फॉलोअर

१३ जुलै २०१६

समाज आरती;  पालखी सोहळ्याचा मानबिंदू 

भंडीशेगाव : सतीश मोरे
माऊली पालखी सोहळा प्रस्थान झाल्यापासून  पालखी मुक्कामाला पोहचे पर्यंत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध  ,नियोजित,  नियमबद्ध आणि अचुक वेळी होतात.  सोहळ्यात सहभागी सुमारे अडीचशे दिंड्यामध्ये एकवाक्यता  असते. सोहळा मुक्कामाला पालखी तळावर पोहचल्यावर होणारी समाज आरती आणि तंबू उभारणी रचना हा सैनिक शिस्तीचा उत्तम नमुना आहे.  पालखी सोहळा सुरू करणारे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे  सरदार असल्याने पालखी सोहळ्यावर सैनिक शिस्तीची छाप आहे.  समाज आरती हा लोकशाही दिंडी सोहळ्याचा मानबिंदू म्हणावा लागेल. 
संत तुकारामाच्या  घराण्यात वारीची परंपरा अनेक  वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याचे पश्चात त्यांचे  कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे  तृतीय चिरंजीव श्री नारायण बाबा यांनी 1685 मध्ये  या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायाच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला नेत. . त्याठिकाणी पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये घरगुती वाद झाल्याने हा सोहळा खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये  माऊलींचे निश्चिम भक्त हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे सरदार म्हणून असलेल्या हैबत बाबानी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला. 
हैबतबाबा सुरूवातीला माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून पंढरीला जात.  सैन्य दलात काम केले  असल्याने पालखी सोहळ्यात त्यांनी तीच शिस्त आणली आहे. पालखी वेळेतच निघते,  पालखी मार्गावर कुठे आणि किती  थांबायचे, विसावा कुठे,  दुपारचे जेवण कुठे हे ठरलेले आहे.  या व्यतिरिक्त पालखी कुठेही थांबत नाही. वारकरी,  टाळकरी,  झेंडेकरी, विणेकरी यांचा क्रम, जागा ठरलेली आहे. या दरम्यान बाहेरचा कोणी  अनोळखी घुसू नये, दिंडी ओळीत चालावी, यासाठी प्रत्येक दिंडीत व्यवस्था  असते. पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदारांचे वंशज  बाळासाहेब, राजाभाऊ  आणि रामभाऊ रणदिवे (चोपदार) हे काम पाहतात.  सोहळा मालक आरफळकर,  सरदार शितोळे यांचे प्रतिनिधी, चोपदार आणि वास्कर बाबा तसेच  आळंदी देवस्थान कमिटी हे एकत्र बसून सर्व निर्णय घेतात  , एकटा कोणी निर्णय घेत नाही. सोहळ्यात लोकशाही अनेक वर्षे पासून सुरू आहे, यांचे हे प्रतिक आहे. 
समाजआरती दरम्यान चोपदारांनी चोप आणि
हात वर केल्यावर सारे शांत होतात.

सायंकाळी सहा ते सात दरम्यान  (वाहतुक परिस्थिती नुसार ) पालखी तळावर पोचते.  तळाच्या मध्यभागी माऊली पालखी ठेवण्यासाठी अलिशान तंबू तयार असतो.  या पुढे पालखी आत यायला जागा सोडून दोन्ही बाजूला आयत आकारात वारकरी, भाविक बसतात.  एका मागोमाग एक नामघोष करत दिंड्या चहुबाजूला येऊन  उभ्या राहतात. यामध्ये फक्त मृदंगचालक, झेंडेकरी,  टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ऐवढेच असतात.  मानाच्या सर्व दिंड्या तळावर पोहचल्यावर स्थानिक ग्रामस्थ पालखी नाचवतच तळावर आणून उंच ठिकाणी ठेवतात.  या दरम्यान माऊली, माऊली चा जयघोष आणि टाळ, मृदंगाच्या नादाने वातावरण फुललेले असते. 
अचानक हो. .....असा प्रमुख चोपदार बाळासाहेब यांचा आवाज येतो आणि  एका क्षणात सर्व काही शांत होते. सारे टाळ बंद होतात. मृदंग वाजवणे थांबतो.  कोणीही बोलत नाही.  फक्त ज्या दिंडी मालकाची अडचण  असेल, दिवसभर त्यांना त्रास झाला  असेल तर त्याच दिंड्या टाळ वाजवत राहतात.  चोपदार स्वत: किंवा त्याचे प्रतिनिधी त्याचेकडे जातात,  अडचणी,  तक्रार  ऐकून घेतात.  शक्य त्या समस्या जागेवरच सोडवल्या जातात, उर्वरितांसाठी नंतर तळावर बोलवले जाते. यानंतर प्रमुख चोपदार हरवलेल्या  आणि सापडलेल्या वस्तूची यादी वाचून दाखवतात. ओळख पटवून त्या वस्तू नेण्याचे आवाहन करतात,  सुचना देतात  आणि शेवटी 'उद्या पालखी सकाळी सहा वाजता निघणार आहे हो ', असे जाहीर करतात.  दुसऱ्या दिवशीचे अंतर पाहून वेळ सांगीतली जाते. ही वेळ पाहून वारकरी दुसऱ्या दिवसाचे नियोजन करतात. सैन्य दलाच्या जवानांना अशाच सुचना दिल्या जातात.  
यानंतर चोपदार दंड  (चोप) विशिष्ट पद्धतीने वर उचलतात आणि  लगेच ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू तुकोबाराय याची समाज आरती होते.  आरती वेळी बाळासाहेब चोपदाराचे शेजारी, मालक आरफळकर समोर राजाभाऊ आणि रामभाऊ चोपदार उभे असतात. त्याचे बाजूला हैबतबाबाचे विणेकरी,  शितोळे सरकार प्रतिनिधी  आणि समाज म्हणून  वास्करबाबा असतात. हे सर्व ठरले प्रमाणे शिस्तबद्ध होते.  
आरती संपलेनंतर सर्व दिंड्या आपल्या जागेवर जातात.  दरम्यान सोहळा मालकांचा तंबू  उभारण्यात येतो.  हा तंबू तयार झालेशिवाय  इतर तंबू  उभे केले जात नाहीत.हा तंबू कसे उभारावेत हे पण निश्चित आहे. या तंबू च्या आठ खुट्यावर प्रमुखांचे काही तंबू उभारले जातात. प्रचंड शिस्तीचा हा सोहळा असून समाज  आरती मानबिंदू आहे.



 
 
 
 
 🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 13 जुलै 
वाखरी सतीश मोरे 

कोणतीही सवय लागायला, सुटायला किमान पंधरा कमाल एकवीस दिवस लागतात,  असे म्हणतात . गेल्या सोळा दिवसात पहाटे दोन तीन वाजता उठायची  आम्हा सर्वाना सवयच लागली होती. आज भंडीशेगाव मध्ये खरं तर लवकर  उठायची गरज नव्हती, वाखरी अंतर
कमी  असल्याने दुपारी एक वाजता पालखी निघणार होती. पण सवयी प्रमाणे तीन वाजता अनेकांना जाग आली,  पुन्हा झोपवले इतरांनी. पाणी टंचाई थोडी जाणवत होती या भागात.  याचाच विचार करून खरात व लोहार माऊलींनी मला चार वाजता जागे केले.  उठा,  कपडे तंबूतच ठेवा आणि लगेच टॅन्कर खाली आंघोळीला चला,  असे सांगितले.  हा अनुभव मी लोणंद मध्ये पण घेतला होता.  उठलो,  थेट टॅन्कर गाठला.  टॅन्कर रिकामा करून शंकरराव थोरात  नडशीकाना पाणी भरून  आणायला जायचे होते.  काॅक फुल करून भरपूर पाणी सोडले त्यांनी.  मनसोक्त स्नान केले.  12 नंबर दिंडीला थोरात  आणि त्याचे सहकारी दिपक जगताप वडगाव, रमेश थोरात कार्वे, रामचंद्र पिसाळ, दिनकर वायदंडे घोणशी, मुकेश खराडे काले यांच्या अविरत प्रयत्नामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. सह्याद्री साखर कारखान्याने टॅकर दिला आहे. 

पावणे पाच वाजता आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. रस्त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक गाडी फिरत होती,  शौचालयांची जागा सांगत तिकडे जायचे आवाहन सुरू होते.  जय भवानी, बारामती चहा वारीत प्रसिद्ध आहे. चहा घेऊन पालखी तळाकडे आलो.  तळावर काकडा आरती सुरू झाली होती,  तर तिथेच एका बाजूला  खुल्या जागेत  अनेक जण झोपले होते. तेथून पुढे जाऊन  माऊली पालखी दर्शन घेतले. गर्दी कमी असल्याने निवांत दर्शन झाहले. परत तंबूत परतलो आणि पुन्हा झोपलो.  सात वाजता उठवले कोणीतरी,  फ्रेश झालो,  उरलेले विधी आटोपले . 

बंडा तात्या त्या झाडाच्या जवळपास पुजा करत बसले होते.  नमस्कार केला, त्यानी विचारपूस केली. दहा मिनिटांनी बसू असे सांगितले. परत  एकदा गेलो, तात्या सोबत  अनेक विषयांवर चर्चा झाली.  रिंगण आणि उडीचे खेळ यावर माहिती दिली. वारीमध्ये बदल होत आहेत,  शासन स्तरावर चांगले काम केले आहे यावर्षी,  असे सांगून आणखी सुधारणा होणेसाठी तुम्ही लिखाण करा, पुढच्यावर्षी वारी सुरू होण्याआधी मला  आठवण करा,  असेहीते म्हणाले.  करवडी गावात तात्याच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात जलसंधारण काम झाले, त्याचा परिणाम छान झाला, याची माहिती दिली तेव्हा त्यानी करवडीत आणखी एक करायचे आहे, गोशाळेत बैठकीला हजर रहाव असे सांगून आम्हाला कसलेच श्रेय नको,  पण गावागावांत कामे पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

आज मठाधिपती वैकुंठवासी भगवान मामा कराडकर यांची 7 वी पुण्यतिथी.  त्या निमित्ताने भजन कार्यक्रम आयोजित केला होता. अनेकांनी मामाच्या आठवणीना उजाळा दिला.   पाडुरंग पवार कराड आणि  बाळासाहेब देसाई वाठारयांचेवतीने पुरी कुर्मा गुलाबजाम, जिलेबी, भात जेवण होते . दहा वाजता पंगती पडल्या. तंबू पॅक अप अगोदरच झाले होते.  आकरा वाजता  आम्ही निघालो वाखरी दिशेने. 

आज कडक  ऊन पडले होते.  पंढरी जवळ आली आहे,  त्यामुळे विठ्ठल दर्शन ध्यास घेतलेले वारकरी भर  ऊन्हात चालत होते. वारे जोरात वाहत होते.  रस्ता तापला होता,  वरून ऊन्हाची धग,  तरीही पायात काही न घालता चालणारे वारकरी मी पाहिले. एक तास गेला,  बाजीराव विहीरीच्या  अलिकडे एक नवीन बांधलेले घर दिसले,  रंग दिला नव्हता,  आत गेलो. टॅब चार्ज करायला लावला,  कागद टाकला आणि दिड पर्यंत  आराम केला. पुन्हा चालू लागलो.  बाजीराव विहिरी जवळ रिंगण पहायला खुप गर्दी होती.  या ठिकाणी संत तुकाराम महाराज, सोपान काका, वटेश्वर आदी अनेक पालखी सोहळ्याचे वारकरी एकत्र आले होते. बघेल तिकडे वारकरी,  पताका आणि टाळाचा आवाज.  येथून वाहतुक दुसर्‍या मार्गाने वळवली होती.  अनेक पालखीचे दर्शन घेतले,  चालत पुढे आलो.  तीन वाजता वाखरीत पोहचलो. 

 
पंढरपूरचे प्रवेशद्वार म्हणुन वाखरी ओळखलेजाते. शासन व  पंढरपूर नगरपालिकेने येथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे तुकाराम महाराज  आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी  जवळ जवळ मुक्कामी असतात . दोन्ही मोठ्या सोहळ्याचे वारकरी  साडेतीन चार लाख लोकांना चांगली  सुविधा उपलब्ध करून दिली होती. येथे उघड्यावर शौचाला बसायला पुर्ण बंदी आहे.  अनेक युनिट तसेच पाणी नळ आहेत. 

सायंकाळी तंबूसमोर सर्वासोबत फोटो सेशन केले,  आराम केला.  डाॅक्टर जोशी सोबत वारीतील चांगल्या वाईट गोष्टीवर चर्चा केली. परत जीप मध्ये जाऊन बातमी व वारी लिहीत बसलो साडे आठ वाजेपर्यंत. 

दुपारी एक वाजता नेट बंद पडले आहे.  सुरू झाले की लगेच तयार  आहे तुम्हाला माझी वारी पाठवायला.  माऊली 

 

एकंदरीत आजचा दिवस छान गेला. 


     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

१२ जुलै २०१६



🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 12 जुलै 
भंडीशेगाव  सतीश मोरे 

पंढरीची पायी  वारी सुरू होऊन  आज 15 दिवस झाले, वारीचा आता अंतिम टप्प्या आहे.  पंढरी 32 किलोमीटर अंतरावर आहे. विठ्ठल दर्शन तीन दिवसावर आलं आहे. आज 16 किलोमीटर चालायच,  उद्या 8 आणि परवा 6 किलोमीटर,  आली पंढरी. ही चर्चा सुरू  असतानाच काल झोप लागली होती. पहाटे दिड वाजता बापूंनी उठवले.  मी म्हणालो,  अहो दिड वाजले आहेत,  आज जवळचा टप्पा आहे,  झोपा.  सारे पुन्हा झोपले.  अडीच वाजता काही जण जागे झाले,  सर्वाना उठवले.  वळकटी ट्रकात नेऊन ठेवल्या.  ब्रश केला. सारे बाहेर पडलो.  गेली चार दिवस पालखी तळावर भाजपायुमो, प्रशासन, संघाचे कार्यकर्ते  आणि ग्रामस्थ यांनी वारकरी लोकांना शौचालय युनिट  उपलब्ध करून दिले आहेत.  उघड्यावर जाऊ नका,  पालखी तळावर अमुक ठिकाणी युनिट  ठेवले आहेत,  मोफत उपलब्ध आहे,  भरपूर पाणी आहे असे आवाहन स्पिकर वर केले जात होते. गत वर्षीचा अनुभव आणि यंदाचा विचार करता काही प्रमाणात का होईना निर्मल वारीने एक पाऊल पुढे पडले आहे. सकाळी या अतिशय  अत्यावश्यक कामासाठी  केलेल्या सुविधांचा लाभ वारकरी घेत होते,  हा बदल स्वागतार्ह आहे. 

सव्वा तीन वाजता चालायला सुरुवात केली.  नेहमी प्रमाणे खुप गर्दी होती.  पहाटे अंधारात चालताना फक्त पुढे बघायचे, पुढच्याचे चालणे अनुकरण करत पुढे चला,  माऊली, माऊली म्हणा, चालत रहा,  येवढेच करायचे असते. ज्याला पुढे जायचे त्यानी उजव्या बाजूने माऊली माऊली म्हणत जायचे, वाहनाची लाईन त्याच बाजूला  असते,  थोडी रिस्क  असते,  पण काही अडचण येत नाही. वारी हे पुर्व संचित आहे,  असे म्हणतात, आम्ही खरंच नशीबवान आहे,  वारी करायला मिळाली, त्यामुळे  या सर्व  अडचणी,  अडथळे वर मात करत चालत  आहे.  आजपर्यंत कोणतीही अडचण आली नाही.  खुप आनंद लुटत आम्ही चालत राहिलो. 

तोंडले आणि  बोंडले अशी दोन गावे रस्त्याचे विरूद्ध बाजुला  आहेत.  इथेच माऊली पालखी दुपारचा भोजन विसावा असतो,  येथेच तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखी जवळून जातात.  या ठिकाणी सकाळी सहा वाजता पोहचलो.  खुप कंटाळलो होतो, त्यात बारीक पाऊस झाल्याने रस्ता घसरट झाला होता,  एक माऊली पडली होती.  थोडे थांबायचे ठरवले. 
बोंडले गावातील  एका दुकानासमोर कागद  अंथरले. पडलो.  सात वाजता जागे झाले सारे.  ईपुढारी ओपन केला,  सारे जण माझेजवळ आले.  पाऊस  आणि पुराच्या बातम्या पाहिल्या.  कोयना धरण भरेल यंदा नक्की,  कराड पुलावरून पाणी जाणार. .... हे होणार,  ते  होणार सुरू झाले.  चहा घेऊन पुढे चालू लागलो. 

 
 
 
 
खरं तर  आज आमच्या दिंडीत चकुल्या मेनू होता.  पण त्यासाठी  आकरा वाजेपर्यंत थांबायला लागले असते.  अजून चार तास होते.  सर्व संमतीने पुढे चालत रहायचा निर्णय घेतला.  एक दोन किलोमीटर चाललो,  कडेला कुठे पाणी दिसते काय याचा सारेच शोध घेत होते,  पाणी असायचे पण गर्दी खुप असायची,  किंवा गर्दी कमी होती पण पाणी कमी होते.  पंढरपूर तालुक्याचे या भागात पाणी दुर्भिक्ष होते.  कुठेही पाणी व्यवस्था नव्हती.  ज्याची विहीर आहे,  तिथे खुप कमी पाणी होते.  पुढे सोय होईल , माऊली करतील काहीतरी, असा विश्वास होता,  चालत राहिलो.  चढाला महाराष्ट्र शासन पीडब्लुडी विभागाचे चार टॅकर ओळीत उभे होते.  एकातले पाणी कमी होते,  तर तीन जागी महिलाची स्नान करण्यासाठी गर्दी होती.  चला पुढे म्हणालो,  एव्हाना साडे आठ वाजले होते,  भुकेची जाणीव झाली. पुण्यातील आमदार श्रीमती
माधुरीताई मिसाळ यांच्या वतीने पिठलं भात जेवणाचीसोय केली होती. पळसाच्या पानाच्या  पत्रावळी वर गरमागरम भात पिठलं घेऊन मस्त नाश्ता केला. पोट भरलं.  आमचे काही मित्रांनी  पेठ वडगावच्या माऊली अन्नछत्र मंडळाने तुपातला शिरा पण घेतला. पुढे निघालो. चालत राहिलो.  रस्त्याकडेला आंघोळीसाठी गर्दी दिसली. आता काही झाले तरी तिथे जायचेच,  असे म्हणून उतरलो खाली.  खुप गर्दी होती,  तरीही घुसलो, उंच पाईप लावली होती, बोअर होती.  पाणी कमी जास्त होत होते,  गडबडीत स्नान केले, तयार झालो,  गंध लावला, निघालो.  

बारा वाजता भंडीशेगाव येथे पोहचलो.  कपडे वाळत टाकली.  लिंबाच्या झाडाखाली पडलो . तीन पर्यंत आराम केला. झाडाखालच्या राष्ट्रीय गप्पा मारत बसलो. चार वाजता   आमची वाहने आली,  तंबू उभारणे सुरू झाले. दरम्यान टॅबवर काम केले . मोबाईल बॅटरी  उतरली होती, चार्ज करण्यासाठी बाहेर पडलो.  मोबाईल चार्ज सेंटर वारीत उपलब्ध आहेत.  पुढे पानपट्टी मागे चार्ज सेंटर होते,  सोबत काही  सहकारी पण होते. मोबाईल लावून तिथेच बसायला लागते,  त्यामुळे तिथेच ठाण मांडले. दरम्यान त्याची माहिती घेतली,  टॅबवर वारी सुरू केली.  परत जाताना एका  आवाजाकडे लक्ष वेधले.  

तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत सोलापूर पोलीसाचे किर्तन कलापथक होते.  सहाय्यक फौजदार विठ्ठल माने यांचे ऑन ड्युटी किर्तन झाले.  खुप लोक जमले होते. अतिशय सुंदर विवेचन करताना बायकोवर दादागिरी नको, व्यसने करू नका,गुरू नाही त्याचे जीवन गुरासारखे, पण गुरू करताना काळजी घ्या, असे आवाहन केले. भिंतीवरचा विषारी विंचू  पाल खाते,  तीच अतिविषारी पाल जमीनीवर आली की  कोंबडी खाते मग त्या कोंबडींचे  तगडे ओढून खाणारा माणुस किती विषारी ? असा प्रश्न उपस्थित केला. 7350014801 हा मोबाईल नंबर देताना मी किर्तनकार पोलीस  आहे,  पाकीटमार महाराज नाही, तुमच्या गावात बोलवा , प्रवास खर्च दिला तरी चालेल ,नाही दिला तर  चालेल,  असे सांगून वाढदिवस,  पुण्यतिथी दिनी एक झाड लावा , असे आवाहन त्यांनी केले. पोलीस काॅन्स्टेबल रमेश ठोंबरे ,रविकिरण माने,सुरेश कांबळे ,रमेश सुरनर यांनी त्यांना साथ दिली. 

सात वाजता पालखी  आली. आज पुन्हा समाज आरती अनुभवली.  
उद्या पुढारीत समाज  आरती  याविषयी वाचा. 

आरती नंतर तळावर सेना कराड तालुका प्रमुख माझे गाववाले  विनायक भोसले आणि नितिश जाधव नाना सैदापूरकर यांची भेट झाली. सोबत प्रमोद खंडागळे  आणि अमित पवार होते.   दुपारी फोन करून त्यानी कळवले होते.  तळावर फोन लागत नाही,  पण फोन लावायला काढला आणि विनायक समोर!  दोघांना भेटून खुप आनंद झाला.  त्याना आमच्या तंबूत नेले, सर्व दाखवले.  गप्पा मारल्या. जाधव यांनी माझी वारी रोज वाचतो असे मला  आवर्जून सांगितले. आज बंडा तात्याचा मुक्काम इथेच होता. आठ वाजता तात्या जेवताना दिसले ,पुन्हा जाऊन भेटू म्हटले तर सव्वा नऊ वाजता ते एका छोट्या झाडाच्या बुंध्याला झोपले होते. खरंच तात्या फार मोठी विभुती आहेत, वारीत पदोपदी याचा अनुभव आला. 

नऊ वाजता जेवलो. आजची वारी पूर्ण केली. 
दिवसभर खुप आनंद मिळाला. 


     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

महिला माऊली सेवेकर्च्याया कामाला सलाम
 

वेळापूर सतीश मोरे 

कामाची योग्य विभागणी,  श्रम ,जल ,काम  ,आहार,  स्वच्छता याचे योग्य व्यवस्थापन,  अचुकता ही पंढरीच्या वारीला जाणाऱ्या सर्व दिंड्याची खास वैशिष्टय़े म्हणता येतील. वारीत महिला आणि पुरूष दोघांचाही सहभाग असतो. कष्टाची कामे पुरूष करतात.   त्याहून अधिक क्लिष्ट,  अवघड  आणि कमी प्रतिष्ठेची मात्र अत्यावश्यक कामे करायला महिला सेवेकरी  18  ते 20  तास धडपडत असतात. कोणतीही बिदागी न घेता काम करणाऱ्या  सेवेकरी महिला माऊलींच्या या सेवेमुळेच हायजेनिक पोटभर जेवण वारकर्याना मिळू शकते. सलाम या सेवेला,  त्रिवार सलाम त्या माऊलींना !


वारी प्रवास सुरू होण्याआधी किमान महिनाभर तयारी सुरू केली  जाते.  वारकरी किती येणार,  त्यात महिला किती,  पुरूष किती,  सेवा देणारे किती,  टाळकरी, झेंडेकरी, याचा विचार केला जातो.  त्यानुसार तंबू संख्या किती  असावी,  स्वयंपाकाची भांडी किती व कोणती  आणायची,  जेवणाचे धान्य,  साखर,  तेल आदी साहित्य किती घ्यायचे याचे नियोजन केले जाते. हे साहित्य कुठे ठेवायचे,  कोणत्या दिवशी कोणता स्वयंपाक असतो यावरून ट्रकमध्ये साहित्य त्या क्रमाने भरले जाते.  हे सर्व काम करताना पुरूष सेवेकरीची जितकी आवश्यकता असते त्याहून  अधिक छोटी छोटी पण  महत्वाची कामे महिला सेवेकरी करतात.  अनेक दानशूर लोक गहू किंवा तांदुळ देतात, ते निवडण्याचे काम तसे खुप सोपे आहे, वाटते. पण वारीत सहभागी लोकांच्या संख्येनुसार धान्याची पोती 10  ते 20 इतकी असतात. ह धान्य निवडायचे काम  पुरूषांना जमत नाही, किंबहुना ते करत नाहीत. गहू निवडून ते दळून पीठ वाहनात ठेवले जाते.  

आळंदीला गेल्यापासून पंढरपूर मठात पर्यंत अनेक छोटी मोठी कामे महिला सेवेकरी करतात.  अनेक वर्षे पासून सेवा करणाऱ्या अनेक महिला सेवेकरी वारीत पहायला मिळाल्या. तीस वयापासून 70 वर्षे वयाच्या महिला सेवेकरी हे काम माऊली सेवा म्हणून करतात.  क्वचितच महिला नाममात्र बिदागी घेतात.  विनामोबदला काम करणाऱ्या सर्व सेवकांचा शेवटी टाॅवेल , टोपी,  चोळी नारळ देऊन सत्कार केला जातो.  सेवेकरी महिला अथवा पुरूषांना स्वतंत्र तंबू व्यवस्था असते . पहाटे तीन वाजता तंबू काढला की सारे साहित्य ट्रकमध्ये टाकले जाते.  त्यानंतर याच ट्रकमध्ये या महिला जशी जागा आहे तिथे  बसतात. या दरम्यान थोडी झोप लागते. दुपारचा भोजन विसावा ठिकाणी चार -पाच वाजता  वाहन पोहचते.  तिथे जी सोय आहे त्यानुसार आंघोळ व इतर विधी आटोपला जातो. उजाडलेले असते.  लगेच स्वयंपाक तयारी सुरू होते. 

 मुख्य आचारी जेवणाचा मेनू सांगतात.  लगेच पीठ मळायला घेतले जाते. त्याचवेळी भाज्या स्वच्छ करून निवडणे, कांदा व भाज्या कापणे, लसूण सोलणे , मसाला तयार करणे चपात्या लाटणे,  भाजणे,  भाकरी करणे, हे काम करताना या महिला गवळणी, हरिपाठ म्हणतात. हरीचे नाम घेता घेता काम सोपे होऊन जाते. संपते.  ही कामे दिसताना सोपी वाटतात,  पण महिला सेवेकरीच ते करू शकतात. जेवण तयार झाल्यावर वाटपींना भरून देणे, चपात्या,  भाकरी मोडणे ही कामे महिलांवरच येऊन पडतात. बारा वाजता पंगती संपतात आणि सर्वात क्लिष्ट भांडी धुवायचे,  घासायचा काम महिला सेवेकरीच करू शकतात. किमान 3 ते 5 मोठ्ठी पातेली, कढई, उलातणे, पळी, वगराळी आदी भांड्याचा ढिगच लागतो. नाक न धरता आणि मुरडता घरच्या प्रमाणे महिला हे काम करतात. 

एक वाजता ट्रक पुन्हा सुरू होतो. तीन पर्यंत मुक्काम ठिकाणी पोहचतो. या दरम्यान डुलकी लागते. तंबू उभे झाल्यावर तासभर विश्रांती घेऊन पुन्हा सायंकाळच्या सस्वयंपाकाची तयारी सुरू होते. पुन्हा तेच.  सारे जण झोपलेले असतात तेव्हा  दहा, आकरा पर्यंत महिला भांडी घासत  असतात. त्यानंतर तंबूत झोपतात. महीला सेवेकर्याचे वेळापत्रक असे बिझी राहते. या शिवाय दिंडीत  आलेले पाहुणे यांना चहापाणी करून देणे,  दिंडी मालकांना वेगळा स्वयंपाक तसेच कपडे धुणे,  ही कामे महीलाच करतात. म्हणूनच या महिलांना सलाम करावा वाटतो,

११ जुलै २०१६


🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 11 जुलै 
वेळापूर  सतीश मोरे 

पहाटे 2 वाजताच गोवारेच्या बापूंनी त्याच्या स्टाईलमधे हाळ्या मारत जागे केले. सारेजण  उठले.  सारे विधी आटोपून तीन च्या सुमारास रस्त्यावर  आलो.  वारकरी जेव्हा प्रवास सुरू करतो तेव्हा निघताना रस्त्याला नमस्कार करतो आणि मगच पुढे जातो. यामागे कृतज्ञतेची भावना  असते. ज्या रस्त्यावरन चालायचे आहे, तो रस्ता साथ देणार आहे, त्यावरून चालणार आहे त्याला नमस्कार करून,  त्याची परवानगी घेणे,  हा त्यामागचा हेतू आहे. 

आज 18 किलोमीटर अंतर पार करायचे होते,  फार नव्हते.  पण तरीही आम्ही लवकर निघालो . ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेवचा ताल ठेका धरत  अंधारात चाललो होतो.  खुप गर्दी होती.  वाहने पण खुप होती.  हवा अजिबात नव्हती, त्यामुळे धुराचा त्रास होत होता.  पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून चोख नियोजन केले होते.  आम्ही चालत राहिलो.  चहा पाणी करण्यासाठी चार च्या सुमारास थांबलो.  पुन्हा चालायला लागलो. 

पंढरपूर आता जवळ आले आहे,  आता दोन तीन मुक्काम राहीले,  चर्चा सुरू होती.  आज  आणि  उद्या लवकर  उठावे लागणार,  परवा पासून  अंतर कमी  असल्याने चालायला सुरुवात दुपारी असणार,  काही जण सांगत होते.  गेली 13  दिवस पहाटे  उठायला लागतेय,  आता दोनच दिवस हे करावे लागणार,  हा विचारच खुप सुख देऊन जात होता. आम्ही खुललो होतो,  चालत राहिलो.  पुन्हा पावणे पाचच्या सुमारास चहाला थांबलो.  मी चहावाल्याला फक्त गरम पाणी करून मागीतले.  घसा स्वच्छ झाला,  खोकला पण कमी झाला यामुळे.  तिथेच सारेजण थांबले.  लवकर निघालो आहे,  पुढे जाऊन अंधारात कॅनाल मध्ये कसे उतरायचे?  चला इथेच पडा,  सारे सहमत.  आम्ही तिथेच कागद  अंथरला, जवळपास आत मोठी रोपवाटिका होती . हवा थंडगार होती, मस्त झोप लागली. साडे पाच   वाजता महेश तवर यांनी  उठवले,  चला उजाडले. पुन्हा चालू लागलो . सव्वा सहा वाजता  आम्ही कॅनाल जवळ पोहचलो.  मी खरे तर आंघोळ करणार नव्हतो, पण वाहते पाणी पाहून बेत बदलला.  सारे जण  आत  उतरले.  मनसोक्त स्नान करून तयार झालो, सुतार माऊलीनी गंध लावला. 


कॅनाल जवळच आमचे दुपारचे जेवण होते.  लगेच पोहचलो तेथे.  हवा जोरात सुटली होती.  कपडे,  टाॅवेल वाळायला टाकली आणि पिक अप जीप च्या मागे फळ्यावर जाऊन बसलो. फ्रेश मुड मध्ये  एक विषय टॅबवर तयार केला. थोडा पेंग  आला,  डुलकी काढली.  पुन्हा उठलो आणखी एक विषय तयार केला.  दहा वाजले होते,  तिकडे जेवणाची तयारी सुरू झाली होती.  आज कराडचे भैया तवर, रामभाऊ शिंदे,  तुकाराम पोळ, चंद्रनील कारखानीस, जालिंदर यादव  यांचे वतीने जेवण होते.  सारे जण  आकरा वाजता आले, श्रीखंड घेऊन,  बाकी स्वयंपाक तयार होता . पण दिंडी आली नव्हती.  स्वयंपाक तयार  असला तरी जोवर  दिंडी येत नाही तोवर पंगत पडत नाही.  आज खुडुस फाट्यावर दुसरे रिंगण होते.  ते रिंगण झाल्यावर बराच वेळ वारकरी तेथे खेळ करत होते.  त्यामुळे वेळ लागत होता.  इकडे आम्ही सारे दिंडीच्या प्रतिश्क्षेत होतो.  भुक तरी जाम लागली होती. कुणी चिवडा लाडू खाऊन घेतला,  कोणी चहाला गेले.  साडे बारा वाजता दिंडी आली.  बसायला जागा योग्य नव्हती त्यामुळे बुफे सिस्टीमने जेवण झाले.  ताट हातात घेऊन मिळेल त्या जागेवर बसत होते. वारीत  आपले जेवण झाले की स्वतचे ताट स्वत धुवायला लागते.  जेवण करताना काही वाटत नाही,  ताट धुवायला सुद्धा काही वाटत नाही,  पण पाणी टाकी पुढे इतकी गर्दी होते, त्यात भर नळाखाली
झालेला चिखल,  त्यामुळे तिथे जाऊ वाटत नाही.  मी रोज एक  आयडिया करतो,  कमी जेवण घ्यायचे,  लवकर खायचे आणि कोणी यायचे अगोदर टाकीजवळ जाऊन ताट वाटी धुवायची. आज गर्दी खुप होती.  पण  आमचे भाग्य नाही जेवलेले लोक  आमचे ताट स्वत मागून घेत होते.  माझे ताट  एका वृद्ध माऊलीने मागीतले,  पण मी धुवून तुम्हालाच देतो , असे सांगितले,  तरी त्यानी ऐकले नाही.  शेवटी मी ताट दिले.  आपले ताट दुसर्‍याला धुवायला
लावले,  फिल झाले.  पण मग त्या माऊलीचा शोध घेतला,  पाणी बाटली भरून त्या माऊलीला दिली, तेव्हा हलके वाटले.

दोन वाजता निघालो,  वेळापूर दिशेने. पुढे बोर्ड वाचला वेळापूर 5 किलोमीटर. बरे वाटले.  वारीत चालताना  अंतर कसे निघून जाते हे कळत नाही.  सकाळच्या टप्प्यात काहीच वाटत नाही,  पण दुपारी  संध्याकाळी पाय थोडे दुखतात, तेव्हा  अंतर बोर्ड पाहून हायसे वाटते.  स्वच्छ हवा होती, वातावरण ढगाळलेले होते,  उन  नव्हते. चालत राहीलो. 

वेळापूर  अलिकडे उतार रस्ता आहे.  तिथे आल्यावर तुकाराम महाराजांना पंढरपूर मंदीर दिसले होते,  भास झाला होता, त्यामुळे ते येथून धावत सुटले होते,  अशी श्रद्धा आहे.  याठिकाणी पालखी खांद्यावर घेऊन धावतात, पालखी यायला वेळ होता.

सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥1॥ 
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥ 
पाणचो-याचें दार। वरिल दाटावें तें थोर ॥2॥ 
वश जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥3॥ 
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥4॥ 
तुका ह्मणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥5॥



आमचे सहकारी धावू लागले,  इतरही वारकरी धावत होते.  हा क्षण टिपायला चॅनेलच्या व्हॅन तयार होत्या,  तसेच परिसरातील लोक जमले होते,  उंचावर बसले होते. येथे धावा  आणि भारूड सादर केले जाते. बुलढाणा जिल्ह्य़ातील लोक भारूड करत होते, काही महीलानी पिंगा धरला होता,  मजा आली. 

साडे तीन वाजता तळावर पोहचलो, काही  तंबू तयार होते.  कागद टाकला आणि पडलो तासभर. साडे चार वाजता आमचे तंबूत  आलो,  पुन्हा झोपलो.  साडे पाच वाजता हरिपाठ सुरू झाला,  उठलो. नंतर वारी लिखाण केले .

जेवण तयार होते, निरोप आला पण भुक लागली नव्हती. तरीही सहकारी निघाले साडे सात वाजता जेवायला बसलो.  जेवण झाल्यावर तंबूत गप्पा पावसाच्या. वसिम शेख यांनी मला कराड कृष्णा नदीचा पूर फोटो पाठवला होता,  तो सर्वानी पाहीला.  यंदा पुलावरून पाणी जाईल का यावर अटकळी सुरू झाल्या. कृष्णा नदीतील मड्या मारूती मंदिर पाण्यात  बुडणे हे कराडकरांसाठी पुर सिम्बॉल आहे. ती चर्चा रंगली.  गप्पा मारत एक  एक जण झोपू लागला.  


 
एकंदरीत आजचा दिवस छान गेला. 

     - सतीश मोरे 
       9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩


फुकटखाऊ वृत्तीच्या  लोकांमुळे
वारी मार्गावर अन्न
  सोहळ्याची उंची वाढविण्यासाठी दानशुराच्या सहकार्याची  गरज 


माळशिरस :  सतीश मोरे

वारीत अन्न देणारे हजारो हात ,खाणारे लाखो आहेत.  परंतू  फुकट मिळाले म्हणून घ्यायला धावणारे मोकळे वारकरी याच्यामुळे पंढरीची वारीला अस्वच्छ  रूप येऊ लागले आहे.  शिस्तबद्ध माऊली पालखी सोहळ्यातील कोणीही वारकरी मोफत उपलब्ध असलेल्या कोणत्याही सेवेचा लाभ घेत नाही.  शिस्तबद्ध सोहळा जगाला हेवा वाटेल  असा  आहे.  पण या पालखी पुढे चालणाऱ्या वारकर्याच्या मोफत मिळेल ते खाऊ, उरलेले रस्त्यावर फेकून देऊ, अशा वृत्तीमुळे वारी मार्ग गलिच्छ होऊ लागले आहेत. माऊली सोहळा उंची वाढवढ्यासाठी  दानशूर व्यक्ती व संस्थानी वाया जाणारे दान बंद करून  इतर  उपक्रमात वाटा उचलला पाहीजे. 



पालखी सोहळ्यात सर्वात  पुढे मानाचा नगारा,  त्या मागे दिंडी नंबर 27 आणि  त्या पाठोपाठ माऊलींचा अश्व  असतो. नंतर 26 ते 1 अशा मानाच्या दिंड्या असतात. त्यानंतर रथात ठेवलेली माऊली पालखी असते.  त्या पाठोपाठ 1 ते 201 या मानाच्या दिंड्या असतात. गेल्या काही वर्षांत या मागोमाग 200 दिड्या नव्याने  आलेल्या आहेत.  रथासमोरील 27,  रथ,  मागील 201 आणि इतर 200 दिंड्या,  यामध्ये सहभागी टाळकरी, झेंडेकरी, वारकरी, तुलसी आणि पाणी वाटणारी महिला, चोपदार याला पालखी सोहळा म्हणत्यात. या सर्वाची संख्या दिड ते दोन लाख असते. शिस्तबद्धता, अचुकता,वक्तशीरपणा,  नियमबद्धता, कडकपणा पहावा तर या सोहळ्यातच. याचेवर पुर्ण नियंत्रण सोहळ्याचे चोपदाराकडे असते. अंतरानुसार  सकाळी सहा सात  वाजता निघणे,  नऊच्या सुमारास पहिला विसावा,  दुपारी बारा वाजता जेवण विसावा, साडे चार दरम्यान  आणखी एक विसावा, त्यानंतर सहा वाजता मुक्काम ठिकाणी पोहचणे, असा यांचा नित्यक्रम  असतो. नैसर्गिक परिस्थिती अपवाद वगळता यात कधीच बदल होत नाही. यांचे विसावा ठिकाण, मुक्काम ठिकाण निश्चित  आहे.  यामध्ये सहभागी वारकरी मध्येच कुठे थांबत नाहीत, दिंडी बाहेर जात नाहीत,  काहीही मोफत वाटप  असले तर तिकडे ढुंकूनही पाहात नाहीत .

या सोहळ्याच्या पुढे,  कुणाचेच नियंत्रण नसलेला वारकरी  असतो. यामध्ये पण दिंड्या  असतात,  दहा वीस जणांचा समुह असतो, स्वतंत्र चालणारे एक दोघेही असतात . याला मोकळा समाज  असे वारी भाषेत म्हटले जाते.  हे लोक कधीही चालायला सुरुवात करतात, कुठेही थांबतात, परत चालतात, कुठेही निवारा शोधतात, कुठेही झोपतात, मुक्काम करतात. कुणाचेच न  ऐकणारा हा समाज दोन ते तीन लाख  इतका असतो. हे ही पंढरीचे वारकरीच आहेत,  ते भजन करतात,  माऊली जयघोष करतात,  त्यानाही पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घ्यायचे असते.  पण त्याच्यात शिस्त नावाचा प्रकार क्वचितच पहायला मिळतो.  रहायची जागा निश्चित नाही,  जेवण व्यवस्था नाही किंवा वेळापत्रक नाही,  असा हा समाज रस्त्यावर कोणीही काय वाटत असेल तर लगेच तिकडे धावतो.  मोफत वस्तू घेण्यासाठी तुटून पडतो.  पाणी बाटली,  चहा,  बिस्किटे,  स्नॅक्स पुढे, राजगिरा लाडू,  टोप्या,  छत्री काहीही असो, हा समाज त्या मागे धावतो, वस्तू घेताना गडबड,  धक्काबुक्की . मस्ती करतो. अनेक जण तर फक्त याच कामासाठी वारीला आलेले असतात. 




अलिकडे पंढरीच्या वारीत दान करणार्‍या अन्नदात्याची संख्या अचानक  वाढली आहे.  वारीत वस्तू किंवा खाद्य पदार्थ वाटले की सेवा होते, अशी भावना वाढली आहे. शिरा,  उपीट, लाडू, पोहे,  पुरी भाजी,  जेवण , चहा,  पाणी बाटली,  बिस्किटे वाटणारे अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था,  वारकरी सेवा मंडळे, गणेश मंडळे गावागावात  आहेत. पहाटे तीन पासून रात्री उशिरा पर्यंत ही सेवा सुरू असते.  या संस्थाचा उद्देश चांगला आहे,  उपक्रम स्तुत्यआहे.  पण घेणांराची मानसिकता कृतज्ञताशील नसते.  फक्त फुकट मिळाले म्हणून धाव धाव करणे,  वस्तू घेणे, आवडले तर खाणे,  पोट भरले की उरलेले रस्त्यावर फेकून देणे,  असे प्रकार सर्रास सुरू आहेत.  असे खाद्य पदार्थ रस्त्यावर फेकल्यावर तुडवले जातात,  रस्याकडेला प्लेटचा ढीग लागलेला असतो.  पाणी पिशव्य तुडवल्या जातात . अन्न व पाण्याची नासाडी केली जाते,हे सर्व पाहवत नाही. 

मोकळ्या समाजातील या सैराट वारकर्यांमुळे चांगल्या लोकांचा वारीबाबत दृष्टिकोन बदलतआहे.  लोक यालाच पालखी सोहळा म्हणतात. वास्तविक या लोकांचा पालखी सोहळ्याशी काही संबंध नसतो.  फुकट खाऊ प्रवृत्तीच्या या लोकांना आवरणे कठीण आहे.  त्यासाठी मोफत वस्तू,  खाद्य पदार्थ वाटणार्‍या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. वाया जाणारे दान करून पुण्य राहीले बाजूला,  दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे रोगराई होऊन शापच मिळू शकतो.  चोपदार फौडेशनने गेल्या वर्षी याबाबत केलेल्या  आवाहनास प्रतिसाद देऊन राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी  अन्नदान न करता पालखी दिंड्या साठी 5 लाख रुपये खर्च करून 1000 ताडपत्रया दिल्या होत्या. सोहळ्यास ज्याची गरज आहे,  ते द्यायला हवे.  जेवण देण्यासाठी दिंडी कटीबद्ध असते. काही  खाजगी दिंड्या 2 ते 4 हजार रुपये भिसी गोळा करून चालवल्या जातात, याचाही विचार दानशुरानी केला पाहिजे.


१० जुलै २०१६



दिनांक 10 जुलै 
माळशिरस  सतीश मोरे 

सकाळी पाच वाजता उठलो.  मुक्काम दिक्षितांच्या घरीच होता. तंबूत असतो तर  अडीच वाजता उठायला लागले असते. नको म्हणल तरी त्यांनी गरम पाणी करून दिलेच. तयार झालो . रात्री झोपेत वारी लिहली होती , वाचली, एडीट करून तुम्हा माऊलीना पाठवली. साडे सहा वाजता बाहेर पडलो. आज माऊली पालखी सोबत चालणार होतो,  पुढे चौकात आलो.  रस्त्यावर झालेला चिखल,  भिरभिर पडणारा पाऊस यामुळे ट्राफिक जाम झाले होते.  वाहने थांबली होती,  किचकच झालेल्या रस्त्यावर वारकरी उभे होते. माऊलीकडे जायला वेळ लागणार होता, म्हणून  एकटेच चालायचे ठरवले. चलो माळशिरस, अकेला. रोज सहकारी  असायचेच, आज ते पुढे दुपारच्या भोजन ठिकाणी पोहचले होते. सहकारी अशोक शिंदे यांचा फोन आला,  कुठे आहे,  कुठे थांबायचे हे त्यानी सांगितले. 

आलो मुख्य रस्त्यावर. पावणे सात वाजता चालायला सुरुवात केली.  सोबत हजारो वारकरी होतेच. पुढे मागे बघायचे,  नव्हते.  एकटेच जायचे असल्याने काही काळजी नव्हती.  भुरभुर पाऊस सुरू होताच.  सुरूवातीला काही वाटले नाही, पण नंतर भिजतोय याची जाणीव झाली.  प्लॅस्टिक कागद बाहेर काढला. खोळ तयार करून चालायला लागलो.  रस्त्यावर  झालेला चिखल वारकरी लोकांना आव्हान देत होता, थांब म्हणत होता,   पण वारकरी त्याला दाद देत नव्हते. एक तीन चाकी सायकल दिसली. अपंग पती पत्नी सायकल पॅडेल हाताने मारत होते. फोटो काढायला पुढे आलो, चौकशी केली. जामखेडचे बाळू जालींदर गोरे गेली दहा वर्षे येतात वारीला.  मागे ढकलायला  वडील होते.  फोटो काढताना त्यानी मला विचारले,  आता  आम्हाला काय मिळणार?  मला कळेना यांना काय सांगायचे. मी पेपर मध्ये लिहतो,  तुमचा फोटो पेपरात येऊ शकतो,मी उत्तरलो.  त्यावर मला काय मिळणार, असे त्यांनी विचारले.  तुम्हाला माऊली देतील, असे सांगून तेथून निघालो. 

चालत राहिलो. एक तास झाला होता.  थांबायची इच्छा झाली.  पण पाऊस सुरूच होता. थांबायला जागा नव्हती.  भुरभुर पाऊस ,  खोळ घातलेली, विनाखंड चालणे  त्यामुळे घाम आला होता. खांद्यावर टाकलेल्या  ओल्या टाॅवेलने घाम पुसला. मांडवे गाव आले होते.  अरूंद
पुल पार करून आलो. उजवीकडे  आमचा पाणी टॅन्कर रस्त्यकडेलाच होतो. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने बारा नंबर दिंडीसाठी गेली अनेक वर्षे पाणी टॅन्कर पुरवला आहे , वारकरी सेवा करत आहे, हा कारखाना.  तो टॅकर पाहून थांबलो, आमचा खबाले पाटील ट्रक नंबर  MH 06 9594 दिसला. आत गेलो . जीप मध्ये जॅकेट ठेवले. शर्ट पण काढला.  बनियन  ओले झाले होते, थंडी वाजली. तसाच किचन विभागात गेलो,  तिथे गरम हवा,  वाफेत  बरं वाटले.  माने गुरुजी तिथे होते,म्हणाले, या भाताच्या पातेल्यावर बनियन टाका. तसे केले,  तोपर्यंत  उघडा उभा राहिलो होतो. मजा आली.  

साडे दहा वाजता जेवायला बसलो. पाऊस आला की वारीत बुफे सेवा असते. ओळीत उभे राहून ताटात भाकरी, पिठलं, खरडा,  वांग्याचे कालवण आणि भात मेनू होता.  जीपमध्ये जाऊन बसलो.  काही जण ट्रक खाली,  काही झाडाखाली तर काहीजण पावसात भिजत जेवत होते. भुक हा असा विषय आहे, जेव्हा लागते तेव्हा काही सुचत नाही. पोटभर  जेवण झाल्यावर निघालो पुढे. मी रिंगण पहायला थांबणार  असल्याने सहकारी पुढे गेले होते, त्यामुळे  एकटाच होतो. चालायला लागलो, चार किलोमीटर अंतरावर सदाशिवनगरचा शंकरराव मोहिते साखर कारखाना  आला.  जागा अपुरी असल्याने सदाशिवनगर ची जागा रद्द करण्यात आली होती.  तेथून पुढे जवळच  पुरूंदावडे येथे रिंगण सोहळा होणार होता. तिथे पोहोचलो.  स्वागत कक्षातच राजाभाऊ आणि  रामभाऊ चोपदार ऊभे होते,  माझे त्याचेकडे काम होते, राजाभाऊंनी रामभाऊ कडे काम सोपवले. आम्ही तळावरच बोललो. 

एक वाजता माऊली अश्वाचे आगमन झाले. रिंगण सोहळा  अतिशय सुंदर जाहला.  नवीन जागा फार मोठी होती.  सर्वाना पाहता आले.  कुठेही गोंधळ झाला नाही. रिंगण सोहळा नंतर वारकरी खेळ धरला,  नंतर उडीचे खेळ सुरू झाले.  एका तालात टाळ वाजत होते,  वारकरी बेभान होऊन टाळ वाजत होते. टाळ, मृदंगची जुगलबंदी सुरू झाली,  बाळासाहेब,  रामभाऊ,  राजाभाऊ चोपदार हातवारे करून सुचना देत होते. बंडा तात्या पण  उभे होते.  अर्धा तास हा खेळ सुरू होता.  दरम्यान वारकरी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे भेटले, लोकमतचे पत्रकार भेटले. फोटो काढले 

परत प्रवास सुरू.  माळशिरस सहा किलोमीटर अंतरावर होते. खुप कंटाळा आला होता,  पण लवकर जाऊन लिहायचे होते. थांबून चालणार नव्हते.  आता पाऊस थांबला होता,  उन पडले होते.  हे अंतर पार करायला दोन तास गेले. पाच वाजता पोहचलो.  मोठे गाव आहे ते. गावाबाहेर पालखी मुक्काम होता. खुप थकलो होतो. जाऊन ट्रक केबिनमध्ये पडलो.  


ट्रक मालक निवास खबाले पाटील, तसेच सहकारी  यांच्याशी चर्चा केली.  त्याना अपंग व्यक्तींचा किस्सा सांगितला.  तेव्हा वेगळीच बाजू कळली. वारीत काही जण अशी सायकल ढकलायला रोजंदारीवर माणूस ठेवतात. त्याचा उद्देश फक्त पैसे कमावणे हाच असतो. सायंकाळी  हिशोब करताना पैसे विभागणी करताना एका व्यक्तीने हे पाहीले आहे 

रात्री साडे आठ वाजता जेवायला बसलो. वळकटी घेऊन  तंबूत गेलो. काम पूर्ण केले.  सकाळी तीन वाजता जाताना न्यायची कपडे,  साहित्य जुळवून ठेऊनच झोपतात सारे.


एकंदरीत आजचा दिवस छान गेला. 
आठरा किलोमीटर चाललो,  मजेत..


     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...