फॉलोअर

१२ जून २०१६

सिक्कीम सहल विशेष भाग 1



पूर्वोत्तर सात राज्य  म्हणजे सात बहिणी आणि त्यांचा आठवा भाऊ म्हणजे सिक्किम. 1975 साली भारतामध्ये सामिल झालेले सिक्किम हे छोटेसे राज्य आहे. लोकसंख्या 6.5 लाख. चार विभागांत विभागलेल्या या राज्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सिक्किम असे चार जिल्हे आहेत.
गेली 5 टर्म या ठिकाणी पवनकुमार चामलिंग हे एकच या  राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर गेल्या पावणेतीन वर्षांपासून कराडचे लोकप्रिय खासदार म्हणून कारकिर्द गाजविलेले श्रीनिवास पाटील हे राज्यपाल म्हणून कार्यभार पाहत आहेत. श्रीनिवास पाटील सिक्किमचे राज्यपाल झाल्यापासून या राज्याला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
गत आठवड्यात राज्यपालांच्या निमंत्रणावरून या राज्याचा दौरा करण्याचा योग आला. खूप वेगळं पहायला मिळालं या ठिकाणी. भारतामध्ये असे शिस्तबद्ध राज्य असू शकतं याबाबत आश्चर्य वाटतं. परदेशात राहत आहोत, अशी भावना झाली. सिक्क्मिचे काही सुखद अनुभव आजपासून...



बुद्धिझमचा प्रभाव, आचरण  आणि अतिथी देवो भव 

बौद्ध धर्माची लोकसंख्या आणि प्रभाव असलेल्या सिक्किममधील लोक अतिशय नम्र आहेत. पर्यटन हा मुख्य उद्योग असल्यामुळे घरा-घरांत पर्यटनपूरक व्यवसाय आहेत.
स्त्रीपुरूष असा भेदभाव कुठेही पहायला मिळाला नाही. साक्षरतेचे प्रमाण 83 टक्के आहे. तर स्त्री-पुरूष जन्मदर 1000 पुरूषांमागे 900 हून अधिक स्त्रिया असा आहे. घरात मुलगी जन्माला आली की आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी घर सांभाळते, आई-वडिलांना काही कमी पडू देत नाही. स्त्री-भ्रृणहत्या, गर्भलिंग निदान सेंटर हा प्रकारच येथे नाही. अनेक हॉटेल्स, दुकाने, टुरिस्ट सेंटर यांमध्ये महिला काम करताना दिसल्या.

सिक्किम राज्यात पदवीपर्यंत मुला-मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत आहे. मात्र तरीही उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे. याबाबत राका येथील एका दुकानदाराला विचारले.  आमच्याकडे बहुतांश मुले-मुली कामचलाऊ म्हणून दहावी, बारावीपर्यंत शिकतात व त्यानंतर पर्यटनपूरक व्यवसायाच्या मागे लागतात. शिक्षणाबरोबरच घरही चालले पाहिजे, अशी भावना पालकांमध्ये असते, असे त्यांनी सांगितले.



सिक्किमची राजधानी गंगटोक. पहाडावर वसलेले हे शहर पाहताना सह्याद्रिच्या खोऱ्यात राहणाऱ्या आपल्यासारख्यांच्या ऊरात धडधड होते. जेथे फक्त पक्षी, किडे-मुंग्या, जंगली प्राणीच जाऊ शकतात, अशा उंच ठिकाणी कडावर  लोकांनी घरे बांधली आहेत. मोठे बंगले उभे केले आहेत. लांबून ही घरे पाहिली तर अशा ठिकाणी या लोकांनी घरे बांधलीच कशी असा प्रश्न पडतो. गंगटोकमध्ये हॉटेल्सची संख्या खूप आहे. मार्च ते जून आणि ऑक्टोबर ते जानेवारी हा पर्यटनाचा हंगाम असतो. या काळात देशभरातील पर्यटकांची येथे रेलचेल असते. परदेशी पर्यटक येथे कमी पहायला मिळाले.
पर्यटनावरच शहराची किंबहुना राज्याची रोजी-रोटी असल्यामुळे येथे "अतिथी देवो भव्‌: ' हा मंत्र पहावयाला मिळाला. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील काही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना दमबाजी,  लूट, फसवणूक असे प्रकार पहावयास मिळतात. मी हे स्वत: अनुभवलेले आहे.  मात्र पूर्ण सिक्किममध्ये आठ दिवसांत मला असा कोणताच प्रकार पहावयास मिळाला नाही.


बुद्धिझमचा प्रभाव असलेले गंगटोकवासिय खरंच बुद्धांच्या वाटेने चालत आहेत हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. कार ड्रायव्हर, फेरीवाला, दुकानदार, हॉटेल मॅनेजर, वेटर, कामगार, बाजारपेठेतील सेल्समन, पॅराग्लायडिंग पायलट, रिवर राफ्टिंग पायलट, त्यांचे सहकारी, पर्यटन केंद्रावरील अधिकारी, पहारेकरी, तिकिट विक्री करणारा, सिक्किम टुरिझम सेंटरमधील स्टाफ, अधिकारी, राजभवन सर्किट हाऊस खानावळमधील वेटर, कुक तसेच रस्त्यावर मला अनेक लोक भेटले. त्या प्रत्येकामध्ये नम्रता पहावयाला मिळाली. व्यवहार ठरविताना, विक्री करताना कुठेही दमबाजी, वस्तू घेण्याचा आग्रह, घासाघीस, अडवणूक असा प्रकार पहावयास मिळाला नाही. दुकानात मांडलेली वस्तु हाताने घ्या, पहा.. निवड करा आणि घ्या, असा खुला व्यवसाय येथे आहे.



पैसे देवाणघेवाण वेगळी पद्धत 

भारतात कोठेही पहायला मिळाली नाही अशी एक वेगळी गोष्ट मला येथे पहायला मिळाली. कोणत्याही ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्यानंतर पर्यटक खिशातून पैसे काढतात आणि द्यायला लागतात तेव्हा हे लोक अतिशय नम्रतेने हे पैसे स्विकारतात. दोन्ही हातांची ओंजळ करून पैसे स्विकारण्याची इथली खास पद्धत आहे. पैसे परत देताना उजव्या हातानेच द्यायचे. पैसे देताना उजव्या हाताच्या कोपराला डावा हात लावून  अतिशय नम्रपणे पैसे परत दिले जातात. संपूर्ण सिक्किम राज्यात आर्थिक देवाण-घेवाणीचा हा एक वेगळाच अनुभव आला.  "तुम्ही असे का करता?' असे न राहवून  एका टॅक्सी ड्रायव्हरला विचारले असता "ही तर आमच्या धर्माची, बुद्धांची शिकवण आहे. पैसा नम्रतेने द्यावा आणि स्विकारावा, कारण त्यामध्ये बुद्ध आहेत. पैसा आला म्हणून मस्ती करु नये आणि नसला म्हणून भीक मागू नका. कष्ट करा, अशी आमची शिकवण आहे.' असे त्या ड्रायव्हरने सांगितले.

नो भिकारी  आणि देणगी पेटी
  
संपूर्ण सिक्किम राज्यात सात-आठ दिवस होतो. प्रयत्नपूर्वक शोध करून सगळीकडे पाहिले. मात्र कोठेही भिकारी दिसला नाही. ना स्टँडवर, ना रस्त्यावर, ना मार्केटमध्ये, ना मंदीर.. चर्च..मोनॅस्ट्रीबाहेर. बौद्ध धर्माचे मंदिर म्हणजे गुंबा. याला इंग्लिशमध्येमोनॅस्ट्री असे म्हणतात. अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये 100- 150 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मोनॅस्ट्री पहावयास मिळाल्या. गंगटोकमध्ये तर 18 व्या शतकातील प्राचीन मोनॅस्ट्री आहे.  येथे दूर्मिळ वस्तुंचे संग्रहालय असून बुद्ध धर्मप्रचारकांच्या हस्तलिखित ग्रंथांच्या प्रति आहेत. अतिशय देखण्या, सुबक अशा या मोनॅस्ट्रीबाहेर कोठेही भिकारी पहावयास मिळाला नाही.


कोठेही "येथे देणगी स्विकारली जाईल', "दानपेटीतच पैसे टाकवेत',  अशा प्रकारचे बोर्ड पहावयास मिळाले नाहीत. मोनॅस्ट्रीमध्ये पुजारी नव्हता किंवा पहारेकरीही नव्हता. कोणीही यावे दर्शन घ्यावे, पुजा करावी आणि शांतपणे निघून जावे. असे वेगळे वातावरण पहावयास मिळाले. गणेशटोक व हनुमानटोक येथेही मंदिर आहेत. मात्र तेथे सुद्धा पुजा साहित्य विक्री केंद्रे, देणगी आग्रह फलक दिसले नाहीत. मोनॅस्ट्रीबाहेर भिकारी का नाहीत?  असा सवाल पडला. मोडक्या हिंदी भाषेत बौद्ध धर्मगुरूंनी मला सांगितले, "येथील लोक स्वाभिमानी आहेत. भिक कधी मागणार नाहीत. कष्ट करून काम करून पोट भरा, अशी आमची शिकवण आहे. आम्ही भिक मागायची वेळ येणारच नाही असे काम करा. व्यसने करू नका असे शिकवितो.' असे त्यांनी सांगितले.




राजभवनचे "खुले निमंत्रण'
सिक्किम हे पर्यटनप्रेमी राज्य आहे. येथील लोक आलेल्या पाहुण्यांना आपला मानतात. पर्यटकांची लूट, वस्तु चोरी अशा घटना येथे घडत नाहीत. मी राज्यपाल झाल्यापासून महाराष्ट्रीय पर्यटकांना येथे येण्याचं "खुलं आवातणं' दिलं आहे. राजभवनावर आलेल्या मराठी पर्यटकांसाठी मी खास वेळ देतो. येण्यापूर्वी राजभवनला कळविले तर त्यांची योग्य व्यवस्था करण्यास माझा राजभवन स्टाफ तयार असतो.
           - श्रीनिवास पाटील,
          राज्यपाल, सिक्किम
             (क्रमश:)

१० जून २०१६

ट्रीप विदाऊट प्लॅन




खुप फिरायचं आहे, उंच उडायचं आहे
प्लॅन न करता लाॅग टूरवर जायचं आहे
लांब पठारावर बेधुंद होऊन फिरायचं आहे
इवल्याशा फुलांसोबत गप्पा मारत
हिरव्यागार गालीच्यावर हुदडायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे


डोंगर, दरी, झाडे अन् खळखळणारे झरे
हे तर आहेत माझे सखेसोयरे
त्याच्यासोबत हितगुज करायची आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

निसर्ग साद घालत मला खुणावतोय,
वस्तूच्या मागं का लागलाय सुनावतोय
स्वच्छंद पाखरासोबत उडायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

मी तर माझ्या हुकमाचा राजा
कोणाचीच नाही मला परवा
राजासारखं एक दिवस रहायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

कुणाला हे हवं, कुणाला तेही हवं
निसर्गाचा आनंद मला फक्त हवाय
दिलखुलास एन्जॉय करायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

           ....सतीश मोरे,
               





26 मे 2016
बागडोगरा ते दिल्ली
विमान प्रवासात सुचली
Return journey from Sikkim






०५ जून २०१६

सखी पाऊस आणि वार्‍याची झुळूक



1

            पाऊस

आजचा पाऊस खुप वेगळा होता
ती आणि मी जवळ येत होतो
पाऊस आमच्या मागे होता
आम्हाला भेटू देत नव्हता !



        दोघांना पावसात भिजायचं होतं
        मला भिजताना तिला पहायचं होतं
        माझ्या गालावरचे थेंब चुंबायचे होते
        पण मला
        तिच्या डोळ्यात खोल पहायचं होते !

थांब म्हणून ती थांबली नाही
हळुवार पावसात चिंब भिजून गेली
मागे वळून पाहताना मला
चिंब चिंब भिजवून गेली !


        आज पुन्हा पाऊस आला
        भिजलं सारं गाव
        खिडकीच्या काचेवर
        मग पुन्हा तुझं नाव !


म्हणूणच
पाऊस आला की
मला काहीच सुचत नाही
फक्त आठवतो
तुझा श्वास !

आणि

वेड लावतं
तुझं वावरणं !

                 ..   सतीश मोरे






2







                          वार्‍याची झुळूक

'ती' छोटीशी झुळुक
हळुवारपणे आली
'तु'ला स्पर्शून गेली
अन जरा थबकली
सखी माझी हसली
ओठावरची लाली फुलली !

     तशा तुम्ही दोघीही अवखळ
     तुला हवं स्वातंत्र,ती स्वच्छंद
     तुम्हा दोघींनाही अडवणार कोण
     तव तुमा स्पर्शाची आस लागली
     सखी माझी हसली
     ओठावरची लाली फुलली !


त्या सुंदर केशकल्पांवर
तुझा न राहीला अधिकार
'तीला'ही न आवरला मोह
स्पर्श घेता त्या बटेचा
सखी माझी हसली
ओठावरची लाली फुलली !

     तु तुझ्या हुकुमाची राणी
    'ती' तुझ्या सख्याची आळवणी
    मिलनाचा संदेश घेऊनी आली
    भेटीच्या आसुने तु ही खुलली
    सखी माझी हसली
    ओठावरची लाली फुलली !

   
.                            ......  सतीश मोरे











०१ जून २०१६

सिक्कीम राज्य निर्माण : चौघा महाराष्ट्रीयन दिग्गजाचे योगदान

गगंगटोक

पश्चिम महाराष्ट्रातील कोकण प्रवेशद्वार म्हणजे पाटण तालुका. या तालुक्यातील मारुल हवेली गावातील शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती सिक्किम राज्याच्या उच्च पदावर राज्यपालपदी विराजमान झाली आहे . श्रीनिवास पाटील राज्यपाल झाले आणि आपणा सर्वांना  सिक्किम राज्य आपलं वाटू लागलं. यापूर्वी सिक्किम हे भारतातील एका राज्यापैकी एक अशी आपली ओळख होती. घटनात्मकदृष्टया राज्यपालपद फार मोठे आहे. राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्ति राजकीय सोय करण्यासाठी राज्यपाल पदावर नेमणूक केली जाते. हा या पदाचा आजपर्यंतचा इतिहास आहे, यात तथ्यही आहे. मात्र सिक्किमसारख्या संवेदनशील राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक करताना आतपर्यंतचा इतिहास पाहिला तर केवळ उच्च विद्याविभूषित व्यक्तिंनाच संधी मिळाली आहे.
आयएएस ऑफिसर, इंग्लिशवर प्रभूत्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सखोल अभ्यास याचा विचार करूनच सिक्किमचे राज्यपाल नियुक्त झाले आहेत. श्रीनिवास पाटील यांची नियुक्ती याच निकषावर झाली आहे. महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यामुळेच महाराष्ट्रीयन पर्यटकांचा ओढा तिकडे वाढला आहे.  राजभवनामधील शाही पाहुणचार हे ही त्यामागचे गोड कारण आहे.




औंध पंतप्रतिनिधी

श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेतून राजीनामा देवून बाहेर पडले आणि थेट कराड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उतरले. 1999 आणि  त्यानंतर 2004 असे सलग दोनदा ते मताधिक्याने निवडून गेले. या कालावधीत त्यांनी खासदार फंड काय असतो आणि खासदार फंडाशिवायसुद्धा इतर निधी किती प्रमाणात आणता येतो हे दाखवून दिले. विकासकामांबरोबरच श्रीनिवास पाटील यांनी खासदार झाल्यांनतर वेगळ्या शैलीमुळे जनसंपर्क वाढविला, ओळखी वाढविल्या, प्रत्येक गावात खुमासदार शैलीत भाषण करून अनेकांना आपलंसं केलं.

बोलणारा, काम करणारा, सहज उपलब्ध असणारा खासदार कराड मतदारसंघाला लाभला. 2009 साली लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये कराड मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले. वास्तविक मतदारसंघ पुनर्रचना कमिटीमध्ये स्वत:  श्रीनिवास पाटील होते. कराड मतदारसंघ वाचवायचा असेल तर कराडला कोकणचा काही  भाग जोडावा लागला असता आणि कराड-सातारा जवळीकता कमी झाली असती आणि हे होऊ नये म्हणून श्रीनिवास पाटील यांनी त्यात बदल सुचवले.  सातारा आणि माढा असे दोन लोकसभा मतदासंघात जिल्हा विभागला गेला.

कराड मतदारसंघाचे अस्तित्व संपल्यानंतर अभ्यासू  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी देण्यासाठी  राजकीय ताकद पणाला लावून त्यांना सिक्किमच्या राज्यपालपदी सन्मानित  केले. ओळखीने, शिफारसीने, दबाव टाकून अथवा इतर मार्गाने कोणतेही पद, नोकरी मिळविता येते. मात्र ते टिकविण्याचे, वाढविण्याचे, समृद्ध करण्याचे आणि त्या पदाची उंची वाढविण्याचे काम त्या व्यक्तिलाच करावे लागते.उच्च विद्याविभूषित श्रीनिवास पाटील यांनी तेच केले.



सिक्किम राज्याला विशेष दर्जा आहे. 1975 साली हे राज्य भारतात सहभागी झाले. वास्तविक या भूभागावर पहिल्यापासूनच चीनचा डोळा होता. सिक्किमच्या राजाच्या ऐशोआराम कार्यपद्धतीला कंटाळून  या राज्यातील नागरीक भारतात सहभागी झाले. नेपाळ, चीनव्याप्त तिबेट या देशांनी सिक्किमला वेढले आहे. चीनचा धोका आणि घुसखोरी याचा विचार करून सिक्किममध्ये भारताने मोठा लष्करी तळ उभारला आहे. संरक्षक विषयक गुप्त माहिती, ज्ञान आणि अवलोकन असणारा राज्यपालच या राज्यात नेमला जातो.
राज्यातील जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले सरकार असते. मात्र संवेदनक्षम अशा सिक्किमसारख्या सर्व पूर्वोत्तर राज्यांत राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. या राज्यपालांचा सतत थेट राष्ट्रपतींशी संपर्क आणि संवाद असतो. राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असल्यामुळे या राज्यपालांकडून संरक्षक विषयक  मिळालेल्या माहितीवरून देशाचे संरक्षणात्मक धोरण व उपाययोजना राबविल्या जातात. अशा उच्च पदावर श्रीनिवास पाटील यांचे नेमणूक होणे हा खरंच मराठी माणसाचा सन्मान आहे. सिक्किमच्या निर्मितीपासून आजअखेर 4 दिग्गज मराठी व्यक्तिंनी या राज्याच्या विकासासाठी आणि वाटचालीसाठी योगदान दिले आहे.


सिक्कीम हा स्वतंत्र देश होता. या देशावरही भारताप्रमाणे इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारचे भारताचे राजकिय राजदुत म्हणून 1952 ते 1958  दरम्यान  महाराष्ट्रातील औंध संस्थानचे आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी काम पाहिले आहे.  1952 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम देशाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रतिनिधी त्याचेसमवेत होते. दरम्यान 1957 मध्ये पंडित नेहरू कन्या  इंदिरा यांना घेऊन सिक्कीमला आले होते.  येथून पुढे ते ल्हासा (तिबेट ) येथे गेले होते.  तत्कालीन सरंक्षण मंत्री व्हि. के.  कृष्णन मेनन त्याच्या समवेत होते. पंतप्रतिनिधी यांच्या रूपाने मराठी माणसाने सिक्कीम देशात कारभार पाहिला होता.



1975 साली सिक्किमच्या जनतेने भारतात सामिल होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सार्वमत चाचणी घेण्यात आली. 98 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्याला पाठींबा दिला. सिक्किम राज्याचा सार्वमताचा हा ठराव त्यावेळचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत मांडला. सिक्किमच्या जनतेची मागणी यशवंतराव चव्हाण यांनी या ठरावाद्वारे सभागृहासमोर मांडली. लोकसभेने बहुमताने यास मान्यता दिल्यानंतर 16 मे 1975 साली सिक्किम भारतात सहभागी झाले. त्यामुळे सिक्किम राज्य निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.



 महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या होमी तल्यार खान यांनी 1981 ते 1984  सिक्किम राज्यपाल म्हणून काम पाहिले .अभ्यासू खान यांनी त्या काळात चांगले कार्य केले होते. 20 जुलै 2013 पासून श्रीनिवास पाटील सिक्किम राज्यपाल  आहेत. सिक्किम देश  आणि राज्याशी राजकिय आणि घटनात्मकदृष्टया संबंध असलेले हे चौथे मराठी व्यक्ति आहेत.
दोन वर्षे 10 महिन्यांपूर्वी श्रीनिवास पाटील सिक्किमचे राज्यपाल झाले. त्यानंतर त्यांनी  लोकनियुक्त पवनकुमार चामलिंग यांच्या सरकारमधील मंत्री, स्थानिक लोक, विरोधी पक्ष आदी सर्वांना विश्वासात घेवून आपलेसं केलं आहे. "मिशीवाला बडा साहब' अशी त्यांची राज्यभर ओळख झाली आहे. सिक्किमची संस्कृती जपण्याबरोबरच वाढविण्यासाठी स्थानिक जनतेत मिसळून काम करणारा आपला राज्यपाल असे त्यांचे काम आहे.

रराज्यपाल तल्यार खान



श्रीनिवास पाटील सिक्किम राजभवनामध्ये राहतात. वास्तविक राजभवनात स्थानिक जनतेचे काही काम नसते, किंवा खुप कमी असते. तरीही राजभवन सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय श्रीनिवास पाटील यांनी घेतला आणि त्यामुळेच  रोज किमान 50 लोकांना राज्यपाल भेटतात. महाराष्ट्रातील लोकांना तर राजभवनाचे खुले आमंत्रण असते.
"पुढारी'च्या माध्यमातून गेली 20 वर्षे सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांशी माझे जवळचे संबंध राहिले आहेत. खासदार पदाच्या कालावधीत श्रीनिवास पाटील अनेकदा "पुढारी' वर्धापन दिनासाठी उपस्थित राहिले होते. पुढारी परिवारातील सर्व सदस्यांना ते नावाने ओळखतात. सिक्किमला अवश्य या! असे त्यांचे अनेक दिवसापासून आग्रहाचे निमंत्रण होते. गेल्या दोन वर्षांत कराड, पाटण तालुक्यातील सुमारे 2000 लोक सिक्किमला जाऊन आले आहेत. आपण पण गेलेच पाहिजे  अशी मनापासून इच्छा होती.  ती पुर्ण झाली.


3 हजार मिलोमीटर अंतर पार करून आपल्या  इकडचा माणूस जेव्हा सिक्किमला जातो तेव्हा त्याची पहिली इच्छा असते, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भेटायची. एवढ्या लांबून आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, राज्यभर फिरण्यासाठी मार्गदर्शन करणे हे करण्यासाठी राजभवनमधील स्टाफ आनंदाने तयार असतो. इस्टेट मॅनेजर तारासिंग तसेच किचन स्टाफ काही कमी पडू देत नाहीत.  नवीन राजभवन सर्कीट हाऊस इमारत देखणी आहे.  या इमारतीच्या टेरेस वरून कांचनगंगा पर्वत रांगांचे दर्शन होते.  अतिशय सुंदर नजारा आहे तो!  या ठिकाणी पन्नासएक वातानुकूलीत सुट आहेत . राजेशाही थाटात इथे राहण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच म्हणायचे. येथे अतिशय उत्तम जेवणाची सोय आहे. अतिशय प्रशस्त दिवानखाना , हाॅल आहेत.  इमारतीचे बांधकाम अलीकडेच झाले आहे, लुक जुन्या पद्धतीचा आहे. खुप छान सोय केली जाते, सर्व पाहुण्यांची !



इथं येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी राज्यपाल  श्रीनिवास पाटील स्वत:  बोलतात , वेळ देतात. लहान-मोठ्या सर्वांची आपुलकीने चौकशी करतात. हा आजपर्यंत जाऊन आलेल्या सर्वांचा अनुभव आहे. पुढारी पत्रकार म्हणून त्यांनी मला खूप प्रेम दिले. राजभवनमध्ये आयोजित न्यायमुर्ती शपथविधी कार्यक्रमाचे मला विशेष निमंत्रण होते. हा माझा आणि "पुढारी'चा सन्मानच आहे, असे मी समजतो.
नियोजित सुचनेनुसार दुपारी 1 वाजता  सहकुटुंब मी राजभवनवर पोहोचलो.
सोबत साडू दिलिप आणि मेहुणी पिंकी होती. वेळेत पेाहोचा... वेळ पाळा.. तुम्ही फार मोठे व्हाल! हा फार मोठा मंत्र श्रीनिवास पाटील यांनी अनेकदा दिला आहे.
ते स्वत: वेळ पाळण्यात सुरूवातीपासूनच दक्ष असतात. आम्ही वेळेत पोहोचलो. राजभवनाबाहेरील सुरक्षा रक्षकांनी तपासणी केल्यानंतर आम्ही पाहुणे कक्षामध्ये जाऊन बसलो.  अतिशय सुंदर सजविलेल्या या कक्षात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांचे सुंदर तैलचित्र लावलेले होते. पाचच मिनीटांत शाही थाटातील चहा-पान झाले.



थोड्याच वेळात रुबाबदार शैलीत राज्यपालांचे या कक्षात आगमन झाले. आल्या-आल्या सर्वांना नमस्कार केला. आम्ही सर्वजण या वडिलधारी दिग्गजासमोर नतमस्तक झालो. एका सहाय्यकाला त्यांनी हळदी-कुंकू करंडा द्यायला सांगितला. माझी पत्नी आणि मेहुणीने एकीमेकीला हळदी-कुंकू लावले. मी चाटच पडलो. एवढ्या लांब आल्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम तोही राजभवनात पहायला मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
भगवान गौतम बुद्धांची आकर्षक मुर्ती, पांढरं उपरणं देवून आम्हा दोन्ही कुटुंबियांचा त्यांनी सत्कार केला. माझ्यासाठी खास वेगळी भेट म्हणून ड्रॅगनचे सुंदर शिल्प असलेनं टेबल पेन होल्डर  दिला. कुटुंबातील सर्वांची आपुलकीने चौकशी केली.कसलीही राजकीय चर्चा न करता केवळ जुन्या आठवणींमध्येच आमच्या गप्पा रंगल्या. पुढारीकार ग. गो. जाधव यांच्या आठवणी जागवल्या. संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी पुढारी खुप  मोठ्ठा केला आहे,  कष्ट घेतले  आहे,  असे  साहेबांनी सांगितले. माझा मुलगा पियुष आणि देवयानी यांची चौकशी केली, पुढे काय होणार हे विचारले. सौ विद्या यांच्या शाळेची माहिती घेतली.




रिलायन्स आणि एल ऍन्ड टी मध्ये  काम करणारे माझी मेहुणी आणि साडू यांच्या कंपनीतील दिग्गज अधिकाऱ्यांची नावे, अनुभव, किस्से सांगितले. धिरुभाई अंबानी यांच्यासोबत झालेली भेट सविस्तर कथन केली. त्यानंतर राज्यपालसाहेब आम्हाला त्यांच्या मुख्य कार्यालयीन केबिनमध्ये घेवून गेले.
दोन्ही बाजूला तिरंगे, भिंतीवर राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे फोटो, त्यासमोरील टेबलावर सिक्किमचा नकाशा असा आगळा-वेगळा रूबाब पहायला मिळाला. श्रीनिवास पाटील यांच्या ऑफिस टेबलवर यशवंतराव चव्हाण यांचा  फोटो होता. त्याचबरोबर आई-वडील, जवळचे नातेवाईक यांचे फोटोही एका बाजूला काचेच्या खाली ठेवलेले होते. साहेबांच्या उजव्या बाजूला भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय दुर्मिळ फोटो असणारे तैलचित्र लावले होते. तर डाव्या बाजूला भिंतीवर पंढरीच्या विठ्ठलाची सुंदर फोटो फ्रेम होती. साहेबांनी आमच्याशी इथेपण गप्पा मारताना केवळ सिक्किम हाच विषय घेतला होता. एलईडी पॉईंटर लाईट नकाशावर  दाखवून त्यांनी सिक्किमच्या प्रत्येक भागाची माहिती दिली. सिक्किम राज्यपाल म्हणून असणारे विशेष अधिकार, कलम समजावून सांगितले. येथेही  फोटोसेशन केले.

त्यानंतर ग्रंथालय, अभ्यासिका, चिंतन कक्ष, व्यायाम कक्ष आदी सर्व खोल्या त्यांनी स्वत: पुढे होवून दाखविल्या. राजभवनात एक विशेष तिब्बत भवन नावाचा कक्ष आहे. येथे राज्यपालांचे विशेष पाहुणे मुक्काम करतात. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी  याच कक्षात उतरले होते, असे साहेबांनी सांगितले. या कक्षामध्ये जाऊन आम्ही फोटोसेशन केले. राजभवनला लागुनच तिश्ता रेसिडन्सी मध्ये राज्यपाल राहतात.  साहेबांच्या घरात सुद्धा संपुर्ण मराठीमय वातावरण आहे.   साडेतीन तास राजभवनावर केवळ गप्पा सुरू होत्या आणि आमच्या ज्ञानात भर पडत होती.
खूप सांगण्यासारखं आहे. लिहीण्यासारखं आहे. पण लेखन मर्यादा आहेत.



"आप मेरे साथ इधर आओ'
श्रीनिवास पाटील राज्यपाल होऊन राजभवनावर मुक्कामास आल्यापासून राजभवनाचे विजेचे बिल निम्म्यावर आले आहे. वास्तविक राजभवन खूप उंचावर आहे. येथे प्रकाश भरपूर पडतो. रात्री सजावटीचे दिवे लावले जातात. येथे 4.30 वाजता  उजाडते. सायंकाळी 6 वाजता लावलेले दिवे सकाळी 4.30 वाजता बंद झालेच पाहिजेत, असा साहेबांनी दंडक केला. यापूर्वी निवांत 7 वाजता दिवे बंद करण्याची सवय असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने सुरूवातीला याकडे थोडे दुर्लक्ष केले मात्र सज्जड दम दिल्यानंतर शिस्त लागली. आता तो कर्मचारी साहेबांचा लाडका झाला आहे.
साहेबांच्या केबिनमधून दुसऱ्या केबिनमध्ये आम्ही जात असताना मी एक खूप वेगळी गोष्ट अनुभवली  थोड्या वेळापूर्वी आम्हाला चहा घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याला साहेबांनी "आप मेरे साथ इधर आओ' असे सांगितले. एवढे मोठे राज्यपाल आपल्या कार्यालयातील "क' वर्ग कर्मचाऱ्याला अहो-जाहो बोलवतात,  याचं खूप आश्चर्य वाटलं. न रहावून मी साहेबांना विचारलं? मला लहानपणापासून ही सवय आहे. आमच्यात ती पद्धतच आहे. रहिला प्रश्न सिक्किम राज्यपाल म्हणून तर या राज्यात अरे-तुरे बोलविणे ही शिवी समजली जाते, असे त्यांनी मला सांगितले. राज्यपाल साहेबांच्या त्या उत्तराने मी थक्क झालो.









११ मे २०१६

सैराट आठवण

सैराट आठवण
आज तुझी खुप आठवण आली

मग मी ती वही हळुच बाहेर काढली
अलगद तुला न्याहळू लागली
तुझा स्पर्श स्मरण करून गेली
आज तुझी खुप आठवण आली

ती वही, ती पत्रे, ती प्रेमस्फुरणे
निशब्द होऊन बोलत राहीली
तुझ्यातला मी शोधू लागली
आज तुझी खुप आठवण आली

सुगंध बहरला शब्दफुलांचा अन् कायेचा
ऋतू आला पतझड सावनका
अबोल प्रीत प्रिया ती बावरली
आज तुझी खूप आठवण आली

आठवणीच आणि माझं नातं खुप जुनं
जवळ असुनही खुप दूर का वसली
वर्षे सरली पण स्मरणात तु  राहीली
आज तुझी खुप आठवण आली

एकटी आठवण खुप सुंदर असते
तिच्यात फक्त तु अन् मी असतो
का  ती भुतकाळ विस्कटत आली
आज तुझी खुप आठवण आली

आठवण आज सैराट जाहली
मज सोडून माझी सखी का गेली
उध्वस्त ह्रदयाला  फुंकर मारून गेली
आज तुझी खुप आठवण आली
.         
          ........सतीश मोरे

भेट  लास्ट वन्
भेट सरता सरता
हात सोडता सोडता
मी हळुच पुसले तीजला
सांग ना सखे काय हवे तुजला ??

सोडलेला हात पुन्हा घट्ट पकडत
ती बोलली ,
हा स्पर्श ठेऊन जा
बदल्यात माझे श्वास घेऊन जा
ते क्षण जे एकत्र जगलो
ती साधना ठेऊन जा
बदल्यात माझी प्रीतीची
भावना घेउन जा

मी फक्त इतकेच बोललो
जे तुझेच आहे राणी
ते वेगळे मागु नको
एकच जीव आहोत आपण 

तु वेगळी वागु नको
तु आणि तुझे डोळे
तू नुकतंच बहरलेल हिरवं रान
वहीत जपलेलं जाळीदार पान☘
तुझे नयन कट्यार 
करते  थेट ह्रदयावर वार ❤

२५ एप्रिल २०१६

उन्हाळी सुट्टी आमची आणि आजची



   
                                     झुक झुक आगीनगाडी
                                         धुराच्या रेषा हवेत सोडी
                                              पळती झाडे पाहु या
                                                   मामाच्या गावाला जाऊया !!




हे बालगीत आठवतंय 
लहानपणी केलेला, दंगा, गोंधळ, मजा, धाबडधिंगा 
सगळे डोळ्यासमोर उभे राहिले ना !
मामाच्या गावाला जाण्यासाठी 
आई बाबाकडे केलेला हट्ट पण आठवतोय, होय ना ! 
एसटीत, रेल्वेत बसायला मिळणार असल्याने 
वाढणारी  उत्सुकता पण  आठवतेय ना! 

1990- 1995 च्या अगोदर शाळेत असणाऱ्या  आपल्या पिढीला मामा,  मामी,  आजी आजोबा, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, मामाचं गाव,  मामाचे दोस्त, मामाच्या गावातील गल्ली बोळ,  रस्ता,  विहिर,  मैदान,  घरगुती बैठे खेळ,  पत्ते ,चलस , सूर, आठ्या पाट्या आणि खुप खुप काही पहायला मिळाले आहे. 
आजच्या घडीला  आपल्या मुलांना हे काही पहायला मिळू शकत नाही. 


सोशल मिडिया वर मे महिन्यातील सुट्टी 20 वर्षापुर्वीची आणि आजची असे दोन फोटो फिरत आहेत.  हे फोटो पाहून माझ्या मुलीने पप्पा तुम्ही झाडावर खेळत होता? असे आश्चर्याने विचारले.  मला पण का पाठवत नाही, असा प्रश्‍न केला. पुढे जाऊन तिने तुम्ही आणखी काय काय करत होता, कसे जायचा, पारंब्या म्हणजे काय, कुठले खेळ खेळायचा,  कुठे लपून बसायचा, असे एकावर एक प्रश्नाची सरबत्ती केली. खरंच किती रम्य काळहोता तो,  किती सुंदर  आठवणी  आहेत, बालपणीच्या!


शाळेत जायचे होते, पण शाळेचे टेन्शन नव्हते, आभ्यास होता पण टारगेट नव्हते, गुरूजीचा धाक, भिती होती मात्र एक्स्ट्रा क्लासचा दबाव नव्हता. पास होण्यासाठी धडपड होती, 90 % चे ध्येय नव्हते . पण या सर्व शिक्षणात प्रचंड आनंद मिळत होता.  घरची कामे करून शाळेला जायचे,  खाकी चड्डी, पांढरा शर्ट मुलांसाठी आणि निळा पांढरा ड्रेस मुलीसाठी, हा ऑल  ओव्हर मराठी शाळेचा ड्रेस कोड.  हायस्कूलला पण तोच ड्रेस.

शाळेत जायला ना स्कूल बस ना व्हॅन, ना रिक्षा. जीवन जगण्यासाठीचं खरं शिक्षण मिळत होतं या शाळेत. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी कधी लागते इकडे  सगळ्यांचेच लक्ष असायचे. सुट्टीचे प्लॅनिंग एकच मामाच्या गावाला जायचे. मामाचं गाव हा सार्‍या भाच्चा भाच्चीसाठी जगातील सर्वात आनंददायी ठिकाण असायचे. बहीण भाऊ नाते खूप पवित्र,  निरागस,  समर्पण , सेवा,  त्याग  आणि काळजीचं आहे आणि होतं. आज समानता आणि आई वडिलांच्या संपत्तीमधील वाटा यामुळे काही ठिकाणी  हे नाती ताणले गेले आहे. तरीही मामा हा प्रत्येकाचा जवळचा होता व आजही आहे.



सुट्टीची तारीख पोस्ट कार्ड ने मामाला कळवली जायची, त्या दिवशी मामा कुठल्याही परिस्थितीत बहीण च्या घरात हजर! भाच्चे मंडळीना सायकल, एसटी, रेल्वे , बैलगाडी तर जवळपास गाव  असेल तर चालत घेऊन मामा जायचा. मामाची मामी वाट पाहत  असायची.  भाच्याला, भाच्चीला आदराने हाक मारली जायची. ती नावे पण गमतीशीर असायची. राणीसाहेब, राजसाहेब. मामी खुप जपायची या नात्याला. 

सुट्टीत खुप मज्जा करायचो आम्ही पोरं.  नदीकाठी आजोळ असेल तर नदी, नाहीतर विहिरीत पोहायला जाणे हे हमखास  असायचे.  पोहायची, पाण्याची भिती मामा अशी घालवायचा की पोहणे चार  आठ दिवसांत शिकत होतो. सकाळपासून संध्याकाळ ते रात्री झोपेपर्यंत दंगा, मस्ती, खेळ याशिवाय काही नव्हते. मामी खुप छान स्वयंपाक करायची, प्रेमाने भरवायचीही. मामाची मुलगी किंवा मुलगा हा विक पॉइंट होता.  मामी चेष्टा करायची, जावई म्हणून चिडवायची. मामा पोरांना घेऊन रानात जायचा,  शेतावर विहिरीच्या पाटात धम्माल खेळ. झाडावर चढून खेळायचे, सावलीत बसून मस्त पैकी कांदा चटणी , पिठलं खायचं. कुळवावर बसायचा जो आनंद होता तो आज  ऑडीत बसण्यातही नाही.
 दुपारी पत्ते किंवा चलस खेळ, कंटाळा आला की गाण्याच्या, गावांच्या, शब्दांच्या भेंड्या.

चिंचेचे चिचोके आडवे फोडायचे, त्या आमच्या सोंगट्या. पांढरी बाजू आणि काळी बाजू हे परिणाम. जमीनीवर, पाटावर  उभ्या आडव्या रेषा आखून खेळ भलताच रंगायचा, चलसचा.





मी तर मे महिन्यात आणि दिवाळीत रेठरे बु गावाला आजोळी जायचोच. चैनीच्या रेठर्यात टुरिंग टाॅकीज होती. तिथे पिक्चर पहायला जाणे हा माझा आवडता छंद. मामाकडून गोड बोलून पैसे काढायचे, अनं रात्री पिक्चर बघायला जायचे.  मामा नाही म्हणला तर मामी जवळ गुळुगुळु करायचे. मामी पैसे द्यायची, रात्री उशीरा हळूच येऊन पत्र्यावर झोपायचे, असा क्रम असायचा.


अनेकांच्या  मामाच्या गावची  जत्रा मे महिन्यात असायची. मग आणखी मजा. पाळणा, गोल रिंगण,  खेळणी, पिपाणी, चिरमुरं, बत्तासू काय काय!  सुट्टी संपत आली की मामा छान ड्रेस घ्यायचा. परत घरी सोडायला यायचा.  मामी आग्रहानं म्हणायची , जावई बापू या पुढच्या सुट्टीत.  खुप छान आठवणी आहेत मामाच्या गावाच्या,  मे महिन्यातील सुट्टीच्या. पुन्हा एकदा लहान होऊन मामाच्या गावाला जावंसं वाटतंय.




आज काळ बदलला आहे. मामा मामी नोकरी करतात. भाच्चा-भाच्चीसाठी मामाला वेळ नाही. अपवादात्मक कुटुंबे सोडली तर मामाचं गाव आता खुप दूर झालं आहे.  मनोरंजनाचे निकष बदलले आहेत.  तेव्हा टिव्ही, मोबाईल नव्हते.  घराबाहेर  असणाऱ्या मोठ्या जगात मनोरंजन शोधलं जायचं. आजची पोरं  4 जी आहेत. सुट्टीत मोबाईल वर तुटून पडलेली आहेत.  खेळायला म्हणून  जमतात पण येताना मोबाईल खिशातून आणतात.  मग व्हिडिओ, फोटो, पिक्चर,  फाईल अपलोड  अॅड ट्रान्स्फर आणि चॅटिंग यातच यांची सुट्टी जात आहे. यापेक्षा अधिक लिहलं तर राग येईल आजच्या पिढीला.


आजच्या या परिस्थितीवर
आधुनिक मामाचा गाव  ही
कविता वाचून समाधान आणखी काही सांगायची गरज नाही.

झुक झुक झुक आगीनगाडी 
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव हाय मोठा
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया
मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया 
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको चटपट 
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया 
मामाच्या गावाला जाऊया

...........सतीश मोरे




२३ एप्रिल २०१६

जागतिक पुस्तक दिन विशेष

आठ दिवसांत लातूर दौरा आणि किरकोळ आजारपण यामुळे लिहता आले नाही.
आज जागतिक पुस्तक दिनी पुन्हा एकदा नव्याने सुरू करत आहे.

लोभ आहेच तो यापुढेही कायम रहावा. 




☑२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन

〰〰〰〰〰〰〰〰〰
२३ या अंकाला अंकशास्रामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे....
२३ अंक हा बुद्धिमत्ता कारक मानला जातो....
आज शेक्सपियर चा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस हि.....

🔲🔲🔲

🔺मरगळलेल्या, अस्वस्थ मनाला शांत करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे पुस्तकांनी भरलेली जागा “वाचनालय”. चाफ्याच्या फुलांनी मन जसं प्रफुल्लित होतं अगदी तसंच नवीन कोऱ्या पुस्तकाचं असतं. नवीन पुस्तकं हातात आलं की त्याचं नाव न पाहता त्याची किंमत न पाहता पहिला त्या पुस्तकाचा गंध मनात भरून घ्यावा हीच खऱ्या वाचकाची सवय. आज असं पुस्तकं आणि त्याचा सुगंध आठवण्याचा खास दिवस म्हणजे आजचा ‘जागतिक पुस्तक दिन’.
#२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

🔲🔲🔲

जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! विल्यम शेक्सपियरचा जन्म २३ एप्रिल, इ.स.१५६४ आणि मृत्यू देखील २३ एप्रिल, इ.स. १६१६. शेक्सपिअर हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.

वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

🔲🔲🔲

भरपूर आर्थिक संपत्ती नसताना देखील या जगातील एक व्यक्ती खूप श्रीमंत असते असे म्हटले जाते, आणि ती व्यक्ती म्हणजे ‘पुस्तक प्रेमी’. ज्याच्याकडे पुस्तकांचा खजिना असतो, त्याच्याकडे ज्ञानाचे भंडार असते.

🔲🔲🔲

चांगल्या पुस्तकांमुळे आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल घडतो. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.

🔲🔲🔲

कुणाला वाचनालयात जायला वेळ नाही लायब्ररीमध्ये उपलब्ध होणारी पुस्तकं फिरत्या वाचनालयातून घरपोच फिरू लागली.आता या वाचनालयांबरोबरच इंटरनेट आणि ‘ई-बुक’ देखील आहेत. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय असतो. पूर्वी केवळ ‘वाचनालय’ हे पुस्तके वाचण्याचे आणि मिळण्याचे एकमेव ठिकाण होते. लोक आवडीने वाचनालयास भेट द्यायचे. आज पुस्तके वाचण्याचे आणि खरेदी करण्याचे मोठो स्त्रोत निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानामुळे चांगल्या पुस्तांचा आणि लेखकांचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे.


📚📖📚📖🌎📖📚📖📚



आज शनिवार कविता डे

विल्यम शेक्सपिअर यांच्या प्रेम कविता अजरामर आहेत .

प्रेम वेड्या
त्या दोघांच्या भेटीचा हळुवार संवाद ,

माझ्या नजरेतून तुमच्या साठी !



तो आणि ती 

1

ती

कालची संध्याकाळ वेगळी होती
तुझ्या आठवणींची त्यात गर्दी होती

शोधत होते त्यामध्ये मीच मला
त्या गर्दीत मला दिसत होते
अफाट वाळवंट आणि बेफाम वारा!

त्याक्षणी
माझ्यासाठी आला एक ढग
तो आला एका क्षणासाठी पण

मी तृप्त झाले मणभर
ज्याची मी वाट बघत होते जीवनभर!


2

तो

मी माझा कधीकधी असतो
अनेकदा तुझ्याच विचारात असतो
मणभर आणि काकणंनर
जीवनभर आणि क्षणभर
नातं आपलं जपुया हर पल


3

ती

कधी कातरवेळी तुझी आठवण
मनी माझ्या दाटून येते
दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे
मग मन उगाच पहात राहते
तुझ्या स्पर्शाची जादू
मनाला हळूच हलवून जाते
तु नसतानाही असे का होते
माझे मलाच उमजत नाही
जवळ नसतानाही तुझा भास होतो
तुझ्या आठवणींत चिंब भिजवून जातो

4

तो

तुझी आठवण मला कधीच येत नाही
तुझी काळजी मात्र सतत लागून राहते
कुठेही रहा, सुखी रहा,
स्वच्छंद , सुमधूर, सुमंगल
पण
तुझ्यावरचा माझा अधिकार मात्र राखीव ठेव

तुझ्या सुखातच माझा आनंद आहे
तु उभी राहण्यातचं माझा स्वर्ग आहे.


5

ती

मी कुठेही असेन
तुझ्यासाठी तुझ्यातच असेन
साद दे कधीपण जीवलगा
येईन परतुन सख्या साजना

आठवतोय तुला तो पाऊस
नाही? असं का करतोस

काल पुन्हा पाऊस आला 
पाऊस पडून गेला अन
तुझ्या आठवणीने पुन्हा गर्दी केली

हुरहुर लावतात तुझ्या या आठवणी
पण सुखद स्पर्शाचा थंडावाही देतात

जायचं असतं परतून तर येतोसच का? 
वेड या जीवा लावतोस का ?    
                            
यायच्या आगोदर तुला परतुनी जायचं असत
मला मात्र सतत तुझ्याजवळ राहायचं असतं


6

तो

मला परत जायचंच नसतं
तुझ्या जवळ रहायचे असतं..

मी आल्यावर तुझ्याजवळ असतो
गेल्यानंतर तर तुझ्यामध्येच असतो


                   ..........सतीश मोरे


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...