सहभागी होत असतात. उन, वारा, पाऊस, वय, आजार, घरांतील अडचणी याची कसलीही पर्वा न करता वारकरी भक्तीच्या या प्रवाहात स्वत:ला झोकून देतात. 13 दिवस हा प्रवास सुरू असतो. तरुण, वृद्ध, स्त्री- पुरूष, सशक्त, अपंग असे सारेचजण वारीत सहभागी होतात.  गेल्या काही वर्षांत वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची अचानक वाढलेली मोठी संख्या प्रशासना समोरील मोठे आव्हान राहिलेले आहे. 
आळंदी ते पंढरपूर दरम्यान ..................... एवढे मुक्काम असतात. मुक्कामातील सर्वात मोठे शहर म्हणजे पुणे. या शहरात दोन दिवस वारकऱ्यांचा मुक्काम असतो. महानगराला वारकऱ्यांचे हे भक्तीचे ओझे सोसणे किंवा पेलवणे तसे सोपे जाते. पाणी, निवास आणि खाद्य व्यवस्था पुणेकर चोख पार पाडतात. थोडीफार वाहतूक व्यवस्था कोलमडते मात्र दोन दिवस पुणे पोलिस अखंडपणे प्रयत्न करीत असतात. वारीच्या वाहतूक व्यवस्थेत पुणे, सातारा आणि सोलापूर पोलिस यांना फार मोठे प्रयत्न करावे लागतात. या तिन्ही जिल्ह्यातील सुमारे 50 हजार पोलिस तसेच  एसआरपी,  स्थानिक युवक  आणि चोपदार फौडेशन 17 दिवस वारी वाहतूक व्यवस्थापन करीत असतात. माऊलीमय झालेले वारकरी  पोलिसांसाठी काही अडचण नसते. मात्र पालखी सोहळा पहावयास आलेले भाविक, हौसे-गवसे आणि गेल्या काही वर्षांत वारीमध्ये वाढलेल्या वाहनांची संख्या पोलिसांसाठी  मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

आळंदी ते पुणे आणि पुढे सासवड ते नीरा या दरम्यान पुणे जिल्हा आणि पुणे ग्रामीण पोलिस वारी वाहतूक व्यवस्थापन करतात. लोणंद ते तरडगाव दरम्यान सातारा जिल्हा पोलिसांवर ही जबाबदारी असते. पालखी सोहळा नातेपुते गावात प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्हा पोलिस ही जबाबदारी स्वीकारतात. वारीचा त्या जिल्ह्यात प्रवेश होण्या अगोदर अनेक दिवस या वाहतूक व्यवस्थापनावर पोलिस दल काम करीत असते. इतर जिल्ह्यांतून वाढीव कुमक मागविली जाते. पालखी सोहळ्यात पालखीच्या पुढे असणाऱ्या 27 दिंड्या आणि पालखीच्या मागे असणाऱ्या 210 नोंदणीकृत दिंड्या तसेच त्यांच्या पाठीमागे सुमारे 250 नोंदणी नसलेल्या दिंड्या आणि यामध्ये सहभागी असलेले वारकरी, टाळकरी, विणेकरी एवढाच पालखी सोहळ्याचा भाग असतो. यामध्ये दोन ते अडीच लाख वारकरी सहभागी असतात. मात्र या सोहळ्याच्या पुढे  कोणाचेही नियंत्रण नसलेला मोकळा समाज हा अडीच- तीन लाखांच्या घरात असतो. अशाप्रकारे पाच लाख वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग सतत कार्यरत ठेवणे, कोठेही ट्राफिक अडथळे येऊ न देणे, पालखी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे अडचणी निर्माण होऊ न देणे ही प्रमुख जबाबदारी पोलिसांच्याकडे असते. तिन्ही जिल्ह्यांचे पोलिस एकमेकांशी सतत संपर्कात असतात. 

पालखी सोहळा आणि त्यामध्ये सहभागी वारकरी यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा  काम करते. तर मोकळ्या समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांना कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा कार्यरत असते. पालखी सोहळ्यातील वारकरी म्हणजे शिस्तीचा मूर्तीमंत अनुभव असतो. मात्र मोकळा समाज पूर्णपणे स्वतंत्र, अनियंत्रित आणि खुला असतो. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे हे वारकरी कोठेही थांबतात. या दरम्यान काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशावेळी पोलिस यंत्रणा "माऊली... माऊली' करून या वारकऱ्यांना विनंती करते आणि वाहतूक व्यवस्था खुली करते.



मोकळा समाज आणि पालखी सोहळ्यात गेल्या काही वर्षांत वाढलेली वाहनांची संख्या हे पोलिसांसमोरील मुख्य आव्हान आहे.  दिंडी आणि त्यामध्ये सहभागी वारकरी यांचे निवासाचे साहित्य, भोजन व्यवस्था आणि रोजच्या वापरातील साहित्य वाहून नेण्यासाठी वाहनांची गरज असते.  ट्रॅक्टर, टेम्पो आणि ट्रक, पाण्याचा टँकर ही प्रमुख वाहने असतात. मात्र अलिकडे दिंडी प्रमुखांच्या वातानुकूलित कारची तसेच जीपची यात भर पडली आहे. या वाहनांचा आकडा कुठेही नोंद नसला तरी पालखी सोहळ्यात तसेच मोकळ्या समाजात मिळून सुमारे 20 हजार वाहने असतात. ही वाहने डाव्या बाजूने सतत धावत असतात. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणारे वारकरी आणि डाव्या बाजूने चालणारी ही वाहने म्हणजे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान असते. 

मुख्य पालखी सोहळ्यातील कोणीही वारकरी स्वत:ची दिंडी सोडून जात नाही. मात्र हा सोहळा पहावयास आलेले भाविक आणि मोकळ्या समाजातील लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी कुठेही घुसत असतात. वारीतील वाहनांचा वेग कमी असला तरी रस्त्याच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाणारे अनियंत्रित वारकरी रिस्क घेवून रस्ता पार करीत असतात. या दरम्यान अपघातही होतात. माऊलींच्या कृपेने त्या अपघातात कोणीही मयत झालेले नाही किंवा गंभीर जखमी होत नाही. मात्र या वारकऱ्यांवर नियंत्रण कसे ठेवायचे हा पोलिसांसमोरील महत्वाचा प्रश्न असतो. 

पोलिस यंत्रणा वारकऱ्यांना कधीही रागावून बोलत नाही. किंबहुना तशी वेळच येत नाही. मात्र थोडा रस्ता रिकामा मिळाला की भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि बघ्यांची संख्या यांच्यावरील नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न अपूर्ण पडतात. मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखी सोहळा निघाल्यापासून तो मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत रस्त्यावर पुढे-मागे 10 ते 15 किलोमीटर वारकऱ्यांचा अखंड प्रवास सुरू असतो. या दरम्यान कोणकोणत्या ठिकाणी पोलिस उभे करायचे याचे नियोजन असते. मुख्य रस्त्याला जोडणारे छोटे-मोठे रस्ते, लहान-मोठी गावे या ठिकाणी पोलिस सज्ज ठेवले जातात. मात्र ही यंत्रणा कमीच पडते. 


चोपदारच वारीचे पोलिस अधीक्षक 

 पंढरीच्या वारीमध्ये पोलिसांसमोर वारकरी लोकांना नियंत्रित करण्यासाठी तसा फार मोठा त्रास होत नाही. कोणी वारकऱ्यांने काहीही चुकीचे केले तर दुसरा वारकरी "ओ माऊली.. हे बरोबर नाही', असे सांगतो आणि तात्काळ तो वारकरी मूळ प्रवाहात येतो. मुळात 5 लाख लोकांवर नियंत्रण करण्यासाठी  पोलिस यंत्रणा किती काम करणार हा प्रश्न असतो. मुख्य पालखी सोहळ्याची शिस्त अतिशय सुंदर असते. यावर नियंत्रण करण्यासाठी चोपदार अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडीत असतात. पालखी सोहळ्याचे मुख्य पोलिस अधीक्षक  खरे तर चोपदारच असतात. चोपदारांनी दिलेल्या सूचना आणि आदेशाचे पालन पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी तंतोतंत करतात. मात्र मोकळ्या समाजातील वारकऱ्यांना आवरण्याचे आणि त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था खुली ठेवण्याचे अवघड काम पोलिसांसमोर असते.

०६ जुलै २०१६

🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩
दिनांक 5 जुलै
लोणंद  सतीश मोरे

वाल्हे छोटे गाव आहे, त्यामुळे मोबाईल टॉवर्स जाम झाले होते,  दुपारी दोन वाजता नेट बंद पडले,  सुरूच झाले नाही.  त्यामुळे काल रात्री वारी पोस्ट करता आली नाही.  एक फायदा झाला लवकर म्हणजे साडे 9 वाजता वाजता झोपलो.
आज सकाळी तीन वाजता उठलो, खरं तर उठायची इच्छा होत नव्हती,  गेल्या पाच सहा दिवसांत पहिल्यांदा  इतकी मस्त झोप लागली होती. तोंडावर पाणी मारले, सारे तयार होत होते.  वळकटी ट्रक मध्ये नेऊन ठेवली . आमचा ग्रुप तयार होताच,  लगेच चालायला लागलो.  चारच्या सुमारास चहा घ्यायला थांबलो,  तेव्हा टॅब सुरू केला, नेट सुरू झाले होते. एकावर  एक पोस्ट यायला लागल्या. 14 तास नेट बंद होते ना! लगेच माझी वारी वेल्हे मुक्काम पोस्ट 50 ग्रुपमध्ये  शेअर केली. दरम्यान काही जण विधी साठी गेल्याने थांबलो.  पुन्हा चालू लागलो.  आज  आमच्या ग्रुप मध्ये सुरूवाती पासूनच ज्ञानोबा ज्ञानोबा , ज्ञानोबा माऊली तुकाराम चा घोष सुरू होता.  आम्ही पंधरा जण होतो.  महेश तवर आणि बाळू संकपाळ पुढे म्हणत होते,  आम्ही त्याच्या मागे.  सर्व जणांचे कान त्या आवाजाकडे होते.  रस्त्यावर माऊलीचा महाप्रवाह अखंड वहात होता.  त्यामध्ये  आपल्या माणसाचा आवाज ऐकून त्या पाठोपाठ जात होतो. त्यामुळे  आज चुकामूक झाली नाही. 
निरा पाच किलोमीटर बोर्ड दिसला, आनंद झाला. आता जवळ आलंय ही भावनाच खुप आनंद देऊन जाते. पुढे रेल्वे फाटक असल्याने वाहतूक खुप स्लो होती. वाल्हे ते निरा रस्ता  एकेरी असल्याने वारकरी माऊलीना आज उजव्या बाजूने जाणाऱ्या वाहनातून पडणार्‍या धुराचा खुप त्रास होत होता.  वारकरी खोकत होते,  मार्ग काढत पुढे जात होते.  फाटकाच्या नजीक पोहचलो . खुप गर्दी झाली, थोडी ढकला ढकली पण झाली, वाहने थांबवून  वारकरी पुढे गेले. पुढे एक दोन किलोमीटर रेल्वे लाईन व रस्ता समांतर आहे. र एक्स्प्रेस ट्रेन जात होत्या. भोळे भाबडे वारकरी रेल्वे बघायसाठी बाजुला येऊन थांबत होते. त्यांना त्याचे अप्रुव वाटत होते.
साडे पाच वाजले होते. डाव्या बाजूला निरा दुध शीतकरण केंद्राशेजारी  एक पेट्रोल पंप पाहून सर्वाना थांबवले. पंपावर वाहनाची रांग  मी अनेकदा पाहिली आहे. पण मोठ्या पंपाच्या विस्तृत जागेत वारकरी निवांत झोपलेले आज पहिल्यांदा पहायला मिळाले. पंपाचा ताबा माऊलीनी घेतला होता, असे म्हणावे लागेल.  काल रात्री आलेले हे वारकरी पंपात मिळेल त्या जागेवर निवांत पडले होते, किती छान झोप लागली होती  त्या माऊलींना ! खुप हेवा वाटला मला त्याच्या या झोपेचा!
पुढे निघालो, पाउस सुरु झाला. वारकरी लोकांनी प्लॅस्टिक कागद बाहेर काढले. पावणे सहा झाले, उजाडले होते आता. निरा कॅनाल दिसू लागला,  डाव्या बाजूला बाहेर पडलो. कच्च्या रस्त्यावरून चालत निरा कॅनाल च्या सेवा रस्त्यावर आलो. पुढे कॅनाल वरील छोटा पुल  ओलांडून डावीकडे गेलो. कॅनाल पाण्याने भरून वहात होता. खुप कमी वारकरी होते पाण्यात.  वारकरी माऊलीसाठी खास पाणी सोडण्यात आले होते. वाहते पाणी पाहून सारे सुखावले. बॅगा बाजूला ठेवून  आम्ही पाण्यात  उतरलो.  गेल्या पाच दिवसांत  परिस्थिती स्वीकारत झटपट आंघोळ करायला लागली होती. पाणी  अंगावर टाकणे, अंग ओले करणे म्हणजे आंघोळ अशी वारकर्याची वारीतील पद्धत असते.  आज काही बंधन नव्हते, पाणी कमी नव्हते ,निरा भरून वहात होता,  त्यामुळे आम्ही चेकाळलो. खाली उतरलो,  मनसोक्त स्नान केले. एकमेकांना आंघोळ घातली, पाठ घासली.  काहीजण पोहले,  पाय मोकळे करून घेतले. कपडे धुवायला ही जागा योग्य होती. चार दिवसाचे कपडे धुतले. आमच्या मागोमाग अनेक लोक तिथे आले. पुरूष आणि महिला वारकरी पाण्यात  उतरून स्नान करू लागले. सारे तयार झाले. गंध लावला. फोटो काढले. निघालो.  


निरा गावाकडे जायला लागलो.  पिंपरी खुर्द गाव आले. आमच्या समुहात गोवारे गावचे शिवाजी विठ्ठल देशमुख बापू ज्येष्ठ वारकरी  आहेत.  विनोदी स्वभावाचे बापू सर्वात लवकर झोपतात  आणि सर्वात  अगोदर म्हणजे दोन वाजता उठतात. पंधरा मिनिटांत तयार होऊन सगळ्यांना उठवतात.  ग्रामीण अस्सल टच व दमदार  आवाजात ' ये उठा की, उठा लवकर ' असा आवाज पहाटे कानावर पडला की सारे जागे होतात.  राग येतो त्यांचा पण  उठावेच लागते.  अन्यथा बापूंचा दम  असतो, ' नाही उठला तर सारा तंबू उतरावा लागेल.  तंबू याच्या अंगावर काढून टाका. ' हे कोणाला नको  असते त्यामुळे सारे पटकन  उठतात . सांगायचे कारण बापूंची मेव्हणी या गावात दिली आहे. साडू शहाजीराव मारूतराव शिंदे लोणंद मध्ये  एका खासगी कंपनीत नोकरी करतात. शिंदे यांचे आग्रहाचे निमंत्रण असल्याने आम्ही कराडचे 15-20 वारकरी त्याच्या घरी दरवर्षी जेवायला जातो. आदर अतिथ्य करावे तर या कुटुंबासारखे.  त्यांच्या घरी 9 वाजता पोहचलो.  दुमजली सारे घर त्यानी आमच्या ताब्यात दिले होते.  कुठेही जा,  काही घ्या,  बसा,  हे स्वातंत्र फक्त  आपल्या स्वतःच्या घरातच  असते.  पण येथे घरच्या सारखेच होते.  किती मोठेपणा म्हणायचा.  आम्ही आमच्या घरात पाहुणे आले तर  इतके मोकळे सोडले असते का?  असा विचार  आला. आम्ही आता भजनासाठी गोलाकार बसलो. खरात माऊली,  बाळू संकपाळ यांच्या सोबतीला उस्मानाबाद येथील दोन वारकरी होते.  थोडी भजन जुगलबंदी झाली  साडे दहा पर्यंत भजन,  पुन्हा आरती करून जेवायला बसलो. वरण, भात,  चपाती, भाजी, सुधारस आणि श्रीखंड...  काय सुंदर जेवण होते ते. संताचे पंगतीला बसण्याचा आनंद काय असतो ते अनुभवले.
बारा वाजता शिंदे माऊली कुटुंबाला नमस्कार करून निरेतून निघालो. निरा नदीच्या काठावर माऊली पालखी विसावली होती. परिसरातील  अनेक  गावातील भाविकांची दर्शनासाठीगर्दी केली होती. खुप लांब रांग लागली होती. खेळणी दुकाने, हार फुले दुकाने आणि माऊलीनी गाव फुलले होते.  पुढे निघालो, पुलावर  आलो, नदीत  अनेक भाविक स्नान करत होते, कोणी कपडे धुत होते,  तर काही जण कपडे वाळत घालत होते.  खुप सुंदर दृश्य होते ते. याच नदीत माऊली पादुकांना स्नान घातले जाते. लांबूनच एक कमान दिसली.  सातारा जिल्हा परिषद आणि खंडाळा पंचायत समिती आपले सातारा जिल्ह्यात स्वागत करत आहे. खुप आनंद झाला,  आपण  आपल्या जिल्ह्यात आलो,  आपला सातारा आला .गेली सात दिवस पुणे जिल्ह्यातून पालखी जात आहे . आता सातारा मग सोलापूर जिल्हा  येणार.  फोटो काढले.  पुल ओलांडून पुढे आलो,  सातारा जिल्हा प्रशासनाने स्वागत तयारी केली होती. त्या स्वागत फलकावर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो पाहून सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचाच असा विचार छाती फुगवून गेला. 


सातारा जिल्हा पोलिसांनी वाहतूक नियोजन चांगले केले होते. माऊली उजवीकडे येऊ नका, वाहनांना जागा द्या असे पोलीस  सांगत होते, अधिकारी अलर्ट होते पण काही गाॅगलधारी डॅशियर पोलीस मधोमध उलट्या बाजूने दुचाकीवरून सायरन लावून येत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्या ऐवजी विस्कळीत झाली. असे उलटे येणारे पोलीस व त्याची दुचाकी पुणे जिल्ह्यात नव्हते.
लोणंद जवळ आलो, रेल्वे पुल पार केल्यावर कराडचे ट्राफिक पोलीस मनोज शिंदे, पाटणकर  आणि. . भेटले,  चहा पिला. विशेष म्हणजे मनोज शिंदे मला गेल्या वर्षी याच जागेवर भेटले होते.  शहरात प्रवेश केला,  फलटण रस्त्याला लागलो, आणखी एक रेल्वे ब्रिज आला. पोलीस स्टेशनला नजीकच्या मालोजीराजे विद्यालयात आलो.  पटांगणावर आमची पालं ठोकली होती , जाऊन पडलो. अडीच वाजले होते.
चार वाजता सदा माऊली फोटोग्राफर  आले, मला मिठीच मारली.  कराडवरून सतीश यादव, विनायक विभुते आदी आले होते. त्यांना  भेटून खुप आनंद झाला.  दरम्यान लोणंद रहिवासी, कराड येथील गजानन प्लॅनेटचे मालक माझे मित्र लायन विवेक राव यांचा फोन आला,  माऊली आमच्या घरी या . मी मोबाईल कुठे चार्ज करायला लावायचा असा विचारच करत होतो,  माऊलीनी विवेक राव यांचेकडे निरोप पाठवला. आमच्या मुक्काम मालोजीराजे विद्यालय होता. तेथून जवळच रेल्वे लाईन पलिकडे लोणंद मधील प्रसिद्ध  गजानन शोरूम मध्ये गेलो.. सोबत शाम पवार काका होते  गप्पा मारत बसलो.  मोबाईल तिथेच ठेवून जेवायला तंबू कडे आलो. सगळीकडे चिखल होता. बारीक पावसात वारकरी उभे राहून मिळेल तेथे जेवायला बसले होते.  पिक अप गाडीचा फाळका पाडला, त्यावर ताट ठेवले, जेवलो.  पुन्हा मोबाईल आणायला रेल्वे लाईन ओलांडून पलीकडे गेलो.  इंटरनेट मिळत नव्हते,  दहा पर्यंत वाट पाहीली अन झोपलो. साडे आकरा वाजता जाग आली तेव्हा पुन्हा पाहीले, नेट जाम होतं.  शेवटी टॅब बंद करून झोपलो. 


🤗🤗🤗
वाल्हे येथील एक महत्त्वाचा प्रसंग सांगायचे राहून गेले.  वाल्हे येथे दुपारी लवकर पोहचलो. वाहने उशिरा  आल्याने स्वयंपाक करणे दोन वाजता सुरू झाल. दरम्यान  आता करायचे काय म्हणून बसलो होतो. यावेळी लवकर या, लवकर या,  भारूडाचा कार्यक्रम सुरू होत आहे,  असा आवाज आला.  आम्ही कराडचे चार पाच लोक तिकडे गेलो. पुढेच बसलो. भारूड ही संत  एकनाथ यांचा आवडता प्रकार.  खुप लोकप्रिय. किर्तन, प्रवचन  ऐकायला न येणारे भारूड म्हणलं की लगेच येतात. ग्रामीण भाषेत,  चिमटे घेऊन,  कधी उपहासात्मक विनोद करून, कधी नाचून , गाऊन भारूड सादर केले जाते.  अग  ग ग ग  विंचू चावला , या शेजारणीनं बरं नाही केलं,  मला पंढरीला नेलं ग बया,  ही भारूड गीते आपल्याला आठवत असतील.  असे भारूड मी पहिल्यांदा बघत होतो. खुप मजा आली. यातील कलाकारांने डोक्यावर समई ठेवून त्यावर पाण्याने भरलेला हंडा  ठेवला, डोक्यावर चुंबळ ठेवून ती पेटवून नाच केला.
या भारूडाचा घटक म्हणून मला त्या कलाकाराने बोलवले. सुरूवातीला काही कळले नाही पण या हो साहेब असे सांगून त्यांनी माझ्या डोक्यावर जिरेटोप घातला आणि जेजुरीचा राजा म्हणून मला सादर केलं. माझ्या मिशामुळे मला ही संधी मिळाली, हे लक्षात आले.  मी मल्हारी झालो होतो. आकरावीत असताना नाटकात काम केले होते, 26 वर्षे नंतर  आज पुन्हा राजा झालो. वेगळा अनुभव होता. खुप हसलो,  फोटो काढले.
एकंदरीत आज मंगळवारचा  दिवस छान गेला.
पंधरा किलोमीटर चाललो,  मजेत..
     - सतीश मोरे 9881191302
     माऊली माऊली
🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
⛳ karawadikarad.blogspot.in    ⛳

दिंडी चालते, चालते ; वारकरी विसावतो!
लोणंद सतीश मोरे
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! चा जयघोष करीत टाळकरी, झेंडेकरी वारकरी दिवसभर चालत राहतो. दुपारी विसाव्याच्या ठिकाणी चार घास खातो. थोडा कलंडतो. नगारा वाजतो, पालखी निघाली असा निरोप येतो. वारकरी उठून पुन्हा मार्गक्रमण करतो. सायंकाळी 7 च्या सुमारास पालखी सोहळा विसावातळावर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. समाज  आरती संपल्यानंतर दिंड्या आपआपल्या जागेवर विसावतात. वारकरीही नेमूण दिलेल्या तंबूत जाऊन पडतो. सायंकाळच्या जेवणानंतर लवकर झोपी जातो. पुन्हा पहाटे उठतो, तयार होतो आणि पुन्हा दिंडी ज्ञानोबा माऊली... तुकाराम! चा जयघोष करीत वारी पुढे चालत राहते.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होतात. यात माळकरी असतात किंवा आई-वडिलांनी सुरू केलेली परंपरागत वारी सुरू ठेवण्यासाठी आलेले वारकरीही असतात. सोहळ्यात सहभागी नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत सुमारे ते 500 दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांचा नित्यनेम एकच असतो. पालखीपुढील 27 आणि पाठीमागे असणाऱ्या 210 दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांना शिस्तितच रहावे लागते. नियमांचे पालन करावे लागते. आळंदी ते पंढरपूर (वाखरी) येथे पालखी पोहोचेपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते झोपेपर्यंत वारकऱ्यांचा नियम, रोजनिशी ठरलेली आहे. त्यामध्ये बदल होत नाही.
आळंदी सोडल्यानंतर पालखी पुण्यात येते. या ठिकाणी अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेल्या रितीप्रमाणे वारकरी वारकऱ्यांच्या घरातच, शाळेत, धर्मशाळेत विसावतात. महानगर असलेल्या पुण्यात दोन दिवस भक्तीचा महापूर वाहत असतो. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन तत्पर असते. पालखी सासवडला पोहोचल्यानंतर निवास व्यवस्था खऱ्या अर्थाने पाहण्यासारखी असते आणि  शिस्तबद्ध वारीचा अनुभव इथून पुढे अनुभवावयास येतो.
वारीतील प्रत्येक दिंड्यांची मुक्कामांची ठिकाणे ठरलेली आहेत. अनेक वर्षांपासून एखादी दिंडी ज्या ठिकाणी उतरत असते, त्याच ठिकाणी ती विसावते. या जागा कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. काही ठिकाणी दिंड्या खासगी जागेत, शाळेत, धर्मशाळेत मुक्कामी असतात. बहुतांश दिंडी मालकांच्याकडे वारकऱ्यांसाठी तंबू निवास व्यवस्था असते. सासवडमध्ये पहिल्यांदा तंबू उभारले जातात. दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी या तंबूमध्ये जागा नेमून दिली जाते. त्याच जागेवर वाखरी मुक्कामापर्यंत त्या वारकऱ्यांनी रहायचे असते. सायंकाळी 7 च्या सुमारास पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणी समाज आरती झाल्यानंतर दिंड्यांतील वारकरी, टाळकरी, चोपदार, विणेकरी असे सारेचजण आपल्या तंबूकडे जातात.
दिवसभर विठ्ठल नामघोषात बेधुंद होऊन नाचलेले, थकलेले वारकरी येथे पाहेाचल्यानंतर माल वाहतूक ट्रकमधून आपले गाठोडे घेवून तंबूत जातात. बाड-बिस्तारा अंथरल्यानंतर पहुडतात.  साडेसात- आठच्या सुमारास पंगती पडतात. काही दिंड्यांमध्ये पत्रावळी वापरली जाते. तर अलिकडे बहुतांश दिंडी मालकांनी ताट-वाट्यांची सोय केली आहे. जेवण झाले की ताटे विसळून वारकरी पुन्हा तंबूकडे येतो. नऊ- साडेनऊ वाजेपर्यंत तंबुमध्ये सर्व वारकरी झोपलेले असतात. स्वयंपाक करणारे, वाढपी आणि सेवेकरी उशिरा जेवतात.
पहाटे तीन वाजता दिंडी स्थळावर उठा... उठा... उठा अशी लबगब सुरू होते. तंबु काढण्यास सुरूवात होते. एखाद्या तंबूतील वारकरी उठत नसेल तर "सर्व तंबू तुला एकट्याला काढावा लागेल' किंवा "तुझ्या अंगावरच तंबू पाडतो' अशी प्रेमळ धमकी देवून त्याला जागे केले जाते. प्रात:विधीसाठी गडबड सुरू होते. रात्री झोपतानाच उशाला पाणी बॉटल भरून ठेवलेली असते. ती घेवून सोय असेल तर शौचालय नसेल तर उघड्यावरच हा विधी आटोपला जातो. तिकडे पाण्याच्या टाकीवर आंघोळ करण्यासाठी नंबर लागलेले असतात. पहाटेच्यावेळी गार वारा वाहत असतो. थंडी असते. मात्र याची कदर न करता स्त्री-पुरूष सर्व वारकरी थंड पाण्यानेच टाकीलगतच आंघोळ करतात. सर्व वारकऱ्यांच्या आंघोळी होईपर्यंत  इकडे सर्व तंबू काढलेले असतात.
आपल्या साहित्याच्या ठिकाणी जाऊन गाठोड्यात बांधलेली माऊली आणि विठ्ठलाचा फोटो काढून वारकरी त्याची पूजा करतात. गंध उगळून डोक्यावर लावतात. बुक्का लावला जातो. या दरम्यान तयार झालेले वारकरी सर्व साहित्य ट्रकमध्ये नेऊन ठेवतात. पाचच्या सुमारास ट्रक, पाणी टँकर व इतर सर्व वाहने तेथून बाहेर पडलेली असतात.
कुठेतरी जागा शोधून प्लास्टिकचा कागद किंवा पोते टाकून वारकरी पुन्हा कलंडतो. साडेसहाच्या सुमारास चूळ भरून पुन्हा तयार होतो. पालखीच्या मागे किंवा पुढे प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. त्या ठिकाणी अगोदरच पोहचलेला  विणेकरी, झेंडेकरी शोधत तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. सकाळी 7 च्या सुमारास  पालखी येथून निघते. साडेआठ ते नऊच्या सुमारास पालखी विसावा असतो. तेथे वारकरी विसावतात. घरातून आणलेलं खाद्य साहित्य काढतात. थोड्या वेळात पुन्हा पालखी सुरू होते. दुपारी 12 ते 1 च्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी सोहळा थांबतो. सुमारे दीड तास पालखी जाग्यावरच असते. या ठिकाणी पुन्हा पंगती पडतात. पहिल्या पंगतीला टाळकरी, माळकरी, विणेकरी आणि दिंडीत प्रत्यक्ष सहभागी वारकऱ्यांचा मान असतो.  जेवणानंतर झाडाखाली, ट्रॅक्टर- ट्रकखाली मिळेल त्या जागेवर विसावा घेण्यासाठी वारकरी थांबतात.
नगारा वाजवत घोडागाडी येते. या नगऱ्याचा अर्थ पालखी निघणार आहे... तयार व्हा. असा असतो. पुढे पुन्हा सोहळा सुरू होतो. अखंड हरिनाम मुखी घेऊन वारकरी चालत राहतात. माऊलींचे नाव घेतले तर चालणे सुखावह होते. चारच्या सुमारास विसाव्यासाठी पालखी थांबते.  त्याठिकाणी भक्त मंडळांनी चहापाण्याची सोय केलेली असते. त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू होतो. सातच्या सुमारास पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाहोचते. असा पंढरीच्या वारीतील पालखी  वारकऱ्यांचा नित्यक्रम असतो.
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot.in/

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...