फॉलोअर

०४ जुलै २०१६




  पाऊस वाढला अन्  वारकर्याचा उत्साह पण
जेजुरी : सतीश मोरे
पंढरीच्या वारीत  रविवारी वारकरी भक्ती रसासोबत  पावसात पण न्हाऊन निघाले.  सासवड ते जेजुरी दरम्यान सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला.  मोकळ्या समाजातील लाखो वारकरी  पुढच्या टप्प्यावर पोहचण्यासाठी सकाळी लवकर निघतात. वारकरी  आणि पाऊस यांच्यात जणू वेगाची स्पर्धा लागली होती. दिवसभर हा खेळ सुरू होता.  दोघेही जोशात होते.  माऊलींच्या नामाचा महीमा आणि राम कृष्ण हरी या मंत्राच्या ताकदीसमोर अखेर पर्जन्यराजा हरला, माऊली जिंकली.

सासवडला दोन दिवस मुक्काम करून सुखावलेले वारकरी रविवारी सकाळी लवकर उठून जेजुरीला जायला निघाले. सासवड जेजुरी अंतर 19  किलोमीटर आहे.  अंतर कमी  असल्याने माऊली पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे 250 दिंड्या उशिरा  निघणार होत्या .  सोहळ्यात सहभागी नेहमी  दिंड्यातील वारकर्यापेक्षा मोकळ्या समाजात खुप वारकरी असतात. त्यांचे कसलेही वेळापत्रक नसते.  केव्हाही निघा, कुठेही थांबा. हे वारकरी सकाळी लवकर उठून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघतात. पहाटे चार तीन पासूनच वारकरी बाहेर पडले होते.  चार वाजता तर रस्त्यावर वारकर्याचा मोठा प्रवाह होता.
अंधारात पुढच्याचा अंदाज घेत तसेच उजव्या  बाजूला असलेल्या वाहनांच्या प्रकाशात वारकरी चालले होते. सासवड शहर सोडून एक किलोमीटर अंतर गेल्यावर पावसाला सुरुवात झाली . या अगोदर आळंदी ते पुणे ते दिवे घाट दरम्यान वारकरी रिमझिम पावसात आनंदले होते,  हा पाऊस फार थोडा वेळ होता.  पण  आता पावसाचा जोर जास्त होता.  सगळी कडे  आभाळ गच्च भरलेले होते. त्यामुळे माऊलींनी लगेच प्लॅस्टिक खोळ बाहेर काढली. काहींनी रेनकोट, छत्र्या बाहेर  काढले.
आता पावसाने आणखी वेग वाढवला.  जोरदार पाऊस सुरू होता. रस्त्यावर पाणी साचले. चालणे  अवघड होत होते. पण वारकरी थांबले नाहीत.  मार्ग काढत पुढे जात राहिले. सोबतीला होते माऊली आणि तुकाराम महाराजाचा जयघोष. या नामाने त्यांना ताकद मिळत होती. डोक्यावर घेतलेली खोळ दोन्ही हातांनी पकडत, थोडी तोंडावर घेऊन ते चालत होते . दोन तास झाले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. गटागटाने चालणारे वारकरी  कोणी चुकू नये म्हणून काळजी घेत होते.  माऊली माऊली म्हणून उजवीकडे  असणारे वाहनाचे क्लिनर वारकर्याना साईड मागत होते.  पोलीस व्यवस्थापन बेपत्ता होते.  वाहतूक शिस्तीचे काम वारकर्यानी हाती घेतले.
सहा वाजले, उजाडू लागले, पाऊस सुरूच होता. वाराही जोराने वाहू  लागला , वारकर्याचा उत्साह जराही कमी झाला नाही.  मध्ये कोणी चहा घ्यायला थांबत, काही जण नाश्ता करून पुन्हा चालणे सुरू करत. पावसाचे पाणी पायावर पडत होते,  मधूनच खोळ वार्‍याने उडून जायची, सारे अंग थंडीने शहारत होते.  पाऊस मी म्हणत होता आणि वारकरी माऊली म्हणत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत हा खेळ सुरू होता. आता जेजुरी जवळ आले आणि पाऊस दमला.  चिंब चिंब भिजून गेलेले वारकरी जेजुरीला पोहचलो. पावसाने बारा पर्यंत  विश्रांती घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. दिवसभर हा खेळ सुरु होता, वारकरी जेजुरीला येत होते. 
सायंकाळी माऊली पालखीचे आगमन झाले. या दिंड्यातील वारकरी,  टाळकरी, विणेकरी सारे पावसात भिजले होते,  त्याचे कपडे पाऊस थांबला की सुकत होते. पावसाची तमा न करता वारकरी चालत राहिले. बर्‍याच दिवसांनी पालखी सोहळ्यात असा पाऊस पडला,  अशी प्रतिक्रिया वारकर्यानी व्यक्त केली.



मोबाईल वाढले; वारकरी झाले ऑनलाईन
जेजुरी :  सतीश मोरे
पंढरीची वारी कालची  आणि आजची याबाबत माहीती घेतली आणि तुलना केली तर खुप मुद्दे आहेत.  500-1000 वारकरी घेऊन जाणारी फार फार पुर्वीची वारी, त्यानंतर 1970 च्या सुमारास 10000 वारकरी, 1990 च्या सुमारास 20000 वारकरी आणि  1995 मध्ये  वारी लाखावर  पोहोचलेली वारी !  2000 नंतर तीन लाख वारकरी आता चार लाखावर पोहचलेल्या ज्ञानेश्वर  माऊली सोहळा. सोहळ्यात बरेच बदल झाले आहेत. वारीसाठी घर सोडल्यानंतर महिनाभरात  कुटुंबाशी  कसलाही संपर्क नसलेला पुर्वीचा वारकरी मात्र आता  ऑनलाईन झाला आहे, रोज संध्याकाळी आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत  बोलत आहे, वारीचे अनुभव सांगत आहे.
 संत तुकारामांच्या घराण्यात वारीची परंपरा फार वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याच्यनंतर त्यांचे कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव श्री नाराङ्मण बाबा यांनी 1685 मध्ये या  वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायांच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला जात. त्याठिकाणी पालखीमध्ये  ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत  हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये वाद झाल्यामुळे हा सोहळा काही काळ खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये  माऊलींचे निश्चिम भक्त श्री हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या कडे सरदार म्हणून असलेल्या पवार कुळातील हैबत बाबा यांनी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला, वाढवला.
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गेल्या काही दशकात  अनेक बदल टप्प्याटप्प्याने होत गेले आहेत.  अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या वारीत महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील वारकरी सहभागी होतात.  सुरुवातीला हा आकडा शेकड्यात होता,  पुढे हजारात,  विसाव्या शतकाच्या अखेरीस लाखावर,  आता तीन ते चार लाखांच्या घरात गेला आहे.
पुर्वी वारीसाठी वारकरी आठ दहा दिवस अगोदर  आळंदीला जायला निघत. पुढे बैलगाडी आली . टमटम, एसटी बस आली. आळंदी ते पंढरपूर वारी व पंढरपूर येथे दोन दिवस, परतीचे दहा दिवस असा महीना दिड महिना वारी कार्यक्रम  असायचा. आता यामधील पंधरा वीस  दिवस कमी झाले आहेत.
पुर्वी वारकरी पंढरीला निघाला की सारे गाव जमायचे,  त्याचे दर्शन घेतले  आमच्या वतीने पाडुरंगाला नमस्कार सांगा,  हे पाच रूपये पेटीत टाका, असे सांगायचे.  तो वारकरी पुन्हा कधी परत येणार याची खात्री नव्हती. मात्र आता इंटरनेट च्या जमान्यात वारी,  पालखी सोहळा आणि वारकरी ऑनलाईन झाला आहे.  गतवर्षी मी वारीमध्ये वारकर्यांकडे खुप कमी मोबाईल पाहीले होते. ऍन्ड्रॉईड फोन क्वचित होते.   यावर्षी वारीला मोबाईल फोन घेऊन येणारे वारकरी खुप वाढले आहेत. महिला व पुरुष वृद्ध  वारकरी छोटासा मोबाईल घेऊन येतात.  दिवसभर त्याचा फोन बंद असतो,  मात्र मुक्कामाला पोहचले की हे आज्जी,आजोबा फोन बाहेर काढून घरी फोन करतात.  मी जेजुरीला पोहचली हाय, तब्येत चांगली आहे.  काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे,  असा संवाद होतो. फक्त खुशाली आणि कुठे पोचलो आहे,  येवढे सांगणे हाच फोन उद्देश  असतो. या दरम्यान गावातील  एखादा युवक, अनुभवी वारकरी  त्या दिंडीत  असेल तर तो वृद्ध वारकऱ्यांचे फोटो त्याच्या मुलाला पाठवतो,  हे पहायला मिळाले.


टाळकरी, झेंडेकरी व इतर वारकऱ्यांकडे सुद्धा मोबाईल  आला आहे.  दुपारी विसावाच्या ठिकाणी थांबलो की यांचे फोन सुरु होतात.  काही जण आपल्या फोनवर मोबाईल न आणलेल्या माऊलींना मोफत फोन लावून देत  सेवा करतात. गळ्यात दोरा बांधून त्याला मोबाईल बांधला जातो.  आधुनिक तरूण वारकरी, पहिली दुसरी वारी करणारे युवा वारकरी, संत वाडमय मंडळाचे सदस्य,  शिष्य वारीत ऍन्ड्रॉईड फोन घेऊन आले आहेत. मोबाईल  कॅमेरात सतत सेल्फी घेण्यात हे मग्न होते. फोटो काढून लगेच सोशल नेटवर्किंग साईट वर टाकले जातात.  मोबाईल  मोबाईल चार्ज करण्यासाठी  अनेक ठिकाणी चार्जर सेंटर सुरू झाली आहेत.  वारी अपडेट देण्यासाठी गेल्या काही वर्षांत फेसबुकवर  समुह तयार झाले आहेत.  वारी कव्हरेज देण्यासाठी मराठी चॅनल 24 तास कार्यरत आहेत. पण आता वारकरी मोबाईल लाईनवर, ऑनलाईन वरही येत  आहेत,  हा वारीतील सुखद अनुभव आहे. मुख्य पालखी सोहळ्यातील दिंडीच्या तुलनेत खुल्या समाजात खुप मोबाईल फोन असल्याचे आढळले.
वारी अपडेटस देण्यात सोशल मिडिया आघाडीवर आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर वारीचे तासातासाला फोटो पडतात. वारी मार्गावर माऊली दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे फोटो सोशल मिडियावर पडत  असतात.

०३ जुलै २०१६


 नांदेडकर देतायेत मोफत शुद्ध पाणी
सासवड सतीश मोरे
पाणी जीवन आहे, पाणी अमृत  आहे,  पाणी तृष्णा भागवते,  पाणी समृध्दि आणते. पाण्याशिवाय काही शक्य नाही. पाणी किती महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे.  पंढरीची वारी करताना थकलेल्या,  दमलेल्या वारकर्याला पाणी तरतरी आणते,  ताजेतवाने करते. महाराष्ट्र शासनाने वारकरी लोकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवले आहे. वारी मार्गावर सामाजिक कार्यकर्ते व शासन पाणी टॅन्कर उभे करते. पाणी पुरवठा यंत्रणेच्या मदतीला  आता नांदेड येथील साईप्रसाद अमृतदिंडी धावून  आली आहे. वारी मार्गावर सलग 18 दिवस शुद्ध आणि थंड मिनरल वाॅटर देण्यासाठी 200 स्वयंसेवक यंत्रणा या संस्थेने उभी केली आहे.
2012 साली स्थापन झालेल्या या संस्थेला कुणाचाही चेहरा नाही. नोंदणीकृत संस्था वा ट्रस्ट नाही  कोणी अध्यक्ष नाही,  पदाधिकारी नाहीत.  सारेच स्वयंसेवक म्हणून उस्फूर्त पणे सेवा करतात. सामाजिक कार्यात ही संस्था अग्रेसर आहे.  1400  सदस्य संख्या असलेल्या साईप्रसादने आजवर 70 विवाह लावून दिले  आहेत. या संस्थेच्या काही सदस्या गत वर्षी वारीत सहभागी झाले होते. सहा महिन्यापुर्वी  वारीत सर्वांना शुद्ध मिनरल व थंड पाणी पुरवठा कसा करता येईल यावर विचार केला. पुणे, सोलापूर, सातारा  जिल्हाधिकारी तसेच पुणे आयुक्त, पंढरपूर मंदिर सेवा समिती व ननगरपालिका मुख्याधिकारी यांचेसोबत चर्चा झाली,  आळंदी पंढरपूर वारी मार्गाचे सर्वेक्षण केले.



संस्थेने या कामी नांदेड, जालना,  औरंगाबाद, नगर तसेच वारी मार्गावरील गावातील दाते व लोकवर्गणीतून निधी गोळा केला. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी दोन ट्रकवर  आर ओ प्लान्ट  उभ केले आहेत. पाणी थंड करण्यासाठी चिलर आर  ओ प्लान्टला जोडले आहेत.    गावातील पाणी या प्लान्ट पर्यंत आणण्यासाठी 15 हजार लिटर क्षमतेचे दोन टॅन्कर ठेवले आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाला तर दोन जनरेटर पण ठेवले  आहेत. स्थानिक ठिकाणी पाणी उचलून ते शुद्ध केले जाते.  आठ टेम्पो मध्ये 1400  लिटर क्षमतेचे इन्सुलेटेड टॅक असून
त्यामध्ये पाणी साठवले जाते. 40 ठिकाणी पिक अप जीपमध्ये 20 लिटरचे 1000  जार ठेवले आहेत. संस्थेचे स्वयंसेवक या वाहनाबाहेर उभे राहतात. येणाऱ्या वारकरी माऊलीला पोटभर पाणी देतात.
शुद्ध मिनरल पाणी, तेही मोफत उपलब्ध करून देऊन या  संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान 200 स्वयंसेवकाच्या सोबतीला स्थानिक लोकांनी, तरूणांनी यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.  प्रत्येक गावातील लोकांनी फक्त पाणी द्यावे,  आम्ही ते शुद्ध करून माऊलीना देऊ, विठ्ठल भक्तांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.

वारीत सहभागी वारकरी ठणठणीत रहावा, असे आम्हाला वाटते.   वारकरी मिळेल तिथे कोठेही पाणी पिऊन तहान भागवतो.  वारकर्याना आजार मुख्यत्वे पाण्यामुळे होतात . ते होऊ नये म्हणून  आम्ही शुद्ध मिनरल  पाणी मोफत  देतो.  पाणी बाॅटल विकत घेणे सर्वाना जमत नाही. 
.   ........... स्वयंसेवक साईप्रसाद
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot.in/   
  
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot.in/  

०२ जुलै २०१६


माऊली नाम आहे  चालणाऱ्या 
वारकऱ्याचे टाॅनिक
दिवे घाट :  सतीश मोरे
अरे वारकऱ्या 
तुले नाही ऊन वारा 
थंडी झुगारीत अवघ्याले 
आली पंढरीची वारी
वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल आणि या देवाजवळ जाण्याचा सहज सोपा मार्ग दाखविणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या नावात किती ताकद आहे याचा प्रत्यय वारकऱ्यानी पुन्हा एकदा अनुभवला. दिवे घाटातील चढ उतार, वेडीवाकडी वळणे कधी आली आणि संपली माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी माऊलीना कळलेच नाही.  बालकापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धाला वारीत चालण्याची ताकद मिळते फक्त माऊली  नामाने. आळंदी ते पंढरपूर दरम्यान सुमारे पावणे तीनशे किलोमीटर अंतर सहज पार होते ते माऊली नामामुळे!
पंढरीची वारी करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र सर्वानाच वारीला जायला जमत नाही. विठ्ठल भेटीची ओढ ज्याच्या हृदयात उफाळून येते, संत संगतीचा ध्यास लागतो आणि या दोन्ही  गोष्टी जुळल्यानंतर ज्याला विठ्ठलाचे बोलावणे येते त्यालाच पंढरीच्या वारीचे भाग्य लाभते, असे म्हणतात. वर्षानुवर्षे घरात सुरू असलेली वारी परंपरा चालू ठेवणारा वारकरी, स्वतःच्या इच्छेने आलेला वारकरी असो वा लेकाने सुनेने इथं काय करताय बसून असे म्हणत बळजबरीने वारीला आलेला वृद्ध, संसारातील कटकटीला कंटाळलेला कुणाचा पती, कुणाची पत्नी, सासु , सुन , तरूण, तरूणी, म्हातारी, म्हातारा, लहान मुले, मुली सारे सारे जण पंढरीच्या वारीला आले आहेत. इच्छेने असो की अनिच्छेने वारीला जाण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिंडीत तो कष्टकरी भाविक सहभागी झाला आहे.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातून पंढरीला निघालेला हा वारकरी वारीचा आनंद लुटत आहे. काशी यात्रा आणि पंढरीची,आळंदीची वारी यात फरक आहे. इतर सर्व यात्रा पापक्षालन आणि पुण्यसंपादनासाठी एकवार केल्या जातात. मात्र आळंदी पंढरीची वारी नित्यनेमाने प्रतिवर्षी करायची असते. यातून फार मोठा आनंद मिळतोच शिवाय संताच्या भेटी गाठी होतात. पायी वारी करण्याचा आनंद काही औरच.



भक्तीप्रेमरसाची अनुभुती घेण्यासाठी आलेला या वारकऱ्यानी आळंदीतून चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जोश होता. संताची साथ आणि जवळच्या लोकांची सोबत होती. 25-30 किमी अंतर चालून वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला आले. दोन दिवस पुणेकराच्या आदर अतिथ्याने सारे भारावले. पुण्यभूमीला कृतज्ञपणे वंदन करून वैष्णवांचा मेळा सासवडकडे निघाला.
पंढरीच्या वारीमध्ये सर्वात अवघड,लांब पण आल्हाददायक,  आनंददायी असा हा टप्पा. त्यात भर म्हणजे दिघीचा घाट आणि   एकादशीचा उपवास . साडे सहा वाजता माऊलींची पालखी निघाली. शिंदे छत्री येथे सकाळचा विसावा, हडपसर येथे दुपारचे भोजन करून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पालखी दिघी घाटात पोहचली. चढाचा रस्ता सुरू झाला आणि वैष्णवाचा जोश वाढू लागला.
अवघड रस्ता, घाट, खाचखळगे तसेच  उन, वारा आणि पावसातही वारकरी बेभान होऊन नाचत असतात. त्याला कशाचीच फिकीर नसते. त्याला ही ताकद मिळते फक्त माऊलींच्या नामामुळे.
वारीमध्ये तसेच कीर्तन, अभंग म्हणताना वारकरी का नाचतात याबाबत किर्तनकार गोष्ट सांगतात. एकाने दुसऱ्याला विचारले हे वारकरी का नाचतात ? दुसरा सद्पुरूषाने हसत हसत उत्तर दिले, अरे बाबा मनुष्याच्या डोक्यावर मोठे थोरले ओझं दिल तो नाचणार नाही. कुंथतच राहील. पण ते ओझे कुणी काढून टाकले तर तो उड्या मारत नाचेल. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर दोन मोठ्ठी ओझ्याची गाठोडी असतात. एक प्रपंचाचे दुसरे परमार्थाच. या दोन्हीच्या भाराखाली मनुष्य दबलेला असतो. पंढरीच्या वारीमध्ये अशी मौज आहे की पाठीमागे असणाऱ्या ज्ञानोबा माऊलीनी त्याच्या डोक्यावरून परमार्थाच ओझं काढून घेतले आहे तर पुढे असलेल्या पाडुरंगाने प्रपंचाचे ओझे पळवले आहे. त्यामुळे तो या वारीत बेफाम होऊन नाचतात आणि त्यामुळेच घाट रूपी रस्त्याचे  दुख कसे संपते हे त्याला समजत नाही.
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष वारीत सर्व काळ सुरू असतो. दिवे घाटाचा रस्ता आला. हळुहळु पालखी आणखी चढाला लागली. आभाळ भरून आले होत . वैष्णवानी आता राधा राधा राधा कृष्ण राधा चा ठेका धरत नाचायला सुरवात केली. दुसरीकडे काहींनी जय जय राम कृष्ण हरी चा नाद धरला. अंतर कमी होत होतं. वैष्णव जन नाचत होते.
पालखी पुढे पुढे जात होती, वारकरी माऊली नामात रंगून गेले.  . भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवाना पायाखालची वाट कशी निघून गेली हे कळलेच नाही. सर्व इंद्रिये भजनरंगात रंगल्याने अदभुत शक्ती मिळून वृद्धाच्या ठिकाणी सुध्दा तरूणासारखा आवेश व उत्साह निर्माण झाला आणि घाटातील अवघड वाटेच्या रूपातील दुख संपून गेलं. माऊलीच्या पालखी सोहळ्यात रस्ता कधी संपतो हे लक्षातच येत नाही याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव वैष्णवाच्या संगतीत आला.

०१ जुलै २०१६


गतवर्षी पेक्षा आळंदीत यंदा कमी भाविक 


पुणे
धन्य पुंडलिका बहु बरे केले ।
निदान  आणले पंढरिये ।।
धन्य ते पंढरी, धन्य भीमा तीर ।
आणियेले सार पुंडलिक ।।
नित्यनेमाने वारी करणारे हजारो वारकरी मंगळवारी आळंदीत दाखल झाले होते. प्रस्थान सोहळ्यात माऊली भक्तांचा अमाप उत्साह पहायला मिळाला. बुधवारी पालखीने पुण्याकडे मार्ग क्रमण केले. या दरम्यान गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी वारीमध्ये कमी वारकरी सहभागी झाले आहेत  . मागील वर्षे पडलेला मोठ्ठा दुष्काळ,  त्यामुळे झालेले स्थलांतर व भीषण परिस्थिती आणि याही वर्षी जुन संपत आला तरी पावसाने मारलेली दडी याचा परिणाम वारीवर झाला आहे. गेल्या वर्षी आळंदीत आलेले सुमारे साडेपाच सहा  लाख भाविकांच्या तुलनेत यावर्षी पाच लाख भाविक आणि  वारकरी आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही संख्या आहे  याला काही दिंडी मालकांनीही दुजोरा दिला आहे .
गेल्या काही वर्षांत वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी यांची संख्या वाढत आहे. 1990 नंबर झानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी  आणि दिंड्या वाढू लागल्या आहेत.  माऊली सोहळ्यात सहभागी पुर्व परपरागत दिंड्या मध्ये 1990 -1993 दरम्यान 10 ते 15  हजार वारकरी सहभागी होत  असत.  या दरम्यान पालखी सोहळ्याकडे प्रशासनाचे जास्त लक्ष नसायचे. पालखी गावातून यायच्या, जायच्या त्याकडे त्या गावातील लोक  आणि निवडक वारकरी यांच्या व्यतिरिक्त कोणाला घेणेदेणे नसायचे. 1990 च्या दशकात  ज्ञानेश्वरी सप्तशताब्धि जयंतीच्या निमित्ताने राज्यभर अनेक गावांमध्ये पारायण सोहळे पार पडले.  माऊलींच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला.  त्यानंतर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी संख्या वाढली. हळूहळू ही संख्या लाखावर गेली.  पुढे दोन लाख झाहली तर गेल्या सहा वर्षांत ही संख्या पाच सहा  लाखावर पोहचली आहे.


आळंदीत माऊली सोहळ्यास प्रारंभ होतो तेव्हा राज्य भरातील शेकडो दिंड्या येथे दाखल होतात.  अनेक वर्षे सलग या सोहळ्यात सहभागी होणार्‌या दिड्यांना संस्थान ट्रस्ट वतीने नंबर दिला जातो. फार  पुर्वी पालखी खांद्यावर घेतली जायची, पुढे रथ आला. त्यामुळे रथासमोरील दिंड्या  आणि रथामागे असणाऱ्या दिंड्या  असे क्रमांक देण्यात आले.  माऊली पालखी रथाचे पुढे पहिला क्रमांक दिंडी आळंदीची असते व पुढे यासहीत 27 दिंड्या  असतात.  रथामागे किंवा पालखीमागे नोंदणीकृत  201 दिंड्या असतात. तर त्या मागोमाग तितक्याच म्हणजे 200 दिंड्या आहेत. या 200  दिंड्याचे सातत्य, सक्रिय   सहभाग पाहून त्यांना नंबर दिले जातात.  गेल्या काही वर्षांत या दिंड्या मध्ये सहभागी वारकर्याची संख्या वाढली आहे.
गत वर्षी माऊली सोहळ्यात आळंदी पासूनच वारकर्याचा फार मोठा सहभाग होता.  साधारण पाऊसपाणी व्यवस्थित झाले असेल तर सोहळ्यात वारकरी स्वयंप्रेरणेने,  स्फुर्तीने येतात.  वारीला येणारा सर्वाधिक शेतकरी,  कष्टकरी,  शेतमजूर वर्ग आहे. माऊलीची वारी या वर्गानेच वाढवली, फुलवली आणि टिकवलीही.  वारी सुरू होते ज्येष्ठ वद्य  अष्टमीला.  या दरम्यान  अगोदर पाऊस योग्य वेळेत पडला तर हा वर्ग पेरण्या पुर्ण करून घेतो.  पेरण्या पूर्ण झाल्या , चांगले पीक येईल,  सारं काही चांगले होईल या आशेने शेतकरी सुखावतो.  मोकळा श्वास घेतो  आणि मोकळेपणाने वारीला निघतो.  ज्या वर्षी पाऊसमान चांगले होते, त्यावर्षी वारीत वारकरी जास्त येतात,  हा अनुभव आहे.  दुसरीकडे पंढरीच्या पाडुरंगाकडे जाऊन दर्शन घेऊन  आले की सारे काही आलबेल होईल, या आशावादही त्याचा असतो. गत वर्षी पाऊस बरा होता, त्यामुळे माऊली सोहळ्यात सुमारे साडेचार लाख लोक सहभागी झाले होते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
वास्तविक सहभागी वारकरी लोकांची कुठेही नोंदणी नसते,  रस्त्यावरन  जाणारा वारकर्याचा प्रवाह मोजता येत नाही.  दहा ते वीस  किलोमीटर रस्त्यावर फक्त वारकरी आणि दिंड्या दिसत  असतात.  आळंदी मध्ये  आलेली वाहने,  झालेली गर्दी,  किती लांब रांगा लागल्या,  इंद्रायणी नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी होणारी गर्दी या सर्व बाबींचा विचार करून पोलीस खाते अंदाज बांधते. चालु वर्षी सुमारे  पाच  लाख वारकरी आळंदीत आले असावेत,  हा आकडा गतवर्षी पेक्षा 1 लाखाने कमी आहे. यापैकी सारेच वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी होत नाहीत.  काही भाविक  माऊली दर्शन घेऊन घराकडे जातात, पुढे पंढरपूर जवळपास पुन्हा सोहळ्यात सहभागी होतात.
यंदा जुन महिन्यात राज्यभरात सरासरी पेक्षा 25% पण पाऊस झाला नाही. काही भागात वळवा पाठोपाठ मान्सून सक्रिय झाला आहे.  तरीही राज्याचा विचार करता पावसाची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस नसल्याने पेरण्या झाल्या नाहीत, बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे.  धरणे, पाझर तलाव आटले आहेत.  या सर्व गोष्टींचा परिणाम वारीवर झाला आहे. यावर्षी शेतकरी वारकरी कमी झाला आहे  पुणे, सासवड मध्ये काही जण सहभागी होतात.  मात्र गतवर्षी तुलनेत यंदा वारकरी कमी आहेत. काही दिंडी मालकाकडे माहिती घेतली असता त्यांनी पण यावर्षी लोक कमी  आले आहेत,  गावाकडे पाऊस नाही, त्यामुळे परिणाम झाला असल्याचे त्यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना सांगितले.


आळंदीत गतवर्षीचा तुलनेत कमी भाविक आले आहेत. गेल्या वर्षी माऊली दर्शनासाठी सुमारे सहा लाख लोक आले होते. यावेळी 5 लाख भाविक सहभागी आले आहेत. कमी पाऊसमान हे याचे कारण असू शकते. हे सर्व वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी होतात असे नाही. यंदा पावसामुळे वारकरी सहभाग कमी आहे .
- मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी, राजगुरुनगर, खेड. 



३० जून २०१६




🚩🚩🚩  माझी वारी 🚩🚩🚩
पुणे सतीश मोरे
मंगळवारी  माऊली पालखी प्रस्थान सोहळा डोळे भरून पाहिला  आणि मठात येऊन निवांत बसलो. दुपारी हेवी जेवण झाल्यामुळे आणि सोहळा पाहून पोट भरले असल्याने भुक लागली नव्हती.  तरीही तारूखच्या कुलकर्णी काकानी आग्रह धरला, नव्हे द्रोण पत्रावळी,  भात आणि भाजी घेऊन आले.  थोडा भात खाल्ला आणि झोपण्याची तयारी केली. दहा वाजताच्या सुमारास पडलो,  झोप लागत नव्हती,  डोळ्यासमोर फक्त माऊलीची पालखी आणि वारकरी दिसत होते.

सकाळी  उठून लवकर निघायचे होते.  रात्री दोन तीन वेळा जाग आली,  फक्त घड्याळात पाहिले पुन झोपलो. साडे तीन वाजता शेजारी गजर झाला,  पटकन जागा झालो. अंगात थोडी कणकणी होती,  जाणवले. इंन्दायणी मध्ये  स्नान करायला जायचे रद्द करून फ्रेश होऊन तयार झालो.  साडेचार वाजता सहकारी सोबत बाहेर पडलो.  माऊली मंदिर शिखराचे दर्शन घेतले,  नदीमध्ये अनेक जण स्नानासाठी उतरले होते.  नदीचा पुल पार करून पुणे रस्ता पकडला.
पालखी  सकाळी सात वाजता  आळंदीतून निघणार होता.  पहिल्या दिवशी यामध्ये जायचे नव्हते.  मी मोकळा समाजातून जायचे ठरवले होते.  रस्त्याला लागलो.


नुकताच जोरदार पाऊस पडला होता, आळंदीमधील सर्व रस्ते चिखलमय झाले होते. पहाटे  अंतर उरकते म्हणून बाहेर पडलेले वारकरी  रस्त्यावर , नदीत स्नान करण्यासाठी निघालेले वारकरी , स्नान करून बाहेर पडणारे वारकरी या सर्वाची रस्त्यावर लगबग सुरू होती. पाठीवर सॅक , डोक्यावर टोपी घालून मी चालायला लागलो. रस्त्यावर एका बाजूला पुण्याकडे जाणारे वारकरी यांचा प्रवाह तर  डावीकडे दिंड्याचे साहित्य घेऊन जाणारी अवजड वाहने,  ट्रक याची लाईन लागली होती .
झानेश्वर माऊली,  तुकोबा महाराज यांच्या नावाचा जयघोष,  राम कृष्ण हरी चे स्मरण, हाताने टाळी वाजवत वारकरी चालत होते.  रस्त्यावर खुप चिखल होता,  काही ठिकाणी पाणी पण साठले होते.  यातून मार्ग क्रमण करत वारकरी चालले होते.  एकमेकांना दाटून, आपला ग्रुप धरून जात होते,  दिंडीचे चोपदार कोणालाही रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊ देत नव्हते. अंधारात कोणी चुकून जाऊ नये,  हरवू नये म्हणून काही दिंड्यानी एल ईडी दिव्याची माळ काठीला बांधली होती. 

 अंतर उरकत होते, वारकरी चालत होते. पायात साधे चप्पल, स्लिपर किंवा साधा सॅन्डल . या चपल्यामुळे अनेकांच्या कपड्यावर, साडीवर,  धोतरावर चिखलाची रांगोळी झाली होती.  रस्त्यावर झालेल्या रबडीमुळे पाय घसरत होता,  गती कमी होत होती,  पण थांबता येत नव्हते.  एक तर बाजूला व्हा, पण तसे केले तर ग्रुप पुढे जातो,  त्यामुळे  आहे त्या परिस्थितीत वारकरी चालत होते , अंतर जवळ करत होते. 
आता साडे पाच वाजले होते, थोडं दिसायला लागले होते,  थोडं दमलो होतो , शुजचे लेस पण लुज झाले. थांबायची इच्छा झाली,  बाजूला आलो.  चहाची टपरी बघितली, खुर्ची वर जाऊन बसलो.  कटींग चहा मागितला.   आय टी दिंडीतील पाचपन्नास युवक युवती तिथे आले.  त्याची माहिती घेतली गप्पा मारल्या.  वास्तविक  या दिंडीच्या  एका व्हाॅटसअप  ग्रुपमध्ये मी वर्षभर मी आहे.  खुप चांगले लोक आहेत.
पुन्हा चालायला लागलो.  दिघी गाव आणि मिलिटरी एरिया सुरू झाला,  रस्त्याकडेला सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक  नेत्यांनी मोफत चहा, नाश्ता उपलब्ध केला होता.  काही वारकरी तेथे जात होते,  आंघोळी साठी शाॅवर पण सोय होती.  मिलिटरी  एरियातून जाताना दोन्ही बाजूला सैनिक, त्याची वाहने, त्याचा ड्रेस रूबाब पाहून खूप हेवा आणि आनंद झाला. 

 
चालत चालत अंतर बरंच कापलं होतं, अजुनही पुणे 12 किलोमीटर अंतरावर होते.  माऊलीमय वातावरण, संताची सोबत आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ लागली होती . त्यामुळे अंतर कसे पार पडले कळलं नाही. उंच  इमारती दिसू लागल्या, गर्दी झालेली होती.  रस्त्यावर बॅरीकेटस लावून वाहतूक बंद करण्यात आली होती,  वारकरी सुरक्षित जावा,  दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी खुप सुंदर नियोजन केले होते.
नऊ वाजले होते. साडे चार तास चालत होतो. बरंच अंतर पार पडले होते, आवाक्यात  आले होते. पालखी जिथे मुक्काम करते ते ठिकाण भवानी पेठ पाच सहा किलोमीटर अंतरावर होते.  मला मुक्कामाला कात्रज कोंढवाला जायचे होते,  बसची चौकशी केली.  पोलिसांनी पुढे दोन किलोमीटर खडकी जवळ बस मिळेल असे सांगितले.
येरवडा हद्दीत प्रवेश करण्या पुर्वी आंबेडकर उडान पुल,  अनेक रस्ते  एकत्र येऊन झालेला चौक लागतो,  तेथे पोहचलो.  एका छोट्या हाॅटेलात जाऊन नाश्ता केला. पुन्हा चालू लागलो.  इन्द्र धनुष्य बस सेवा सुरू होती.  बस पकडली. बारा वाजता सासुरवाडी मुक्कामी पोहचलो.

पाच तास सुमारे 27 किलोमीटर चाललो होतो,  थोडा थकलो होतो.  बातमी  लिखाण करायचे काम सुरू केले.  दिड वाजता बातमी मेल केली. जेवण झाल्यावर निवांत पडलो.
आज, उद्या गुरुवार पुण्यातच मुक्काम.









- सतीश मोरे,कराड 
  9881191302
     माऊली माऊली





 

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot.in/  


वारीतील वाढती वाहने ; नियंत्रणाची गरज
पुणे: 
पंढरीच्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे 10 हजारांहून अधिक हलकी व जड वाहने वारकऱ्यांचे साहित्य नेण्यासाठी  सोयीची असली तरी या वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि अवजड वाहनांमुळे रस्त्यावर उडणारी धूळ याचा वारकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कितीही नियोजन केले तरीही ही वाहने कोणत्या वेळेत सोडायची हा दिंडी मालकांबरोबरच पोलिस यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. धूळ आणि धूर याचा आरोग्यावर होणारा परिणाम धोकादायक असला तरीही या वाहनांना आवरणार कोण? तसेच दिंडी चालक-मालकांचीच विनापरवाना अनावश्यक वाहने अडवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालखी सोहळ्यात नोंदणीकृत अडीचशेच्या दरम्यान दिंड्या सहभागी असतात. शेकडो वर्षांपासून या दिंड्यांचे मानकरी, मालक, चालक पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. एका दिंडी सोहळ्यात 600 ते 2000 वारकरी सहभागी असतात. यामध्ये दिंडी चालक- मालक, वारकरी, टाळकरी, विणेकरी, स्वयंपाकी, तंबू उभारणारे, मदतनीस , ट्रक चालक व क्लिनर तसेच स्वयंपाक कामात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून त्यांच्या सेवेसाठी त्या दिंडीत वाहने निश्चित केली जातात. अनेक वाहने कित्येक वर्षे वारी सेवेत  आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी तंबू व इतर साहित्य, स्वयंपाक तयार करण्याचे साहित्य, गहू, तांदूळ, तेल व इतर साहित्य तसेच वारकऱ्यांच्या पिशव्या, गाठोडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू आदी वाहून नेण्यासाठी दिंडीमध्ये वाहन व्यवस्था असते.
साधारण 800 वारकरी सहभागी होणार असतील तर त्यांच्यासाठी 1 ट्रक, 1 टेम्पो, 1 पाणी टँकर (पाणी क्षमतेनुसार), 1 जीप अशी 4 वाहने लागतात. मात्र यामध्ये गरज नसताना दिंडी मालकाच्या आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या 2 ते 3 वाहनांची भर पडते. दिंडी मालक-चालकांच्या आर्थिक क्षमतेनुसार 5 लाखांपासून 25 ते 30 लाख रुपयांपर्यंतच्या अत्याधुनिक वातानुकूलित वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे. 600 वारकरी दिंडीत सहभागी असतील तर त्यांच्यासाठी 4 ते 5 वाहने पुरेशी असतात. मात्र ही संख्या 10 वर गेली आहे. आळंदी ते पुणे दरम्यान वाहने कमी असतात. मात्र सासवड ते वाखरी दरम्यान वाहनांची संख्या वाढतच जाते. 250 दिंड्यांमधे सहभागी 2 ते अडीच लाख वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वाहनांपेक्षा दुपटीने वाहने सहभागी होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
काही दिंड्यांमध्ये तर 30 ते 40 वाहने आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांची गरज आहेच. मात्र दिंडी चालक-मालक आणि दिंडीसाठी आर्थिक पुरवठा करणारे दानशूर व्यक्तिंसाठी किंबहुना स्टेटससाठी आणलेली वाहने वाढत आहेत. मुख्य पालखी सोहळ्यातील या दिंड्यांच्या सेवेसाठी ढोबळमानाने विचार केला तर सुमारे 3000 वाहनांची गरज असताना दुप्पट वाहने सहभागी होत असल्याचे लक्षात आले आहे.





वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे विस्कळीत होत असलेली वाहतूक व्यवस्था हा एक भाग आहे. याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडतो. पालखी सोहळ्यासाठी कार्यरत अत्यावश्यक असणारी वाहने पहाटे 4 ते 5.30 दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणावरून निघतात. मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेले तंबू काढण्याचे काम पहाटे 3 च्या सुमारास सुरू होते. वारकऱ्यांची लगबग याच दरम्यान असल्यामुळे त्यांच्या मुलभूत सोयीसाठी उभे असलेले पाणी टँकरवर गर्दी होते. वारकऱ्यांचे साहित्य, गाठोडी, तंबू साहित्य घेवून जाणारा ट्रक आणि धान्य वाहून नेणारा टेम्पो अथवा जीप चारच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढील ठिकाणी जायला निघतो. टाकीतले पाणी संपल्यानंतर पाणी टँकर पाचच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी नेमूण दिलेल्या ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. तेथे पाणी भरून हे टँकर पुढे दुपारच्या भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन थांबतात.
स्वयंपाकाचे साहित्य (शेगडी, गॅस, भांडी, पातेली, ताट-वाट्या आदी.) घेवून जाणारे वाहनसुद्धा याच दरम्यान निघून दुपारच्या भोजन व्यवस्थेसाठी नियोजित  ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. या वाहनांची संख्या फार मोठी असल्यामुळे पहाटे 4 ते 6 या दरम्यान पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फार मोठी लगबग सुरू असते. ही वाहने रस्त्याला लागतात. त्या दरम्यान मोकळ्या समाजातील वारकरी पहाटेच्यावेळी चालणे कमी त्रासदायक असल्यामुळे बाहेर पडलेले असतात. या वारकरी लोकांची संख्या पालखीच्या पुढे मागे  असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांपेक्षा अधिक असते. हा आकडा 2 ते अडीच लाखाचा  असतो. पहाटे  अंधारात पुढच्या वारकऱ्याकडे पाहत अंदाजे हे वारकरी मार्गक्रमण करीत असतात. डाव्या बाजूला वारकऱ्यांची मोठी संख्या आणि उजव्या बाजूला धावणारी वाहने असे चित्र असते. पहाटेच्यावेळी स्वच्छ हवा आणि ताजेतवाने शरीर यामुळे अंतर उरकण्यासाठी बाहेर पडलेला मोकळा समाज या वाहनांतून पडणाऱ्या विषारी धुरामुळे पुरता बेजार होऊन जातो. या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यामुळे वाहन कच्च्या रस्त्यावर उतरले की खूप धूळ उडते. या धुराचा आणि धुुळीचा सामना करीत वारकरी पुढे जात असतात. उजव्या बाजूला वाहने असल्यामुळे वारकरी तिकडे जात नाहीत. मात्र चालण्याचा वेग जास्त असणारे वारकरी पुढे जाण्यासाठी (ओव्हर टेक) उजवीकडील वाहनांच्या मार्गावर येतात आणि त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो.
धूळ आणि धूर या दोन कारणांमुळेच वारकऱ्यांना त्रास होतो. माऊली हरिनाम घोषात उन्ह, वारा-पावसात चाललेले अंतर वारकऱ्यांना काहीच वाटत नाही. याचा त्रासही होत नाही. मात्र वाहनांतून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी घटक आरोग्यास हानीकारक आहे. यामुळे वारीत खोकणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. धूळ आणि धुरामुळे वारकरी त्रस्त होतात. काहींना खोकला होतो. उपचारासाठी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध असतात. मात्र वाहनांची संख्या कमी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही.
पंढरीची वारी वाढत आहे, फुलत आहे. ही वारी अधिक शिस्तबद्ध होण्यासाठी प्रशासन झटत आहे. मात्र आरोग्यदायी आणि स्वच्छ वारी करण्यासाठी शासकीय यंत्रणा करीत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत. वास्तविक वारी ही चालत करायची असते.  अत्यावश्यक वाहनांची गरज आहेच मात्र मोठेपणा दाखविण्यासाठी येणारी दिंडी चालक- मालकांची वाहने कमी होण्याची गरज आहे.



स्टिकर आणि फ्लेक्स लावा आणि  घुसा
पालखी सोहळ्यातील दिंड्या सकाळी 7 ते 8 या दरम्यान निघतात. या दरम्यान काही अंतरावर पुढे सोहळ्यातील दिंडी चालक-मालक यांची वाहने 6 च्या दरम्यान मार्गक्रमण करतात. या वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. परवाना नसलेली वाहने घुसतात. काही दिंडी मालक स्वत: वाहनांवर स्टिकर लावतात. मोठ्या वाहनावर पालखी सोहळा नावाचे फ्लेक्स लावले जातात. हौस म्हणून  काही जण चारचाकी वाहने घेऊन वारी सोहळ्यात सहभागी होतात. पालखी मालकांकडून पालखी सोहळ्यादरम्यान धावणाऱ्या वाहनांसाठी परवाना दिला जातो. मात्र परवान्यापेक्षा अनधिकृत वाहने अधिक असतात, असे आढळून आले आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची? असा प्रश्न पालखी मालकांबरोबरच पोलिस यंत्रणेला पडलेला आहे. गरज नसताना सोहळ्यामध्ये सहभागी होणारी दिंडी चालक-मालकांची वाढती वाहने शोभेसाठी असतात. या वाहनांत एखादा दुसरा व्यक्ती असतो. बाकी वाहने रिकामीच धावत असतात. ही वाहने कमी झाली तर धुराचे प्रमाण कमी होऊ शकते.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...