फॉलोअर

११ जानेवारी २०२३

यात भिती कसली?


यात भिती कसली* ?

आयुष्यात अनेक चुका होतात, काही चुका सहज होतात तर काही चुका जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने होतात. काही चुका नकळत होतात तर काही कळत. कधीकधी पुढे काय होणार आहे याची जाणीव असूनही चुक केली जाते. ती चुक होत नसते तर केलेली असते. अशा चुकांमुळे शेवट निराशाजनक किंवा दुर्दैवी होतो. अशा वेळी निराश नाही व्हायचं कारण आपण स्वतः ते संकट ओढवून घेतलेलं असतं, आपण स्वतःच खड्डा खोदलेला असतो. मग स्वतःच खोदलेल्या खड्डयात पडायची कसली भिती? पडलो आहे तर पडलो, ते स्वीकारुया आणि यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग पण आपणच शोधू असा विचार करता करता आणि मग हे सुचलं. ⬆️⬇️

 *सतीश मोरे सतिताभ* 
    ११.०१.२०२२

०४ जानेवारी २०२३

आवडते त्याच ट्रेनमध्ये बसा !



तुम्हाला एखादं काम आवडतं नसेल तर ते तुम्ही करता कामा नये. ज्या विषयात रस आहे तेच काम केलं तर ते मनापासून होतं. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची, नोकरी करण्याची संधी मिळाली. 

आपले इंटरेस्ट कशात आहेत ते तुमचं तुम्ही ओळखा. नोकरी करायची इच्छा असलेला माणुस व्यवसाय करू लागला तर तो आठ तासच करतो. याउलट व्यवसायात रस असलेला व्यक्ती चुकून नोकरीत पडला तर तो तिथेही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करतो, सर्वांची मने जिंकतो मात्र तो तिथे फार काळ रमत नाही. 

सदगुरु वामनराव पै म्हणतात, तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि तुम्ही कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीत बसला तर तुम्ही पुण्याला पोहोचू शकणार नाही किंवा लांब मार्गाने खूप उशिरा पोहोचणार. त्यासाठी पुण्याला जायचं असेल तर पुण्याला जाणाऱ्या एसटीतच बसले पाहिजे, ती एसटी तुम्हाला थेट पुण्याला नेऊ शकते. तुम्हाला हवं त्या मार्गाला जायचं असेल तर त्यादिशेकडेच पाहिलं पाहिजे आणि त्यावरच आपल्या लक्ष केंद्रित केले पाहिजे

म्हणून शक्यतो आवडीचे काम निवडा, शाखा निवडा. त्यातच करीयर करा. ज्या गावाला जायचं नाही त्या गाडीत बसायचं नाही या आशयाचं मेरीमी विलिंमसन यांचं एक इंग्रजी सुवचन आहे, If a train doesn't stop at your station, it is not your train. त्यामुळे तुम्हाला आवडते त्याच ट्रेनमध्ये बसा. 

सतीश मोरे सतिताभ
०४.०१.२०२३

०३ जानेवारी २०२३

व्यक्त व्हा पण कुठेही नको !


आपल्या अडचणी किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीतरी एक हवा असतो, त्याचा आपण शोधही घेत असतो. आजच्या काळात आपलं मन मोकळं करण्यासाठी असा एखादा व्यक्ती शोधताना मात्र काळजी घ्यायला हवी. 

जो कोणी आपल्या अडचणी सोडवू शकतो, ज्याला आपल्या समस्यांवर उपाय माहित आहे किंवा जो कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो आणि आपण त्याला शेअर केलेलं त्यांच्या पुरतेच ठेवेल, अशाच व्यक्ती समोर व्यक्त व्हा. अन्यथा कुठेही मन मोकळं करू नका. कारण अनेक जण तुमच्या दुःखाचा बाजार करायला बसले आहेत. 

दुःख आणि समस्या व्यक्त करण्यासाठी एक तात्पुरता पण रामबाण उपाय आहे, तो म्हणजे स्वतःला छंदाच्या 'वेडा'त बांधून ठेवणं. मस्त पैकी गाणी ऐकणं, गाणी म्हणणं,सिनेमा पाहणं किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एकटं राहणं. दोन तीन तासांच्या चित्रपटात तुम्ही जग पाहून तर येताच, दुःखही विसरता, काही क्षण हसताही. चित्रपटातील 'जब तक जिंदगी है, तब तक मरना नहीं ' या सारखा एखादा संवाद तुम्हाला मार्गही दाखवेल. निसर्ग तर तुम्हाला खुप काही शिकवतो. फुले हसायला शिकवतील, झाडं द्यायला, नद्या सतत प्रवाही रहायला तर डोंगर उंच स्वप्न पहायला. प्राणी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला. तर मग करा एकदा प्रयत्न ! 

सतीश वसंतराव मोरे
०३.०१.२०२३

०९ डिसेंबर २०२२

पियुष ... क्षितिज तुझी वाट पाहत आहे.!

# *पियुष* ...

हे सारं लिहीत असताना डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत. अश्रू खारट असतात खरं, पण दुःखाचे अश्रू आणि आनंदाचे अश्रू यात एक फरक असतो. दुःखाचे अश्रू वाहतात, आनंदाचे अश्रू टपकतात, एक एक करून हळूच बाहेर पडतात. मन भरून आनंदाला उधाण आणतात, हर्षवायूला वाट मोकळी करून देतात. आज हेच आनंदाश्रू तरळले आहेत माझ्या डोळ्यात !

तु अमेरिकेला निघाला आहेस, शिकायला, शिकत शिकत कमवायला. हा आमच्या समस्त मोरे कुटुंबियासाठी, करवडी गावातील मोरे भावकीसाठी गर्वाचा क्षण आहे. अमेरिकेत जाऊन तु खुप शिकावं, तुझ्या क्षेत्रातील नवीन कला हस्तगत करून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावीस, अशा तुला खुप खुप शुभेच्छा !

पत्रकारांचा मुलगा पत्रकार व्हावा असं खुप कमी लोकांना वाटते. सुरूवातीला मलाही तसंच वाटलं होते. पुढे इतरांप्रमाणे मलाही तु डाक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ व्हावंसं वाटलं. पण अकरावी वेळी माझ्या बाबतीत जी चुक झाली होती ती तुझी होऊ नये असं वाटलं. *"ज्या क्षेत्रात ज्याला रस आहे तिथेच त्याला नोकरी किंवा काम मिळाले, तेच त्यांचे करियर झाले तर त्यासारखा सुखी या जगात कोणीही नसतो,"* या आशयाचे एक सुवचन मी बारावीच्या पुस्तकात शिकले,वाचले होते. तु तुझा मार्ग स्वतः निवडावा, त्या क्षेत्रात तु शिकावं,असा सल्ला मी दिल्यानंतर तु तुझी वेगळी वाट निवडली. हाँटेल मॅनेजमेंटच करायचे ठरवून पुण्यात ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षे डिग्री पुर्ण करुन तु आता पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला निघाला आहेस, हा अतिशय सुंदर असा क्षण आहे.

 *तुझ्या सोबत मी कायम आहे,असणार आहे* जसे माझ्यासोबत माझे दादा आहेत. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही असे म्हणतात, पण बापाच्या हृदयात मुलांसाठी फार मोठी जागा असते, कदाचित आईपेक्षाही अधिक, हे तितकेच खरं. भावनेच्या बांधात बांधून मी तुला गुंतवून ठेवणार नाही पण एवढंच सांगेन *तु निवडलेलं क्षितीज फार मोठ्ठं आहे. तुला त्या कक्षेत तुझी जागा निर्माण करायची आहे.* अशक्य असं काहीच नाही कारण तुझी आवड तुला खुणावत राहणार आहे, गप्प बसू देणार नाही.

नव्या देशात,नव्या प्रांतात तु निघाला आहेस. तिथं नवीन शिकताना तुला अनेकदा अपमानाला, रागाला, नावडत्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल, सामोरं जावं लागेल. पण ती एक परिक्षा असणार आहे आणि त्यात तु नक्किच यशस्वी होशील.

मला सर्व काही समजते, मी सर्वश्रेष्ठ आहे असं न म्हणता आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहीलं की नवीन शिकताना त्रास होत नाही. महानायक अमिताभ बच्चन अजूनही त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या दिग्दर्शकांचं ऐकतात. ते म्हणतात, 'मला काहीतरी नवीन करायचं आहे, मला काम द्या.' तुलाही शिकायला खुप संधी मिळणार आहेत. तु शिकत रहा. तुझ्या क्षेत्रात पुर्ण रस घेऊन त्यात प्राविण्य मिळवं. 

बाप्पा मोरया, कुलस्वामी शिखर शिंगणापूर, ग्रामदैवत जानुबाई आणि अखंड कृष्णामाई यांची कृपा तुझ्यावर आहेच,राहील.‌ सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांची शिदोरी तुला प्रेरणा देत राहील.

आणि हो.. *महत्वाचे माझ्या कडून अपेक्षांचं कसलंही ओझं तुझ्यावर असणार नाही.* एक चांगला माणूस म्हणून तु यशस्वी होशील, ही खात्री आहे . लव यु बेटा !

Success is achieved and maintained by thse who try and keep on trying with The Positive Mental Attitude.  Best of luck 👍

@..... *पप्पा* 

२.३० मध्यरात्री.
१०.१२.२०२२ मुंबई.

०७ डिसेंबर २०२२

लोहार माझा गुरू

_लोहार...माझा गुरू !_ 

गुरुदेव श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले असे म्हणतात. त्यातील एक गुरु लोहार होता. श्री दत्तात्रयानां एकदा एक विलक्षण दृष्य दिसले. लोहाराचे काम करणारा एक माणूस अत्यंत तल्लीन होऊन काम करण्यात इतका रंगून गेला होता की, त्याच्या जवळून एक मिरवणूक वाजत गाजत गेली तरीसुद्धा त्या लोहाराचे लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलेच नाही किंवा त्या आवाजाने त्यामुळे लोहाराचे चित्त जरा सुद्धा विचलित झाली नाही. लोहाराची ती एकाग्रता व काम करण्यातील तल्लीनता पाहून तो लोहार गुरु करण्यास योग्य आहे, असे श्री दत्तात्रयांना वाटले.

तल्लीन होऊन काम करणाऱ्या त्या लोहाराची लागलेली कर्मसमाधी ही गुहेत बसून किंवा जंगलात बसून योगसमाधी लावणाऱ्या योग्यापेक्षा सहस्त्रपटीने श्रेष्ठ होय, असा *सद्गुरू वामनराव पै* आणि जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. 

 *श्री दत्तात्रय जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !*

२१ नोव्हेंबर २०२२

आवाहन

*आता फक्त 100 अन्नदात्यांची गरज आहे !* 

माऊलीनो नमस्कार,

आपणास माहीत आहेच की 23 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या आदल्या दिवशी कोळे येथील अनाथ आश्रमाला भेट दिल्यानंतर या अनाथाश्रमाला 365 अन्नदाते मिळवून देण्याचा अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने मी संकल्प केला होता. 

कोळे येथील जिजाऊ अनाथ आश्रम हे समीर नदाफ चालवतात. *महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे नोंदणीकृत* असलेल्या या आश्रमामध्ये तीन ते चौदा वयोगटातील 32 मुले मुली आहेत.नदाफ दांपत्य या मुलांचा सांभाळ करतात. त्यांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होतो ते रात्री अकरा पर्यंत हे दांपत्य या मुलांच्या सेवेत असतात. अतिशय कष्टाने व जिद्दीने उभारलेल्या या अनाथाश्रमासाठी समाजातील अनेक घटक मदत करत असतात.

 *या 32 मुलांचा रोजचा दोन वेळच्या जेवणाचा तसेच चहापाणी नाश्त्याचा खर्च सुमारे पंधराशे रुपये आहे.* हा खर्च त्यांना मिळाला तर या दांपत्याला पैशासाठी भटकत राहावे लागणार नाही, असा विचार आल्यानंतर 365 अन्नदाते शोधण्याचा मी प्रयत्न केला. समाजामध्ये असलेल्या तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या प्रेमामुळे मला अतिशय चांगले यश आले आहे. समाजातील अनेक घटकांनी, अगदी मुंबई पुणे येथील कराडवासीयांनी मला फोन करून या उपक्रमात सहभागी नोंदणी होण्याची इच्छा व्यक्त केली. *265 एवढे सदस्य आता या दानशूर अन्नदात्यांच्या यादीमध्ये सहभागी झाले* आहेत. 

आपणही या योजनेत सहभाग घेऊ शकता. सहभागी होण्यासाठी मला फोन करा. मी आपलं नाव या संबंधी तयार केलेल्या एका ग्रुपमध्ये घेईन. आपण पंधराशे रुपयेची मदत समीर नदाफ यांच्या गुगल पे नंबर 8459883401 वर पाठवून द्यावी.

आपणही मदतीसाठी आपला हात पुढे करावा, ही विनंती.

 धन्यवाद

सतीश वसंतराव मोरे
9881191302

१८ नोव्हेंबर २०२२

समजुन घेताना कमी पडशील का?




तुझ पाहताना तुझ पहावस वाटतं.!!
हे वेड मनातल थोडसंच, जपाव वाटतं 

नजर शोधीशी मज, तुझ भोवती.!
हुरहुर हि मनीची,नाजूक वळणावरती.!

तुझिया नजरेत, जपावे कि लपवावे ?
अबोल मनाचे संकेत, न सांगताच का तुला कळावे?

असे ही हुरहुर, मनाची नात्याची.!!
नात तुझं माझं अनोख ते नवं.!

वाटत तु अवखळ वादळी पाऊस..
तर, मी वाऱ्याची  मंद  झुळूक ,
तु पावसाचा बसणारा थेंब ,
तर, मी बंद पेटतील मोती !

जाणीव होते जेव्हा सत्याची, 
मग वाटतं
निखळ मैत्रीसारखं नातं आपलं असावं !
दूरपर्यंत जपता येत असेल, तर आणि तरच पुढे जावं!!

न सांगताही काही गोष्टीं तुला उमगतील का.??
समजुन घेताना तुही 
कुठे कमी पडशील का?? पडशील का ?

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...