समाज आरती; पालखी सोहळ्याचा मानबिंदू
भंडीशेगाव : सतीश मोरे
माऊली पालखी सोहळा प्रस्थान झाल्यापासून पालखी मुक्कामाला पोहचे पर्यंत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध ,नियोजित, नियमबद्ध आणि अचुक वेळी होतात. सोहळ्यात सहभागी सुमारे अडीचशे दिंड्यामध्ये एकवाक्यता असते. सोहळा मुक्कामाला पालखी तळावर पोहचल्यावर होणारी समाज आरती आणि तंबू उभारणी रचना हा सैनिक शिस्तीचा उत्तम नमुना आहे. पालखी सोहळा सुरू करणारे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे सरदार असल्याने पालखी सोहळ्यावर सैनिक शिस्तीची छाप आहे. समाज आरती हा लोकशाही दिंडी सोहळ्याचा मानबिंदू म्हणावा लागेल.
संत तुकारामाच्या घराण्यात वारीची परंपरा अनेक वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याचे पश्चात त्यांचे कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव श्री नारायण बाबा यांनी 1685 मध्ये या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायाच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला नेत. . त्याठिकाणी पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये घरगुती वाद झाल्याने हा सोहळा खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये माऊलींचे निश्चिम भक्त हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे सरदार म्हणून असलेल्या हैबत बाबानी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला.
हैबतबाबा सुरूवातीला माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून पंढरीला जात. सैन्य दलात काम केले असल्याने पालखी सोहळ्यात त्यांनी तीच शिस्त आणली आहे. पालखी वेळेतच निघते, पालखी मार्गावर कुठे आणि किती थांबायचे, विसावा कुठे, दुपारचे जेवण कुठे हे ठरलेले आहे. या व्यतिरिक्त पालखी कुठेही थांबत नाही. वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी यांचा क्रम, जागा ठरलेली आहे. या दरम्यान बाहेरचा कोणी अनोळखी घुसू नये, दिंडी ओळीत चालावी, यासाठी प्रत्येक दिंडीत व्यवस्था असते. पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदारांचे वंशज बाळासाहेब, राजाभाऊ आणि रामभाऊ रणदिवे (चोपदार) हे काम पाहतात. सोहळा मालक आरफळकर, सरदार शितोळे यांचे प्रतिनिधी, चोपदार आणि वास्कर बाबा तसेच आळंदी देवस्थान कमिटी हे एकत्र बसून सर्व निर्णय घेतात , एकटा कोणी निर्णय घेत नाही. सोहळ्यात लोकशाही अनेक वर्षे पासून सुरू आहे, यांचे हे प्रतिक आहे.
![]() |
| समाजआरती दरम्यान चोपदारांनी चोप आणि हात वर केल्यावर सारे शांत होतात. |
सायंकाळी सहा ते सात दरम्यान (वाहतुक परिस्थिती नुसार ) पालखी तळावर पोचते. तळाच्या मध्यभागी माऊली पालखी ठेवण्यासाठी अलिशान तंबू तयार असतो. या पुढे पालखी आत यायला जागा सोडून दोन्ही बाजूला आयत आकारात वारकरी, भाविक बसतात. एका मागोमाग एक नामघोष करत दिंड्या चहुबाजूला येऊन उभ्या राहतात. यामध्ये फक्त मृदंगचालक, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ऐवढेच असतात. मानाच्या सर्व दिंड्या तळावर पोहचल्यावर स्थानिक ग्रामस्थ पालखी नाचवतच तळावर आणून उंच ठिकाणी ठेवतात. या दरम्यान माऊली, माऊली चा जयघोष आणि टाळ, मृदंगाच्या नादाने वातावरण फुललेले असते.
अचानक हो. .....असा प्रमुख चोपदार बाळासाहेब यांचा आवाज येतो आणि एका क्षणात सर्व काही शांत होते. सारे टाळ बंद होतात. मृदंग वाजवणे थांबतो. कोणीही बोलत नाही. फक्त ज्या दिंडी मालकाची अडचण असेल, दिवसभर त्यांना त्रास झाला असेल तर त्याच दिंड्या टाळ वाजवत राहतात. चोपदार स्वत: किंवा त्याचे प्रतिनिधी त्याचेकडे जातात, अडचणी, तक्रार ऐकून घेतात. शक्य त्या समस्या जागेवरच सोडवल्या जातात, उर्वरितांसाठी नंतर तळावर बोलवले जाते. यानंतर प्रमुख चोपदार हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूची यादी वाचून दाखवतात. ओळख पटवून त्या वस्तू नेण्याचे आवाहन करतात, सुचना देतात आणि शेवटी 'उद्या पालखी सकाळी सहा वाजता निघणार आहे हो ', असे जाहीर करतात. दुसऱ्या दिवशीचे अंतर पाहून वेळ सांगीतली जाते. ही वेळ पाहून वारकरी दुसऱ्या दिवसाचे नियोजन करतात. सैन्य दलाच्या जवानांना अशाच सुचना दिल्या जातात.
यानंतर चोपदार दंड (चोप) विशिष्ट पद्धतीने वर उचलतात आणि लगेच ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू तुकोबाराय याची समाज आरती होते. आरती वेळी बाळासाहेब चोपदाराचे शेजारी, मालक आरफळकर समोर राजाभाऊ आणि रामभाऊ चोपदार उभे असतात. त्याचे बाजूला हैबतबाबाचे विणेकरी, शितोळे सरकार प्रतिनिधी आणि समाज म्हणून वास्करबाबा असतात. हे सर्व ठरले प्रमाणे शिस्तबद्ध होते.
आरती संपलेनंतर सर्व दिंड्या आपल्या जागेवर जातात. दरम्यान सोहळा मालकांचा तंबू उभारण्यात येतो. हा तंबू तयार झालेशिवाय इतर तंबू उभे केले जात नाहीत.हा तंबू कसे उभारावेत हे पण निश्चित आहे. या तंबू च्या आठ खुट्यावर प्रमुखांचे काही तंबू उभारले जातात. प्रचंड शिस्तीचा हा सोहळा असून समाज आरती मानबिंदू आहे.








