रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
०१ सप्टेंबर २०१७
सीओ जिओ
नवे मुख्याधिकारी
सत्ताधारी नगरसेवकाची
झाली जय्यत तयारी !
ईकासावरच चर्चा
ना टेंडरचं टेंशन
ना भिती कलेक्शनची वरच्या !
सारे आज बसणार
रंगीत संगीतच्या चर्चेत
आम्हीच जिंकल्याच बरळणार !
जिंकले कोणी ना हरले
आण्णा दादा काका
कारभारी हुशार आपले !
२९ जुलै २०१७
त्यासीं म्हणे जो आपुला
बाळासाहेब पाटील यांच्या विषयी खूप लिहिता येईल. त्यांच्या वक्तशीरपणा आणि सभ्यता याचा खूप जवळून अनुभव अनेकांनी घेतला आहे.
या दिवशी बाळासाहेब पाटील यांच्या लोकसंपर्काचे पैलू पहायला मिळाले. पी.डी.पाटील साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून लोक त्यांना का मान देतात हे अनुभवायला आले.
१४ जुलै २०१७
पसारा
ती
पसारा सहज मांडला जातो ,
परंतु आवरताना जीव घेतो.....
मग तो घरातला असो
नाहीतर मनातला...........
पसारा मांडणारा
तो सहज मांडून जातो
मनाला मात्र घरघर लावून जातो !
तो
मनातला पसारा आवरायला,
आवरलेला पुन्हा मांडायला
लतिके तुझी साथ हवी आहे
अगं तुझा हात हवा आहे !
@ सतीश
०६ जुलै २०१७
फुगवा
फुगवा
चुकलं कोण, कोण बरोबर ?
थोडं तुझं अन् थोडं माझं ,
आणि उरलेलं आपल्या दोघांचं !
इतकं रूसायचं असतं का कधी ?
तुटेपर्यत ताणायचं नसतं कधी !
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे
खरं प्रेम म्हणजे भांडण
करुन परत जवळ येणे.....!!
तुझं माझं सख्ख नातं तुटंल का कधी ?
माझ्यातून वेगळ करता येणार ना कधी !
@.....सतीश मोरे
०४ जुलै २०१७
वारीत उधळलं जातंय पसायदानाचं दान
भाईजान झाले माऊलीमय, परदेशी विद्वत्यांना भुरळ
वारीत उधळलं जातंय पसायदानाचं दान
पंढरपूर सतीश मोरे
भागवत धर्म सर्वांचा आहे. या धर्मांची पताका संत ज्ञानेश्वर महाराज यांनी उंचावली. तुकोबा माऊलीनी तर अल्लाह मध्येच पाडुरंग पाहिला. अवघ्या जगाची काळजी वाहणाऱ्या माऊलींनी जगासाठी पसायदान मागीतले. आता विश्वात्मक देवे, येणे वागज्ञे तोषावे,असे म्हणत जगातील सर्व लोकांना जे जे हवे आहे ते मिळावे असे मागणे मागीतले. सर्वांसाठी मागते ती माऊली. ज्ञानोबा तुकोबाराय माऊलींच्या या वैश्विक दृष्टीकोनावर फिदा झालेले जगभरातील भक्त वारीत सहभागी झाले आहेत. देव एकच आहे म्हणणारे ख्रिस्ती माऊलींचा गजर करत आहेतच शिवाय संतांच्या महाराष्ट्र भुमीतील मुस्लिम भाईजाननी तर स्वत:चे घर दार माऊलींच्या दिंडीला खुले केले आहे. वारीत सर्व धर्मभाव जपला जातो, वाढवला जातोय, वारीसाठी ईदचा सण सुद्धा एक दिवस पुढे ढकलला जातोय. माऊलींच्या पसायदानाचे दान विश्वभर उधळलं जातंय. आज खरी आषाढी एकादशी साजरी होत आहे असंच म्हणावं लागेल.
तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर जाऊ लागला आहे. माऊली सोहळ्याचे वेड अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षांपासून लागलेले आहेच. गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखांवर पोहोचली. त्यानंतरच्या काळात 2 लाख पुढे 3 , 4 ,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. . माऊलीच्या प्रेमाने, ज्ञानानं सर्वांना भुरळ घातली असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेले आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वारीत सहभागी होत आहेत. अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षा पुर्वी मांडली होती. ती आज सत्यात येताना दिसत आहे.
गुंथर सोन्थायमर नावाचा जर्मनी येथील विद्वत्ताने अनेक वर्षे पुर्वी माऊली पालखी सोहळा आणि जेजुरीचा खंडोबा यावर एक डाॅक्युमेंटरी तयार केली होती. या व्यक्तीला माऊली सोहळ्याची इतकी भुरळ पडली होती की त्यांनी हा व्हिडीओ जगभर प्रसिद्ध केला. युरिको इकेनोया ही जपान मधील एक व्यक्ती गेली 32 वर्षापासून वारीत सहभागी होत आहे. लिसा नावाची एक महिला भारतीय पारंपारिक साडी परिधान करून वारीत सहभागी होत आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या दिडीतून फ्रान्स मधील महिला वारी करत आहे.
वारी आणि मुस्लिम समाज यांचे नाते अनेक वर्षापासून घट्ट आहे. गावागावात हिंदु मुस्लिम ऐक्य टिकून आहे याचे कारण दोन्ही समाजातील लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करतात. खरं तर हिंदू मुस्लीम एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगीतला जातो.
जगदगुरु संत तुकोबाराय पुण्यातून दिंडी घेवून जात होते . मुख्य पुण्यातून जाताना एका भर चोेैकात जोराचा पाऊस सुरु झाला. दिंडीतले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जावून उभे राहीले .
परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजायला लागले. त्याच चौकात एक मस्जिद होती. मस्जिदित चर्चा सुरु झाली .
" आरे ओ तुकाराम भिग रहे है ओ बहुत ही बडे संत है "
आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानांनी तुकोबारायांना आतमधे आदरपुर्वक धरुन नेले. नंतर सर्व दिंडी मस्जिदमध्ये गेली. सर्व वारकरी मस्जिदमधे जमले. रात्रीची किर्तनाची वेळ झाली. मुर्तीपुजा न माननार्याच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन करतील याची सर्वांना उत्कंठा लागली. तुकोबाराय किर्तनाला उभे राहीले आणि अभंग घेतला.
अल्ला देवे अल्ला दिलावे !
अल्ला दवा अल्ला खिलावे !!
अल्ला बगर नही कोये !
अल्ला करे सो ही होये !! 1 !!
(अभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )
ज्ञानेश्वर माऊलींनी यापुढे जाऊन अवघ्या विश्वाची काळजी वाहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटच्या 18 व्या अध्यायात माऊलींनी जगातील सर्व जाती धर्माच्या, वंशाच्या, वर्णाच्या पंथाच्या लोकांसाठी पसायदान मागीतले आहे. हे संत सर्वांची काळजी घेतात, उच्च नीच मानत नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजावर माऊलींच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात मुस्लिम समाज हिरीरीने सहभागी होतो. शेकडो वर्षांपासून मांडवी ओढा येथे वारकर्यांच्या दिंडीचा मुक्काम मुस्लिम कुटुंबात असतो. पिंपरद येथील अनेक मुस्लिम कुटुंबे वारकरी मंडळाना अन्नदान करतात. वारीकाळात कोकण येथील एका दिंडीचा दुपारचा भोजन विसावा मुस्लिम कुटुंबातच असतो. तोंडले बोंडले येथे माऊलींच्या रथासमोर असणारे मानाचे अश्व एका मुस्लिम कुटुंबातच पाणी पितात. ठाकूरबा वस्ती येथे रिंगण झाल्यानंतर तेथील मुस्लिम हाॅटेल व्यवसायिक सर्वांना चहापान करतात. बरड येथे असलेल्या दर्गाहमध्ये वारकरी मुक्काम करतात. माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाल्हेकर मुस्लिम कुटुंबाकडे जेवण असते.
सातारा जिल्हातील कुशी या गावातून अकबरसा शेख यांच्या नेतृत्वात तुकाराम महाराज सोहळ्यात 2 तर माऊली आहे सोहळ्यात 3 दिंड्या प्रतिवर्षी जातात. गतवर्षी रमजान ईदचा पवित्र सण माऊली सोहळा लोणंद मुक्कामी होता त्याच दिवशी आला होता. यादिवशी सुमारे तीन लाख वारकरी लोणंद मुक्कामी असतात. याचा विचार मुस्लिम समाजाने ईदचा सण एक दिवस पुढे ढकलला होता. माऊली सोहळ्यातील दिंडी क्रमांक 155 चा कारभारी मुस्लिम आहेत. दिवंगत जयतुंबी महाराज यांनी अनेक माऊली सोहळ्यात सहभागी होऊन वारी केली आहे. त्या किर्तन कार म्हणुन प्रसिद्ध होत्या. परवा तुकोबाराय यांची पालखी यवत मुक्कामी असताना ईदचा सण होता. तेथील मुस्लिम समाजाने वारकर्यांना शिरकुर्मा खाऊ घातला. तर मुस्लिम भाईजाननी वारकर्यानी दिलेली भाजी भाकरी खाल्ली. यावर्षी आमच्या सोबत कराडचा हुसेन शेख यांनी आळंदी ते पंढरपूर दरम्यान आमच्या वाहनाचे सारथ्य केले आहे. माझी निम्मी वारी झाली, मला हाजला जाण्याचे पुण्य लाभले अशी प्रतिक्रिया हुसेनने व्यक्त केली.
०३ जुलै २०१७
निर्मल वारी..... शक्य आहे
निर्मल माऊली सोहळा शक्य आहे !
अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी, जगाला वेड लावणारी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारी तरीही कोणालाही जात न विचारणारी , कोणालाही निमंत्रण न देता लाखोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या वारकर्याची पंढरीची वारी आणि ज्ञानेश्रर महाराज पालखी सोहळा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी काही निवडक हात पुढे आले आहेत. या हाताच्या सकारात्मक प्रयत्नाला फार मोठ्ठे यश आले आहे. वारी निर्मल होऊ शकते, अवघड काही नाही. गरज आहे फक्त माऊलीवर प्रेम करणार्या हातांची ! तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात वारकर्य्च्या सेवेवेसाठी खुप काही करता, आता फक्त निर्मल वारी साठी आपले हात रिकामे करा. स्वच्छ भारत सुंदर भारतचाच एक भाग म्हणून आपली वारी सुंदर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्था, दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले तर हे शक्य आहे, होय 2018 चा निर्मल सोहळा शक्य आहे.
माऊली पालखी सोहळा किती मोठ्ठा, भव्य, अप्रतिम, शिस्तबद्ध असतो याविषयी लिहील तेवढं थोडंच आहे. माऊली प्रेमी वाचक, वारकरी, भाविक हे सर्व जाणतातच ! माऊली सोहळ्याचे वेड अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षापासून लागलेले आहेच. गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखावर पोहोचली. त्यानंतर काळात 2 लाख पुढे 3 , 4 ,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. पुर्वी फार कमी प्रमाणात दखल घेणारे विचारवंत, प्रसिद्धी माध्यमे तसेच सरकारी यंत्रणा आता माऊली सोहळ्यात पुर्ण वेळ सहभागी होत आहेत. माऊलीच्या प्रेमाने सर्वांना वेड लावलेले असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याचे लागलेले आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वारीत सहभागी होत आहेत. अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षे पुर्वी मांडली होती. ती आज सत्यात येताना दिसत आहे.
जगात वारकरी हा एकमेव संप्रदाय असेल जिथे कोणालाही जात विचारली जात नाही. ज्ञानाची कवाडे सर्वाना खुले करणारा हा एकमेव संप्रदाय असेल. त्यामुळेच केवळ याच संप्रदायात सर्व जाती धर्माचे संत होऊन गेले. तरीही त्याना कोणत्याही चौकटीत अडकवून ठेवले गेले नाही. यामुळेच निवृत्ती ज्ञानदेव , सोपान ,मुक्ताबाई एकनाथ नामदेव , तुकाराम यांच्या वारकरी संप्रदायाचे सार्याला वेड लागले आहे. सोहळा फार मोठ्ठा होत आहे. एकाच वेळी, एकाच दिशेने, एकाच देवाच्या विठ्ठलाच्या ध्यासाने, येवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन , सलग सतरा आठरा दिवस चालणारा हा जगातील एकमेव धार्मिक कार्यक्रम आहे. ही भारतीयाच्या दृष्टीने अअभिमानाची गोष्ट आहे. या सोहळ्याची दखल घ्यायला महाराष्ट्र आणि भारत सरकारने खुप वेळ घेतला आहे. म्हणूनच देहू आळंदी ते पंढरपूर मार्गाचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी मार्ग असे नामकरण करून हा मार्ग चौपदरीकरण करणे सुरू आहे. ही जमेची बाजू आहेच शिवाय वारी मार्ग स्वच्छ, सुंदर आणि निर्मल होण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षांत सकारात्मक पाऊले उचलली गेली आहेत.
वारीत सहभागी होणाऱ्या 4 ते 5 लाख वारकरी माऊलीसाठी सर्वात मोठा प्रश्न शौचालयाला कुठे जायचे हा असतो. माऊली सोहळ्यात वारकरी सुमारे 240 किमी अंतर चालत पार पाडतात. पहाटे तीन वाजता त्याचा दिवस सुरू होतो. उठल्यावर नैसर्गिक विधी अत्यावश्यक व न टाळता येणारा असतो. एकवेळ जेवण नाही मिळाले तर वारकरी सांभाळून घेतात मात्र नैसर्गिक विधीचा प्रश्न गंभीर असतो. पालखी तळावर , परिसरात एक लाखभर लोक राहतात. मुक्काम ठिकाणाहून पुढे तीन ते सहा किलोमीटर अंतरावर रस्त्याकडेला तंबू उभारून किंवा मिळेल त्या जागेवर सुमारे तीन लाख वारकरी मुक्कामी असतात. या सर्व लोकांची उठण्याची वेळ पहाटे 2 ते 4 अशी आहे. सुमारे चार लाख लोकांसाठी शौचालयांची सोय करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. मात्र तरीही पहाटे ऊठून लगेच मार्गक्रमण करणारे वारकरी साठी गावाबाहेर शौचालय युनिट उभारणे शक्य आहे. गेल्या दोन वर्षांत विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय सवयंसेवक संघ तसेच राज्य सरकारच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुमारे दहा हजार फिरते युनिट उभे करण्यात आले आहेत. त्याला वारकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. स्वयंसेवक, कार्यकर्ते पहाटे रस्त्यावर उभे राहून वारकरीना अडवतात, हात जोडतात. माऊली, सर्व सोय आहे, पाणी पण भरपूर आहे, बादली पण आहे, अशी विनंती करून शौचालय युनिट मध्येच जा असा आग्रह धरत आहेत. खरंच या कार्याला सलाम केला पाहिजे,
पंढरपूर, वाखरी येथे तर कायमस्वरूपी अनेक शौचालय उभी करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदी परिसरात उघड्यावर शौचालयास बसणे गुन्हा दाखल केला जातो.
केवळ दहा हजार फिरते शौचालय युनिट बसवून निर्मल वारी साठी काहीनी पाऊल उचलले आहे. अजून किमान 30000 हजार युनिटची गरज आहे. या कामासाठी मोठ्या निधीची गरज लागणार आहे. वारकरी सेवेसाठी हजारो हात पुढे येतात, हे लोक गरज नसेल तिथेही फार खर्च करतात. मोफत वस्तू वाटप करतात. चांगल्या हेतूने कलेले दान योग्य कामी लागत नाही, अनेक ठिकाणी अन्नाची नासाडी झालेले वारीत सर्रास दिसून येते. पालखी तळ परिसर तसेच रस्त्यावर शिळे अन्न, भाजी, चपाती पडलेल्या दिसतात. फक्त अन्नदान केले तरच फार मोठे पुण्य मिळते असा (गैर) समज झाल्याने सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच मंडळे, ग्रामस्थ यावर खर्च करतात. त्याऐवजी या लोकांनी वारी मार्गावरील गावांना शौचालय युनिट दान केली तर मोठ्या परिणाम होणार आहे, वारकरी माऊलीची सोय होऊन वारकरी आशिर्वाद देतील, पुण्य पदरी पडू शकेल. निर्मल वारी, निर्मल पालखी मार्ग करणे अवघड, अशक्य नाही. यासाठी सहकार्याची गरज आहे. कोणाही वारकर्याची उघड्यावर शौचालयास बसण्याची इच्छा नसते, पण सोय नसती आणि ही गोष्ट टाळणे अशक्य असल्याने तो दुसरा मार्ग स्वीकारतो. पालखी सोहळा गावातून गेल्यावर त्या गावात साथीचे रोग पसरतात, अनेक लोक आजारी पडतात. हे आपण थांबवू शकतो.
चौकट
सोहळा भारतातच का?
एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मिक सोहळा भारताबाहेर एखाद्या प्रगत देशात का होत नाही? याचे कारण आणि उत्तर कधी आपण शोधले आहे का ? हे विश्वचि माझे घर, आता विश्वात्मके देवे असा विचार करणारा भारत हा एकमेव देश आहे. शेकडो वर्षे पुर्वी माऊलीनी हे पसायदान मागीतले आहे. त्यामुळे हा सोहळा भारतातच होऊ शकतो याचा विचार करून स्वच्छ आणि सुंदर वारी संकल्पना सत्यात उतरण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे इतर देशात हा सोहळा असता तर त्या देशाने 230 किमी अंतराचा महामार्ग कधीच विकसित केला असता. कायमस्वरूपी स्वच्छता सुविधा देऊन ही वारी जगाच्या नकाशावर नेऊन ठेवली असती, आता हे काम आपण करू शकतो. सरकारची जबाबदारी सरकार पुर्ण करेल आपण शौचालय युनिट साठी सढळ हाताने मदत केली पाहिजे.
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...


