फॉलोअर

०९ जुलै २०१९

माझी वारी

राम कृष्ण हरी,

वेळापूर ते भंडीशेगाव असा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी माऊलींची पालखी सकाळी निघाली. वेळापूर हे अंतर 18 किलोमीटर आहे, हा टप्पा महत्त्वाचा यासाठी म्हटले आहे कारण या टप्प्यात वारकऱ्यांना 2 प्रमुख सोहळ्यातील अनेक वारकरी भेटतात, अनेक दिंड्या भेटतात. ज्ञानोबा माऊली तुकोबाराय सोपानदेव या तिन पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि वारकरी एकत्र येण्याचा आजचा दिवस होता.

11 वाजण्याच्या सुमारास बोंडले येथे सोपानदेव काका यांची पालखी पोहोचले, त्यानंतर काही तास नंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी या मार्गावर आल्यानंतर हा मार्ग फुलून गेला. तत्पूर्वी माऊली पालखी सोहळ्यातील मोकळ्या समाजातील वारकरी या मार्गावर पुढे मार्गक्रमण करत होतेच. तोंडले-बोंडले येथे सोपानकाका आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन रथ जवळून गेले,दोन बंधू एकमेकांना भेटले आणि हा क्षण टिपण्यासाठी वारकरी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष केला. मोठ्या आवाजात माऊली माऊली असा जयघोष झाला.

त्यानंतर आम्ही दुपारच्या भोजनासाठी विसाव्यासाठी आमच्या कराडकर दिंडी कडे मार्गक्रमण केले.पंढरीच्या वारीत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यात असणाऱ्या सर्व दिंड्या आणि या दिंड्यांचे मुक्कामाचे ठिकाण ठरलेले आहे.
प्रत्येक दिंड्यांचा दुपारच्या जेवणाचा विसावा कुठे असतो हे ठिकाणी ठरलेले आहे, एवढेच नव्हे तर दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी जेवणात काय मेनू असावा हेही काही दिंड्यांमध्ये पद्धती ठरलेले आहेत. कराडकर दिंडी नंबर 12 येथे तोंडले-बोंडले याठिकाणी दुपारच्या जेवणावेळी गेल्या 36 वर्षांपासून चकुल्या हा पदार्थ केला जातो. चकुल्या हा महाराष्ट्रातला अतिशय आवडता पदार्थ आहे. वारकरी चुकल्याचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. खूप दिवसानंतर आज चकुल्याचा स्वाद घेतला, भरपेट जेवलो.

तोंडले-बोंडले या गावापर्यंत आळंदी ते पंढरपूर हा जो महामार्ग आहे या मार्गाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असे नाव आहे. मात्र तोंडले-बोंडले मध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी या महामार्गाला येऊन मिळते तिथे या महामार्गाचे नाव बदलते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्ग असे या महामार्गाचे नामकरण होते. हे पाहताना महाराष्ट्रातील हे दोन दिग्गज ज्ञान संत एकाच मार्गावरून चालत असल्याचा भास होतो.

संत तुकाराम महाराज आणि सोपान काका यासहित अनेक पालख्या तोंडले-बोंडले येथून पुढे गेल्यानंतर मगच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रस्त्यावरून पुढे जाते. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुमारे एक लाख तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दिड लाख वारकरी सहभागी असतात या दोन्ही पालखी सोहळ्यात मिळून तितकेच खुल्या म्हणजेच मोकळ्या समाजातील वारकरी असतात असा मिळून हा आकडा साधारण साडेपाच सहा लाखांवर पोहोचला आहे.  त्यातच लहान-मोठ्या गावातून येणाऱ्या सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातील पालख्या हळू या मार्गावर येतात आणि हा आकडा सात लाखांवर पोहचतो, त्यामुळे तोंडले-बोंडले नंतर पालखी महामार्ग म्हणजे ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज यांचा नामाचा महासागरच बनलाय असे चित्र आहे.

भंडीशेगाव येथे पालखी तळावर आज गर्दी फुललेली होती हवा वाहत होती, भंडी शेगाव ग्रामस्थांनी माउलींच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. मात्र संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे जात नाही. तोपर्यंत माऊलींची पालखी येत नाही त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माऊली येणार नाहीत अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे पालखीतळावर फेरफटका मारायला निघालो. पालखीतळावर गेल्या तीन वाजेदरम्यान एक हमखास व्यक्ती आम्हाला भेटते, ते म्हणजे पोलीस कीर्तनकार विठ्ठल माने. तळावर आत गेल्यानंतर पाहिले विठ्ठल माने यांचे कीर्तन सुरु होते.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक आयपीएस मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या माऊलींच्या सोहळ्यांमध्ये वारी नारी शक्तीची  असा एक रथ तयार केला आहे. या रथामध्ये पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. दिंडीच्या मार्गावर हे पोलीस मार्गदर्शन करतात या पथकात कृष्णा चव्हाण सुरेश कांबळे रमेश ठोंबरे सुरेश माने अतुल सुरवणे हेही पोलीस सहभागी आहेत. या पथकामध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार विठ्ठल माने हे कीर्तनकार आहेत. पोलिसांच्या या किर्तनाला वारकरी फार प्रतिसाद देतात. एक पोलीस तोही किर्तन करतो याचे लोकांना अपूर्व वाटते. विठ्ठल माने यांना यांच्याशी  बातचीत केली.

माऊलींची पालखी रात्री सायंकाळी साडे आठ वाजता बंडीशेगाव येथे मुक्कामाला पोहचले तर संत तुकाराम महाराजांची पालखी सुरुली येथे मुक्कामाला पोहचली, खूप उशीर झाल्यामुळे रात्री दहापर्यंत रस्ते माऊलींच्या गर्दीने फुलून गेले होते. आता भंडी शेगाव येथे कराडकर यांच्या दिंडीमध्ये जेवायला थांबले तर मुक्कामाच्या ठिकाणी जायला आणखीन वेळ होईल म्हणून आम्ही पुढे चालायला निघालो.

आज आमचा मुक्काम भंडी शेगाव येथील एका मित्रांच्या शेतावर होता, अर्बन बँकेतील महेश शिंदे यांचे क्लासमेट मारुती गीते गिड्डे यांच्या शेतावर मी रात्री उशिरा मुक्कामाला पोहोचलो. हे फार्महाऊस म्हणजे चारी बाजूला डाळिंबीची बाग आणि मध्ये शेतातील घर. या घरात निसर्गाच्या सान्निध्यात माउलीने आमची व्यवस्था केली होती.

मुक्कामाला पोहचण्यापूर्वी आज जेवायचे कुठे हा प्रश्न होता. रस्त्याला कुठे  हाँटेलात झुणका-भाकर मिळते का याचा मी शोध सुरू केला. एका ठिकाणी झुणका-भाकर चे हॉटेल आहे समजून आम्ही गेलो तर ती बीडमधील एक दिंडीचा छोटा टेम्पो होता. त्यांना आम्ही जेवायला मिळेल का असे विचारले त्यावेळी त्यांनी अहो माऊली आमची दिंडी आहे, हाँटेलात नाही. तुम्ही आमच्याकडे जेवा असा आग्रह करून आम्हाला जेवायला वाढले. अतिशय आग्रहानी आम्हाला झुंणका भाकर खायला दिले. माऊलीच्या सोहळ्यातील कोणी उपाशी राहत नाही हे आम्हाला माहिती आहे. गेले
तीन वर्षे मी तो अनुभव घेतो आहे. मात्र मला स्वतःला कुठे जेवायला जाण्याचा अशी वेळ आली नव्हती.आजवर कराडकर यांच्या दिंडी मध्ये जेवणाची व्यवस्था होती.आज मात्र एक वेगळा अनुभव आला. माऊलींनी आमची व्यवस्था केली, आम्हाला पिठलं भाकरी खायची इच्छा झाली होती त्यासाठी आम्ही हॉटेल शोधत होतो मात्र एका दिंडीमध्ये माउलीने आम्हाला जेवणाची व्यवस्था केली,तिथेही आम्हाला खायला पिठले भाकरीच मिळाले .एक वेगळा योगायोग आणि अविस्मरणीय असा क्षण होता तो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली माऊली!
😌जय माऊली😌
माऊली सतीश मोरे

Also available at
karawadikarad.blogspot.com

०८ जुलै २०१९



राम कृष्ण हरी,
पंढरीची वारी आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली पोहोचली आहे. आज सोमवारी माऊलीचा मुक्काम वेळापूर येथे आहे. उद्या भंडीशेगाव, परवा वाखरी आणि त्यानंतर पंढरपूर. अजून तीन मुक्काम आणि पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी माऊली पंढरपुरात पोहोचणार आहेत.

सोमवारी सकाळी माऊलींची पालखी माळशिरस चा मुक्काम वेळापूरला जायला निघाली. 5 कि. मी.  आल्यानंतर लगेच खुडूस नावाचे गाव आहे, याठिकाणी पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण झाले. त्या नंतर नेहमीप्रमाणे वारकर्‍यानी उडीचे खेळ खेळले.

आता वारकऱ्यांना वेध लागले आहेत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचे! वारकरी चालत आहेत. विसाव्याच्या ठिकाणी बसल्यानंतर चर्चा रंगतात. किती मुक्काम झाले, किती राहिले, उद्या कुठे असणार परवा कुठे असणार याची चर्चा रंगू लागली आहे. लोणंद सोडल्यापासून वारकऱ्यांना उन्हाचा खुप त्रास होत आहे. पुणे ते लोणंद पाऊस होता. पावसाळी वातावरण होते त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. थोडाफार त्रास झाला तो चिखलाचा मात्र लोणंद नंतर आता गेल्या आठ दिवसात ऊन पडले आहे. त्यातच रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा धूराचाही त्रास होत आहे

माळशिरस सोडल्यानंतर कडक ऊन पडले होते, या उन्हात चालताना तहानभूक हरवलेले वारकरी माउलींच्या नामाचा जयघोष करत होते. मात्र  थकून काही वारकरी झाडाखाली आराम करत होते. खडूसचे रिंगण संपल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी, जेवणासाठी थांबले. त्यावेळी अचानक वारा सुरू झाला, जोरदार हवा  येऊ लागली. धुळीचे कण वारकऱ्यांच्या ताटात येऊ लागले. जेवताना वारकऱ्यांचे चांगली दैना झाली. काही दिंडीमध्ये स्टील ताटाची सोय केलेली होती. ते वारकरी ताट घेऊन उचलून निवांत ठिकाणी गेले. मात्र पाऊस नव्हता केवळ वाराच होता. काहींच्या पत्रावळ्या उडून गेल्या. वारा आला मात्र पाऊस काय आला नाही.
पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला. आता वेळापूर जवळ आले होते. वेळापूरच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर धावा आहे. धावत जायची उताराची जागा.या उतारावरून चालत असताना तुकाराम महाराजांना विठ्ठलाचे मंदिराचे कळसाचे दर्शन झाले होते,अशी वारकऱ्यांची भावना आहे.
तुका म्हणे धावा I पुढे आहे विसावा II
असा एक अभंग प्रचलित आहे. तुम्ही धावत धावत विठ्ठलाकडे जा.लवकरच तुम्हाला विसावा मिळणार आहे म्हणजे  तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन मिळणार आहे. विठ्ठलाचे दर्शन मिळाल्यानंतर तुमची तहान भूक, चालून चालून आलेला थकवा सर्व संपणार आहे, असे या अभंगातून तुकाराम महाराजांना सांगावयाचे असेल. वारकरी धावत होते, काहीजण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. हा क्षण टिपण्यासाठी विविध चॅनलचे प्रतिनिधी रस्त्याकडेला उंचावर बसले होते. धावा संपल्यानंतर वेळापूर मध्ये रात्रीचा मुक्काम झाला.वेळापूरमध्ये रस्त्याकडेला एक प्राचीन तळे आहे.त्याला बकासुराचे तळे म्हणतात. भीमाने बकासुराचा वध वेळापूर नजीक एका गावात केला होता. ज्या बकासुराला रोज खायला गाडाभर अन्न लागायचे, बकासुर ते अन्न खाल्ल्यानंतर या तळ्यामध्ये पाणी प्यायचा, असे येथील लोकांनी सांगितले.



आजच्या प्रवासात खूप वारकरी भेटले. झाडाखाली बसलेले वारकरी गावाकडची चौकशी करत होते. पाऊस पडलाय का? पेरणी झाली का ?ऊस किती उगवला आहे? सारे ठीक आहे का ?आहे आई वडिल कसे आहेत? मुलं कशी आहेत ?याची माहिती घेत होते. वारी आता डिजिटल झाली आहे. मोबाईलवरून वारकरी गप्पा मारत आहेत. व्हिडीओ कॉलिंग लावून मुलाबाळांशी बोलणारे वारकरी पहायला मिळाले.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली माऊली ! माऊली माऊली !

Also available at
karawadikarad.blogspot.com

०६ जुलै २०१९

माऊलींच्या कृपेने पंढरीची वारी अतिशय सुंदर चालू आहे. पंढरीच्या वारीमध्ये सर्वात काय महत्वाचे असेल तर तडजोड. वारीमध्ये सर्व काही मिळते. वारीमध्ये फक्त आपला भाव चांगला असला की सर्व गोष्टी उपलब्ध होऊन जातात. माझी ही चौथी वारी आहे. वारीला जाताना करावयाची वस्तुची तयारी फार मोठी नसते. जाताना  फार सुख सुविधा घेऊन जाण्याची गरज नसते, घेऊन जायचे असतो ते फक्त शुद्ध आणि पवित्र मन. तिथे गेल्यावर सर्व गोष्टी आपोआप मिळत राहतात. खाण्यापिण्याची तर बिलकुल चिंता नसते. गरज असते फक्त तडजोडीची. जो कोणी तडजोड करू शकेल त्याला वारी सोपी असते. यावर्षी वारी करताना खूप गोष्टी सहज होत गेल्या आणि अधिकाधिक आनंद मिळत गेला. माऊलीची कृपा !


नातेपुते मुक्कामी आल्यानंतर राहण्याची उत्तम सुविधा झाली गेली. गेली चार वर्षे नातेपुते मुक्काम सोय राहुल खोचीकरांचे मामेभाऊ मंगेश दीक्षित यांच्या घरी होते. दीक्षित कुटुंबासारखी प्रत्येक गावात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरी वारकरी मुक्कामाला असतात.काही घरांमधील वारकरी ठरलेले आहेत,गेली अनेक वर्षे त्यांच्याच घरात उतरतात . काही वारकरी एखाद्याच्या घराच्या बाहेर जाऊन, माऊली आजची रात्र येथे काढू का अशी विनंती करतात. बहुतांशी हे वारकरी समाजातील असतात.दारात आलेल्या वारकऱ्याला कोणीही बाजूला जा असं सांगत नाही. अशा अनेक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना त्यांना निवारा देण्यासाठी वारी मार्गावरील गावात भक्तिभाव फुलून वाहत असतो. वारीचा मुक्काम जेव्हा एखाद्या गावात असतो त्या अगोदरचा दिवस आणि तो दिवस ही गावे भक्तिभावाने फुलत असतात. कुणाच्या घरात त्यांना येऊ नका असे म्हटले जात नाही. घराच्या दारात, पार्किंग मध्ये, अंगणात कुठेही जागा मिळेल तिथे वारकरी विसावतात, ती रात्र काढतात आणि पहाटे निघून जातात.  संबंधित जागा मालकाच्या कोणत्याही वस्तूची मोडतोड केली जात नाही अथवा कुठलीही वस्तू कोणी न विचारता हात लावत नाही. वारकरी फक्त बाथरूम पाणी आणि ती जागा वापरतात. जाताना ती जागा स्वच्छ करून जातात. सेवा करण्यात दीक्षित यांच्या कुटुंबासारख्या अनेकांना खूप आनंद वाटतो. वारकऱ्यांच्या सेवेसाठी काही कुटुंबे चहापाणी देतात, काहीजण जेवणाची व्यवस्था करतात .मोकळ्या समाजातील अनेक वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशी कुटुंबे आहेत म्हणून माऊली सोहळ्यातील दिंड्यांमधील वारकरीपेक्षा अधिक संख्येने असलेल्या मोकळा समाजातील वारकऱ्यांसाठी वारी सुसह्य होत जाते. दीक्षित कुटुंबीयांनी आमचे अतिशय सुंदर व्यवस्था केली. नातेपुते येथे भेटायला अमोल चव्हाण सहकुटुंब आले होते, सोबत आमच्या सौ. आणि लेक देवयानी आली होती. देवयानीने मला भेटल्यानंतर कडकडून मिठी मारली. रात्री जाताना तिला मला सोडवत नव्हते, मला तिला सोडवत नव्हते. खूप वेळ पप्पांच्या  मिठीत सामावली होती ती! तिच्यासाठी नातेपुते यात्रेत छोटीशी खरेदी केली.  छोटीशी खरेदी केल्यानंतरही देवयानीच्या डोळ्यात वाहणारा आनंद खूप मोठा आनंद होता.

नातेपुते गावात अतिशय प्राचीन हेमाडपंती गिरिजात्मक शिव शंकर महादेव मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. या मंदिराविषयी  लिहिता येईल थोडी कमी आहे. उंचावर असलेले अतिविशाल असे हे हे मंदिर सुद्धा शिखर शिंगणापूर प्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या मालकीचे आहे. मंदिराच्या शेजारी बळी मंदिर आहे बळी मंदिराच्या समोरच शनी मंदिर आहे. याबाबत पुढारी ऑनलाईन साठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे, आपण अवश्य पहा. हे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही माळशिरस दिशेने मार्गक्रमण केले. माळशिरसच्या  रस्त्याच्या दुतर्फा हिरवेगार वडाची, पिंपळाची झाडे आहेत, या झाडाखाली वारकरी आराम करतात. ही झाडे म्हणजे अनेक वर्षापासून वारकऱ्यांसाठी निवारा आहेत .नातेपुतेत कराड तहसिलमध्ये  काम केलेल्या रमा जोशी भेटल्या. रमा जोशी आत्ता  ग्रामीण सोलापूर मध्ये तहसिलदार आहेत. त्यांच्याकडे वारीचा चार वर्षाचा अनुभव आहे. प्रशासकीय सेवेतील लोकांना माऊली मुक्कामाच्या ठिकाणी येणे अगोदरचे 10 दिवस फार काम करावे लागते. हे काम हे अधिकारी सेवा म्हणून करतात. महसूल, जिल्हा परिषद ,आरोग्य, वीज कंपनी, पोलीस आदी अनेक खात्यातील लोक  वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी रात्र दिवस झटत असतात. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कनिष्ठ कर्मचा-यांपर्यंत सर्वजण झटून काम करतात. माऊलीचे काम करतात .वारकऱ्यांची सेवा म्हणजे आईवडिलांची सेवा म्हणून हे लोक काम करतात. त्यांच्या  मनातील सेवाभाव भरून वाहत असतो.  संबंधित गावात 2 दिवस दोन ते तीन लाख लोक येतात ,त्यांची राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय विज, पार्किंग आधी सर्व विषयावर  सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून काम होत असते. गेल्या काही वर्षात वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या वतीने वारीसाठी वेगळा निधी दिला जातो. विविध खात्यातील 24 तास झटणाऱ्या या शासकीय कर्मचारी, अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे वारी सहज होत जाते हे सुखद सत्य आहे.रमा जोशी यांनी केलेल्या मनोभावे सेवेमुळे त्यांना यावर्षी सदाशिवनगर पुरूंदावडे रिंगण, खडूस रिंगण आणि वाखरी रिंगण तसेच पालखी तळाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याशी गप्पा मारल्या.

नातेपुते ते माळशिरस दरम्यान सदाशिवनगर येथे होणारे या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण असते. हे रिंगण पाहण्यासाठी सोहळ्यातील वारकऱ्यांनाबरोबरच स्थानिक भाविक खूप गर्दी करतात. खरेतर रिंगण हा सोहळा फक्त पाच मिनिटाचा असतो मात्र त्याची तयारी फार मोठी असते. पुन्हा ही सर्व जबाबदारी पोलीस खात्यावर येऊन पडते. एकाच ठिकाणी हजारो लोक येणार, त्यांची सोय आणि त्यांची सुरक्षा याचा विचार करून पोलीस खाते संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने खूप प्रयत्न करत असते.गेली अनेक वर्षे सदाशिवनगर येथील कारखान्याच्या ग्राउंड वर हे रिंगण होत होते. त्यामुळे सदाशिवनगरचे गोल रिंगण या नावाने ते प्रसिद्ध होते. कारखान्याच्या आसपासच्या इमारती वाढत गेल्या आणि वारकऱ्यांची संख्या ही हजारावरुन लाखावर पोहचली,त्यामुळे कारखान्याची जागा अपुरी पडू लागली. दोन-तीन वर्षांपूर्वी ही जागा बदलून कारखान्यापासून पुढेच पुरंदावडे या गावात गोल रिंगण होते. हे रिंगण पाहण्याचा आनंद आम्ही लुटला.एका अश्वावरती माऊली बसलेले असतात आणि दुसऱ्यावरत शितोळे सरकारचा प्रतिनिधी बसलेला असतो. माऊलींचा घोडा आणि शितोळे सरकार यांचा अश्व गोल धावतात आणि जेव्हा माऊलींचा अश्वाबरोबर सरकारांचा अश्व धावतो तेव्हा  रिंगण पूर्ण होते.  रिंगणानंतर ज्या मार्गावरून अश्व धावला आहे त्याच्या पायाखालची माती कपाळावर लावण्यासाठी वारकरी पुढे येतात, वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. तत्पूर्वी रिंगण संपल्यानंतर उडीचे खेळ खेळले जातात. हे खेळ पाहण्याचा एक वेगळा आनंद आणि अनुभव असतो. माऊलींची पालखी रिंगण स्थळावर मध्यभागी ठिकाणी ठेवली जाते. या पालखीच्या गोलाकार वारकरी एका रांगेत बसतात आणि सुरु होतो राम कृष्ण हरी नामाचा जप. सोबत ताल मृदुंग यांचा नाद! या वारकऱ्यांच्या मधोमध चोपदार उभे राहून सुचना देतात. चअर्धा तास हा खेळ चालू असतो. उड्या मारण्याचा  खेळ हा झाला याचा साधा सोपा अर्थ !थकलेल्या, दमलेल्या वारकऱ्यांना मनोरंजन होण्याच्या दृष्टीने हे खेळ खेळले जातात. विणेकरी टाळकरी  या खेळात सहभागी होतात. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या माऊली या खेळात गोल धावतात तेव्हा सारेजण माऊली माऊली माऊली माऊली असा जयघोष करतात. वेगळाच आनंद असतो या खेळामध्ये.

पुरंदावडे रिंगण आटपून आम्ही पुढे निघालो.  माळशिरस च्या अलीकडे एका ठिकाणी माझी बहीण दाजी सहकुटुंब आले होते,  माझे वडील दादापण आले होते, त्यांना भेटलो. माळशिरसच्या चौकात कराडच्या तेली गणपती चौकातील कार्यकर्ते वारकऱ्यांना लाडू वाटत होते. आपल्या कराडमधील अनेकजण भेटल्यामुळे खूप आनंद झाला. जगन पुरोहित यांनी कडकडून मिठी मारली. रात्रीचा मुक्काम माळशिरस येथील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे यांच्या घरी होता.वारीतील आमचे तीन मुक्काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचओळखीच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहेत.  जेजुरीत संघाच्या संघाच्या एका स्वयंसेवकांच्या  पेशवे यांच्या घरी होतो, पुढे अशाच एका स्वयं संलकावतीने  माळशिरस येथे आमची सोय करण्यात आले होती.माळशिरसच्या अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर आम्ही वाघमोडे यांना फोन केला.चौकातच त्यांचे छोटेखानी ऑफिस आहे तेथे त्यांना भेटलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. वास्तविक वाघमोडे आणि आमची कसलीही ओळख नाही. आमच्या मुक्कामाची व्यवस्था त्यांच्या घरी ज्यानी केली आहे त्यांचीही कसली ओळख नव्हती.काही पत्रकार मित्र तुमच्याकडे मुक्कामी येणार आहेत त्यांची सोय करा, असा त्यांना फोन आला. एका फोनवर कसलीही ओळख नसताना आमची राहण्याची सोय  करण्यासाठी पांडुरंग वाघमोडे तयार झाले होते. कारण यामागे होती भाजप पक्षाची निष्ठा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क. या नेटवर्क बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहीत अनेकानी कौतुक केले आहे,त्यामुळे मी केलेले लिखाण कोणीही राजकीय समजू नये, ही कृतज्ञता व्यक्त आहे.

माळशिरसच्या पुढे दोन किलोमीटर असलेल्या 60 वस्ती चौकात वाघमोडे यांचे घर आहे. या ठिकाणी वाघमोडेंची वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. 60 वस्ती हे नाव कसे पडले याचा इतिहास त्यांनी सांगितला. ब्रिटिश कालीन बंधाऱ्यातून माळशिरस तालुक्याला पाणी आले आहे .या बंधाऱ्याचे छोटे पोटपाट अनेक गावातून गेले आहेत. 58 नंबरचा पोट पाट माळशिरसया प्रवेशद्वाराला गावातून जातो. 59 नंबर चा पंटपाट सध्या जिथे माऊली पालखीतळ आहे तिथून जातो. 60 नंबरचा पोटपाट माळशिरसपासून दोन किलोमीटर वाघमोडे वस्ती इथून जातो. या साठ नंबरच्या पोट पाटामुळे या चौकाला अहिल्यादेवी 60 वस्ती चौक असे नाव पडले आहे. पांडुरंग वाघमोडे यांच्या सोबत एक पत्रकार या नात्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाबाबत चर्चा केलीच त्यांनीही आमच्याकडून सातारा जिल्ह्यात राजकारणाची माहिती घेतली. यांच्या कुटुंबीयांनी आमचे राहण्याची चांगली सोय केली.खुप दिवसानंतर त्यांच्या घरी शेवग्याची शेंग आणि आणि बाजरी भाकरी कुस्करून खाल्ली. 
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली माऊली



 
राम कृष्ण हरी !
😌 जय माऊली 😌
माऊली सतीश मोरे

Also available at

०५ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *फलटण,बरड*

  *०४/०७/२०१९*
*०५/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,

फलटण ते नातेपुते (शिंगणापूर फाटा) हा 30 किलोमीटरचा प्रवास एकाच दिवशी म्हणजे काल गुरूवारी माऊलीच्या जयघोषात पालखीच्या पुढे जाऊन आम्ही पूर्ण केला होता. आमच्या एका सहकार्याला घरगुती कामासाठी कराडला जावे लागणार असल्यामुळे
दोन मुक्कामाचे अंतर एकाच दिवशी चालायचे असे ठरवून आम्ही काल दिवसभर सकाळी दहा ते रात्री नऊ तीस किलोमीटर प्रवास पूर्ण केला. माऊलींचे नाम घेताना हा प्रवास कसा पार पडला हे आम्हाला समजलेच नाही मात्र रात्री थोडा त्रास झाला.



फलटणच्या विश्रामगृहावर रात्री उशीरा रात्री उशिरा पोहोचलो पुढारीचे फलटण तालुका प्रतिनिधी हरीश पाटणे यांचा शिलेदार यशवंत खलाटे यांनी आम्हा सर्व वारकऱ्यांचा खूप चांगला पाहुणचार केला. एक वेगळा व्यक्ती एक चांगला माणूस आम्हाला भेटल्याचा आनंद झाला. फलटणमधील पत्रकार खरे तर  वारकऱ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करतात. यशवंत खलाटे आणि त्याच्या सर्व सहकार्याने माझा मोठा भाऊ म्हणून केलेल्या आदरातिथ्य आणि दिलेला सन्मान खरच लक्षात राहील. रात्री उशिरा विश्रामग्रहावर पोहोचल्यानंतर पाय खूप दुखत असल्यामुळे आणि शरीराने साथ न दिल्यामुळे कालच काहीच लिहू शकलो नाही. मात्र माऊलीचे नाम आणि माऊलींचा आशीर्वाद सोबत असल्यामुळे एवढे विशेष त्रास जाणवले नाही.

काल रात्री वारीमध्ये चालत असताना फार मोठी प्रश्न उद्भवला. ही समस्या किंवा अडचण वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे मी सांगू इच्छित नाही. मात्र  न केलेल्या चुकीचा  त्रास झाला. सुरुवातीपासूनच माझा सकारात्मक विचारांवर आणि कर्मावर विश्वास आहे. Success through Positive Mental Attitude या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे .1996 सालु हे पुस्तक मी वाचले होते. मुळ इंग्रजी पुस्तकाच्या मी मराठीमध्ये नोट्स काढल्या होत्या. चुकीचे काही केले नसेल तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आपली दिशा योग्य असेल तर कधीही अपयश येत नाही. आसा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे हा त्रास झाल्यानंतर काही क्षण वाईट वाटले. मात्र त्याच क्षणी पंढरपूरच्या दिशेने तोंड करून *विठ्ठला* असा मोठ्या आवाजात टाहो फोडला. काही अंतर या विचारातच आणि विठ्ठल नाम घेत चालत राहिलो.

विठ्ठल नामाचा महिमा काय असतो आणि सत्याच्या बाजूने कायम परमेश्वर उभा असतो, याचा प्रत्यय मला फक्त पाचच मिनिटात आला. पाच मिनिटानंतर महामाऊलींचा मला फोन आला आणि त्यांनी माझी सर्व बाजू उचलून धरली आणि तुम्ही असेच पुढे काम करत राहा. तुमची कोणतीही चूक नाही,काम करत रहा मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद दिला आणि माझे डोके हलके झाले.


विठ्ठलाने फक्त पाच मिनिटात सकारात्मक विचाराचा, सत्कृत्याचा, सत्कर्माचा रिझल्ट दाखवला होता, मी खूप आनंदी झालो. पंढरीच्या वारीत असे अनेक सुखद प्रसंग ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळतात त्यातून मी कसा अपवाद असेन !

राम कृष्ण हरी

आज शुक्रवार सकाळी पुढे फार काही चालवायचे नसल्यामुळे आम्ही सर्व सहकारी उशिरा उठलो. आमच्या सहकार्याचे  कराडला जाणे रद्द झाले होते. आम्ही तशी विठ्ठलाकडे विनवणी केली होती.  दिवसभर काय करायचं शेवटी शिंगणापूरला जायचा निर्णय घेतला. गाडी तयार होऊन बसलो तेवढ्यात विश्रामगृहावर पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे माऊली यांची भेट झाली. 1990 पासून भिसे माऊली पंढरीची वारी करत आहेत. अनेक खस्ता खात, सर्व परिस्थितीवर मात करत यांनी आजपर्यंत पंढरीची वारी कव्हर केली आहे. वारी जगापर्यंत पोचवण्यासाठी मिडीयाचे फार मोठे योगदान आहे असे भिसे माऊली यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. बदलती वारी, वारीमधील बदलती पत्रकारिता याविषयी आम्ही बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्वजण शिंगणापूरला जायला निघालो.

माऊलींचा मुक्काम आज बरडला होता. बरड पासून शिंगणापूर हे अंतर पंधरा किलोमीटर आहे त्यामुळे वारकऱ्यांचा ओढा  शिगणापूर कडे खूप होता शिंगणापूर गावात जिकडेतिकडे वारकरी दिसत होते.विदर्भ मराठवाडामधील वारकरी शिंगणापूरला फार गर्दी करतात .शिंगणापूर हा आमचा कुलस्वामी, तेथे गेल्यानंतर आमचे परंपरागत बडवे संतोष बडवे यांना भेटलो. रणजित पाटील यांनी मोहन बडवेंना फोन करून बोलावून घेतले.खूप गर्दी असूनही व्यवस्थित दर्शन घेतले, शिंगणापूर ची सर्व माहिती घेतली,व्हिडिओ तयार केला आणि परतीच्या प्रवासाला बरडकडे निघालो.
*See Pudhari online link*



बरडला जाण्यासाठी जवळचा रस्ता पकडला. या रस्त्यावर सगळीकडे भकास भकास होते. जावळीमध्ये जनावरांची छावणी दिसली, छावणीमध्ये जनावरांची संख्या कमी असली तरी या भागात अजिबात पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली होती आणि मशागती करताना शेतकरी दिसले.

जुलै महिना आला तरी पावसाचा पत्ता नाही. माण खटाव फलटण तालुक्यात भीषण परिस्थिती आहे हे वास्तव आजच्या प्रवासात पाहायला मिळाले. एका गावातून जात असताना रस्त्याच्या कडेला प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचे बॅरेल कळशी हंडे ठेवलेले दिसले .जरा पुढे गेलो तर एका ठिकाणी टँकर मधील पाणी या बॅरलमध्ये भरले जात होते. ग्रामस्थांची भेट घेतली. हे पाणी पाहून धक्का बसला. टँकरमधून गावागावात अस्वच्छ, दुषीत पाणी पोहचवले जात होते, हे या भागातील लोकांना समजत नव्हते असे नाही. पण पाण्यासाठी टाहो करणाऱ्या या नागरिकांना , ग्रामस्थांना मिळेल ते पदरात पडले असे समजून ते पाणी स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता.

कराड साताराचे लोक पाण्याचा किती अपव्यव करतात, शुद्ध पाणी गाड्या धुण्यासाठी, शौचालयासाठी वापरतात. सकाळचा भरलेले पाणी शिळं झालं म्हणून संध्याकाळी ओतून टाकतात,अशी स्थिती जिल्ह्याच्या एका टोकाला असताना दुसऱ्या टोकावर माण फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आह,पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते हे विदारक चित्र पाहून खूप वाईट वाटले.

टॅंकर मालकाने पुढारी ऑनलाईन बुम पाहून थोडेसे त-त-प-प केलं. आम्ही आठ टॅंकर फलटण नगरपालिकेत भरून आणतो असे त्यांनी सांगितले .मात्र फलटणमध्ये असेच पाणी दिले जात असेल याचा विचार केला नक्की दिले जात नसेल .म्हणजेच टँकर मालक खोटे बोलत आहेत, अस्वच्छ पाणी भरून ग्रामस्थांना वाटत आहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही हे जाणवले.

साडेचार वाजता बरडला पालखी तळावर पोहोचलो. बारा नंबर दिंडी मध्ये जाऊन वारकरी सहकार्याने गप्पा मारल्या.थोडा वेळ ट्रकमध्ये बसून आराम केला. या पालखी तळा शेजारीच एक दर्गाह आहे या दर्ग्याच्या परिसरात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. याच परिसरात अनेक वारकऱ्यांनी आपले तंबू उभारले होते.अनेक वारकर्याने त्या दर्गा च्या समोरील शेडमध्ये आपले अंथरून टाकून जागा धरली होती. ही मुस्लिम समाजाची जागा आहे,येथे कसे झोपावे झोपावे असे त्यांना काहीच वाटले नव्हते. या लोकांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले आहे,जगातील सर्वांच्या कल्याणाची काळजी घेतली आहे, सर्वधर्मसमभाव हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया आहे,असे त्यांनी बोलून दाखवले.या लोकांची मुलाखत घेऊन पुढे गेलो.
*See Pudhari online link*

माऊली पालखी सोहळा अतिशय महत्वाचा क्षण म्हणजे समाज आरती सोहळा. सोहळ्याचे मालक हरफळकर यांच्या मालकीच्या ट्रक वर उभा राहून हा सोहळा पहिला, फोटो काढले. व्हिडिओ तयार केले बातमी पाठवली. त्यानंतर ट्रकच्या केबिन वर बसून तेथे उपस्थित वारकऱ्यांची गप्पा मारल्या.
*See Pudhari online link*

 तिकडे बारा नंबर दिंडीमध्ये साडेसात वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता. लायन्स क्लबचे माझे सहकारी विराज जांभळे मला भेटायला तेथे आले होते, त्यांच्यासोबतच जेवण घेतले.

रात्री उशिरा नातेपुते मुक्कामी पोहोचलो. नातेपुते हे माझे मित्र राहून खोचीकर यांचे आजोळ. गेली तीन वर्षे खोचीकर यांच्या आजोळी आम्ही वारकरी उतरतो रात्री उशिरा त्यांचे मामेभाऊ मंगेश यांच्या सोबत गप्पा मारत बसलो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान मात्र इमोशनल गेला.

माऊली माऊली !




माऊली माऊली !

Also available at

👇karawadikarad.blogspot.com



🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩


०४ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *वाल्हे*
  *०३/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,

तरडगाव चांदोबा लिंब

लोणंदचा दीड दिवसाचा मुक्काम आटोपून माऊली तरडगाव मुक्कामाला निघाले. तरडगाव ते लोणंद अंतर फक्त नऊ किलोमीटर आहे, त्यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास माऊलीची पालखी तरडगावकडे निघाली. सातारा जिल्ह्यात लोणंदमध्ये पालखी दीड दिवस थांबत असल्यामुळे  काल सायंकाळपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी लोणंद मध्ये माऊली भक्तांचा महापूर उसळला होता.  लोणंद ते तरडगाव हे अंतर खूप कमी असल्यामुळे माऊलींच्या पालखीसोबत चालणाऱ्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भक्तांची संख्या येथे वाढते, माऊलींच्या पालखीसोबत हे वारकरी चालतात.



लोणंदला भाविक जास्त  येण्याचे का आणखी एक कारण आहे. लोणंदमध्ये पालखी दुपारी निघते आणि त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर चांदोबाचा लिंब येथे भरणारे  पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण ! चांदोबाचा लिंब येथे होणारे पहिले रिंगण हे पाहण्यासारखे असते. रिंगण पाहून पुढे तीन किलोमीटर अंतरावर माऊलींच्या पालखीतळावर जाऊन समाज आरतीचा पाहण्याचा आनंद लुटायचा हेही एक लोणंद ते तरडगाव चालणे मागचे खास कारण असते.


दुपारी साडेबाराच्या दरम्यान माऊलींचा सोहळा लोणंद मधून निघाला, माऊलींना वेशीपर्यंत सोडण्यासाठी लोणंदकर आले होते .कापडगाव पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी भक्तांचा जणू मेळावा भरला होता.जिकडे पाहावे तिकडे फक्त वारकरी दिसत होते, वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यावर येत होते.

इकडे चांदोबाचा लिंब येथे रिंगण पाहण्यासाठी पुढे येऊन अनेक भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चांदोबाचा लिंब हे मंदिर बरोबर रस्त्याच्या एका बाजूला मात्र रस्त्यातच आहे. लोणंद फलटण हा मार्ग चौपदरी करण्यात आला आहे . रुंदीकरणात हे मंदिर जाऊ शकते. मात्र श्रद्धेचा व भावनेचा भाग तसेच न्यायालयीन बाब असल्यामुळे हे मंदिर अजूनही रस्त्यातून हटवण्यात आले नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार हे लक्षात घेऊन सातारा पोलिसांनी योग्य नियोजन करणे गरजेचे होते.माऊलींची पालखी लिंब येथे पोहोचणे अगोदरच येथे हजारो भाविक माऊलींची वाट पाहत होते. चारच्या सुमारास माऊलींची पालखी रिंगणाच्या ठिकाणी आली



सातारा पोलिसांच्या बेफिकीरपणा आणि स्थानिक युवा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी यामुळे पालखी चांदोबाचा लिंब येथे आल्यानंतर ढकलाढकली सुरू झाली. वास्तविक या ठिकाणी किती लोक उभे राहू शकतात याची काळजी व माहिती पोलिसांनी घ्यायला हवी होती. मात्र ती न घेतल्यामुळे दिंडी सोबत आलेले वारकरी ,स्थानिक ग्रामस्थ आणि अगोदरच येऊन बसलेले वारकरी यांची एकच गर्दी रिंगणाच्या परिसरात झाली. माऊलींच्या अश्वाला धावत येण्यासाठी तीन फुटाचा रुंदीचा रस्ता करणे गरजेचे असते,हा करण्यासाठी  रथाच्या शेजारी असणाऱ्या जागेत लोकांना मागे ढकलल्यास सुरवात केली. मात्र या लोकांना माझ्या सरकायला जागाच नव्हती, त्यामुळे अनेकजण रेलिंगला धडकले, रेलिंगच्या पाठीमागेच पोलिसांची व्हॅन उभी होती या व्हॅनवर स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उभ्या होत्या. त्या उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत होत्या. मात्र काही करू शकत नव्हत्या. त्यांनी नेमलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोबाजी दाखवण्याच्या नादामध्ये वारकऱ्यांना आणि भाविकांना ढककले. यातून पत्रकार सुद्धा सुटू शकले नाहीत. काहींचे मोबाईल, कँमेरे खाली पडले,काहीजण खाली पडले. थोडी चेंगराचेंगरी झाली. पाच मिनिटात रिंगणाला सुरूवात झाली. माउलींच्या अश्वाच्या पाठीमागे दुसरा घोडेस्वार धावत आला. माऊली माऊली माऊली चा जयघोष झाला आणि पाच मिनिटात रिंगण संपले, माऊलींची पालखी पुढे निघाली.

सातारा पोलिसांचा नियोजन किती ढिसाळ होते याचा प्रत्यय रिंगण झाल्यानंतर आला. रिंगण स्थळावर वाहतूक ठप्प झाली होती. रिंगण संपल्यानंतर माऊली पुढे गेल्यावर ही वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र चांदोबाचा लिंब ते तरडगाव तीन किलोमीटरचे अंतर पाया पडायला अनेकांना अडीच तासाचा कालावधी गेला. वाहतूक खूप ठप्प झाली होती. चौपदरी रस्ता असूनही एवढा वेळ वाहतूक ठप्प झाली याचे आश्चर्य वाटले.( *वाल्हे घाटातला अरुंद रस्ता, दिवेघाटात भर पावसात अरुंद रस्त्यावरून झालेली वाहतूक एवढे असूनही पुणे जिल्हा पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वाहतूक विस्कळीत झाली नव्हती*)


एका बाजूला वारकरी पुढे चालत होते  दुसर्‍या बाजूला मुंगीच्या पावलाने चार चाकी वाहतूक सुरू होती रिंगणाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावायला सातारा पोलीस कमी पडले हे यातून सिद्ध झाले.

दरम्यान चांदोबाचा लिंब येथे रिंगण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. सातपूते मॅडम यांचे पहिली ओळख फोनवरून झाली होती. कराड कोल्हापुर नाका येथे वाहतुकीची होत असलेली कोंडी आणि आणि कराड पोलीसांचे दुर्लक्ष याबाबत याबाबत पुढारी सह अनेक दैनिके छापलेल्या बातम्याची माहिती सातपूते मॅडमना गेल्या महिन्यात मोबाईल वरून दिली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मॅडमनी एडिशनल एसपीना कराडला पाठवले होते आणि हा प्रश्न निकाली काढला होता,याबाबत मॅडम ना धन्यवाद दिले.


रिंगण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडत फलटणला मुक्कामी जाण्याचा निर्णय घेतला. लोणंद ते तरडगाव ते निंबोरे हे अंतर काल रात्री आम्ही चालून पूर्ण केले होते. गाडीने निंभोरे येथे आलो. आठ वाजता फलटण च्या दिशेने चालायला सुरुवात केली. यादरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांचा फोन आला. तरडगाव येथे माऊलींचे दर्शन घेऊन आणि आ. दीपक चव्हाण यांच्यासोबत भोजन आटोपून आमदार बाळासाहेब पाटील कराडला निघाले होते. आम्ही चालत आहोत हे समजल्यानंतर त्यांनी आमचे लोकेशन्स विचारले आणि त्याठिकाणी आम्हाला भेटावयास आले. आमच्या प्रकृतीची चौकशी केली. आ बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा गेल्या चार वर्षापासून पंढरीची वारी पायी करतात. आमच्या समोरच त्यांनी जशराज यांना फोन लावला, खुशाली विचारली. थोड्या थोड्या गप्पा मारल्या आणि आम्हाला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देत ते निघून गेले.


रात्री साडेआठ ते 10.30 वाजेपर्यंत केवळ दोन थांबे घेत फलटणला पोचलो, माझे जवळचे मित्र डॉ. प्रसन्ना पतंगे यांचे फलटण हे मूळ गाव. दुपारी त्यांनी सहज मेसेज पाठवला होता ,'मी उद्या फलटणला येत आहे आमच्या गावी आमच्या घरी या.'  यावरआजच तुमच्या घरी येत आहे असे मी कळवले होते. डॉक्टर पतंगे यांनी आपल्या घरी आईला फोन करून आमच्या भोजनाची तयारी करण्याचे कळवले होते. साडेदहा वाजता डॉक्टर पतंगे यांची आई घराबाहेर रस्त्यावरच  उभे राहून आमची वाटच पाहत बसल्या होत्या. माऊलींनी आग्रहाने जेवणास घातले. डॉक्टर पतंगे यांचे बंधू जितेंद्र पतंगे हे संगीतकार आणि गायक आहेत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये बीई झाले आहेत. जितेंद्र पतंगे यांच्या स्टुडिओ मध्ये बसून संगीत या विषयावर चर्चा करताना अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर चर्चा झाली. जितेंद्र पतंगे यांनी कंपोस्ट केलेली गाणी पाहिली आणि ऐकली. खूप आनंद झाला. रात्री उशिरा 12 वाजता फलटण विश्रामगृहावर मुक्कामाला पोहोचलो. फलटण विश्रामगृहाची अवस्था आणि दुरावस्था याच्यावर वेगळे भरपूर लिहावे लागेल.असो.रात्र घालवण्यासाठी येथे जागा मिळाली हेही नसे थोडके!

एकंदरीत आजचा दिवस खूप आनंदाचा गेला. एक वाजता ब्लॉग लिहून सर्वांना पाठवले आणि झोपी गेलो.

माऊली माऊली !

Also available at

👇karawadikarad.blogspot.com




🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०३ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *लोणंद*
  *०२/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,




Also available at

👇karawadikarad.blogspot.com


नीरा नदीच्या काठी निरा गावात राहण्याचा अनुभव खरच वेगळा होता. सकाळी सर्व विधी आटोपले.  माऊलीं नीरास्नान ज्या ठिकाणी होणार आहे त्या नीरा नदी काठी पुलावर आलो .नीरा पुल पुणे जिल्ह्याच्या हद्दीत  तर पुल संपल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता. सात दिवसानंतर आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार होतो. समोरच पुलाच्या शेवटी सातारा जिल्ह्यात आपले स्वागत करत आहे असा बोर्ड लावला होता. सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी नदी पुलावरून पात्राचे दर्शन घेतले.

निरेच्या पात्रांमध्ये वारकरी स्नान घेत होते .वरुन धो धो पाऊस पडत होता. निरा पुलावर वारकऱ्यांची गर्दी होती. हे सर्व मोकळ्या समाजातील वारकरी पुढे येऊन आपल्या सकाळच्या सर्व विधी करण्यासाठी निवारा शोधत होते.

काल रात्री नीरा पुलावर पाहणी करायला आलो तेव्हा पुलाच्या फुटपाथवर असणारा चिखल व घाण याबाबत सातारच्या कलेक्टर श्वेता सिंघल यांना फोन करून कल्पना दिली होती. सिंगल मॅडम याची तात्काळ दखल घेत स्वच्छता करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे पूल स्वच्छ झालेला पाहून लक्षात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन असो वा पुणे-सोलापुर  प्रशासन असो कायमच कार्य करत असते. माऊलींचा सोहळा सुसह्य होण्यासाठी प्रशासनाचे मिळणारे सहकार्य खरच उल्लेखनीय असते. जिल्हा परिषद पंचायत समिती पोलीस यंत्रणा महसूल विभाग आरोग्य विभाग शेती विभाग या सर्व विभाग वारकऱ्यांच्या सोयीसाठी सदैव कार्यक्रम असतात वारकऱ्यांना काही कमी पडू देत नाहीत. नीरा नदीकाठी वैष्णवांचा भरलेला मेळा पाहून खूप आनंद झाला.




पुढे येऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आलो आपल्या जिल्ह्यात असे म्हणत सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला. लोणंद मध्ये येत असताना रस्त्याकडेला नेहमीप्रमाणे अनेक ओळखीचे पोलीस कर्मचारी भेटत गेले. अधिकारीही दिसले. दुपारी लोणंद मध्ये पोहोचल्यानंतर गजानन प्लॅनेट्सचे विवेक राव यांच्या घरी जाऊन चहा पाणी घेतले. माऊलीची पालखी यावेळी निरा स्नानासाठी नदीपात्रात नदीकाठाला होती, अतिशय भावपूर्ण वातावरणात माऊलींना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.सहाच्या सुमारास माऊलींची पालखी लोणंद मध्ये पोहोचली. लोणंदकरानी माऊलींचे भक्तिभावात स्वागत केले. नेहमीप्रमाणे लोणंदमध्ये ही माऊली पोहोचल्यानंतर थोडा पाऊस पडला.

लोणंदच्या पुढे असणाऱ्या चांदोबाचा लिंब येथे आमचे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुढे चालत चार किलोमीटर अंतरावर डॉक्टर काकडे यांच्या आत्मश्री आयुर्वेदिक केंद्रामध्ये आलो.

माऊलीच्या नामघोषात गेल्या सात दिवसांपासून पंढरीच्या वाटेचे अंतर कसे कमी होत आहे हेच कळत नाही. तरीपण सातारा जिल्हा आल्यानंतर आपल्या गावात आल्याचा आनंद खूप होत आहे. लोणंदला आल्यानंतर वारकरी आज दीड दिवस थांबणार आहेत. इथे लोणंदच्या पाठीमागे आणि पुढे अनेक गावात वारकरी मुक्काम करत आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्थानिकांनी मोफत चहा पाणी पिण्याचे पाणी याची व्यवस्था केली आहे. लोणंद मध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाने पाण्याचे टँकर उभे केले आहेत.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान .

माऊलीची कृपा दुसरे काय !



🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०२ जुलै २०१९

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

राम कृष्ण हरी,

जेजुरी मध्ये मुक्कामाची चांगली सोय झाली होती, रात्री झोप चांगली मिळाली मात्र सकाळी सहा वाजता पालखीतळावर या असा निरोप रामभाऊ चोपदार यांनी दिला होता. पहाटे पाच वाजता जेजुरीच्या गडावरून करून भोंगा वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली, उठलो. पटकन तयार झालो. सहा वाजता जेजुरी पालखी तळावर पोहोचलो. नियोजित वेळेप्रमाणे बरोबर सहा वाजता माऊली साठी खास तयार केलेल्या मोठ्या या गडद हिरव्या रंगाच्या तंबूमध्ये पालखीत ठेवलेल्या माऊलींच्या पादुका भावपूर्ण वातावरणात माऊली नामाचा जयघोष करत उचलण्यात आल्या. या पादुका रथामध्ये ठेवल्यानंतर लगेच नगारा वाजला आणि पालखी सोहळा वाल्हेच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज झाला.



पालखीतळावर काय शिस्त असते, पालखीचा मुक्काम आटोपून दुसर्‍या गावाकडे जाताना त्या ठिकाणी काय वातावरण असते काय नियम असतात,असते हे सकाळी सहा वाजता पहावयास मिळाले. इतक्या लवकर पालखी निघणार असल्यामुळे सर्व सुमारे 400 दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी तळावर येऊन थांबले होते. राजाभाऊ चोपदार यांनी विणेकरांची हजेरी घेण्यास सुरुवात केली होती. सोहळ्यात सहभागी असणाऱ्या दिंड्याच्या मालकांना रोज हजेरी देणे गरजेचे असते .दिंडी मालकांच्या वतीने त्या दिंडीचा विणेकरी हजेरी देण्यासाठी येतो. पालखी तळाच्या परिसरात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किंवा अगदी जवळपास कोठेही त्या दिंडीला मुक्कामाची जागा मिळालेली असते. त्याठिकाणाहून संबंधित दिंड्याचे विणेकरी आणि झेंडेकरी सोहळा सुरू होण्याच्या वेळेअगोदर तळावर येऊन थांबतात, ओळीने दिलेल्या क्रमानुसार उभे राहतात. विणेकरी हजेरी देतात, रथा समोरील 27 दिंड्यांची हजेरी अगोदर होते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या नोंदणीकृत 251 दिंड्या आणि त्याचे विणेकरी हजेरी देताना माऊलींचा पालखी पादुका मध्ये ठेवल्यानंतर त्या तंबूमध्ये असलेल्या कट्टाचे दर्शन घेतात, आणि बाहेर बाहेर उभे असलेल्या चोपदारांच्या कडे हजेरी देतात अशी पद्धत आहे. ही माहिती मिळाल्‍यानंतर आम्ही वारकरी  या मासिकाचे संपादक सचिन पवार यांना भेटावयास गेलो आम्ही वारकरी संस्थेतर्फे तरुणांसाठी वेगळा उपक्रम वारी विथ विसडम पवार यांनी यावर्षी राबवण्याचा निर्णय घेतला होता



पंढरीची वारी काय आहे याचा अप्रुव सगळ्यांनाच आहे.वारी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असते अशाच उत्सुकता असणाऱ्या राज्यभरातील आस्तिक-नास्तिक 100 विद्यार्थ्यांना यावर्षी वारीमध्ये *वारी विथ विसडम* या उपक्रमाच्या माध्यमातून वारीची माहिती सांगितले जाणार आहे. आम्ही वारकरीचे संपादक सचिन पवार माऊली हे वारकऱ्यांना विद्यार्थ्यांना वारी कशी चालते, वारी मध्ये काय उपक्रम असतात आणि वारी कोणी सुरू केल्यापासून  दिवसभरात वारीत उपक्रम काय असतात याची माहिती विद्यार्थ्यांना देत होते.

तळावरील हा दोन उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर बाहेर पडलो. अचानक ओ मोरे माऊली असा आवाज आला. पाठीमागे पाहतो तर एक विणेकरी मला बोलावत होते. या विणकरी माऊरलीकडे पाहून मी इतका आनंदित झालो की माझा आनंद सांगू शकत नाही.माझे चुलते पण जी मोरे यांची मुलगी, माझी चुलत बहीण वैशाली रहिमतपूर येथे आत्याच्या मुलाला दिली आहे. आत्याचा मुलगा संजय म्हणजे आमचे दाजी. या लग्ना अगोदर पासून संजय दाजी यांचे करवडी मध्ये सतत येणे-जाणे होते, मी ही अनेक वेळा रहीमतपुरला त्यांच्या घरी राहून आलो आहे.  हे दाजी  एका दिंडीचे विणेकरी होते.

 संजय दाजी यांची माझी भेट जवळजवळ पाच सहा वर्षानंतर झाली असेल. गेली काही वर्षे संजय दाजी यांनी पूर्ण परमार्थाचा मार्ग स्वीकारून एक वेगळ्या पद्धतीचे जीवन ते जगत आहेत. मध्यंतरी त्यांच्या घरातील काही कार्यक्रमाला मला जाणे जमले नव्हते. संपूर्ण भारत भ्रमण करून आलेल्या पारमार्थिक विचारांचा वसा घेतलेल्या संजय पवार दाजी यांना भेटण्याची इच्छा मला खूप दिवसापासून होती. ती भेट माऊलींच्या पालखी सोहळ्यात झाली. मला खूप आनंद झाला. आम्ही दोघांनी एकमेकाच्या पायाचे दर्शन घेतले , कडकडून मिठी मारली. संजय दाजींना यांना विणकरीच्या रुपात पाहून खूप खूप आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, त्यांच्यासोबतच पालखी मधून पुढे चालत आलो. जेजुरी लोणंद रस्त्यावर पालखी येताच मी त्यांचा निरोप घेतला आणि जेजुरी गडावर जायला निघालो.

*जेजुरीच्या गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले.  जेजुरीमध्ये मल्हारराव होळकर यांच्या वंशजांनी बांधलेले छत्री मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे .या मंदिराविषयी यापूर्वी ऐकले होते या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील नंदी 6 फुटी आहे. एक वेगळे मंदिर पाहिल्याचा आनंद झाला.या मंदिराचा व्हिडिओ आणि माहिती आपणास पाठवून देत आहे अवश्य ऐका*.

 9 वाजता पुन्हा वाल्ह्यांच्या दिशेने चालायला सुरुवात सुरुवात केली. वाल्हेचा घाट आणि घाटांमधील अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणे यामुळे वारकऱ्यांना चालणे कठीण होते त्यातच पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.

मात्र या कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत होते चिखलातून दगडातून पाण्यातून आपली वाट पार पाडत भरपावसात साडेबाराच्या सुमारास माऊलींची पालखी वाल्हे गावाजवळ पोहोचली. दुपारी एक वाजता पालखी तळावर पोहचली, समाज आरती झाली. पाऊस उघडल्यावर दुपारच्या पंगती पडल्या. त्यानंतळ थकलेल्या माऊलींनी आराम केला. काही जण कपडे धुवायला गेले, काहीजण वाल्या कोळीच्या डोंगरावर वाल्मिक ऋषीच्या दर्शनासाठी गेले काही जण निवांत तंबूमध्ये पडून राहिले. कराडकर यांच्या बारा नंबर दिंडीमध्ये जेवण झाल्यानंतर ह. भ .प. बंडातात्या कराडकर यांची एक मुलाखत घेतली .दुपारचे दोन वाजले होते, वाल्यामध्ये न राहता पुढचा प्रवास सुरु करावा,असा निर्णय घेतला आणि चालायला सुरुवात केली.




साडेपाच वाजता नीरा नदी जवळ पोहोचलो ,नदीच्या पलीकडे गेल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता.आपल्या जिल्ह्यात प्रवेश करण्याची उत्सुकता होती.दरम्यान निरेत कुठे राहायचे या बाबत अगोदरच फोनाफोनी झाली होती.माझे लहानपणीचे जुने मित्र श्रीधर नलवडे यांची एक बहीण नीरा येथे शिक्षिका होते ते अनेक वर्षे निरेत राहत होते, त्यांना फोन करून निळ्या मध्ये कुठे राहायची व्यवस्था होती का अशी विनंती केल्यानंतर आमच्या बहिणीने लगेच घर मालक तुषार आगवणे  यांच्या घरी राहायला जावा सांगितले. सधन शेतकरी आणि तितकेच मनाने श्रीमंत असलेल्या या आगवणे कुटुंबाने  आमचे अतिशय मनोभावे स्वागत केले, पाहुणचार केला.नीरा मध्ये चांगल्या ठिकाणी राहायला मिळाल्यामुळे खूप आनंद झाला,

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली माऊली.

Also available at

👇karawadikarad.blogspot.com




🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...