फॉलोअर

१४ ऑक्टोबर २०२१

उत्तुंग अमिताभ बच्चन प्रेमी पत्रकार सन्मान सोहळा


 कोरोना काळात पत्रकारांचे काम कौतुकास्पद

जिल्हाधिकारी शेखर सिंह; अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने 53 पत्रकारांचा सन्मान

कराड 13 आक्टटोबर

कोरोना संकटाला संपूर्ण जगाला तोंड द्यावे लागले. या काळात माध्यमांनी सकारात्मक आणि संयत भूमीका बजावली. कोरोनाची व्याप्ती, त्याचे परिणाम, घ्यावयाची काळजी, नियम, हॉस्पिटलची उपलब्धी याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात शासन व प्रशासनाला पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केले. विशेष करून या कठीण काळात सातारा जिल्ह्यातील माध्यमांनी खूप चांगले काम केले याचे विशेष कौतुक आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
अमिताभ बच्चन प्रेमी गु्प कराड- साताराच्या वतीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोरोना योद्धा पत्रकार सन्मान सोहळा’ येथील हॉटेल अलंकार येथे बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


 यावेळी प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, अमिताभ बच्चन प्रेमी गु्पचे अध्यक्ष सतीश मोरे, उपाध्यक्ष संजय बदियाणी, जॉन्टी थोरात, सचिव जगन पुरोहित, कोषाध्यक्ष  सतीश भोंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी शेखर सिंह यांच्या हस्ते 53 पत्रकारांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. दरम्यान कोरोना काळात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल ग्रुपच्या वतीने  ज्येष्ठ सदस्य डॉ. सुभाष एरम, ज्ञानेश्वर राजापुरे यांच्या हस्ते शेखर सिंह यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बदल होत असले तरी माध्यमांचे स्वातंत्र अबाधित असल्याचे सांगून शेखर सिंह म्हणाले,  आज माध्यमांची परिभाषा बदलत आहे. प्रिंट मीडियासुध्दा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उतरत आहे. बातम्यांचे स्वातंत्र्य आहे. प्रशासनाच्या विरोधात बातम्या येतात, यामध्ये काही चुकीचे नाही. प्रशासनातील चुका दाखवून देणे हे माध्यमांचे कामच आहे. सातारा जिल्हयात काम करत असताना प्रशासनाविरोधात आलेल्या बातम्या मी नेहमी सकारात्मक अंगानेच घेऊन चुका सुधारत असतो.  

कोरोनाच्या जागतिक महामारीत माध्यमांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेष करून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी खूप चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत डॉक्टरांची मते, शासनाची भूमिका, उपचारांची सुविधा, दैनंदिन परिस्थिती याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम माध्यमांनी केले आहे.  
सातारा जिल्ह्यात दुसरी लाट ओसरली असली तरी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 650 आयसीयू बेड, 300 व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. पूर्वीपेक्षा क्षमता वाढविण्यात आली आहे. लसीकरण टक्केवारीत सातारा जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. प्रादुर्भाव कमी असला तरी लोकांनी गाफील राहू नये. तिसरा बुस्टर डोस देण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू आहे. तो किती दिवसांनी द्यायचा, कोणाला द्यायचा याबाबत अद्याप गाईडलाईन प्राप्त झालेल्या नाहीत. तिसर्‍या लाटेेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने काळजीपूर्वक करावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले. 

 

सतीश मोरे म्हणाले, अमिताभ बच्चन यांचे जीवन, त्यांचे विचार, कार्य यावर प्रभावीत होवून अमिताभ बच्चन प्रेमी गु्रपची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील लोक ग्रुपमध्ये आहेत. या वर्षीपासून राज्यस्तरीय ‘महानायक’ पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
दरम्यान यावेळी उद्योजक सलिम मुजावर, दीपक अरबुणे यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक राजेश शहा यांनी केले. स्वागत प्रमोद गरगटे, डॉ. नितीन जाधव, विनायक पाटील यांनी केले. सन्मानपत्र वाचन सुधीर एकांडे व सागर बर्गे यांनी केले. सूत्रसंचालन प्रबोध पुरोहित, मिलिंद रैनाक, संभाजी शेवाळे, अशोक मोहने यांनी केले. आभार दीपक रैनाक यांनी मानले.  

कार्यक्रमाची सुरूवात विजय पाटील यांनी गायलेल्या अग्निपथ स्तवनाने झाली. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



अमिताभ बच्चन यांचे जीवन प्रेरणादायी..
महानायक अमिताभ बच्चन यांचे जीवन प्रेरणादायी आहे. आकाशवाणीवर मुलाखत देण्यासाठी गेले असता त्यांना तुमचा आवाज निवेदकासाठी योग्य नाही, असे म्हणून त्यांना नाकारले होते. पण तोच आवाज त्यांचा लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर घेऊन गेला. सुपरस्टार म्हणून सर्वाधिक कारकिर्द गाजविणारे अमिताभ बच्चन हे एकमेव उदाहरण असेल. त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या नावे फॅन क्लब हे आजपर्यंत बातम्यांमध्येच वाचत होतो, पण कराडमध्ये त्यांच्या नावे प्रेमी गु्रप कार्यरत आहे हे पहिल्यांदाच पाहतोय. या गु्रपच्या वतीने वृक्षारोपणासह सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अमिताभ बच्चन प्रेमी गु्प कामाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...